Sunday, July 31, 2016

      श्यामसुंदर वैद्य - सुरवातीपासूनचा साथीदार 
वसंत गणेश काणे 
शिक्षक परिषदेची स्थापना १९७० साली झाली. या प्रारंभीच्या काळात जी मोजकी शिक्षक मंडळी साथीला लाभली, त्यात श्री शामसुंदर वैद्य यांचा प्रामुख्याने उल्लेख करवयास हवा. त्या काळी शिक्षक परिषदेचे काम नागपूर शहरात तर अतिशय मर्यादित स्वरुपातच  होते. सर्वश्री  कै गणपतराव वैद्य, कालिदासजी सालोडकर यांचे बोट पकडून मी परिषदेच्या कामात सहभागी झालो होतो. माझ्या जावा मोटर सायकलवर गणपतरावांना घेऊन शाळाशाळात जाणे शिक्षकांशी संपर्क साधणे, ही प्रमुख कामे आम्ही करीत असू. गणपतरावांचे व्यक्तिमत्त्व, कार्यकर्ता म्हणून असलेली ओळख यामुळे लोक वरवर गोड बोलून आमची बोळवण करीत. ‘आज शाळेत जावा मोटर सायकलवर परिषद येऊन गेली’, असा कुचेष्टेने उल्लेख करीत.
 नागपूर शहरात थोडेसे तरी काम होते. नागपूर ग्रामीण मध्ये तर शिरकावच नव्हता. एके दिवशी सकाळी श्री श्यामसुंदरजी भेटीला घर शोधित शोधित आले. त्यांना गणपतराव वैद्यांनी माझी भेट घेण्यास पाठविले होते. त्यांचे सेवाविषयक प्रकरण होते. त्यातील काही मुद्दे आता आतापर्यंत तरी न्यायप्रविष्ट होते, म्हणून  त्याचा उल्लेख करीत नाही. पण प्रकरण असाधारण स्वरुपाचे होते. सहजासहजी निकालात निघणारे नव्हते. प्रतिपक्षाला जुन्या संघटनेचा पाठिंबा होता. विधानपरिषदेतही त्याच संघटनेचा प्रतिनिधी होता. हे प्रकरण किचकट व बिकट आहे, आपणाला सोडवतांना अतिशय कठीण जाईल, असे मी गणपतराव वैद्यांना सांगितले. यावर ते म्हणाले, ‘प्रकरण सोपे असते तर आपल्याकडे आलेच नसते. परस्पर निकालात निघाले असते. नियमात बसते किंवा नाही, ते सांग’. यावर मी म्हणालो, ‘या प्रश्नाबाबत  नियमात अनुकूल किंवा प्रतिकूल अशी कोणतीच तरतूद नियमात नाही’. नागपुरातील ख्यातनाम वकील व पुढे हायकोर्टात न्यायधीशपदी नियुक्त झालेले कायदेपंडित श्री. अजित देशपांडे हे आमच्या परिचयाचे होते. प्रामाणिक सार्वजनिक कार्यकर्ते अशी त्यांची आमच्याबाबतची समजूत असावी. ते आम्हाला न कंटाळता सल्ला देत असत. त्यांचा सल्ला घेण्याचे आम्ही ठरवले. ‘एखादी गोष्ट करू नये, अशी कायदा करणाऱ्यांची इच्छा असेल तर तशी स्पष्ट तरतूद ते नियमात करतात. तशी स्पष्ट तरतूद नसेल ( बार/प्रतिबंध नसेल) तर व्यवस्थापनादी घटक आपला विवेकाधिकार वापरू शकतात’ , असे काहीसे ते म्हणाल्याचे आठवते. आम्ही श्यामसुंदरजींचे प्रकरण स्वीकारले. ही लांब चालणारी व दमछाकीची लढाई होती. यश मिळत नव्हते. अधूनमधून प्रतिकूल भूमिकाच घेतली जायची. सुरवातीला श्यामसुंदर नाराज होत. पण पुढे त्यांना परिषदेच्या सच्चेपणाची खात्री पटली. ते स्वत:ही लढवैयेच होते. ते आमच्यातलेच एक झाले.
   त्यांच्या रूपाने नागपूर ग्रामीण भागात एक कार्यकर्ता परिषदेला मिळाला. तेव्हापासूनचा त्यांचा परिषदेवरचा लोभ कायम होता. एखादे प्रकरण निकालात निघाले की, ते त्याबाबतचे सर्व दस्तऐवज आणून माझ्या स्वाधीन करीत. ‘माझे काम झाले, इतरांच्याही उपयोगी पडू शकतील, म्हणून ती कागदपत्रे ते माझ्या स्वाधीन करीत. ती आजही माझ्याजवळ आहेत. अधूनमधून कागदपत्रे चाळतांना ती दृष्टीस पडत. आणि स्मृतींना उजाळा मिळे.
 पुढे शिक्षक बॅंकेच्या निमित्ताने जणू नव्याने ओळख झाली. पण जुन्या गोष्टीही आठवत. माझे वर्तनानपत्रातले लेख वाचल्यावर दर भेटीत ते त्या बाबत काहीना काही उल्लेख आवर्जून करीत.
 आज संघटना मोठी झाली आहे. शिखरस्थानी असलेल्यांना आपोआप प्रसिद्धी मिळत असते. परिषदेचे खंदे कर्तेधर्ते म्हणून त्यांचा आपोआप परिचय होत असतो. पण परिषदेचा पाया रचला गेला त्यावेळी एखाद्या निमित्ताने जवळ आलेले व परिषदेचेच झालेले कार्यकर्ते आजच्या पिढीला माहीत नसतात. त्यांचा व त्यांच्या कार्याचा परिचय अशाप्रकारे एका श्रद्धांजलीपर लेख लिहितानाच नवीन पिढीला करून देतांना  थोडे अवघडल्यासारखे वाटत असले तरी या निमित्ताने तरी आपण आपल्या सहकाऱ्याच्या रुणाचा उल्लेख करावा, असे वाटून गेले. ईश्वर श्यामसुंदरजींच्या आत्म्याला सद्गती देवो व त्यांच्या वियोगाचे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या आप्तेष्टांना देवो, ही त्या जगनियंत्याच्या चरणी प्रार्थना

No comments:

Post a Comment