My son (Ajit), and daughter-in-law (Neelam) suggested to me that I should have a blog of my own. Because of their kind suggestion, I have created this blog.
Friday, June 11, 2021
असा हा पाकिस्तान!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
पाकिस्तानचे विभाजन होण्याची शक्यता सध्या राजकीय आणि वृत्तसृष्टीत वर्तवली जात आहे. याची दोन कारणे सांगितली जातात. पहिले कारण असे आहे की, पाकिस्तानात दहशतवाद्यांना खुली सूट आहे. आज ना उद्या ते पाकिस्तानवरच उलटतील आणि देशावर ताबा मिळवतील आणि ही पाकिस्तानच्या अंताची सुरवात असेल. दुसरे असे की, पाकिस्तानची आर्थिक घसरगुंडी वेगाने होत आहे. तो सध्या कर्जात आकंठ बुडालेला आहे. चीनसाठी ही सुवर्णसंधी असून त्याने पाकिस्तानवरची आपली पकड आवळायला सुरवात केली आहे.
पण ही कारणे पाकिस्तानमधल्यांना आणि त्यांच्या साथीदारांना पटत नाहीत. सैन्यशक्तीच्या आधारावर पाकिस्तानला एकसंध ठेवता येईल, असे त्यांना वाटते. सैन्याला आर्थिक गाजर दाखवून आपल्या काबूत ठेवता येईल. त्याच्या मदतीने अफगाणिस्तानमधील तालिबान्यांना निष्प्रभ करण्याचा हेतू साध्य होईल आणि आपल्याला अनुकूल राजवट अफगाणिस्तानात स्थापित करता येईल, असा अमेरिकेच्या नवीन राजवटीचा कयास आहे. बायडेन प्रशासनाने बहुदा म्हणूनच पाकिस्तानला सैनिकी मदत देण्याचा विचार केला असावा. ही मदत पाकिस्तान भारताशी लढण्यासाठीच वापरण्याची शक्यता आहे, हे या प्रशासनाला कळत का नसेल? पाकिस्तानच्या लष्कराने सध्याची नावालाच असलेली इमरानी राजवटच कायम ठेवली आणि तालिबान्यांचा, दहशतवाद्यांना आश्रय देण्याचे धोरण थोडेफार बदलले तरी लष्कराच्या तंत्राने चालणारे राष्ट्र म्हणून ते तग धरू शकेलही. पण त्यासाठी त्याला भारतद्वेश सोडावा लागेल. ते सध्यातरी शक्य कोटीततले दिसत नाही. त्यामुळे पख्तून, बलुची आणि सिंध या प्रांतात फुटून निघण्याची चळवळ दिवसेदिवस बळ पकडीत जाईल, हीच शक्यता जास्त आहे. पाकिस्तानची लवकरच चार शकले होतील. चवथा तुकडा पंजाब हीच पाकिस्तानची ओळख असेल.
बेकायदेशीरपणे व्यापलेला भाग
12 डिसेंबर 2019 ला विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात भारताच्या परराष्ट्रव्यवहार मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरात शासनाकडून जी माहिती समोर आली आहे, ती अशी आहे. जम्मू आणि काश्मीरमधील 78 हजार चौरस किमी. प्रदेश बेकायदेशीरपणे पाकिस्तानच्या ताब्यात आहे. 1963 साली जनरल अयूब खान यांच्या कारकिर्दीत झालेल्या तथाकथित सीमा करारानुसार पाकिस्तानने यातील 5 हजार 1 शे 80 चौ. किमी भारतीय प्रदेश चीनला बेकायदेशीरपणे देऊन टाकला आहे. शक्सगम म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश काराकोरम पर्वतरांगांना लागून आहे. यात शक्सगम आणि रस्कम दऱ्यांचा आणि तिथून वाहणाऱ्या नद्यांचा समावेश आहे. या निमित्ताने पाकिस्तानने चीनची कर्जरूपी आर्थिक मदत आणि सैनिकी पाठिंबा, न्युक्लिअर तंत्रज्ञान आणि मैत्री या गोष्टी साध्य केल्या आहेत. मुळात आपला नसलेला हा भाग ताब्यात ठेवणे आणि परस्पर चीनला परस्पर देणे असा दुहेरी गुन्हा पाकिस्तानने केला आहे.
पाकिस्तानची दोन शकले
1971 मध्ये मुक्ती वाहिनी आणि भारत यांच्या संयुक्त प्रयत्नातून पूर्व पाकिस्तान फुटून निघाला आणि आजच्या बांग्लादेशाची निर्मिती झाली आणि पाकिस्तानची समसमान दोन शकले झाली. सततचा अन्याय, मुस्कटदाबी, बलात्कार यांच्या विरुद्धच्या मुक्तीसाठीच्या लढ्याचा हा परिणाम होता.
पाकिस्तानी कारभार
पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच नागरी नेतृत्वात आजवर कधीही प्रशाससनक्षमता आढळून आलेली नाही. देशप्रेमाऐवजी भारतद्वेशावरच राज्यकर्त्यांचा भर असत राहिला. पाकिस्तानचे आजचे आर्थिक प्रश्न निर्मितीपासूनच्या भ्रष्टाचारी नेत्यांच्या देणगी स्वरुपाचे आहेत. राज्याच्या उद्दिष्टांपेक्षा वैयक्तिक उद्दिष्टांना/स्वार्थांना महत्त्व दिल्याचा हा परिणाम आहे.
खुली सूट असलेले दहशतवादी एके दिवशी पाकच्याच राज्यव्यवस्थेला उलथून टाकण्याचा धोका आहे. सुपीक जमीन आणि कालव्यांचे जाळे असलेला भूभाग पाकिस्ताच्या वाट्याला आला असतांनाही आपली आर्थिक घसरण सुधारेल, अशी शक्यताच पाकी जनतेला वाटत नाही. देशाची डबघाईला आलेली अर्थव्यवस्थाच आता कोलमडून पडेल, असे मत वाजिद शमसूल हसन या पाकच्या ब्रिटनमधील माजी वकिलांनी व्यक्त केले आहे.
पाकिस्तानचे सैन्यदल मग्रूर, भ्रष्टाचारी, सत्तालोभी, परस्परवैरी आणि कपटी सेनाधिकाऱ्यांमुळे जनतेच्या मनातून उतरले आहे. हे सैन्यदल, कुख्यात आयएसआय ही गुप्तहेरसंस्था, सनातनी मुल्ला मौलवी आणि तालिबानी उपद्रवी यांच्याच भरवशावर पाकिस्तानची सध्याची वाटचाल सुरू आहे.
सामाजिक आणि राजकीय पातळीवर पाकिस्तानला चांगले, निपुण आणि समर्थ नेतृत्व कधी लाभलेच नाही. मुल्ला मौलवींचा समाजमनावर जबरदस्त पगडा आहे. त्यामुळे लष्कर आणि धार्मिक नेते यांचाच प्रभाव पाकिस्तानमध्ये दिसून येतो आहे. अनेक मुस्लिम राष्ट्रांनी अनेक धार्मिक आणि सामाजिक बाबतीत आधुनिकता स्वीकारली दिसते पण पाकिस्तानात हे होतांना दिसत नाही.
पंजाब प्रांतीयांचा पगडा पाकिस्तानच्या सर्वच क्षेत्रात आहे. सिंधी, बलुची आणि पश्तून प्रांतीयांची सर्वच क्षेत्रात गळचेपी होत असून हे भाग अतिशय अस्वस्थ आणि असमाधानी आहेत. पाकिस्तानचा निम्मा हिस्सा याच कारणास्तव बांग्लादेशाच्या स्वरुपात फुटून निघाल्यानंतरही पाकिस्तानचे आजचे पंजाबी नेतृत्व जागे झालेले दिसत नाही. सैन्याची पकड थोडीही सैल झाली तर किंवा ती तशीच असतांना सुद्धा पाकिस्तानचे पश्तून, बलुची आणि सिंधी घटक वेगळे होण्यासाठीची चळवळ जोरात करीत आहेत, मोदींना मदतीसाठी आवाहन करीत आहेत.
भारताची भीती दाखवून आणि ‘इस्लाम खतरेमे’, अशी भावनिक हाक देऊन लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न आजवर थोडाफार यशस्वी व्हायचा. पण नकारात्मक मुद्दा आणि तोही असत्य असेल तर त्याची हाळी देऊन लोकांना फारकाळ विचलित करता येणार नाही. या उलट भारताने केलेली प्रगती आणि विशेषत: पंतप्रधान मोदी यांचे यशस्वी नेतृत्व याबद्दल पाकिस्तानी जनतेत विलक्षण उत्सुकता दिसू लागली आहे.
पाकिस्तानने काश्मीरचा बळकावलेला भाग
भारतातील जम्मू डिव्हिजनचे क्षेत्रफळ 42 हजार चौ.किमी आणि लोकसंख्या 1 कोटी 50 लक्ष आहे तर काश्मीर डिव्हिजनचे क्षेत्रफळ 16 हजार चौ.किमी आणि लोकसंख्या 1कोटी 36 लक्ष आहे. पाकिस्तानने काश्मीरमधील बळकावलेल्या प्रदेशाची क्षेत्रफळ आणि लोकसंख्याविषयक माहिती ठोकळमानाने अशी आहे.
पाकव्याप्त काश्मीर - पाकव्याप्त काश्मीरचे क्षेत्रफळ 13 हजार चौ.किमी. आणि लोकसंख्या 52 लक्ष असून दिखाऊ स्वायत्तत्ता असलेल्या या भागाचे मुख्यालय मुझफराबाद येथे आहे. त्यात 1) नीलम 2) मुझफराबाद 3) हातियन बाला 4) बाघ 5) हवेली 6) पूंच 7) सुधानोटी 8) कोटी 9) मिरपूर 10) भिंबर हे दहा जिल्हे येतात. मुख्यत: इथूनच पाकिस्तानी घुसखोर आज बोगदे खणून वा अन्यप्रकारे भारतात प्रवेश मिळवत असतात. युनोच्या ठरावानुसार 1 जानेवारी 1949 ला घाईघाईने शस्त्रसंधी केला नसता तर टोळीवाल्याना काश्मीर बाहेर काढता आले असते आणि पाकव्याप्त काश्मीर नकाशात दाखविण्याचे कारणच पडले नसते, अशा वार्ता/चर्चा त्याकाळी वृत्तपत्रात आल्या होत्या.
गिलगिट-बाल्टीस्तान - याचे क्षेत्रफळ 73 हजार चौ.किमी आणि लोकसंख्या 12 लक्ष 50 हजार असून या प्रदेशाला पाकिस्तानने कायदेशीर स्थान दिलेले नाही यामुळे भविष्यात चीनच्या दळणवळणविषयक आणि अन्य महत्त्वाच्या आर्थिक प्रकल्पांबाबतच्या व्यवहारात कायदेशीर अडचण होणार आहे. यात ग्वादारपर्यंत जाणारा चीन-पाकिस्तान एकॅानॅामिक कोरिडॅार प्रमुख आहे. ही अडचण दूर करण्यासाठी याला पाकिस्तानचा पाचवा प्रांत म्हणून दर्जा मिळणे आवश्यक होते. म्हणून पाकिस्तान सरकारने याला वेगळ्या प्रांताचा तात्पुरता दर्जा दिला आणि त्या भागात विधानसभेची निवडणूक घेण्याचेही ठरविले. या बाबीची गंभीर दखल घेत भारताने प्रत्युत्तर स्वरुपात (डिमार्क) पाकिस्तानी दूतावासाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्याला पाचारण करून पाकिस्तानचे हे कृत्य बेकायदेशीर असल्याचे सांगून त्याबाबत तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे. सध्या कोविड व्हायरसच्या सार्वत्रिक साथीचे निमित्त पुढे करून निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. असा आहे पाकिस्तानचा आजचा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे अस्थिर असलेला आणि आर्थिक डबघाईला आलेला डोलारा!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment