Tuesday, July 26, 2016

ग्रॅंड ओल्ड पार्टी व डोनाल्ड ट्रंप
वसंत गणेश काणे,     बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड  २७२१, प्राईम रोज लेन नाॅर्थ, याॅर्क, पेनसिलव्हॅनिया
९४२२८०४४३०  
Email-kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
  रिपब्लिकन पार्टी म्हणताच आपल्यासमोर एकेक कर्तृत्वशाली व्यक्तिमत्त्व उभे राहते. अब्राहम लिंकन, थिओडोर रुझवेल्ट, आयसेनहोव्हर, निक्सन, फोर्ड, रीगन,  बुश पितापुत्र आठवतात. तसेच डेमोक्रॅट पक्षाचे नाव घेताच फ्रॅंकलीन रुझवेल्ट, हॅरी ट्रूमन, जाॅन एफ केनडी, लिंडन जाॅनसन, जिमी कार्टर, बिल क्लिंटन, बराक ओबामा हे दिग्गज समोर उभे राहतात.
 जी ओ पी - अमेरिकेतील ओहायो प्रांतातील क्लिव्हलंड येथील वातावरण अगोदरच डलासमधील पाच गोऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या हत्याकांडामुळे व ल्युसियाना आणि मिनोसोटा येथील गोळीबारात हताहत झालेल्या काळ्या लोकांच्या आठवणींमुळे तणावयुक्त झालेले असतांना अमेरिकेतील जीओपीचे (ग्रॅंड ओल्ड पार्टीचे- म्हणजेच रिपब्लिकन पार्टीचे) राष्ट्रीय संमेलन क्लिव्हलॅंड येथे संपन्न होत आहे. त्यातून ओहायो हे राज्य ‘ओपन कॅरी स्टेट’ (विनापरवाना शस्त्र बाळगण्याची अनुमती असलेले) असल्यामुळे सावधगिरीची बाब म्हणून सुरक्षेचा विशेष व कडेकोट बंदोबस्त केला जात आहे. पोलिसांसाठी हा कसोटीचाच प्रसंग आहे. गुप्तचर अगोदरच प्रांतभर विखुरलेल असून स्थानिक प्रतिनिधी, गुन्हेगार विश्व, यातून अंदाज घेत परिस्थतीवर लक्ष ठेवून आहेत.
   लगेचच पेन्सिवव्हॅनिया प्रांतात फिलाडेल्फिया येथे डेमोक्रॅट पक्षाचे राष्ट्रीय संमेलन आयोजित असून त्यावेळी मात्र पोलिस बंदोबस्त नेहमीसारखाच असणार असून कोणतीही विशेष व्यवस्था आयोजित नाही. पण तिथेही सावधगिरीची ‘अन्य’ उपाययोजना कार्यान्वित होणार आहे.
 संमेलनाचे दोन उद्देश -  क्लिव्हलंड येथील संमेलनाच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्षाचा प्रमुख उद्देश डोनाल्ड ट्रंप यांची प्रतिमा थोडी सोज्वळ स्वरुपात उभी करणे व ती ओव्हल आॅफिसला (अमेरिकेच्या अध्यक्षाचे कार्यालय) मानवणारी आहे हा समज जनमानसात रुजवण्याचा आहे. तसेच या निमित्ताने पक्षांतर्गत जो अभूतपूर्व असा संघर्ष प्राथमिक स्तरावरील निवडींच्या वेळी झाला, त्याची अजूनही धुमसत असलेली आग शमवून, पक्ष एकजिनसी स्वरुपात ८ नोव्हेंबर २०१६ च्या  अध्यक्षपदाच्या लढतीसाठी सज्ज करणे हा दुसरा उद्देश आहे. ‘काहीही झाले तरी ट्रंप नकोच’, ही पक्षांतर्गत चळवळ शमली असली तरी ती पुरतेपणी थंडावलेली नाही. या पार्श्वभूमीवर क्लिव्हलंडला पक्षाच्या अधिवेशनाच्या काळात दंगली माजलेल्या दिसू नयेत, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. तसेच दंगली झाल्या तर त्यांचा परिणाम ट्रंप यांच्या प्रतिमेचा उजळपणा आणखी कमी होण्यात होईल, हे पक्ष जाणून आहे.
ट्रंप व पेन्स ही दुक्कल -  डोनाल्ड  ट्रंप यांनी आपला उपाध्यक्षपदाचा जोडीदार निवडतांना, त्याची निवड जाहीर करतांना व त्याच्या निवडीमागचे (राज) कारण सांगतांना आपल्या स्वभावाला साजेसेच वर्तन केले. इंडियानाचे गव्हर्नर माईक पेन्स यांची निवड न्यूयाॅर्क येथे त्यांनी साधेपणाने जाहीर केली. एरवी ही एक ‘इव्हेंट’ असते. पण प्रकाशझोत आपल्यावरच राहील, याची पुरेपूर काळजी ट्रंप यांनी घेतली. या निमित्ताने केलेल्या भाषणाचा प्रमुख भाग स्वत:ची स्तुती व थोरवी सांगण्यात खर्च करून आपल्या भूमिकेचा अंदाज घेणे/येणे कसे अशक्य आहे हे वार्तांकन करणाऱ्यांना जाणवून दिले. ‘माईक पेन्स यांचे व्यक्तिमत्त्व प्रत्येक बाबतीतच अलौकिक आहे’, हे सांगतांना यांच्या निवडीमागे पक्षात एकोपा निर्माण व्हावा म्हणून ही निवड माझ्यासारख्या ‘उपऱ्याने’ (पक्ष कार्यकर्ता नसणाऱ्याने) करणे आवश्यकच होते, हे सांगण्यास ते विसरले नाहीत. महिला, अल्पसंख्यांक व समलिंगी यात ट्रंप यांची प्रतिमा मुळीच चांगली नाही. त्यातून गर्भपात, कुटुंब नियोजन, समलिंगीचे प्रश्न व स्थलांतरितांचे प्रश्न याबाबत माईक पेन्स हे तर पराकोटीचे उजवे व सनातनी विचारांचे समजले जातात. इंग्रजीचा अवास्तव पुरस्कार (अमेरिकेत स्पॅनिश बोलणाऱ्यांची संख्या बरीच आहे) हा ही अडचण निर्माण करणारा मुद्दा आहे. तीनदा बाशिंग बांधणारा उतावळा, म्हणून ट्रंप यांची संभावना होत असते. म्हणूनच बहुदा सुसंस्कृत जनमानसाच्या त्यांच्याकडून कोणत्याही अपेक्षा नसाव्यात/नाहीत.
अशीही ट्रंप व पेन्स यांची दुक्कल पाहून हिलरी क्लिंटन व त्यांचे समर्थक यांना हर्षाच्या उकळ्या फुटत आहेत. अमेरिकन महिलावर्ग ही दुक्कल साफ नाकारील, असे त्यांना वाटते आहे. ७७ टक्के महिलांनी ट्रंप यांचे बाबत आपले  प्रतिकूल मत नोंदविलेही आहे.
 प्रतिमा उजळण्याचे प्रयत्न - ट्रंप यांची प्रतिमा उजळण्याची तजवीज हा चार दिवस चालणाऱ्या संमेलनाचा मुख्य हेतू आहे. भीमदेवी थाटात गर्जना करणारा (बाॅंबॅस्टिक), भावनावश वृत्तीचा (इंपल्सिव्ह), दिखाऊगिरीत तरबेज असलेला (शोमन) व वक्तृत्त्वाने केवळ सभा गाजवणारा, मुख्य म्हणजे सोळा प्रतिस्पर्ध्यांचा खातमा पक्षांतर्गत निवडणुकीत करणारा ‘उपरा’ ही आजची ट्रंप यांची जनमानसात असलेली प्रतिमा पुसून टाकणे आणि एक खराखुरा (सबस्टॅंटिव्ह) व सहानुभूती बाळगणारा (कंपाशनेट) अशी त्यांची प्रतिमा उभी करायची आहे. त्यांचे शब्दनिपुणतायुक्त रोखठोक वक्तृत्त्व लोकप्रिय असते, असे त्यांचे समर्थक म्हणतात. पण यात मांडलेल्या मुद्यांमुळे अल्पसंख्यांक व महिला मतदार त्यांच्या वाट्यालाही उभे राहण्यास तयार नाहीत. (बहुदा) यावर उपाय म्हणून त्यांच्या तृतीय पत्नीने (पूर्वाश्रमीची फॅशन माॅडेल असलेल्या) - मेलानियाने- पतीच्या समर्थनार्थ राष्ट्रीय संमेलनात एक उत्कृष्ट भाषण केले व वाहवा मिळविली. पण हे समाधान अल्पकाळ टिकले. एका काकदृष्टी असलेल्या वार्ताहराने हे भाषण म्हणजे बराक ओबामांच्या पत्नीने - मिखिल ओबामाने - चार वर्षांपूर्वी डेमोक्रॅट पक्षाच्या संमेलनात केलेल्या भाषणाची सहीसही नक्कल आहे, हे सप्रमाण दाखवून रिपब्लिकनांच्या तोंडचे पाणीच पळविले. हे म्हणजे आपल्या केजरी आणि दिग्गूराजांनाही मागे टाकण्यासारखे झाले. टिंगलटवळीला एकच ऊत आला आहे. इतका की, तोच एका स्वतंत्र लेखाचा विषय ठरावा. अमेरिकन राजकीय विश्लेषक जगातल्या खोचक पत्रकांराचे मुकुटमणी शोभावेत, असे आहेत. त्यांना आयतेच खाद्य मिळाले आहे. त्यांच्यासमोर आपले राजदीप, करण किंवा बरखा म्हणजे ‘किस झाडकी पत्ती’, अशी स्थिती आहे. पत्नीच्या भाषणाचा हा मुद्दा आता ८ नोव्हेंबरपर्यंत नवनवोन्मेषशाली ठरावा, असे प्रयत्न डेमोक्रॅट व पत्रकार करणार यात शंका नाही.
अनपेक्षित अडचण - याशिवाय अडचणीचा आणखी एक मुद्दा असा की, रिपब्लिकन पक्षाच्या अनेक दिग्गजांनी संमेलनाला दांडी मारली आहे. दोन माजी अध्यक्ष व अध्यक्षपदाचेच पण पराभूत झालेले दोन माजी उमेदवार हे संमेलनात दिसणार नाहीत. कुणी फिशिंगला गेले आहेत, कुणी अंगणातील गवत कापत ( लॅंड मोविंग) आहेत, कुणी ग्रॅंड कॅनियनला पदयात्रा (ट्रेकिंग) काढणार आहेत, याचवेळी सिनेट व हाऊसच्याही निवडणुका आहेत. त्यासाठीचे उमेदवार एकट्यानेच स्वतंत्र प्रचार करणार आहेत, काही मतदारांशी संपर्क दौरा आयोजित करीत आहेत. याच काळात एक महिला उमेदवार अलास्काला ४०००(चार हजार) मैल दूर विमानातून प्रचार करीत आहे. एक ना दोन. हजार कारणे पुढे येत आहेत.
अशी पक्षांतर्गत स्थिती आहे.
ट्रंप यांच्या प्रचाराचे मुख्य सूत्र - अशा परिस्थितीत ट्रंप यांचे कसे होणार?  त्यांचे प्रचाराचे मुद्दे कोणते राहणार? त्यांची बलस्थाने कोणती?  अतिरेक्यांविरुद्ध युद्ध पुकारणार, ही लोकांना आवडणारी सकारात्मक भूमिका, बेकारांना रोजगार, नोकऱ्यात अमेरिकनांना प्राधान्य, ही आकर्षक आश्वासने, डेमोक्रॅट पक्षाच्या देशहितविरोधी धोरणांचा निषेध, हिलरींनी खाजगी ईमेलचा सरकारी कामासाठी वापर केला व गुप्ततेचा भंग केला तसेच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला ही दखलपात्र गुन्हेगारी, मुस्लिमांकडून क्लिंटन फाऊंडेशनसाठी मदत घेतल्यामुळे अतिरेक्यांचे बाबतीत मिंधेपणाची व बोटचेपी भूमिका, गठ्ठा मतांसाठी अवैध घुसखोरांना नागरिकत्व दिले, अमेरिकन नोकऱ्यांवर परदेशींना कबजा करू दिला, हे हिलरी व डेमोक्रॅट पक्षाचे पाप आहे व ते आपण दूर करू, असा भरभक्कम मसाला ट्रंप यांनी गोळा केला आहे. त्यांची मतपेढी दिवसेदिवस वाढतच जाईल. आता ती आणखी खाली जाण्याची शक्यता नाही. आता सौभाग्यवती पुन्हा तोंड उघडतील असे वाटत नाही. पण संमेलनात ट्रंप यांच्या पहिल्या दोन पत्नींपासून झालेल्या चार चिरंजीवांचीही भाषणे अजून व्हायची आहेत. हा कार्यक्रम जर सुरळीत पार पडला की झाले. ‘अतिरेक्यांशी सरळ दोन हात करू इच्छिणारा धडाकेबाज नेता’ ही आपली प्रतिमा आपल्याला विजय मिळवून देईल, असा विश्वास ट्रंप बाळगून आहेत. म्हणूनच उमेदवारीची अधिकृत घोषणा होताच त्यांनी देशाला आश्वासन दिले, ‘अपार कष्ट करीन, तुमचा अपेक्षाभंग होऊ देणार नाही’.

No comments:

Post a Comment