Friday, June 11, 2021

शिंजो ॲबे - एक द्रष्टा कर्मयोगी नेता! वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? जपानचे पंतप्रधान शिंझोआबे यांनी एक वर्ष अगोदरच आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. असे सांगतात की, सध्या ते नेपोलियनच्या जीवनावरील खंड वाचीत होते. दोन खंड वाचून होताच त्यांनी म्हटले की मी आता तिसरा खंड वाचणार नाही. कारण त्यात नेपोलियनच्या उतरणीला लागलेल्या जीवनाची कथा असणार आहे. ती वाचण्यात मला स्वारस्य नाही. शिंझो यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देण्यासाठी ही कथाच पुरेशी ठरावी. 2000 पासून 2012 पर्यंत जपानचे सर्व पंतप्रधान जेमतेम 1 वर्षपर्यंतच पंतप्रधानपदी होते. पण 2012 नंतर ही स्थिती बदलली. तेव्हापासून 2020 पर्यंत शिंझो ॲबे यांच्या देदीप्यमान सलग कालखंडात जपान प्रगतीचे एकेक शिखर सर करीत चालला होता. ‘आजवर मी देशासाठी जे काही केले आहे, त्यापेक्षा आणखीही काही करावे अशी इच्छा होती पण पोटाचे जुनेच दुखणे आता असह्य झाले आहे. त्यामुळे मला पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन सार्वजनिक जीवनातून दूर होण्यावाचून दुसरा मार्ग समोर दिसत नाही’, असे पत्रकारपरिषदेत घोषित करीत जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे यांनी सर्वांचा निरोप घेतला आहे. खरेतर एक वर्षाहून थोडा जास्तच कालावधी उरला होता. पण आपल्या पक्षाला लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीला पुढील योजना आखण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक आहे, ही जाणीव शिंझो ॲबे यांना होती. वैद्यकीय कारण अल्सरेटिव्ह कोलायटिस हे चिंतेमुळे बळावणारे दुखणे आहे. त्यांच्या राजीनाम्याचे वृत्त जाहीर झाले आणि बाजार अक्षरश: गडगडला. कोरोनावरची एक प्रभावी उपाययोजना म्हणून प्रत्यक्ष पैसे न देता, प्रत्येक व्यक्तीला दोन मास्क विनामूल्य देण्याचा निर्णय त्यांचा निर्णय चेष्टेचा विषय ठरला होता. ही चेष्टा त्यांना सहन होत नव्हती. शेवटी ही यशदायी योजना त्यांना सोडून द्यावी लागली. इतर देशांच्या तुलनेत कोरोनाला आवर घालण्यात आम्ही अधिक यशस्वी ठरलो असतांनाही, आम्हाला जनतेचा पाठिंबा का मिळत नाही? हा प्रश्न त्यांना सतत छळत असे. राजीनामा देण्यासाठी 19 जून 2020 ला शिंझो ॲबे यांनी एका डिनरचे आयोजन केले. यावेळी उपपंतप्रधान व अर्थमंत्री तारो आसो, मुख्यसचिव योशिहिदे सुगा, लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे प्रभावी नेते अकिरा अमारी कोरोनाकाळात प्रथमच एकत्र आले होते. ‘आपण चौघांनी या डिनरच्या निमित्ताने एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असे मला गेले खूप दिवस वाटत होते’, स्मितहास्य करीत शिंझो ॲबे म्हणाले. हे चौघे एकमेकांचे जिवाभावाचे सहकारी होते. डिनरसाठी सहभागी झालेले त्यांचे हे तीन साथीदार वर्षानुवर्षे त्यांची साथ करीत आले आहेत. म्हणूनच पुढे काय, या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी ही डिनर मीटिंग आयोजित होती. कोरोनाच्या प्रकोपकाळात शिंझो ॲबे यांच्या अन्य सहकाऱ्यासोबत रोज बैठकी होत असत. पण पंतप्रधानांची प्रश्नांवरची पकड काहीशी ढिली झाल्याचे सहकाऱ्यांना जाणवत होते. हे लक्षात येताच सुगा समोर आले आणि त्यांनी बरीच सूत्रे तात्पुरती आपल्या हाती घेतली. उत्तराधिकाऱी म्हणून अनेक नावे पुढे येत आहेत. पण योग्य निवड करणे खरोखरच कठीण होणार आहे. शिंझो यांचे व्यक्तिमत्त्व आहेच तसे. असा हा आठ वर्षांचा कार्यकाळ शिंजो ॲबे हे सलगपणे सर्वात जास्त काळ पंतप्रधानपदी राहिलेले पंतप्रधान आहेत. उजवे राष्ट्रवादी अशी त्यांची ओळख आहे. ते जपानच्या इतिहासाचे पुनर्लेखन केले पाहिजे, या मताचे आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कुटुंबीयांपासून दूर राहणाऱ्या सैनिकांच्या नैसर्गिक गरजा पूर्ण करण्याकरता दक्षिण कोरिया आणि चीनमधील युवतींवर सक्ती करण्यात आली होती, हा आरोप त्यांना अमान्य आहे. ही बाब चीन आणि दक्षिण कोरिया व चीन अजूनही विसरलेले नाहीत. युद्धानंतर झालेल्या या अन्यायाबद्दल जपानने माफी मागितली आणि पीडित महिलांच्या चरतार्थासाठी पेन्शन देऊ केले होते. यातली शेवटची पीडित महिला काही वर्षांपूर्वी वयाच्या 74 व्या वर्षी मरण पावली आणि हा विषय तसा एकप्रकारे संपला. यात सक्ती नव्हती तर या महिला स्वखुशीने उदरनिर्वाहासाठी दाखल झाल्या होत्या, असे शिंजो ॲबे यांचे म्हणणे होते. ॲबेनॅामिक्स उत्तर कोरियाबाबत कठोर भूमिकेला पर्याय नाही, असे त्यांचे मत होते. दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या तहात जपाने शस्त्रास्त्रे निर्माण करायची नाहीत व सैन्यही ठेवायचे नाही, अशा अटी होत्या, त्या आता बदललेल्या परिस्थितीत काढून टाकाव्यात, याबाबत ते आग्रही होते. शस्त्रास्त्रे व सैन्य यावर खर्च होणारा पैसा विकासासाठी वापरून त्यांनी जपानला आज आर्थिक महसत्ता बनविले आहे. त्यांच्या अर्थकारणाची जातकुळी वेगळी होती. ती ॲबेनॅामिक्स म्हणून ओळखली जाते. या अर्थकारणाची तीन प्रमुख सूत्रे होती. पहिले असे की, बॅंकांकडून सुलभपणे कर्ज मिळावे, दुसरे असे की, शासनाने स्वत: भरपूर खर्च करून अर्थकारणाला गती प्राप्त करून द्यावी आणि तिसरे म्हणजे, पायाभूत सोयीसुविधांचा उत्तम विकास साधावा. यामुळे खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळाले, चलनवाढीला आळा बसला आणि रोजगारनिर्मितीसाठी वेगळे प्रयत्न करावे लागले नाहीत. एका जपानी-अमेरिकन नागरिकाने शिंजो ॲबे यांचा उल्लेख जपानचा मोदी अशा शब्दात केलेला आहे. अर्थात आज कोरोनामुळे जपानच्या अर्थकारणाला काहीसे ग्रहण लागले आहे, हा भाग वेगळा. पण त्यामुळे त्यांना प्रसन्न मनाने जनतेचा निरोप घेता आला नाही. कोरोनाचा सामना करण्यासाठी शिंजो ॲबे यांनी देशात आणीबाणी सारखी कठोर उपाययोजना केली खरी पण जनतेनेही आम्ही स्वप्रेरणेने आणि स्वखुशीने सर्व नियमांचे आणि पथ्यांचे पालन करीत आहोत, हे दाखवून अशा टोकाच्या भूमिकेची आवश्यकता नसल्याचे दाखवून दिले. समसमासंयोग काही वेगळा असतो का? काका- पुतणे, दोन टोके शिंजो ॲबे यांचे घराणे राजकारणी घराणे होते. त्यांचे चुलते ऐसाकू सॅटो हे सुद्धा 1964 ते 1972 अशी 6 वर्षे पंतप्रधान होते. ते शांततासाठीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते होते. काका पुतण्यात भूमिका आणि धोरणे यात टोकाची भिन्नता आहे. ॲबे यांनी शस्त्रबंदी काळातही संरक्षणावर चतुराईने भरपूर खर्च केला. चीनसोबत शांतता हवी असेल तर त्याच्यासारखेच शक्तिसंपंन्न होण्यावाचून पर्याय नाही, अशी त्यांची भूमिका होती. शस्त्रसामर्थ्याला पर्याय नाही चीन आणि उत्तर कोरियाच्या रोजच्या धमक्या व चाचण्या लक्षात घेता शस्त्रसज्जतेसाठी जनतेचा कौल घ्यावा अशी त्यांची योजना होती. युद्धाचे ढग देशावर येऊन ठाकले असतांना निवडणुका कसल्या घेता हा आक्षेप त्यांनी फेटाळून लावला. उत्तर कोरियाशी दोन हात करायचे झाले तर जपानला सर्वस्वी अमेरिकेवर अवलंबून रहावे लागेल, ही स्थिती बदलण्यासाठी जपानने स्वत: सैन्यदले उभारण्याची, अण्वास्त्रासकट सर्व प्रकारच्या शस्त्रांनी सज्ज असण्याची आवश्यकता आहे, असे त्यांचे मत होते. यासाठी अमेरिका व मित्र राष्ट्रांसोबत दुसऱ्या महायुद्धातील पराभवानंतर केलेल्या तहाची जशी अडचण होती, तशीच जपानच्या राज्यघटनेचीही अडकाठी होती. विद्यमान अमेरिकन राजवट जपानचे संरक्षण करण्याची जबाबदारी केव्हाही झटकून टाकेल अशी त्यांना भीती त्यांना वाटत होती. पण सध्या सरकारजवळ घटना दुरुस्ती पारित करण्यासाठी आवश्यक असलेले बहुमत नव्हते. निवडणुकीनंतर ते मिळेलच, याची हमी कोणी द्यावी? याशिवाय आणखीही एक अडचण होती. जपानचे वेगळेपण जपानच्या सम्राटांचा अण्वस्त्र निर्मितीला विरोध होता. त्यांना शिंझो ॲबे यांच्या आग्रहाला बळी पडायचे नव्हते. म्हणून वाढते वय आणि ढासळत चाललेल्या प्रकृतीचे निमित्त सांगून त्यांनी वयोनिवृत्तीची, घटनेत तरतूद नसलेली, इच्छा व्यक्त केली, असे म्हणतात. आजवर अख्खे जपान परंपरेनुसार सम्राटांसमोर नतमस्तक होत आलेले आहे. पण शिंझो ॲबे यांनी मात्र त्यांच्या विरोधात जाऊन आपला अण्वस्त्रनिर्मितीबाबतचा मुद्दा रेटण्याचे धाडस केले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जपानच्या शरणागतीची घोषणा जपानच्या घटनेनुसार सम्राटांना करायची होती. शरणागतीच्या नामुश्कीने सर्व जपानी जनता दु:खी व अपमानित झाली होती. पण या निमित्ताने का होईना, जपानी जनतेला आपल्या सम्राटांचे दुर्मीळ दर्शन होणार होते. याचा आनंदही जनतेच्या मनात होता. एका डोळ्यात सम्राटाच्या दर्शनाची अपूर्व संधी मिळणार म्हणून आनंदाचे हसू आणि दुसऱ्या डोळ्यात नामुष्कीच्या पराभवामुळे पत्कराव्या लागणाऱ्या लज्जास्पद शरणागतीमुळे आसू, अशी विचित्र स्थिती जनतेची झाली होती. असा जनताहृदयसम्राट आणि अशी राजनिष्ठ जनता ज्या जपानमध्ये 1945 साली होती, त्याच जपानमध्ये आज 2020 मध्ये शिंझो ॲबे सारखा निष्कपट, लोकहितदक्ष, कर्मयोगी तर्ककठोर आणि सम्राटाच्या विरुद्धसुद्धा भूमिका घेणारा पंतप्रधान उदयाला यावा, हा कालमहिमाच नाही काय?

No comments:

Post a Comment