Tuesday, July 19, 2016

अमेरिकेतील कुरघोडीचे राजकारण(२)
वसंत गणेश काणे
मतपेटीचे राजकारण- या प्रश्नाला  (इसीसला हत्याकांडासाठी जबाबदार धरण्याच्या प्रश्नाला) वेगळे महत्त्व यासाठीही आहे की, डेमोक्रॅट पक्ष मुस्लिम व मेक्सिकन विस्थापितांबद्दल नरमाईची भूमिका घेतो कारण ते त्यांचे भरवशाचे मतदार आहेत, असा समज आहे व तो पूर्णपणे चुकीचा आहे, असे म्हणता येत नाही. ज्या ज्या देशात लोकशाही आहे त्या त्या सगळ्या देशात मतपेढीचे राजकारण, मतपेढी उभी करणे, जोपासणे, तिला खूष ठेवणे हा प्रकार निरनिराळ्या स्वरूपात असतोच. कुठे कमी तर कुठे अधिक प्रमाणात एवढाच कायतो फरक असतो. ‘मेरी कमीझ तेरी कमाझसे अधिक सफेद है’, एवढेच काय ते एक दुसऱ्याला म्हणू शकतो.
क्लिंटन फाऊंडेशनचे मुस्लिम दाते - क्लिंटन कुटुंबावर आणखीही एक आरोप आहे. क्लिंटन फाऊंडेशनला खनीज तेलाच्या भरवशावर श्रीमंत झालेले मध्यपूरवेतील बहुतेक देश व धनवंत भरघोस मदत करीत असतात. त्यातही सौदी कतारी व कुवेती लोक आघाडीवर आहेत. त्यामुळे मुस्लिम दहशतवाद्यांबद्दल हे कुटुंब नेहमीच नरमाईची भाषा वापरते, असा आरोप आहे. हिलरी क्लिंटन यांचा पाकिस्थानकडे कल असतो, त्याचेही हेच कारण आहे, असे एरवीही होत असलेले आरोप व कुजबुज हे प्रकार आज निवडणुकीच्या काळात नेहमीपेक्षा अधिक तीव्रतेने ऐकू येत आहेत. ओबामा प्रशासनाने - म्हणजे डेमोक्रॅट प्रशासनाने- तर बेकायदा प्रवेश करणाऱ्या सर्व विस्थापित व स्थलांतरित यांची नागरिकत्व व/वा ग्रीन कार्डाबाबतची प्रकरणे (की ज्यात मेक्सिकन व मुस्लिमांचे प्रमाण जास्त आहे) तातडीने निकाली काढत आणली आहेत. आता ते त्यांचे भरवशाचे मतदार ठरणार हे निश्चित आहे. यामुळे रीतसर पद्धतीने नागरिकत्व व/वा ग्रीन कार्ड मिळवणार्ऱ्यांचा नंबर खाली घसरला आहे (दरवर्षी किती लोकांची प्रकरणे निकाली काढायची हा आकडा निश्चित असतो व त्यातला फार मोठा हिस्सा या लोकांना मिळाला आहे). इथला भारतीय समाज यामुळे ओबामा प्रशासनावर म्हणजेच पर्यायाने डेनोक्रॅट पक्षावर नाराज आहे. याची डेमोक्रॅट पक्षाला फारशी चिंता नाही. कारण भारतीय लोकांचा कल सामान्यत: रिपब्लिकन पक्षाकडे असतो, असे मानले जाते. अमेरिका पाकिस्थानला का चुचकारत असते, याचे रहस्यही यातच दडलेले आहे, असे मानतात. डेमोक्रॅट पक्षाची मतपेढीत अल्पसंख्यांक व आफ्रिकन अमेरिकन यांचा फार मोठा वाटा आहे, असे मानले जाते. याबाबत डेमोक्रॅट पक्षाचे आपल्या येथील काॅंग्रेस पक्षाशी साम्य दिसते. अर्थात मतपेढीची गणिते नेहमीच इतकी साध्या बेरीज वजाबाकीची नसतात. यात प्रसंग, व्यक्ती, तात्कालिक लाभ यासारख्या मुद्यांमुळे फरक पडतो. पण सध्यातरी या प्रश्नावरून ट्रंप यांनी डेमोक्रॅट पक्षावर मात केल्याचे चित्र आहे.
    तर्क व राजकारण-  दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, तरूण मतदार दिवसेदिवस ट्रंप यांच्याकडे अधिकाधिक संख्येत आकृष्ठ होत आहेत. त्यांचे अजब तर्कटही त्यांना भावते. हत्याऱ्याचे मुस्लिम अफगाणी पूर्वज दोन पिढ्या अगोदरच अमेरिकेत येऊन स्थायिक झाले होते. मुस्लिमांना आश्रय देण्याचे धोरण वेळीच( म्हणजे तेव्हापासून) बदलले असते तर आज हे हत्याकांड झाले नसते, हा त्यांचा तर्कही मतदारांना पटतो आहे. वास्तवीक त्याच सुमारास अनेक स्थलांतरीत /विस्थापित अमेरिकेत येऊन स्थायिक झाले असतील आणि तेव्हापासून ते गुण्यागोविंदाने अमेरिकेत राहात व वावरत असतील. पण…..
 द्विपक्षीय राजकारणावर परिणाम होईल का?- ट्रंप वाईट आहेत पण हिलरीही त्यांच्यापेक्षा चांगल्या नाहीत’, असे मानणारा फार मोठा वर्ग अमेरिकेत आहे. दोन्ही पक्षांनी या विषयाची दखल घ्यावी असा हा मुद्दा आहे. पण राष्ट्रीय संमेलनात गृहीत उमेदवाराच्या निवडीवर पक्षाचा शिक्कामोर्तब करण्याचा शिरस्ता बाजूला ठेवून त्यांना उमेदवारी नाकारून दुसऱ्या कुणाला देण्याचा विचार करण्यापूर्वी रिपब्लिकन पक्षाच्या धुरिणांना शंभरदा विचार करावा लागणार आहे. ट्रंप यांचा स्वभाव बघता ते बंडखोरी करून स्वतंत्र उभे राहिले तर मतदारांचा फार मोठा वर्ग त्यांच्या बाजूने मतदान करील, अशी भीती या धुरिणांना वाटते आहे. हिलरी क्लिंटन या स्वार्थी, कारस्थानी, दीर्घद्वेषी आहेत, असे मानणारे लोक खुद्द त्यांच्या पक्षातही आहेत. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनात कौल मिळवू, अशी जिद्द बाळगून त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी बर्नी सॅंडर्स हे तर कंबर कसून मैदानात उतरले आहेत. यामुळे पडणारी संभाव्य फूट अमेरिकेतील आजवरच्या परंपरागत द्विपक्षीय राजकारणाच्या शेवटाच्या प्रारंभ तर ठरणार नाही ना? याबाबत अजूनतरी कुणाचीही भविष्यवाणी समोर आलेली नाही. काळाच्या उदरात काय दडलेले आहे हे कोण सांगू शकतो? ते काहीही असले तरी मध्यपूर्वेतील घडामोडींमुळे अमेरिकेतील राजकारण पार ढवळून निघत आहे हे मात्र नक्की.

No comments:

Post a Comment