Friday, June 11, 2021

सुवेझ कालव्यातील अभूतपूर्व जलवाहतुक खोळंबा वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? निसर्गाने आशिया आणि आफ्रिका हे दोन महाकाय खंड सुवेझ नावाच्या एका चिंचोळ्या पट्टीच्या संयोगभूमीने (इस्थमस) जोडलेले होते. ही चिंचोळी पट्टी खणून काढली आणि तिथे कालवा काढला तर जगातले दोन समुद्र म्हणजे भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र (रेड सी) जोडले जातील आणि व्यापारी तसेच प्रवासी जहाजांना आफ्रिकेला वळसा घालण्ची वेळ येणार नाही आणि वेळ आणि पैसा वाचेल, ही कल्पना 17 नोव्हेंबर 1869 ला प्रत्यक्षात आली. या दिवशी पहिली नौका या कालव्यातून भूमध्य समुद्रातून लाल समुद्रात गेली. या कालव्यामुळे लंडन आणि मुंबई दरम्यानचा प्रवास 20 हजार किलोमीटर वरून कमी होऊन 12 हजार किलोमीटरचा झाला. जहाज रुतून बसले पुढे अनेकदा निरनिराळ्या कारणांनी बंद पडलेला सुमारे 200 किलोमीटर लांबीचा सुवेज कालवा, 1975 सालच्या नोव्हेंबरमध्ये वाहतुकीसाठी खुला झाला, तो 22/23 मार्च 2021 पर्यंत सुरु होता . पण 400 मीटर लांबीचे, 2 लक्ष मेट्रिक टन वजनाचे, तायवानस्थित एव्हरग्रीन मरीन या कंपनीने भाडेतत्त्वावर घेतलेले एव्हरगिव्हन या नावाचे, सॅाकरच्या तीन क्रीडांगणांपेक्षाही मोठे असलेले महाकाय जहाज वाळूत रुतून बसले. त्याचे असे झाले होते की, 23 मार्चला या भागात वादळी वाऱ्याच्या प्रचंड झोतामुळे कालव्याच्या काठालगतची वाळू उडून कालव्यात आली. तसे पाहता हे सुवेजसाठी नवीन नाही. पण सुसाट वाऱ्यामुळे तज्ञ मार्गदर्शकांचा जहाजावरचा ताबा सुटला. ते भरकटून कालव्याच्या काठावर उडून आलेल्या रेतीत रुतून बसले. जहाज कालव्यातून नेण्याचे काम विशेष कौशल्याचे असून त्यासाठी सुवेज व्यवस्थापनाचे दोन तज्ञ पायलट जहाजाचे सुकाणू हाती घेतात. जहाजावरचे सर्व 25 खलाशी भारतीय होते. जहाजाच्या सुटकेसंबंधींच्या प्रयत्नात त्यांचा मोठा वाटा होता. जहाज का आणि कसे फसले मोठी जहाजे नेता यावीत म्हणून सुवेज कालवा अनेकदा रुंद करण्यात आला आहे. पण आपण जहाजांची रुंदी व लांबीही वाढवीतच गेलो आहोत. तसेच किनाऱ्यावरची वाळूही अधून मधून काठ ओलांडून आत येते आणि परिणामी रुंदी कमी होते. त्यामुळे केव्हातरी जे होणार होते तेच यावेळी घडले आहे. 23 मार्च 2021 ला या परिसरात तुफान वारावादळ निर्माण झाले. त्याने उडवलेली वाळू कालव्याचा काठ ओलांडून आत आली आणि हा कालवा अरुंद झाला. कालव्याची कमीतकमी रुंदी 205 मीटर आहे. एरवीही हा चिंचोळा भाग नौकनयनकौशल्याची परीक्षा घेणाराच असतो. अगोदर कालव्यात दोन्ही काठांपासून समान अंतरावर उभे करून जहाज सरळ नाकासमोर सरळ रेषेत हाकावे लागते. वादळामुळे जहाज तिरपे होऊन दोन्ही काठांना टेकून वाळूत रुतून बसले. या वेळी वादळामुळे समोरचे काहीही दिसत नव्हते. खरे तर हे जहाज वादळी वाऱ्यामुळे एका कडेवर कलंडून आडवेही शकले असते. पण त्याचा कालव्याच्या दोन्ही कडांना स्पर्श झाल्यामुळे तसे झाले नसावे. गाळ काढणाऱ्या आणि खेचणाऱ्या नौका हतबल अगोदर गाळ काढणाऱ्या नौकांनी (डिगर्सनी) गाळ काढण्याचा प्रयत्न सुरू केला. नंतर खेचणाऱ्या नौकांनी (टग्ज) जहाजाला खेचण्याचा आणि पुन्हा तरंगते करण्याचा प्रयत्न केला. पण महाकाय आणि वजनदार जहाजाच्या तुलनेत एरवी जबरदस्त आणि शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या या नौका चिमुकल्या सिद्ध झाल्या. जहाजावर पोलादाच्या 20 हजारावर भरभक्कम वजनाच्या पेट्या होत्या. त्यामुळे वाळू काढण्याचेच काम जोरात सुरू ठेवण्याचे ठरले. वाळूची जहाजावरची पकड अगोदर सैल केल्याशिवाय खेचणाऱ्या नौका काहीही करू शकणार नाहीत, हे स्पष्टपणे जाणवत होते. भरतीच्या लाटांचा फायदा घेऊन हे जहाज हलवण्याचाही प्रयत्न झाला, पण व्यर्थ! जहाजावरील हजारो पेट्यांपैकी काही पेट्या इतरत्र हलवून जहाज हलके करता येईल का यावरही विचार झाला. पण हा उपाय खूपच वेळखाऊ आहे म्हणून शेवटचा पर्याय म्हणून बाजूला ठेवला गेला. मोठ्या जहाजांचा फायदा व्यापार अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी पुरवठा शृंखला सुदृढ राहणे आवश्यक आहे, कालवा बांधला जातो तेव्हा तो रुंद वाटला पण जहाजे हळूहळू इतकी मोठी जात आहेत की कालवा अरुंद झाल्यासारखे वाटू लागले आहे. मोठी जहाजे व्यापारी दृष्टीने किफायतशीर ठरली आहेत. त्यामुळे येणारे नवीन जहाज अगोदरच्यापेक्षा मोठेच असावे, असा मालकांचा प्रयत्न असतो. पण याच गतीने कालवे रुंद करता येत नाहीत. जहाजे वादळांत डोलू लागली की, अनेकदा जहाजांवरच्या सामान ठेवायच्या मोठमोठ्या कोठ्या (कंटेनर्स) साखळ्या तोडून सरकत सरकत कठडे ओलांडून समुद्रात पडून बुडतात आणि अतोनात नुकसान होते. पुरवठा शृंखलांचे महत्त्व कोरोना काहीसा थबकल्यामुळे नुकतेच कुठे कोठ्या वाहून नेणाऱ्या जहाजांना (कंटेनर शिप्सना) बरे दिवस येत होते. अशा काळात सुवेज कालवा अल्पकाळापुरता जरी बंद पडला तरी पुरवठा शृंखला तुटून भाव कडाडू लागतील. पेट्रोलचे भाव पुन्हा नव्याने कडाडणार, असे दिसते आहे. सुवेझमधून तेल वाहतुक न करता पाईप लाईन टाकून हे तेल वाहून नेणेच अधिक सोयीचे, फायद्याचे आणि सुरक्षित राहील का, असा विचार तेल कंपन्या करू लागल्या आहेत. कारण प्रश्न केवळ सुवेजपुरता मर्यादित नाही पनामा कालवा, होरमूज आणि मलाक्काची सामुद्रधुनी हेही असेच जलवाहतुक मार्गातील अपघातप्रवण टप्पे आहेत. या जलवाहतुक खोळंब्याचा जगाच्या अर्थकारणावरही विपरीत परिणाम होतो आहे. कारण जागतिक व्यापारातील 12% टक्के मालवाहतुक सुवेज कालव्यातून होत असते. ठप्प झालेल्या कालव्याच्या दोन्ही टोकांना पहिल्या 4/5 दिवसातच शेकडो जहाजे ताटकळ उभी आहेत, असे दाखविणारी छायाचित्रे नासाने प्रसिद्ध करताच व्हायरल झाली होती. सुवेझ कालव्यातून अनेक मोठमोठी जहाजे नेहमीच ये जा करीत असतात. त्यामुळे भविष्यात असे घडू नये म्हणून काय करावे यावर लगेच खल सुरू झाला आहे. जहाजांचा आकार आणखी वाढविता येणार नाही एक त्यातल्या त्यात एक बरे आहे ते हे की यापेक्षा मोठी जहाजे बांधणे नजीकच्या काळात तरी शक्य होणार नाही, असे दिसते. कारण तसे करायचे झाल्यास केवळ जहाजांच्या डिझाईनमध्येच मोठे बदल करावे लागील असे नाही तर त्यासाठी भलीमोठी भांडवली गुंतवणूक करून बंदरेही विकसित आणि विस्तारित करावी लागतील. कोरोनामुळे सर्वांच्याच खिशाला कात्री लागली असल्यामुळे कुणीही या सारख्या प्रकल्पात गुंतवणूक करण्याची शक्यता नाही. दक्षिण कोरियाजवळ एकट्यापाशी अशी 12 मोठी जहाजे आहेत. हा सध्याचा उचांक आहे. प्रत्येकी 150 मिलियन डॅालर किमतीची अशी मोजून 47 जहाजे सध्या निरनिराळ्या गोद्यांमध्ये बांधणीच्या वेगवेगळ्या अवस्थेत आहेत. यात 23 हजार कंटेनर वाहून नेण्याची क्षमता असणारी ही जहाजे 2024 मध्ये समुद्रात उतरवण्यात येणार आहेत. सध्या शांघाय, सिंगापूर आणि नेदरलंडमील रॅाटरडॅम या बंदरातच अशी मोठी जहाजे सहजपणे हाताळली जाऊ शकतात. अमेरिकेलाही हे सहज शक्य होत नाही आणि नजीकच्या भविष्यात शक्यही होणार नाही. जहाज जेवढे मोठे तेवढा वाहतुक खर्च कमी होतो, म्हणून अशी भलीमोठी जहाजे बांधली जातात पण बंदरांच्या काठाजवळच्या समुद्राची खोली वाढवावी लागल्यामुळे आणि जहाज बंदरात घेण्यासाठी ओढणाऱ्या नौका अधिक शक्तिशाली असाव्या लागत असल्यामुळे बंदरांचा व्यवस्थापन खर्च वाढत चालला आहे. कालवा मोकळा करून देण्याची क्षमता फक्त आमच्याकडे असल्यामुळे हा मार्ग आम्हीच मोकळा करू शकतो असा अमेरिकेचा दावा होता. 21 व्या शतकाच्या प्रांरभीचा हा जलवाहतुक खेळखोळंबा आजवरच्या सर्व प्रकारच्या ट्रॅफिक जॅमवर कडी करणारा ठरला आहे. आठवडाभराच्या अथक परिश्रमानंतर, तब्बल 18 मीटर खोल गेल्यावर, 27 हजार घन मीटर वाळू खणून बाजूला काढण्यात यश आले आणि समोरचा भाग मोकळा होऊन जहाज काहीसे सरकले. पण तरंगले मात्र नाही. पण नंतर काही प्रयत्नानंतर मात्र त्याचा पुढे जाण्याचा मार्ग मोकळा होऊन हा आंतरराष्ट्रीय खेळखंडोबा एकदाचा संपला. सुवेझमध्ये एव्हरगिव्हनचे घोडे एकदाचे न्हाले, हे पाहताक्षणीच अमूलने एक समर्पक आणि गोंडस डूडल शेअर करून समयोचित आणि प्रातिनिधिक आनंद व्यक्त केला.

No comments:

Post a Comment