Friday, June 11, 2021

अनेकरूपा: नृपनीती वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? स्वत: एक राजा असलेल्या भर्तृहरीने ‘वाराङ्गनेव नृपनीतिः अनेकरूपा’ असे राजनीतीसंबंधी (नृपनीतीसंबंधी) म्हटले आहे. तो म्हणतो, ‘राजनीति कधी खोटं बोलणारी, तर कधी सत्य वदणारी; कधी कठोर शब्दप्रयोग करणारी; तर कधी मधुर वाणीचा वर्षाव करणारी; कधी हिंसक, तर कधी दया दाखवणारी; कधी धनलोभी, तर कधी उदार; कधी उधळपट्टी करणारी, तर कधी पैसापैसा गोळा करणारी अशी अनेक रूपे धारण करणारी असते. भर्तृहरीने म्हणूनच राजनीतीची तुलना नित्य वेगळी शैय्यासोबत करणाऱ्या वारांगनेशी केली आहे. ग्रामपंचायतीपासून तो जागतिक राजकारणापर्यंत रोज होत असलेल्या डावपेचांकडे आणि कटकारस्थानांकडे पाहिल्यानंतर भर्तृहरीच्या या कथनाचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. इथिओपिया- नव्याने चर्चेत आलेला देश इथिओपिया किंवा फेडरल डेमोक्रॅट रिपब्लिक ॲाफ इथिओपिया हा पूर्व आफ्रिकेतील एक भूवेष्टित (लॅंडलॅाक्ड) देश आहे. जवळपास 11 कोटी लोकसंख्या, 4 लक्ष 20 हजार चौरस मैल क्षेत्रफळ आणि अदिस अबाबा हे राजधानीचे शहर असा या देशाचा ठोकळ तपशीलही फारच कमी लोकांना माहीत असेल. साधारणपणे याच्या उत्तरेला इरिट्रिया, ईशान्येला डिजिबोटी, पूर्वेला सोमालिया दक्षिणेला केनिया पश्चिमेला सुदानचा एक हिस्सा तर वायव्येला सुदानचाच दुसरा हिस्सा, असे भूवेष्टनाचे स्वरूप आहे. आधुनिक मानवाचे अतिप्राचीन काळातले सांगाडे इथिओपियात सापडले आहेत. यावरून एक मत असे आहे की, इथूनच मानवाने पृथ्वीच्या निरनिराळ्या खंडांकडे कूच केले असावे. 1936 मध्ये इटालीने इथिओपिया काबीज केला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर इथिओपिया खऱ्या अर्थाने मुक्त झाला पण पुढे 1974 मध्ये रशियाच्या प्रोत्साहनामुळे या देशात साम्यवादी राजवट अस्तित्वात आली. 1987 मध्ये ही राजवट जाऊन पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक ॲाफ इथिओपिया अस्तित्वात आले. 1991 मध्ये या राजवटीलाही उलथून टाकून आजचे फेडरल डेमोक्रॅट रिपब्लिक ॲाफ इथिओपिया अस्तित्वात आले आहे. स्वत:ची वेगळी ओळख असलेले व तसे मानणारे ओरोमो 35% , अम्हारा 27 %, , सोमाली 6 % आणि टिग्रियन 6 % असे चार वांशिक गट इथिओपियात आहेत. या सर्वांची मिळून टक्केवारी 74 % इतकी होते. उरलेले 26 % लोक छोट्या छोट्या वांशिक गटातील आहेत. यात सतत वांशिक संघर्ष होत आहेत/असतात. आजतर आधुनिकतेबरोबर वेगवेगळे राजकीय पक्ष सुद्धा निर्माण होणे अपरिहार्यच होते. यातही संघर्षच होत असतात. ही अस्वस्थता विद्यमान पंतप्रधानांना आवरता आली नाही. त्यामुळे छोट्या वांशिक गटांची ससेहोलपट होतच राहिली. या संघर्षाला ऊत आल्यामुळे सध्या आज जगभर चर्चा होत आहे.. वांशिक संघर्ष केंद्र शासन आणि टिग्रे प्रांतातील प्रांतिक शासन यात ही संघर्षाची ठिणगी उडाली आहे. देशाचे पंतप्रधान अबीय अहमद यांच्या नियंत्रणाखाली असलेले लष्कर आणि टिग्रेर पीपल्स लिबरेशन फ्रण्ट (टीपीएलएफ) या राजकीय पक्षाचे बंडखोर अनुयायी यात तुंबळ युद्ध सुरू आहे. या संघर्षाला वांशिक भिन्नतेचाही आयाम आहे. मुळातला केंद्र विरुद्ध राज्य असे स्वरूप असलेला हा संघर्ष 35 % ओरोमो वंशीय आणि 6 % सोमाली वंशीय यात आज परिवर्तित झालेला आहे. पंतप्रधान स्वत: ओरोमो वंशाचे आहेत. आजपर्यंत निदान एक लक्ष निरपराध सोमाली नागरिक प्राणाला मुकले असून तेवढ्यांनीच शेजारच्या देशात पलायन करून आपला जीव कसाबसा वाचवला आहे. ते आज अन्नाला मोताद झाले आहेत. आजतरी हा संघर्ष शमण्याची यत्किंचितही शक्यता दिसत नाही. धर्मश: विचार करतो म्टटले तर सर्व प्रकारचे ख्रिश्चन धर्मी 63 %, इस्लाम धर्मी 34 % आणि प्राचीनकाळपासून राहत असलेले आणि आज अत्यल्प संख्येत असलेले ज्यू 3% असे लोकसंख्येचे ठोकळमानाने विभाजन सांगता येईल. या संघर्षाला धार्मिक संघर्षाचेही रूप आहे. बंडखोरांना मशिदीत आश्रय दिला जातो, हे कळल्यानंतर अनेक मशिदींवर हल्ले करण्यात आले आहेत. इजिप्त इथिओपियात बेबनाव नाईल ही आफ्रिकेतली तसेच जगातलीही सर्वांत लांब म्हणजे (7,650 किमी.) नदी असून ती भूमध्य समुद्रास मिळते. टांझानिया, बुरूंडी, रूआंडा, झाईरे, केनिया, युगांडा, सूदान, इथिओपिया व इजिप्त अशा अनेक देशातून ही नदी वाहत असल्यामुळे कुणाही एका देशाने तिचे पाणी अडवल्यास/तिच्यावर धरण बांधल्यास धरणाच्या पलीकडच्या देशांमध्ये पाण्याची टंचाई होणार हे उघड आहे. इथिओपियाने नाईल नदीवर भलेमोठे धरण बांधल्यामुळे तर इजिप्त इथिओपियाला पाण्यातच पाहतो आहे. चांगल्या सुरवातीला लागले भलतेच वळण इथिओपियातील अंतर्गत संघर्ष हाच मुख्य प्रश्न आहे. आज जगातले देश इतके परस्परावलंबी झाले आहेत की, कोणत्याही एका देशातल्या अंतर्गत संघर्षाचे परिणाम इतर देशांनाही भोगावे लागतात. खरेतर अबीव अहमद यांनी 4 थे पंतप्रधान म्हणून 2 एप्रिल 2018 ला पदावर आरूढ झाल्यानंतर सुरवात खूपच चांगली केली होती. त्यांनी प्रथम सर्व राजकीय कैद्यांची मुक्तता केली आणि त्यांना देशाच्या राजकीय प्रवाहात सामील करून घेतले. देशात मोठमोठ्या आर्थिक सुधारणाही घडवून आणल्या. मुख्य म्हणजे निरनिराळ्या वांशिक गटात समेटही घडवून आणला. आफ्रिका खंडात अशा सुसंस्कृत व्यवहाराची कुणालाही अपेक्षा नसते. त्यामुळे युरोपीय महासंघाला अशी अंतर्गत सुरक्षा असलेला हा देश आर्थिक संबंध जोडण्यासाठी योग्य वाटला, यात नवल नाही. अबीव अहमद यांच्यासाठी तर ही पर्वणीच होती. पण पुढे करोनाच्या साथीचे कारण समोर करून पंतप्रधान अबीय यांनी निवडणूक पुढे ढकलली आणि संघर्षांची पहिली ठिणगी पडली. जगात कोरोनाकाळात ठिकठिकाणी निवडणुकी होत आहेत, मग आपल्याच देशात निवडणुकी पुढे का ढकलता, असा विरोधी पक्षांचा आक्षेप होता/आहे. आदेश मोडून विभागीय निवडणुका टिग्रे पीपल्स लिबरेशन फ्रंट या विभागीय पक्षाने तर केंद्राचा निवडणुका पुढे ढकलण्याचा आदेश झुगारून आपल्या स्तरावर 9 सप्टेंबर 2020 ला टिग्रे विभागात निवडणुका घेतल्या सुद्धा! यामुळे संतापून जाऊन पंतप्रधान अदिव अहमद यांनी टिग्रे विभागावर लष्करी कारवाईलाच सुरवात केली. या कारवाईत हजारो नागरिक प्राणाला मुकले तर इतर अनेकांनी सुदानमध्ये पलायन करून आश्रय घेतला. यानंतर देशभर हिंसाचार भडकला. तो थांबवण्याबाबत इथिओपियाचे पंतप्रधान अबीव अहमद यांनी बंडखोरांशी चर्चा करण्याचे सुद्धा टाळले असून त्यांना संपवण्यासाठी ते हात धुवून मागे लागले आहेत. ही यादवी अशीच सुरू राहिली तर युरोपीय महासंघाला आपल्या इथिओपियाबाबतच्या धोरणाचा नव्याने आणि वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा महासंघाने इथिओपियाला दिला आहे. पण व्यर्थ! न विरोध थांबतोय, न दमनचक्र!! सुदान इथिओपियात सीमावाद याशिवाय इथिओपिया आणि सुदान यातला सीमावाद फश्का नावाच्या 600 चौरस किमी क्षेत्रफळाच्या सुपीक भूभागाच्या निमित्ताने धुमसत होता आणि आहे. सुदान आणि इथिओपिया यातील 1600 किलोमीटर लांबीच्या सीमारेषेची आखणीच नव्हे तर करारही झाला आहे पण करारावरची शाई पुरतेपणी वाळलेली नसतांनाच हा अंतर्गत संघर्ष निर्माण झाल्यामुळे समजुतदारपणाने केलेल्या कराराचे भवितव्य धोक्यात आले आहे. इट्रिपिया आणि इथिओपिया इरिट्रिया आणि इथिओपिया यांच्या सीमाही एकमेकींना स्पर्श करतात. असे असूनही आज या दोन देशात मैत्रीचे संबंध आहेत. याचे श्रेय पंतप्रधान अबीव अहमद यांनाच जाते. कारण ईरिट्रियाशी असलेला 22 वर्षांचा सीमासंघर्ष त्यांनी थांबवला आणि आपल्या समजुतदारपणाचा परिचय दिला. संघर्ष समाप्त केल्याबद्दल पंतप्रधान अबीय यांना गेल्या वर्षी शांततेच्या नोबेलने पारितोषिकाने गौरवण्यात आले होते. पण शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक मिळते न मिळते तोच अबीय अहमद यांच्या धोरणातील हा बदल पराकोटीच्या विरोधाभासाचे एकमेव उदाहरण असावे. या हिंसाचारात एका विख्यात संगीतकाराचा - हाचालू हुंडेसा- याचाही विनाकारण बळी गेला आहे, हे आणखी एक विसंगत दुर्दैव! स्वत: एक राजा असलेल्या भर्तृहरीने ‘वाराङ्गनेव नृपनीतिः अनेकरूपा’ असे राजनीतीसंबंधी (नृपनीतीसंबंधी) म्हटले आहे. त्याची आठवण या निमित्ताने झाल्याशिवाय रहात नाही.

No comments:

Post a Comment