My son (Ajit), and daughter-in-law (Neelam) suggested to me that I should have a blog of my own. Because of their kind suggestion, I have created this blog.
Friday, June 11, 2021
हिवाळ्यातील डावपेचांची लढाई
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
लडाखमधील चुशूल व आजूबाजूच्या उंच भागातून भारताने आपला फौजफाटा हिवाळ्यापूर्वी मागे घ्यावा, असा आग्रह चीनने नुकत्याच पार पडलेल्या सैनिकी व राजकीय प्रतिनिधींच्या बैठकीत धरला असून सध्या या मुद्यावरच वाटाघाटी अडल्या आहेत. भारताने सुचविलेल्या यानंतरच्या बैठकीबाबत चीनकडून अजून काहीही निरोप नसल्याचे वृत्त आले आहे, यानंतरच्या बैठकीत तणाव निवळेल, असे मधाचे बोट लावण्यास मात्र चीन विसरला नाही, तर लडाखला प्रगतीसाठी चीनची आवश्यकता आहे, ही किंवा अशी वृत्ते(?) बोलकी आहेत. दुसरीकडे रेचिन ला आणि रेझॅंग ला यासारखी कैलासपर्वतरांगामधील ठाणी भारताने रिकामी करावीत असाही आग्रह चीनने धरला आहे. या मोबदल्यात आपण फिंगर 4 पासून फिंगर 8 पर्यंत मागे सरकू, असा चलाख आणि सामरिक दृष्ट्या चीनच्याच फायद्याचा प्रस्तावही समोर ठेवला आहे.
चीनला डेपसॅंग सेक्टरमध्येही काही मोक्याची ठाणी हवी आहेत. तसे झाले तर शक्सगम दरीकडे जायला कमी लांबीचा आणि सोपा मार्ग चीनच्या हाती येईल. तसेच काराकोरम खिंडीकडे जायचा मार्गही सुकर होईल. दौलत बेग ओल्डी भारताच्या ताब्यात आहे, हेही चीनला नको आहे. कारण त्यामुळे चीन-पाकिस्तान एकॅानॅामिक कोरिडॅार या महत्त्वाकांक्षी मार्गाला भारताकडून कायमस्वरुपी धोका निर्माण होईल अशी चीनला भीती वाटते. पण हाच चीन स्वत: मात्र भूतान, उत्तराखंड आणि अरुणाचलांच्या सीमेलगत मोक्याच्या ठिकाणी गावे वसवतो आणि नापाक सेनेसोबत कवायती करतो आहे.
पाकिस्तानला चिथावणी
भारताला चीनचे हे सर्व प्रस्ताव सपशेल अमान्य आहेत/असणार हे उघड आहे. कारण असे झाले तर एका बाजूला चिनी फौजा तर दुसरीकडून सियाचीनमधील पाकिस्तानी फौजा यांच्या कात्रीत दौलत बेग ओल्डी सापडेल. या भागात आपली बाजू आणखी पक्की व्हावी यासाठी पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरचा चीन-पाकिस्तान एकॅानॅामिक कोरिडॅारच्या जवळ असलेला भूप्रदेश ताब्यात घ्यावा व चीन-पाकिस्तान एकॅानॅामिक कोरिडॅारला बऱ्यापैकी सुरक्षित करावे, असे चीमचे पाकिस्तानला, सांगणे कसले, चिथावणे आहे. यासाठी पाकिस्तानला राजकीय पातळीवर पाठिंबा आणि भारतात दहशतवादी घुसवण्यास प्रोत्साहन, चीन देतो आहे. भारताने त्यांच्यावर कारवाई करताच, अमेरिकेत प्रस्थापित होऊ घातलेली राजवट, भारतात काश्मीरमध्ये मानवी हक्क हनन होत असल्याचे निमित्त पुढे करून भारतावरच दबाव आणील, असा चीनचा डाव/कयास आहे.
जून 2020 मध्ये गलवानची चीनला अद्दल घडवणारा घटना घडली. चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच होते . पुढे या भागात बर्फवर्षा होणार होती. त्यामुळे हे वातावरण निवळेपर्यंत चीनने शांत राहण्याचे आणि चर्चेच्या फेऱ्या चालू ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे. या काळात ठिकठिकाणी आवश्यक तो शस्त्रसाठा व अन्नधान्यादींचा पुरवठा करून ठेवण्यास सुरवात केली आहे.
या काळात भारताने प्रत्यक्ष ताबा रेषेच्या आतल्याच पण उंचवट्यांच्या आणि म्हणून मोक्याच्या जागी आपला तळ ठोकला आहे. त्यामुळे आता चिनी फौजा सपाट मैदानी भागात आल्या असून भारतीय सैनिक उंच ठाण्यांवरून त्यांच्या हालचाली टिपू शकतील अशी स्थिती निर्माण झाली आहे.
ही स्थिती अर्थातच चिनी फौजांसाठी सोयीची नव्हती/नसणारच. भारतीय सैनिक लढाईत सुद्धा लढाईविषयक संकेत आणि नियमांचे पालन करतात, याची चिनी सैनिकी अधिकाऱ्यांना खात्री आहे. त्यामुळे उंचीचा फायदा घेऊन भारतीयांकडून आपल्यावर हल्ला होईल अशी त्यांना मुळीच भीती नाही. पण थंडी ओटोपल्यानंतर काय, ही चिंता त्यांना सतावत असणार. मधल्या काळात चर्चेदरम्यान दोन्ही फौजांनी आपापल्या भागात थोडेथोडे सरकावे, यावर एकमत व्हावे असा चीनचा प्रयत्न आहे. भारतीय फौजी या मोक्याच्या ठिकाणाहून खाली उतरल्या तर पहावे, हा हेतू समोर ठेवून चीन सध्या आपल्याशी चर्चा करू पाहतो इथे त्यांची एक चूक झालेली दिसते आहे, भारतीयांची भूमिका चर्चेने प्रश्न सुटावेत अशी असली आणि ते लढाई करतांना सुद्धा सगळे नियम व संकेत पाळणारे असले तरी ते बावळट नाहीत, हे चिन्यांना माहीत नसावे. म्हणून आपण बळकावलेल्या भागातून मागे सरकू आणि भारतीय फौजा आपल्याच ताब्यातील भूभागातून मागे सरकतील, असा त्यांचा डाव आहे.
चीनचा अपेक्षाभंग
भारतात सत्ताबदल झाल्यानंतर मोदी शासनाने पाकिस्तानबाबत एकामागून एक निर्णय घ्यायचा जो सपाटा लावला तो चीनला अपेक्षित नव्हता. सुरक्षेसाठी सीमावर्ती भागात रस्त्यांचे जाळे विणणे, सैनिकी सुसज्जतेवर भर देणे, प्रत्युत्तर म्हणून सर्जिकल स्ट्राईक्स करणे, बालाकोटवर तर चक्क विमानहल्लाच करणे, डोकलामप्रकरणी कडक भूमिका घेणे, काश्मीरबाबतची राज्यघटनेतील 370 व 35 ए ही कलमे वगळणे, नवीन नकाशा प्रसिद्ध करून गिलिगित, बाल्टिस्थान आणि आक्साई चीनवरच्या अधिकाराचा पुनरुच्चार करणे हे सर्व जगाप्रमाणे चीनलाही अपेक्षित नव्हते. अशा भारताची जगाने आणि चीननेही अपेक्षाच ठेवली नव्हती. भारताच्या या आत्मविश्वासाला टाचणी टोचून फुग्याप्रमाणे फोडून टाकावे, या हेतूने चीनने लडाख, उत्तराखंड, अरुणाचल आदी क्षेत्रात घुसखोरी करायला सुरवात केली. पण चीनचा अपेक्षाभंग झाला. भारताने प्रत्युत्तरादाखल कारवाई केली. गलवानप्रकरणी तर चीनला धड प्रतिक्रियाही देता आली नाही. भारताने आमचे सैनिक किती मारले ते आम्ही जाहीर करीत नाही, कारण असे केल्यास परिस्थिती आणखी चिघळेल, असे म्हणत समजुतदारपणाचा आव चीनने आणला. भारताने गमावलेल्या वीसही सैनिकांना त्याचा गौरव करीत त्यांच्या मूळगावी हजारोंच्या उपस्थितीत लष्करी इतमामाने मानवंदना दिली तर चीनने आपल्या सैनिकांच्या बाबतीत असे काहीही केले नाही, ही घटना अनेक दृष्टींनी बोलकी आहे.
चिनी प्रचारतंत्र
मध्यंतरी अशा वार्ता कानावर येत होत्या की, चीनने असा प्रस्ताव ठेवला आहे की, आम्ही फिंगर 4 पासून फिंगर 8 पर्यंत मागे हटायला तयार आहोत. अशाप्रकारे आम्ही बफर झोन तयार करू. या भागात आम्ही गस्त घालू पण भारताला मात्र या भागात गस्त घालता यायची नाही. याशिवाय दोन्ही बाजूंनी आपले रणगाडे आणि तोफाही प्रत्यक्ष ताबारेषेपर्यंत मागे घ्याव्यात. पण याच्या अगोदर तुम्ही. भारतीयांनी कैलासपर्वतांच्या रागांमधील चुशूलच्या उंचवट्यांवरून खाली उतरले पाहिजे. इकडे हे शब्द हवेत विरतात न विरतात तोच चीनच्या ग्लोबल टाईम्सने प्रसिद्ध केले की, असा कुठलाही प्रस्ताव आम्ही समोर ठेवलेला नसून कडाक्याच्या थंडीला घाबरून भारतीयांच्याच मनात हा विचार घोळतो आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की, हा चीनच्या प्रचारतंत्राचा एक भाग होता. चीनच्या अपेक्षेप्रमाणे भारतात या विषयावर बरेच चर्वितचर्वण होऊन चीनचा उद्देश काही अंशी तरी सफल झाला.
भविष्यात संघर्ष उद्भवलाच तर सध्या ताब्यात असलेल्या मोक्याच्या ठिकाणांवरील ताब्याच्या आधाराने आपण चीनला जबरदस्त टक्कर देऊ शकू. चीनला याची जाणीव
आहे. चर्चेच्या टेबलावरील डावपेचात हा हुकमी एका आपल्या हातून जाणार नाही, याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल. कारण लढाईत जिंकायचे पण चर्चेत मात्र ते गमवायचे यासाठी आपण कुप्रसिद्ध आहोत.
तसेच आपण डेपसॅंगच्या बाबतीतही अशीच आपल्याच हद्दीत चढाईची भूमिका घ्यायला हवी होती का? पण हा ताबा शत्रूच्या माऱ्याच्या टप्यात असेल. लढाईत अशी ठाणी ताब्यात ठेवणे कठीण जाते व ती ताब्यात ठेवता आलीच तर त्यासाठी सैनिकीहानीची बरीच मोठी किंमत मोजावी लागेल. त्यामुळे सध्या या भानगडीत न पडणेच चांगले, असे लष्करीतज्ञांचे मत आहे. हा मुद्दा सैनिकी डावपेचांच्या अभ्यासक्रमातला एक महत्त्वाचा पाठ ठरावा असा आहे. चुशूलसारखीच ठाणी ताबारेषेवर अन्यत्रही आहेत. त्यातलेच एक ठाणे आहे, सियाचीनमधील साल्टोरो रांगेवरचे आहे. हेही असेच महत्त्वाचे ठाणे आहे. चर्चेच्या फेऱ्या कितीही होत आणि कितीही वेळ चालोत. कोणत्याबाबतीत काहीही झाले तरी माघार घ्यायची नाही, या बाबतीतली खुणगाठ मनात पक्की ठेवूनच योग्य संधीची वाट पाहत यानंतरच्या चर्चांच्या फेऱ्यात सहभागी होत राहणे अतिशय महत्त्वाचे आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment