Tuesday, July 19, 2016

 अमेरिकेतील अटीतटीचा सामना
वसंत गणेश काणे
 अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांच्या विरोधात भरपूर दारूगोळा विरोधकांजळ ठासून भरलेला तयार आहे, याची कल्पना असल्यामुळेच रिपब्लिकन पक्ष त्यांच्या पाठीशी आपली सर्व शक्ती एकवटण्याच्या खटाटोपात लागला आहे. अमेरिकन नागरिकांपैकी इतर सर्वसामान्य विरोधक बाजूला ठेवून विचार करायचा म्हटले तरी ट्रंप यांना कृष्णवर्णी आणि स्पॅनिश मतदार यांचा असलेला परकोटीचा विरोध तर कुणाच्या छातीत धडकी निर्माण करील, इतका तीव्र व टोकाचा आहे. कारण ही गठ्ठामते आहेत. ही मते एरवीही डेमोक्रॅट पक्षाकडेच झुकलेली असतात. त्यांचा ट्रंप यांच्यावर विशेष रोष आहे. त्यामुळे मतदानाचे अंदाजे आकडे ट्रंपच कशाला, इतर कोणत्याही रिपब्लिकनाच्या विरोधात कायमस्वरूपी झुकलेले दिसत आहेत.
  असे असूनही ट्रंप हिलरी क्लिंटन यांच्यापासून हाकेच्या अंतरावरच आहेत, असेच म्हणायला हवे. कारण स्विंग स्टेट्स या नात्याने निवडणुकीचा निकाल फिरवण्याची क्षमता असलेल्या राज्यात आता ट्रंप यांचे बस्तान हळूहळू बसतांना दिसत आहे. असे का होत असावे? हिलरी क्लिंटन अनेकांना आवडत नाहीत, हे कारण तर आहेच, याशिवाय एक आणखी मुख्य कारण असेही आहे की, त्यांची विश्वसनीयता अनेकांच्या दृष्टीने पार रसातळाला गेली आहे. जेव्हा मतदारांसमोर फक्त दोनच पर्याय असतात तेव्हा पहिला पर्याय जर नको असेल तर दुसऱ्या पर्यायाशिवाय अन्य मार्गच उरत नाही. यामुळेच ट्रंप रणांगणात कायम आहेत.
   न्यूयाॅर्क टाईम्स व सीबीएस यांनी केलेले सर्वेक्षण उदाहरण म्हणून घेता येईल. या सर्वेक्षणातील पहिलाच प्रश्न बघा. हिलरी क्लिंटन प्रामाणिक व विश्वसनीय आहेत किंवा नाहीत? ६७ टक्के मतदार म्हणतात की, त्या प्रामाणिक व विश्वसनीय नाहीत. किती? थोडेथोडके नाहीत, तर तब्बल ६७ टक्के. अर्थात, यात रिपब्लिकन पक्षाकडे कल असलेले मतदारही आहेत. त्यातले तर ९३ टक्के मतदार त्यांना अप्रामाणिक व अविश्वसनीय मानतात, हे विशेष नाही. पण सॅंपलमध्ये ३/४ मतदार असे आहेत की जे डेमोक्रॅट किंवा रिपब्लिकन अशा कोणत्याच पक्षाचे मतदार नाहीत. अन्य २५ टक्यातील जे मतदार स्वत:ला डेमोक्रॅट पक्षाचे समर्थक म्हणवतात, त्यातल्यासुद्धा दर तीन पैकी एका मतदाराला वाटते की, क्लिंटन प्रामाणिक व विश्वसनीय नाहीत.  हिलरी क्लिंटन यांच्या समर्थकांपैकीच ३३ टक्के मतदार असे आहेत. हा आहे की नाही बुचकळ्यात टाकणारा मुद्दा? क्लिंटन यांच्यासाठी ही बाब धक्कादायक व धोकादायक नाही का?
  पण हीही बाब खरी आहे की, प्रामाणिकपणा व विश्वसनीयता याबाबत ट्रंप यांची कीर्तीही कौतुक करावी अशी नाही. ६२ टक्के लोक ट्रंप यांना प्रामाणिक व विश्वसनीय मानत नाहीत. स्वत:ला रिपब्लिकन पक्षाचे समर्थक म्हणवणाऱ्यांपैकी सुद्धा ३२ टक्के मतदार ट्रंप यांना प्रामाणिक व विश्वसनीय मानीत नाहीत, असा प्रकार ट्रंप यांच्या बाबतीतही आहे. या दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये त्यांना अप्रामाणिक व अविश्वसनीय मानत आहेत हा प्रकार म्हणजे ‘हम सब चोर है।’, या प्रकारचा झाला नाही का? एक चोर तर दुसरा लुटारू. यातूनच मतदारांना कुणातरी एकाची निवड करायची आहे.
  पण एक मुद्दा ट्रंप यांच्या खूपच बाजूचा आहे. त्यांना जुनी पद्धत उखडून टाकायची आहे. ते केवळ प्रस्थापितांच्या विरुद्ध आहेत, एवढेच नाही तर ‘ज्याप्रकारे राजकारण करू नये, असे आम्हाला वाटते आहे’, तसेच ट्रंप म्हणत आहेत, याचे मतदारांना आकर्षण वाटते आहे. तर हिलरी क्लिंटन नेमके उलट म्हणत आहेत. त्यांचा भर  स्थरता(स्टेडीनेस), सातत्य व अनुभव यावर आहे.
   कोणत्याही प्रचलित मापदंडांच्या आधारे ट्रंप यांचे मूल्यमापन करता यायचे नाही. त्यांचे कार्य कसे असावे व त्यांनी कारभार कसा करावा याबाबत निरनिराळ्या लोकांच्या वेगवेगळ्या अपेक्षा आहेत. असा प्रकार क्लिंटन यांचेबाबतीत नाही. त्यांची मते, त्यांची भूमिका, त्यांची वैचारिक बैठक  सर्वज्ञात आहे त्या स्वभावत: नोकरशाही वृत्तीच्या आहेत. सामान्य लोकांसाठी राज्यकारभाराचा शकट कसा हाकावा हेच त्यांना त्यातल्यात्यात बऱ्यापैकी माहीत आहे. चाकोरीबाहेर जाऊन काहीतरी करण्याचा त्यांचा पिंड नाही.
  आज त्या काहीशी वेगळी भाषा वापरत आहेत, हे खरे. पण जे त्या आज म्हणत आहेत, त्यानुसार त्या भविष्यातही वागतील यावर विश्वास नसेल, तर मतदारांनी तरी त्यांना मत का द्यावे? यापेक्षा अगदी बेधडकपणे वेगळी मांडणी करणारे ट्रंप बरे नव्हेत का?
आतापर्यंत हिलरी क्लिंटन स्वत: प्रामाणिकपणा- विश्वसनीयतेबाबतची टीका हसण्यावारी नेत असत. पण हा मुद्दा हारजीत ठरविण्याइतका महत्त्वाचा झाला आहे, हे त्यांना आता पुरतेपणी उमगले आहे. म्हणून मतदारांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी मला काहीतरी करावेच लागेल, असे त्या वारंवार म्हणत असल्याचे वृत्त आहे.
   विश्वसनीयता परत मिळविण्यासाठीसाठी क्लिंटन खूप व जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत. ट्रंप यांना असे काही करण्याची गरज नाही. मतदार जेव्हा जुनेजरठ उखडून टाकण्याचे ठरवतात, तेव्हा जुन्याला ‘मरणालगुनि’ जावेच लागते हा नियम आहे. त्यातही महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, विश्वसनीयतेबातचा क्लिंटन यांचा स्कोअर उत्तरोत्तर कमी होण्याचीच शक्यता आहे. विश्वसनीयतेची ही घसरगुंडी हिलरी थोपवू शकल्या नाहीत तर काय? मतदारांनी बदल घडवून आणण्याचा निर्णय केला तर? असे घडेल का? यावर ट्रंप यांच्या जिंकण्याच्या आशा उत्तरोत्तर पल्लवीत होणार आहेत. उलट हे विधान अधिक बरोबर ठरेल की, क्लिंटन यांची जिकण्याची शक्यताच दिवसेदिवस धूसर होत जाणार आहे.

No comments:

Post a Comment