My son (Ajit), and daughter-in-law (Neelam) suggested to me that I should have a blog of my own. Because of their kind suggestion, I have created this blog.
Friday, June 11, 2021
कमला हॅरिस यांची राजकीय भूमिका
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
जॅान एफ केनेडीचा अपवाद वगळला तर अमेरिकेत जेव्हाजेव्हा डेमोक्रॅट पक्ष सत्तेवर आला आहे, त्यात्या वेळी अमेरिकेची भूमिका पाकिस्तानधार्जिणी राहिलेली आहे. तुलनेने भारताला सैनिकी स्वरुपाची व/वा अन्य मदत सामान्यत: रिपब्लिकन पक्षाच्या राजवटीतच मिळालेली आढळते. सध्या अमेरिकेत ज्या जनमत चाचण्या होत आहेत, त्यात डेमोक्रॅट पक्ष आघाडी घेतांना दिसतो आहे.
डेमोक्रॅट पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार ज्यो बायडेन हे 78 वर्षांचे आहेत. त्यामुळे त्यांना एका तरूण आणि तडफदार साथीदाराची साथ असावी, या भूमिकेतून कमला हॅरिस या 55 वर्षाच्या भारतीय-आफ्रिकन-अमेरिकन महिलेची निवड डेमोक्रॅट पक्षाने उपाध्यक्षपदासाठी केली असावी, असे एक मत आहे. अमेरिकेत उपाध्यक्ष हा फारसा प्रकाशात नसतो. मायकेल पेन्स हे विद्यमान उपाध्यक्ष आहेत हे कुणाला फारसे माहीतही नसेल. पण कमला हॅरिस यांचे तसे नाही. त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय प्रभावी आहे. डेमोक्रॅट पक्ष निवडून आल्यास कमला हॅरिस यांच्याकडे महत्त्वाची भूमिका येण्याची शक्यता आहे. वयस्क ज्यो बायडेन यांच्यापेक्षा त्याच अधिक सक्रिय असतील, अनेकांना वाटते. त्यामुळे उपाध्यक्षपदाच्या उमेदवार असल्या तरी त्यांची राजकीय मते जाणून घेणे भारतासाठी महत्त्वाचे आहे. अर्थात राजकारण्यांची निवडणुकीपूर्वीची मते आणि निवडून आल्यानंतरची मते यात अनेकदा फरक पडलेला दिसतो, हेही विसरून चालणार नाही. राजकारणात हे असेच असते.
मते कशी जाणून घेतली
अमेरिकन सिनेटवर कमला हॅरिस यांनी निवडून आल्यानंतर वेळोवेळी जी भूमिका घेतलेली आहे ती पाहून त्यांची राजकीय भूमिका लक्षात यायला मदत होण्यासारखी आहे. यासाठी त्यांनी वेळोवेळी सिनेटमध्ये केलेले भाषण व मतदान, सिनेट बाहेरची त्यांची राजकीय भाषणे आणि त्यांनी वेळोवेळी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीही पुरेशा बोलक्या ठराव्यात. ज्यो बायडेन यांच्याऐवजी आपल्याल अध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी काही स्तरापर्यंत पक्षांतर्गत लढत दिली असली तरीही ज्यो बायडेन यांनी त्यांची आपला उपाध्यक्षीयपदाचा साथीदार उमेदवार म्हणून निवड केलेली आहे, ही घटना तशी बोलकी आहे. त्यांचे महत्त्वाचे काही विचार असे आहेत.
अध्यक्षाचे युद्धविषयक अधिकार
2019 मध्ये न्यूयॅार्क टाईम्सने एक प्रश्नावली प्रसृत करून जनमत संग्रह केला होता. त्यात कॅांग्रेसच्या संमतीशिवाय एखाद्या देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याचा अधिकार अध्यक्षाला असावा किंवा कसे, या आशयाचा एक प्रश्न होता. इराण व उत्तर कोरियातील अण्विक प्रकल्पांवर बॅाम्बहल्ला करावा का, असाही एक प्रश्न होता. यावर आपले मत हॅरिस यांनी पुढीलप्रमाणे व्यक्त केले होते. अमेरिकेच्या सुरक्षेला अध्यक्षाने सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाहीना, याचाही विचार झाला पाहिजे. पण अनेक दशके युद्ध करून सुद्धा प्रश्न सुटले नाहीत, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.
भारत
नागरिकत्व दुरुस्ती कायदा/ सिटिझन्स ॲमेंडमेंट ॲक्ट (सीएए) आणि काश्मीर बाबत त्यांची भूमिका पूर्णपणे भारतविरोधी आहे. तर हे दोन्ही प्रश्न भारताचे अंतर्गत प्रश्न असून त्याबाबत इतर राष्ट्रांची ढवळाढवळ भारताला साफ अमान्य आहे. त्यामुळे डेमोक्रॅट पक्ष निवडून येणे हे भारताच्या हिताचे नाही. 5 ॲागस्ट 2019 ला त्यांनी डेमोक्रॅट पक्षाच्या काही कार्यकर्त्यांसह अमेरिकेतील पाकधार्जिण्या काश्मिरी गटाची भेट घेतली होती. हा गट एनजीओ म्हणून काम करणारा असून तो जस्टीस फॅार काश्मीर (जेएफके) या नावाने ओळखला जातो. भारताने काश्मीरमध्ये घुसखोरी केली असा अपप्रचार अमेरिकन जनतेत पसरवण्याचा उपद्व्याप हा गट करीत असतो. असिफ महमूद नावाचा मूळात पाकिस्तानी असलेला, डेमोक्रॅट पक्षाच्या कार्यकर्ता हया गटाचा म्होरक्या आहे. काश्मीरमध्ये 5 ॲागस्ट 2019 पूर्वीच्या स्थितीत झालेला बदल या गटाला मान्य नाही. नंतर डिसेंबर 2019 मध्ये कमलला हॅरिस यांनी भारताच्या परराष्ट्रीय भूमिकेवर कडक शब्दात टीका केली होती. त्यावेळी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री श्री जयशंकर यांनी प्रमिला जयपाल यांचा समावेश असलेल्या अमेरिकन कॅांग्रेस सदस्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेण्याचे नाकारले होते. या सदस्यांनी काश्मीरमध्ये लावलेले निर्बंध उठवावेत, अशी मागणी करणारा ठराव अमेरिकन कॅांग्रेसमध्ये मांडला होता. या ठरावात वस्तुस्थितीचा विपर्यास केलेला आहे, असे भारताने ठणकावले होते. कमला हॅरिस यांनी आपल्याला डेमोक्रॅट पक्षाकडून अध्यक्षपदासाठीची उमेदवारी मिळावी म्हणून प्रचार केला होता. तेव्हा काश्मीरबाबत त्यांना प्रश्न विचारले असता आम्हीही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, ‘ते’ एकटे नाहीत, असे सांगून काश्मीरबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. पण काश्मीर भारताचा अंतर्गत प्रश्न असून त्याबाबत भारत व पाकिस्तान याशिवाय तिसऱ्या पक्षाची लुडबुड भारताला सपशेल अमान्य असल्याचे यापूर्वीच अनेकदा स्पष्ट करण्यात आले होते, हे त्या विसरल्या होत्या.
चीन
चीनची व्यापारक्षेत्रातील भूमिका अनुचित आहे, अमेरिकन बौद्धिक संपत्तीची चीनने अक्षरश: चोरी केली आहे, असे त्यांचे स्पष्ट मत आहे. पण ट्रेड वॅार व वारेमाप कर लादणे त्यांना मान्य नाही. अमेरिकन कंपन्यांचे हितसंबंधही विचारात घेतले पाहिजेत,असे त्या म्हणतात. चीनने मानवी हक्कांची पायमल्ली चालविली असून हे त्यांना निषेधार्ह वाटते. चीनची पर्यावरणविषयक भूमिकाही त्यांना मान्य नाही. हॅांगकॅांग प्रश्नी त्यांची भूमिका चीनविरोधी आहे. हॅांगकॅांगचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व कायम राहिले पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. सीमासंघर्षप्रश्नी त्या भारताच्या बाजूच्या आहेत.
उत्तर कोरिया
उत्तर कोरियामुळे जागतिक शांततेला धोका आहे, असे आपले मत असल्याचे त्यांनी स्पष्टपणे मांडले आहे. पण उत्तर कोरियावर अमेरिकन कॅांग्रेसच्या अनुमतीशिवाय हल्ला करण्याचा कोणताही घटनात्मक व कायदेशीर अधिकार डोनाल्ड ट्रंप यांना नाही असे पत्र ज्या 18 डेमोक्रॅट सदस्यांनी प्रसृत केले होते, त्यात कमला हॅरिस यांचा समावेश होता. कोरियन हुकुमशहा किम जॅांग उन यांच्याशी मैत्रीसंबंध प्रस्थापित करण्याचा ट्रंप यांचा प्रयत्न कमला हॅरिस यांना मान्य नव्हता. उत्तर कोरियाची अण्वस्त्र व क्षेपणास्त्र निर्मितीविषयक कार्यक्रमाची गती कशी मंद होईल यावर अमेरिकेचा भर असला पाहिजे, असे कमला हॅरिस यांना वाटते. पण डोनाल्ड ट्रंप यांच्या भूमिकेमुळे नेमके उलट घडले, असे त्यांना वाटते.
रशिया
2016 मध्ये रशियाने अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप व ढवळाढवळ केली, असे कमला हॅरिस यांचे मत आहे. रशियाने डोनाल्ड ट्रंप यांना निवडून येण्यास मदत केली, असा त्यांचा आरोप आहे. क्रिमिया रशियात खालसा करून घेणे, तसेच युक्रेनच्या बाबतीतही हीच भूमिका घेण्याचा रशियाचा प्रयत्न असणे, कमला हॅरिस यांना मान्य नाही.
अफगाणिस्तान
2018 मध्ये कमला हॅरिस यांनी सिनेट सदस्य या नात्याने अफगाणिस्तानचा दौरा केला होता. यावेळी त्यांच्यासोबत दोन रिपब्लिकन सिनेट सदस्यही होते. अफगाणिस्तानमधील शस्त्रसंघर्ष संपावा, अफगाण महिलांना सुरक्षा मिळावी यावर त्यांचा भर आहे.
इस्रायल
पतिसहवर्तमान त्यांनी इस्रायलला भेट दिली आहे. तशा त्या अगदी पहिल्यापासून इस्रायलच्या पाठीराख्या राहिलेल्या आहेत. इस्रायलला सुरक्षा तसेच स्वसंरक्षणाचा अधिकारही असला पाहिजे, असे त्यांना वाटते.
इराण
इराणने अण्वस्त्रे तयार करू नयेत, यावर अमेरिकेचा भर असला पाहिजे, असे त्यांना वाटते. इराणबाबतचा जुना आणि ट्रंप यांनी रद्द केलेला करार पुन्हा अस्तित्वात यावा, या मताच्या त्या आहेत. इराणचे एक प्रमुख सेनाधिकारी कासीम सोलेमनी यांची हत्या व्हावयास नको होती, असे त्यांचे मत आहे.
सौदी अरेबिया
सौदी अरेबियाने येमेनवर केलेले आक्रमण कमला हॅरिस यांना अमान्य असून सौदीला दिली जाणारी शस्त्रास्त्रांची मदत थांबवावी या मताच्या त्या आहेत. जमाल खाशोगी या पत्रकाराच्या हत्येसाठी त्या राजे सलमान यांना त्या जबाबदार धरतात. डोनाल्ड ट्रंप यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले, असा त्यांचा आरोप आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment