Sunday, July 31, 2016

डेमोक्रॅट पक्षाचे दर्जेदार संमेलन
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड 
पाईम रोजलेन, याॅर्क, पेन्सिलव्हॅनिया 
९४२२८०४४३० 
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
डेमोक्रॅट पक्षाचे दर्जेदार संमेलन -  ग्रँड ओल्ड पार्टी (जीओपी) म्हणजेच रिपब्लिकन पार्टीच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर डेमोक्रॅट पक्षाचे संमेलन उठून दिसते. बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांचे भाषण हे या संमेलनाच एक प्रमुख वैशिष्ट्य ठराव,असे झाले. हिलरी क्लिंटन  यांना  उमेदवारी मिळाल्यानंतर बराक ओबामा यांनी समाधान व्यक्त केले तेव्हा   ‘ह्यांचं मत तेच माझं मत’, अशी त्रोटक प्रतिक्रिया होती मिशेल ओबामा यांची. अमेरिकेच्या प्रथम मानांकित महिला (फर्स्ट लेडी) मिशेल बराक ओबामा यांची. पण हे असं सांगून पुरता अर्थबोध होणार नाही. सगळं सुरवातीपासूनच सांगितलं पाहिजे. हिलरी क्लिंटन यांना  डेमोक्रॅट पक्षाकडून अध्यक्षपदासाठीची उमेदवारी मिळाल्याचे निश्चित झालं आणि विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी या निर्णयाचं अतिशय उत्साहानं, आनंदानं स्वागत केलं. वृत्तसृष्टीनं या वृत्ताला साजेसं महत्त्वही दिलं. पण अमेरिकेच्या प्रथम मानांकित महिला (फर्स्ट लेडी) मिशेल बराक ओबामा यांच्या कार्यालयाकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली की, त्याचं मतही ‘ह्यांच्या’ मतासारखंच आहे. एखाद्या अस्सल भारतीय पतिव्रतेकडून कौतुकाची थाप मिळावी, असं हे मत आहे.
जिवाभावाच्या मैत्रिणी - विनोद बाजूला ठेवूया. मिशेल आणि हिलरी या दोघी एकमेकींच्या सध्या चांगल्या मैत्रिणी आहेत. मिशेल यांच्या खास क्लबच्या हिलरीही सदस्या आहेत. हिलरी सेक्रेटरी आॅफ स्टेट या पदावर कार्यरत असतांना या दोघी अनेकदा एकाच व्यासपीठावर आढळून आल्या आहेत. 
अराजकीय भूमिका - पण मिशेल यांची भूमिका प्रामुख्याने अराजकीय स्वरूपाचीच राहिली आहे. बराक ओबामा दोनदा अध्यक्षपदाचे उमेदवार होते. मिशेल याही त्यांच्यासाठीच्या प्रचार मोहिमेत सहभागी असत. पण त्यांनी स्वत:ला प्रचारकार्यात झोकून दिले नव्हते. त्या म्हणत , ‘राजकारण महत्त्वाचे आहे, यात शंका नाही. पण मी राजकारणी नाही. राजकारण हे माझे ध्येय कधीच नव्हते’. घराबाहेर किती वेळ घालवायचा याबद्दलचे त्यांचे नियम कडक आहेत. याबाबत एका निश्चित व पूर्वनियोजित  वेळापत्रकानुसार त्याचे काम सुरू असते/असायचे. त्यांचा प्रचारकार्याचा कार्यक्रम आखणाऱ्या चमूला त्यांच्या स्पष्ट व नेमक्या सूचना असत. ‘प्रचारासाठी इतका इतका वेळ मी काढून ठेवला आहे. त्यात काय काय करायचे ते तुम्ही ठरवा. तो आटोपला की मला कुणी भेटायचे सुद्धा नाही. अगदी फोन सुद्धा करायचा नाही’. डेमोक्रॅट पक्षाच्या संमेलनात त्या उपस्थित राहत असत एवढेच. त्यांची भूमिका एखाद्या राजकारण्याची कधीच नसे. 
अराजकीय भूमिका हेच शक्तिस्थान -आश्चर्याची गोष्ट ही की त्यांच्या या भूमिके व वृत्तीमुळेच त्यांना भरपूर राजकीय बळ मिळाले आहे. याचा प्रत्यय फिलाडेल्फिया येथील डेमोक्रॅट पक्षाच्या संमेलन प्रसंगी, त्यांनी हिलरींना पाठिंबा देणारे जे भाषण केले, त्या निमित्ताने आला. २६ जुलैची सकाळ. मिशेल यांनी भाषणाला प्रारंभ केला आणि काही क्षणातच त्यांनी सभागृहाचा ताबा घेतला. सर्व श्रोते मंत्रमुग्ध होऊन एकचित्ताने त्यांचे भाषण ऐकत होते. प्रतिसाद देत होते.
१. आठ वर्षांपूर्वी हिलरींना अध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली नाही, तेव्हा त्या रागावल्या नाहीत किंवा निराश झाल्या नाहीत. गाशा गुंडाळून त्या घरीही गेल्या नाहीत. कारण एक सार्वजनिक कार्यकर्ता या नात्याने व्यक्तिगत निराशेपेक्षा कितीतरी काम आपल्या पुढ्यात आहे, याची त्यांना जाणीव होती.
२. आयुष्यातील कोणत्याही प्रसंगी त्यांनी पाठ फिरवलेली नाही.  प्रत्येक प्रसंगाला त्यांनी धैर्याने तोंड दिल आहे.
३. आपले प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रंप यांच्याजवळ रोजगार देण्यासाठीच्या कोणत्याही योजना नाहीत, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नाहीत की ज्येष्ठ नागरिकांसाठीही नाहीत. त्यांच्या सर्व योजना त्यांच्यासारख्या श्रीमंतांसाठीच आहेत.
४. हिलरींचा स्वभाव असा आहे की, त्या प्रतिकूलतेसमोर कधीही झुकत नाहीत, की तडजोड करीत नाहीत.
५. केवळ हिलरींमुळे आता माझ्या मुलींची आणि तुमच्या माझ्या सर्वांच्याच मुलामुलींची ही खात्री  झाली आहे की, एक महिला अमेरिकेची अध्यक्ष होऊ शकते.
६. पुढील चार /आठ वर्षात आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याची क्षमता कोणात असेल, हे या निवडणुकीने ठरणार आहे.
७. जेव्हा एखादा क्रूरपणाने किंवा अडदांडपणाने वागतो बोलतो, तेव्हा  तुम्ही त्या पातळीला जायचे नसते. कधीच नाही. ते जेवढे खालच्या पातळीवर उतरतील, तेवढाच आपण आपला स्तर उंच ठेवायचा असतो, हे आपले बोधवाक्य आहे.
८. आपल्या मुलांचे भवितव्य कुणाच्या हाती सोपवायचे हेच या आणि प्रत्येक निवडणुकीच्या माध्यमातून ठरवायचे असते. ही जबाबदारी विश्वासाने ज्या व्यक्तीवर सोपवावी अशी माझ्या मते एकच व्यक्ती आहे.  तीच व्यक्ती अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी योग्य आहे आणि ती व्यक्ती आहे आपली मैत्रीण हिलरी क्लिंटन. 
९. आपल्या जबाबदारीकडे गंभीरपणाने पाहील अशीच व्यक्ती मला माझ्या मुलींसाठी आणि मुलांसाठी अध्यक्षपदी हवी आहे. अध्यक्षाला हाताळावे लागणारे विषय काळे किंवा पांढरे असे ठोकळ स्वरूपाचे नसतात. ते मोजक्या शब्दात मांडता येत नाहीत.
१०. हा देश श्रेष्ठ नाही, काहीतरी करून आपल्याला त्याला श्रेष्ठत्त्व प्राप्त करून द्यायचे आहे असे कुणी म्हणत असेल तर त्याचे ऐकू नका. कारण  अगदी या क्षणी सुद्धा हा देश या भूतलावरचा सर्वश्रेष्ठ देश आहे.
भाषणाची परिणामकारकता -मिशेल ओबामा यांचे हे भावपूर्ण वक्तव्य ऐकत असतांना श्रोत्यांच्या मनात वेगवेगळे तरंग उठत होते. साशा आणि मालियाची माता या नात्याने त्या बोलत असतांना श्रोत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते तर नामनिर्देश न करता त्या जेव्हा डोनाल्ड ट्रंप यांना धारेवर धरत होत्या तेव्हा श्रोते त्यांच्या चपखल शब्दयोजनेला मनापासून दाद देत होते. अजूनही ज्या मतदारांची मते संदिग्ध असतील त्यांची मते अनुकूल करण्याचे सामर्थ्य मिशेल यांच्या भाषणात आहे, असा विश्वास संमेलनात उपस्थित असलेले प्रतिनिधी व्यक्त करतांना दिसत होते. बर्नी सॅंडर्स यांचा हिलरींना असलेला कडवा विरोध आता मावळला आहे. पण पक्षात एकवाक्यता निर्माण करण्याचे सकारात्मक सामर्थ्य मिशेल यांच्या भाषणात होते. अशा शब्दात वार्तांकन करणाऱ्यांनी मिशेल यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
शीर्षक बदलले - एका वृत्तपत्रातील संपादकीय कक्षातील घडामोडी रंजक व बोधप्रद ठराव्यात, अशा आहेत. वार्ताहराने संपादकीय कक्षाकडे मिशेल यांच्या भाषणाअगोदर ट्वीट केले होते की, प्रथम पृष्ठावरील हेड लाईन ‘बर्नी सॅंडर्स व हिलरी यातील बेबनावाशी’ संबंधित असेल. तीन तासांनी त्याने पुन्हा ट्वीट केले, ‘हेडलाईन बदलावी लागणार!’ ‘सभा मिशेल यांनी जिंकली’. नंतरचे ट्वीट होते, ‘ २०२० च्या डेमोक्रॅट पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवार असणार मिशेल ओबामा! सभागृहातील सर्वांच्या तोंडचा मुद्दा.’ २०२० साली काय व्हायचे होईल. पण निदान या निवडणुकीत तरी हिलरींसाठी मिशेल यांचे हे भाषण नवसंजीवनी स्वरुपाचे ठरणार हे मात्र नक्की.
क्लिंटन- केन ही जोडगोळी - हिलरी क्लिंटन यांनी आपला उपाध्यक्षपदाचा जोडीदार म्हणून व्हर्जिनियाच्या टिम केन या ५८ वर्षाच्या तरूण पण अनुभवी, अभ्यासू पण धडाडीच्या, स्पॅनिश भाषेत अस्खलित बोलू शकणाऱ्या ( स्पॅनिश भाषा बोलणारे बरेच मतदार आहेत) व गर्भपात विरोधी मत असलेल्या (अमेरिकेत गर्भपाताला विरोध करणारे अनेक सनातनी विचाराचे मतदार आहेत) एका चतुर साथीदाराची निवड केली आहे. प्रतिपक्षाचे हल्ले परतवून लावण्याची महत्त्वाची जबाबदारी उपाध्यक्षपदाच्या साथीदाराची असते. हे शिवधनुष्य पेलण्याची क्षमता टिम केन यांच्यात आहे. अशा जोडीदाराची गरज हिलरी क्लिंटन यांना पदोपदी भासणार आहे. 
  अशाप्रकारे दोन्ही पक्षांनी आपापल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या जोडगोळीची (टिकेट) निवड करीत, निवडणुकीच्या रणांगणात पदार्पण करून पुढील तीन महिन्यातील रणधुमाळीतील पहिले पाऊल टाकले आहे. 
      श्यामसुंदर वैद्य - सुरवातीपासूनचा साथीदार 
वसंत गणेश काणे 
शिक्षक परिषदेची स्थापना १९७० साली झाली. या प्रारंभीच्या काळात जी मोजकी शिक्षक मंडळी साथीला लाभली, त्यात श्री शामसुंदर वैद्य यांचा प्रामुख्याने उल्लेख करवयास हवा. त्या काळी शिक्षक परिषदेचे काम नागपूर शहरात तर अतिशय मर्यादित स्वरुपातच  होते. सर्वश्री  कै गणपतराव वैद्य, कालिदासजी सालोडकर यांचे बोट पकडून मी परिषदेच्या कामात सहभागी झालो होतो. माझ्या जावा मोटर सायकलवर गणपतरावांना घेऊन शाळाशाळात जाणे शिक्षकांशी संपर्क साधणे, ही प्रमुख कामे आम्ही करीत असू. गणपतरावांचे व्यक्तिमत्त्व, कार्यकर्ता म्हणून असलेली ओळख यामुळे लोक वरवर गोड बोलून आमची बोळवण करीत. ‘आज शाळेत जावा मोटर सायकलवर परिषद येऊन गेली’, असा कुचेष्टेने उल्लेख करीत.
 नागपूर शहरात थोडेसे तरी काम होते. नागपूर ग्रामीण मध्ये तर शिरकावच नव्हता. एके दिवशी सकाळी श्री श्यामसुंदरजी भेटीला घर शोधित शोधित आले. त्यांना गणपतराव वैद्यांनी माझी भेट घेण्यास पाठविले होते. त्यांचे सेवाविषयक प्रकरण होते. त्यातील काही मुद्दे आता आतापर्यंत तरी न्यायप्रविष्ट होते, म्हणून  त्याचा उल्लेख करीत नाही. पण प्रकरण असाधारण स्वरुपाचे होते. सहजासहजी निकालात निघणारे नव्हते. प्रतिपक्षाला जुन्या संघटनेचा पाठिंबा होता. विधानपरिषदेतही त्याच संघटनेचा प्रतिनिधी होता. हे प्रकरण किचकट व बिकट आहे, आपणाला सोडवतांना अतिशय कठीण जाईल, असे मी गणपतराव वैद्यांना सांगितले. यावर ते म्हणाले, ‘प्रकरण सोपे असते तर आपल्याकडे आलेच नसते. परस्पर निकालात निघाले असते. नियमात बसते किंवा नाही, ते सांग’. यावर मी म्हणालो, ‘या प्रश्नाबाबत  नियमात अनुकूल किंवा प्रतिकूल अशी कोणतीच तरतूद नियमात नाही’. नागपुरातील ख्यातनाम वकील व पुढे हायकोर्टात न्यायधीशपदी नियुक्त झालेले कायदेपंडित श्री. अजित देशपांडे हे आमच्या परिचयाचे होते. प्रामाणिक सार्वजनिक कार्यकर्ते अशी त्यांची आमच्याबाबतची समजूत असावी. ते आम्हाला न कंटाळता सल्ला देत असत. त्यांचा सल्ला घेण्याचे आम्ही ठरवले. ‘एखादी गोष्ट करू नये, अशी कायदा करणाऱ्यांची इच्छा असेल तर तशी स्पष्ट तरतूद ते नियमात करतात. तशी स्पष्ट तरतूद नसेल ( बार/प्रतिबंध नसेल) तर व्यवस्थापनादी घटक आपला विवेकाधिकार वापरू शकतात’ , असे काहीसे ते म्हणाल्याचे आठवते. आम्ही श्यामसुंदरजींचे प्रकरण स्वीकारले. ही लांब चालणारी व दमछाकीची लढाई होती. यश मिळत नव्हते. अधूनमधून प्रतिकूल भूमिकाच घेतली जायची. सुरवातीला श्यामसुंदर नाराज होत. पण पुढे त्यांना परिषदेच्या सच्चेपणाची खात्री पटली. ते स्वत:ही लढवैयेच होते. ते आमच्यातलेच एक झाले.
   त्यांच्या रूपाने नागपूर ग्रामीण भागात एक कार्यकर्ता परिषदेला मिळाला. तेव्हापासूनचा त्यांचा परिषदेवरचा लोभ कायम होता. एखादे प्रकरण निकालात निघाले की, ते त्याबाबतचे सर्व दस्तऐवज आणून माझ्या स्वाधीन करीत. ‘माझे काम झाले, इतरांच्याही उपयोगी पडू शकतील, म्हणून ती कागदपत्रे ते माझ्या स्वाधीन करीत. ती आजही माझ्याजवळ आहेत. अधूनमधून कागदपत्रे चाळतांना ती दृष्टीस पडत. आणि स्मृतींना उजाळा मिळे.
 पुढे शिक्षक बॅंकेच्या निमित्ताने जणू नव्याने ओळख झाली. पण जुन्या गोष्टीही आठवत. माझे वर्तनानपत्रातले लेख वाचल्यावर दर भेटीत ते त्या बाबत काहीना काही उल्लेख आवर्जून करीत.
 आज संघटना मोठी झाली आहे. शिखरस्थानी असलेल्यांना आपोआप प्रसिद्धी मिळत असते. परिषदेचे खंदे कर्तेधर्ते म्हणून त्यांचा आपोआप परिचय होत असतो. पण परिषदेचा पाया रचला गेला त्यावेळी एखाद्या निमित्ताने जवळ आलेले व परिषदेचेच झालेले कार्यकर्ते आजच्या पिढीला माहीत नसतात. त्यांचा व त्यांच्या कार्याचा परिचय अशाप्रकारे एका श्रद्धांजलीपर लेख लिहितानाच नवीन पिढीला करून देतांना  थोडे अवघडल्यासारखे वाटत असले तरी या निमित्ताने तरी आपण आपल्या सहकाऱ्याच्या रुणाचा उल्लेख करावा, असे वाटून गेले. ईश्वर श्यामसुंदरजींच्या आत्म्याला सद्गती देवो व त्यांच्या वियोगाचे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या आप्तेष्टांना देवो, ही त्या जगनियंत्याच्या चरणी प्रार्थना

Tuesday, July 26, 2016

तुर्कस्थानमधील फसलेले बंड, उघडी पडलेली लक्तरे व आशेचे किरण
वसंत गणेश काणे
तुर्कस्थानमध्ये सैन्याने १५ जुलैच्या मध्यरात्री केलेला उठाव १६ जुलैलाच सकाळी सकाळी शमला आणि लोकनियुक्त शासन कायम राहिले, ही वार्ता लोकशाहीप्रेमीजनांना समाधान देणारी वाटत असली तरी त्या निमित्ताने निर्माण झालेले संशय, उघड झालेले हेवेदावे, तापल्या तव्यावर आपली पोळी भाजून घेण्याची वृत्ती, वरून शांततेचा व लोकशाहीचा पुरस्कार पण आतून दुसऱ्या देशात आपल्याला सोयीचे होईल असे शासन स्थापन करण्याची वृत्ती या आणि अशाच मनुष्यसुलभ पण अवांछनीय अशा कृत्त्यांचे दर्शन आता हळूहळू समोर येत असून अनेकांचे मायावी स्वरूपही उघडकीला येत आहे. या सर्व बाबींचे नीट आकलन होण्यासाठी एखाद्या चित्रमय युद्ध कथेशी स्पर्धा करणाऱ्या मूळ घटनापटाचा सुरवातीपासूनच व ती दृश्ये नजरेखाली घालूनच विचार करणे योग्य ठरेल.
दृश्य पहिले - १५ जुलै २०१६ ची मध्यरात्र. स्थळ तुर्कस्थानची राजधानी अंकारा. बंडखोर सैन्यातील अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली हालचालींना प्रारंभ झाला. रणगाडे, हेलिकाॅप्टर्स आणि एफ-१६ जातीची विमाने यांनी एकाच वेळी मोहीम सुरू केली. जमावावर हल्ले झाले, टी व्ही केंद्रांवर ताबा घेण्यासाठी झटापटी झाल्या आणि तोफा पार्लमेंटच्या इमारतीवर आग ओतू लागल्या.
दृश्य दुसरे - अध्यक्ष तय्यीप एर्डोगन यांचा सुरवातीला पत्ताच नव्हता.  समुद्र किनाऱ्यावरील मार्मारिस नावाच्या गावी ते सुट्टीचा आस्वाद घेत होते. तिथे बंडखोरांच्या तावडीतून ते बालबाल वाचले आणि त्यांच्या जीवात जीव आला. ते कसेबसेच बचावले. पण त्यामुळेच पुढे घटनाक्रमाने वेगळे वळण घेतले. रातोरात व १६ तारखेला सकाळी त्यांनी आपले समर्थक गोळा केले व आपण सुरक्षित असून उठाव फसला असल्याची घोषणा केली.
दृश्य तिसरे - बंडाचे वृत्त कळताच राजधानीतील संसद सदस्यांनी पार्लमेंटच्या इमारतीकडे धाव घेतली. पार्लमेंटला बंडखोरांनी वेढण्याचा कसून प्रयत्न केला. सगळे सदस्य बंडखोरांच्या हाती पडतील आणि तुर्कस्थानमधील लोकशाहीचा अंत होईल अशी शक्यता दिसू लागली. विरोधी पक्षनेते महमूद तनाल यांनी प्रसंगावधान राखून प्रथम तुर्कस्थानच्या राज्यघटनेची प्रत  बगलेत मारली आणि मगच पार्लमेंटच्या इमारतीकडे इतर सामानासह धाव घेतली. त्या रात्री ते अंकारा येथील बार असोसिएशनच्या आॅफिसमध्ये होते. जेट विमानांच्या घिरट्या पाहताच त्यांनी प्रसार माध्यमांशी संपर्क केला. पण तेवढ्यात त्यांना रस्त्यावर दाणदाण पाय आपटीत मार्चिंग करीत जाणारे सैनिक दिसले.  राजधानीपासून काही मैल अंतरावर असलेल्या इस्तंबूल या दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहरामधील सर्व पुलांचा ताबा सैन्याने घेतला होता आणि वाहतूक रोखली होती. अंकारामधील गुप्तहेर खात्याचे मुख्य कार्यालय असलेल्या इमारतीवर सैन्याने हल्ला चढवला होता. पार्लमेंटची इमारतच त्यातल्यात्यात सुरक्षित असणार असा महमूद तनाल यांनी विचार केला. अटक टळण्याची शक्यता तिथे जाण्यातच होती. इतर खासदारही तिथेच असणार होते. पण तरीही त्यांनी तुरुंगात कोणकोणत्या वस्तू लागतील याचा थंड डोक्याने विचार करून त्या सोबत घेतल्या त्यातली सर्वात शेवटची वस्तू होती, राज्यघटनेची प्रत. ही प्रत मी सोबत का घेतली, ते त्यांनी नंतर आता स्पष्ट केले आहे. ते म्हणतात, ‘मी व्यवसायाने वकील, त्यातून संसदेच्या मानवाधिकार समितीचा सदस्य. त्यामुळे तुरुंगात ही प्रत लागणारच, हे मी जाणून होतो.
दृश्य चौथे -  या उलट आॅर्हन अटले हे सत्ताधारी जस्टीस ॲंड डेव्हलपमेंट पार्टीचे एक नेते. ते घरीच होते. त्यांनी स्फोटांचे आवाज ऐकले, ठिकठिकणी फोन केले. सैन्याने उठाव केला आहे, हे कळताच  अगोदर पिस्तुल उचलले व पोलिस मुख्यालयाकडे जाण्याचे ठरविले. पण कारमध्ये बसतात न बसतात तोच पोलिस मुख्यालयाजवळ स्फोट झालेला त्यांनी ऐकला व लगेच ज्वालांचा लोळ उठलेला पाहिला. हे बघताच त्यांनी पार्लमेंटच्या इमारतीकडे तातडीने कूच केले.  अशा या दोघांच्या दोन तऱ्हा.
दृश्य पाचवे - तीन प्रमुख पक्षांचे संसद पार्लमेंटच्या हाॅलमध्ये एकत्रित झाले. चौथा पक्ष कुर्दिश पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने आपले पाठिंब्याचे पत्र पाठविले. तुर्कस्थानच्या इतिहासातील हा अभूतपूर्व प्रसंग होता. सर्व राजकीय पक्षात एकजूट झाली होती. स्पीकर कर्हामन यांनाही धीर आला, त्यांनी संसद चालू आहे असे जाहीर करून जनतेला धीर व दिलासा दिला आणि बंडखोरांविरुद्ध लढण्याचा निर्धार कळवला व जनतेची साथ मागितली. तेवढ्यात लागोपाठ दोन स्फोट ऐकायला आले. एक तर संसदेच्या आवारातच झाला आहे, असे वाटत होते.
दृश्य सहावे - मार्मारिस येथूनच अध्यक्ष तय्यीप एर्डोगन यांचा संदेश प्रसारित झाला. बंडखोरांवर ताबा मिळविण्यात यश मिळाले होते. अध्यक्षांनी संपर्कासाठी टी व्ही नाही, शासकीय कार्यालयही नाही तर चक्क व्हिडिओ चॅट केले होते. बंडखोरांचा नि:पात करण्यासाठी जनतेने बाहेर पडावे, असे त्यांनी आवाहन केले. ‘मीही पाठोपाठ निघतच असून लवकरच तुम्हाला येऊन मिळेन’, असे त्यांनी जनतेला आश्वासन दिले.
दृश्य सहावे -अध्यक्ष तय्यीप एर्डोगन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत  जनता रस्त्यावर उतरली. राजधानी अंकारामध्ये तिने पार्लमेंटच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. सुमारे तीनशे मैलावरील इस्तंबूल शहरात बंडखोरांनी दोन पुलांवर कब्जाकरून वाहतुक थांबविली होती. शहरातील युरोपियन व एशियन विभाग अशाप्रकारे पाचर ठोकून वेगळे केले होते. तकसीम चौकात बंडखोर सैनिक कडे करून सज्ज होते. इकडे जनतेतून निषेधाच्या आरोळ्यांसोबत ‘गाॅड इज ग्रेट! ग्रेटेस्ट’ अशा गर्जना उठत होत्या.
दृश्य सातवे - अध्यक्ष तय्यीप एर्डोगन अंकारा या राधानीकडे न जाता इस्तंबूलला गेले. या शहराचा त्यांना वर्षानुवर्ष नि:संदिग्ध पाठिंबा मिळत आलेला होता. ते येथील जनतेच्या गळ्यातले ताईत होते. भल्या पहाटे म्हणजे सकाळी ४ वाजता त्यांचे विमान इस्तंबूल शहरातील अटाटर्क विमानतळावर उतरले. ‘बंडखोरांची कृती देशद्रोहाची असून तिला क्षमा नाही, आपण अध्यक्षपदावर कायम आहोत’, असे त्यांनी ठणकावून सांगितले. ‘ही इष्टापत्तीच आहे. आता सैन्यदलाचे शुद्धिकरण करणे शक्य होणार आहे’, असा मनोदयही त्यांनी याचवेळी व्यक्त केला.
अमेरिकेची प्रतिक्रिया - अमेरिकेचे सेक्रेटरी आॅफ स्टेट जाॅन केरी यांची प्रतिक्रिया सावध होती. अध्यक्ष बराक ओबामा यांनी वाॅशिंगटनहून तुर्कस्थानमधील सर्व पक्षांनी लोकनियुक्त शासनाच्या पाठीशी उभे रहावे; दंगल, गोंधळ, हिंसा वा रक्तपात टाळावा, असे आवाहन केले. अमेरिकन स्टेट डिपार्टमेंटने म्हटले आहे की, आम्हाला आमची भूमिका तात्काळ देण्यात कोणतीच अडचण गेली नाही, आम्ही लोकनियुक्त शासन, कायद्याचे राज्य यांच्या बाजूचेच असणार, सत्ताप्राप्तीसाठी बळाचा वापर करण्याला आमचा विरोधच असणार, हे उघड होते.
अमेरिकेच्या भूमिकेबद्दल संशयाचे वातावरण - अगोदरपासूनच अंकारा व वाॅशिंगटन यांच्यात मतभेद आहेत. तुर्कस्थानमध्ये लोकशाहीत अपेक्षित असलेल्या सुधारणांबाबत या दोन राष्ट्रात मतभेद आहेत. तसेच तुर्कस्थानच्या सरहद्दी पलीकडे इराक व सीरिया मध्ये इसीस विरुद्ध जी लढाई सुरू आहे, त्याबाबत तुर्कस्थान उचलत असलेली पावले  अमेरिकेला समाधानकारक वाटत नाहीत. बंडाची चाहूल लागताच तुर्कस्थानमधील ज्या विमानतळावर अमेरिका व तुर्कस्थान या दोन्ही राष्ट्रांच्या फौजा तैनात आहेत (तुर्कस्थान नाटो-नाॅर्थ अटलांटिक ट्रिटी आॅर्गनायझेशनचा- सदस्य असल्यामुळे ही व्यवस्था होती) त्या ठिकाणी अमेरिकन फौजांनी बंडखोरांना छुपी साथ दिली, असा तुर्कस्थानला संशय वाटतो आहे. अमेरिकेने याचा तात्काळ इन्कार केला असला तरी तुर्कस्थानचे समाधान झालेले नाही. आता या विमानतळावरून बाॅंबफेकी अमेरिकी विमाने इसीस विरुद्धच्या कारवाईसाठी उड्डाण करू शकत नाहीत. इतर तळांबाबतही तुर्कस्थानने अशीच भूमिका घेतली तर काय करायचे, ही चिंता अमेरिकेला सतावत आहे. यापैकी काही ठिकाणी तर नाटो फौजांची अण्वस्त्रे तैनात आहेत.
अध्यक्ष तय्यीप एर्डोगन यांची भूमिका अशीच ताठर होत गेली तर? भविष्यात तुर्कस्थानमध्ये लोकशाही टिकेल का? हा प्रश्न अमेरिकेला सतावत आहे(?). तर हे नक्राश्रू आहेत, असे तुर्कस्थानला वाटते आहे.
बंडानंतरची अंतर्गत साफसफाई - बंडखोरांचा पुरता बीमोड करण्याचे प्रयत्न योग्यच ठरतात. हजारो सैनिकांना संशयावरून बडतर्फ करण्यात आले आहे. सैनिकांसोबतच पोलिस, न्यायाधीश व बंडाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत केल्याचा संशय असलेले सनदी अधिकारी यांचीही हकालपट्टी झाली आहे. हेही एकवेळ योग्य ठरविता येईल पण शिक्षण खात्यातील २० हजार अधिकाऱ्यांना घरी पाठविले जात आहे आणि विद्यापीठातील १५०० पेक्षा जास्त शिक्षक, प्राध्यापक, विभाग प्रमुख यांना राजीनामे देण्यास सांगितले जात आहे, याला काय म्हणावे? संशयितांना परदेश प्रवासाची अनुमती मिळत नाही. तसेच तीन महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर झाली आहे. हे म्हणजे अतीच झाले.
अमेरिकेवरील नाराजीचे आणखी एक कारण - फेतुल्ला गुलेन या कट्टर व प्रभावशाली धार्मिक  तुर्की नेत्याच्या  आदेशानुसार हा बंडाचा बनाव रचला गेला असा तुर्की शासनाचा दावा आहे. फेतुल्ला गुलेन १९९९ पासून अमेरिकेतील पेन्सिलव्हॅनिया प्रांतात विजनवासात राहतो आहे. फेतुल्ला गुलेन व तुर्कस्थानचे विद्यमान अध्यक्ष तय्यीप एर्डोगन यांच्यामधून विस्तव जात नाही. फेतुल्ला गुलेन अमेरिकेत राहून तुर्कस्थानमधील सर्व प्रशासकीय यंत्रणेत आपले अनुयायी घुसवीत आले आहेत, असा अध्यक्ष तय्यीप एर्डोगन यांचा दावा आहे. अस्तनीतील निखाऱ्या सारख्या असलेल्या या घुसखोरांना काहीही झाले तरी आपण निखंदून काढूच असा अध्यक्ष तय्यीप एर्डोगन यांचा निर्धार आहे. अमेरिकेने फेतुल्ला गुलेन यांना देशातून हकलून द्यावे व तुर्कस्थानच्या स्वाधीन करावे, अशी अध्यक्ष तय्यीप एर्डोगन यांनी मागणी केली आहे. फेतुल्ला गुलेन यांनी या बंडाशी आपला काहीही संबंध नाही, असे जाहीर केले असून अमेरिकेलाही त्यांना विनाकारणच जबाबदार धरले जाते आहे, असे वाटते आहे. अमेरिकेने मध्यपूर्वेत आजवर केलेल्या उचापती पाहता अमेरिकेवर तुर्कस्थानच नव्हे तर इतरही विश्वास ठेवायला तयार नाहीत.
एकजुटीला तडे - अध्यक्ष तय्यीप एर्डोगन यांची तीव्र प्रतिक्रिया समजण्यासारखी आहे. त्यांच्या केवळ पदालाच धोका निर्माण झाला होता असे नाही तर त्यांच्या जिवावरच बेतले होते. पण त्यांची सध्याची कारवाई म्हणजे वाजवी अंतर्गत विरोधालाही मूठमाती देण्याचा प्रयत्न आहे, असे विरोधकांना वाटते आहे. यांचा या बंडाशी काडीचाही संबंध नव्हता, ते अध्यक्ष तय्यीप एर्डोगन यांचे फक्त राजकीय विरोधक आहेत, इतकेच. विरोधी पक्ष नेते महमूद तनाल यांनी अध्यक्ष तय्यीप एर्डोगन यांची ही कारवाई चुकीची ठरविली आहे. या बंडाला अध्यक्ष तय्यीप एर्डोगन यांची चुकीची धोरणेही कारणीभूत झाली होती, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
  १६ जुलैची स्थिती - १६ जुलैच्या सकाळी अंकारा ही राजधानी शांत झाली होती. बंड शमले होते. पार्लमेंटमध्ये आश्रयाला गेलेले खासदार एकेक करून बाहेर पडायला सुरवात झाली होती. पण रक्षक व खासदारांची ओळख पटत नव्हती. दोघेही एकमेकांकडे संशयाने व धास्तीनेच पाहत होते. विरोधी पक्ष नेते महमूद तनाल यांना काही पोलिस अधिकाऱ्यांनी ओळखले. त्यांनी तनाल यांची त्यांच्या कार पर्यंत सोबत केली. त्या कारवर एक साधा ओरखडा सुद्धा उमटला नव्हता. तोफांचे गोळे अवतीभवतीच पडले होते.
बंडानंतरचे कवित्त्व - सर्व राजकीय पक्षांनी या काळात अभूतपूर्व अशा एकजुटीचा परिचय दिला होता. जनतेने बंडखोरांना केवळ झिडकारलेच नव्हते तर बंडखोरांशी प्रत्यक्ष संघर्षही केला होता. पण बंड शमताच आपापसातील मतभेद पुन्हा डोके वर काढीत आहेत. आता अध्यक्ष तय्यीप एर्डोगन यांच्या नेतृत्त्व गुणांचीच खरी परीक्षा आहे. आपले आसन बळकट करण्याचा मर्यादित हेतू ठेवूनच ते वागले तर, येरे माझ्या मागल्या, हे ठरलेलेच आहे. आता चेंडू शासनाच्या अंगणात आहे. पुढचे पाऊल शासनाकडून कसे टाकले जाते यावर तुर्कस्थानचे भवितव्य अवलंबून असेल. इस्लामला लोकशाही मानवत नाही. त्याला तुर्कस्थानचा काहीसा अपवाद होता. इस्लामचा हा मानवी चेहरा मध्यपूर्वेत बदल घडवून आणण्यात महत्त्वाचा वाटेकरी होऊ शकतो. अमेरिकेतील वार्तांकनक्षेत्रातील दिग्गज न्यूयाॅर्क टाईम्स, वाॅशिंगटन पोस्ट, टाईम मॅगॅझीन या सारख्यांच्या  वार्ताहरांनी कणाकणानी, क्षणोक्षणी व टप्याटप्प्याने गोळा केलेल्या वार्तांची ही गोळाबेरीज आज तरी शांततावादी व सुसंस्कृत जगाच्या आशा पल्लवित करणारी आहे.
ग्रॅंड ओल्ड पार्टी व डोनाल्ड ट्रंप
वसंत गणेश काणे,     बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड  २७२१, प्राईम रोज लेन नाॅर्थ, याॅर्क, पेनसिलव्हॅनिया
९४२२८०४४३०  
Email-kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
  रिपब्लिकन पार्टी म्हणताच आपल्यासमोर एकेक कर्तृत्वशाली व्यक्तिमत्त्व उभे राहते. अब्राहम लिंकन, थिओडोर रुझवेल्ट, आयसेनहोव्हर, निक्सन, फोर्ड, रीगन,  बुश पितापुत्र आठवतात. तसेच डेमोक्रॅट पक्षाचे नाव घेताच फ्रॅंकलीन रुझवेल्ट, हॅरी ट्रूमन, जाॅन एफ केनडी, लिंडन जाॅनसन, जिमी कार्टर, बिल क्लिंटन, बराक ओबामा हे दिग्गज समोर उभे राहतात.
 जी ओ पी - अमेरिकेतील ओहायो प्रांतातील क्लिव्हलंड येथील वातावरण अगोदरच डलासमधील पाच गोऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या हत्याकांडामुळे व ल्युसियाना आणि मिनोसोटा येथील गोळीबारात हताहत झालेल्या काळ्या लोकांच्या आठवणींमुळे तणावयुक्त झालेले असतांना अमेरिकेतील जीओपीचे (ग्रॅंड ओल्ड पार्टीचे- म्हणजेच रिपब्लिकन पार्टीचे) राष्ट्रीय संमेलन क्लिव्हलॅंड येथे संपन्न होत आहे. त्यातून ओहायो हे राज्य ‘ओपन कॅरी स्टेट’ (विनापरवाना शस्त्र बाळगण्याची अनुमती असलेले) असल्यामुळे सावधगिरीची बाब म्हणून सुरक्षेचा विशेष व कडेकोट बंदोबस्त केला जात आहे. पोलिसांसाठी हा कसोटीचाच प्रसंग आहे. गुप्तचर अगोदरच प्रांतभर विखुरलेल असून स्थानिक प्रतिनिधी, गुन्हेगार विश्व, यातून अंदाज घेत परिस्थतीवर लक्ष ठेवून आहेत.
   लगेचच पेन्सिवव्हॅनिया प्रांतात फिलाडेल्फिया येथे डेमोक्रॅट पक्षाचे राष्ट्रीय संमेलन आयोजित असून त्यावेळी मात्र पोलिस बंदोबस्त नेहमीसारखाच असणार असून कोणतीही विशेष व्यवस्था आयोजित नाही. पण तिथेही सावधगिरीची ‘अन्य’ उपाययोजना कार्यान्वित होणार आहे.
 संमेलनाचे दोन उद्देश -  क्लिव्हलंड येथील संमेलनाच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्षाचा प्रमुख उद्देश डोनाल्ड ट्रंप यांची प्रतिमा थोडी सोज्वळ स्वरुपात उभी करणे व ती ओव्हल आॅफिसला (अमेरिकेच्या अध्यक्षाचे कार्यालय) मानवणारी आहे हा समज जनमानसात रुजवण्याचा आहे. तसेच या निमित्ताने पक्षांतर्गत जो अभूतपूर्व असा संघर्ष प्राथमिक स्तरावरील निवडींच्या वेळी झाला, त्याची अजूनही धुमसत असलेली आग शमवून, पक्ष एकजिनसी स्वरुपात ८ नोव्हेंबर २०१६ च्या  अध्यक्षपदाच्या लढतीसाठी सज्ज करणे हा दुसरा उद्देश आहे. ‘काहीही झाले तरी ट्रंप नकोच’, ही पक्षांतर्गत चळवळ शमली असली तरी ती पुरतेपणी थंडावलेली नाही. या पार्श्वभूमीवर क्लिव्हलंडला पक्षाच्या अधिवेशनाच्या काळात दंगली माजलेल्या दिसू नयेत, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. तसेच दंगली झाल्या तर त्यांचा परिणाम ट्रंप यांच्या प्रतिमेचा उजळपणा आणखी कमी होण्यात होईल, हे पक्ष जाणून आहे.
ट्रंप व पेन्स ही दुक्कल -  डोनाल्ड  ट्रंप यांनी आपला उपाध्यक्षपदाचा जोडीदार निवडतांना, त्याची निवड जाहीर करतांना व त्याच्या निवडीमागचे (राज) कारण सांगतांना आपल्या स्वभावाला साजेसेच वर्तन केले. इंडियानाचे गव्हर्नर माईक पेन्स यांची निवड न्यूयाॅर्क येथे त्यांनी साधेपणाने जाहीर केली. एरवी ही एक ‘इव्हेंट’ असते. पण प्रकाशझोत आपल्यावरच राहील, याची पुरेपूर काळजी ट्रंप यांनी घेतली. या निमित्ताने केलेल्या भाषणाचा प्रमुख भाग स्वत:ची स्तुती व थोरवी सांगण्यात खर्च करून आपल्या भूमिकेचा अंदाज घेणे/येणे कसे अशक्य आहे हे वार्तांकन करणाऱ्यांना जाणवून दिले. ‘माईक पेन्स यांचे व्यक्तिमत्त्व प्रत्येक बाबतीतच अलौकिक आहे’, हे सांगतांना यांच्या निवडीमागे पक्षात एकोपा निर्माण व्हावा म्हणून ही निवड माझ्यासारख्या ‘उपऱ्याने’ (पक्ष कार्यकर्ता नसणाऱ्याने) करणे आवश्यकच होते, हे सांगण्यास ते विसरले नाहीत. महिला, अल्पसंख्यांक व समलिंगी यात ट्रंप यांची प्रतिमा मुळीच चांगली नाही. त्यातून गर्भपात, कुटुंब नियोजन, समलिंगीचे प्रश्न व स्थलांतरितांचे प्रश्न याबाबत माईक पेन्स हे तर पराकोटीचे उजवे व सनातनी विचारांचे समजले जातात. इंग्रजीचा अवास्तव पुरस्कार (अमेरिकेत स्पॅनिश बोलणाऱ्यांची संख्या बरीच आहे) हा ही अडचण निर्माण करणारा मुद्दा आहे. तीनदा बाशिंग बांधणारा उतावळा, म्हणून ट्रंप यांची संभावना होत असते. म्हणूनच बहुदा सुसंस्कृत जनमानसाच्या त्यांच्याकडून कोणत्याही अपेक्षा नसाव्यात/नाहीत.
अशीही ट्रंप व पेन्स यांची दुक्कल पाहून हिलरी क्लिंटन व त्यांचे समर्थक यांना हर्षाच्या उकळ्या फुटत आहेत. अमेरिकन महिलावर्ग ही दुक्कल साफ नाकारील, असे त्यांना वाटते आहे. ७७ टक्के महिलांनी ट्रंप यांचे बाबत आपले  प्रतिकूल मत नोंदविलेही आहे.
 प्रतिमा उजळण्याचे प्रयत्न - ट्रंप यांची प्रतिमा उजळण्याची तजवीज हा चार दिवस चालणाऱ्या संमेलनाचा मुख्य हेतू आहे. भीमदेवी थाटात गर्जना करणारा (बाॅंबॅस्टिक), भावनावश वृत्तीचा (इंपल्सिव्ह), दिखाऊगिरीत तरबेज असलेला (शोमन) व वक्तृत्त्वाने केवळ सभा गाजवणारा, मुख्य म्हणजे सोळा प्रतिस्पर्ध्यांचा खातमा पक्षांतर्गत निवडणुकीत करणारा ‘उपरा’ ही आजची ट्रंप यांची जनमानसात असलेली प्रतिमा पुसून टाकणे आणि एक खराखुरा (सबस्टॅंटिव्ह) व सहानुभूती बाळगणारा (कंपाशनेट) अशी त्यांची प्रतिमा उभी करायची आहे. त्यांचे शब्दनिपुणतायुक्त रोखठोक वक्तृत्त्व लोकप्रिय असते, असे त्यांचे समर्थक म्हणतात. पण यात मांडलेल्या मुद्यांमुळे अल्पसंख्यांक व महिला मतदार त्यांच्या वाट्यालाही उभे राहण्यास तयार नाहीत. (बहुदा) यावर उपाय म्हणून त्यांच्या तृतीय पत्नीने (पूर्वाश्रमीची फॅशन माॅडेल असलेल्या) - मेलानियाने- पतीच्या समर्थनार्थ राष्ट्रीय संमेलनात एक उत्कृष्ट भाषण केले व वाहवा मिळविली. पण हे समाधान अल्पकाळ टिकले. एका काकदृष्टी असलेल्या वार्ताहराने हे भाषण म्हणजे बराक ओबामांच्या पत्नीने - मिखिल ओबामाने - चार वर्षांपूर्वी डेमोक्रॅट पक्षाच्या संमेलनात केलेल्या भाषणाची सहीसही नक्कल आहे, हे सप्रमाण दाखवून रिपब्लिकनांच्या तोंडचे पाणीच पळविले. हे म्हणजे आपल्या केजरी आणि दिग्गूराजांनाही मागे टाकण्यासारखे झाले. टिंगलटवळीला एकच ऊत आला आहे. इतका की, तोच एका स्वतंत्र लेखाचा विषय ठरावा. अमेरिकन राजकीय विश्लेषक जगातल्या खोचक पत्रकांराचे मुकुटमणी शोभावेत, असे आहेत. त्यांना आयतेच खाद्य मिळाले आहे. त्यांच्यासमोर आपले राजदीप, करण किंवा बरखा म्हणजे ‘किस झाडकी पत्ती’, अशी स्थिती आहे. पत्नीच्या भाषणाचा हा मुद्दा आता ८ नोव्हेंबरपर्यंत नवनवोन्मेषशाली ठरावा, असे प्रयत्न डेमोक्रॅट व पत्रकार करणार यात शंका नाही.
अनपेक्षित अडचण - याशिवाय अडचणीचा आणखी एक मुद्दा असा की, रिपब्लिकन पक्षाच्या अनेक दिग्गजांनी संमेलनाला दांडी मारली आहे. दोन माजी अध्यक्ष व अध्यक्षपदाचेच पण पराभूत झालेले दोन माजी उमेदवार हे संमेलनात दिसणार नाहीत. कुणी फिशिंगला गेले आहेत, कुणी अंगणातील गवत कापत ( लॅंड मोविंग) आहेत, कुणी ग्रॅंड कॅनियनला पदयात्रा (ट्रेकिंग) काढणार आहेत, याचवेळी सिनेट व हाऊसच्याही निवडणुका आहेत. त्यासाठीचे उमेदवार एकट्यानेच स्वतंत्र प्रचार करणार आहेत, काही मतदारांशी संपर्क दौरा आयोजित करीत आहेत. याच काळात एक महिला उमेदवार अलास्काला ४०००(चार हजार) मैल दूर विमानातून प्रचार करीत आहे. एक ना दोन. हजार कारणे पुढे येत आहेत.
अशी पक्षांतर्गत स्थिती आहे.
ट्रंप यांच्या प्रचाराचे मुख्य सूत्र - अशा परिस्थितीत ट्रंप यांचे कसे होणार?  त्यांचे प्रचाराचे मुद्दे कोणते राहणार? त्यांची बलस्थाने कोणती?  अतिरेक्यांविरुद्ध युद्ध पुकारणार, ही लोकांना आवडणारी सकारात्मक भूमिका, बेकारांना रोजगार, नोकऱ्यात अमेरिकनांना प्राधान्य, ही आकर्षक आश्वासने, डेमोक्रॅट पक्षाच्या देशहितविरोधी धोरणांचा निषेध, हिलरींनी खाजगी ईमेलचा सरकारी कामासाठी वापर केला व गुप्ततेचा भंग केला तसेच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला ही दखलपात्र गुन्हेगारी, मुस्लिमांकडून क्लिंटन फाऊंडेशनसाठी मदत घेतल्यामुळे अतिरेक्यांचे बाबतीत मिंधेपणाची व बोटचेपी भूमिका, गठ्ठा मतांसाठी अवैध घुसखोरांना नागरिकत्व दिले, अमेरिकन नोकऱ्यांवर परदेशींना कबजा करू दिला, हे हिलरी व डेमोक्रॅट पक्षाचे पाप आहे व ते आपण दूर करू, असा भरभक्कम मसाला ट्रंप यांनी गोळा केला आहे. त्यांची मतपेढी दिवसेदिवस वाढतच जाईल. आता ती आणखी खाली जाण्याची शक्यता नाही. आता सौभाग्यवती पुन्हा तोंड उघडतील असे वाटत नाही. पण संमेलनात ट्रंप यांच्या पहिल्या दोन पत्नींपासून झालेल्या चार चिरंजीवांचीही भाषणे अजून व्हायची आहेत. हा कार्यक्रम जर सुरळीत पार पडला की झाले. ‘अतिरेक्यांशी सरळ दोन हात करू इच्छिणारा धडाकेबाज नेता’ ही आपली प्रतिमा आपल्याला विजय मिळवून देईल, असा विश्वास ट्रंप बाळगून आहेत. म्हणूनच उमेदवारीची अधिकृत घोषणा होताच त्यांनी देशाला आश्वासन दिले, ‘अपार कष्ट करीन, तुमचा अपेक्षाभंग होऊ देणार नाही’.

Tuesday, July 19, 2016

 अमेरिकेतील अटीतटीचा सामना
वसंत गणेश काणे
 अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांच्या विरोधात भरपूर दारूगोळा विरोधकांजळ ठासून भरलेला तयार आहे, याची कल्पना असल्यामुळेच रिपब्लिकन पक्ष त्यांच्या पाठीशी आपली सर्व शक्ती एकवटण्याच्या खटाटोपात लागला आहे. अमेरिकन नागरिकांपैकी इतर सर्वसामान्य विरोधक बाजूला ठेवून विचार करायचा म्हटले तरी ट्रंप यांना कृष्णवर्णी आणि स्पॅनिश मतदार यांचा असलेला परकोटीचा विरोध तर कुणाच्या छातीत धडकी निर्माण करील, इतका तीव्र व टोकाचा आहे. कारण ही गठ्ठामते आहेत. ही मते एरवीही डेमोक्रॅट पक्षाकडेच झुकलेली असतात. त्यांचा ट्रंप यांच्यावर विशेष रोष आहे. त्यामुळे मतदानाचे अंदाजे आकडे ट्रंपच कशाला, इतर कोणत्याही रिपब्लिकनाच्या विरोधात कायमस्वरूपी झुकलेले दिसत आहेत.
  असे असूनही ट्रंप हिलरी क्लिंटन यांच्यापासून हाकेच्या अंतरावरच आहेत, असेच म्हणायला हवे. कारण स्विंग स्टेट्स या नात्याने निवडणुकीचा निकाल फिरवण्याची क्षमता असलेल्या राज्यात आता ट्रंप यांचे बस्तान हळूहळू बसतांना दिसत आहे. असे का होत असावे? हिलरी क्लिंटन अनेकांना आवडत नाहीत, हे कारण तर आहेच, याशिवाय एक आणखी मुख्य कारण असेही आहे की, त्यांची विश्वसनीयता अनेकांच्या दृष्टीने पार रसातळाला गेली आहे. जेव्हा मतदारांसमोर फक्त दोनच पर्याय असतात तेव्हा पहिला पर्याय जर नको असेल तर दुसऱ्या पर्यायाशिवाय अन्य मार्गच उरत नाही. यामुळेच ट्रंप रणांगणात कायम आहेत.
   न्यूयाॅर्क टाईम्स व सीबीएस यांनी केलेले सर्वेक्षण उदाहरण म्हणून घेता येईल. या सर्वेक्षणातील पहिलाच प्रश्न बघा. हिलरी क्लिंटन प्रामाणिक व विश्वसनीय आहेत किंवा नाहीत? ६७ टक्के मतदार म्हणतात की, त्या प्रामाणिक व विश्वसनीय नाहीत. किती? थोडेथोडके नाहीत, तर तब्बल ६७ टक्के. अर्थात, यात रिपब्लिकन पक्षाकडे कल असलेले मतदारही आहेत. त्यातले तर ९३ टक्के मतदार त्यांना अप्रामाणिक व अविश्वसनीय मानतात, हे विशेष नाही. पण सॅंपलमध्ये ३/४ मतदार असे आहेत की जे डेमोक्रॅट किंवा रिपब्लिकन अशा कोणत्याच पक्षाचे मतदार नाहीत. अन्य २५ टक्यातील जे मतदार स्वत:ला डेमोक्रॅट पक्षाचे समर्थक म्हणवतात, त्यातल्यासुद्धा दर तीन पैकी एका मतदाराला वाटते की, क्लिंटन प्रामाणिक व विश्वसनीय नाहीत.  हिलरी क्लिंटन यांच्या समर्थकांपैकीच ३३ टक्के मतदार असे आहेत. हा आहे की नाही बुचकळ्यात टाकणारा मुद्दा? क्लिंटन यांच्यासाठी ही बाब धक्कादायक व धोकादायक नाही का?
  पण हीही बाब खरी आहे की, प्रामाणिकपणा व विश्वसनीयता याबाबत ट्रंप यांची कीर्तीही कौतुक करावी अशी नाही. ६२ टक्के लोक ट्रंप यांना प्रामाणिक व विश्वसनीय मानत नाहीत. स्वत:ला रिपब्लिकन पक्षाचे समर्थक म्हणवणाऱ्यांपैकी सुद्धा ३२ टक्के मतदार ट्रंप यांना प्रामाणिक व विश्वसनीय मानीत नाहीत, असा प्रकार ट्रंप यांच्या बाबतीतही आहे. या दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये त्यांना अप्रामाणिक व अविश्वसनीय मानत आहेत हा प्रकार म्हणजे ‘हम सब चोर है।’, या प्रकारचा झाला नाही का? एक चोर तर दुसरा लुटारू. यातूनच मतदारांना कुणातरी एकाची निवड करायची आहे.
  पण एक मुद्दा ट्रंप यांच्या खूपच बाजूचा आहे. त्यांना जुनी पद्धत उखडून टाकायची आहे. ते केवळ प्रस्थापितांच्या विरुद्ध आहेत, एवढेच नाही तर ‘ज्याप्रकारे राजकारण करू नये, असे आम्हाला वाटते आहे’, तसेच ट्रंप म्हणत आहेत, याचे मतदारांना आकर्षण वाटते आहे. तर हिलरी क्लिंटन नेमके उलट म्हणत आहेत. त्यांचा भर  स्थरता(स्टेडीनेस), सातत्य व अनुभव यावर आहे.
   कोणत्याही प्रचलित मापदंडांच्या आधारे ट्रंप यांचे मूल्यमापन करता यायचे नाही. त्यांचे कार्य कसे असावे व त्यांनी कारभार कसा करावा याबाबत निरनिराळ्या लोकांच्या वेगवेगळ्या अपेक्षा आहेत. असा प्रकार क्लिंटन यांचेबाबतीत नाही. त्यांची मते, त्यांची भूमिका, त्यांची वैचारिक बैठक  सर्वज्ञात आहे त्या स्वभावत: नोकरशाही वृत्तीच्या आहेत. सामान्य लोकांसाठी राज्यकारभाराचा शकट कसा हाकावा हेच त्यांना त्यातल्यात्यात बऱ्यापैकी माहीत आहे. चाकोरीबाहेर जाऊन काहीतरी करण्याचा त्यांचा पिंड नाही.
  आज त्या काहीशी वेगळी भाषा वापरत आहेत, हे खरे. पण जे त्या आज म्हणत आहेत, त्यानुसार त्या भविष्यातही वागतील यावर विश्वास नसेल, तर मतदारांनी तरी त्यांना मत का द्यावे? यापेक्षा अगदी बेधडकपणे वेगळी मांडणी करणारे ट्रंप बरे नव्हेत का?
आतापर्यंत हिलरी क्लिंटन स्वत: प्रामाणिकपणा- विश्वसनीयतेबाबतची टीका हसण्यावारी नेत असत. पण हा मुद्दा हारजीत ठरविण्याइतका महत्त्वाचा झाला आहे, हे त्यांना आता पुरतेपणी उमगले आहे. म्हणून मतदारांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी मला काहीतरी करावेच लागेल, असे त्या वारंवार म्हणत असल्याचे वृत्त आहे.
   विश्वसनीयता परत मिळविण्यासाठीसाठी क्लिंटन खूप व जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत. ट्रंप यांना असे काही करण्याची गरज नाही. मतदार जेव्हा जुनेजरठ उखडून टाकण्याचे ठरवतात, तेव्हा जुन्याला ‘मरणालगुनि’ जावेच लागते हा नियम आहे. त्यातही महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, विश्वसनीयतेबातचा क्लिंटन यांचा स्कोअर उत्तरोत्तर कमी होण्याचीच शक्यता आहे. विश्वसनीयतेची ही घसरगुंडी हिलरी थोपवू शकल्या नाहीत तर काय? मतदारांनी बदल घडवून आणण्याचा निर्णय केला तर? असे घडेल का? यावर ट्रंप यांच्या जिंकण्याच्या आशा उत्तरोत्तर पल्लवीत होणार आहेत. उलट हे विधान अधिक बरोबर ठरेल की, क्लिंटन यांची जिकण्याची शक्यताच दिवसेदिवस धूसर होत जाणार आहे.

इराकमधून इसीसच्या माघारीला प्रारंभ, पण...
वसंत गणेश काणे
   इराकची राजधानी असलेल्या बगदादहून आलेल्या वार्तेवर सुरवातीला कोणाचाही विश्वास बसत नव्हता. इसीसच्या फौजा केवळ माघारच घेतांना दिसत नाहीत, तर त्यांचे पलायन सुरू झाले आहे, हे ते वृत्त होते. फालूजा हे इराकमधल एक सैनिकी  महत्त्वाचे केंद्र होते. या ठिकाणी इसीसच्या फौजा ठिय्या देऊन बसल्या होत्या. त्यांची आगेकूच थांबवण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी इराकच्या मित्रांच्या (नाटोच्या) फौजा निकराचे प्रयत्न करीत होत्या. रशियाही स्वतंत्रपणे व आपल्यापरीने याच प्रयत्नात होता. पण त्या जशा पुढे सरकत नव्हत्या तशाच त्या मागेही हटत नव्हत्या. शेवटी एक वृत्त आले. त्या फौजा आपल्या वाहनांच्या ताफ्यासह केवळ मागेच हटतांना दिसत नाहीत, तर त्यांचे पलायन सुरू झाले आहे.
   अमेरिकेने मानवरहित ड्रोन हे टेहळणी विमान पाठवून खात्री करून घेतली. वाॅर रूममध्ये हे एक भला मोठा पडदा टांगलेला होता. लष्कराचे महत्त्वाचे अधिकारी समोर उभे राहून पडद्यावरील निरीक्षणे व नोंदी यांची बारिक तपासणी करीत होते. पडद्यावरील हालचालींवरून एकच निष्कर्ष निघत होता. सर्व चिन्हे माघारी नव्हे तर पलायन सुचवीत होती. वाहने एकत्र येत होती, त्यांची गर्दी वाढत होती. पण लक्षणे पलायनाची दिसत होती.
  पण हा क्षण समाधान मानून स्वस्थ बसण्याचा नव्हता तर निर्णायक आघात करण्याचा होता. आजवरचा अनुभव लक्षात घेऊन इसीसने आपला वाहनांचा ताफा सतत विखुरलेला ठेवण्याचे धोरण अवलंबिले होते. हवाई हल्यात सर्व वाहने एकदम नष्ट होऊ नयेत, म्हणून ही काळजी घेतली जात असे. पण आतातर इतकी गडबड धांदल दिसत होती की, वाहतुक थांबली होती ‘ट्रॅफिक जाम’ झाला होता.
  फालुजा शहर बगदादपासून केवळ ३५ मैल अंतरावर होते. येथपर्यंत इसीसच्या फौजा पोचल्या होत्या. यानंतर एकच चढाई करताच बगदाद पडले असते. इराकच्या राजधानीवरच कबजा होताच पुढचे काम सोपे होते. बाकीचा इराक पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला असता. पण इराक सरकारच्या फौजांनी इराकच्या मित्रांच्या(नाटोच्या) फौजांच्या मदतीने, अमेरिकेच्या ड्रोन या मानवरहित विमानंच्या हल्याच्या साह्याने व रशियाच्या स्वतंत्र पण पूरक बाॅंब वर्षावाच्या मदतीने इसीसची आगेकूच थांबवली होती. आता तर चक्क माघारच नाही तर पलायन सुरू झालेले दिसत होते.
  जूनच्या शेवटच्या एकाच प्रभावी व सर्वंकष हल्यात ४०० अतिरेकी व त्यांच्या सोबत असलेला २०० वाहनांचा ताफा नष्ट झाल्याच्या वार्ता कानावर येत होत्या पण पुष्टी होत नव्हती. विश्वासही बसत नव्हता. विश्वास तरी कसा बसावा? गेली दोन वर्षे इसीसच्या फौजांची आगेकूच अव्याहत सुरू होती. इसीसच्या फौजा सतत पुढेपुढेच सरकत होत्या. पण आता लढाईचे पारडे पलटले होते.
  असे का वकाय घडले होते? गुप्तहेरांचे दाखले व आघाडीवरून परत आलेल्यांच्या मुलाखती यावरून एक बाब उघड झाली. इराकच्या फौजा, मित्रराष्ट्रांच्या(नाटोच्या) फौजा, ड्रोनचे हल्ले व रशियाची नेमकी व अचुक बाॅंबफेक एकसमयावच्छेदेकरून जुळून येईल, असे अतिरेक्यांना वाटले नव्हते. त्यांना तरी हे सगळे असे जुळून येईल, असे का वाटावे? रशिया व नाटोचे पार बिनसले होते. पण रशियालाही इसीसचा धोका पटला होता. त्यामुळे नाटोसह जरी नव्हे तरी वेगळ्या रीतीने पण नेमका, वेळेवर व योग्यत्या क्षेत्रावर रशियानेही तुफान बाॅंबफेक केली होती.
 अतिरेकी अगोदर आश्चर्यचकित झाले. पुढे त्यांच्यात मतभेद होऊन त्यांच्यात दोन तट पडले. त्यांना परिस्थतीचा अंदाज घेता आला नाही. जेव्हा अंदाज आला तेव्हा उशीर झाला होता. माघार हाच पर्याय शिल्लक होता. तशी ही काही इसीसची पहिली माघार नव्हती. या अगोदरही ते मागे हटले होते. पण ती धोरण आखून घेतलेली माघार असे. लवकरच त्यांच्या फौजा पुन्हा एकत्रित येत व चढाई सुरू करीत. पण हे सपशेल पलायन होते. आता संपूर्ण इराणमधून अतिरेक्यांची सपशेल माघार फार दूर नाही. तसे अजूनही मोसूल हे महत्त्वाचे ठाणे त्यांच्या ताब्यात आहे, हे खरे आहे. पण आता विजयाने उत्साहित झालेल्या इराकी फौजा नव्या जोमाने मोसूलवर चढाईची योजना आखीत आहेत. अमेरिकेने आणखी ६०० सैनिकांचा ताफा याच कामासाठी पाठविला आहे.
   परत फिरणाऱ्या इसीसच्या वाहनात नक्की कोण व काय आहे, याचा शोध घेणे सुरू आहे. अनेकदा या वाहनात, बंदीवान नागरिक, स्त्रिया व मुलेही असतात. त्यांचा नाहाक बळी जायला नको. एकेक वाहन हुडकून व ज्यावर मशीनगन्स तैनात असतील, त्यांच्यावरच हल्ला करण्याचे काम जसे जिकिरीचे आहे तसेच ते जोखमीचेही आहे. काही गल्लत झाली तर एकतर निरपराध लोकांचा बळी जायचा किंवा हल्ला करणाऱ्या विमानालाच धोका पोचायचा.
   म्हणून एक वेगळीच रणनीती अवलंबिली जात आहे. परतीच्या वाटेला असलेल्या वाहनांच्या ताफ्याच्या मागेपुढे व भोवती बाॅंब टाकून मोठमोठे खड्डे पाडून रस्त्यावरून होणारी त्यांची वाहतुक थांबवायची व बायपास तयार करणेही अशक्य करायचे. म्हणजे कोणतेही वाहन निसटून जाऊच शकणार नाही. ते जागीच खिळून राहील. मग एकेका वाहनाचा आकाशातून टेहळणी करून अंदाज घ्यायचा .त्यावर शस्त्रे आहेत, असे दिसताच ती नष्ट करायची. एक आणखी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आघाडीवरच्या अधिकाऱ्यानेच यापुढे स्वत: निर्णय घ्यायचे आहेत. या अगोदर तो सेंट्रल कमांडकडे अहवाल पाठवायचा व तिकडून अनुमती मिळाल्यानंतर पुढील कारवाई करायचा. वाहनात मुलकी नागरिक नाहीत, ही खात्री पटताच पुढची कारवाई करण्याचे अधिकार आता आघाडीवरील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
   या निर्णयाचा अनुकूल परिणामही लगेचच दिसून आला. फालुजा जवळच अल्बू बाली हे छोटेसे खेडे आहे. टेहळणी करणाऱ्या ड्रोनने जवळजवळ शंभर वाहने त्या दिशेने कूच करीत आहेत व एकत्रित येत आहेत, अशी दृश्ये टिपली. लगेच इराकी तोफांनी त्यांच्यावर आग ओकायला सुरवात केली व अन्य देशाच्या विमानांनी त्यांच्यावर बाॅंब वर्षाव केला. यात एक आश्चर्यकारक बाब लक्षात आली. विमानातून टाकलेल्या बाॅंबच्या स्फोटानंतर काही वेळाने दुसरा एक स्फोट होत होता. याचा अर्थ असा की, हे कार बाॅंब्जहोते. कार बाॅंब पाठवून लढण्याचे एक वेगळेच युद्धतंत्र इसीसच्या फौजा अंगिकारणार होत्या. ते वेळीच व योगायोगाने लक्षात आले होते.
  हळूहळू हा सर्व प्रकार इसीसच्या परत फिरणाऱ्या वाहनात बंदीवान असलेल्या मुलकी नागरिक, स्त्रिया व मुले यांच्याही लक्षात येऊ लागल्याचे दिसत आहेत. हल्यातून वाचलेलेल्या किंवा वगळलेल्या वाहनातून ही मंडळी पळ काढून आसरा शोधतांना दिसत आहेत. यांना चुकूनही हानी पोचू नये म्हणून संबंधित वाहनावर जवळजवळ एक तास नजर ठेवून मागच त्यावर हल्ला करण्या किंवा न करण्याचा निर्णय इराकी फौजा घेत आहेत.
  इसीस आता आपले युद्धतंत्र बदलतांना दिसत आहे. एकटदुकट वाहन वापरून केवळ मोक्याच्या ठिकाणीच नव्हे ठिकठिकाणी गनीमी हल्ले करून सतावून सोडण्याचे तंत्र अवलंबिले जात असावे, अशी शंका व्यक्त होते आहे. कारण एकटदुकट ठिकाणी होणाऱ्या हल्यामागचे  खरे  दुसरे सूत्रधार उघड होत नसतात. जगातील ठिकठिकाणची इसीसची स्लिपिंग सेल्स एकदम क्रियाशील होताना दिसत आहेत. हे हल्ले अचानक होत असतात. त्यांचे प्रसिद्धीमूल्यही खूप असते. हल्याचा हा प्रकार इसीससाठी कमी नुकसानदायक व अधिक परिणामकारक असतो. अशा हल्याच्या वार्ता दिवसेदिवस वाढत्या प्रमाणात येऊ लागतील असे दिसते.
अमेरिकन मतपत्रिकेचे अगडबंब स्वरूप व एकाचवेळी अनेक निवडणुका
वसंत गणेश काणे
८ नोव्हेंबरला अमेरिकेत जी मतपत्रिका असेल त्या मतपत्रिकेत अध्यक्ष व उपाध्यक्षांची नावे कोणती असतील ते आज आता सांगता येणार नाही, म्हणून आपण २०१२ सालची मेरी लॅंड प्रांतातील ॲरुंडेल काऊंटीची(जिल्ह्याची) मतपत्रिका  उदाहरणादाखल घेऊ. ही मतपत्रिका चांगलीच लांबरुंद अशी चार पानी होती. या मतपत्रिकेवर सर्वात वर दोन सूचना होत्या.
१) तुम्हाला ज्याला मत द्यायचे असेल त्याच्या नावाच्या डाव्या बाजूला एक अंडाकृती वर्तुळ आहे. दिलेल्या पेन्सीलनेच ते वर्तुळ काळे करा. दुसरी एखादी पेन्सील वापरू नका. चूक झाल्यास खोडण्याचा प्रयत्न न करता नवीन मतपत्रिका मागा. आपले नाव लिहिल्यास किंवा स्वाक्षरी केल्यास किंवा गुप्ततेचा भंग होऊ शकेल अशी खूण केल्यास मतपत्रिका बाद होईल.
२)उभ्या असलेल्या उमेदवाराशिवाय दुसरेच एखादे नाव तुमच्या मनात असेल तर ते नाव तुम्ही लिहू शकता.
उदाहरणासाठी निवडलेल्या मेरीलॅंड प्रांतातील ॲरुंडेल काऊंटीच्या (जिल्ह्याच्या) मतपत्रिकेत पुढीलप्रमाणे  ७ बाबतीतला तपशील होता.
(१) प्रथम अ) बराक ओबामा व ज्यो बिडन या अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या जोडगोळीचे(टिकेट) नाव होते. त्यांच्यासमोर डेमोक्रॅट असे लिहिलेले होते.
याच्या खाली ब) मिट राॅम्नी व पाॅल रायन या रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या जोडगोळीचे नाव व त्याच्या समोर रिपब्लिकन पक्ष असा मजकूर होता. यानंतर क) गॅरी जाॅनसन व जेम्स ग्रे ही लिबर्टेरियन पक्षाची जोडगोळी व तिच्या खाली ड) जील स्टीन व चेरी होंकाला ही ग्रीन पक्षाची जोडगोळी होती. सर्वात शेवटी यापैकी कोणतीही जोडगोळी पसंत नसल्यास मतदाराला आपल्याला मतानुसार ई) हव्यात्या जोडगोळीचे नाव लिहिता यावे म्हणून जागा सोडलेली होती.
  शेवटची मतदाराच्या पसंतीची जोडगोळी आजवर कधीही निवडून आलेली नाही व भविष्यातही निवडून येण्याची सध्यातरी सुतराम शक्यता दिसत नाही. पण मतदाराला अमेरिकन राज्यघटनेने आपल्या पसंतीच्या जोडगोळीचे नाव नोंदवण्याचा अधिकार दिलेला आहे. याला दाद द्यायलाच हवी.
    दुसरे असे की, मतदाराला कोणती ना कोणती जोडगोळीच निवडावी लागते. एका जोडीतील अध्यक्ष व दुसऱ्या जोडीतील उपाध्यक्ष निवडता येत नाही. त्यामुळे अध्यक्षाइतकीच मते घेऊन उपाध्यक्षही निवडून येतो. या चार जोडगोळ्या वा हवी ती जोडगोळी निवडण्यासाठी त्याखाली रिकाम्या दोन जागा हा मजकूर पूर्ण देशभर सर्व मतपत्रिकांवर सारखाच होता.
    यानंतर (२) सिनेटवर निवडावयाच्या उमेदवारांची नावे होती. सिनेट म्हणजे आपल्या येथील राज्यसभा असे समजून विचार करायला हरकत नाही. दर दोन वर्षांनी सिनेटच्या शंभर सदस्यांपैकी एकतृतियांश म्हणजे ३३ किंवा ३४ सदस्य निवृत्त होत असतात व त्यांच्या जागी नवीन सिनेटर राज्यागणिक जे जे निवृत्त झाले असतील त्यांच्या जागी निवडायचे असतात. मेरीलॅंड प्रांतातील ॲरुंडेल जिल्ह्यातील एक सिनेट सदस्य निवृत्त झाला असल्यामुळे त्याऐवजी डेमोक्रॅट, रिपब्लिकन, लिबर्टेरियन पक्षाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे तीन पक्षीय सदस्यांची नावे व त्यानंतर एका अपक्षाचे नाव होते व सर्वात शेवटी आपल्या पसंतीचे नाव लिहिण्यासाठी जागा सोडलेली होती.                                                    
   असाच क्रम(३) हाऊस आॅफ रिप्रेसेंटेटिव्हच्या एका प्रतिनिधीच्या निवडीसाठी याच तीन पक्षांच्या उमेदवारांच्या नावासह व पसंतीच्या उमेदवाराच्या नावासाठीच्या एका रिकाम्या जागेसह होता. आपल्या येथील वाचकांसाठी हा सर्व तपशील नवा असल्यामुळे ही सर्व माहिती तपशीलवार नोंदविली आहे. असाच क्रम संपूर्ण मतपत्रिकेवर इतर सदस्यांच्या पक्षनिहाय नावासह, अपक्षांच्या नावासह व पसंतीच्या नावासाठी रिकाम्या जागेसह कायम होता.
पण मतपत्रिका येथेच संपत नाही. (४) या नंतर तीन न्यायाधीश व शिक्षण मंडळाच्या दोन सदस्यांबाबत मुदतवाढीसाठी हो वा नाही हा पर्याय व पसंतीच्या नावासाठी रिकाम्या जागेसह होता. (५) यानंतर घटना दुरुस्तीबाबतच्या दोन प्रस्तावावर जनमताचा कौल घेण्यासाठी हो/नाही, असे पर्याय होते. येथे मतपत्रिकेची एक बाजू संपते.
    मतपत्रिकेच्या दुसऱ्या बाजूवर (६) घटना दुरुस्तीबाबतचे सात प्रस्ताव होते व चार प्रश्न विचारले होते. या ठिकाणी मतपत्रिकेच्या पहिल्या पानाची दुसरी बाजू संपते.
(७) मतपत्रिकेच्या तिसऱ्या पानावर  मतदारांना वेगवेगळ्याविषयावरचे एकूण अकरा प्रश्न विचारले होते. त्यांची हो/नाही अशी उत्तरे अपेक्षित होती. मतदारांचे नशीबच म्हणायचे की मतपत्रिकेचे चौथे पान कोरे होते. पण हे मेरीलॅंड या  प्रांतातील उदाहरण आहे. प्रत्येक प्रांतागणिक त्या त्या जिल्ह्यात यापेक्षा अधिक निवडणुकाही असू किंवा नसूही शकतात. पण हे सर्व प्रकार एकच मतपत्रिका हाताळते. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील मतपत्रिकेत काही तपशील गळतात तर काही नव्याने समाविष्ट होतात.
       मतपत्रिकेवरील मतदाराला स्वत:च्या पसंतीचे नाव लिहिण्याची तरतूद
अनेकांना केवळ तात्त्विकदृष्ट्याच महत्त्वाची वाटते आहे. अशी नावे सुचविली जाणे व सर्वांकडून याप्रकारे एकच नाव सुचविले जाणे व तो निवडून येणे या अशक्य कोटीतले वाटते आहे. पण हाच तर्क तिसऱ्या पक्षाचे संदर्भातही केला जात असे. पण आज वेगळीच परिस्थिती दिसते आहे. २०१२ साली लिबर्टेरियन पार्टी व ग्रीन पार्टी या दोन पक्षांना मिळून केवळ दोन टक्केच मते मिळाली होती. पण आज २०१६ मध्ये सध्याच झालेल्या जनमत चातणीनुसार हे दोन पक्ष १० टक्के(७.५ + २.५=१०) मते घेत आहेत. येत्या चार महिन्यानंतर यात वाढ झाली तर ही टक्केवारी आणखीही वाढू शकेल. हा प्रकार असाच सुरू राहिला तर याचा परिणाम म्हणून २०२० मध्ये तिसरा पक्ष अमेरिकेच्या राजकीय क्षितिजावर अवतरलेला दिसूही शकेल.
 असे का व्हावे/झाले? असे म्हणतात की, दोन्ही पक्षांबद्दल जनमानस एकाच वेळी एवढे नाराज झालेले यापूर्वी कधीच दिसले नव्हते. याचे एक कारण असे असावे की हे दोन्ही पक्ष आता वृद्ध झाले आहेत. नवसंजीवन देईल असा नेता दोन्ही पक्षांजवळ नाही. त्यातल्या त्यात समाधानाची बाब ही की, नुकतीच डेमोक्रॅट पक्षाचे बाबतीत एक अनुकूल घटना घडली आहे. बर्नी सॅंडर्स यांनी आपला विरोधी पवित्रा म्यान केला असून हिलरींना पाठिंबा दिला आहे. त्या अगोदर हिलरी यांनी बर्नी सॅंडर्स यांचीच काही धोरणे आपण पुढे चालवू असे म्हटले होते. त्यामुळे म्हणा किंवा आणखी काही कारणांमुळे हा तिळगूळ समारंभ पार पडला असावा. आता डेमोक्रॅट पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनात गृहीत उमेदवार(प्रिझंप्टिव्ह कॅंडिडेट) हिलरी क्लिंटन यांचीअधिकृत उमेदवार म्हणून घोषणा ही केवळ एक औपचारिकताच उरलेली असेल. डोनाल्ड ट्रंप यांनाही रिपब्लिकन पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळेल. त्यामुळे घोड्यामैदानावरील भिडू नक्की झालेले दिसतात. आता मग प्रतीक्षा आहे चर्चेच्या फडांची.
    जिल्हास्तरापासून देश पातळीपर्यंतच्या सर्व निवडणुका, घटना व कायद्यातील दुरुस्तीबाबतचा मतदारांचा कौल, विशिष्ट प्रश्नांबाबतची मतदारांची मते (जसे गर्भपात, समलिंगींचे प्रश्न),  न्यायाधीश, शेरीफ, शासकीय वकील, नोंदणी अधिकारी यांची निवडणूक वा त्यांना मुदतवाढ हे सर्व विषय एकाच वेळी, एकाच मतपत्रिकेद्वारे जाणून घेण्याचा अमेरिकेतला हा प्रकार बहुदा एकमेव व अद्वितीय असावा.
अ) अशाप्रकारे देशपातळीवर अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड, हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हच्या म्हणजे ४३५ सदस्यांची निवड, इलेक्टोरल काॅलेजच्या ५३८ सदस्यांची निवड व सिनेटच्या दर दोन वर्षांनी निवृत्त होणाऱ्या एकतृतियांश सदस्यांची( म्हणजे ३३/३४ सदस्य) निवड दर चार वर्षांनी होतातच. याशिवाय ब) प्रांतागणिक, क) जिल्ह्यागणिकही काही सभागृहांची/सदस्यांची मुदत संपलेली असू शकते. अशा निवडणुकाही याच वेळी याच मतपत्रिकेद्वारे घेतल्या जातात. यात प्रांतानुसार फरक असू शकतो. कारण अमेरिका हे अनेक प्रांतांचे मिळून बनलेले संघराज्य आहे. त्यामुळे राज्यागणिक अनेक बाबतीत फरकही आहेत. पण सर्वसाधारणपणे व गोळाबेरीज स्वरूपात हा तपशील बरोबर आहे.
असे वेगळेपणाचे अनेक प्रकार इतरही निरनिराळ्या विषयांचे बाबतीत पहायला मिळतात. अमेरिकन संघराज्य निर्माण होऊन आता दोनशे चाळीस वर्षे होत आहेत. त्या निमित्ताने या विषयांवरील चर्चा सुरू झाल्या असून या विषयीचा बहुदा पहिला लेख टाईम या मासिकात नुकताच छापून आला असून त्यात आजवरच्या दोनशे चाळीस वर्षातील धवल व कृष्ण कालखंडांची चर्चा ज्या विषयांशी संबंधित आहे त्यात निवडणूक हाही एक विषय असावा याच्या मागचे कारण काय असावे बरे?
यंत्रमानवाद्वारे हल्लेखोरांचा नि:पात - योग्य की अयोग्य?
वसंत गणेश काणे
डलास पोलिसांनी जाॅनसन नावाच्या माजी सैनिकाचा खातमा करण्यासाठी यंत्रमानवाचा उपयोग करून एक बॅांब त्याच्या जवळ नेला आणि तो माऱ्याच्या टप्प्यात येतात बॅांब उडवून त्याला ठार केले. या माथेफिरूने या अगोदर त्याने पाच गोऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना ठार केले होते.
 त्याने शरण यावे म्हणून त्याचे मन वळ विण्याचा प्रयत्न  सतत दोन तास केल्यानंतर तो शरण तर येणार नाहीच पण आणखी काही पोलिस अधिकाऱ्यांना मारण्याच्या विचारात आहे, हे कळताच त्याला अशाप्रकारे मारण्याचा निर्णय घेण्यात आला. ल्युसियाना आणि मिनेसोटा येथे पोलिस कारवाईत मारल्या गेलेल्या काळ्या माणसांच्या मृत्यूचा सूड घेण्याच्या हेतूने जाॅनसन नावाच्या या कृष्णवर्णियाने हे कृत्य योजनापूर्वक केल्याचा पोलिसांचा दावा आहे. ‘काळ्यांच्या जीवालाही मूल्य आहे’, या आशयाच्या घोषवाक्याला अनुसरून सध्या अमेरिकेत एक चळवळ सुरू असून तिचा अध्यक्ष ओबामा यांनीही पुरस्कार केलेला असला तरी त्यांनी पोलिसांची अशाप्रकारे हत्या करण्याच्या या प्रकाराचा निषेध केला असून त्याला मारण्याची पोलिसांची कारवाई उचित ठरविली आहे.
 या घटनेवरून सध्या अमेरिकेत उलटसुलट विचार व्यक्त होत असून नैतिक दृष्ट्या पोलिसांची ही कारवाई योग्य की अयोग्य यावर मते व्यक्त होत आहेत. अशाप्रकारे यंत्रमानवाचा उपयोग करून हल्लेखोराला ठार करण्याची ही पहिलीच घटना आहे.गुन्ह्याचा प्रतिबंध करण्यासाठी व निर्दोष व्यक्तींचे प्राण वाचविण्यासाठी यंत्रमानवाचा व रिमोटचा आधार घेण्याचा पायंडा या प्रकरणाचे निमित्ताने पडतो आहे.
 अशा गुन्हेगारांनी शरण यावे म्हणून त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे मन वळवायचे की त्यांना यंत्रमानवाचा उपयोग करून ठार मारायचे? कोणकोणत्या परिस्थितीत यंत्रमानवाचा वापर उचित ठरवायचा? विशेष परिस्थिती कशी, केव्हा व कुणी ठरवायची?
दुसरे उपाय योजले असते तर इतर अधिकाऱ्यांच्या जीवाला धोका पोचला असता, असे पोलिस प्रमुखांचे मत आहे. डलास शहराच्या महापौरांनी पोलिसांची कारवाई उचित ठरविली आहे. भविष्यातही असा प्रसंग गुदरला तर हाच उपाय योजावा, असे त्यांना वाटते आहे. पोलिसांचे जीव जपलेच पाहिजेत असे त्यांचे मत आहे.
यंत्रमानव, सैनिक व पोलिस - पोलिस आजवर यंत्रमानवाचा उपयोग संशयित बॅांब निकामी करण्यासाठी, ओलिसांना मुक्त करण्यासाठी व आग नियंत्रित करण्यासाठी वापरीत होते. इराकच्या युद्धात अमेरिकन सैन्यदलाने यंत्रमानवाचा उपयोग करून शत्रूची स्फोटक आयुधे निकामी केली होती. सैन्याची गरज भागल्यावर उरलेले यंत्रमानव त्यांनी पोलिसांकडे वर्ग केले आहेत. त्यामुळे सध्या पोलिसदलाजवळ निरनिराळ्या प्रकारचे यंत्रमानव उपलब्ध असतात.
यंत्रमानवाचा वापर - जमिनीवर चालणारे यंत्रमानव आम्ही शत्रूच्या सैनिकांना मारण्यासाठी कधीच वापरत नाही, असे संरक्षण विषयाच्या तज्ञांचे म्हणणे आहे. बाॅंबचा शोध घेऊन तो निकामी करण्यापुरताच आणि या प्रकारे जीवितहानी टाळण्यापुरताच आम्ही त्यांचा वापर करतो. रणांगणावरही टेहेळणी करण्यासाठीच त्यांचा वापर केला जात असतो, हल्ला करण्यासाठी नाही. मात्र आकाशात उडणाऱ्या यंत्रमानवांचे (उदाहरणार्थ ड्रोन) बाबतीत असे नसते. नुकतेच ड्रोन वापरून अमेरिकेने शेकडो सैनिक व मुलकी नागरिक यांना ठार केले आहे.
सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेले विविध प्रकारचे यंत्रमानव -  सर्व यंत्रमानवांची स्फोट घडवून आणण्याची क्षमता एकसारखी नसते. आकारही लहानमोठे असतात.पाळीव कुत्र्यांना चाळा म्हणून म्हणा  किंवा आणखी एखाद्या कारणास्तव म्हणा एक कृत्रिम हाड चघळायला देतात, असे ऐकले आहे. त्याचा आकार हाताच्या बोटाएवढा असतो, असे म्हणतात. या आकारापासून एखाद्या अजस्त्र ट्रक एवढ्या आकाराचे यंत्रमानव उपलब्ध आहेत. एखाद्या वाहनाला कॅमरा असलेली व उभय दिशेने ध्वनि वाहून नेणारी हातासारखी रचना असते. ती दृश्ये टिपते, तसेच उभय पक्षी/दिशांनी संदेश वहनाचेही काम करू शकते. एखादा लहानसा स्फोट घडवून समोरच्याला तात्पुरते बलहीन करणारा यंत्रमानवही असू शकतो. संशयित वस्तू स्फोट घडवून निकामी करणारी यंत्रणाही उपलब्ध आहे. डलास येथील  हल्लेखोरासाठी कोणती यंत्रणा वापरली याचा खुलासा पोलिस तशा अर्थाची विनंती केल्यावरही करीत नाहीत. बाॅंब उडवून हल्लेखोराला ठार करण्याचा निर्णय का घेतला असावा? सामान्य उपाय लक्षात येऊन तो सावध झाला असता आणि पोलिसदलातले आणखी काही अधिकारी हताहत झाले असते, असाही विचार पोलिसांनी केला असू शकतो.
 यंत्रमानव विरुद्ध मानव हा विषम संघर्ष - या विषयाच्या तज्ञांचे हे पक्के मत आहे की, डलास प्रकरणी आपण कोणता उपाय करीत आहोत, त्याचे परिणाम काय होतील, याची पोलिसांना नक्की कल्पना असलीच पाहिजे. यंत्रमानवाचा देशांतर्गत प्रयोग करण्याचे हे पहिलेच उदाहरण असले तरी इराकच्या युद्धात असा वापर सर्रास केला गेला होता, असे तेथील युद्धात सहभागी झालेले सैनिक सांगतात.
मुळात यंत्रमानवाची निर्मिती जीवितहानी वाचावी या हेतूने करण्यात आली आहे, असे तज्ञ सांगतात. डलासमधील निर्णयामुळे अन्य पोलिस अधिकारी किवा आजूबाजूला असलेल्या अन्य निर्दोष व्यक्ती यांचे जीव वाचले याचे समाधान असले तरी भविष्यात काय होईल, हे कुणी सांगावे? वाटाघाटी करून हल्लेखोराचे मन शरण येण्याचे केव्हा थांबवायचे व त्याला नि:प्रभ करण्यासाठी डलास प्रकरणी जसा निर्णय घेतला तसा निर्णय केव्हा घ्यायचा? ही लक्ष्मणरेषा कशी आखायची याबाबतची चर्चा अमेरिकेत अनेक दिवस होत राहील, असे दिसते.
खाजगी अनुदानित शाळात नियुक्तीसाठी होणाऱ्या मुलाखती बंद होणार?
वसंत गणेश काणे
  खाजगी अनुदानित प्राथमिक,माध्यमिक व कनिष्ठमहाविद्यालयात शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांच्या नियुक्त्या करण्याबाबतची अधिसूचना २ जुलै २०१६ रोजी प्रसारित करण्यात आली असून याबाबतच्या हरकती/सूचना १७ जुलै २०१६ नंतर शासन विचारात घेणार आहे. यथावकाश व कायद्यातील तरतुदींचे अनसरण करून याबाबतची दुरुस्ती १५ जुलै१९८१ च्या सेवाअटीत समाविष्ट करण्यात येईल. अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती करतांना शासन किंवा शासनमान्य यंत्रणेद्वारे घेतलेल्या योग्यता/पात्रता चाचणीत(टीचर्स एलिजिब्लिटी टेस्ट) उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवार अभियोग्यता चाचणी (ॲप्टिट्यूड टेस्ट)देऊ शकेल. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचीच नियुक्ती खाजगी अनुदानित शाळेत करता येईल. अभियोग्यता चाचणीत मिळालेल्या गुणांमध्ये सुधारणा करण्यासाठी उमेदवार पाचवेळा ही चाचणी देऊ शकेल. पात्रता व अभियोग्यता ठरविण्यासाठी शासन वेळोवेळी पाठ्यक्रम निश्चित करील.
सुरवातीला शाळा व्यवस्थापन सर्वाधिक खप असलेल्या वृत्तपत्रात बिंदू नामावलीचा विचार करून रिक्त पदांसाठी जाहिरात देईल. तसेच रिक्त पदांची माहिती जिल्हा समायोजन कार्यालय व समाज कल्याण
कार्यालयालाही देईल. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर  निदान पंधरा दिवसांचा अवधी असेल. या काळात आॅन लाईन किंवा लेखी अरज करता येतील. यानंतर शाळा समिती पाच दिवसात गुणवत्ता यादी प्रसिद्ध करील व त्यानुसार उमेदवारांची गुणवत्तेच्या आधारे निवड करील. असे या नवीन पद्धतीचे सर्वसाधारण स्वरूप दिसते. सविस्तर माहितीसाठी ही अधिसूचना शासनाच्या वेबसाईटवर पाहता येईल.
   या बदलामुळे मुलाखती घेणे बंद होईल, शाळा समितीचे काम पात्रता परीक्षा व अभियोग्यता परीक्षा यातील गुणांची बेरीज करून गुणवत्ता यादी तयार करून त्यानुसार नेमणुका करण्यापुरतेच सीमित राहील, असे दिसते. मुलाखती बंद केल्यामुळे त्या निमित्ताने व त्यावेळी होणाऱ्या  वशिलेबाजीला व व्यक्तीचे व्यक्तित्त्व पाहून नेमणूक करण्याला, नेमणुकीचे वेळी पैसे मागण्याच्या वृत्तीला आळा बसेल आणि किमान गुणवत्तेशिवाय नियुक्ती करता येणार नाही, हेही साध्य होईल, अशी अपेक्षा आहे. उमेदवार रुजू व्हायला येईल, तेव्हाच तो मुख्याध्यापकाला व फक्त मुख्याध्यापकालाच दिसेल, तो शाळा समितीसमोर आताप्रमाणे उभा होणारच नाही, असे सध्यातरी दिसते आहे. याबाबत सर्व संबंधितांच्या सूचना व हरकती विचारात घेऊन शासन सेवाअटींमध्ये बदल करून ते सभागृहासमोर मान्यतेसाठी ठेवील
चूक, निष्काळजीपणा की हेतुपुरस्सर कृती ?
वसंत गणेश काणे
  हिलरी क्लिंटन यांनी सेक्रेटरी आॅफ स्टेट या पदावर असतांना शासकीय कामांशी संबंधित माहिती हाताळतांना शासकीय ईमेलऐवजी खाजगी ईमेल वापरून पराकोटीचा निष्काळजीपणा( ग्राॅस केअरलेसनेस) दाखविला आहे, असा ठपका याबाबत चौकशी करणाऱ्या एफबीआय चे प्रमुख जेम्स काॅमी यांनी ठेवला असला तरी त्यांच्यावर गुन्हेगारीचा आरोप मात्र ठेवलेला नाही. पण शिरस्त्याप्रमाणे ही माहिती जस्टीस डिपार्टमेंटकडे न सोपवता त्यांनी सरळ टेलिव्हिजनवर उघड करावी, हा प्रकार असाधारण स्वरूपाचा मानला जातो आहे.
 हिलरी क्लिंटन यांच्यावर आता फौजदारी खटला भरला जाण्याची शक्यता उरली नाही. कारण अटर्नी जनरल लाॅरेटा लिंच यांनी अगोदरच जाहीर केले आहे की त्या एफबीआयच्या शिफारसी जशाच्या तशा स्वीकारणार आहेत. दहा हजारावर ईमेल्स तपासून पाहिल्यानंतरही हिलरी यांचा नियमभंग करण्याचा हेतू होता, असा कोणताही पुरावा हाती आलेला नसला तरी महत्त्वाची शासकीय गोपनीय माहिती हाताळतांना त्यांनी पराकोटीचा निष्काळजीपणा दाखविला आहे, हे नमूद करून हिलरी यांची स्पष्टीकरणे काॅमी यांनी खोडून काढली आहेत. हिलरी यांचे म्हणणे असे होते की, खाजगी ईमेलने त्यांनी पाठविलेली कोणतीही माहिती किंवा खाजगी ईमेलवर त्यांना मिळालेली कोणतीही माहिती ‘त्यावेळी’ गोपनीय नव्हती.  पण मिळालेल्या किंवा पाठविलेल्या निदान ११३ ईमेल्स ह्या ‘त्यावेळी’ गोपनीय स्वरूपाच्याच होत्या असे एफबीआयचे म्हणणे आहे.
  शासकीय कामाशी संबंधित असलेल्या अनेक ईमेल्स आमच्या स्वाधीन केलेल्या ३०,००० ईमेल्स नव्हत्या. यातील माहिती देशविरोधी तत्त्वांना उपलब्ध झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी टिप्पणीही काॅमी यांनी केली आहे. अशी परखड टीका केल्यानंतर काॅमी म्हणतात की, सारासार विचार करणारा कुणीही फिर्यादी पक्ष ह्या माहितीच्या आधारे खटला दाखल करणार नाही. जुने दाखलेही असेच आहेत. क्लिंटन यांची जबानी घेऊन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी काॅमी यांचे हे प्रकटन आले आहे.
  हिलरींच्या वतीने या निर्णयाला मान्यता दिलेली असली तरी ‘ खाजगी ईमेलचा शासकीय कामासाठी वापर ही केवळ  ‘एक चूक’ होती या आपल्या पूर्वीच्या भूमिकेचाच त्यांनी पुनरुच्चार केला आहे.
   रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे गृहीत उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांनी हिलरी या कशा कपटी, कारस्थानी आहेत, हे उघड झाले आहे, असे म्हणून तोफ डागली आहे. रिपब्लिकन पक्षाचे असलेले हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हचे सभापती (स्पीकर) पाॅल राॅयन यांनी एफबीआयच्या खटला न भरण्याच्या निर्णयावर नापसंती दाखवत म्हटले आहे की, कायद्यासमोर सर्व समान असले पाहिजेत. हिलरींवर खटला न भरण्याचा निर्णय काॅमी यांनी उघड केलेल्या माहितीशी विसंगत आहे.
  या सर्व हकीकतीवरून एक बाब मात्र नक्की झाली आहे की, हे प्रकरण हिलरींची पाठ शेवटपर्यंत सोडणार नाही. त्यांना शेवटपर्यंत बचावात्मक भूमिकाच घ्यावी लागेल. त्यांची विश्वसनीयता आणि निर्णयक्षमता याबाबत सामान्य मतदार कोणती भूमिका घेतात, हे शेवटी निकाल लागेल तेव्हाच कळेल.
ट्रंप म्हणजे इटालीच्या पंतप्रधानाची अमेरिकन आवृत्ती?
वसंत गणेश काणे
    डोनाल्ड ट्रंप यांना अध्यक्ष म्हणून निवडण्यापूर्वी आमचे अनुभव लक्षात घ्या, असे इशारा इटालीमधील राजकीय समीक्षक जियान फ्रॅंको गॅलो; जनमत चाचणी प्रमुख मारिया रोझी; व्यवसायाने पत्रकार असलेला त्याचा अमेरिकन चरित्र लेखक फ्रीडमन; प्रमुख व आघाडीचे  दैनिक इल फतो कोडियानो व एकेकाळची त्याची चाहती असलेली एक सामान्य नागरिक बारबारा काॅंटी यांनी केले आहे.
  इटालीतील माध्यम सम्राट, कोट्यधीश, स्त्रीलंपट व स्थलांतर करू इच्छिणाऱ्यांचा प्रखर विरोधक असे चरित्र, वृत्ती व स्वभावगत साम्य असलेले इटालीचे सतत चारवेळा म्हणजे १९९४ ते २०११ या कालखंडात पंतप्रधान राहिलेले सिल्व्हिओ बर्लूस्कोनी व अमेरिकेतील अध्यक्षपदाचे गृहीत उमेदवार (प्रिझंप्टिव्ह कॅनडिडेट) डोनाल्ड ट्रंप यातील साम्यांचे मुद्दे आहेत. कपाळाने डोक्यावर केलेले आक्रमण लपवण्यासाठी ट्रंप केसांच्या झुपक्यांना खुबीदारपणे वळवतात तर इटालीचा माजी पंतप्रधान सिल्व्हिओ बर्लूस्कोनी दोनदा केशरोपण करून घेतो, एवढाच कायतो फरक आहे.
आज जेव्हा अमेरिकन मतदार आमचे अनुकरण करून ट्रंप यांना अमेरिकेच्या अध्यक्षपदी बसवतात की काय, अशी शंका येते तेव्हा कृपा करून आमच्या पावलावर पाऊल ठेवून जाऊ नका, असे कळकळीचे आवाहन केल्यावाचून राहवत नाही, असे वर उल्लेखलेली सर्व मंडळी करतांना आढळतात.
याला कारणही तसेच आहे. आपल्या इटालीच्या पंतप्रधानपदाच्या प्रदीर्घ कार्यकाळात (१९९४ ते २०११) सिल्व्हिओ बर्लूस्कोनी यांने इटालीला आर्थिक दिवाळखोरी,  पराकोटीचा राजकीय भ्रष्टाचार, लैंगिक लफडी, कज्जेदलाली आणि करचुकवेगिरी ते लालचलुचपतखोरी याशिवाय दुसरे काहीही दिले नाही. नकतीच त्याच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली असून २०१९ पर्यंत कोणतेही पद स्वीकारण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे.
  जनमत चाचणी प्रमुख मारिया रोझी म्हणते की, आज दर सात मतदारांपैकी फारतर एक मतदार सिल्व्हिओ बर्लूस्कोनीला मत देईल.
  व्यवसायाने पत्रकार असलेला त्याचा अमेरिकन चरित्र लेखक फ्रीडमन म्हणतो की, मुसोलिनीनंतर शंभर वर्षांनी तितकाच प्रभावशाली नेता इटालीच्या नशिबी आला होता. त्याच्या कारकिर्दीत इटालीला काहीच मिळाले नाही, असे नाही पण लफडीच लक्षात रहावीत, अशी अवस्था आहे.
  आपल्या लैंगिक लफड्यांचा उल्लेख करण्यासाठी ‘बुंगा बुंगा’ हा शब्दप्रयोग त्याने स्वत:च तयार करून योजला होता. आज इटालीत हा एक चेष्टेचा शब्द / विषय झाला आहे. विज्ञापन तंत्र व बाजारपेठ काबीज करण्याचे/ जिंकण्याचे तंत्र ( स्लफ मार्केटिंग टेक्निक) क्वचितच कुणी त्याचा हात धरू शकेल.
 इटालीतील महिलांना डोनाल्ड ट्रंप यांचीही भुरळ पडतांना दिसते आहे, असे मत  नोंदवून सिल्व्हिओ बर्लूस्कोनीची एकेकाळी चाहती असलेली बारबारा काॅंटी ही महिला म्हणते की, त्याचे खरे स्वरूप कळताच आम्ही त्याच्यापासून शंभर योजने दूर गेलो.
मतदानाची टक्केवारी कशी वाढेल? अमेरिकन विचारवंतांना काळजी
वसंत गणेश काणे
   ॲंथनी माॅर्गन हे जगविख्यात पेन्स विद्यापीठातील राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक आहेत. त्यांनी लिहिलेल्या लेखाचे शीर्षक आहे,’ तुमच्या मताने नक्की बदल घडेल’. मला जे जे भेटतात, त्या प्रत्येकाच्या कानीकपाळी मी ओरडत असतो. 'बाबांनो, ८ नोव्हेंबरला मतदानाला जा. माझ्या एकट्याच्या मताने काय होणार, असा विचार करू नका’. कारण असा विचार करीत अनेक मतदार घरी बसतात. (ठोकळमानाने २००० साली ५४ टक्के, २००४ साली ६० टक्के, २००८ साली ६२ टक्के, २०१२ साली ५८ टक्के, मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला होता). मतदानाच्या दिवशी घरी बसणाऱ्या बहुसंख्य मतदारांना आपल्या मतदान न करता घरी बसण्याने काय होते/होईल, हे बहुदा कळतच नाही/ नसावे, अशी शंका लेखकाने व्यक्त केली आहे. 'अल्पसंख्यांकांच्या मनात हा विचार यावा, हे तर मुळीच योग्य नाही'.
   मी स्वत: आफ्रिकन - अमेरिकन आहे, हे नोंदवून लेखक म्हणतो, ‘ बेट (ब्लॅक एंटरटेनमेंट टेलिव्हिजन) ॲवाॅर्ड्स विजेता जेसी विल्यम्सने आपल्या आपल्या भाषणात हा मुद्दा अतिशय पोटतिडकीने मांडला आहे. अमेरिकेतील ५० टक्के गरीब मतदानाला जात नाहीत. यापैकी २६ टक्के कृष्णवर्णी तर २४ टक्के स्पॅनिश असतात. मतदान न करून ते स्वत:चे फार मोठे नुकसान करीत असतात. अमेरिकेत गृहयुद्ध झाले आणि परिणामत: आफ्रिकन लोकांच्या गुलामीच्या बेड्या निखळून पडल्या खऱ्या पण प्रत्यक्षात अनेक आफ्रिकन- अमेरिकनांना स्वातंत्र्याची फळे चाखताच आली नाहीत. अनेकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या नाहीत तर इतर अनेकांना घटनेनुसार मिळायला हवेत, ते कायदेशीर अधिकार मिळाले नाहीत.
१९६५ साली तत्कालीन अध्यक्ष लिंडन जाॅनसन मतदानाच्या अधिकाराचा कायद्यावर स्वाक्षरी केली व राज्य आणि स्थानिक पातळींवर आफ्रिकन- अमेरिकनांच्या घटनात्मक अधिकारांची हमी मिळावी म्हणून १५ वी घटना दुरुस्ती पारित केली व परिणामत: त्यानंतर आफ्रिकन- अमेरिकनांना अधिक मुक्त वाटू लागले खरे पण तरीही अन्याय थांबले नाहीत, तसेच पीडितांना न्यायोचित भरपाई आजही मिळत नाही, हे वास्तव आहे.
आफ्रिकन- अमेरिकनांना मतदानाचा अधिकार मिवण्यासाठी रक्त सांडावे लागले, घाम गाळावा लागला आणि अश्रूपात तर विचारायलाच नको. केवळ कायदा करून दलितांवरचे अन्याय दूर होत नाहीत, हे कटूसत्य अमेरिकेतही अनुभवाला आलेले पाहून कायद्यासोबत मानसिकताही बदलण्याची आवश्कता पुन्हा एकदा पटली.
 मतदान का केले पाहिजे, यासाठी केवळ हा एकच दाखला पुरेसा आहे, असे लेखकाने आग्रहाने प्रतिपादन करीत आपल्या हजारो पूर्वजांनी यासाठी केलेल्या बलिदानाची आठवण करून दिली आहे.
 या निमित्ताने लेखकाने फ्रेडरिक डगलस या अमेरिकन विचारवंताचा एका सुप्रसिद्ध वचनाचा दाखला दिला आहे. ‘मागणी नसेल तर कोणतेही सत्ताकेंद्र तुमचे अधिकार देणार नाही’, हा त्याचा सल्ला अमेरिकेपुरता मर्यादित नाही, हेही जाणवते. ‘घोषणा करून किंवा रक्तपात घडवून नव्हे तर शिक्षित होऊन वंशश्रेष्ठतेचा दावा फोल ठरवता येईल. स्वत: शिका, बांधवांना शिकण्यास प्रेरित करा, कसेच पुढे जाणाऱ्याचे पाय ओढून त्याला खाली खेचण्याच्या खेकड्याच्या वृत्तीचा त्याग करा. मतदानाचा अधिकार बजावा, यासारखे सोपे व हमखास फळ देणारे दुसरे शस्त्र नाही. बदल हमखास घडून येतील’. रिपब्लिकन उमेदवार ट्रंप यांचा नामोल्लेखही न करता त्यांना वेसण घालण्याचा हा सुसंस्कृत प्रयत्न जगात विरळाच म्हणावा लागेल.
अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वेगळेपण(२)
वसंत गणेश काणे
   असे होणार मतदान - अगोदर थोडी पार्श्वभूमी लक्षात घेऊ या. अमेरिकन संसदेची दोन सभागृहे आहेत. एक हाऊस (हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज ) व दुसरे सिनेट.
हाऊसमध्ये प्रत्येक राज्याला त्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्त्व असते. जसे कॅलिफोर्निया हे सर्वात मोठे राज्य आहे. त्याला हाऊसमध्ये ५३ प्रतिनिधी असतात. पण राज्य कितीही लहान असले तरी त्याला किमान एक तरी प्रतिनिधी हाऊसमध्ये मिळतोच. १९११ सालची लोकसंख्या गृहीत धरून केलेल्या हिशोबानुसार प्रत्येक राज्याची हाऊसमधील प्रतिनिधींची संख्या ठरवण्यात आली असून सध्या हाऊसची सदस्य संख्या ४३५ इतकी आहे.
सिनेटमध्ये प्रत्येक राज्याला दोन सिनेटर्स मिळतात. मग ते राज्य लहान असो वा मोठे. अमेरिकेत आजमितीला ५० राज्ये आहेत. त्यामुळे ५० ला दोनने गुणून येणारी संख्या १०० ही सिनेट मधील सिनेटर्सची संख्या असते. अशाप्रकारे जोपर्यंत राज्यांची संख्या ५० आहे तोपर्यंत सिनेटर्सची संख्या १०० व राज्याच्या लोकसंख्येचा विचार करण्यासाठी  १९११ सालची त्या त्या राज्याची संख्या हिशोबात घ्यायची हा निकष जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत हाऊसमधील प्रतिनिधींची (रिप्रेझेंटेटिव्हज) संख्या ४३५ कायम राहील.
  इलेक्टोरल काॅलेज - यात एकूण ५३८ सदस्य असतात. प्रत्येक राज्याच्या वाट्याला किती इलेक्टर्स असतील? त्या राज्याची प्रतिनिधींची (रिप्रेझेंटेटिव्हज) संख्या अधीक सिनेटर्सची संख्या असा तो नियम आहे. या नियमानुसार कॅलिफोर्नियाच्या वाट्याला ५३+२ =५५ इलेक्टर्स येतील तर लहानातलहान राज्याच्या वाट्याला १+२=३ इलेक्टर्स येतील. या न्याने ४३५+१००=५३५ ही संख्या येत असतांना इलेक्टर्स ५३८ कसे?विशेष कारणास्तव नेब्रास्का व मेन या दोन राज्यांना हे जास्तीचे इलेक्टर्स मिळतात. अशा प्रकारे ज्या उमेदवाराला २७० मते(इलेक्टर्स) मिळतील तो उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून येतो.
   पक्ष इलेक्टर्ससाठी उमेदवार कसे निवडतात? - प्रत्येक राज्याची इलेक्टर्ससाठी उमेदवार  निवडण्याची पद्धत वेगळी असते. यांचे नामनिर्देशन पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनात करतात. पक्षाचे अनुभवी व एकनिष्ठ कार्यकर्ते, पक्षाचे राज्य पदाधिकारी, अध्यक्षीय उमेदवार वा पक्षाशी जवळीक असलेल्या व्यक्ती यातून राज्यनिहाय इलेक्टर्स निवडले जातात. जसे कॅलिफोर्नयातून ५५ उमेदवारांची यादी प्रत्येक पक्ष तयार करील. अध्यक्षीय उमेदवारांच्या नावाखाली यांचा नावे असतात किंवा नसतात.
  विनर टेक्स आॅल- २०१२ मध्ये कॅलिफोर्नियात सामान्य मतदारांनी मतदान केले तेव्हा ओबामा व राॅम्नी याना अनुक्रमे ५१ व ४९ टक्के मते मिळाली. म्हणजे ओबामा यांना या राज्यात आघाडी मिळाली. म्हणून डेमोक्रॅट पक्षाचे सर्वच्यासर्व म्हणजे ५५ उमेदवार इलेक्टर्स म्हणून निवडून आले असे मानतात.मतांच्या टक्केवारीनुसार इलेक्टर्सची वाटणी होत नाही. या नियमाला ‘विनर टेक्स आॅल’ असे म्हणून संबोधतात.या नियमानुसार प्रत्येक राज्य त्या राज्याच्या वाट्याच्या सर्व इलेक्टर्ससह या किंवा त्या उमेदवाराकडे जाते. कॅलिफोर्नियाप्रमाणे फ्लोरिडा (२७+२=२९), न्यूयाॅर्क(२७+२=२९), टेक्सास(३६+२=३८) ही सुद्धा मोठी राज्ये आहेत. ही सुद्धा कुणतरी एकाकडे (क्लिंटन किंवा ट्रंप) जातील. अशाप्रकारे ज्याच्याकडे २७० इलेक्टर्स जातील तो निवडून येईल. कारण २७० इलेक्टर्सची २७० मते त्या उमेदवाराला मिळणार, हे उघड आहे. पण कुणालाच २७० इलेक्टर्स म्हणजेच त्यांची २७० मते मिळाली नाहीत तर काय होईल? हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हजच्या ४३५ प्रतिनिधींची तातडीची बैठक होईल व ते अध्यक्ष निवडतील. तसेच सिनेटचे सदस्य उपाध्यक्ष निवडतील. अध्यक्षीय निवडणुकीत सामान्य मतदारही मतदान करीत असतात. यांच्या मतांला पाॅप्युलर व्होट असे म्हणतात. समजा, एका उमेदवाराला ५० टक्यापेक्षा जास्त पाॅप्युलर व्होट्स मिळाली. पण दुसऱ्या उमेदवाराला इलेक्टोरल व्होट्स ५० टक्यापेक्षा जास्त मिळाली, तर कोण निवडून येईल? इलेक्टोरल व्होट्स ज्याला जास्त आहेत, तो. सामान्यत: ज्याला जास्त इलेक्टोरल व्होट्स मिळतात, त्यालाच पाॅप्युलर व्होट्सही जास्तच मिळतात, पण आजवर चारदा अपवाद घडला आहे.  १८२४, १८७६, १८८८ व अलीकडचे उदाहरण म्हणजे २००० अशी ही अपवादात्मक वर्षे आहेत. २००० साली डेमोक्रॅट पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार अल गोर यांना ४८.३८ टक्के पाॅप्युलर व्होट्स मिळाली तर त्यांचे रिपब्लिकन प्रतिस्पर्धी जाॅर्ज बुश यांना ४७.८७ टक्केच मते मिळाली. म्हणजे पाॅप्युलर व्होट्समध्ये अल गोर आघाडीवर होते. पण जाॅर्ज बुश यांना २७१ इलेक्टोरल व्होट्स मिळाली होती तर अल गोर २६६ च इलेक्टोरल व्होट्स मिळाली होती. त्यामुळे जाॅर्ज बुश यांना इलेक्टोरल व्होट्समधील आघाडीमुळे विजयी घोषित करण्यात आले.
  एक काल्पनिक उदाहरण घेऊ. - समजा ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये कुणालाच २७० इलेक्टोरल व्होट्सचा जादुई आकडा गाठता नाही, तर काय? म्हणजेच कुणालाच ५० टक्क्यापेक्षा जास्त इलेक्टोरल व्होट्स  मिळाली नाहीत तर काय? अशा परिस्थितीत हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हचे ४३५ सदस्य अध्यक्षाची निवड करतील. ८ नोव्हेंबर २०१६ लाच हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज ची निवडणूक होते आहे. हे सदस्य अध्यक्षाची व सिनेट उपाध्यक्षाची निवड करील.  ही परिस्थिती उद्भवली तर तो द्विपक्षीय राजकारणाच्या शेवटाचा आरंभ मानला जाईल.
अमेरिकेच्या २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीचे वेगळेपण(१)
वसंत गणेश काणे
         वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राला आपल्या सव्वीस वर्षांच्या अविरत प्रयत्नांनी जागतिक कीर्ती मिळवून देणारा  बेंजामिन ब्रॅडली हा वयाच्या ९३ व्या वर्षी २१ ऑक्टोबर २०१४ ला निधन पावला. पण या थोर पत्रकाराचे वैशिट्य असे की त्याच्या पश्चात हे वृत्तपत्र त्याच जिद्दीने व त्याच प्रथा व परंपरा राखत प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत आहे. बेंजामिन ब्रॅडलीचा उत्तराधिकारी म्हणतो, तसा १९९१ मध्ये निवृत्त झाला असला तरी आजही तो आमच्या सोबत न्यूज रूम मध्ये आमची सोबत करीत आहे, असे आम्हाला सतत जाणवत असते, आता अगदी परलोकवासी झाला असला तरी.
    वाॅशिंगटन पोसटने २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीविषयी अत्यंत शास्त्रशद्ध पद्धतीने जनमत चाचणी आयोजित केली असून  सप्टेंबर २०१५, डिसेंबर २०१५, मार्च २०१६ व जून २०१६ असा दर चार महिन्यात जनमताने घेतलेले हेलकावे  स्पष्ट करणारा अहवाल खरेतर मुळातूनच वाचावयास हवा.
या सर्वेक्षणअहवालाचा निष्कर्ष एका वाक्यात सांगायचा तर तो असा आहे की, हिलरी क्लिंटन जून अखेरीस बारा टक्क्यांनी पुढे ( ५१-३९=१२) आहेत. सप्टेंबर २०१५ मध्ये असलेली क्लिंटन यांची केवळ ३ टक्यांची आघाडी डिसेंबर २०१५ मध्ये ६ टक्यावर गेली. मार्च २०१६ मध्ये ती आणखी वाढून ९ टक्यांपर्यंत पोचली मात्र मे२०१६  मध्ये क्लिंटन  २ टक्यांनी मागे पडल्या पण लगेच जून २०१६ मध्ये हा फरक त्यांनी भरून काढला व चक्क १२ टक्यांची आघाडी घेतली. मार्च ते मे या काळात क्लिंटन यांची लोकप्रियता एकदम का घसरली ( नोज डाईव्ह) व जून संपतो ना संपतो तोच तिने पुन्हा मुसंडी मारून १२ टक्यांची बढत का घेतली.?    
     ट्रंप का माघारले?-  याला ट्रंप स्वत:च यासाठी जबाबदार आहेत. ट्रंप यांची बेताल व भडकावू वक्तव्ये  रिपब्लिकन मतदारांनाही आवडली नाहीत. जज्ज मेक्सिकन असल्यामुळे मेक्सिकन लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांबाबत पक्षपती राहू शकेल, ह्या ट्रंप यांच्या वक्तव्यावर तर समीक्षकांनी टीकेची झोड उठवली होती. महिलांबाबतची अनुदार वक्तव्ये, मित्र राष्ट्रे जपान व दक्षिण कोरिया यांनी आपली आपण संरक्षण सज्जता उभी करावी किंवा त्यांच्या संरक्षणासाठी येणारा खर्च द्यावा ही त्यांची मागणी, लोकप्रियता कमी करणारी ठरली. ही दोन्ही राष्ट्रे त्यांच्या संरक्षणासाठीचा खर्च  वर्षानुवर्षे उचलत आहेत, याचा ट्रंप यांना पत्ताही नाही, याबाबतचे त्यांचे अज्ञान त्याच्या अध्यक्षपदाबाबतच्या सक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले. एक व्यावसायिक म्हणूनही त्यांती कीर्ती चांगली नाही, याची उदारणे जगजाहीर झाली. ह्या बाबींमुळे त्यांनी स्वत:च आपले नुकसान करून घेतले आहे. राजकारणात काय बोलावे, यापेक्षाही काय बोलू नये, हे महत्त्वाचे असते, हे या बड्या बिल्डरला कळलेच नसावे. यामुळे नोव्हेंबरची अध्यक्षपदाची निवडणूक ट्रंप यांच्याबाबतचा जनमताचा कौल दाखवणारीच ठरण्याची शक्यता वाढली आहे. दर तीन पैकी दोन मतदारांनी ट्रंप अध्यक्षपदासाठी अपात्र आहेत, असे मत नोंदवले आहे.
     हिलरींबद्दलही नाराजी - पण इकडे हिलरी क्लिंटन यांनीही सेक्रेटरीपदावर असतांना खाजगी ईमेल व शासकीय कामासाठीची इमेल यात केलेली गल्लत व सरमिसळ मतदारांनी अयोग्य ठरविली आहे. पन्नास टक्के अमेरिकनांना हे दोन्ही उमेदवार अध्यक्षपदाला न्याय देऊ शकतील, असे वाटत नाही. अशा परिस्थतीत एखादा तिसरा पर्याय मिळाला तर तर तो निवडून येईल किंवा नाही, हे सांगता येणार नाही, पण ही द्विपक्षीय राजकीय पद्धतीच्या शेवटाची सुरवात ठरू शकेल, असा विचार, हा नि:कर्ष समोर आल्यावर अनेकांच्या मनात येतो आहे. अनेकांच्या मनात क्लिंटन यांच्याविषयी इतका रोष आहे की, ट्रंप  यांच्याबद्दल चांगले मत नसून सुद्धा केवळ बदल हवा म्हणून ट्रंप यांना मत द्यावे असे त्यांना वाटते आहे. अर्थात असा असंतोष केवळ हिलरींमुळेच आहे असे नाही. त्याला गेल्या आठ वर्षातील डेमोक्रॅट पक्षाची राजवटही कारणीभूत आहे.  असे असले तरी मे महिन्यात दोन टक्के मतांनी ट्रंप यांनी मिळविलेली आघाडी भरून काढत क्लिंटन यांनी ट्रंप यांना १२ टक्याच्या फरकाने मागे टाकले आहे. पण याचे श्रेय क्लिंटन यांना द्यायचे की  ट्रंप यांना  या अपश्रेयाचे धनी मानायचे?
   इतर पक्षांकडील कल वाढीला लागला - लिबर्टेरियन पार्टीच्या गॅरी जाॅनसन यांना ७(सात) टक्के मतदार पाठिंबा देत आहेत तर ग्रीन पार्टीच्या श्रीमती जिल स्टीन यांना ३ (तीन) टक्के मते मिळाली आहेत. या दोन उमेदवारांनी १० टक्के मते घेतली आहेत. याचा अर्थ असा की हा ट्रंप व क्लिंटन यांच्या मतांमध्ये  पडलेला फरक वा दिसणारी बढत ९० चे दोन भाग होऊन पडलेली आहे. २०१२ च्या अध्यक्षीय निवडणुकीत इतर सर्व उमेदवारांना मिळालेली मते जेमतेम २(दोन) टक्के होती. २०१६ मध्ये हे दोनच उमेदवार एकूण १० टक्के मते घेतांना आजच दिसत आहेत. यात आणखी वाढ झाली तर काय? ही बाब या दोन्ही पक्षांना विचार करावयास लावणारी आहे.
डोनाल्ड ट्रंप यांचा वाढदिवस  भारतात साजरा होतो तेव्हा
वसंत गणेश काणे
अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे  गृहीत उमेदवार (प्रिझंप्टिव्ह कॅंडिडेट) डोनाल्ड ट्रंप यांचा (बहुदा) सत्तरावा वाढ दिवस दिल्लीत हिंदू सेनेने साजरा केला. त्यावेळी समारंभपूर्वक केक कापून तो ट्रंप यांच्या फोटोला भरवण्यात आला. हे वृत्त येथे अमेरिकेत व्हायरल झाले आहे. कार्यक्रमाची दृक्श्राव्य फीत दाखवीत येथील प्रसार माध्यमांनी केलेली टिप्पणी ऐकून व पाहून इथे हास्याची कारंजी उडत असून शेवटी टाळ्यांचा कडकडाटही होतो आहे.  त्यावर आपण काही टिप्पणी न केलेलीच बरी.
या समारंभात एकाने ट्रंप यांना ‘अमेरिकेचा राजा’ म्हणून निवडून येण्याअगोदरच संबोधले असून ते निवडून येताच मुस्लिम अतिरेक्यांचा खातमा करतील, असा विश्वास व्यक्त करून त्याबाबत वाटणारे समाधान जाहीर केले आहे. अमेरिकेतील अनेक कामे ‘आऊट सोर्सिंग’ करून बाहेरून करून घेतली जातात. या निमित्ताने मात्र उलटा प्रकार घडून येतो आहे. भारतातील हिंदू सेना अतिरेक्यांचा बंदोबस्त करण्याच्या कामाचे ‘आऊट सोर्सिंग’ करतांना दिसत आहे, अशी टिप्पणी वार्तेत शेवटी केली आहे. हे पाहून व ऐकून आपण हसावे की रडावे, हे ज्याचे त्यानेच ठरवावे, हे बरे.
ट्रंप - अमेरिकेच्या घटनेच्या सामर्थ्याची कसोटी
वसंत गणेश काणे
     गॅब्रियल शीनफिल्ड हे हडसन इंस्टिट्यूटमध्ये सिनीअर फेलो असून राजकीयक्षेत्रातील चळवळींचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. आजवर अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांच्या संदर्भात कोणते वादग्रस्त प्रसंग निर्माण झाले व प्रत्येक प्रसंगी अमेरिकन राज्यघटनेने अमेरिकन नागरिकांचे घटनादत्त स्वातंत्र्य कसे अबाधित ठेवले या विषयावर लिहिलेल्या लेखात त्यानी तीन अध्यक्षांचे बाबतीत घडलेल्या पेचप्रसंगांचे दाखले दिले आहेत. निक्सन, जाॅर्ज बुश व ओबामा यांचे बाबतीत घडलेल्या पेचप्रसंगांचे उदाहरण त्यांनी दिले आहे. या लेखाला तसे पाहिले तर एक इतिहास म्हणूनच महत्त्व उरलेले आहे, असे अनेकांना वाटू शकेल व ते काही अंशी बरोबरही ठरेल पण लेखाचा शेवट करतांना त्यांनी रिपब्लिकन उमेदवार  ट्रंप निवडून आले तर काय होईल यासंबंधीची शक्यता वर्तवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या लेखाला वर्तमानाचा संदर्भ प्राप्त झाला असून त्याचे वाचनमूल्य एकदम वाढले आहे. (हा लेख मूळ लेखाचा शब्दश: व फक्त अनुवाद एवढाच नाही. त्यात पूरक मुद्देही आहेत)
   लेखाच्या सुरवातीला ते म्हणतात की, आताआता जनमत चाचणीचे निष्कर्ष हाती येत आहेत, त्यानुसार हिलरी क्लिंटन यांनी ट्रंप याना मागे टाकले असून हा एक शुभसंकेत आहे. पण निवडणुकीला (८ नोव्हेंबर) अजून बराच अवकाश आहे. मध्येच काही अघटित घडले आणि ट्रंप निवडून आले तर काय व काय काय होईल? होऊ शकेल?
   हिंसाचाराला प्रोत्साहन देणारा, अनेक घटनाविरोधी धोरणांचा अंगिकार करीन असे प्रस्ताव जनतेसमोर मांडणारा व धरसोड वृत्तीचा/लहरी स्वभावाचा हा नेता व्हाईट हाऊसचे सत्तासोपान चढण्यात खरेच यशस्वी झाला तर आपली राजकीय- घटनादत्त रचना टिकून राहील का? की ती उलथून पडेल?
   ही राज्यघटना गेली अडीचशे वर्षे नागरिकांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करीत आलेली आहे. याचे कारण असे की शासनाची तीन अंगे विधीपालिका/ कायदेमंडळ, कार्यपालिका/प्रशासन व्यवस्था व न्यायपालिका यात परस्पर नियंत्रणाची तरतूद (चेक्स ॲंड काउंटरचेक्स) या घटनेत आहे. त्यामुळे या तीन शाखात आजवर समतोल साधला गेला.
  राज्यघटनेच्या या क्षमतेची सर्वात मोठी चाचणी  १९७४ साली रिपब्लिकन पक्षाचे नेते रिचर्ड निक्सन यांचे कारकिर्दीत झाली. वाॅटरगेट हे डेमोक्रॅट या विरोधी पक्षाचे कार्यालय. यातील संवाद/चर्चा कळाव्यात म्हणून रेकाॅर्डिंग करणारी छुपी यंत्रणा या कार्यालयात निक्सन यांच्या संमतीने/सूचनेवरून बसवण्यात आली होती, हे उघडकीला  आले. स्पेशल प्राॅसिक्युटर लिआॅन जवोर्स्की यांनी निक्सन यांच्यावर कोर्टासमोर हजर राहण्याचा आदेश (सबपिना) बजावला. व त्यांच्यावर बेकायदेशीर घरफोडी (ब्रेक इन) व नंतर सारवासारवी (कव्हर अप) असे आरोप लावले. निक्सन यांनी अडवण्याचे व अडकाठी आणण्याचे अटोकाट प्रयत्न करून पाहिले. शेवटी हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. युनायटेड स्टेट्स विरुद्ध निक्सन या प्रकरणी सर्व न्यायमूर्तींनी एकमताने अध्यक्षांच्या विरुद्ध निकाल दिला. अध्यक्ष या नात्याने असलेल्या आपल्या अधिकारावर न्यायालयाचे हे अतिक्रमण अाहे, असे निक्सन म्हणू शकले असते पण त्यांनी पायउतार होणे पसंत केले.
    या विषयी निक्सन यांचे मित्र व राजकीय सल्लागार यांच्यातील एक प्रसंग आठवतो, तो उल्लेखनीय वाटतो म्हणून देत आहे.
   अशा या अडचणीच्या प्रसंगी आपला हा विश्वसनीय सल्लागार नक्की उपयोगी पडेल, अशा खात्रीने निक्सन यांनी  हेन्री किसिंजर यांना भेंटीला बोलवून ‘ आता मी काय करू?’, असे अत्यंत काकुळतीने विचारले. पण एक अक्षरही न बोलता हा कूटनीतिज्ञ चिरूट ओढीत एका कोपऱ्यकडे एकटक पाहत राहिला, असे सांगतात. ‘या पापाला राजीनामा देण्याशिवाय दुसरे प्राय:श्चित्त नाही’, असेच जणू हेन्री किसिंजर यांना सुचवावयाचे असावे. कारण या भेटीनंतर निक्सन राजीनामा देऊन पायउतार झाले. एका राजकारण्याला आपल्या ‘शब्दाविणा झालेल्या या संवादात’, हेन्री किसिंजर यांनी नक्की काय सांगितले असेल, याचा अंदाज ज्याने त्याने करावा.
  दुसरे उदाहरण - ११ सप्टेंबरला जाॅर्ज बुश यांच्या राजवटीत फार मोठा अतिरेकी हल्ला झाला होता. न्यूयाॅर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर भस्मसात झाले होते. या निमित्ताने बुश यांनी एकतर्फी (युनीलॅटरली) निर्णय घेऊन अतिरेक्यांच्या टेहळणीचा कार्यक्रम, सैनिकी न्यायाधिकरणे, आणि अतिरेक्यांना डांबून ठेवण्याचे अधिकार  कायद्यातील तरतुदींचे पालन न करता शासनाकडे घेतले. याबाबत अध्यक्षांना घटनेनुसार जे अधिकार आहेत, त्यांच्या सीमा ओलांडल्या गेल्या. अमेरिकन काॅंग्रेस, कार्यपालिकेतीलच काही अधिकारी आणि सर्वोच्च न्यायालय यांनी हा प्रकार बेकायदा ठरवून जाॅर्ज बुश यांना वेसण घातली. या निर्णयाचा अध्यक्षांनी प्रतिवाद केला नाही.
   विरोधाभासाचा मुद्दा असा की, बुश यांच्यावर टीका करीत ओबामा यांनी त्यांचाच कित्ता गिरवला व अध्यक्षांना नसलेले अधिकार वापरले. पण त्यातल्यात्यात समाधानाची बाब ही आहे की, त्यांनी न्यायालयांचे निर्णय, अपिले करीत का होईना, पण स्वीकारले व घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होऊ दिला नाही. उद्याचा अध्यक्ष यापुढे जाणारच नाही, असे कसे सांगावे?
 ट्रंप हे उद्याचे उत्तराधिकारी असू शकतात. आपल्याला मिळालेला जनादेश गृहीत धरून उद्याला जर त्यांनी अमेरिकन काॅंग्रेस व न्यायालये यांना डावलून आपलाच हेका चालवला तर कोणती परिस्थिती निर्माण होऊ शकेल, हे याबाबतच्या सर्व शक्यता गृहीत धरून तपासून पाहिलेले बरे.
  समजा उद्या आॅर्लॅंडो सारखे हत्याकांड झाले तर काय होईल? सर्व मुसलमानांना अमेरिकेचे दरवाजे बंद होतील. देशातील सर्व मुस्लिमांनी ट्रंप यांच्या संकल्पाप्रमाणे स्थापन झालेल्या इस्लामिक कंट्रोल ब्युरोच्या कार्यालयात आपली नोंद केलीच पाहिजे, असा शासकीय आदेश जारी होईल. अमेरिकन घटनेच्या पहिल्या दुरुस्तीनुसार न्यायालये हा आदेश घटनाविरोधी ठरवतील. ट्रंप यांनी न्यायालयाचा निर्णय मानला नाही तर अमेरिकन काॅंग्रेस त्यांच्यावर महाभियोग (इंपीच) चालवील. अमेरिकन सिनेट त्यांच्यावर अटक वाॅरंट बजावेल व त्यांना पदावनत करील. पण अमेरिकेचे संरक्षण करण्यासाठी आपली इस्लामविरोधी धोरणे पुढे रेटणे आवश्यक आहे, हे निमित्त पुढे करून हे आदेश त्यांनी धुडकावून लावले व हे आपले अध्यक्षीय अधिकार या प्रभावित (रिग्ड) यंत्रणा हिरावून घेत आहेत, असे म्हणून निर्णयावर ठाम रहायचे ठरवले तर काय?
  अशावेळी ट्रंप यांची व्हाईट हाऊसमधून शारीरिक उचलबांगडी कोण करणार? काॅंग्रेसची सत्ता कॅपिटोलमधील पोलिसदलावर चालते. या दलात २३०० च्या जवळपास सामान्य शस्त्रे असलेलेच सैनिक आहेत. सर्वोच्च न्यायालय व अन्य न्यायालये यांच्या आधिपत्त्याखाली असलेल्या सैनिक दलाजवळ तर याहीपेक्षा कमी प्रतीची शस्त्रे आहेत. ३८०० संख्येचे सशस्त्रदल डिपार्टमेंट आॅफ जस्टीसच्या आधिपत्त्याखाली आहे.
  या तुलनेत अध्यक्ष ट्रंप यांच्या आधिपत्त्याखाली डझनावारी सशस्त्र दले असतील. त्यात सीक्रेट सर्व्हिस, एफबीआय, सीआयए अशा दिग्गज दलांचा समावेश होतो. अशा परिस्थिती यांच्यामधील संघर्ष अगदीच एकतर्फी होईल.
   आजवर अमेरिकेची राज्य घटना दणकट(रोबस्ट) ठरली आहे. पण ट्रंप सारख्या जनआंदोलनातून उभ्या झालेल्या व भुरळ घालणाऱ्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या नेत्यापुढे तिचा निभाव लागेल का? भावनोद्दिपनाची - भडकवण्याची (डेमॅगाॅग) क्षमता लाभलेल्या ट्रंप सारख्यांच्या नेतृत्त्वामुळे अशी चिंता वाटू लागली आहे.
  या निमित्ताने १९७५ साली भारतात लागू झालेल्या आणीबाणीची आठवण आल्यावाचून राहिली नाही. हजारो नागरिकांचा तुरुंगवास, छळ, लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे जनआंदोलन, जनता पक्षाचा उदय आणि अशा प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून झालेली ४३वी घटना दुरुस्ती हा सर्व घटनाक्रम स्मृतिपटलावरून एखाद्या चित्रफितीप्रमाणे सरकून गेला. सर्वच लोकशाही राजवटींच्या जन्मकुंडलीत असे योग असतात का?/ असतील का?
अमेरिकेतील कुरघोडीचे राजकारण(२)
वसंत गणेश काणे
मतपेटीचे राजकारण- या प्रश्नाला  (इसीसला हत्याकांडासाठी जबाबदार धरण्याच्या प्रश्नाला) वेगळे महत्त्व यासाठीही आहे की, डेमोक्रॅट पक्ष मुस्लिम व मेक्सिकन विस्थापितांबद्दल नरमाईची भूमिका घेतो कारण ते त्यांचे भरवशाचे मतदार आहेत, असा समज आहे व तो पूर्णपणे चुकीचा आहे, असे म्हणता येत नाही. ज्या ज्या देशात लोकशाही आहे त्या त्या सगळ्या देशात मतपेढीचे राजकारण, मतपेढी उभी करणे, जोपासणे, तिला खूष ठेवणे हा प्रकार निरनिराळ्या स्वरूपात असतोच. कुठे कमी तर कुठे अधिक प्रमाणात एवढाच कायतो फरक असतो. ‘मेरी कमीझ तेरी कमाझसे अधिक सफेद है’, एवढेच काय ते एक दुसऱ्याला म्हणू शकतो.
क्लिंटन फाऊंडेशनचे मुस्लिम दाते - क्लिंटन कुटुंबावर आणखीही एक आरोप आहे. क्लिंटन फाऊंडेशनला खनीज तेलाच्या भरवशावर श्रीमंत झालेले मध्यपूरवेतील बहुतेक देश व धनवंत भरघोस मदत करीत असतात. त्यातही सौदी कतारी व कुवेती लोक आघाडीवर आहेत. त्यामुळे मुस्लिम दहशतवाद्यांबद्दल हे कुटुंब नेहमीच नरमाईची भाषा वापरते, असा आरोप आहे. हिलरी क्लिंटन यांचा पाकिस्थानकडे कल असतो, त्याचेही हेच कारण आहे, असे एरवीही होत असलेले आरोप व कुजबुज हे प्रकार आज निवडणुकीच्या काळात नेहमीपेक्षा अधिक तीव्रतेने ऐकू येत आहेत. ओबामा प्रशासनाने - म्हणजे डेमोक्रॅट प्रशासनाने- तर बेकायदा प्रवेश करणाऱ्या सर्व विस्थापित व स्थलांतरित यांची नागरिकत्व व/वा ग्रीन कार्डाबाबतची प्रकरणे (की ज्यात मेक्सिकन व मुस्लिमांचे प्रमाण जास्त आहे) तातडीने निकाली काढत आणली आहेत. आता ते त्यांचे भरवशाचे मतदार ठरणार हे निश्चित आहे. यामुळे रीतसर पद्धतीने नागरिकत्व व/वा ग्रीन कार्ड मिळवणार्ऱ्यांचा नंबर खाली घसरला आहे (दरवर्षी किती लोकांची प्रकरणे निकाली काढायची हा आकडा निश्चित असतो व त्यातला फार मोठा हिस्सा या लोकांना मिळाला आहे). इथला भारतीय समाज यामुळे ओबामा प्रशासनावर म्हणजेच पर्यायाने डेनोक्रॅट पक्षावर नाराज आहे. याची डेमोक्रॅट पक्षाला फारशी चिंता नाही. कारण भारतीय लोकांचा कल सामान्यत: रिपब्लिकन पक्षाकडे असतो, असे मानले जाते. अमेरिका पाकिस्थानला का चुचकारत असते, याचे रहस्यही यातच दडलेले आहे, असे मानतात. डेमोक्रॅट पक्षाची मतपेढीत अल्पसंख्यांक व आफ्रिकन अमेरिकन यांचा फार मोठा वाटा आहे, असे मानले जाते. याबाबत डेमोक्रॅट पक्षाचे आपल्या येथील काॅंग्रेस पक्षाशी साम्य दिसते. अर्थात मतपेढीची गणिते नेहमीच इतकी साध्या बेरीज वजाबाकीची नसतात. यात प्रसंग, व्यक्ती, तात्कालिक लाभ यासारख्या मुद्यांमुळे फरक पडतो. पण सध्यातरी या प्रश्नावरून ट्रंप यांनी डेमोक्रॅट पक्षावर मात केल्याचे चित्र आहे.
    तर्क व राजकारण-  दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, तरूण मतदार दिवसेदिवस ट्रंप यांच्याकडे अधिकाधिक संख्येत आकृष्ठ होत आहेत. त्यांचे अजब तर्कटही त्यांना भावते. हत्याऱ्याचे मुस्लिम अफगाणी पूर्वज दोन पिढ्या अगोदरच अमेरिकेत येऊन स्थायिक झाले होते. मुस्लिमांना आश्रय देण्याचे धोरण वेळीच( म्हणजे तेव्हापासून) बदलले असते तर आज हे हत्याकांड झाले नसते, हा त्यांचा तर्कही मतदारांना पटतो आहे. वास्तवीक त्याच सुमारास अनेक स्थलांतरीत /विस्थापित अमेरिकेत येऊन स्थायिक झाले असतील आणि तेव्हापासून ते गुण्यागोविंदाने अमेरिकेत राहात व वावरत असतील. पण…..
 द्विपक्षीय राजकारणावर परिणाम होईल का?- ट्रंप वाईट आहेत पण हिलरीही त्यांच्यापेक्षा चांगल्या नाहीत’, असे मानणारा फार मोठा वर्ग अमेरिकेत आहे. दोन्ही पक्षांनी या विषयाची दखल घ्यावी असा हा मुद्दा आहे. पण राष्ट्रीय संमेलनात गृहीत उमेदवाराच्या निवडीवर पक्षाचा शिक्कामोर्तब करण्याचा शिरस्ता बाजूला ठेवून त्यांना उमेदवारी नाकारून दुसऱ्या कुणाला देण्याचा विचार करण्यापूर्वी रिपब्लिकन पक्षाच्या धुरिणांना शंभरदा विचार करावा लागणार आहे. ट्रंप यांचा स्वभाव बघता ते बंडखोरी करून स्वतंत्र उभे राहिले तर मतदारांचा फार मोठा वर्ग त्यांच्या बाजूने मतदान करील, अशी भीती या धुरिणांना वाटते आहे. हिलरी क्लिंटन या स्वार्थी, कारस्थानी, दीर्घद्वेषी आहेत, असे मानणारे लोक खुद्द त्यांच्या पक्षातही आहेत. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनात कौल मिळवू, अशी जिद्द बाळगून त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी बर्नी सॅंडर्स हे तर कंबर कसून मैदानात उतरले आहेत. यामुळे पडणारी संभाव्य फूट अमेरिकेतील आजवरच्या परंपरागत द्विपक्षीय राजकारणाच्या शेवटाच्या प्रारंभ तर ठरणार नाही ना? याबाबत अजूनतरी कुणाचीही भविष्यवाणी समोर आलेली नाही. काळाच्या उदरात काय दडलेले आहे हे कोण सांगू शकतो? ते काहीही असले तरी मध्यपूर्वेतील घडामोडींमुळे अमेरिकेतील राजकारण पार ढवळून निघत आहे हे मात्र नक्की.
अमेरिकेतील कुरघोडीचे राजकारण(१)
वसंत गणेश काणे,    

    कोणता विषय कसा तापवता येईल व त्याला कोणत्या दिशेने नेता येईल, हे राजकारण्यांकडून शिकावे, असे म्हणतात. त्याचप्रमाणे इथून तिथून सर्व राजकारणी सारखेच, असेही म्हणतात. हे विधान खरे की खोटे हे ठरविण्यासाठी पुरावे देण्याची जबाबदारी सामान्यत: ते करणाऱ्याची असते/असावी, हेही सर्वमान्य असायला हवे. पण काही विषय असे असतात की, ते पसरवण्यासाठी पुराव्याची आवश्यकता नसते कारण लोक पुरावे मागण्याच्या भानगडीतच पडत नाहीत. असे विषय शोधून काढून त्यांचा आपले म्हणणे सिद्ध करण्याचे बाबतीत राजकारण्यांचे हात कुणी धरू शकणार नाही.
    आॅर्लॅंडो हत्याकांड-  सध्या अमेरिकेत ‘गे’(समलिंगी) लोकांचा महिनाभर चालणारा उत्सव सुरू आहे. या काळात या प्रकारच्या व्यक्तींबद्दलचे विषय चर्चेला येणे ही एरवी एक सामान्य बाब ठरली असती. या मंडळींच्याही काही समस्या असतात. त्यांच्या सोडवणुकीचा मुद्दाही विचारात घेतला जावा, हा विषय या उत्सवाच्या काळातच समोर यावा याचेही आश्चर्य वाटायला नको. या मंडळींनी कोणती सार्वजनिक स्वच्छालये वापरावीत, महिलांसाठीची की पुरुषांसाठीची हा विषय या काळात नव्याने पुढे आला. त्यांनी त्यांना हव्या त्या स्वच्छतागृहाचा वापर करावा, असे मत व्यक्त होताच जोरदार विरोधी प्रतिक्रिया उमटायला प्रारंभ झाला. समलिंगी विवाहाला मान्यता देण्याचे कायदे अमेरितील राज्यांमध्ये पारित होत आहेत. या आणि अशा भूमिकांमुळे संतापलेल्या ओमर मतीनने - एका माथेफिरूने-  फ्लोरिडा राज्यातील आॅर्लॅंडो येथील पल्स नावाच्या केवळ गे लोकांसाठी असलेल्या नाईट क्लबमध्ये घुसून स्वयंचलित शस्त्राचा वापर करून ५० जणांचा बळी घेतला व शंभरावर लोकांना जायबंदी केले.
   ट्रंप यांचा निष्कर्ष- रिपब्लिकन पक्षाचे अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे गृहीत उमेदवर( प्रिझंप्टिव्ह कॅंडिडेट) ट्रंप या चतुर राजकारणी गड्याने या हत्याकांडाचा फायदा घेत म्हटले की, इस्लामी दहशतवादाबाबत मी सुरवातीपासूनच जे सांगत होतो, ते खरे निघाले की नाही ते पहा. आता ओबामांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायलाच हवा. मुस्लिमांच्या अमेरिकेतील प्रवेशावर बंदी घालायलाच हवी. कारण असे की, मतीन हा हत्यारा इस्लाम धर्मीय होता व त्याचे पूर्वज दोन पिढ्या अगोदर अफगाणिस्थानातून अमेरिकेत आले होते.
  हिलरी क्लिंटन यांचा नाईलाज-डेमोक्रॅट पक्षाच्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या गृहीत उमेदवर ( प्रिझंप्टिव्ह कॅंडिडेट) - हिलरी क्लिंटन यांना सुद्धा यावेळी अशीच कडक भूमिका तात्काळ  घेणे भाग पडले. आजचा दिवस राजकारण करण्याचा दिवस नाही. या प्रश्नाबाबत धरसोड उपयोगाची नाही. निर्धारपूर्वक इसीसचा समाचार घ्यायलाच हवा. जी मूल्ये उराशी बाळगून अमेरिका उभी आहे, ज्या मूल्यांचा आपल्याला अभिमान आहे, त्यांच्या रक्षणासाठी इसीसशी युद्ध केले पाहिजे. थोडक्यात काय तर अशा प्रकारे दोन्ही पक्षांनी या घटनेचे ‘इस्लाम कनेक्शन’ गृहीत धरले आहे.
एका समाजशास्त्रज्ञाची भूमिका - वास्तवीक या प्रश्नाचे समाजशास्त्रीय विश्लेषण करणारा एक विस्तृत लेख एका अधिकारी व्यक्तीने लिहिला आहे. जेम्स अॅलन फाॅक्स हे गुन्हेगारीशास्त्र (क्रिमिनाॅलाॅजी), कायदा व सार्वजनिक धोरण(पब्लिक पाॅलिसी) या विषयांचे नाॅर्थ इस्टर्न विद्यापीठात प्राध्यापक असून त्यांनी याबाबतची आपली भूमिका व मते वृत्तपत्रात मांडली आहेत. ते म्हणतात, या प्रश्नाचा सर्व बाजूंनी विचार होणे आवश्यक आहे. एकदम निष्कर्ष काढणे बरोबर नाही. तसे न करता एकदा का हे अतिरेक्यांचे कृत्य आहे, अशी आपली समजूत आपण करून घेतली की, हत्याऱ्याच्या अडनावावरून आपण त्याची जातकुळी ठरवून मोकळे होतो. भरीस भर ही की, स्वत:ला इसीसचा प्रवक्ता म्हणवणारी व्यक्ती जेव्हा या घटनेची लगेच दखल घेते आणि पाप्यांना रमझानच्या काळात शिक्षा करणारी ही व्यक्ती, इसीसच्या वतीने विशेष पारितोषिकाची मानकरी ठरेल, असे जाहीर करते, तेव्हा तर जणू आता शंकेला वावच उरलेला नाही, असे आपण समजून चालत आहोत. हा लेख म्हणजे या विषयाचा शास्त्रशुद्ध विचार करणारी अमेरिकेतील एक अधिकारी व्यक्ती कशाप्रकारे विचार करते, याचा नमुना ठरावा, असा आहे.
   संरक्षण व शस्त्रास्त्र विषयाच्या तज्ञाचे मत - असाच दुसरा लेख संरक्षण व शस्त्रास्त्रे या विषयाचे तज्ञ  टाॅमस डेव्हिस यांनी लिहिला आहे. हे एक सेवानिवृत्त सैनिकी अधिकारी असून त्यांनी आपली मते मांडतांना म्हटले आहे की, शस्त्रास्त्र वापराबाबत सैन्यात जे नियम पाळले जातात, निदान त्यांचे जरी पालन करण्याचा आग्रह आपण सर्वसाधारण व्यक्तींचे बाबतीतही धरला तरी आॅर्लॅंडो सारखी हत्याकांडे होणार नाहीत. हे एका माथेफिरूचे कृत्य आहे, असे वाटते.
टाईम्सची संयमित भूमिका - ओर्लॅंडो हत्याकांड प्रकरणी ‘टाईम’ या जगविख्यात मासिकाची प्रतिक्रिया सर्वात परिपक्व मानली जाते. या मासिकाने आपल्या मासिकाचे मुखपृष्ठ काळ्या रंगात छापले असून त्यावर पांढऱ्या रंगात हत्याकांडात बळी पडलेल्या पन्नास स्त्रीपुरुषांची नावे एकाखाली एक अशी पानभर छापली आहेत आणि सोबत लाल रंगात प्रश्न उपस्थित केला आहे,‘ व्हाय डिड दे डाय?’ आतमध्ये या विषयाचे सविस्तर विवेचन करणारा लेख आहे. या प्रतिक्रियेचे अराजकीय व विचार करायला भाग पाडणारे स्वरूप दीर्घ काळ नजरेसमोर येत रहावे असे आहे. पण अमेरिकेतील निवडणुकीच्या राजकारणातच नव्हे तर एरवीही असे गंभीर विचार कुणाच्याही पचनी पडत नाहीत.
शस्त्रनियंत्रणासाठी सैन्याचे अनुसरण करा
वसंत गणेश काणे
       अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील आंर्लॅंडो गावातील शंभरावर लोकांना जायबंदी करणारे व किमान शंभर लोकांचा बळी घेणारे हत्याकांड झाल्यानंतर अनेक मानसशास्त्रज्ञ, विचारवंत, शस्त्रास्त्रनिपुण व्यक्तींची मते प्रसार माध्यमाद्वारे जनतेसमोर येत आहेत. टाॅमस डेव्हिस हे एक सेवानिवृत्त सैनिकी अधिकारी असून त्यांनी आपली मते मांडतांना म्हटले आहे की, शस्त्रास्त्र वापराबाबत सैन्यात जे नियम पाळले जातात, निदान त्यांचे जरी पालन करण्याचा आग्रह नागरिकांसाठी धरला तरी आंर्लॅंडो सारखी हत्याकांडे होणार नाहीत. अशी हत्याकांडे का होतात, याचे सर्व तपशील कदाचित कधीच उघडकीला येत नसतात/ येणार नाहीत, हे जरी मान्य केले तरी त्यांचे संख्यात्मक प्रमाण व हानीची तीव्रता नक्कीच कमी करता येईल.
     शस्त्रास्त्रे वापरण्याच्या बाबतीत, बाळगण्याच्या बाबतीत जे निकष सैनिकांसाठी आहेत, जी बंधने आहेत, ती तरी नागरिकांसाठी असावीत की नाही? सैन्यातले लोक शस्त्रे उशाशी घेऊन झोपतात, अशी जर कुणाची कल्पना असेल तर ती सपशेल चुकीची आहे. अर्थात सैन्य म्हटले की दारूगोळा आलाच, तसेच त्यांचा साठाही आसपासच असतो पण असे असले तरी शस्त्र ही एक धोकादायक वस्तू आहे आणि त्याबाबत थोडीशीही हयगय झाली तरी जिवावरही बेतू शकते, याची जाणीव सर्वांनाच असते. त्यातून व्यक्ती दारूच्या किंवा अन्य व्यसनाच्या अधिन असेल, तिचा मनाचा समतोल बिघडला असेल, किंवा तिच्या निष्ठेबद्दल शंका असेल तर तिच्या हातून गंभीर स्वरुपाची कृती होऊ शकेल हे गृहीत धरून दक्षता घेतली जाते.
   समाजात तर याबाबत विशेष काळजी घ्यायला हवी. श्स्त्र चालवण्याचे रीतसर शिक्षण ज्यांने घेतलेले नाही, त्याने तर शस्त्राला स्पर्शही करता कामा नये. ज्याने असे शिक्षण घेतले असेल त्याच्याजवळ शस्त्र वापरण्याचा परवाना असला पाहिजे. त्या शस्त्राची शासनाजवळ नोंद असली पाहिजे. दारूगोळा नियंत्रित असला पाहिजे. प्रत्येक गोळीचा हिशोब ठेवला गेला पाहिजे. संबंधित व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडले असल्याची चिन्हे दिसताच त्याच्याजवळची शस्त्रे काढून घेतली पाहिजेत व मन:स्वास्थ्य ठीक झाल्याची खात्री पटल्यावरच त्या व्यक्तीला तिचे शस्त्र परत दिले गेले पाहिजे. या नियमांचे काटेकोर पालन जर आम्ही सैन्यात करतो तर हेच नियम नागरिकांना लागू का असू नयेत?
   सैनिकांच्या हाताशी सदैव शस्त्रे असतात, हा समज चुकीचा आहे. जे कामावर नसतात, त्यांच्याजवळ शस्त्रे नसतात. ती एका अलमारीत बंद असून ती अलमारी जमिनीला खिळवून ठेवलेली असते. त्या खोलीला दोन भक्कम दारे असतात व दारांना खास कुलपे लावलेली असतात. खोलीला अलार्म लावलेला असतो. याशिवाय तासातासाला सर्व जागच्याजागी आहे ना व संरक्षक यंत्रणा ठीकठाक आहे ना याची पाहणी केली जाते. सर्व सैनिकांचे मनस्वास्थ्य ठीक आहे किंवा नाही, याचा नित्य आढावा घेतला जात असतो.
   शस्त्र ही एक भयंकर वस्तू आहे. स्वयंचलित बंदूक तर खूपच भयंकर मानली पाहिजे. अल्पावधीत जास्तीत जास्त माणसे मारता यावीत, या दृष्टीने तिची रचना असते. आॅर्लॅंडोच्या हत्याऱ्याने अशीच बंदूक वापरली होती. पिस्तुल बाळगण्याचा परवाना असेल तर आठपेक्षा जास्त फैरी झाडता येऊ नयेत. रायफल असेल तर पाचपेक्षा जास्त फैरी झाडता येऊ नयेत. असे असेल तर सावजाला बचावासाठी काहीतरी हालचाल करता येईल व हत्याऱ्याला बंदुकीत पुन्हा गोळी भरण्याआधी अडवता येईल. देशातील हत्याकांडाची मालिका पाहता हा मुद्दा पटण्यास हरकत असू नये.
आॅर्लॅंडोचे हत्याकांड
वसंत गणेश काणे
   अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील आंर्लॅंडो गावातील शंभरावर लोकांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची इजा पोचवणारे व किमान शंभर लोकांचा बळी घेणारे हत्याकांड केवळ अमेरिकेलाच नव्हे तर सर्व जगाला हादरा देणारे ठरले. याबाबत अमेरिकेत विविध माध्यमांमध्ये विविध पातळींवर चर्चा, टीका टिप्पणी होत आहे. जेम्स अॅलन फाॅक्स हे गुन्हेगारीशासत्र (क्रिमिनाॅलाॅजी), कायदा व सार्वजनिक धोरण(पब्लिक पाॅलिसी या विषयांचे नाॅर्थ इस्टर्न विद्यापीठात प्राध्यापक असून त्यांनी याबाबतची आपली भूमिका व मते वृत्तपत्रात मांडली आहेत. आपल्या देशातही अनेक हत्याकांडे होत असतात. त्याबाबत आपल्या येथे भारतात उमटणाऱ्या प्रतिक्रिया, दावे, निष्कर्ष कशाप्रकारचे असतात, ते आपण जाणतो. या विषयाचा शास्त्रशुद्ध विचार करणारी अमेरिकेतील  एक अधिकारी व्यक्ती कशाप्रकारे विचार करते, ते जाणून घेणे उपयोगाचे ठरू शकेल असे वाटते.
  हे हत्याकांड एका नाईट क्लबमध्ये झाले ज्या ठिकाणी एल जी बि टी (गे) लोकांचा वावर असतो. हेच ठिकाण हल्लेखार निवडतो, हा तपशील किती महत्त्वाचा आहे, हा मुद्दा सध्या पोलिस यंत्रणेची परीक्षा पाहणारा आहे. अशाप्रकारे त्या ठिकाणी केवळ योगायोगाने असणाऱ्या निरपराध व अपरिचित व्यक्तींची अंदाधुंद गोळीबार करून हत्या करणारी व्यक्ती मानसिक संतुलन नष्ट झालेली मनोरुग्ण असावी,असे सामान्यत: वाटते. पण सामूहिक हत्या करणारी व्यक्ती आपले सावज निवडण्याचे बाबतीत खूपच चोखंदळ (सिलेक्टिव्ह) व हिशोबी/काटेकोर (मेथाॅडिकल) असतात, असा अनुभव आहे. अशी व्यक्ती अतिशय थंड डोक्याने व पद्धतशीरपणे विशिष्ट व्यक्तींना किंवा विशिष्ट व्यक्तीसमूहांना स्वत:वरील किंवा समाजावरील संकटासाठी जबाबदार धरीत असते व म्हणून त्यांना शासन करीत असते.
 आज अतिरेक्यांच्या दहशतीखाली आपण सर्व वावरत आहोत. त्यामुळे हा इस्लामी अतिरेकाचा प्रकार आहे, अशी चर्चा देशभर सुरू व्हायला वेळ लागला नाही. अशी हत्याकांडे या पूर्वी घडली असल्यामुळे  हे त्यातलेच एक ताजे हत्याकांड म्हणून स्वीकारले गेले. हत्याकांडाचा पुरता तपशीलही हाती यायचा होता आणि हे कृत्य अतिरेक्यांचे (देशातील किंवा देशाबाहेरील) असल्याची समजूत अधिकारी व्यक्तींनी करून घेतली.
   एकदा का हे अतिरेक्यांचे कृत्य आहे, अशी आपली समजूत आपण करून घेतली की, हत्याऱ्याच्या अडनावावरून आपण त्याची जातकुळी ठरवून मोकळे होतो. भरीस भर ही की, स्वत:ला इसीसचा प्रवक्ता म्हणवणारी व्यक्ती, पाप्यांना रमझानच्या काळात शिक्षा करणारी ही व्यक्ती विशेष पारितोषिकाची मानकरी ठरेल, असे जेव्हा जाहीर करते, तेव्हा तर शंकेला वावच उरत नाही.
लगेच वार्ता येऊन थडकते की, हत्याऱ्याने ९११ या क्रमांकावर फोन करून (संकटकाळी पोलीस यंत्रणेशी संपर्क करण्याचा नंबर) आपली इसीसशी बांधिलकी असल्याचे जाहीर केले आणि बोस्टनच्या हत्याकांडाचा हवाला दिला. इस्लामिक दहशतवादापासून प्रेरणा घेऊन दोन भावांनी प्रेशर कुकरचा उपयोग करून स्वतंत्रपणे बोस्टन मॅराथाॅन शर्यत संपतासंपता हे स्फोट १२ सेकंद व १९० मीटर अंतराने १५ एप्रिल २०१३ ला घडवून आणले होते. या हल्ल्यात हल्लेखोर स्वत:, दोन पोलीस अधिकारी व अन्य तीन नागरिक असे सहा जण मृत्युमुखी पडले होते व २८० अन्य नागरिक जखमी झाले होते. त्यावेळी जी चौकशी झाली होती, त्तेव्हा सुद्धा हत्याऱ्याचे अतिरेक्यांशी लागेबांधे आहेत, असा सबळ पुरावा हाती आला नव्हता.
  हा हत्यारा एखादा एकांड्या शिलेदार असेलही कदाचित, द्वेशापोटी तो हत्या करण्यास प्रवृत्त झाला असेलही, पण तो द्वेश अमेरिकन समाजाविषयीचा होता की 'गे' किंवा समलिंगींविषयींचा होता, हे अजून स्पष्ट व्हावयाचे आहे. रमजानमध्ये त्याचे कृत्य अधिक प्रशंसनीय मानले जाईलही, पण या लोकांनी कोणत्या स्वच्छालयात जायचे, याबाबतचा काथ्याकूट जवळजवळ जो गेला महिनाभर चालू आहे, त्यामुळेही त्याचे मानसिक संतुलन बिघडलले असू शकते. दोन ‘पुरुषांनी’ सार्वजनिक ठिकाणी जे चुंबनालिंगन दिले, त्यामुळे तो अतिशय संतापला होता, असेही एका वाहिनीचे वृत्त आहे.
समलिंगींच्या द्वेषापोटी अमेरिकेत यापूर्वीही हल्ले झाले आहेत. कधी हल्लेखोर एकटदुकट असायचा तर तर कधी हे संघटित हल्ले असायचे. त्यांचा दशशतवाद्यांशी संबंध नसायचा. या हत्याकांडाच्या दिवशीच लाॅसेंजेलिसमध्ये समलिंगींच्या आनंद मोर्चावरील संकल्पित हल्ला थोपवण्यात आला होता, हे एक पूर्णपणे वेगळे प्रकरण होते.
हल्लेखोराचा नक्की हेतु कोणता होता व त्याची मानसिक स्थिती नक्की कशी होती, हे जोपर्यंत उघड होत नाही, तोपर्यंत नक्की उपाययोजना कोणती करायची हे ठरवता येणार नाही. सर्वच नाईट क्लब्जना सुरक्षा पुरवायची की सर्व क्लब्जनाही ती पुरवायची? की जिथे जिथे म्हणून गे लोक एकत्र येत असतात, त्या सर्व ठिकाणांना पुरवायची? २०१२ मध्ये कोलोराडोमध्ये चित्रपटगृहावर हल्ला झाला होता. त्यावेळी चित्रपटगृहांच्या मालकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन सुरक्षा व्यवस्था बळकट केली होती. लगेच न्यूटनमध्ये शाळेवर हल्ला झाला होता. तेव्हा आम्ही पूर्ण अमेरिकेतील सर्वच लहानमोठ्या शाळांना सुरक्षा देण्याचा आग्रह धरला.
    अशी उपाययोजना कितपत परिणामकारक किंवा योग्य ठरेल हा मुद्दा बाजूला ठेवला तरी अशाप्रकारची तटबंदी करून बंदिस्त जीवन जगायला आपण प्रारंभ करणे म्हणजे म्हणजे अतिरेक्यांचे मनसुबे सफल होण्याच्या दृष्टीने दिलेला प्रतिसाद ठरतो, हे आपण विसरतो आहोत. अतिरेक्यांना नेमके हेच हवे आहे/असते. काही लोकांचे जीव घेणे एवढ्यापुरता अतिरेक्यांचा हेतु मर्यादित नसतो. ज्या स्वातंत्र्याचा आपण आनंद घेत आहोत, त्याचा संकोच झालेला त्यांना हवा असतो.
  कोणत्याही हल्यात  किती लोक हताहत झाले किती यमसदनी गेले यावर त्या हत्येची तीव्रता का अवलंबून असावी? या संख्येचा वारंवार उल्लेख करून आपण अतिरेक्यांची(अप) कीर्ती (?) वाढण्यासच मदत करीत आहोत, हे आपण विसरत नाही का? ओर्लॅंडोचे हत्याकांड ही आजवरच्या सामूहिक हत्याकांडातील सर्वात मोठी घटना आहे, हे सांगण्यापाठीमागचा आपला उद्देश काय आहे? समजा यात हतागत झालेल्यांची संख्या कमी असती तर तिची भीषणता कमी ठरेल का? या बाबीचा वारंवार उल्लेख करून आपण त्याच्या साथीदारांना हे रेकाॅर्ड मोडण्यासाठी प्रेरित तर करीत नाही ना?/ करणार नाही ना? कारण उच्चांक मोडण्यासाठीच तर असतात.