My son (Ajit), and daughter-in-law (Neelam) suggested to me that I should have a blog of my own. Because of their kind suggestion, I have created this blog.
Friday, June 11, 2021
त्रिमूर्तींची गौरवशाली शौर्यगाथा
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ,
नागपूर 440 022
मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
जगातल्या मोठ्या आणि प्रमुख ग्लेशियर (हिमनद्यांपैकी) सियाचिन ही एक हिमनदी असून हा सर्व भाग एक अतिसुंदर पर्वतीय प्रदेश म्हणून ओळखला जातो. हिमालयातील काराकोरम पर्वत रांगांमधली सियाचिन ही हिमनदी 5 हजार 4 शे मीटर उंचीवर आहे. भारताने सियाचिनवर ताबा मिळविण्यासाठीची मोहीम 1984 सालच्या 13 एप्रिलला योजिली होती. पुढे काही काळानंतर पाकिस्तानला मात देत या उंच युद्धक्षेत्रावरची मोहीम यशस्वीरीत्या पार पाडून भारतीय सैन्यदलाने मानवी सहनशक्तीचा नवा उच्चांकही प्रस्थापित केलेला आढळतो.
ॲापरेशन मेघदूत
लेफ्टनंट जनरल प्रेमनाथ हून यांच्या नेतृत्वातील या मोहिमेचे नाव, ॲापरेशन मेघदूत असे योजून सैन्यदलाने आपल्या कल्पकतेचा परिचय दिला आहे. कालिदासाच्या मेघदूत या काव्यात, रामटेक मुक्कामी शिक्षा भोगीत असलेला शापित यक्ष आपल्या प्रियतमेला निरोप पाठविण्यासाठी मेघाची दूत म्हणून योजना करतांना दाखविला आहे. उत्तर लडाखमधील सियाचिन ग्लेशियर सर करण्यासाठी निघालेल्या लष्कराला मार्गदर्शन करीत, वेळ पडल्यास संरक्षण देण्याची तयारी ठेवीत, रसद आणि सैनिकी सामग्री पुरवीत निघालेल्या भारतीय वायुदलाच्या हेलिकॅाप्टर्स, विमानादी आकाशयानांच्या मोहिमेचे ‘ॲापरेशन मेघदूत’ असे अभिनव नामकरण वायुदलाने केलेले आढळते. फरक इतकाच की, कालिदासाच्या मेघदूतात यक्ष आणि त्याची प्रियतमा यांची ताटातूट झाल्यामुळे विप्रलंभ शृंगार ठायाठायी आढळतो तर भारतीय सैन्य दलाच्या मेघदूत मोहिमेत निखळ वीररसाची प्रचिती येते.
ॲापरेशन राजीव
यानंतरचे 1987 चे बाणासिंगांच्या नेतृत्वाखालील ॲापरेशन राजीव हे खऱ्या अर्थाने ॲापरेशन मेघदूतााचीच पुढची पायरी म्हटली पाहिजे. याही अगोदर सेकंड लेफ्टनंट राजीव पांडे यांना अशाच मोहिमेत हौतात्म्य प्राप्त झाले होते. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ आणि गौरवार्थ ह्या मोहिमेचे नाव ॲापरेशन राजीव असे ठेवण्यात आले होते. या मोहिमेत सियाचिन हिमनदी, तिच्या तीन उपनद्या, तसेच साल्टोरोहा सुळका यासह सिया ला, बिलाफॅांड ला आणि ग्यॅांग ला या मोठ्या, मोक्याच्या आणि महत्त्वाच्या खिंडी यावरही भारताने ताबा मिळवला आहे. अशाप्रकारे 2600 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर भारताचे प्रभुत्व प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला.
सियाचिनचे सामरिक महत्त्व
सियाचिनला पृथ्वीचा तिसरा ध्रुव असेही म्हटले आहे. चीन आणि पाकिस्तानला तो आपल्या ताब्यात हवा आहे तर भारताला चीन आणि पाकिस्तान यात सियाचिनचा उपयोग पाचरीसारखा उपयोगाचा आहे. लडाखचा उत्तरभाग आणि विशेषत: दौलत-बेग ओल्डी हे महत्त्वाचे ठाणे, सियाचिनमुळे पाकिस्तानपासून कसे संरक्षित आहे, ते सोबतच्या आकृतीवरून वरून स्पष्ट होते.
नरिंदर कुमार यांची सियाचिन मोहीम
कर्नल नरिंदर कुमार यांना पर्वतारोहणाचीही आवड होती. त्यांनी माऊंट एव्हरेस्ट, नंदादेवी या सारखी अनेक शिखरे सर केली आहेत, हिमबाधेमुळे (फ्रॅास्टबाईट) त्यांच्या पायाची चार बोटे कापावी लागली होती. पण त्यांचा उत्साह कायमच राहिला. लेफ्टनंट जनरल प्रेमनाथ हून यांचे ॲापरेशन मेघदूत 1984 सालचे. पण या अगोदर जे जे घडले त्याची माहिती फार कमी लोकांना असेल. तब्बल सहा वर्षे अगोदरपासून म्हणजे 1977 पासूनच भारताची टेहळणी पथके आपली भूमिका पार पाडीत होती, या कानाचा त्या कानालाही पत्ता लागू न देता! कर्नल नरिंदर कुमार यांच्या या सियाचिन मोहिमा अतिशय महत्त्वाच्या आणि मोलाच्या होत्या. सियाचिनचा नरिंदर कुमार यांनी घेतलेला वेध, शोध, दाखविलेली दूरदृष्टी, धैर्य आणि शौर्य अतुलनीय असल्याचे उल्लेख आज सैनिकक्षेत्राव्यतिरिक्त इतरत्रही ठिकठिकाणी आढळून येतात.
खरेतर सियाचिनबाबतची माहिती कर्नल नरिंदर कुमार यांना तशी योगायोगानेच समजली होती. नरिंदर कुमारांना गिर्यारोहणाशी संबंधित एका अमेरिकन नियतकालिकात सियाचिन पाकिस्तानात असल्याचे दाखविलेले दिसले आणि ते अतिशय अस्वस्थ झाले. आणखी तपशिलात गेल्यावर त्यांना अमेरिकन वायुदलाने पाकिस्तानच्या या दाव्याचे समर्थन केलेले दिसले, तेव्हा तर ते भडकलेच. नरिंदर कुमार यांनी हा नकाशा ताबडतोब भारतीय सैन्यदलाच्या मुख्यालयाकडे पुढील कारवाईसाठी पाठविला. अमेरिकन सैन्यदलाची ही नसती उठाठेव संरक्षण विभागाने अतिशय गांभीर्याने घेतली आणि सियाचिनबाबतच्या वस्तुस्थितीची शोधमोहीम हाती घेऊन इत्थंबूत माहिती मिळविण्यासाठी नरिंदर कुमार यांनाच अनुमती दिली.
त्याकाळी सियाचिन हिमनदीवर पाकिस्तानच्या बाजूकडूनही अनेक मोहिमा आखल्या जात असत. या वार्ता कानावर पडत तेव्हा नरिंदर कुमार अतिशय अस्वस्थ होत. सियाचिनबाबत माहिती मिळविण्याची अनुमती मिळताच 1977 मध्ये नरिंदर कुमार यांनी 70 गिर्यारोहकांची चमू गठित करून एकापाठोपाठ एक अशा अनेक मोहिमा आखल्या. 1981 पर्यंत त्यांनी अनेक शिखरे पादाक्रांत केली होती. आता सियाचिनचा चप्पा न चप्पा त्यांना माहिती झाला होता.
सीमा कशा ठरतात?
सियाचिनवर ताबा मिळविण्यासाठी पाकिस्तानच्या कारवाया गुप्तपणे सुरूच होत्या. भारत नेहमीप्रमाणे 1949 च्या कराची करारावर आणि नंतरच्या 1972 च्या सिमला करारावर भोळेपणाने आणि बावळटपणे विसंबून होता. तसे पीहिले तर याला एक कारणही होते. सियाचिनचे तापमान इतके कमी असते की तिथे मानवी वसती टिकणे अशक्यच आहे, याची नोंद खुद्द दोन्ही करारातच होती. सियाचिनमुळे लडाखचे दोन भाग होतात. हा जलप्रवाह पुढे भारतातील स्क्योक नदीला जाऊन मिळतो. म्हणून नियम आणि संकेतानुसार सियाचिनवर भारताचा अधिकार आहे, हे स्पष्ट होते. पण डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे, सीमांची आखणी सर्व्हेअर करू शकतो. सर्व्हेनुसार सियाचिन भारताचाच भाग ठरतो. पण सीमा ठरविणे हे सर्व्हेअरचे नव्हे तर ते मुत्सद्यांचे काम आहे. त्यामुळे नुसत्या सर्व्हे रिपोर्टवर विसंबून राहता येत नाही. त्याला शक्तीची जोड हवी असते.
भारत काहीतरी करून सियचिन ताब्यात घेणारच, असे पाकिस्तानच्या मनाने घेतले आणि म्हणून दोन्ही करारातील तरतुदींकडे साफ दुर्लक्ष करीत पाकिस्तानने केवळ सियाचिनच नव्हे तर काराकोरम पर्वतरांगांवरही आपला अधिकार गुपचुप प्रस्थापित करण्याचे ठरविले. सर्व टेकड्या, सुळके आणि खिंडींवर ताबा मिळावयाचाच असा निर्धार करून पर्वतारोहणासाठीचे साहित्य विकत घेण्यासाठी पाकिस्तनने एका विदेशी विक्रेत्याकडे मागणी नोंदविली.
योगायोगानेच पाकचे गुपित उघड झाले
योगायोगाची गोष्ट म्हणा किंवा पुरेशी काळजी न घेतल्यामुळे म्हणा, पाकिस्तानच्या नजरेतून एक गोष्ट निसटली, ती ही की, भारतही याच विक्रेत्याकडून पर्वतारोहणासाठीचे साहित्य पूर्वीपासूनच निरनिराळ्या निमित्ताने विकत घेत होता. आपल्या गुप्तहेर खात्याला पाकच्या मागणीची बातमी कळली आणि संरक्षण विभाग खडबडून जागा झाला. पाकिस्तानचा डोळा सियाचिनवर आहे, हे भारताने ताडले आणि सियाचीन मोहिमेच्या आखणीला तातडीने प्रारंभ झाला. मोहिमेचे सांकेतिक नाव ठरले, ॲापरेशन राजीव! कामगिरी फत्ते करण्याची जबाबदारी सोपविली गेली, सुभेदार मेजर बाणासिंग यांच्याकडे. अल्पावधीतच म्हणजे 26 जून 1987 ला 21 हजारफुटापेक्षा जास्त उंचीवर उणे 26 अंश तापमानात सियाचिनमधील शिखरावर बाणासिंगांनी तिरंगा फडकवला. यावेळी भारताने पाकिस्तानला मात दिली पण ती फक्त चारच दिवस अगोदर शिखरावर पोचून! बाणासिंगांचा परमवीर चक्राने सन्मान करण्यात आला. पाकिस्तानने या शिखराला जिनांचे नाव देण्याचे ठरविले होते. आता भारताने तो मान बाणासिंगांना दिला.
मेजर नरिंदर कुमार यांनी पाकिस्ताने मनसुबे वेळीच शोधले आणि तातडीने ही माहिती संरक्षण खात्याला कळविली म्हणूनच मेघदूत आणि राजीव या मोहिमा वेळीच आखता आल्या. परम विशिष्ट सेवा मेडल, कीर्ति चक्र, अति विशिष्ट सेवा मेडल, पद्मश्री, अर्जुन ॲवॅार्ड, मॅक्ग्रेगर मेडल असे सैनिकी आणि नागरी गौरव प्राप्त करणाऱ्या या कर्नल नरिंदर कुमारांनी नुकताच म्हणजे 31 डिसेंबर 2020 ला वयाच्या 87 व्या वर्षी आपला निरोप घेतला आहे. तर परम विशिष्ट सेवा मेडल आणि अति विशिष्ट सेवा मेडल यांनी गौरवान्वित असलेल्या लेफ्टनंट जनरल प्रेमनाथ हून यांनी आपली इहलोकीची यात्रा नरिंदर सिंगांच्या अगोदर 6 जानेवारी 2020 ला वयाच्या 91 व्या वर्षी संपविली होती. आज हयात असलेल्या तीन परमवीरचक्रधाऱ्यांपैकी सर्वात ज्येष्ठ असलेले सुभेदार मेजर आणि ॲानररी कॅप्टन बाणासिंग आज 72 वर्षांचे आहेत. अशी आहे या त्रिमूर्तींची गौरवशाली वीरगाथा!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment