Thursday, March 13, 2014

Khas Adami Party 13.02.2014

प्रासंगिक

तारीख: 13 Mar 2014 00:39:25

‘खाप’ची खास खैरात’

निवडणूक म्हटली की मतांचा जोगवा आणि आश्‍वासनांची रेलचेल! नुकताच एक घपलेबाजांचा पक्ष जन्माला आला आहे. या पक्षाचा कार्यक्रम आणि जाहीरनामा प्रसिद्ध करीत आहोत.
खास आदमी पक्षात (खाप) भ्रष्ट आणि शस्त्रधारी बलदंड व्यक्तींचे सहर्ष स्वागत होत असते. (या पक्षाचे खाप नावाच्या जात पंचायतीशी केवळ नामसादृष्य आहे, हे वाचकांनी लक्षात असू द्यावे). या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जवळजवळ सर्वच पक्षांच्या कार्यालयांना भेटी देऊन त्या त्या पक्षात वर उल्लेख केलेल्या गुणांनी युक्त असलेल्या व्यक्तींसाठी टेहेळणी करून योग्य व्यक्तींसाठी आपल्या पक्षाची ‘महाद्वारे’ खुली असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा गुणांनी युक्त असलेल्या अनेक व्यक्तींसाठी ‘द्वारे’ लहान पडतील म्हणून ‘महाद्वारे’ मुद्दाम तयार करून घेतली असल्यामुळे कुणालाही प्रवेश करताना अडचण पडू नये. काहींना प्रवेशद्वाराने प्रवेश करताना अडचणींचा सामना करावा लागतो, याची जाणीव असल्यामुळे अशा व्यक्तींसाठी मागील दाराने प्रवेश करण्याचीही खापने खास व्यवस्था केली आहे.

खाप एक प्रमुख दावेदार पक्ष

सध्या काही मोजक्याच लोकांनी खाप पक्षात प्रवेश केला असला, तरी अनेकांच्या मनाचा अजूनही हिय्या होत नाही. अशांचे मनोबल वाढविण्यासाठी खापने खास प्रयत्न सुरू केले आहेत. ही बाब सध्या मोजक्याच व्यक्तींना माहीत आहे. अशा गोष्टी लवकरच सर्वांना माहीत होतील आणि योग्य व्यक्तींचा लोंढाच खाप पक्षात प्रवेश करील, याची पक्षाच्या धुरीणांना खात्री आहे. असे घडून आले तर हा पक्ष सत्तेच्या राजकारणात एक प्रमुख दावेदार पक्ष म्हणून उदयाला येईल असा यांचा होरा आहे. सत्ता प्राप्त करण्यासाठी पुरेसे संख्याबळ या पक्षाला मिळेल किंवा नाही, अशी भीती अनेक इच्छुकांच्या मनात असल्यामुळे त्यांनी आपले पत्ते अजूनही उघड केलेले नाहीत. प्रसंगी ‘अन्य पक्षांचा पाठिंबा घेऊन सत्ता हस्तगत करणे आणि पाठिंबा देणार्‍या पक्षावरही दुगाण्या झाडण्याचे धोरण स्वीकारणे’, या धोरणाचा परिचय जसजसा अधिकाधिक प्रमाणात संबंधितांना कळेल, तेव्हा अनेक समविचारी पक्ष खापला पाठिंबा देण्यासाठी अहमहमिकेने पुढे येतील, असा विश्‍वास खापच्या प्रवक्त्याने प्रगट केला आहे.

यांचा मतदानाचा अधिकार अबाधित ठेवा

मतदार यादीतील अनेक व्यक्ती मृत झाल्यामुळे त्यांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्याचा कुटिल डाव निवडणूक आयोगाने रचला आहे. वास्तविक या व्यक्ती यमसदनी निवासाला गेल्या आहेत. केवळ निवासस्थान बदलले म्हणून त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्याच्या निवडणूक आयोगाच्या धोरणाचा खाप पक्ष तीव्र निषेध करीत आहे. यांनाही मतदानाचा हक्क असला पाहिजे यासाठी खाप पक्ष प्राणपणाने लढा देईल. या लढाईत पक्षाचीच प्राणाहुती पडली तरी खाप पक्ष त्यासाठी तयार राहील. आजवर अनेकदा या मतदारांनी आपल्या प्रतिनिधीच्या द्वारे/आधारे मतदान केले आहे. परंपरागतपणे सुरू असलेली ही सवलत अशीच चालू राहिली पाहिजे. हा प्रमुख मुद्दा घेऊन खाप पक्ष जनता दरबारात आपले गार्‍हाणे मांडणार आहे. (खापच्या सर्वोच्च नेत्याने नाहीतरी तीन आरटीआय कार्यकर्त्यांना जिवंतपणी श्रद्धांजली वाहिलीच की नाही?)
‘आम्हाला सत्तेचा मोह नाही’, हे खापच्या धुरीणांनी राजीनामा देऊन नुकतेच सिद्ध केले आहे. याबद्दल खापचा गौरव करण्याचे सोडून अनेक पक्षांनी आमची टिंगलटवाळी करणे सुरू केले आहे. ‘आम्ही असा अपप्रचार मुळीच सहन करणार नाही’, असा सज्जड इशारा खापचे एक नेते मस्तवाल यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.

शुभ्र कोष चेहरा उजळ करणार

काही नतद्रष्ट मंडळी खापच्या नेत्यांच्या तोंडाला काळे फासण्याच्या प्रयत्नात आहेत, असा सुगावा खापच्या खास बित्तंबातमी काढणार्‍या यंत्रणेला लागला आहे. काही नतद्रष्टांनी मस्तवाल आणि त्यांचे सहकारी विदेशातून पैसा घेतात, असा जाहीर आरोप करून खापच्या या नेत्याला घरचा अहेर दिला आहे. तरीही नेत्यांनी अशा प्रसंगी डळमळीत भूमिका घेऊ नये आणि डगमगूही नये. पक्षाने यासाठी एक शुभ्र कोष (व्हाईट सेल) गठित केला असून, या सेलचे सदस्य फासलेला काळा रंग ताबडतोब धुऊन काढतील. एवढेच नव्हे तर त्या नेत्याचा चेहरा अधिक उजळून कसा निघेल याची पुरेपूर काळजी घेतील, अशी नि:सन्दिग्ध हमी पक्षाचे शुभ्र कोष प्रमुख चमको चांदी यांनी दिली आहे.

मुलाखतीबाबत विनाकारण गहबज

खापच्या प्रसिद्धी तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख यांची एका वाहिनीवर नुकतीच एक मुलाखत प्रसारित झाली. या वाहिनीच्या प्रमुखांना खापची आचार आणि विचारसरणी पटल्यामुळे त्यांनी खापने सुचविलेल्या खास मुद्यांवर भर देऊन या मुलाखतीचे प्रसारण केले.
प्रसार माध्यमातील काही विघ्नसंतोषी, मत्सरी आणि उचापतखोर मंडळींनी याचा उगाच खूप बाऊ करून चिखलफेक करण्याच्या तंत्राचा अवलंब केला आहे. काय तर म्हणे मुलाखत देणारी व्यक्ती ज्या मुद्यांना ‘हाय लाईट’ करू इच्छिते तेच मुद्दे ‘हाय लाईट’ करणे, ही बाब प्रसार माध्यमांच्या रूढ संकेतांना धरून नाही. अशा क्षुल्लक कारणासाठी विरोध करणे ही बाब खाप खपवून घेणार नाही. तशीच वेळ आली तर त्या वाहिनीच्या कार्यालयातील सामान आणि साधने कशी कालबाह्य झाली आहेत, हे त्यांना सोदाहरण आणि सप्रमाण दाखवून देईल आणि त्या वाहिनीच्या कार्यालयाचा चेहरामोहरा बदलण्यास साह्य करील आणि आपल्या रचनात्मक भूमिकेचा परिचय करून देईल. या आणि अशा कामासाठी नुसतेच प्रवीण नव्हेत, तर पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होऊन ‘सुवर्ण’पदक प्राप्त केलेले अनेक कार्यकर्ते पूर्वीपासूनच आमचे सक्रिय सदस्य आहेत. याचा विसर संबंधितांनी पडू देऊ नये, अशी इशारेवजा धमकी तमाम करंट्या प्रसिद्धी माध्यमांना त्यांनी दिली आहे.

खापचा वचननामा

मध्यंतरी काही गरीब मंडळींनी ‘गरीब आदमी पक्ष’ (गाप) स्थापन करण्याचा विचार केला होता. ही माहिती कळताच खापच्या कार्यकर्त्यांनी या पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. खाप गरिबांसाठी घरोघरी फुकट धान्य पुरवण्याचा आदेश यच्चयावत किराणा विकणार्‍या दुकानदारांना देणार आहे, कापडाचे दुकानदार कापडासाठी अर्धे पैसे घेणार असले तरी कपडे मोफत शिवून देतील, वीज आणि नळाचे कनेक्शन लावून देणारे पैसे तर घेणार नाहीतच उलट बल्ब आणि मग्गे व बादल्या भेटीदाखल देतील, अशी व्यवस्था करण्यात येईल. वीजचोरांना पूर्णपणे संरक्षण देण्यात येईल. झोपडवासीयांसाठी टोलेजंग इमारती बांधण्यात येतील. हा कार्यक्रम पाहून हे दोन्ही पक्ष परस्परात विलीन झाले आणि त्यामुळे आता प्रतिस्पर्ध्यांसमोर ‘तगडे आव्हान’ उभे ठाकले आहे. खापचा ‘मनी फेस्टो’ उघड करण्याचा प्रयत्न काही चलाख आणि उपद्व्यापी मंडळींनी चालविला आहे. खापने जाहीर केलेल्या मॅनिफेस्टोकडेच मतदारांनी लक्ष द्यावे आणि ‘मनी फेस्टो’ कडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन खाप पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात केले आहे.
- वसंत गणेश काणे, पुणे

No comments:

Post a Comment