Monday, March 3, 2014

Third in between the Two

                          दोघांमध्ये तिसरीही ! योग्य की अयोग्य?  
                                    वसंत गणेश काणे
हल्ली मुक्काम पुणे
९४२२८०४४३०
आईबापांनी मुलांना जन्म द्यावा ,हा निसर्गाचा नियम सर्वज्ञात तसाच सर्वमान्यही आहे. पण कौरवांच्या जन्माची कथा काहीशी वेगळी आहे. अर्थात या शंभर भावंडांचे पितृत्व धृतराष्ट्राकडे तर मातृत्व गांधारीकडे होते,यात मात्र दोन मते नाहीत. पांडवांच्या जन्माची कथा वेगळी असली तरी प्रत्येक पांडवाच्या बाबतीत एकच माता (कुंती) आणि एकच पिता होता. अर्थात प्रत्येकवेळी पिता वेगळा असला तरी कुंती आणि यम (युधिष्ठिराचे माता-पिता),कुंती आणि वायू (भीमाचे माता-पिता),कुंती आणि इंद्र(अर्जुनाचे माता-पिता),माद्री आणि अश्विनीकुमार(नकूल आणि सहदेवाचे माता-पिता) असा प्रत्येकवेळी एकाच माता आणि पिता असा प्रकार होता. जरासंधाची जन्माची कथा काहीशी वेगळी आहे.मधोमध बरोबर उभा चिरलेला मानवदेह दोन शकलांच्या स्वरुपात जन्माला आला.जरा नावाच्या जन्मदात्रीने ही दोन शकले जोडली आणि जरासंध जन्माला आला. या सारख्या अनेक कथा आपल्याच प्राचीन साहित्यात आहेत, असे नाही. निसर्गनियमाला वगळून संततीप्राप्तीसाठी निरनिराळे प्रयोग मानवाने केलेले आहेत,असे दिसते.
सरोगेट मदर (भाडोत्री माता) हा प्रकार सध्या रूढ होऊ पाहतो आहे. या प्रकारात काही कारणास्तव माता आपल्या गर्भाचा भार नऊ महिने आपल्फ्या उदरात धारण करू शकत नसेल तर तिचे स्त्रीबीज आणि पित्याचे शुक्राणू यांचा संयोग स्त्री शरीराबाहेर घडवून दुसऱ्याच स्त्रीच्या गर्भाशयात या गर्भाची वाढ घडवून आणतात.अशाप्रकारे भाड्याने (उसनवारीने) घेतलेल्या गर्भाशयात हा गर्भ वाढतो.नऊ महिन्यांनी ही उसनी माता मूळ मातापित्याच्या अपत्याला जन्म देते. उसनी माता या गर्भाचे पोषण आपल्या गर्भाशयात घडवून आणीत असली तरी या पद्धतीत आनुवंशिकता बदलत नाही.
सध्या इंग्लंड आणि अमेरिकेत एका वेगळ्याच प्रयोगाची चाचणी घेणे सुरु आहे. या प्रयोगात गर्भधारणा स्त्री शरीराबाहेर प्रयोगशाळेत घडवून आणल्यानंतर गर्भातील रोग/अपंगत्व निर्माण करणारे गतक काढून टाकतात आणि त्यांच्याऐवजी दुसऱ्या स्त्रीपासून घेतलेल्या निरोगी घटकांचे प्रत्यारोपण करतात. ह्या घटकांना शास्त्रीय परिभाषेत मायटोकोनड्रीयल डीएनए असे नाव आहे. मूळ गर्भातल्या सदोष मायटोकोनड्रीयल डीएनए मुळे हृदयरोग, यकृत आणि मेंदूचे आजार , आंधळेपणा अविकसित स्नायू व अवयव ह्यासारखी वैगुण्ये निर्माण होण्याची शक्यता असते.ती दूर करुन निरोगी आणि अव्यंग अपत्याला जन्म देणे या प्रयोगाने शक्य होणार आहे. यासाठी माता आणि पिता यांच्यासोबत तिसर्या घटकाची सक्रीय मदत घ्यावी लागते.
हा प्रयोग आपल्या अपत्यला सदोष मायटोकोनड्रीयल डीएनए देणाऱ्या महिलांसाठी वरदान ठरण्याची शक्यता खूपच वाढते.या मातांमधील सदोष मायटोकोनड्रीयल डीएनए पुढील पिढीमध्ये संक्रमित होणे थांबवण्याचा दुसरा कोणताही उपाय सध्या माहिती नाही. या प्रयोगामुळे अशा मातासुद्धा निरोगी संततीला जन्म देऊ शकतील,असा दावा सायली डेव्हीस नावाच्या इंग्लंडच्या चीफ मेडिकल आफिसरने केला आहे. पुरेशा संशोधनाशिवाय हा प्रयोग व्यवहारात आणू नये,असा इशारा ‘ह्युमन जेनेटिक अलर्ट’ या गटाने दिला आहे.
कोणताही शास्त्रीय शोध ‘शाप’ आणि ‘वरदान’ अशा दोन्ही प्रकारे वापरता येतो. ‘निर्दोष संततीची निर्मिती’ हे या शोधाचे वरदान ठरेल, यात शंका नाही. पण असेच प्रयोग करून विकृत मनोवृत्तीचे लोक उद्या ‘राक्षससेना’ निर्माण करायला धजावले तर करणार? तसेच या प्रश्नाला एक नैतिकतेची किनारही आहे. निसर्गाच्या प्रक्रियेत मानवाने किती आणि कोणत्या स्तरापर्यंत ढवळाढवळ करावी, हा प्रश्न आजही अनुत्तरीतच राहतो.

असे म्हणण्याचे कारण असे की, भारतातही ‘इंट्रा व्हिटरीओ फरटीलायझेषण’ या नावाने ओळखला जाणारा प्रकार विशेषत: द्क्षिण भारतात  खूपच लोकप्रिय झाला आहे. शामवर्णी जोडपी आपल्या अपत्याचा रंग गोरा व्हावा, केस सोनेरी रंगाचे असावेत, डोळ्यांचा रंग निळा असावा अशाप्रकारे आपले अपत्य गर्भावस्थेतच ठीकठाक करून घेतात. ‘डिझायनर बेबी’ या नावाने हा प्रकार ओळखला जातो. अशा प्रयोगातून एक नवीन प्राणीवंश जन्माला आला नाही म्हणजे मिळवली!             

No comments:

Post a Comment