Friday, June 11, 2021

अमेरिकेत सहमतीच्या राजकारणावर भर वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? अमेरिकेत अध्यक्षपदाची उमेदवारी कुणाला मिळावी यासाठी पक्षस्तरावर तृणमूल पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत उमेदवारात स्पर्धा असते. एकेक उमेदवार गळत जातो आणि शेवटी कुणातरी एकाला अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून पक्षाची मान्यता मिळते. डेमोक्रॅट पक्षात ज्यो बायडेन, कमला हॅरिस आणि बर्नी सॅंडर्स यांच्यात अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या निमित्ताने पक्षांतर्गत चुरस होती, वादही होते. अगोदर कमला हॅरिस यांनी आर्थिक बळाच्या अभावामुळे स्पर्धेतून माघार घेतली आणि बायडेन यांना पाठिंबा दिला असला तरी, सर्वाना वैद्यकीय मदत, नि:शुल्क शिक्षण, स्थलांतरित, आणि गर्भपात याबात त्या अधिक उदारमतवादी आहेत तर मुक्त शस्त्रपरवान्याबाबत कडक धोरणाचा पुरस्कार करणाऱ्या आहेत. त्यानंतर डेमोक्रॅट पक्षातलेच, पण समाजवादी भूमिकेशी बरीचशी जवळीक साधून असलेले आणि म्हणूच कदाचित तरूण मतदारांवर बऱ्यापैकी प्रभाव असलेले बर्नी सॅंडर्स आणि ज्यो बायडेन यांच्यात चर्चेच्या फेरी झडून बर्नी सॅंडर्स याचे काही मुद्दे बायडेन यांनी स्वीकारले आणि बर्नी सॅंडर्स यांनीही बायडेन यांना पाठिंबा देत माघार घेतली. पुढे ज्यो बायडेन यांनी कमला हॅरिस यांना आपला उपाध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून निवडले तर बर्नी सॅंडर्स महत्त्वाच्या बजेट कमेटीचे प्रमुख आहेत. तडजोडीला पर्याय नाही एकेकाळी एकमेकांचे स्पर्धक असलेल्या या तिघांनी आपापसातले मतभेद विसरून निवडणुकीपुरते तर एकदिलाने काम करून विजयश्री खेचून आणली खरी पण या तिघांना मागचे सगळे विसरून एकदिलाने काम करणे व्यवहारात तेवढे सोपे असणार नाही. तिजोरीच्या किल्या बर्नी सॅंडर्स यांच्या हाती आहेत. कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी भलेमोठे पॅकेट मंजूर करून करून घेण्यासाठी ज्यो बायडेन यांना बर्नी सॅंडर्स यांची सहमती हवी आहे. तसेच सिनेटमध्ये डेमोक्रॅट पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष यांचे प्रत्येकी 50 सदस्य निवडून आले असल्यामुळे. बजेट कमेटीचा प्रस्ताव उपाध्यक्ष कमला हॅरिस गरज पडल्यास आपले निर्णायक मत (कास्टिंग व्होट) देऊन पारित करून घेऊ शकतात. अमेरिकेत व्हिपची तरतूद नसल्यामुळे सर्व डेमोक्रॅट सदस्य ठरावाच्या बाजूनेच मतदान करतीलच याची हमी नाही. तसेच सर्व रिपब्लिकन सदस्य ठरावाच्या विरोधातच मतदान करतील असेही नाही. तसेच हा आर्थिक विषय असल्यामुळे केवळ 51 मते ठरावाच्या बाजूने मिळाली की झाले असेही हे काम नाही, तर 60 टक्के मताधिक्याने हा ठराव पारित होणे आवश्यक आहे. रिपब्लिकन सदस्यांच्या सहकार्याशिवाय हे कठीण हे कठीणच आहे. कोरोनामुळे अमेरिकेतील गरीब आणि श्रीमंतांमधली खाई रुंदावली आहे. ही असमानता दूर करण्यावरच लक्ष केंद्रित करावे, यातच शहाणपण आहे. त्यामुळे या दृष्टीनेच हालचाली सुरू झाल्याचे दिसते आहे. ज्यो बायडेन आणि बर्नी सॅंडर्स यातील संबंध तसे मुळात गेल्या चौदा वर्षे राजकीय दोस्तीचेच राहिलेले आहेत. अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी मात्र दोघे एकमेकांविरुद्ध कठोर प्रचार करीत होते, त्या निमित्ताने निर्माण झालेली कटुता दूर सारून पूर्वीसारखे मैत्रीचे संबंध निर्माण करण्यावर उभयपक्षी भर दिला जातो आहे, पॅकेज की खर्चवाढ की वेतनवाढ? बायडेन यांच्या मदतीच्या पॅकेजचे बर्नी सॅंडर्स समर्थकच आहेत. पण ते त्यांचे मत असे आहे की अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी पॅकेटला बळ देण्यासाठी शासनाने वेगळ्याप्रकारेही खर्च वाढविला पाहिजे, त्यासाठी कामे काढली पाहिजेत. रिपब्लिकन पक्ष एवढे मोठे पॅकेज देण्याच्या विरोधात आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, त्यापेक्षा पगारवाढ करा. कर्मचाऱ्यांच्या हातात आणखी पैसे खुखुळतील, असे पहा. सिनेटमध्ये 100 पैकी 50 सदस्य असलेल्या रिपब्लिकनांच्या या मागणीकडे बायडेन प्रशासनाला दुर्लक्ष करता येणार नाही. पण बायडेन तर पॅकेटवर अडून आहेत. यावर तोडगा कसा काढायचा? बजेट पास झालेच पाहिजे अमेरिकेत व्हिपची तरतूद नाही. त्यामुळे अमेरिकेत लोकप्रतिनिधींना निलंबनासारख्या कारवाईची भीती नसते. त्यामुळे प्रत्येक सदस्य आपली भूमिका ठरवू शकतो. सामान्यत: सदस्य पक्षाच्या ध्येयधोरणाच्या विरोधात जात नसले तरी प्रत्येक जण समोर आलेल्या विषयावर विचार करून मतदान करीत असल्यामुळे सत्ताधाऱ्यांना आपल्या पक्षाच्या सदस्यांनाही सांभाळावे लागते, त्यातून बहुमत आत्तासारखे निसटते असेल तर प्रतिपक्षाच्या सदस्यांनाही अनुकूल करून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. अडमुठेपणा होतच नाही असे नाही. अशावेळी बजेट तीनतीन महिने पास होत नाही, अडकून पडते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगारच नव्हे तर सर्व आर्थक व्यवहार खोळंबून राहतात. 2018 मध्ये मध्यावधी निवडणुका झाल्यानंतर हाऊसमध्ये रिपब्लिकन पक्षाने बहुमत गमावले होते. मेक्सिकोची सीमा भिंत बांधून बंद करण्याची डोनाल्ड ट्रंप याची भूमिका डेमोक्रॅट पक्षाला मान्य नव्हती. त्यामुळे बजेटमधील भिंतीसाठीच्या तरतुदीमुळे ते हाऊसमध्ये पास होईना. हा 6 महिन्यांचा शट डाऊन होता.. एका अभूतपूर्व प्रसंगाचा दाखला अमेरिकेत 800,000 सरकारी नोकरांपैकी 42,000 तटरक्षक (कोस्ट गार्ड्स) आहेत. 2018 मध्ये ते ‘शट डाऊन’ सुरू असूनही कामावर होते. ‘तुम्हाला पगार मिळणार नाही’, असे कळविले होते. ‘अमेरिकेत आजवर सैन्य दलांवर ही पाळी कधीच आली नव्हती. तुम्ही आजवर अनेक बिकट प्रसंगांवर मात केली आहे. याही वेळीही कामावर रहा, देशाला तुमचा विसर पडलेला नाही आणि कधी पडणारही नाही.’ अशा आशयाचे आवाहन सैन्यदलप्रमुखांनी सैनिकांना केले. त्याला उत्तम प्रतिसादही मिळाला. सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी/सेवानिवृत्तांसाठी धनसंग्रह मोहीम हाती घेण्यात आली. ‘अहो, तुम्ही आमचे कमांडर-इन - चीफ आहात. राजकारण बाजूला ठेवा आणि सैनिकांच्या कुटुंबीयांची उपासमार थांबवा’, अशा आशयाचे आवाहन डोनाल्ड ट्रंप यांना करण्यात आले. शेवटी भिंतीसाठी थोडीशी तरतूद मान्य करवून घेऊन हा प्रश्न कसाबसा सुटला. दर दोन वर्षांनी मतदारांना सामोरे जावे लागते हाऊसचा (जणू आपली लोकसभा) कार्यकाळ दोन वर्षांचाच असतो. म्हणजे 2022 मध्ये हाऊसच्या 435 सदस्यांच्या निवडणुकीसाठी आणि सिनेटच्या निवृत्त होणाऱ्या एकतृतियांश सदस्यांची निवड करण्यासाठी अमेरिका पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे. अध्यक्षाचा कार्यकाळ निम्मा झाल्यानंतर होणाऱ्या या निवडणुकीला मध्यावधी निवडणूक असे म्हणतात. सत्ताधाऱी आणि विरोधक दोन वर्षात कसे वागले ते बघून मतदार आपला कौल देत असतात. या निवडणुकीमुळे अनेकदा हाऊस आणि सिनेटमधील मधील सत्तासमीकरणे पार बदलून गेली असा इतिहास अमेरिकेला नवीन नाही. असे चेक्स ॲंड बॅलन्सेस ही अमेरिकेच्या घटनेची विशेषता आहे. यामुळे कुणीही मग्रूर होऊ नये, बेफिकीरपणे वागू नये, हे हेतू साधले जातात, निदान साधले जावेत, अशी भूमिका या तरतुदीच्या मुळाशी आहे. त्यामुळे कुणीही टोकाची भूमिका स्वीकारून वागत नाही. त्वयार्धं मयार्धम् यावेळी तर सिनेटमध्ये दोन्ही पक्ष तुल्यबळ आहेत. म्हणून बिल पास व्हावे यासाठी बायडेन आपले पॅकेट थोडे छोटे करतील, बर्नी सॅंडर्स यांच्या सूचनेनुसार खर्च वाढवतील आणि रिपब्लिकनांची वेतनवाढीची मागणीही काही प्रमाणात मान्य करून लोकांच्या हाती पैसे खुळखुळतील असे पाहतील आणि बिलांची नौका सिनेटची मान्यता मिळवून पैलतिरी नेतील, असे दिसते. उपाध्यक्षपदी असलेल्या कमला हॅरिस सिनेटच्या अध्यक्षा आहेत. त्यांना कास्टिंग व्होटचा म्हणजे दोन्ही पक्षांना समसमान मते मिळाल्यास निर्णायक मत देण्याचा, अधिकार आहे, त्यामुळे त्यांच्याशीही बायडेन यांना जुळवूनच घ्यावे लागणार आहे. बायडेन, सॅंडर्स आणि कमला हॅरिस हे तिघेही एकाच डेमोक्रॅट पक्षाचे सदस्य आहेत, हे खरे आहे. पण पक्षांतर्गत निवडणुकीत अध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी म्हणून एकमेकाविरुद्ध लढल्यानंतर आता त्यांच्यावर एकोप्याने वागण्याची वेळ आली आहे. रिपब्लिकन पक्ष तर बोलूचालून विरोधी पक्षच आहे. पण त्याचीही साथ घेणे बायडेन यांना भाग आहे आणि अडेलतट्टूपणाने वागणे रिपब्लिकनांनाही परवडण्यासारखे नाही. ते कसे वागतात हे पाहूनच 2022 मध्ये हाऊसच्या मध्यावधी निडणुकीत मतदार मतदान करणार आहेत. त्यातच कोरोनामुळे अमेरिकेत सर्वांचीच तारेवरची कसरत सुरू झाली आहे. त्यामुळे थोडं तुझं, थोडं माझं, असे म्हणतच अमेरिकेतील कारभाराचा गाडा निदान पुढची दोन वर्षे तरी मार्गक्रमण करील असे दिसते.

No comments:

Post a Comment