Tuesday, July 19, 2016

अमेरिकेतील कुरघोडीचे राजकारण(१)
वसंत गणेश काणे,    

    कोणता विषय कसा तापवता येईल व त्याला कोणत्या दिशेने नेता येईल, हे राजकारण्यांकडून शिकावे, असे म्हणतात. त्याचप्रमाणे इथून तिथून सर्व राजकारणी सारखेच, असेही म्हणतात. हे विधान खरे की खोटे हे ठरविण्यासाठी पुरावे देण्याची जबाबदारी सामान्यत: ते करणाऱ्याची असते/असावी, हेही सर्वमान्य असायला हवे. पण काही विषय असे असतात की, ते पसरवण्यासाठी पुराव्याची आवश्यकता नसते कारण लोक पुरावे मागण्याच्या भानगडीतच पडत नाहीत. असे विषय शोधून काढून त्यांचा आपले म्हणणे सिद्ध करण्याचे बाबतीत राजकारण्यांचे हात कुणी धरू शकणार नाही.
    आॅर्लॅंडो हत्याकांड-  सध्या अमेरिकेत ‘गे’(समलिंगी) लोकांचा महिनाभर चालणारा उत्सव सुरू आहे. या काळात या प्रकारच्या व्यक्तींबद्दलचे विषय चर्चेला येणे ही एरवी एक सामान्य बाब ठरली असती. या मंडळींच्याही काही समस्या असतात. त्यांच्या सोडवणुकीचा मुद्दाही विचारात घेतला जावा, हा विषय या उत्सवाच्या काळातच समोर यावा याचेही आश्चर्य वाटायला नको. या मंडळींनी कोणती सार्वजनिक स्वच्छालये वापरावीत, महिलांसाठीची की पुरुषांसाठीची हा विषय या काळात नव्याने पुढे आला. त्यांनी त्यांना हव्या त्या स्वच्छतागृहाचा वापर करावा, असे मत व्यक्त होताच जोरदार विरोधी प्रतिक्रिया उमटायला प्रारंभ झाला. समलिंगी विवाहाला मान्यता देण्याचे कायदे अमेरितील राज्यांमध्ये पारित होत आहेत. या आणि अशा भूमिकांमुळे संतापलेल्या ओमर मतीनने - एका माथेफिरूने-  फ्लोरिडा राज्यातील आॅर्लॅंडो येथील पल्स नावाच्या केवळ गे लोकांसाठी असलेल्या नाईट क्लबमध्ये घुसून स्वयंचलित शस्त्राचा वापर करून ५० जणांचा बळी घेतला व शंभरावर लोकांना जायबंदी केले.
   ट्रंप यांचा निष्कर्ष- रिपब्लिकन पक्षाचे अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे गृहीत उमेदवर( प्रिझंप्टिव्ह कॅंडिडेट) ट्रंप या चतुर राजकारणी गड्याने या हत्याकांडाचा फायदा घेत म्हटले की, इस्लामी दहशतवादाबाबत मी सुरवातीपासूनच जे सांगत होतो, ते खरे निघाले की नाही ते पहा. आता ओबामांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायलाच हवा. मुस्लिमांच्या अमेरिकेतील प्रवेशावर बंदी घालायलाच हवी. कारण असे की, मतीन हा हत्यारा इस्लाम धर्मीय होता व त्याचे पूर्वज दोन पिढ्या अगोदर अफगाणिस्थानातून अमेरिकेत आले होते.
  हिलरी क्लिंटन यांचा नाईलाज-डेमोक्रॅट पक्षाच्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या गृहीत उमेदवर ( प्रिझंप्टिव्ह कॅंडिडेट) - हिलरी क्लिंटन यांना सुद्धा यावेळी अशीच कडक भूमिका तात्काळ  घेणे भाग पडले. आजचा दिवस राजकारण करण्याचा दिवस नाही. या प्रश्नाबाबत धरसोड उपयोगाची नाही. निर्धारपूर्वक इसीसचा समाचार घ्यायलाच हवा. जी मूल्ये उराशी बाळगून अमेरिका उभी आहे, ज्या मूल्यांचा आपल्याला अभिमान आहे, त्यांच्या रक्षणासाठी इसीसशी युद्ध केले पाहिजे. थोडक्यात काय तर अशा प्रकारे दोन्ही पक्षांनी या घटनेचे ‘इस्लाम कनेक्शन’ गृहीत धरले आहे.
एका समाजशास्त्रज्ञाची भूमिका - वास्तवीक या प्रश्नाचे समाजशास्त्रीय विश्लेषण करणारा एक विस्तृत लेख एका अधिकारी व्यक्तीने लिहिला आहे. जेम्स अॅलन फाॅक्स हे गुन्हेगारीशास्त्र (क्रिमिनाॅलाॅजी), कायदा व सार्वजनिक धोरण(पब्लिक पाॅलिसी) या विषयांचे नाॅर्थ इस्टर्न विद्यापीठात प्राध्यापक असून त्यांनी याबाबतची आपली भूमिका व मते वृत्तपत्रात मांडली आहेत. ते म्हणतात, या प्रश्नाचा सर्व बाजूंनी विचार होणे आवश्यक आहे. एकदम निष्कर्ष काढणे बरोबर नाही. तसे न करता एकदा का हे अतिरेक्यांचे कृत्य आहे, अशी आपली समजूत आपण करून घेतली की, हत्याऱ्याच्या अडनावावरून आपण त्याची जातकुळी ठरवून मोकळे होतो. भरीस भर ही की, स्वत:ला इसीसचा प्रवक्ता म्हणवणारी व्यक्ती जेव्हा या घटनेची लगेच दखल घेते आणि पाप्यांना रमझानच्या काळात शिक्षा करणारी ही व्यक्ती, इसीसच्या वतीने विशेष पारितोषिकाची मानकरी ठरेल, असे जाहीर करते, तेव्हा तर जणू आता शंकेला वावच उरलेला नाही, असे आपण समजून चालत आहोत. हा लेख म्हणजे या विषयाचा शास्त्रशुद्ध विचार करणारी अमेरिकेतील एक अधिकारी व्यक्ती कशाप्रकारे विचार करते, याचा नमुना ठरावा, असा आहे.
   संरक्षण व शस्त्रास्त्र विषयाच्या तज्ञाचे मत - असाच दुसरा लेख संरक्षण व शस्त्रास्त्रे या विषयाचे तज्ञ  टाॅमस डेव्हिस यांनी लिहिला आहे. हे एक सेवानिवृत्त सैनिकी अधिकारी असून त्यांनी आपली मते मांडतांना म्हटले आहे की, शस्त्रास्त्र वापराबाबत सैन्यात जे नियम पाळले जातात, निदान त्यांचे जरी पालन करण्याचा आग्रह आपण सर्वसाधारण व्यक्तींचे बाबतीतही धरला तरी आॅर्लॅंडो सारखी हत्याकांडे होणार नाहीत. हे एका माथेफिरूचे कृत्य आहे, असे वाटते.
टाईम्सची संयमित भूमिका - ओर्लॅंडो हत्याकांड प्रकरणी ‘टाईम’ या जगविख्यात मासिकाची प्रतिक्रिया सर्वात परिपक्व मानली जाते. या मासिकाने आपल्या मासिकाचे मुखपृष्ठ काळ्या रंगात छापले असून त्यावर पांढऱ्या रंगात हत्याकांडात बळी पडलेल्या पन्नास स्त्रीपुरुषांची नावे एकाखाली एक अशी पानभर छापली आहेत आणि सोबत लाल रंगात प्रश्न उपस्थित केला आहे,‘ व्हाय डिड दे डाय?’ आतमध्ये या विषयाचे सविस्तर विवेचन करणारा लेख आहे. या प्रतिक्रियेचे अराजकीय व विचार करायला भाग पाडणारे स्वरूप दीर्घ काळ नजरेसमोर येत रहावे असे आहे. पण अमेरिकेतील निवडणुकीच्या राजकारणातच नव्हे तर एरवीही असे गंभीर विचार कुणाच्याही पचनी पडत नाहीत.

No comments:

Post a Comment