Tuesday, July 19, 2016

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या दोन्ही गृहीत उमेदवारांना हितचिंतकांचा हितोपदेश
                                               वसंत गणेश काणे
     डोनाल्ड ट्रंप
   डोनाल्ड ट्रंप हे रिपब्लिकन पक्षाचे व हिलरी क्लिंटन या डेमोक्रॅट पक्षाच्या गृहीत उमेदवार (प्रिझंप्टिव्ह कॅंडिडेट) म्हणून घोषित झाल्यानंतर त्यांच्याविषयी वृत्तपत्रात रोज काहीना काही मजकूर येत असतो.
    ट्रंप हे कज्जेदलालीत प्रथम क्रमांकावर आहेत. ३५०० खटल्यांपैकी काही ट्रंप यांनी दाखल केलेले तर काही त्यांच्यावर दाखल झालेले खटले आहेत. त्यांच्यावर खटले दाखल करणाऱ्यात काही त्यांच्या उद्योगातले वेटर, चाकर यासारखे लोक आहेत. काहींना पगार मिळालेला नाही, काहींना कमी मिळाला, काहींचा पगार कापला गेला अशा तक्रारी आहेत. मी कष्टकऱ्यांचा कैवारी आहे, अशी त्यांची भूमिका असतांना हे कसे, असा प्रश्न त्यांना विचारला असता खांदे उडवून ते म्हणाले की, त्यांनी कामचुकारपणा केला असेल, त्यांचे काम असमाधानकारक असेल तर मी काय करणार?
मेक्सिकन जज पक्षपाती असू शकतो, असे म्हणून तुम्ही न्यायव्यवस्थेवरच शंका घेत नाही का, असे विचारताच ते म्हणाले की, माझे म्हणणे चुकीच्या पद्धतीने मांडले गेले. मी मेक्सिकोवर टीका करीत असल्यामुळे मेक्सिकोमधील लोकांचा  माझ्यावर राग असेल, असे मी म्हटले होते. अमेरिकेत स्थायिक झालेल्या मेक्सिकन लोकांबद्दल मी असे बोललो नव्हतो.
       ट्रंप यांना अनेकांनी हितोपदेशही केला आहे. यापुढे तरी जिभेवर ताबा ठेवत जा. अध्यक्षपदाची निवणूक ही सोपी गोष्ट नाही. एक सुसज्ज, सुरळीत चालणारी व वंगण घातलेली प्रचार यंत्रणा उभारण्यावर भर द्या. आतापर्यंत ठीक होते पण यापुढे नुसत्या घोषणा करून भागणार नाही. यापुढे चर्चेच्या फैरी झडणार आहेत. त्या दृष्टीने अभ्यास व तयारी करावी लागेल. पक्षांतर्गत निवडणुकीत प्रतिस्पर्ध्याना उद्देशून बेताल विधाने केली, तेव्हा ती कामालाही आली. आता तसे करून चालणार नाही.
   हिलरी क्लिंटन
    हिलरींनाही सल्ला देणारे खूप आहेत. ट्रंप व समर्थकांचा तुमच्यावर आरोप आहे की, तुम्ही दीर्घद्वेषी, हट्टी व कारस्थानी आहात, हे म्हणणे तुम्हाला खोटे ठरवायचे आहे. जणू या प्रयत्नाचा एक भाग म्हणून अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांचे वर्णन, एक धीराची महिला, मनात कणव असलेली महिला व अमेरिकेची पहिली महिला अध्यक्ष या नात्याने आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवू शकेल अशी महिला या शब्दात केले आहे.
     हिलरींना अनेक हितचिंतकांनी हितोपदेश करतांना म्हटले आहे की, तुमच्यावर सतत प्रकाश झोत असतो, त्यामुळे लोक तुम्हाला लोक पाहू शकतात, तुमची भाषणेही लोक ऐकत असतात, पण म्हणून केवळ एवढ्याने जवळीक निर्माण होणार नाही. ट्रंप यांच्या बोलण्याने अमेरिकन तरुणाई प्रभावित झाली आहे. तिला आपल्याकडे वळवण्याचे काम तुम्हाला यशस्वी करायचे आहे. आतापर्यंत ट्रंप यांना उत्तर देण्याचे काम तुम्ही इतरांवर सोपवले, इथपर्यंत ठीक आहे. यापुढे त्यांच्या टीकेला सडेतोड उत्तरे तुम्हालाच द्यायची आहेत, हे लक्षात असू द्या.
     शेवटपर्यंत लढा देऊ इच्छिणारे बर्नी सॅंडर्स
   हिलरी यांनी निर्णायक मते मिळवून गृहीत उमेदवार (प्रिझंप्टिव्ह कॅंडिडेट) म्हणून यश संपादन केल्यावर अध्यक्ष ओबामा त्यांना आपला पाठिंबा जाहीर करूनच थांबले नाहीत तर त्यांनी हिलरींचे नजीकचे प्रतिस्पर्धी बर्नी सॅंडर्स यांना आता डेमोक्रॅटिक पक्षाच्या विजयासाठी आपण एकोप्याने प्रयत्न करू या, असे आवाहन करीत तीनदा भेट घेतली. पण बर्नी सॅंडर्स बधले नाहीत. पक्षांतर्गत निवडणुका (प्रायमरीज) होत असतांना अध्यक्ष ओबामा व उपाध्यक्ष ज्यो बिडेन हे खरोखरच तटस्थ राहिले याबद्द्ल त्यांचे आभार मानत त्यांनी पक्षांतर्गत निवडणुकीतून माघार स्वीकारण्यास सपशेल नकार दिला. जुलै महिन्यात शेवटीशेवटी डेमोक्रॅट पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आहे. त्यावेळी आपण पुन्हा एकदा कौल घेऊ असे म्हणत त्यांनी अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरचा आपला दावा कायम ठेवला आहे.

No comments:

Post a Comment