Wednesday, March 5, 2014

Jevan gharache aani hotelmadhale

जेवण घराचे आणि हॉटेलमधले
                                वसंत गणेश काणे
हल्ली मुक्काम पुणे
९४२२८०४४३०
आपल्या जीवनात सध्या आधुनिकतेचे दर्शन अनेक प्रकारांनी घडताना दिसते. हॉटेलमध्ये सहकुटुंबसहपरिवार जाऊन जिभेचे चोचले पुरविण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. पिझ्झा, बर्गर, पास्ता, सूप हे शब्द लहानथोरांच्या परिचयाचे झाले आहेत.हॉटेलमध्ये या आणि यासारख्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी आई, वडील, आणि दोन (अनेकदा एकच)मुले असे चौकोनी किंवा त्रिकोणी कुटुंबच जाते असे नाही तर सोबत आजी आजोबाही असतात आणि असा कौटुंबिक षटकोण किंवा पंचकोन हॉटेलमध्ये मिळणाऱ्या चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेताना आढळून येतो. आता हा प्रकार शहरापुरातच मर्यादित राहिलेला नाही.
निरनिराळ्या वाहिन्यांवर पदार्थांचे वर्णनही अशाप्रकारे केले जाते की, कानावर पडताच अनेकांच्या जिभेला पाणी सुटावे.खाद्य पदार्थांचे रूप आणि त्यांची सजावट (गार्निशिंग) पाहिल्यानंतर लहानथोर पुढच्या हॉटेलभेटीच्या वेळी कोणता ‘मेनू’ सांगायचा ते आपापसात खल करून आणि नक्की ठरवूनच ‘वीकएंड’ केव्हा येतो याची वाट पाहत असतात. काहींना तर तेवढीही कळ सोसवत नाही.
आपले जुने साहित्य अनेक दृष्टींनी संपन्न आहे.त्यात अक़्नेक कथा आणि उदाहरणे आहेत.त्यात कौटुंबिक व्यवहार कसे असावेत, सामाजिक प्रश्नांच्या बाबतीत कोणती भूमिका योग्य आहे, कोणत्याही कृतीमागे नैतिक अधिष्ठान असणे कसे आवश्यक आहे, याबाबत  मार्गदर्शन केलेले आढळते. एवढी बौद्धिक समज नसणारे या कथांचा आस्वाद रंजक कथा म्हणूनही घेऊ शकतात. य कथा अशाप्रकारेही लोकमान्य आणि लोकप्रिय झालेल्या आहेत.
आज काळ बदलला आहे. आईच्या हातचा पिठलेभात, थालीपीठ या गोष्टी दुर्मिळ झाल्या आहेत. मुलांनाही त्यापेक्षा पिझ्झा बरा वाटू लागला आहे.शाळेत मधल्या वेळच्या  जेवणाची जागा खिचडीने घेतली आहे. खिचडीबाबतच्या कथा सर्वांना माहित आहेत. घरच्या जेवणाने केवळ शरीराचेच पोषण होते असे नाही त्याची ‘फुद्व्हेल्यू’ वाढविणारे अन्य घटकही असतात. घरच्या जेवणाला आईच्या हाताचा परिसस्पर्श झालेला असतो. त्यामुळे या जेवणात शारीरिक आरोग्यासोबत  मानसिक आणि भावनिक आरोग्यही जोपासले जात असते.
आपल्या जुन्या साहित्यात सांदिपनी ऋषींच्या आश्रमात अध्ययनासाठी गेलेल्या श्रीकृष्णाची कथा सांगितली आहे. अध्ययन पूर्ण झाल्यानंतर त्याला सांदिपनी ऋषींनी ‘तुला कोणता आशीर्वाद हवा’,असे विचारले तेव्हा श्रीकृष्णाने दिलेले उत्तर आपल्याला अंतर्मुख करायला लावणारे आहे. श्रीकृष्ण सांदिपनी ऋषींना म्हणाला, ‘मातृहस्तेन भोजनम्’ ‘मला आईच्या हातचे जेवण मिळो’.


No comments:

Post a Comment