Tuesday, March 11, 2014

Teacher's eligibility Test 11.03.2014

शिक्षक पात्रता परीक्षा – म्हणे शिक्षकच नापास !   
                                वसंत गणेश काणे
हल्ली मुक्काम पुणे
९४२२८०४४३०
शिक्षक पात्रता परीक्षा केंद्र शासनाने सुरू करून आता पुष्कळ वर्षे झाली आहेत. याच प्रकारची परीक्षा महाराष्ट्र स्टेट कौन्सिल आफ एक्झामिनेशनने याच वर्षी पहिल्यांदाच १५ डिसेंबर २०१३ ला घेतली आहे. दीडशे गुणांच्या या परीक्षेत प्रत्येकी एक  गुण असलेले दीडशे वस्तुनिष्ठ प्रश्न असलेल्या दोन प्रश्नपत्रिका होत्या. वर्ग एक ते पाच साठी  पहिली प्रश्नपत्रिका होती. वर्ग सहा ते आठ वर्गासाठी दुसरी प्रश्नपत्रिका होती. खुल्या वर्गासाठी साठ गुण तर मागासवर्गीयांसाठी पन्नास गुण हा पास होण्यासाठीचा निकष होता. उमेदवारांना अभ्यासक्रमाविषयी सूचना देण्यात आल्या होत्या. पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्नच  असतील, ही बाब स्पष्ट केली  होती. जिल्हा परिषद आणि नगर परिषद यांच्या शाळांमध्ये उमेदवारांची नियुक्ती या परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधरे करता येतील. चांगल्या खाजगी शाळात या गुणवत्तेसोबत इतरही काही निकष असू शकतील. धंदा म्हणून - आणि तोही नंबर दोनचा – चालविल्या जाणाऱ्या शाळांमध्ये शिक्षकाची धनवत्ता (देणगी देण्याची क्षमता) हीच त्याची गुणवत्ता ठरत असते या प्रकाराला या परीक्षेमुळे किती पायबंद बसेल ते भविष्यात दिसेलच. या परीक्षेत मिळविलेली पात्रता सात वर्षे पर्यंत मान्य राहील. त्यानंतर पुन्हा परीक्षा द्यावी लागेल. उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र  त्या त्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी याजकडून मिळेल. केंद्र शासनाने घेतलेल्या अशाच परीक्षेचा निकाल यंदा अकरा टक्के, उत्तरप्रदेश २५ टक्के, पंजाब ७ टक्के लागला आहे.
परीक्षेला मिळालेला प्रतिसाद व निकालाची टक्केवारी
 वर्ग एक ते पाच साठीची  पहिली प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी अर्ज करणाऱ्या ३ लक्ष ८३ हजार ६३० उमेद्वारांपैकी ३ लक्ष ६७ हजार ८९९ उमेदवारांनी परीक्षा  दिली. त्यापैकी १६ हजार २८१ (मराठी माध्यम १५ हजार ९९५ ,इंग्रजी माध्यम ९८ व उर्दू माध्यम १८८) उमेदवार उत्तीर्ण झाले. वर्ग सहा ते आठ साठीची  दुसरी प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी अर्ज करणाऱ्या २ लक्ष ३५ हजार ७६१  उमेद्वारांपैकी २ लक्ष २४ हजार ०९४ उमेदवारांनी परीक्षा  दिली. त्यापैकी १३ हजार ३३६ (मराठी माध्यम १२ हजार ८८१, इंग्रजी माध्यम २६० व उर्दू माध्यम १९५) उमेदवार उत्तीर्ण झाले.पहिल्या परीक्षेसाठी उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ४.४३ टक्के ( मराठी माध्यम ४.७० टक्के , इंग्रजी माध्यम १.४४ टक्के,  उर्दू माध्यम ०.९१ टक्के) अशी होती तर दुसऱ्या परीक्षेसाठी उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ५.९५ टक्के ( मराठी माध्यम ६.२४, इंग्रजी माध्यम २.६६ टक्के,  उर्दू माध्यम २.५४ टक्के ) अशी होती.
राज्य परीक्षा मंडळाच्या अक्षम्य गुन्हा
या परीक्षेत चुकीचे प्रश्न विचारले गेल्यामुळे उमेदवारांचा गोंधळ उडाला होता. निकाल देताना चुकीच्या प्रश्नांना वगळून उत्तीर्णता ठरविण्यात आली. महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाची ही पहिलीच परीक्षा असली तरी या  परीक्षेत चुकीचे प्रश्न विचारले जावेत हा ‘अक्षम्य गुन्हा’ समजला गेला पाहिजे. यांना ‘चुका’ समजून मोकळे होता येणार नाही. आजकाल प्राथमिक पासून पदव्युत्तर परीक्षेपर्यंत जवळजवळ प्रत्येक परीक्षेत चुकीचे प्रश्न विचारले जात आहेत. हा प्रकार आपण गांभीर्याने घेतला पाहिजे. परीक्षा देणारा उमेदवार सामान्यत: प्रश्नच चुकीचा असेल असे गृहीत धरत नाही. आपलेच काहीतरी चुकत असावे असे मानून त्याच्या मनाचा गोंधळ उडत असतो. यामुळे त्याचा वेळ तर जातोच आणि शिवाय यामुळे जी मानसिक अस्वस्थता निर्माण होते तिचा परिणाम उरलेले प्रश्न सोडवितांना होत असतो. यामुळे उमेदवाराचे जे नुकसान होत असते ते या प्रश्नाचे गुण वगळून किंवा चुकीचा प्रश्न सोडविणाऱ्या उमेदवाराला त्या प्र्श्नासाठीचे सर्व गुण भाल करून भरून निघत नाही. असे प्रश्न कोणत्याच परीक्षेत नसावेत. पण ते शिक्षक पात्रता परीक्षेतही असावेत , याबाबतीतला विरोधाभास कोणालाही फारसा जाणवू नये, याचे आश्चर्य वाटते. ही बाब अक्षम्य ‘चूक’ नव्हे तर ‘गुन्हा’ मानली पाहिजे. प्रश्नपत्रिकेच्या सुरवातीला अनेकदा काही सूचना असतात. ‘या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न चुकीचे असण्याचीही शक्यता आहे’,अशी सूचना या  सूचनांमध्ये असावी, अशी आमच्या एका मित्राची सूचना आहे. तिची संभावना खवचटपणा  म्हणून करून तिची वासलात लावता येणार नाही.
चांगले/योग्य उमेदवार या पेशाकडे कसे वळतील?
तरीही या  परीक्षेत सहा टक्के उमेदवारच उत्तीर्ण व्हावेत, ही एक गंभीर बाब आहे, यात शंका नाही. काही वृत्तपत्रात ‘शिक्षकच नापास’ असे शीर्षक दिलेले आढळले. अशी हेटाळणी    करून हा प्रश्न सुटणार नाही. कमी निकालाचे दोन अर्थ निघतात. हे उमेदवार ज्या शाळा आणि महाविद्यालयात शिकले त्यांच्या शैक्षणिक दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण होते आहे. तसेच कोणत्या दर्जाचे उमेदवार शिक्षक पेशाकडे येण्याचा विचार करीत आहेत , ही बाबही मनाला अस्वस्थ करणारी आहे. मेधावी विद्यार्थ्यांनी शिक्षकी पेशाकडे पाठ फिरविली आहे, याचे गांभीर्य आपण लक्षात घ्यावयास हवे. भावी पिढ्या उत्तम निपजायच्या  असतील तर त्यांना घडविणारे शिक्षक स्वत: योग्य गुणवत्तेचे असले पाहिजेत. असे उमेदवार या पेशात यावेत यासाठी सेवासुरक्षा, प्रत्यक्षात उत्तम वेतन मिळण्याची हमी आणि समाजात मनाचे स्थान ह्या गोष्टी शिक्षकांना मिळतील अशी रचना आणि व्यवस्था करण्याची गरज आहे.
कमी निकालासाठी दिलेली पण न पटणारी करणे
अनेक उमेदवारांचे शिक्षण  खूप वर्षे अगोदरच थांबलेले होते. परीक्षा देण्याचा त्यांचा सराव बंद झाला होता. वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी तर असा सराव असण्याची विशेष आवश्यकता असते. हे कारण पुढे करून कमी लागलेल्या निकालाचे समर्थन करता येणार नाही. परीक्षेत विचारलेले प्रश्न संबंधित वर्गासाठीच्या पाठ्यपुस्तकावर आधारित होते ही वस्तुस्थिती लक्षात घेतली नापासांची ‘भली मोठी टक्केवारी’, ही एक गंभीर बाब ठरते आहे. पहिली ते आठवीच्या मुलांना जे ‘यावे’ अशी अपेक्षा आहे, ते ‘न येणारे’ नव्वदपेक्षा जास्त उमेदवार असावेत, हे पाहून आपली सगळ्यांची झोप उडावयास हवी. या प्रश्नाकडे ‘डोळेझाक’ करणारे निद्रिस्त धुरीण आणि समाज यांना हलवून हलवून जागे करण्याची आवश्यकता आहे. कारण ज्या देशात शिक्षणाची ही अवस्था आहे. तो देश एकविसाव्या शतकात जगाचे नेतृत्त्व करण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता कशी प्राप्त करू शकेल?
शिक्षकाला दुहेरी पात्रता असली पाहिजे
 योग्य पात्रतेचे शिक्षक मिळावेत म्हणून केलेला हा प्रयत्न स्वागतार्ह असला तरी ‘अपूर्ण आणि अर्धवट’ वाटत शिक्षकाला ‘दुहेरी पात्रता’ आवश्यक असते. ‘आपला शिकवायचा विषय’ त्याला स्वत:ला ‘येत असला’ पाहिजे. तसेच तो ‘कसा शिकवायचा’   हेही त्याला माहित असले पाहिजे. थोडी क्लिष्ट भाषा वापरायची झाली तर ‘आशय’ आणि ‘अध्यापनक्षमता’ हे दोन्ही गुण असलेला – सव्यसाचित्व – असलेला शिक्षकच शिक्षणक्षेत्राला न्याय देऊ शकेल. अर्जुनाला डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही हातांनी शरसंधान करता येत असे. म्हणून त्फ्याचे वर्णन ‘सव्यसाची धनुर्धर’ असे केले आहे. शिक्षक असा अर्जुनासारखा असावा. यासाठी उत्तम अध्यापन महाविद्यालये (ट्रेनिंग कॉलेजेस) असली पाहिजेत. याही बाबतीत खूप काही करण्यासारखे आहे. बहुतेक ट्रेनिंग कॉलेजेस धंदा म्हणून चालविली जातात. राज्य पातळीवरच्या एस सी ई आर टी ची अनुमती नसतांना एन सी ई आर टी (राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण परिषद) कडून  ठेत अनुमती घेऊन अध्यापक विद्यालये स्थापन करण्याचा सपाटा सुरु आहे. अर्थातच अशा महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचा स्तर कोणत्या दर्जाचा असेल, ते सांगण्याची आवश्यकता नाही.
नित्य साधना हवी
ज्ञानाचा प्रस्फोट अनु प्रस्फोटालाही मागे टाकतो आहे. अशा आजच्या काळात ‘आशय आणि अध्यापनक्षमता’ यांना सतत ‘धार लावण्याची’ आणि त्यांना सतत अद्ययावत ठेवण्याची आवश्यकता आहे. या दृष्टीने आज केले जात असलेले प्रयत्न वरवरचे आणि दिखाऊ वाटतात.
शिक्षका तू सुद्धा ?
शिक्षकांच्या अपकृत्यांची, दुष्कृत्यांची, लिंग पिसाटपणाची अनेक उदाहरणे जवळजवळ रोज वाचायला मिळतात. प्रसिद्धी माध्यमे आणि समाज यासाठी ‘संपूर्ण शिक्षकवर्गावरच ठपका’ ठेउन्न मोकळा होतो. य प्रकारासाठी संपूर्ण शिक्षकवर्गाला जबाबदार धरणे योग्य नाही. या पेशात शिरलेल्या विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तींचे हे कृत्य असते. अशा व्यक्ती या पेशात(तसे पहिले तर कोणत्याच पेशात) येऊ नयेत यासाठी व्यक्तिमत्त्व चाचणी घेऊन मगच उमेदवाराला अध्यापक महाविद्यालयात प्रवेश द्यावा.आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी प्रवेश देताना त्या अभ्यासक्रमाशी सुसंगत असे व्यक्तिमत्त्व आहे किंवा नाही हे पाहून उमेदवाराची निवड करतात. याच प्रकारची चाचणी शिक्षक पेशासाठी आखणे अशक्य नाही.
आशयात प्रावीण्य, अध्यापनकौशल्यात प्रवीणता आणि सुयोग्य आणि निरोगी व्यक्तिमत्त्व असणारया  व्यक्तीच शिक्षणक्षेत्रात याव्यात  आणि त्यांना उत्तम वेतन व सन्मान मिळावा याची आज गरज आहे. पण याच्या जोडीला उत्तम शालेय व्यवस्थापनही आवश्यक आहे. पण तो एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.                   

     

No comments:

Post a Comment