Friday, June 11, 2021

कोविडसाठी सुव्यवस्थापनतंत्राचा अपेक्षित विकास वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? एखादी जटिल योजना सफल व्हायची असेल तर फक्त आवश्यक ती सर्व सामग्री असून चालत नाही. त्यासाठी सक्षम व्यवस्थापन असावे लागते. म्हणजेच योग्य संचालनाची आवश्यकता असते, गरजेनुसार योग्य आणि सुसूत्र क्रियान्वयनतंत्र (अंमलबजावणी) अवगत असावे लागते. आधुनिक शब्दावलीनुसार याला लॅाजिस्टिक असे म्हटले जाते. हा नवीन युगाचा कानमंत्र आहे. संघासारख्या संस्था यात तरबेज मानल्या गेल्या आहेत. परंतु त्या संघापुरत्याच मर्यादित आहेत/असाव्यात असे नाही. इतरत्रही अनेक ठिकाणी हा कानमंत्र प्रयत्न आणि जाणीवपूर्वक जपला आणि जोपासला जातांना आढळून येत असतो. कोरोनाबाबत तर याची विशेष आवश्यकता आहे. तृणमूलस्तरावर नियोजन हवे लस वगळता औषधादी उणिवांची कमतरता आज ना उद्या संपेलही. ॲाक्सीजनबाबत तर योग्य साठवण, वितरण आणि वाहतुक व्यवस्था करता आली तर अडचण पडायला नको. ॲाक्सीजनपेक्षा सिलेंडर आणि टॅंकरचीच किंमत कितीतरी जास्त असते. ॲाक्सीजन प्लॅंट्स पूर्व आणि पश्चिम भारतातच जास्त असा भौगोलिक असमतोलही आहे. कोरोनाची समस्या हाताळण्यासाठी, नातेवाइकांची ॲाक्सीजन बेड्स, आयसीयू बेड्स आणि औषधांसाठीची धावाधाव टाळण्यासाठी, उपलब्ध सामग्रीचा योग्य आणि न्याय्य वापर होण्यासाठी, विशेषत: मोठ्या शहरात एकाच मध्यवर्ती नियंत्रण कक्षाऐवजी वॅार्डस्तरावर वॅार रूम्सची उभारणी करण्याचा विकेंद्रीकरणाचा प्रयोग पहिल्या लाटेचे वेळीच यशस्वी ठरला आहे. कोरोनाचा रुग्ण हॅास्पिटलमध्ये येण्याची वाट पाहू नका. कोरोनाचा पाठलाग करा, रुग्णांचा शोध घ्या आणि उपचार करा, हे धोरण स्वीकारणे पूर्वी पहिल्या लाटेच्या वेळी यशस्वी ठरले होते. रुग्णांच्या नातेवाइकांनी वॅाररूमला सूचित करावे, तिथून जवळच्याच हॅाटेलमध्ये मुक्कामाला असलेल्या डॅाक्टरांच्या चमूला सूचना मिळावी, त्यांनी रुग्णाच्या घरी जाऊन तपासणी आणि चाचणी घेऊन त्याला गृहविलगीकरण करून घरच्याघरी टेलिमेडिसिन तंत्राने डॅाक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करणे, सुरक्षित हॅास्पिटलमध्ये भरती करणे, तिथे साधा बेड, ॲाक्सिजन बेड, आयसीयू बेड यापैकी कोणती सुविधा आवश्यक आहे हे पाहून, मार्गदर्शन करीत रवानगी होईल अशी व्यवस्था करणे, हे आज सर्वांसाठी सोयीचे ठरणार आहे. पण यासाठी तज्ञ मनुष्यबळाची कमतरता सध्या जाणवते आहे, त्यासाठी नेमके आणि अल्पप्रशिक्षण देऊन वैद्यकीय आणि नर्सिंग विद्यालयातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांमधून अशी चमू तयार करून तज्ज्ञासोबत पाठविली तर या प्रश्नाची तीव्रता काहीशी कमी करता येईल. चमूत एक डॅाक्टर, एक चाचणी अधिकारी, एक परिचारिका याशिवाय आवश्कतेनुसार 3 सदस्य असावेत. सध्या ही विद्यार्थी मंडळी महाविद्यालये बंद असल्यामुळे आपापल्या गावी गेलेली असतील, त्यांना पंतप्रधानांनी सुचविल्याप्रमाणे उचित मानधनावर मुंबई, दिल्ली सारख्या आणीबाणी निर्माण झालेल्या शहरात बोलवून नामांकित हॅाटेलमध्ये त्यांच्या निवासाभोजनादीची व्यवस्था करावी, हे निवासस्थान वॅाररूमजवळच असावे, म्हणजे येण्याजाण्याची यातायात वाचेल. त्याचप्रमाणे औषधांसाठीची वणवण टाळण्यासाठी, औषधे हॅास्पिटलमध्येच उपलब्ध असावीत, यामुळे नातेवाइकांना शोधाशोध करीत फार्मस्यांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत, आवश्यक त्यालाच आवश्यक ते आणि तेच औषध, आवश्यक तेवढेच मिळेल, अशी सक्षम पुरवठा व्यवस्था उभारावी लागेल. हॅास्पिटल्सचे सुरक्षा परीक्षण आणि अंकेक्षणही नियमितपणे व्हायला हवे. तसेच तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, लस वाया न जाऊ देता, लसीकरणाच्या मोहिमेबाबतचा - आपला लसीकरणाचा वेग जगात सर्वात जास्त आहे. यात ॲान लाईन रजिस्ट्रेशन करणाऱ्यांना लसीकरणाच्या तारखा आणि वेळा नेमून देता येतात. पण ज्यांना ही सुविधा विविध कारणास्तव उपयोगात आणता येत नसेल त्यांचे काय? यासाठी वॅार्डस्तरावर पंजीयनाची कक्षांची सोय उपलब्ध करून द्यावी. तसेच लसीकरणाची तारीखही त्यांना त्याचवेळी देण्याची व्यवस्था करावी. लसीकरणासाठी आलेल्या लोकांना केंद्रावरून परत जावे लागू नये. अमेरिकेतील स्थिती 20 जानेवारी 2020 ला अमेरिकेत पहिला करोनारुग्ण आढळून आल्यानंतर पुढे 3.5 कोटीच्या जवळपास लोक कोरोनाने बाधित झाले होते. त्यापैकी 6 लाखाच्या जवळपास लोक मृत्यू पावले आहेत. दोन्ही महायुद्धे आणि व्हिएटनाम युद्ध यातही एवढे लोक मृत्युमुखी पडले नव्हते, हे लक्षात घेतले म्हणजे अमेरिकेतील प्रकोपाची तीव्रता लक्षात येईल. मुखाच्छादन, गर्दीवर बंदी, घराबाहेर न पडण्याचे आदेश, शाळादींना सुटी असे उपाय अमेरिकेने योजले. पण तरीही गरीब, कृष्णवर्णी आहेणि लॅटिन अमेरिकन यांचा फार मोठ्या प्रमाणात बळी गेला. भारतातील लसीकरण आजच्या गतीने भारतात जर 18 पेक्षा जास्त वय असलेल्या सर्वांचे लसीकरण करायचे झाले तर आणखी सात महिने लागतील असा एक संख्यशास्त्रीय अंदाज/ हिशोब टाटा कन्सल्टंन्सी सर्व्हिसेस आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ॲाफ इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंगने मांडला आहे. कोरोनाची दुसरी लाट आली हे कळताच लसीकरणासाठी एकच झुंबड उडालेली दिसते आहे. मात्र मागणीच्या प्रमाणात लस उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना परत जावे लागले आहे. हे थांबलेच पाहिजे. यासाठी नियोजन करून जेवढ्या लसी उपलब्ध आहेत, तेवढ्यांनाच निरोप गेले पाहिजेत. कोरोनाने ग्रासित होणाऱ्यांचा वेग पाहता लसीकरणात खूपच वाढ होण्याची आवश्यकता आहे. अमेरिकेने 3 लसींना मान्यता दिली असून आपल्या 25 टक्के लोकसंख्येचे लसीकरण केले आहे. आपल्याकडे 3 री रशियन लस आता येते आहे. लवकरच आणखी काही लसी येतीलच. श्रीमंत अमेरिकेने आपल्या लोकसंख्येला पुरून उरेल इतका लसींचा साठा करून ठेवलेला आहे. आपले तसे नाही. तसे करणे आपल्याला सहज शक्यही नव्हते. 1 मे पासून भारताने 18 ते 44 वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्यास सुरवात केली आहे. अजूनही 45 आणि वरील वयोगटाचे पहिले लसीकरणही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मोठ्या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करणारी केंद्रे आणि 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाची केंद्रे वेगळी ठेवणे आवश्यक होते. तशी ती ठेवलीही जात आहेत. अमेरिकेसमोर सध्या एक दुसरी वेगळीच अडचण उभी झाली आहे. ज्यांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे त्यापैकी अनेक दुसरी मात्रा घेण्याचे बाबतीत टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे त्यांनी लसीकरणासाठी पुढे यावे, अशी खास विनंती अध्यक्ष बायडेन यांना करावी लागली आहे. भौतिक प्रगती आणि जागरूकता यांतील व्यस्त प्रमाण या निमित्ताने पुढे आले आहे. भारताची स्थिती वेगळी आहे. प्रचंड लोकसंख्या, दुसऱ्या लाटेची पसरण्याची वेगवान गती आणि लसींचा अपुरा पुरवठा, लसीच्या उपयुक्ततेबाबत शंका आणि लसीच्या प्रतिकूल प्रतिक्रियेची भीती हे प्रश्न आपल्या इथे आहेत, तसे ते तिथे फारसे नाहीत. ॲागस्ट अखेरपर्यंत आपण दरमहा 7 कोटीवरून 14 कोटी पर्यंत वाढवू शकू असा आजचा हिशोब आहे. 72 कोटी लोकांचे लसीकरण जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत हर्ड इम्युनिटी येणार नाही. 72 कोटी लोकांना लसीच्या दोन मात्रा द्यायच्या म्हणजे 144 कोटी मात्रा लवकरात लवकर तयार कराव्या लागतील किंवा मिळवाव्या तरी लागतील. आपली स्थिती वाईटच पण ... 6 कोटीच्या लोकसंख्या असलेल्या इटालीमध्ये रोजचे सरासरी 344 मृत्यू म्हणजे दर कोटी लोकसंखयेमागे 57 इतका मृत्युदर आहे. 6.5 कोटींच्या फ्रान्समध्ये 344 मृत्यू म्हणजे दर कोटी मागे 48 मृत्युदर आहे. 8.4 कोटीच्या जर्मनीत 320 मृत्यू म्हणजे दर कोटी मागे 38; तर 33.2 कोटींच्या अमेरिकेत 954 मृत्यू म्हणजे दर कोटी मागे 29 आहे. ही सर्व विकसित आणि सुसज्ज राष्ट्रे मानली जातात. तर 138 कोटीच्या विकसनशील भारतात 3,647 मृत्यू म्हणजे दर कोटी मागे 26 असा सर्वात कमी मृत्युदर आहे. अर्थात हाही कमी असावा/व्हावा अशी अपेक्षा बाळगणे गैर नाही. पण केवळ भारतातच हाहाकार माजला आहे, हे खरे नाही पण हे फक्त भारतातच हे झाले आहे असा जो प्रचार भारताबाहेरचे व आणि भारतातले हितशत्रू करीत आहेत, त्याचा फोलपणा उघड करून मांडणेही तेवढेच आवश्यक आहे. या युगात, सामर्थ्य आहे सुनियोजित चळवळीचे | जो जो करील सातत्याने, तयाचे | परंतु तेथे भगवंतासह तज्ज्ञांचेही आधिष्ठान पाहिजे ||

No comments:

Post a Comment