Tuesday, July 19, 2016

अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वेगळेपण(२)
वसंत गणेश काणे
   असे होणार मतदान - अगोदर थोडी पार्श्वभूमी लक्षात घेऊ या. अमेरिकन संसदेची दोन सभागृहे आहेत. एक हाऊस (हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज ) व दुसरे सिनेट.
हाऊसमध्ये प्रत्येक राज्याला त्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्त्व असते. जसे कॅलिफोर्निया हे सर्वात मोठे राज्य आहे. त्याला हाऊसमध्ये ५३ प्रतिनिधी असतात. पण राज्य कितीही लहान असले तरी त्याला किमान एक तरी प्रतिनिधी हाऊसमध्ये मिळतोच. १९११ सालची लोकसंख्या गृहीत धरून केलेल्या हिशोबानुसार प्रत्येक राज्याची हाऊसमधील प्रतिनिधींची संख्या ठरवण्यात आली असून सध्या हाऊसची सदस्य संख्या ४३५ इतकी आहे.
सिनेटमध्ये प्रत्येक राज्याला दोन सिनेटर्स मिळतात. मग ते राज्य लहान असो वा मोठे. अमेरिकेत आजमितीला ५० राज्ये आहेत. त्यामुळे ५० ला दोनने गुणून येणारी संख्या १०० ही सिनेट मधील सिनेटर्सची संख्या असते. अशाप्रकारे जोपर्यंत राज्यांची संख्या ५० आहे तोपर्यंत सिनेटर्सची संख्या १०० व राज्याच्या लोकसंख्येचा विचार करण्यासाठी  १९११ सालची त्या त्या राज्याची संख्या हिशोबात घ्यायची हा निकष जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत हाऊसमधील प्रतिनिधींची (रिप्रेझेंटेटिव्हज) संख्या ४३५ कायम राहील.
  इलेक्टोरल काॅलेज - यात एकूण ५३८ सदस्य असतात. प्रत्येक राज्याच्या वाट्याला किती इलेक्टर्स असतील? त्या राज्याची प्रतिनिधींची (रिप्रेझेंटेटिव्हज) संख्या अधीक सिनेटर्सची संख्या असा तो नियम आहे. या नियमानुसार कॅलिफोर्नियाच्या वाट्याला ५३+२ =५५ इलेक्टर्स येतील तर लहानातलहान राज्याच्या वाट्याला १+२=३ इलेक्टर्स येतील. या न्याने ४३५+१००=५३५ ही संख्या येत असतांना इलेक्टर्स ५३८ कसे?विशेष कारणास्तव नेब्रास्का व मेन या दोन राज्यांना हे जास्तीचे इलेक्टर्स मिळतात. अशा प्रकारे ज्या उमेदवाराला २७० मते(इलेक्टर्स) मिळतील तो उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून येतो.
   पक्ष इलेक्टर्ससाठी उमेदवार कसे निवडतात? - प्रत्येक राज्याची इलेक्टर्ससाठी उमेदवार  निवडण्याची पद्धत वेगळी असते. यांचे नामनिर्देशन पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनात करतात. पक्षाचे अनुभवी व एकनिष्ठ कार्यकर्ते, पक्षाचे राज्य पदाधिकारी, अध्यक्षीय उमेदवार वा पक्षाशी जवळीक असलेल्या व्यक्ती यातून राज्यनिहाय इलेक्टर्स निवडले जातात. जसे कॅलिफोर्नयातून ५५ उमेदवारांची यादी प्रत्येक पक्ष तयार करील. अध्यक्षीय उमेदवारांच्या नावाखाली यांचा नावे असतात किंवा नसतात.
  विनर टेक्स आॅल- २०१२ मध्ये कॅलिफोर्नियात सामान्य मतदारांनी मतदान केले तेव्हा ओबामा व राॅम्नी याना अनुक्रमे ५१ व ४९ टक्के मते मिळाली. म्हणजे ओबामा यांना या राज्यात आघाडी मिळाली. म्हणून डेमोक्रॅट पक्षाचे सर्वच्यासर्व म्हणजे ५५ उमेदवार इलेक्टर्स म्हणून निवडून आले असे मानतात.मतांच्या टक्केवारीनुसार इलेक्टर्सची वाटणी होत नाही. या नियमाला ‘विनर टेक्स आॅल’ असे म्हणून संबोधतात.या नियमानुसार प्रत्येक राज्य त्या राज्याच्या वाट्याच्या सर्व इलेक्टर्ससह या किंवा त्या उमेदवाराकडे जाते. कॅलिफोर्नियाप्रमाणे फ्लोरिडा (२७+२=२९), न्यूयाॅर्क(२७+२=२९), टेक्सास(३६+२=३८) ही सुद्धा मोठी राज्ये आहेत. ही सुद्धा कुणतरी एकाकडे (क्लिंटन किंवा ट्रंप) जातील. अशाप्रकारे ज्याच्याकडे २७० इलेक्टर्स जातील तो निवडून येईल. कारण २७० इलेक्टर्सची २७० मते त्या उमेदवाराला मिळणार, हे उघड आहे. पण कुणालाच २७० इलेक्टर्स म्हणजेच त्यांची २७० मते मिळाली नाहीत तर काय होईल? हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हजच्या ४३५ प्रतिनिधींची तातडीची बैठक होईल व ते अध्यक्ष निवडतील. तसेच सिनेटचे सदस्य उपाध्यक्ष निवडतील. अध्यक्षीय निवडणुकीत सामान्य मतदारही मतदान करीत असतात. यांच्या मतांला पाॅप्युलर व्होट असे म्हणतात. समजा, एका उमेदवाराला ५० टक्यापेक्षा जास्त पाॅप्युलर व्होट्स मिळाली. पण दुसऱ्या उमेदवाराला इलेक्टोरल व्होट्स ५० टक्यापेक्षा जास्त मिळाली, तर कोण निवडून येईल? इलेक्टोरल व्होट्स ज्याला जास्त आहेत, तो. सामान्यत: ज्याला जास्त इलेक्टोरल व्होट्स मिळतात, त्यालाच पाॅप्युलर व्होट्सही जास्तच मिळतात, पण आजवर चारदा अपवाद घडला आहे.  १८२४, १८७६, १८८८ व अलीकडचे उदाहरण म्हणजे २००० अशी ही अपवादात्मक वर्षे आहेत. २००० साली डेमोक्रॅट पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार अल गोर यांना ४८.३८ टक्के पाॅप्युलर व्होट्स मिळाली तर त्यांचे रिपब्लिकन प्रतिस्पर्धी जाॅर्ज बुश यांना ४७.८७ टक्केच मते मिळाली. म्हणजे पाॅप्युलर व्होट्समध्ये अल गोर आघाडीवर होते. पण जाॅर्ज बुश यांना २७१ इलेक्टोरल व्होट्स मिळाली होती तर अल गोर २६६ च इलेक्टोरल व्होट्स मिळाली होती. त्यामुळे जाॅर्ज बुश यांना इलेक्टोरल व्होट्समधील आघाडीमुळे विजयी घोषित करण्यात आले.
  एक काल्पनिक उदाहरण घेऊ. - समजा ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये कुणालाच २७० इलेक्टोरल व्होट्सचा जादुई आकडा गाठता नाही, तर काय? म्हणजेच कुणालाच ५० टक्क्यापेक्षा जास्त इलेक्टोरल व्होट्स  मिळाली नाहीत तर काय? अशा परिस्थितीत हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हचे ४३५ सदस्य अध्यक्षाची निवड करतील. ८ नोव्हेंबर २०१६ लाच हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज ची निवडणूक होते आहे. हे सदस्य अध्यक्षाची व सिनेट उपाध्यक्षाची निवड करील.  ही परिस्थिती उद्भवली तर तो द्विपक्षीय राजकारणाच्या शेवटाचा आरंभ मानला जाईल.

No comments:

Post a Comment