Saturday, January 21, 2017



सीरिया काल, आज आणि उद्या
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
एखाद्या देशातील जनता एकाच घराण्याच्या ४० वर्षांच्या जुलमी राजवटीखाली सतत पिचली जात असेल तर तिच्या मनात त्या राजवटीबद्दल किती चीड असेल, याची कल्पनाच केलेली बरी. सीरिया या अतिप्राचीन राष्ट्राची स्थिती अशीच आहे. सीरिया, लेबॅनाॅन, जाॅर्डन व इस्रायल व तुर्कस्थान या देशांच्या सीमा एकमेकींना स्पर्श करतात. गेली दीड हजार वर्षे सीरियावर कुणाचे ना कुणाचे आक्रमण  होत आलेले आहे. प्रथम इजिप्त, नंतर हिब्रू, नंतर आसीरियन, मग चाल्डीन्स, व शेवटी पर्शिया असे लोक एका मागोमाग एक सीरियावर तुटून पडले. यानंतरच्या काळात सीरिया रोमन साम्राज्याचा हिस्सा झाले व नंतर पुढे आॅटोमन साम्राज्यात ते खालसा केले गेले. पहिल्या महायुद्धानंतर आॅटोमन साम्राज्याचे तुकडे झाले व फ्रान्सकडे आजच्या सारियाचा ताबा आला.
असाद राजवटीचा प्रारंभ - १९६१ साली सीरियाने आपले स्वांतत्र्य घोषित केले. हफीज अल असादने १९७० मध्ये सत्ताग्रहण केले. तेव्हा पासून सीरियावर या कुटुंबाची राजवट सुरू आहे. तेव्हापासूनच अंतर्गत संघर्षासोबत इस्रायल व लेबॅनाॅन बरोबरही लहानमोठ्या कुरबुरी सुरूच आहेत. जनता युद्धाला पार विटली असून गृहयुद्धात निदान एक लाख लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.
सीरियाचे स्वरूप - जवळपास दोन कोटी लोकसंख्या, ७२ हजार चौरस मैल भूभाग, सपाट व समतल किनारा, लहान लहान टेकड्या व फक्त वाळवंट अशी भौगोलिक स्थिती असलेल्या सीरियाची दमास्कस ही राजधानी असून सुरवातीपासून आजतागायत लोकांचा रहिवास असलेले हे जगातले एक सर्वात जुने शहर आहे, असे मानले जाते. ते आजवर कधीही ओसाड पडले नव्हते. बहुतेक लोक मुस्लिम धर्माचे व सुन्नी पंथीय असून फार थोडे लोक ज्यू व ख्रिश्चन आहेत. अरेबिक, अर्मेनियन, कुर्दिश, सर्कॅशियन, फ्रेंच व इंग्लिश भाषा सीरियात बोलल्या जातात. सरासरी आयुर्मान ७० वर्षे असून ७७ टक्के लोकांमध्ये वाचनक्षमता आहे.
एकेकाळची वैभवसंपन्न शहरे -  दमास्कस शहरात उमय्याद नावाची मुस्लिमांच्या दृष्टीने चौथ्या क्रमांकाचे महत्त्व असलेली पवित्र मशीद आहे. हिलाच ग्रेट माॅस्क आॅफ दमास्कस असेही म्हणतात. याच शहरात सलादिन राजाची कबर सुद्धा आहे. जाॅन दी बाप्टिस्ट हा पहिल्या शतकातील  मोठा  ख्रिश्चन धर्मगुरू मानला जातो.या जाॅन बाप्टिस्टाचे श्रद्धास्थान (श्राईन) सुद्धा इथेच आहे.
ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात अलेप्पो शहरातील तटबंदी असलेला बालेकिल्ला बांधला गेला. हा सर्वात मोठा, सर्वात जुना व आजही मजबुतीने उभा असलेला किल्ला आहे.
आर्टेमिसिया नावाच्या वनस्पतीपासून तयार केलेले अल्कोहोलयुक्त पेय या अलेप्पो शहरात तयार होत असे असे मानतात. हे पारदर्शक, स्वच्छ व अगोड  असे अल्कोहोलयुक्त पेय  आहे. लेव्हंट संस्कृतीत या पेयाचे स्थान विशेष मानले जाते. लेव्हं हा शब्द घटना, व्यक्ती व प्रदेशवाचक असा अनेक अर्थांनी वापरला जातो. हा शब्द प्रदेशवाचक म्हणून वापरला जातो तेव्हा यात सायप्रस, इजिप्त, इराक, इस्रायल, जाॅर्डन, लेबॅनाॅन, पॅलेस्टाईन, सीरिया आणि तुर्कस्थान हे प्रदेश/देश/राष्ट्रे अभिप्रेत असतात.
रोमन अरेबियाची बसरा ही राजधानी होती. ख्रिस्त जन्मानंतर एक वर्षानी येथे एक सभागृह बांधण्यात आले यात अजूनही संगीत महोत्सव साजरे होत असतात.
सीरियाला धार्मिक व ऐतिहासिक कारणांनी भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेदिवस कमी होत चालली आहे. आता ही संख्या जेमतेम १/४ इतकीच उरली आहे. सीरियातील युद्धभूमींना भेट देण्याची योजना एका रशियन कंपनीने आखली असून ‘वाॅर टूरिझम’ हा प्रवास प्रकार नव्याने युरू केला आहे.
दमास्कस शहर पोलादासाठीही प्रसिद्घ असून येथे तयार झालेल्या तलवारी तीक्ष्ण धारदारपणासाठी प्रसिद्ध आहेत. मानवजातीतील पहिला खून सीरियामध्ये झाला होता, अशी समजूत आहे. दमास्कस जवळील कासन पर्वतावर ॲडम आणि ईव्हच्या पुत्राने - केनने - आपला भाऊ एबल याचा खून केल्याची दंतकथा आहे. हा खुनाचा पहिला रिपोर्ट मानला जातो.
हामा शहरातून वाहणाऱ्या ओरोंटेस नदीवर १३६१ साली रहाटगाडगी (नोरीस) बांधून पाणी उपसले जायचे. यापैकी आज फक्त १७ शिल्लक आहेत. यांचाही फारसा वापर होत नाही. त्यांच्याकडे प्रेळक्षीय वस्तू म्हणूनच पाहिले जाते.  यांना जागतिक वारसा मानले जावे असा प्रयत्न आहे. सीरियातूनच युफ्रेटिस नदी वाहते. मेसोपोटॅनियम संस्कृतीचा उदय या नदीच्या काठी झाला, असे मानतात.
मजबूत तटबंदी असलेला बालेकिल्ला हे अलेप्पो शहराचे वैशिष्ट्य असून सुद्धा या शहरावर दहा आक्रमकांनी आजवर मोजून दहा वेळा आक्रमणे केली आहेत. दमास्कस हे शहर ख्रिश्चन धर्ममताशीही कायम संबंधात राहिले आहे.
दमास्कस शहराचे ख्रिश्चनांसाठी महत्त्व अशासाठी आहे की, प्रेषित पाॅलने येशू ख्रिस्ताची शिकवण पहिल्या शतकात दमास्कसच्या वाटेवर असतांना सांगितलेली आहे, असा उल्लेख न्यू टेस्टामेंटमध्ये आहे. याचे मूळ नाव सोल आॅफ तारसस असे होते. तुर्कस्थानमध्ये जन्मलेल्या तारससने इटालीतील रोम शहरात असतांना जगाचा निरोप घेतला.
एकेकाळचा बृहत् सीरिया - भूमध्य समुद्राच्या पश्चिम तटाला लागून असलेल्या सर्व भूभागावर  सातव्या शतकात उमाय्यद खिलापतीचा अंमल होता. पहिल्या महायुद्धानंतर याचे तुर्कस्थान, इराक, जाॅर्डन, इस्रायल आणि लेबॅनाॅन व सध्याचा सीरिया असे तुकडे झाले व सीरियावर फ्रेंचांना ताबा मिळाला.
बाथ पक्षाचा उदय - १९६३ पासून सीरियन राजकारणावर बाथ या पक्षाचा ताबा आहे. १९४७ साली पॅनअरब नॅशनॅलिस्ट ॲंड सोशॅलिस्ट रिनेसन्स मूव्हमेंट या लांबलचक नावाने ही चळवळ सुरू झाली. एकता, स्वातंत्र्य व सामाजवाद ही तत्त्वत्रयी समोर ठेवून सुरू झालेली ही चळवळ पुढे मा्त्र भरकटली. हफीज अल असाद याच्या नेतृत्वाखाली १९७१ ते २००० पर्यंत बाथिस्टांनी एक समर्थ एकछत्री राजवट स्थिरपद केली पण जनतेला मात्र दडपशाहीला सहन करावे लागले.
नशीबाने झालेला अध्यक्ष - बशर अल असाद लंडनला नेत्ररोगचिकित्सेचे ( आॅप्थॅल्माॅलाॅजी)  शिक्षण घेत होता. त्याचा मोठा भाऊ मोटार अपघातात १९९४ मध्ये दगावला. तो खरा तर वारस होता. पण त्याचे अपघाती निधन झाले.  त्यामुळे बशर अल असादला तातडीने सीरियाला परत यावे लागले. त्याच्या गळ्यात सैन्याच्या अधिपतीपदाची व बाथ पक्षाच्या अध्यक्षपदाची माळ घालण्यात आली. त्याचे वय ३४ वर्षांचेच असल्यामुळे तो सीरियाच्या अध्यक्षपदाचा दावेदार होऊ शकत नव्हता. पण अध्यक्षपदासाठीच्या अटी तातडीने बदलण्यात आल्या व सार्वमताने तो अध्यक्षपदी विराजमान झाला. आस्मा आख्रास ही त्याची पत्नी सुद्धा ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या सिरियन दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेली व व्यवसायाने बॅंकिंगक्षेत्रातली आहे. ध्यानीमनी नसताना बशीर झाला अध्यक्ष व आस्मा झाली पहिली मानांकित महिला(फर्स्ट लेडी).
पहिला संघर्ष - भ्रष्टाचारी, क्रूर, कपटी अशी असादची ख्याती. अमेरिकेने घेतली विरोधकांची बाजू. मग रशियाने काय करावे? तो उभा राहिला असादच्या पाठीशी. हा पहिला संघर्ष. सीरियामध्ये १९६३ ते २०११ या ४८ वर्षांच्या दीर्घ काळात आणीबाणी होती. २०११ साली सीरियात गृहयुद्ध सुरू झाले. भीषण नरसंहार झाला, अनेक परागंदा झाले. म्हणूनच कदाचित  सीरिया हा पृथ्वीवरील तसा अलगथलग पडलेला भूभाग असला तरी गृहयुद्धामुळे परगंदा झालेले सीरियन नागरिक जगभर विखुरलेले आढळतात.
सीरियाचा ध्वज - सीरियाच्या राष्ट्रध्वजावर दोन तारे आहेत. एकेकाळी सीरिया व इजिप्त या दोन देशांचे एक संयुक्त राष्ट्र होते, हे तारे त्याचे निदर्शक आहेत. आज हे दोन देश वेगळे झाले असले तरी तारे जुन्या इतिहासाची साक्ष देत सीरियाच्या राष्ट्रध्वजावर कायम आहेत. सीरिया संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थापक सदस्यापैकी एक आहे. आॅटोमन साम्राज्याचे विघटन होण्यापूर्वी सीरिया हा त्या साम्राज्यातला सर्वात मोठा प्रांत होता.असाद नावाचे  सर्वात मोठे मानवनिर्मित सरोवर १९६८ सालपासून सीरियात आहे.
दमास्कसची विशेषता - दमास्कस या राजधानीच्या शहरातील वस्तुसंग्रहालयात इतिहासपूर्व कालापासून आधुनिक कालापर्यंतचे अवशेष व  मानवनिर्मित वस्तूंचा संग्रह आहे. दमास्क याचा अर्थ कलाकुसरीने विणलेले कापड असा असून यावरून दमास्कस हे नाव पडले आहे. दमास्कसला जॅस्मीन सिटी म्हणून संबोधतात, या शहराचे वैशिष्ट्य असे आहे की, या शहरात अतिप्राचीन काळापासून मानवाचे अस्तित्त्व कायम असलेले आढळून येते.
कृत्रिम विभाजनाचे परिणाम कृत्रिम मैत्रीचे प्रयत्न  - सीरिया, लेबॅनाॅन, जाॅर्डन व इस्रायल व तुर्कस्थान या देशांच्या सीमा ज्या दरीत मिळतात, ते प्रतिध्वनी निर्माण करणारे स्थळ असून त्याला शाऊिंटंग पाॅईंट असे नाव आहे. इथे ओरडून लोक परदेशातील नातेवाईकांशी संपर्क साधतात. जमिनीचे तुकडे झाले पण नाती गोती कायम राहिली. मुस्लिम व ख्रिश्चन यात आजवर कधीही सख्य नसून सख्य निर्माण करण्यासाठी २००१ मध्ये दुसरे जाॅन पाॅल हे पोप दमास्कस मधील उमाय्यद मशिदीला भेट देणारे एकमेव ख्रिश्चन धर्मगुरू आहेत.

दुसरा संघर्ष- सध्या सीरिया जागतिक युद्धभूमी झालेली असून ३४ देशांची सैन्ये इसीस ( इस्लामिक स्टेट आॅफ इराक ॲंड सीरिया) विरुद्ध निर्वाणीची लढाई लढत आहेत. सीरियात सुन्नींची संख्या जास्त पण राजवट मात्र सुन्नी नसलेल्याची - असादची. म्हणून इसीसने सीरियाला प्रथम मुक्त करण्याचे ठरविले. आता असादला दोन लढाया लढाव्या लागत आहेत. पहिली लढाई आहे अंतर्त विरोधकाशी. यात अमेरिकेने विरोधकांची बाजू घेतली आहे.दुसरी लढाई सुरू आहे, इसीसशी. या लढाईत अमेरिकेची भूमिका आहे इसीसच्या विरोधातली. म्हणजे पर्यायाने असादच्या बाजूची. अशा पेचात अमेरिका सापडली आहे. रशियाने असादला पाठिंबा दिलेला आहेच. आता रशियाने इसीस विरोधात बाॅम्बवर्षाव करायला सुरवात केली आहे. पण अमेरिका व रशिया स्वतंत्रपणे इसीसवर हल्ले चढवीत आहेत. अमेरिका सीरियन बंडखोरांवर बाॅम्ब टाकीत नाही.कारण ती विरोधकांच्या/बंडखोरांच्या बाजूने आहे. रशिया मात्र दोघांनाही (विरोधक/बंडखोर व इसीसचे सैनिक) बाॅम्ब टाकून ठोकून काढतो आहे. बायका,मुले, म्हातारे या कुणाचाही विचार न करता बाॅम्ब डागतो आहे.
संघर्षाचे जागतिक परिणाम - सीरियातील संघर्षाला जागतिक आयाम प्राप्त झाला असून नागरिकांच्या स्थलांतरामुळे संपूर्ण युरोपभर सोयीसुविधा व सुरक्षा विषयक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. या स्थलांतराची तुलना दुसऱ्या महायुद्धात झालेल्या स्थलांतराशीच होऊ शकेल. प्रारंभी भूतदयेच्या भूमिकेतून युरोपियन देशांच्या सरकारांनी स्थलांतरितांना सामावून घेण्याची भूमिका घेतली. पण यांच्यासोबत येणाऱ्या छुप्या अतिरेक्यांच्या उच्छादामुळे व नागरी सोयीसुविधांवर पडणाऱ्या ताणामुळे युरोपातील सर्वच देशातील लोकमत यांना आश्रय देण्यास टोकाचा विरोध करू लागले आहे. जमिनीवरून येणाऱ्या स्थलांतरितांच्या लाटा संहार करून नष्ट करणे किंवा स्थलांतर करणाऱ्यांना अडवणे अशक्य आहे. समुद्रमार्गे येणारी स्थलांतरितांची जहाजे बुडविणे हाच मार्ग अवलंबिता येणे शक्य आहे पण व्यवहारत: हे अशक्य आहे. मात्र येणाऱ्या बोटी येता येता अनेकदा समुद्रातन बुडतात.
पाॅप्युलेशन बाॅम्ब - या जनलाटांना थोपवणे अशक्य झाल्यामुळे संपूर्ण युरोपमधील जनजीवन बाधित झाले आहे. हाच उद्देश समोर ठेवून इसीसने आखलेली ही पाॅप्युलेशन बाॅम्बची रणनीती यशस्वी होतांना दिसत आहे.  एकूण ५० लक्ष लोक युरोपात घुसवायचे, असा इसीसचा डाव असून सीरिया मधून येत असलेले निर्वासित हा याच योजनेचा भाग आहे. रशिया व अमेरिका या दोन जागतिक महासत्ता वेगवेगळेपणी पण इसीसला मात देण्याच्या एकाच उद्देशाने या लढाईत सहभागी झाली आहेत. पण त्यांच्यातही एकमेकांवर दोषारोपण करण्याचे शीतयुद्ध, रुसवेफुगवे व कुरबुरी सुरूच असतात.
खरे बाॅम्ब -  डिसेंबर २०१५ अमेरिका या युद्धात उतरली असून ९००० वेळा तिने हवाई हल्ले केले आहेत. आपण फक्त सैनिकी तळांवच हल्ले करू अशी अमेरिकेची नीती आहे. काही अपघाती (चुकून झालेले हल्ले) अपवाद वगळता अमेरिकेने हे पत्थ्य पाळलेले दिसते.
 जमिनीवरील युद्धात मात्र अमेरिका सहभागी नाही. कारण या युद्धात मनुष्यबळाची हानी पत्करावी लागते. अमेरिकन जनता आपल्या सैनिकांचा बळी देण्यास मुळीच तयार नाही. विमानाने हवेतून बाॅम्बफेक करणे सोयीचे व सुरक्षित आहे.
अमेरिकेनंतर दोन महिन्यानंतर रशियाही युद्धात सहभागी झाला. रशियाने ४०० वर बाॅम्बहल्ले केवळ सहा दिवसात उरकले आहेत, तेही कोणताही विधिनिषेध न बाळगता. एकतर असा विधिनिषेध बाळगणे हा रशियाचा मूळ स्वभाव नाही, हे जसे खरे आहे तसेच सीरियाचा  राष्ट्रप्रमुख असाद यालाही असाच बेछुट हल्ला व्हायला व नागरी विरोधकांचा खातमा झालेला व त्यांनी भेदरून पलायनाचा अवलंब केलेला हवा आहे. अमेरिकेला असाद मान्य नाही तिची सहानुभूती आहे विरोधकांकडे. पण इसीसविरुद्ध अमेरिकेला असादची बाजू घेणे भाग पडले आहे. असादला मात्र अंतर्गत विरोधक/बंडखोर व इसीस या दोन्ही विरुद्ध एकाच वेळी लढावे लागत आहे.
सीरियातील जलयुद्ध- युद्धात व प्रेमात सर्व क्षम्य असते, या वचनानुसार इसीस व सिरियन सरकार यात जलयुद्ध सुरू आहे. एकमेकांचे पाण्याचे साठे नेस्तनाबूत करण्याच्या अटोकाट प्रयत्नात ही दोघे कुणालाही हार झाणार नाहीत. उभयपक्षी पाण्यावाचून दोन्ही पक्षांचे हाल होत असतात.
ट्युनिशियाची तिरकी चाल - ट्युनिशियाचे अध्यक्ष झिने अल अबिदिन बेन अली यांना जनतेने पदत्याग करायला भाग पाडले होते, या क्रांतीला जॅस्मिन रिव्होल्युशन, असे नाव वृत्तसृष्टीने दिले होते.  ही क्रांती घडवून आणण्यात असादचा हात होता, असा खरा/खोटा संशय ट्युनिशियाला आहे. ह्या क्रांतीचा परिणाम म्हणून सीरियामधील गृहयुद्धात तेल ओतल्यासारखे झाले होते. ट्युनिशिया इसीसविरुद्ध लढण्याचा देखावा करतो आहे, प्रत्यक्षात आमच्या फौजांवच हल्ले करतो आहे, असा असादचा दावा आहे.
निर्वासितांसमोरील तिहेरी पर्याय - सीरियामधील निर्वासितांची समस्या ही दुसऱ्या महायुद्धानंतरची दुसरी मोठी समस्या आहे. एक कोटी तीस लाखापेक्षा जास्त लोक या गृहयुद्धात विस्थापित झाले आहेत. पळा, सुन्नी व्हा किंवा धर्मातिरेक्यांनी केलेला छळ सहन करा यापैकी एकच पर्याय समोर होता. या विस्थापितांचे पुनर्वसन करायचे झाले तर अब्जावधी डाॅलर लागतील, असा अंदाज संयुक्त राष्ट्र संघाने व्यक्त केला आहे.
कुर्दांची वेगळी चूल - इराक, लेबॅनाॅन, सीरिया, ट्युनिशिया इत्यादी देशात यात कुर्द जमात आपली वेगळी ओळख राखून आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, प्राचीन काळच्या आसिरियन शहराचे म्हणजेच निनेव नावाच्या शहाराचे ते मूळ निवासी आहेत. ही जमात आॅटोमन साम्राज्याचे तुकडे झाल्यावर  वेगवेगळ्या राज्यात विभागली गेली आहे. सर्व कुर्द जमातीचे एक राष्ट्र असावे, अशी आकांक्षा बाळगून या जमातीचा त्या त्या राष्ट्रात उठाव करीत असते. असादचा म्हणूनच कुर्द लोकांना विरोध आहे. पण कुर्द इसीसच्याही विरुद्ध आहेत.
जुन्या ठेव्याचा नाश - सीरियामधील पालमिरा शहर इतिहास व संस्कृतीचे माहेरघर मानले जाते. इसीसने संघर्षादरम्यान या शहरातील निरनिराळ्या देवतांच्या पुतळ्यांचा नाश केला. युनेस्कोच्या दृष्टीने हे जागतिक वारसा स्थळ ( वर्ल्ड हेरिटेज साईट) होते. हा फार मोठा अपूर्व ठेवा होता. जगात कुठेही असा काही ठेवा असण्यालाच इसीसचा विरोध आहे. इस्लामिक देशात तर तो असूच शकत नाही.
आज सीरियात एक  रानटी अवस्था निर्माण झालेली दिसत असली तरी मेसोपोटॅमियन संस्कृती या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एकेकाळच्या संमृद्ध संस्कृतीचे हे उगमस्थान आहे. पूर्व दिव्य आहे, पण भावी काळ? त्याचे काय

Saturday, January 14, 2017

उत्तर प्रदेश व पंजाब मधील रणसंग्राम
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?

पंजाब व उत्तरप्रदेश या महत्त्वाच्या दोन राज्यात एकाचवेळी निवडणुका होत असल्या तरी दोन्ही राज्यांमधील परिस्थिती अगदी वेगळी आहे.  पहिले असे की, पंजाबात जात हा महत्त्वाचा मुद्दा नाही, तर उत्तर प्रदेशात जातीचा/ जातींचा विचार केल्याशिवाय कोणत्याही विषयाचा अभ्यास पूर्ण होत नाही, असे म्हणतात व मानतातही. दुसरे असे की, पंजाबात मध्यमवर्गीय लोक जास्त आहेत, तर उत्तरप्रदेश हे एकप्रकारे गरीब प्रजा असलेले राज्य आहे. पंजाबला अमली पदार्थ (ड्रग्ज) आणि मद्य यांनी ग्रासले आहे, तर उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्था यांचा अभाव आणि बलात्कार यापायी जनता भयांकित आहे. पंजाबात गेली दहा वर्षे शिरोमणी अकाली दल व भारतीय जनता पक्ष यांचे संयुक्त शासन राज्य कारभार करीत आहे. प्रस्थापित विरोध (ॲंटी इनकंबन्सी) निर्माण होण्यासाठी हा कालावधी पुरेसा असतो व तो निर्माण होऊ नये यासाठी ज्याप्रकारचे व ज्या गुणवत्तेचे शासन असावे लागते तसे पंजाबात व उत्तर प्रदेशात नाही/नव्हते, असे बहुतेक सर्व निरीक्षकांचे मत आहे.
गेली दहा वर्षे पंजाबात भारतीय जनता पक्ष हा लहान भाऊ तर शिरोमणी अकाली दल मोठा भाऊ असा सबंध या दोन पक्षात होता. लहान भाऊ मोठ्या भावाचा कल सांभाळून  वागत असे. आजमितीला मोठा भाऊ (शिरोमणी अकाली दल) विजयासाठी पूर्णपणे धाकट्या भावावर - नरेंद्र मोदींवर - अवलंबून आहे. शिरोमणी अकाली दलाच्या हातून निसटत चाललेली सत्ता ही दगडावरची रेघ आहे. नरेंद्र मोदींचा करिष्मा व वक्तृत्त्वच कायते शिरोमणी अकाली दलाला वाचवू शकेल.
उत्तर प्रदेशातील मुलायम(?) धक्के - उत्तर प्रदेशातील घडामोडींचा अभ्यास करायचा झाला तर आधुनिक यदु वंशाची माहिती असणे आवश्यक आहे मुलायम सिंग यांच्यापासून विचार करण्यास सुरवात केली तरी चालेल. नंतरचे बहुतेक यदुवंशीय राजकारणात आहेतच. उरलेले केव्हाही कुठेही प्रगट होऊ शकतात व शकतीलही.
मुलायम सिंगांची पहिली पत्नी मालतीदेवी यांचे २००३ मध्ये निधन झाले.पहिल्या पत्नीपासूनचे अखिलेश हे चिरंजीव आताआतापर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असून सून डिंपल (अखिलेश यांची पत्नी) कनौजहून लोकसभेवर खासदार आहे. अखिलेश
दुसरी पत्नी साधना गुप्ता यांचे चिरंजीव प्रतीक यांची मुलायम सिंग व शिवपाल यादव (मुलायम सिंग यांचे बंधू) यांच्याशी विशेष जवळीक असून सून अपर्णा यादव २०१७ मध्ये विधान सभेची निवडणूक लढविणार आहे.
मुलायम सिंग यांचे बंधू - एकूण पाच भाऊ असून त्यातला एक चुलतभाऊ आहे.
१.अभय राम (दिवंगत). चिरंजीव धर्मेंद्र बदांऊचे खासदार तर कन्या संध्या जिल्हा परिषद अध्यक्षा
२. शिवपाल सिंग -  मुलायम सिंगाशी एकनिष्ठ बंधू, मंत्री व पक्षाध्यक्ष असून अमर सिंगांचे खास दोस्त, यांचे चिरंजीव आदित्य हे सहकार संघाचे अध्यक्ष आहेत.
३. रतन सिंग (दिवंगत) यांचा पुत्र रणवीर सिंग व कन्या मृदुला ही ब्लाॅक डेव्हलपमेंट काऊंसिलची सदस्या.
४. राजपाल इटावात वास्तव्य पत्नी व चिरंजीव पंचायतीत अधिकारी. नातू तेज प्रताप मैनपुरीचे खासदार असून यांचे अखिलेशशी विशेष सख्य आहे.
५. राम गोपाल - (चुलत भाऊ) राज्य सभा खासदार  पक्षातून हकालपट्टी  झालेली आहे. यांचेही अखिलेशशी विशेष सख्य आहे.
मुलायम सिंगांची बहीण - कमलादेवी यादव व त्यांचे यजमान अजंत सिंग (मुलायम सिंगांचे मेव्हणे) ब्लाॅक डेव्हलपमेंट काऊंसिलचे सदस्य आहेत.
उत्तर प्रदेशातील गृहकलह/गृहयुद्ध - उत्तर प्रदेशात सत्ताधारी समाजवादी पक्षातील गृहकलहाचे/गृहयुद्धाचे चटके जनसामान्यांनाही आता चांगलेच जाणवू लागले आहेत, भाऊबंदकीचे असे उदाहरण क्वचितच आढळेल. उत्तर प्रदेशात मुलायमसिंगांच्या समाजवादी पक्षातील एकछत्री अंमलाला दुसऱ्या कुणी नव्हे तर खुद्द त्यांच्या चिरंजीवानीच सुरुंग लावला आहे. ‘बापको बेटाही भारी’ पडण्याची चिन्हे आहेत. उत्तर प्रदेशात चालली तर अखिलेशचीच जादू चालू शकेल. अगदी तीर्थरूपांनी हकलून दिल्यानंतर सुद्धा. चिरंजीव वेगळा पक्ष काढतील व काॅंग्रेसशी युती करतील, असे दिसते. गृहकलहासोबत बाप लेकातीलच नव्हे तर इतरही कौटुंबिक संघर्ष संभवतात.
राजकीय आखाड्यातील डावपेच - अखिलेशला नवीन पक्ष स्थापन करून नवीन चिन्ह मिळवावे लागेल. ह्या पक्षाला राज्यातील एकूण संख्येच्या तुलनेत बहुमत मिळाले नाही, समाजवादी पक्षाच्या तुलनेत जरी जास्त आमदार निवडून आणता आले तरी इतरांना आपल्याकडे खेचणे शक्य होईल. पण विधान सभेत बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली तर काय करायचे?
काॅंग्रेसला वाटते आहे की अखिलेशच्या पक्षाशी गट्टी करता आली तर मुस्लिम मतपेढीचा मोठा हिससा आपल्याकडे वळवता येईल.
मयावतींना वाटते आहे की,मुस्लीम गठ्ठा मते आता आपल्याकडे वळतील. कारण भारतीय जनता पक्षाला आपला पक्षच टक्कर देऊ शकेल, असे मुस्लिमांच्या गळी उतरवता येईल.
मुलायम सिंग अखिलेला वारस म्हणून नाकारणार, हे स्पष्ट झाले. एकनिष्ठ अनुयायी, अमरसिंग, तसेच शिवपाल सिंग हा एकनिष्ठ बंधू यावर विसंबून आपलाच पुत्र असलेल्या अखिलेशचा सामना करावा लागणार, हे मुलायम सिंगांच्या लक्षात आले.
भारतीय जनता पक्षाला केंद्राची राजवट नको आहे. ती लादल्यास समाजवादी पक्षाच्या दुभंगाच्या प्रक्रियेची गती मंदावेल. एकजुटीच्या प्रयत्नांनाना बळकटी प्राप्त होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून तो पक्ष सर्व घटनांवर बारीक लक्ष ठेवून स्वस्थ बसला आहे.
आमदारांसमोर पेच!  - नेताजी ( मुलायम सिंग) की भैय्याजी (अखिलेश)? बहुसंख्य आमदार भैय्याजींकडे  वळणार. कारण पाच वर्षे सकारात्मक राजवटीसाठी प्रयत्न केले, असा समज; ग्रामीण पार्श्वभूमी असलेला तरूण; एक कर्ता कार्यकर्ता; अशी पुष्कळशी स्वच्छ प्रतिमा असलेला व तंत्रज्ञ मुख्यमंत्री ही जनमानसातील प्रतिमा अखिलेश याला खूपच उपयोगाची पडणार आहे. वडलांनी पक्ष सांभाळावा, मार्गदर्शन करावे व अखिलेशला राजशकट हाकू द्यावा, हा पायंडाच पुढे चालू रहावा ही बहुसंख्य आमदारांची इच्छा आहे. २०१४ मधील मोदीप्रणित त्सुनामीत फक्त मुलायम सिंग व त्यांचे ५ नातेवाईकच निवडून आले होते. शिवपाल यादव, रामगोपाल यादव, आझमखान व अमर सिंग यापैकी कोणीही ‘दंगल’ माजवू शकण्याची ताकद ठेवून आहेत. स्वत:ला मल्ल म्हणवणारे मुलायम सिंग यांच्यासमोर हे सर्व आजवर ‘छोरे’ ठरत आले आहेत. पण आता सिंव्हाचे दात पुरते पडले नसले तरी खिळखिळे नक्कीच झाले आहेत. अखिलेशने बापसे बेटा सवाई आहे, हे बापाला जाणवून दिले. उद्या सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा प्रश्न
उद्भवला तर काॅंग्रेस आपल्या सोबत राहील, त्याने बापाला(मुलायम सिंग यांना) जाणवून दिले.परिणाम असा झाला की, अखिलेशचे निलंबन मुलायम सिंग यांनी तूर्तास तरी परत घेतलेले दिसते आहे.
दोन टोकाची मते - पण तरीही एक मत असे आहे की, आजचा सुशासनाचा सैल निकष लावला तर पंजाब व उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्र्यांची कारकीर्द अगदीच वाईट म्हणता यायची नाही. पण प्रस्थापित विरोधाला (ॲंटिइनकंबन्सी) मात देण्यासाठी एवढेच पुरेसे नसते. दुसरे मत मात्र अगदी वेगळे आहे. पंजाबात विद्यमान मुख्यमंत्र्यांनी उद्योगांची अक्षरश: वाताहत केली, स्वत:साठी गडगंज संपत्ती जमविली, स्वत:च्या मालकीच्या हाॅटेलपर्यंतचा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडून बांधून घेतला, त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या आराम बस गाड्यांचा ताफा असून त्या रस्त्यांवरून अपघातांची तमा न बाळगता उडत असतात, स्वत:च्याच मालकीचे केबल नेटवर्क आहे, सर्व खाणी स्वत:च्या मालकीच्या आहेत, तसेच खाजगी विद्यापीठही आहे, दारूची दुकाने ही सुद्धा स्वत:च्याच मालकीची, अशी कीर्ती या मुख्यमंत्र्यांची आहे.
पंजाबातील जमेची बाजू - पण विरोधकात एकजूट नाही, विरोधकांना एकमेकांविरुद्ध लढवत ठेवण्याचे अद्वितीय कौशल्य मुख्यमंत्र्यांचे ठायी ठासून भरलेले आहे, जोडीला नरेंद्र मोदींचे वक्तृत्त्व व करिष्मा या बळावर युती सत्तारूढ होईलही, असा निरीक्षकांचा अंदाज आहे.  ही युती भारतीय जनता पक्षासाठी ओढणे होऊन बसली आहे. पण पक्षासमोर सध्यातरी वेगळा पर्याय उपलब्ध नाही.  उत्तर प्रदेशातील स्थिती फारशी वेगळी नाही. त्यात गुंडाराजाची भर कायती पडलेली दिसते.
भारतीय जनता पक्ष - या उलट भारतीय जनता पक्षाची स्थिती दोन्ही राज्यात मजबूत आहे. नोटाबंदीचे आजवर जनतेने सहर्ष स्वागत केले आहे. विरोधकांच्या आक्षेप व आरोपांकडे दुर्लक्ष करीत, फारसे न बोलता पण ठामपणे नाकारले. लोकांनी त्रास सहन केला, गैरसोय सहन केली, रांगेत तासन् तास उभे उभे राहिले. आता मात्र परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे. खते व जंतुनाशकांची गरज सहजपणे पूर्ण व्हावी /होईल, या अपेक्षेत व प्रतीक्षेत शेतकऱीवर्ग आहे. अन्य ग्रामवासीयांचीही अडचण दूर व्हावयास हवी आहे. ‘अघटित घडले, विनाश अटळ आहे’, ही विरोधकांची भविष्यवाणी ऐकूनही जनतेचा मोदींवरचा विश्वास अढळ राहिला आहे.
महागठबंधनाची शक्यता नाही - बिहारप्रमाणे महागठबंधन संभवनीय दिसत नाही. कारण समाजवादी, बहुजन समाज पक्ष व काॅंग्रेस यांच्या परंपरागत मतपेढ्या आहेत. हे तीन शक्तिशाली गट एकत्र येणे कठीणच आहे. तीन काडी पहिलवानांची एकजूट व्हायला अडचण जात नाही. यादव व मुस्लिमांमुळे समाजवादी पक्ष, दलितांमुळे बहुजन समाज पक्ष व जुन्या पुण्याईमुळे व शीला दीक्षितांमुळे ब्राह्मण मतदार साथ देतील या अपक्षेत काॅंग्रेस पक्ष वीस/पंचेवीस टक्के मतांची मजल गाठण्याची खरी खोटी आशा/अपेक्षा बाळगून आहेत. एमआयएम (मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन) ची जादू बिहारमध्ये चालली नाही. मुस्लिमांनी डावपेचाचे/व्युव्हाचे राजकारण (स्ट्रॅटेजिक व्होटिंग) करून भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल, अशाप्रकारे वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांना मतदान केले. असेच राजकारण शिवसेनाही जरा वेगळ्या करू शकेल.
राजकारणातील एकच मर्द गडी - या सर्व कोलाहलात एक मुद्दा वादातीत आहे. पण सर्वांसाठी नरेंद्र मोदी हा एकच मर्द गडी (ही मॅन ) आहे.भ्रष्टाचारी व काळा बाजारवाल्यांशी मुकाबला करण्याची क्षमता जर कुणा एकात असेल तर ती फक्त एकट्या नरेंद्र मोदीमध्येच आहे, असे जनता मानते. जे जे विरोधक आहेत, ते पराकोटीचा विरोध करून विरोधभक्ती करीत आहेत. नरेंद्र मोदींचा उल्लेख न करता कुणााही विरोधकाचे भाषण पूर्ण होत नाही. नोटाबंदीमुळे अनेक ‘बनिये’ दुरावले/दुखावले असले तरी त्यांच्या दृष्टीनेही नरेंद्र मोदींचा प्रामाणिकपणा वादातीत आहे.
२०१४च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर दिल्ली व बिहार मध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला असला तरी भारतीय जनता पक्षाची मतांची टक्केवारी वाढलेलीच दिसते. या निवडणुकीत पंजाब व उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यात २०१४ सालच्या लोकसभेच्या निकालातील  ४२ टक्के मतांची बेगमी कमी होण्याची शक्यता नाही, उलट ती वाढण्याचीच शक्यता आहे. समजा ती काहीशी कमी होईल, असेही गृहीत धरले तरीही भारतीय जनता पक्ष उत्तरप्रदेशात चांगले बहुमत मिळवू शकेल, अशी आजची स्थिती
अशीही कथा एका अपहरणाची!
वसंत गणेश काणे
१९९८ सालची गोष्ट. फ्लोरिडामधील सुतिकागृहातून एका नवजात मुलीचे जन्मानंतर अवघ्या आठ तासानंतर अपहरण झाले होते. ही घटना एवढी धक्कादायक होती की, जॅक्सनव्हिले नावाच्या ‘त्या’ गावातून  जाणारे प्रत्येक वाहन थांबवून एकजात प्रत्येकाची तपासणी पोलिसांनी केली.
एका १६ वर्षाच्या मुलीने ( शानारा माॅब्लीने) कामिया माॅब्लेला जन्म दिला होता. जन्म होऊन फक्त आठच तास झाले होते. त्यामुळे फोटो काढलेला नव्हता. नाळेचे टोक गळाले नव्हते. बेंबी वर आलेली (अंबिलिकल काॅर्ड हार्निया ) होती. पार्श्व भागावर डाग( मंगोलियन स्पाॅट्स) होते. ते साधारणपणे सहा ते आठ आठवड्यांनी जातात. व्हिडिओवर अपहरण दिसत होते पण तो व्हिडिओ अहरणकर्तीची ओळख पटावी एवढा स्पष्ट दिसत नव्हता  शोध तरी घेणार कसा? कामियाचे छायाचित्र तरी कसे जारी करणार? शेवटी कलाकाराला सांगण्यात आले, ‘बाबारे,तूच आपल्या कल्पनेने नवजात अर्भकाचे चित्र काढ’. हे चित्र जॅक्सनव्हिले गावात ठिकठिकाणी लावण्यात आले. पुढेही दर वर्षी ते लावण्यात येत होते. माहिती देणाऱ्याला २ लक्ष ५० हजार डाॅलरचे बक्षीस जाहीर करण्यात आले? अडीच हजार लोकांनी सुगावा लागल्याचे पोलिसांना सांगितले. पण….पण ……
‘अमेरिकाज मोस्ट वाॅंटेड’, नावाचा प्रकटनाचा एक प्रकार असतो. त्यानुसारही तीनदा प्रसिद्धी देण्यात आली. परदेशातील शोधकर्ते सुद्धा मदतीला धावले. पण व्यर्थ!
१३ जानेवारी २०१७ ला १८ वर्षानंतर शोध मोहीम फलद्रुप झाली. कामियाचा पत्ता लागला, असे जॅक्सनव्हिलेचे शेरीफ माईक विल्यम्स पत्रकारांना सांगत होते.  डीएनए चाचणीनुसार निश्चित झाले की,१८ वर्षांची वाॅल्टर बोरो गावात ही मुलगी - कामिया माॅब्ली - रहात होती. ५१ वर्षाच्या अपहरणकर्त्या महिलेला - ग्लोरिया  विल्यम्सला अटक करण्यात आली आहे.
कामिया माॅब्लीची समजूत अशी होती की, ती आपल्या खऱ्या आईबापांसोबतच राहते आहे. हे सत्य पचवण्यासाठी तिला वेळ लागतो आहे. ही प्रक्रिया खूप वेळ खाणारी असणार, इतर कुणाला त्याची कल्पना करणेही कठीण आहे.
शानारा माॅब्ली आपल्या पहिल्यावहिल्या मुलीचा- कामिया माॅब्लीचा- प्रत्येक वाढदिवस न चुकता साजरा करीत आलेली आहे. ती आजवर प्रत्येक वाढदिवसाला केकचा एक छोटासा तुकडा ॲल्युमिनियम फाॅईलमध्ये गुंडाळून फ्रिझरमध्ये जपून ठेवीत असे. पण कामिया माॅब्लीला अशा कोणत्याही केकची चव आजवर घेता आलेली नाही. ही बातमी फ्लोरिडा टाईम्सने प्रथमत: १० जुलै २००८ ला तिच्या अपहरणाच्या दहाव्या वाढदिवसाला छापली होती. शनारा विचायची, ‘ कशी असेल हो माझी मुलगी? तिला काय आवडत असेल? तिचे केस लांबसडक असतील का? तिच्या भिवया माझ्या सारख्याच असतील का?
१६ वर्षाच्या शनारा माॅब्लीने आपल्या नवजात अर्भकाला  नर्स समजून एका कामवालीच्याच स्वाधीन केले होते. ती म्हणाली होती की, बेबीला ताप आलेला दिसतो आहे. तो मोजावा लागेल. वीस मिनिटात बेबीला घेऊन परत परत येते. ही तोतयी (अपहरणकर्ती ?) १४ तास त्याच हाॅस्पिटलमध्ये या मुलीचा शोध घेण्याच्या मिशाने प्रत्येकापाशी चौकशी करीत हिंडत होती. हाॅस्पिटलच्या नर्सेसने वाटले की ही बाई शनाराच्या नात्यातली किंवा ओळखीचीच कुणीतरी आहे. त्या दोघींना बोलतांना त्यांनी पाहिले होते.
नवजात बालिकेला तोतया नर्सने नेल्यानंतर काही मिनिटांनीच तिच्या आजीने काहीतरी काळेबेरे आहे, असा संशय येऊन पोलिसात वर्दी दिली होती. हाॅस्पिटलमधील येण्याजाण्याचे सर्व मार्ग तात्काळ बंद करण्यात आले. पेशंटच्या भेटीला आलेल्या प्रत्येकाला थोपवण्यात आले. बसेस, रेल्वेगाड्या एवढेच नव्हे तर विमानेही रोखून धरण्यात आली. कसून शोध घेण्यात आला, पण उपयोग झाला नाही. या वार्तेकडे फ्लोरिडा प्रांताचेच नव्हे, तर अख्ख्या अमेरिकेचे लक्ष वेधले गेले.
शोधपथकांनी  सुगावा लागलेल्या दूरदूर स्थानी जाऊन शोध मोहीम राबविली. संशयावरून १५ बालकांचे पायाचे ठसे व दोन बालकांचे डीएनए नमुने ताडून पाहिले. एकही नमुना जुळला नाही.
‘अमेरिकेत नॅशनल सेंटर फाॅर मिसिंग ॲंड एक्सप्लाॅयटेड चिल्ड्रेन’, या नावाची संस्था आहे. हे प्रकरण ज्या अधिकाऱ्याकडे सोपविले होते त्याने जाहीर केले की आम्ही शोधमोहीम थांबवणार नाही.
बालिकेच्या पालकांनी हास्पिटलला कोर्टात खेचले. दीड लक्ष डाॅलर नुकसानभरपाई व नवजात बालकांच्या सुरक्षेची व्यवस्था संपूर्ण फ्लोरिडा प्रांतात आणखी चोख व कडक करण्यात येईल, या आश्वासनानंतर केस मागे घेण्यात आली.
होताहोता २०१६ साल उजाडले.साऊथ करोलिना प्रांतातून खबर आली की, कामियाचीच जन्मतारीख सांगणारी एक मुलगी त्यांना आढळली आहे. पण तिचे नाव कामिया नाही, काही वेगळेच आहे. कागदपत्रेही बनावट आहेत, हे आणखी तपास केल्यानंतर लक्षात आले.
आपल्या संबंधात काहीतरी गडबड झालेली आहे, असा संशय कामियाला काही महिने अगोदर पासूनच येत होता.
नुकतेच तिला आपण कोण आहोत, ते कळले आणि आपण जिला आई  मानत होतो, तिच्यावर काय आरोप आहे, हेही तिला समजले.
पोलिसांनी गुप्तता राखण्यासाठी तिचे सध्याचे नाव उघड केलेले नाही. त्यांनी कामियाच्या खऱ्या आईबडलांची भेट घेऊन त्यांना सगळी वस्तुस्थिती सांगितली आहे.
 कामियाचा पिता क्रेग आयकेन आपल्या मुलीच्या जन्माचे वेळी तुरुंगात होता. त्याला १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला (शनारा माॅब्लीला) गरोदर ठेवल्याबद्दल आठ महिने कैदेची शिक्षा झाली होती. त्याचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त होते म्हणजे तो वयात आलेला किंवा प्रौढ होता. अमेरिकन कायद्यानुसार ज्याचे वय १८ पेक्षा जास्त तो प्रौढ व जो त्यापेक्षा लहान तो क्षमापित करण्यास पात्र मानला जातो. या कायद्यानुसार त्याला शिक्षा झाली व शनाराची गय करण्यात आली. १९९९ साली तुरुंगात असतांना तो म्हणाला होता, ‘ ती (त्याची मुलगी) कशी दिसत असेल हो?’.
आपल्या मुलीला मुकलेली शनारा मुले सांभाळून ( बेबी सिटिंग) करीत दिवस काढीत होती. शोधपथकाशी वेळोवेळी चर्चा करीत होती, संवाद साधत होती,  कधीतरी आपली कामिया आपल्याला भेटेल या आशेवर. तिची आशा फलद्रुप व्हायला जवळजवळ दोन दशकं लागली.
फेस टाईमवर पोलिसांनी कामियाची आपल्या खऱ्या आईवडलांशी व आजीशी गाठभेट घालून दिली. तिच्या खऱ्या आईवडलांचा आनंद गगनातही मावला नसणार!
कामियाची आजी (वडलांची आई) वेलमा आयकेन वय वर्ष ६६ म्हणाली, ‘  कामिया अगदी वडलांच्या वळणावर गेली आहे हो. कामिया, आमच्याशी नवख्यासारखी बोलली नाही. अनेक वर्षांपासूनचे तिचे व आमचे बोलणे चालणे आहे, असे वाटत होते. मी रोज देवाजवळ प्रार्थना करीत असे की, ‘देवा, नातीची भेट व्हायच्या आधी मला नेऊ नकोस रे बाबा’. ती कुठेतरी जवळच असणार पण आपण तिला भेटू शकत नाही, तिच्याशी दोन कौतुकाचे शब्द बोलू शकत नाही, या कल्पनेने आम्हाला सतत अस्वस्थ वाटायचे.
शेजाऱ्यांचे म्हणणे असे होते की, कामियाच्या खोट्या आईने- ग्लोरिया विल्यम्सने- तिचे लालनपालन, कोडकौतुक खऱ्या आईने करावे तसेच केले.  तिच्या हौशी पुरवल्या. आम्हाला कुणालाही ही पळवून आणलेली मुलगी आहे, असा किंचितसा संशयसुद्धा कधीही आला नाही. आमच्या लेखी ती स्वत: एक बुद्धिमान, कामसू, पापभीरू, सामाजिक कार्यात अहमहमिकेने सहभागी होणारी शेजारीण होती. तिला नावं ठेवायला जागाच नव्हती. पण ते काहीही असले तरीही तिने  एका मुलीला  पळवून आणले होते हे सत्य काही लपणार नाही.
जिला कामिया आपली आई समजत होती, त्या ग्लोरिया विल्यम्सवर अपहरणाचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी अटक केली आहे. त्या दोघी कोर्टात समोरासमोर येताच कामिया म्हणाली, मी तुझ्यासाठी देवाजवळ करुणा भाकते.  साऊथ कॅरोलिनामधील वालरबोरो येथील ज्या छोट्याशा पण टुमदार घरी इतकी वर्षे कामिया वाढली, खेळली, बागडली ते घर ‘त्या’ हाॅस्पिटलपासून केवळ २०० मैलावर आहे.
‘अमेरिकेतील नॅशनल सेंटर फाॅर मिसिंग ॲंड एक्सप्लाॅयटेड चिल्ड्रेन’ ने १९८३ पासून आजवर अपहरण झालेल्या तीनशे आठ मुलांचा शोध लावला आहे. अातापर्यंत १२ प्रकरणे ऐरणीवर होती. आता त्यांची संख्या ११ झाली आहे. त्यांच्याही आशा आता नव्याने पल्लवीत होत आहेत.
जेव्हा एखाद्या केसची फाईल आता बंद करायला हवी असे वाटू लागते, तेव्हा सुद्धा आम्ही नव्या माहितीच्या शोधात असतो. दर दिवशी तंत्रज्ञानाचे पाऊल पुढे पडत असते. एखादा धागा अवचित हाती लागतोच. कितीही वेळ लागो, शोध घ्यायचे थांबवायचे नाही, हे आमचे ब्रीदवाक्य आहे. पण तरीही हे सांगितलेच पाहिजे की, ‘असे’ प्रकरण आजवर आमच्या वाट्याला आले नव्हते, असे म्हणत पोलिसप्रमुख माईक विलियम्स यांनी पत्रपरिषद आवरती घेतली.



Friday, January 13, 2017

‘स्पेलबाऊंड’
   वसंत गणेश काणे

आल्फ्रेड हिचकाॅक हा आम्हा काॅलेजकुमारांचा आवडता दिग्दर्शक होता. त्याचे गुप्तहेर कथेवर, रहस्यकथांवर आधारित चित्रपट आम्ही न चुकता पहात असू. असाच एक चित्रपट नुकताच पुन्हा पाहण्यात आला. त्याचे शीर्षक होते ‘स्पेलबाऊंड’. स्पेलबाऊंड म्हणजे मंत्रमुग्ध किंवा झपाटलेला. चित्रपटाच्या सुरवातीला एक सुभाषित येते. विल्यम शेक्यपिअरचे ते वचन आहे. ‘दी फाॅल्ट ...इज नाॅट इन अवर स्टार्स, बट इन अवरसेल्व्ह्ज’, म्हणजे दोष ग्रह ताऱ्यांचा नसतो, तर आपल्यातच असतो.
चित्रपटनिर्मितामागचा हेतू - चित्रपटाचा हेतू मानसिक विकृती दूर करण्यास उपयोगी असलेले मनोविश्लेषणाच महत्त्व उकलून दाखविण्याचा व तर्काधिष्टित महत्त्व पुनर्स्थापित करणे हा आहे, अशी करून हिचकाॅकने आपले वेगळेपण चित्रपटाच्या प्रारंभीच श्रोत्यांच्या मनावर बिबवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
चित्रपटातील काही भूमिका- काॅन्स्टन्स पिटर्सन (इनग्रिड बर्मन); डाॅ. मुर्चिसन (लिओ कॅराॅल); डाॅ ॲंथनी एडवर्ड/जाॅन ब्राऊन/जाॅन बॅलेनटाईन (ग्रेगरी पेक); डाॅ ब्रुलोव्ह ( मायकेल चेकाॅव्ह): डाॅ ब्रुलोव्ह (मायकेल चेकाॅव्ह).
चित्रपटाची कथावस्तू - चित्रपटाची कथावस्तू काहीशी अशी आहे. काॅन्स्टन्स  पिटर्सन या नावाच्या महिला मनोविश्लेषण तज्ञाची भूमिका विख्यात नटी इनग्रिड बर्मनने वठविली असून ती व्हरमाॅंट प्रांतातील ग्रीन मॅनाॅर्स येथील मनोविकृती रुग्णालयात (मेंटल हाॅस्पिटल) मध्ये नोकरी करीत असते. तिच्या (काॅन्स्टन्स पिटर्सन) पुरुष सहकाऱ्यांच्या हिशोबी ती एक अलिप्त (डिटॅच्ड) व भावनाशून्य (इमोशनलेस) व्यक्तीच कायती असते. हाॅस्पिटलच्या डायरेक्टरची - डाॅ. मुर्चिसनची - भूमिका लिओ कॅराॅलने साकारली असून  तो मानसिक थकव्यानंतर पुन्हा सेवेत रुजू झालेला असल्यामुळे त्याला सक्तीची सेवानिवृती घेण्यास सांगितलेले असते. त्याची जागा घेण्यासाठी डाॅ ॲंथनी एडवर्ड (नट -ग्रेगरी पेक)  हे नाव धारण करून आलेली व्यक्ती खूपच तरूण दिसत असते. त्यामुळे त्याच्या खरेपणाबद्दल सर्वांच्या मनात संशय निर्माण होतो.
  काॅन्स्टन्स पिटर्सनच्या (इनग्रिड बर्गन) हेही लक्षात येते की, डाॅ ॲंथनी एडवर्ड (ग्रेगरी पेक) म्हणून आलेल्या व्यक्तीच्या मनात पांढऱ्या पृष्ठभूमीवर काढलेल्या काळ्या समांतर रेषांबाबत एक अकारण भीती (फोबिया) दडलेली असते. एका शस्त्रक्रियेसाठी त्यालाही उपस्थित राहण्याचा प्रसंग येतो. त्यावेळचे ते शस्त्रक्रियेचे वातावरण न मानवून त्याला चक्कर येते. तो स्वत: डाॅक्टर असला तरी सर्जन नसतो. त्यामुळे असे घडते. त्यावेळी त्याच्या जवळील बाॅक्समध्ये एक डबी आढळते. तिच्यावर जे बी अशी अक्षरे असतात. या आद्याक्षरांच्या आधारे आपले नाव जाॅन ब्राॅन असल्याचे तो काॅन्स्टन्सला सांगतो. तसेच हा तोतया व खऱ्या ॲंथनी एडवर्ड यांच्या हस्ताक्षरातही फरक असतो, हेही तिच्या लक्षात येते. त्यामुळे हा खरा ॲंथनी एडवर्ड नाही, याबद्दल काॅन्स्टन्स पिटर्सनच्या मनात शंका उरत नाही. तोही तिला आपण तोतया असून आपणच खऱ्या ॲंथनी एडवर्डचा खून केला आहे, पण त्याचबरोबर आपल्याला स्वत:बाबत पराकोटीची विस्मृती झालेली असून आपण खरे कोण आहोत, आपले खरे नाव काय आहे, याबद्दल काहीच आठवत नाही, हेही स्पष्ट करतो. काॅन्स्टन्स पिटर्सनला मात्र वाटत असते की, त्याने खून केला नसून तो निर्दोष आहे. तो खोट्या अपराधी भावाचा बळी आहे. एके दिवशी हा तोतया ॲंथनी एडवर्ड तिच्या नावे एक पत्र लिहून पसार होतो. याच सुमारास उघड होते की, ॲंथनी एडवर्ड हे नाव धारण करून एक तोतया आला होता आणि खरा ॲंथनी एडवर्ड बेपत्ता असून त्याचा बहुदा खून झाला असावा.
डाॅ काॅन्स्टन्स पिटर्सन त्याचा शोध घेते आणि त्याच्यावर आपल्या मनोविश्लेषणविषयक ज्ञानाच्या आधारे प्रयोग करून त्याची विस्मृती दूर करण्याचा व सत्य शोधण्याचा प्रयत्न करते. तोतया आता स्वत:ला जाॅन ब्राॅन म्हणवू लागतो. पोलिस या दोघांच्या मागावर असतात. ती दोघे त्यांना चुकवून रेल्वेने राॅचेस्टर न्यू याॅर्क या रेल्वे स्टेशनवर येतात.अशी अनेक जोडपी स्टेशनवर आलेली असतात. बायको रेल्वेने जाणार असते व नवरा तिला निरोप द्यायला आलेला निरोपाचे निमित्ताने मिठ्या व चुंबनांची देवघेव होत असते. आपणही यापैकी एक असल्याचे तिथे पाळत ठेवन असलेल्या पोलिसांना भासवण्यासाठी ही दोघेही एकमेकांना चुंबनालिंगन देतात. पण चेकरला दोन तिकिटे दाखवून आगगाडीच्या डब्यात बसतात. निरोप द्यायला आलेला स्वत:ही पत्नीसोबत जातांना पाहून चेकर आश्चर्यचकीत होतो. नंतर ती दोघे डाॅ ब्रुलोव्हकडे आश्रय घेतात.  डाॅ ब्रुलोव्हची भूमिका मायकेल चेकाॅव्ह या नटाने वठवली आहे. डाॅ ब्रुलोव्हची डाॅ काॅन्स्टन्स पिटर्सन ही शिष्या असते. आपले लग्न झाले असून आपण दोघे हनिमून सफरीवर आहोत, असे ती आपल्या गुरूला सांगते. पण सत्य काय आहे, याचा त्याला अंदाज येतो. कारण ही दोघेही सोबत काहीही सामानसुमान न घेता आलेली असतात. डाॅ ब्रुलोव्ह त्यांना पाहुणचार घेण्यासाठी थांबवून घेतो.
आता ही गुरू शिष्येची जोडी जाॅन ब्राऊनच्या स्वप्नांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करते. या निमित्ताने बऱ्याच मनोविश्लेषणात्मक संकेतांचाही (सिंबाॅल्स) प्रेक्षकांना परिचय होतो. डोळे, पडदे, कात्र्या,पत्ते, कोरे पत्ते, बिनचेहऱ्याचा माणूस, माणूस उंच इमारतीवरून खाली कोसळणे, चिमणीमागे (गिरणीचा भोंगा) एका व्यक्तीने दडून बसणे, एका चाक खाली कोसळणे व अजस्त्र पंखाद्वारे पाठलाग होणे असे अनेक संकेत (सिंबाॅल्स) कथा लेखकाने व आल्फ्रेड हिचकाॅकने मोठ्या खुबीने वापरले आहेत. या स्वप्नांमधून असा अर्थबोध निघाला की, जॅान ब्राऊन आणि खरा ॲंथनी एडवर्ड बर्फावरून घसरण्याच्या सफरीवर (स्की ट्रिप) वर गॅब्रिएल दरीत गेले असावेत. (पांढऱ्या समांतर रेषा म्हणजेबर्फावर उमटणाऱ्या खाचा असाव्यात.) ॲंथनी एडवर्ड कोणत्या ना कोणत्या कारणामुळे या खेळात दगावला असावा. डाॅ काॅनस्टन्स पिटर्सन व जाॅन ब्राऊन त्याच गॅब्रिएल दरीत मुद्दाम स्किईंग (बर्फावरून घसरणे) साठी जातात व त्याच मार्गाने स्किईंग करतात. टेकडीच्या तळाकडे वेगाने घसरत येत असतांना ब्राऊनची स्मृती अचानक परत येते. त्याचवेळी त्याला एकदम एक उभा कडा समोर असल्याचे दिसते. याच कड्यावरून घसरून खाली पडून एडवर्ड मृत्युमुखी पडला होता, हेही त्याला आता  आठवते. यावेळी मात्र अटोकाट प्रयत्नाने ती दोघे पडतापडता सावरतात. त्याची लहानपणीच्या एका प्रसंगाची आठवणही याचवेळी जागी होते. खूप लहानपणीची गोष्ट होती. तो जिन्याच्या कठड्यावरून खाली वेगाने घसरत येत असतांना कठड्यावरच तळाशी बसलेल्या त्याच्या धाकट्या भावाला त्याचा इतका जबरदस्त धक्का लागतो की तो धाकटा भाऊ चेंडूसारखा उसळून टोकदार रेलिंगवर आदळतो. रेलिंगचे टोक अंगात घुसून धाकटा भाऊ तात्काळ गतप्राण होतो. या घटनेमुळे त्याच्या मनात एक अपराधीपणाचा भाव नेणिवेत घर करून बसला होता. त्याला असेही आठवले की, त्याचे खरे नाव जाॅन बॅलनटाईन असे होते. (अशा घटना जेव्हा प्रत्यक्षात घडतात, तेव्हा स्मृती व ओळख नाहीशी होते. व्यक्ती नवीन नावाने वावरू लागते. पण धारण केलेले नवीन नाव जुन्या नावाशी साम्य असलेले असते. जाॅन ब्राऊन व जाॅन बॅलनटाईन या दोन नावात लेखक व दिग्दर्शकाने साम्य ठेऊन प्रत्यक्षाची नाळ कायम राखलेली आढळते. आलेफ्रेड हिचकाॅकच्या इतर अनेक वैशिष्ट्यांसारखेच हे वैशिष्ट्य ठरावे.) आता सर्व काही सुरळीत होणार असे मानून प्रेक्षक निश्वास सोडतात न सोडतात की, लगेच दरीत कोसळलेलेल्या खऱ्या डाॅ ॲंथनी एडवर्डचे प्रेत सापडते पण त्याच्या पाठीत पिस्तुलातून डागलेली गोळी घुसलेली आढळते. जाॅन बॅलेनटाईनवर खुनाचा आळ येऊन आरोप ठेवला जातो व त्याची रवानगी तुरुंगात केली जाते. यावेळी न्यायालयीन दृश्ये न दाखवता काॅनस्टन्सच्या स्वगतातून(?) तिने त्याची बाजू कोर्टात मांडण्याचा प्रयत्न कसा केला ते आलफ्रेड हिचकाॅकने मोठ्या खुबीने दाखविले आहे.
जाॅन बॅलेनटाईनला शेवटी तुरुंगवास झालाच, या धक्याने खचलेली काॅन्स्टन्स पिटर्सन पुन्हा कामावर रुजू होते. पर्यायी व्यवस्था न होऊ शकल्यामुळे डाॅ मुर्चिसन पुन्हा एकदा पूर्वीच्या पदावर परत आलेला असतो. काॅन्स्टन्स पिटर्सनशी बोलता बोलता तो बोलून जातो की, त्याची व डाॅ ॲंथनी एडवर्डची तोंडओळख झाली होती पण त्याला डाॅ ॲंथनी एडवर्ड फारसा आवडला नव्हता. काॅन्स्टन्स पिटर्सन एकदम चमकते. पूर्वी त्याने सांगितले होते की, डाॅ ॲंथनी एडवर्डला तो मुळीच ओळखत नव्हता. काॅन्स्टन पिटर्सनच्या मनात एकदम संशय निर्माण होतो. ती मनातल्या मनात जाॅन ब्राऊनने त्याने पूर्वी सांगितलेल्या स्वप्नांची व त्यांच्या अर्थांची उजळणी करते. तिला जाणवते की स्वप्नात एक चाक दिसल्याचा उल्लेख जाॅन ब्राऊनने केला होता. या मुद्याकडे दुर्लक्ष झाले होते. ते चाक पिस्तुलाचे रूप घेऊन आले असावे व भोंग्यामागे जडलेला माणूस दुसरा तिसरा कुणी नसून तो खुद्द मुर्चिसनच असला पाहिजे. व त्यानेच पिस्तुलातून गोळी मारून ॲंथनी एडवर्डला दरीत टाकले असावे. ही घटना पडलेल्या चाकाचे रूप घेऊन स्वप्नात आली असली पाहिजे.
काॅन्स्टन्स पिटर्सन मुर्चिसन समोर आपला निष्कर्ष ठेवते. तो तिचा निष्कर्ष मान्य करतो आणि म्हणतो की, ते पिस्तूल अजूनही त्याच्याजवळ आहे. ते पिस्तूल तो तिच्यावर रोखतो. पण तिकडे दुर्लक्ष करीत काॅन्स्टन्स पिटर्सन बाहेर जायला निघते पण जाताजाता बजावते की त्याचा पहिला गुन्हा संशयास्पद परिस्थितीत झालेला मानला जाईलही कारण तेव्हा त्याच्यावर मानसिक थकव्याचा प्रभाव होता हे विचारात घेतले जाईल पण आता तिचा खून झाला तर मात्र ती घटना त्याला थेट इलेक्ट्रिक चेअरवरच नेऊन बसवील. मुर्चिसन तिला बाहेर जाऊ देतो व स्वत:वरच पिस्तूल चालवून आपलाच जीव घेतो.
शेवटी काॅनस्टन्स पिटर्सन व जाॅन बॅलेनटाईनचे गोडसे मीलन होते. ते हनिमूनवर जाण्यासाठी त्याच ग्रॅंड सेंट्रल स्टेशनवर आलेले दाखवले आहेत. त्याच चेकरशी त्यांची गाठभेठ होते. तो पुन्हा आश्चर्यचकीत झालेला दाखवला आहे. अगोदर इथूनच विकृत मनस्थितीतून निर्माण झालेल्या गुन्ह्याच्या शोध मोहिमेची सुरवात झालेली दाखविली आहे.
अमेरिकेची बदलती राजनीती
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
अमेरिकेत पुराणमतवादी व सनातनी वृत्तीचे लोक बरेच आहेत. त्यामुळे साम्यवादाविरुद्धची आघाडी अमेरिकेत आपोआपच उभी राहत असे. रिपब्लिकन पक्षही परंपरेने याच वृत्तीचा असल्यामुळे लोकसंख्येतील एक मोठा गट या पक्षाकडे विनासायास वळत असे. गेली अनेक दशके हा अमेरिकन राजकारणाचा विशेष राहिला आहे. रिपब्लिकन पक्षाचा ग्रॅंड ओल्ड पार्टी अशा शब्दप्रयोगाने गौरवपूर्वक उल्लेख केला जातो. एकेकाळी अब्राहम लिंकन सारख्या प्रागतिक विचाराच्या महापुरुष या पक्षाचे नेतृत्त्व केले होते, हे ऐकून विश्वास बसणार नाही. पण त्यानंतर या पक्षाची उदारमतवादी भूमिका हळूहळू बदलत गेली. पण आता मात्र ती पार बदलली आहे.
बदलती अमेरिका - असा बदल झाला नसता तर, स्वराष्ट्र सुरक्षेबाबतीतले अतिरेकी अत्याग्रही, मुक्त बाजारपेठेचे खंदे पुरस्कर्ते, परंपरागत रूढीरीतीचे पाईक या जीओपी (ग्रॅंड ओल्ड पार्टी) भोवती गोळा होतेना. रशियन साम्राज्यवादाला जगभर ठिकठिकाणी पायबंद घालण्याचा विडाच जणू  या पक्षाने उचलला होता. ही सर्व मंडळी निरीश्वरवादी बोल्शेव्हिक क्रांतीचे लोण जगभर पोचविणासाठी सर्व सूक्तासूक्त मार्गांचा अवलंब करण्याचा खटाटोप थोपविण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत असत.
आजचा रशिया कसा? - आजचा रशिया मार्क्सिस्ट- लेनिनिस्ट शिकवणीचा (डाॅक्ट्रीनचा) पूर्वीसारखा कडवा पुरस्कर्ता राहिलेला नाही, हे जरी आजचे वास्तव असले तरी अमेरिकेच्या दृष्टीने तसेच तिची मित्रराष्ट्रे व उदारमतवादी भूमिकेचे पुरस्कर्ते यांच्या दृष्टीनेही रशियारूपी संकट पुरते निवारले गेलेले नाही, हेही नजरेआड करून चालणार नाही. रशियाने क्रीमियाला कसे गिळंकृत केले, युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर जगाने केलेल्या निर्भर्त्सनेला कशी केराची टोपली दा.खविली, विरोधाला थोडीही भीक घातली नाही, हा इतिहासही नजरेआड करता येण्यासारखा नाही. सीरियामध्ये इसीसला पायबंद घालण्याचे निमित्ताने रशियाने हस्तक्षेप करतांना केलेली बेफाम बाॅम्बफेक, त्यात गतप्राण झालेल्या निर्दोष, जखमी व लढ्यात प्रत्यक्ष सहभाग नसलेल्या नागरिक व असहाय्य बायामुलांची आक्रंदने यामुळे रशिया किंचितही विचलित झाला नाही, हे सर्व पाहिले की, रशियाचा मूळ स्वभाव निदान पुरतेपणी तरी अजूनही गेलेला नाही, असेच जग म्हणेल व म्हणते आहे. या नरसंहारात बळी गेलेल्या सगळ्यांचा एकच गुन्हा होता, तो हा की त्यातले बहुसंख्य लोक सुन्नी हा इस्लामी पंथ मानणारे होते व इसीस ही सुद्धा सुन्नीपंथीयांचा अंमल जगभर कायम करण्यास निघालेल्या अतिरेकी सुन्नींची संघटना आहे. इसीसचे बहुतेक सर्व समर्थक कडवे सुन्नी असले तरी सर्व सुन्नी इसीसचे समर्थक नाहीत, हे रशियाला दिसत नसेल का? सीरियाच्या  बशीर अल् असाद याला जेवढे सुन्नी मरतील तेवढे हवेच आहेत, कारण यामुळे शिया व सुन्नी यातील सीरियामधील संख्यात्मक समतोल शियांच्या बाजूने झुकेल. पण म्हणून रशियाची अशी मदत असादला जरी पटत असली तरी सुसंस्कृत जगताला पटणारी नाही. पण असा विधिनिषेध जणू रशियाच्या ‘डीएनए’तच नाही. इसीस बद्दल तर बोलायलाच नको. त्यांना युरोप पेटलेलाच हवा आहे. मग त्यात त्यांचीच आहुती पडत असली तरीही.
डोनाल्ड ट्रंप यांचे वेगळेपण - रिपब्लिकन पक्षाने -अब्राहम लिंकनच्या ग्रॅंड ओल्ड पार्टीने-या वेळी दिलेला अध्यक्षपदासाठीचा उमेदवार डोनाल्ड ट्रंप हा रशियाधार्जिणा निघावा, हे नजीकच्या भूतकाळात कधीही घडले नव्हते, नव्हे अमेरिकेतील कोणत्याच पक्षाने अशी निवड केली नव्हती. १९४८ साली प्रोग्रेसिव्ह पार्टीने हेन्री वालास यांची अध्यक्षपदासाठीचा उमेदवार म्हणून निवड केली होती, हाच कायतो अपवाद आढळतो. पण हा अमेरिकेतला त्या काळचा तसा लहान पण ज्याचे बहुसंख्य सदस्य साम्यवादी होते, असा पक्ष होता. गेल्यावर्षी निवडणूक प्रचार मोहिमेत डोनाल्ड ट्रंप  रशियन यांनी सतत रशियाचे अध्यक्ष व एकेकाळचे केजी बी या रशियन गुप्तहेर संघटनेचे एक प्रमुख अधिकारी व्हाल्दिमीर पुतिन यांची स्तुती केली, रशियाभोवती कडे करण्याच्या हेतूने अमेरिकेच्या प्रयत्नातून उभारलेल्या नाटोवर (नाॅर्थ अटलांटिक ट्रिटी आॅर्गनायझेशन) टीका केली आणि आपली प्रतिस्पर्धी उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या ईमेल्स ‘हॅक’ करण्यास (भेदण्यास) क्रेमलीनला (रशियाला) प्रोत्साहित केले, असा त्यांच्यावर आरोप व म्हणून आक्षेप आहे, ही वस्तुस्थिती कुणीही ( हो, कुणीही) नाकारत नाही. एवढेच नाही तर रशियाने क्रीमियाचा टवका तोडून घशात घातल्या नंतर त्या युक्रेनचा भाग असलेल्या भागाला खालसा (अनेक्स) करण्याच्या कृतीला क्षमापित (कंडोन) करून मान्यता द्यावी असा प्रस्ताव मांडला! क्रीमिया हे दीपकल्प (पेनिनसुला- म्हणजे तीन बाजूला समुद्र व एका बाजूला जमीन असलेला भारतासारखा देश/प्रदेश ) आहे. युनोने रशियाच्या या कृतीला जबरदस्तीने घेतलेला तात्पुरता ताबा (आॅक्युपेशन) असे संबोधले आहे. रशियाने या कशालाच भीक घातलेली नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच अशी घटना घडली आहे. हिला मान्यता देणे म्हणजे अमेरिकेने उत्तर कोरिया व क्युबा यांच्या पंक्तीला जाऊन बसण्यासारखे आहे. निवडून आल्यानंतर ईमेल्स बाबतचा आक्षेप डोनाल्ड ट्रंप यांनी फेटाळून लावला असून अमेरिकन गुप्तहेर संघटनेने प्रगट केलेली ही माहिती म्हणजे प्रतिपक्षीयांचे राजकीय षडयंत्र( विच-हंट) आहे, असे म्हणून या प्रचाराची संभावना केली आहे.
रिपब्लिकन नेत्यांच्या विचारात बदल -  पण एक वास्तव स्पष्ट दिसते आहे. डोनाल्ड ट्रंप यांच्या विजयानंतर अनेक रिपब्लिकन नेते त्यांच्यासारखाच विचार व्यक्त करीत आहेत. या ग्रॅंड ओल्ड पार्टीच्या रशियाकडे पाहण्याच्या दृष्टिकोणात बदल होतो आहे. नव्याने झालेल्या माहिती संकलनाच्या एका अहवालानुसार निदान चाळीस टक्के रिपब्लिकन नेते असा म्हणजे ट्रंप सारखा विचार करू लागले आहेत. असे असले तरी पूर्ण देशाचा विचार करता सत्तर टक्के अमेरिकनांना रशियाने अमेरिकन निवडणुकीत केलेल्या दखलअंदाजीची (इंटरफिअरन्स) चौकशी करावी असे वाटते तर रिपब्लिकन पक्षापुरता विचार करतो म्हटले तर असा विचार करणारे जेमतेम पन्नास टक्के किंवा थोडेसेच जास्त सदस्य या विचाराचे आहेत. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत हिलरी क्लिंन याना मत देणाऱ्या बहुसंख्य मतदारांना मात्र (८० टक्के) वाटते की, रशियाने अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेत ईमेल्स भेदण्याच्या (हॅक) निमित्ताने जी ढवळाढवळ केली त्याबद्द्ल रशियाला जाब विचारून धारेवर धरलेच पाहिजे. पण ट्रंप यांना मत देणाऱ्या जेमतेम वीस टक्के लोकांनाच असे वाटते. आपल्यासारख्या त्रयस्थांनी या अमेरिकच्या चारभिंतीतील या मतमतांतराचा गंभीरपणे विचार का करायचा?
निक्सन यांच्या काळातील अमेरिका - आपण अमेरिकेच्या बदलत्या विचाराची दखल घ्यायची ती अशासाठी की, जागतिक राजकीय सारीपटावरील अमेरिकेची भूमिका कूस बदलत असल्याची ही चिन्हे आहेत. या बदलांचा आपल्याशीही सबंध पोचतो. एकेकाळी याच अमेरिकेच्या आणि याच रिपब्लिकन पक्षाच्या त्यावेळच्या अध्यक्षाने म्हणजे रिचर्ड निक्सनने रशियाला चाप लावण्यासाठी आपला चाणक्य हेन्री किसिंजर याच्या सल्यानुसार चीनशी जवळीक करायला सुरवात केली होती असे म्हणतात. आज पारडे फिरले आहे. आता चीन डोईजड झाला आहे. म्हणून तर ट्रंप रशियाशी दोस्ती करण्याच्या प्रयत्नात नाही ना? पण यावेळी हेन्री किसिंजर सारखा कुणी चाणक्य सल्ला द्यायला दिसत नाही. मग ट्रंपमध्ये निक्सन व हेन्री किसिंजर हा अमेरिकन चाणक्य हे दोन्ही एकवटले आहेत, असे मानायचे का? हे राजकीय निरीक्षकांचे भाकित मानायचे, की त्यांनी तोडलेले अकलेचे तारे समजायचे? अर्थात याचा निर्णय काळच करील.  पण मग निक्सनना ज्याप्रमाणे डेमोक्रॅट पक्षाच्या वाॅटरगेट नावाच्या कार्यालयातील बोलणी कळावीत म्हणून मायक्रोफोन बसवण्याच्या उपद्व्यापासाठी बदनाम होऊन पायउतार व्हावे लागले होते, हा इतिहास काय सांगतो? ट्रंप यांची पावले निक्सन यांच्या पाऊलखुणांच्या दिशेने तर जात नाहीत ना? भावी काळात त्यांनाही निक्सन यांच्याप्रमाणे पायउतार व्हावे लागणार नाही ना? अनेक लोक या प्रश्नांना डेमोक्रॅट पक्षाने उडवलेल्या वावड्या म्हणत आहेत. त्यांना निवडणुकीत झालेला आपला पराभव पचवता येत नाही, असे म्हणत आहेत. हे तर आपल्या काॅंग्रेस पक्षासारखे झाले आहे की काय? काही लोक ट्रंपना बदलावे असा सल्ला रिपब्लिकन पक्षाला देत आहेत. हे ऐकून तर आपल्या ममतांचीच आठवण व्हावी, अशी स्थिती आहे. पण असे काहीही होणार नाही. अमेरिकन राजकारणात होऊ घातलेल्या आमूलाग्र बदलांची ही चाहूल आहे, असे मानणाराही एक वर्ग आहे. आपण काय बोध घ्यायचा?  जागतिक राजकारणात कुणी कुणाचा स्थायी मित्र किंवा शत्रू नसतो. स्थायी असतात ते ज्याचे त्याचे हितसंबंध. त्यासाठी कुणीही कोणत्याही टोकाला जाईल. जेम्स किर्चिक नावाचे एक राजकीय भविष्यवेते व विचारवंत आहेत. त्यांच्या आगामी ग्रंथाचे शीर्षक आहे, ‘युरोपचा अंत : हुकुमशहा, भडकावू भाषण करणारे व अंधकार युग यांचा उदय’. ही भविष्यवाणी युरोपपुरतीच मानायची की?��विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन आसेंजयाने स्पष्ट केले आहे की, त्यांना रशियाकडून हिलरी क्लिंटन यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान कोणतीही माहिती पुरविण्यात आली नव्हती. अमेरिकेतील रशियाला अनुकूल असलेल्या रिपब्लिकनांच्या एका गटाला वाटते की, रशियाला बदनाम करण्याची कोणतीही संधी डेमोक्रॅट लोकांना हवी असते व पुरेशी असते. तर दुसऱ्या गटाची भूमिका अशी आहे की, अधूनमधून रशिया विरुद्ध काही ना काही किंवा काहीही मिळाले तरी डेमोक्रॅट लोकांना हवेच असते. कारण हे लोक रशियाला मुस्लिम अतिरक्यांना छुपेपणाने साथ देणारे राष्ट्र अशी रशियाची प्रतिमा रंगवायची असते.
एक ठळक उदाहरण द्यायचे झाले तर ते हाऊस आॅफ रिप्रेसेंटेटिव्हच्या रिपब्लिकन अध्यक्षाचेच देता येईल. न्यूट गिनग्रिच नावाचे हे महाशय हाऊसचे अध्यक्ष असतानाची गोष्ट आहे. नाटोचा विस्तार करावा व त्यात लहानमोठ्या सर्वच पूर्वयुरोपियन देशांनाही प्रवेश द्यावा असा मुद्दा समोर आला तेव्हा डोनाल्ड ट्रंप यांनी भूमिका घेतली की, या देशांनी त्यांच्या संरक्षणापोटी अमेरिकेला  पैसे दिले पाहिजेत.(दे मस्ट पे अस). एखाद्या महानगराच्या उपनगराएवढाही ज्यांचा जीव नाही अशा देशाच्या संरक्षणाचे निमित्ताने अणुयुद्धाचा धोका अमेरिकेने का पत्करावा? न्यूट गिनग्रिच यांनी डोनाल्ड ट्रंप यांची री ओली. रशियाला अर्थातच आनंदाच्या उकळ्या फुटल्या, कारण व्हाल्दिमीर पुतिनला विघटन पावलेल्या सोव्हिएट साम्राज्यात काही कामाचे व उपयोगी देश पुन्हा सोव्हिएट ( प्रांत म्हणून) कोणत्याही पद्धतीने का होईना पण परत रशियात आणायचे आहेतच. इतिहासाकडून माणूस काहीही शिकत नाही, हेच खरे. दुसऱ्या महायुद्धाचा प्रसंग का ओढवला?
म्युनिचमध्ये जर्मनी, इटाली, ब्रिटन आणि फ्रान्स यांनी करार करून झेकोस्लोव्हाक गणराज्याला सुडेटेनलॅंड व संरक्षणाचे दृष्टीने महत्त्वाची ठाणी जर्मनीला बहाल करून शांतता राखण्यास मदत करण्यासाठी  एवढासा(?) त्याग करण्यास एकप्रकारे बाध्य केले. हे म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवण्यासारखेच झाले. शांततातर दूरच राहिली, जर्मन फौजांनी अख्खा झेकोस्लोव्हाकच गिळंकृत केला. रशिया व ट्रंप यांच्या जवळिकीचा हा कदाचित प्रारंभ बिंदू असावा. एखाद्या लहानशा भूभागासाठी किंवा लहानशा राष्ट्राच्या अस्तित्त्वासाठी अणुयुद्धाची जोखीम उचलावी का आणि तही फुकटाफाकटी? विचारशील व संवेदनशील अंत:करणालाच हा मुद्दा अंतर्मुख करू शकेल? दलाई लामांना आश्रय देऊन आपण चीनशी वैर ओढवून घेतले ते योग्य होते का? आपल्याकडेही हा प्रश्न विचारणारे लोक नाहीत का? मग ती तर बोलूनचालून इहवादी अमेरिका आहे. असो.
विकिलीक्सच्या ज्युलियन असांजला पकडून आणा व फसावर लटकवा, असे म्हणणारे डोनाल्ड ट्रंप आज त्याची स्तुती करीत आहेत. का? कारण असे की, ईमेल्सची बितंमबातमी आपल्याया रशियाकडून पुरवण्यात आली नव्हती, असे ज्युलियन असांजने जाहीर केले आहे. त्यामुळे त्याने केलेले गुन्हे (ते गुन्हे खरेच त्याने केले होते किंवा कसे हा प्रश्न अलाहिदाच आहे बरं का) माफ होतात का?  विधिवत व्यवहाराच्या पुरस्कर्त्यांच्या तोंडी हे शब्द शोभतात का? हीच मंडळी एकेकाळी ज्युलियन असांजने अमेरिकेशी युद्ध पुकारले आहे आणि त्यासाठी त्याला मृत्युदंडच द्यायला हवा असे म्हणत होती. म्हणून तो जीव मुठीत धरून वाट मिळेल तसा पळत सुटला आहे/होता.अमेरिकेसारखे बलाढ्य राष्ट्र एखाद्या व्यक्तीच्या/संस्थेच्या/संघटनेच्या जिवावर उठते, तेव्हा त्यावर काही भाष्य करण्याची आवश्यकता आहे का?
आज अमेरिका व रशिया यातील वैर काही काळापुरते का होईना व एकाच प्रश्नापुरते का होईना पण मिटते आहे, याला वाईट म्हणायचे कारण नाही. कोणता आहे हा अलौकिक प्रश्न? तो प्रश्न आहे, इस्लामी दशशतवाद! उद्या हा प्रश्न मिटला असे क्षणभर गृहीत धरून चालू. पण पुन्हा येरे माझ्या मागल्या का? पण डोनाल्ड ट्रंप यांना किंवा अमेरिकेलाच दोष देण्यात काय अर्थ आहे? इतिहासाच्या पानोपानी अशी अनेक उदाहरणे सापडतील. का यालाच इतिहास म्हणायचे.
या प्रश्नाला आणखीही एक आयाम आहे. डोनाल्ड ट्रंप दिनांक २० जानवारीला पदभार ग्रहण करणार आहेत. त्यानंतर ते कोणती भूमिका स्वीकारतात हे पहावे लागेल. मी काय (किंवा काय काय) करतो ते पहाच जरा, असे केवळ रशियाबद्दलच नव्हे तर इतर प्रश्नांबाबतही डोनाल्ड ट्रंप म्हणाले आहेत, असे म्हणतात. शहाण्याने त्या दिवसाची वाट पहावी, हेच बरे होणार नाही का?
चार्ल्स डिकन्सची अपूर्ण कादंबरी पूर्ण करण्यासाठी स्पर्धा

वसंत गणेश काणे,  
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ,
नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
     द पिक्विक पेपर्स,   डेव्हिड कॅापरफिल्ड, अ ख्रिसमस कॅरोल , टेल ॲाफ टू सिटीज  ( लंडन आणि पॅरिस या दोन शहरांच्या पार्श्वभूमीवर आकाराला आलेली तसेच आजही बेस्ट सेलर मानली जाणारी कादंबरी)आॅलिव्हर ट्विस्ट या सारख्या एकाहून एक सरस इंग्रजी साहित्यकृतींचा निर्माता, महान साहित्यिक तसेच सामाजिक जाणिवेचा विचारवंत चार्ल्स डिकन्स याच्या वाट्याला ७ फेब्रुवारी १८१२ ते ९ जून १८७० असे उणेपुरे ५८ वर्षाचेच आयुष्य यावे, ही साहित्य आणि सामाजिकतेची जाणीव असलेल्या व्यक्तींसाठी एक दु:खाची आणि दैवदुर्विलासाची बाब होती. व्हिक्टोरिया युगातील कल्पित पात्र निर्मिती करणार्या कादंबरीकारांचा मुकुटमणी म्हणून असलेली त्याची ओळख आजही कायम आहे. आपल्या चाहत्यांचा प्रतिसाद, समीक्षकांच्या सूचना यांना दाद देऊन तो कथानकात, पात्रांच्या व्यक्तिरेखनात बदल करीत असे. डेव्हिड कॅापरफिल्ड ही कांदबरी डिकन्सने स्वत: वरून बेतली आहे, असे म्हणतात. यातील विषयवस्तू प्रथम पुरुषी मांडलेली आहे. म्हणजे कादंबरीचे स्वरूप आत्मकथेसारखे आहे. ह्या मांडणीमुळे वाचकांना भावनावेग आवरत नाही आणि त्यांच्या डोळ्यातून सतत अश्रू पाझरत असतात, असे म्हणतात. त्यातील माॅउचर या पात्राचे चित्रण खुद्द त्याच्या पत्नीलाच आवडले नव्हते. तिने जाहीरपणे हा मुद्दा मांडला. तेव्हा पुढच्याच प्रकरणात त्याने या पात्राच्या व्यक्तिरेखेत बदल केला. ग्रेट एक्सपेक्टेशन्सचे लेखनही प्रथम पुरुषी आहे. ही डिकन्सचे तेरावी कादंबरी आहे. हिच्या लेखनात डिकन्सच्या लेखणीत एक वेगळीच सफाई आलेली आढळते. यातील पिप या अनाथ मुलाची वाढ आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचे सुरेख चित्रण वाचकांच्या स्मरणात कायमस्वरूपी राहील असे आहे. डिकन्सने ही कादंबरी तो प्रसिद्धीच्या शिखरावर असतांना आणि आयुष्याच्या संध्याकाळी लिहिली आहे.  बर्नार्ड शाॅ सारख्या चोखंदळ टीकाकारानेही या कादंबरीची तोंड भरून स्तुती केली आहे, ती उगीच नाही. कोणत्याही कथानकात समकालीन घटना  आणि समस्या हाताळण्यावर त्याचा भर असे. यातून लेखक आणि साहित्यिक यात एक जवळीक साधला जायची असे मानले जाते. सामाजिकतेची जाणीव असलेला साहित्यिक म्हणून त्याचे स्थान  आजही अढळ आहे. त्याच्या अल्पायुष्यात त्याच्या साहित्यकृतींना अभूतपूर्व अशी अफाट प्रसिद्धी मिळाली होती, ती बहुदा या वैशिष्ट्यामुळेच. त्याच्या कादंबर्या आणि कथा आजही लोकप्रिय आहेत.
चार्ल्स डिकन्सच्या अजरामर साहित्यकृती
          १८३६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्याच्या पहिल्याच साहित्यकृतीने - द पिक्विक पेपर्सने - त्याला त्याला जी अफाट प्रसिद्धी मिळवून दिली, त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. यांतील मुख्य पात्र मिस्टर सॅम्युअल पिक्विक आणि त्याचे इतर तीन मित्र या प्रत्येकाची व्यक्तिरेखा स्वतंत्र आणि आपले वेगळेपण राखून आहे. लवकरच आंतरराष्ट्रीय साहित्यक्षेत्रात तो विनोद, वक्रोक्ती आणि अचूक स्वभाव विश्लेषण यांचा मापदंड म्हणून गणला जाऊ लागला. डेव्हिड कॅापरफिल्ड, अ ख्रिसमस कॅरोल , टेल ॲाफ टू सिटीज या सारख्या त्याच्या साहित्यकृती टॅालस्टॅाय, आॅरवेल आणि चेस्टरटन या दिग्गजांच्या विशेष पसंतीला उतरल्या त्या त्यातील वास्तवता, विनोद, गद्य लेखनशैली, सजीव पात्रे आणि सामाजिकतेची जाणीव या वैशिष्ट्यांमुळे. त्याच्या लेखनशैलीवर अरेबियन नाइट्स चा प्रभाव ठिकठिकाणी दिसतो. आपल्या पात्रांना तो नावे देशांना ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देणारी असतील, याची तो काळजी घेत असे. जसे डेव्हिड कॅापरफिल्ड मधील खलनायकाचे नाव मर्डस्टोन असे आहे. हे नाव देतांना 'मर्डर' आणि 'स्टेानी कोल्डनेस' या दोन शब्दांमधील मोजके आणि नेमके अंश एकत्र केले आहेत. टेल ॲाफ टू सिटीज  या कादंबरीत लंडन आणि पॅरिस या दोन शहरांच्या वाट्याला आलेल्या अतिशय चांगल्या आणि वाईट कालखंडांचा उपयोग पार्श्वभूमी म्हणून मोठ्या खुबीने केलेला आढळतो. बालकांचे हक्क आणि शिक्षण हे त्याचे विशेष आवडीने विषय होते. मात्र आॅस्कर वाइल्ड, हेन्री जेम्स, व्हर्जिनिया वूल्फ यांनी मनोविश्लेषणाचा अभाव, सैल लेखनशैली आणि भावनातिरेक याबद्दल नापसंतीही नोंदवली होती. सामाजिकतेच्या दारिद्र्याचे अतिरेकी चित्रण आणि उबग आणणारी विनोदी पात्रे त्यांना नकोशी वाटत.
‘कादंबरी पूर्ण करा’, एक अभिनव स्पर्धा
            पित्याच्या तुरुंगवासामुळे चार्ल्स डिकन्सचे शिक्षण अपुरेच राहिले आणि त्याला एका फॅक्टरीत काम करावे लागले. त्याच्या साहित्यकृती दर आठवल्याला किंवा महिन्याला क्रमश: प्रसिद्ध होत. व्हिक्टोरियन काखंडातला हा कादंबरी प्रकाशनचा एक लोकप्रिय प्रकार होऊन बसला होता. जनसामान्य पै पै जमा करून (पेनी पेनी जमा करून ) साप्ताहिकाचा किंवा मासिकाचा 'तो' अंक विकत घेऊन वाचत असत. असा वाचकांचा आणि चाहत्यांचा एक नवीन वर्ग निर्माण करण्याचे श्रेय त्याला दिले जाते. द मिस्टरी आॅफ एडविन ड्रूड ही त्याची रहस्यमय कादंबरी क्रमश: प्रसिद्ध होत असतांनाच मध्येच त्याचे मेंदूच्या विकाराने (ब्रेन स्ट्रोक) अकस्मात निधन झाले. ह्या कादंबरीने अर्धा टप्पाच गाठला होता.त्याचा वीस वर्षे अखंडपणे सुरू असलेला साहित्यलेखनाचा सपाटा (१५ कादंबर्या, पाच कादंबरिका आणि शेकडो लघुकथा ) 'नायगारा धबधबा'अचानक थांबावा, असा थांबला. या अपुर्या कादंबरीने त्याच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का दिला. रहस्यमय कादंबरीचा शेवट न कळल्यामुळे ते अस्वस्थ झाले, पार गोंधळून गेले. पुढे लोक शेवटाबाबत अंदाज बांधू लागले. एडविन ड्रूड हा या कादंबरीचा नायक यथावकाश हे जग सोडून गेला असता, असा काहींनी अंदाज बांधला, तर काहींना वाटले की  एडविनचा खून त्याच्या अफिमबाज  व चर्चमधील गायक आणि पुजारी असलेल्या चुलत्याने केला असता. एडविनची प्रेयसी रोझावर सिलोनहून आलेल्या लँडलेसचाही (सार्थ  नाव लक्षात यावे) डोळा असतो त्यामुळे संशयाची सुई त्याच्याकडेही निर्देश करीत असते. काही म्हणत एडविन हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. जसे त्याचे स्वप्न होते, त्याप्रमाणे तो इजिप्तला सुखरूप पोचला असता. पण चार्ल्स डिकन्सने मनात योजलेला शेवट नक्की कोणता होता कुणास ठाऊक? कारण प्रस्तावित बारा भागांपैकी सहा भाग प्रसिद्ध झाले आणि डिकन्सने अचानकपणे जगाचा निरोप घेतला होता. का त्यानेही शेवट काय करायचा हे ठरवलेच नव्हते?  डिकन्सच्या चाहत्यांना हा विषय आजही अस्वस्थ करीत आहे. शेवटी त्यांना एक अभिनव मार्ग सुचला आहे. या कादंबरीचा शेवट कोणता असता या विषयावर त्यांनी चक्क एक स्पर्धाच आयोजित केली आहे. '१५० वर्षांपूर्वी ही कथा डिकन्सने कशाप्रकारे शेवटापर्यंत नेली असती?', हे सुचविण्याबाबतचे आव्हान आणि आवाहन बकिंगहॅम विद्यापीठाच्या डॅा.पेट आॅरफर्डने -त्याच्या निस्सीम चाहत्याने- एक वेब साईट( ड्रूड इनक्वायरी ) 'लाँच' करून केले आहे. यामुळे सर्जनशीलतेला वाव मिळेल असे काहींना वाटते आहे तर डिकन्सच्या लेखकाची सर इतर कुणाच्या लेखनाला कशी येणार अशी शंका वाटते आहे. ते काहीही असो, चार्ल्स डिकन्ससाठीचे हे जागतिक व्यासपीठ आता आपल्या सगळ्यांना आमंत्रित करते आहे. आजवर एक लाख लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे. मग आपणच का मागे रहायचे?  चला तर, आपणही उचलू या लेखणी!
१०५ वर्षांची महिला युद्ध वार्ताहर- क्लेअर हाॅलिंगवर्थ
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
तब्बल १०५ वर्षे जगून तिने १० जानेवारी २०१७ ला जगाचा निरोप घेतला आहे. मुळात १०५ वर्षांचं आयुष्य वाट्याला येणं ही सामान्य बाब नव्हे. पण ज्या व्यक्तीच्या वाट्याला हे दीर्घ आयुष्य आलं ती व्यक्ती एक महिला पत्रकार होती, हे विशेषच म्हटले पाहिजे. याशिवाय आणखी वेगळी बाब आहे ती अशी की, तिच्या खाती विसाव्या शतकातील जागतिक महत्त्वाची बातमी प्रथम देण्याचा विक्रम नोंदवलेला आहे. कोणती होती ही खास बातमी? ‘दुसऱ्या महायुद्धाला प्रारंभ झाला आहे’, हे तिने जगाला प्रथम सांगितले. त्या वार्ताहर महिलेचे नाव आहे, क्लेअर हाॅलिंगवर्थ.
बड्या राष्ट्रांनी झेकोस्लोव्हाकियाचा बळी दिला - १९३९ सालची गोष्ट आहे. युद्धखोर हिटलरचे तुष्टीकरणाच्या (अपीझमेंट) नीतीचा अवलंब करून समाधान करावे व युद्ध टाळता आले तर पहावे, या हेतूने युरोपातील बडी राष्ट्रे तडजोडीसाठी अटोकाट प्रयत्न करीत होती. म्युनिचमध्ये जर्मनी, इटाली, ब्रिटन आणि फ्रान्स यांनी करार करून झेकोस्लोव्हाक गणराज्याला सुडेटेनलॅंड व संरक्षणाचे दृष्टीने इतर काही महत्त्वाची ठाणी जर्मनीला बहाल करून शांतता राखण्यास मदत करण्यासाठी एवढासा(?) त्याग करण्यास एकप्रकारे बाध्य केले. हे म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवण्यासारखेच झाले होते. परिणामी शांतता तर दूरच राहिली, काही काळानंतर जर्मन फौजांनी अख्खा झेकोस्लोव्हाकियाच गिळंकृत केला.
म्युनिचची अशीही प्रसिद्धी - जर्मनीतील बॅव्हारिया नावाचा प्रांत आहे. म्युनिच हे या प्रांताच्या राजधानीचे शहर. इतिहासकालीन इमारती आणि इतिहासाच्या व कलाकुसरींच्या खुणा जपणारी वस्तु संग्रहालये (म्युझियम्) हे या शहराचे वैशिष्ट्य आहे. जगाच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या घटनाही याच शहरात घडल्या, हे या शहराचे आणखी एक वैशिष्टय! या म्युनिच शहरात १९३८ साली जर्मनीचा फॅसिस्ट हुकुमशहा ॲडाॅल्फ हिटलर हा वखवखलेल्या भूमिकेत एका परिषदेत सहभागी झाला होता. वर्षापूर्वीच त्याने आॅस्ट्रिया गिळंकृत केला होता. पण त्याची भूक शमली नव्हती. आता त्याची बुभुक्षित नजर झेकोस्लोव्हॅकियातील सुडेटेंलॅंड या प्रदेशाकडे वळली होती. हा भूभाग त्याला जर्मनीत सामील करून हवा होता. कारणही तसेच महत्त्वाचे(?) होते. झेक सरकार म्हणे तिथल्या जर्मन भाषिकांवर अन्याय करीत होते. या प्रश्नाचा विचार करण्यासाठी २९ सप्टेंबर १९३८ ला म्युनिचला परिषद बोलावण्यात आली.
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र - जर्मनी, इटाली, ब्रिटन आणि फ्रान्स यांनी ठराव केला तो असा. जर्मनीने इतर कुठे आक्रमण न करण्याचे वचन दिल्यास सुडेटेंलॅंड हा झेकोस्लोव्हॅकियातील भूभाग खालसा करण्यास हरकत नसावी. वा रे करार! भूभाग झेकोस्लोव्हॅकियाचा! खालसा करण्याची (अनेक्स) अनुमती देणारे इटाली, ब्रिटन आणि फ्रान्स हे होतात कोण? पण शांततेसाठी झेकोस्लोव्हॅकियाने हा ‘त्याग’ करणे कसे आवश्यक आहे, हे त्याला पटवून देण्यात आले. करारावर जर्मनीच्या वतीने ॲडाॅल्फ हिटलर, ब्रिटनच्या वतीने नेव्हिल चेंबरलेन, फ्रान्सच्या वतीने एडाॅर्ड डालाडीर व इटालीच्या वतीने बेनीटो मुसोलिनी यांनी सह्या केल्या. बिचाऱ्या झेकोस्लोव्हॅकियाला त्याग केल्याचे नोंदवण्याचाही अधिकार नव्हता. पण बड्या राष्ट्रांनी हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवूनही दुष्टात्मा शांत झाला नाही, तो नाहीच. कदाचित इतिहासपुरुष कंठरवाने सांगतही असेल की, बाबांनो, तुष्टीकरणाची नीती शांततेची ग्वाही देत नाही.
चेंबरलिन व आपल्यातले विलक्षण साम्य - चेंबरलिन हातात कागदाचा तुकडा हलवीत जगाला आश्वस्त करीत होते, ‘ही पहा, आम्ही हस्तगत केलेली आमच्या काळातली शांतता’. अख्खे ब्रिटन सुखावले. त्यांच्या पंतप्रधानाने जगाला युद्धापासून वाचवले होते. जगात हे असे नित्य चालूच असते. बरोबर उण्यापुऱ्या १७ वर्षांनी आपण नाही का असाच पंचशील करार चीन बरोबर २९ एप्रिल १९५४ रोजी पेकिंग येथे करून अत्यानंदाने नाचलो होतो. दोन उदाहरणात तपशीलात एक दोन ‘लहानसे फरक’ आहेत. झेकोस्लोव्हॅकियात मरणापूर्वीची भयाण शांतता होती. आपल्याला तेही कळत नव्हते. आम्ही जल्लोश करीत होतो. दुसरा ‘लहानसा’ फरक हा होता की, झेकोस्लोव्हॅकियाने स्वत: स्वाक्षरी न केल्यामुळे तसा तो पापाचा धनी होत नव्हता. आपण आपण जाणूनबुजून, अक्कलहुशारीने, नशापाणी न करता, सवखुशीने एकामागून एक असा पाच शिळांचा आघात स्वत:वर ओढवून घेतला. सीमाप्रश्न, अझरला दहशतवादी ठरवण्याचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रात कायम सदस्यत्व देण्याचा प्रश्न, काश्मीरप्रकरणी पाठिंबा देण्याचा प्रश्न, एनएसजीत प्रवेशाचा प्रश्न या सारख्या प्रकरणी पाचपेक्षा जास्त शीळा चीनने आपल्या मस्तकावर हाणल्या आहेत. असो हे काहीसे विषयंतर झाले.
नमनालाच घडाभर तेल का? - १ आॅक्टोबर सुडेटेंलॅंड व पुढे मार्च १९३९ रोजी अख्खा झेकोस्लोव्हॅकियाच जर्मनीने गिळंकृत केला. नवीन पिढीला हा इतिहास माहीत नाही. जुन्या पिढीतलेही हा इतिहास जगलेले  ज्येष्ठतर नागरिकही आजमितीला फारसे शिल्लक नसणार. म्हणूनच नमनालाच घडाभर तेल लागते आहे.
झेकोस्लोव्हाकिया जगाच्या नकाशावरून पुसला गेल्यानंतरही चेंबरलीन यांची  युद्धाविणा शांती जिंकल्याची नशा काही उतरली नाही. नंतर पोलंडचा बळी गेला. मग मात्र चेंबरलिन यांना जाणवले की, हिटलरच्या शब्दांवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही आणि दुसऱ्या महायुद्धाला प्रारंभ झाला. ज्यांचा या युद्धाशी प्रत्यक्ष असा कोणताही संबंध नव्हता अशा पाच कोटी नागरिकांची आहुती पडल्यानंतरच हे युद्ध थांबले पण तेही शीत युद्धाला जन्म देण्यासाठी.
अजि म्या युद्ध पाहिले - आपल्या कथानायिकेची -  क्लेअर हाॅलिंगवर्थची - विशेषता ही की, तिने आपल्या स्वत:च्या डोळ्याने या युद्धाचा प्रारंभ पाहिला आहे. आधुनिक काळातली ‘संजयच’ म्हणाना. पत्रकार म्हणून जगाला या प्रारंभाचे वार्तांकन करणारी ती पहिली वार्ताहर आहे. १९३९ च्या शेवटी शांतता पथकाच्या सोबतीने ती जर्मनी व पोलंडच्या सीमेबर ती अगोदरच येऊन पोचली होती. ‘युद्धस्य कथा रम्या’ असे एक वचन आहे. तिलाही युद्धाच्या वार्ता प्रिय असत. नव्हे युद्धभूमीवर आपण जातीने असावे, असे तिला वाटायचे. (एंजाॅय बिईंग इन वाॅर). पोलंडमधील कटोव्हाईस या गावी ती लंडनच्या डेली टेलिग्राफची वार्ताहर म्हणून काम करीत होती. आॅगस्टमध्ये काम स्वीकारल्या नंतर केवळ तीन दिवसातच विसाव्या शतकातल्या (कदाचित  मागच्यापुढच्या सर्वच शतकातल्या) सर्वात मोठ्या स्कूपची (बितंबातमीची) ती एकमेव धनी ठरली. बातमी होती, ‘हिटलरने पोलंडवर आक्रमण केले आहे. दुसरे महायुद्ध सुरू झाले आहे’.
 दुसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभाचा आखो देखा हाल- संकटाची चाहूल लवकर लागावी म्हणून क्लेअर हाॅलिंगवर्थ खुद्द जर्मनीतच गेली. आपल्या माजी प्रियकराच्या वशिल्याने तिने एक राजकीय वाहन हस्तगत केले. त्यांवर ‘युनीयन जॅक’ हा ब्रिटिश राष्ट्रध्वज लावला. आता ती पोलंड व जर्मनीच्या सीमारेषेवर बिनधास्त फिरू शकत होती. कारण तोपर्यंत ब्रिटन व जर्मनीचे मित्रत्त्वाचे संबंध होते. ‘मला धडाडत चाललेल्या मोटरसायकलवरून जाणारे निरोपे ठिकठिकाणी दिसले. माझ्या एका बाजूला एक खोल दरी दिसत होती. आत डोकावता येत नव्हते. एक भलामोठा पडदा आतले सर्वकाही झाकत होता’, क्लेअर आपल्या सहकाऱ्यांना सांगत होती. सत्तर वर्षांपूर्वी अनुभवलेला प्रसंग तिच्या दृष्टीसमोर पुन्हा एकदा तसाच ताजातवाना उभा राहिला होता. टेलिग्राफ मधील कर्मचारी कान देऊन ऐकत होते. तेही तोच थरार अनुभवत होते.
‘कुठूनसा वाऱ्याचा प्रचंड झोत आला. लहानमोठ्या वस्तू जागा सोडून उडाल्या.छोटी झुडपे तर मुळापासून उखडली गेली. आता दरीतले दृश्यही दिसू लागले. कारण दृश्य झाकणारा पडदा पार उडून गेला होता. खोल दरीत शेकडो रणगाडे आग ओकीत निघाले होते. मी वेगाने परत फिरले.
‘बये, तू कुठे गेली होतीय?’, माझा माजी प्रियकर चिंताग्रस्त होऊन मला विचारत होता. मी वाहन परत केले व उत्तरले,’जर्मनीत’.
‘वेड लागलय का तुला? तिकडे कशाला मरायला का गेली होतीस?’, त्याच्या स्वरातील राग व चिंता दोन्ही जाणवत होती.
‘स्कूप (बितंमबातमी)’, अरे मला स्कूप मिळाला आहे’, क्लेअर सांगत होती. हो,  ती सांगत होती आणि अख्ख्या जगाला प्रथमच कळत होते की, ’पोलंडमध्ये जर्मन रणगाडे घुसले आहेत’.
तत्क्षणी ती सर्व धावत ब्रिटिश कार्यालयात घुसली. क्लेअरने टाईप करायला सुरवात केली.
‘टाॅप सीक्रेट!’
जर्मनीने पोलंडवर रणगाडे घुसवून हल्ला केला आहे!
दुसरा मेसेज पाठवला वाॅर्साला. तिथल्या टेलिग्राफच्या वार्ताहराला तिने सर्व हकीकत सांगितली. २९ आॅगस्टला पोलंडच्या वृत्तपत्रात युद्धाची आठ काॅलमी बातमी होती, ‘ जर्मनीचे १००० रणगाडे सीमेवर तैनात असून शेकडो रणगाडे पोलंडमध्ये घुसले आहेत’.
क्लेअर हाॅलिंगवर्थची पाच दशकांची युद्ध कारकीर्द - यानंतर सुरू झाला तिचा (क्लेअर हाॅलिंगवर्थचा) पाच दशकांचा युद्ध वार्ताहर म्हणून प्रवास!अल्जेरिया ते व्हिएटनाम, ग्रीस ते येमेन कुठेही युद्धभूमी आहे आणि  क्लेअर हाॅलिंगवर्थ मात्र नाही, असे झाले नाही. ब्रिटिश गुप्तहेर किम फिल्बी  रशियाला फितूर झाला होता. त्याला बेनकाब करण्याचे काम क्लेअर हाॅलिंगवर्थ हिने पार पाडले. १९८० पासून तिचा मुक्काम हाॅंगकाॅंगमध्ये होता. तिथेच १० जानेवारी २०१७ ला तिने अखेरचा श्वास घेतला.
बेदरकार क्लेअर - सफारी घालून, मोतीजडित पिस्तुल बाळगत क्लेअर हाॅलिंगवर्थ सैन्यासोबत त्यांच्याप्रमाणेच पावले टाकीत चालतांना पाहणारे अनेक आहेत. बंडखोरांच्या छुप्या छावण्यांना भेट देण्याचा बेदरकारपणा तिच्यात होता. बंदुकींच्या परस्परफैरी सुरू असतांना ती शांतचित्ताने ते ‘फायरवर्क’ पाहत असायची. बाॅम्बफेकी विमानांच्या सोबत तीही दुसऱ्या विमानाने जायची. काश्मीरमध्ये मोटारीत बसून ती एक पूल ओलांडत असतांनाची गोष्ट. पुलावर पाकिस्थान्यांनी गोळे डागण्यास सुरवात करताच ती शेजाऱ्याकडे वळून म्हणाली, ‘असं काही झालंनं की जीवनात जगण्यासारखं बरचं काही आहे, असं वाटायला लागतं’. युद्ध वार्ताहरक्षेत्र हे पुरुषांचं क्षेत्र मानलं जातं. पण या कुणाच्याही तुलनेत ती कमी पडली नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळची गोष्ट सांगतात. उत्तर आफ्रिकेत वाळवंटातली लढाई सुरू होती. ब्रिटिश सेनापती बर्नार्ड माॅंटगोमेरी ने क्लेअर हाॅलिंगवर्थला पत्रकारांच्या ताफ्यातून हाकूनच लावले. तसाही तो स्त्रीद्वेष्टाच होता म्हणा. सैन्याच्या आघाडीवरील तुकडीसोबत महिला नको. ही महिलांची जागा नाही. पिछाडीला सुरक्षित जागी रहा आणि कर वार्तांकन. क्लेअर हाॅलिंगवर्थ तिथून जी निघाली ती अल्जिरियामध्ये जनरल आयसेनहाॅवरच्या सैन्याच्या तुकडीतील एक सहकारी सैनिकच होऊन बसली.
वाळवंटी राहू - वाळवंटातील लढाईत सैन्याची खरी कसोटी लागते. दिवसेदिवस शरीराला पाण्याचा स्पर्श होत नाही, रात्री आकाश पांघरून झोपायचं, मास आणि बिस्किटांवर दिवस काढायचे. हे सहन न होऊन अनेक पुरुष वार्ताहर परत फिरत, कैरोला मुक्काम ठोकीत व तिथूनच वार्तांकन करीत. पण क्लेअरला हे पटणं शक्यच नव्हतं. जमिनीवर झोपायची सवय व्हावी म्हणून घरीसुद्धा ती जमिनीवरच झोपायची. तशी ती पाच फुटाची बुटरीच होती पण विमान चालवायची. पॅराशूट घेऊन बेधडक उडी मारायची. येतोय तो गोळा तोफेचा की ती बंदुकीतून डागलेली गोळी आहे, हे आवाजावरून ओळखायची.
हाताशी विजेरी व पिस्तुल - पोलंड अत्यल्प वेळात काबीज करा, अशा हिटलरच्या आज्ञा होत्या. त्यामुळे सैन्याच्या हालचाली विद्युतवेगी असत. पण या काळात तिची कार त्यांच्याही पुढे असायची. गडद अंधार असेल तरच थांबायचं, गाडी रस्त्याच्या कडेला घ्यायची, तोंडात बिस्किटांचा तोबरा भरायचा, तो घशाखाली उतरावा व्हिस्कीचा घोट घ्यायचा, हाताशी विजेरी आणि पिस्तुल ठेवायचं, शरीराचं मुटकुळं करायचं आणि ताणून द्यायची गाडीतच.
सर्वसंचारी क्लेअर - १९६० साली अल्जिरियात फ्रेंचांविरुद्ध गनिमी युद्ध सुरू झाले होते. त्यावेळी क्लेअर हाॅलिंगवर्थ ब्रिटनमधील गार्डियन या वृत्तपत्राची वार्ताहर होती. या वृत्तपत्राने आपला स्वत:चा इतिहास लिहिला आहे. त्यात क्लेअर हाॅलिंगवर्थ बाबत गौरवपूर्ण उल्लेख करतांना लेखक म्हणतो, अहो, बंदुकांचे आवाज येऊ लागले की, ही सुद्धा त्या दिशेने चालू लागायची. कुठल्याही कसब्यात/डेऱ्यात तिचा बेधडक संचार असे.
प्रतिहल्ला करण्याची हिंमत - अल्जेरियात एका हाॅटेलवर उजव्या गटाच्या अर्धसैनिक गटाने हल्ला चढवून एका ब्रिटिश पत्रकाराचे अपहरण केले. ही घटना आहे १९६२ सालची. क्लेअर हाॅलिंगवर्थची बहाद्दुरी अशी की, तिने सर्व परदेशी वार्ताहरांना संघटित केले व प्रतिहल्लाच केला म्हणाना. पण कसा?
पोकाॅक नावाच्या ग्रंथकाराने  ‘इस्ट ॲंड वेस्ट आॅफ सुवेझ’ या नावाच्या ग्रंथात या लढ्याची साद्यंत हकीकत दिली आहे. क्लेअर हाॅलिंगवर्थने जणू जोन आॅफ आर्क चे रूप धारण केले होते. आपले दोन्ही बाहू उंचावून ती म्हणाली, ‘त्यांना म्हणावं, आमच्यातल्या एकालाच काय पकडता? आम्ही सगळेच येतो ना? मला खात्री आहे, जगातल्या सर्व पत्रकारांना मारण्याची हिमत त्यांच्यात नाही. आम्हा सगळ्यांनाच सरसावलेले पाहताच त्यांनी आमच्यातल्या ‘त्या’ एकाची मुक्तता केली.
लाडावलेल्या पत्रकार - पत्रकारांचेही प्रकार असतात. त्यात महिला पत्रकारही आल्याच की. अर्नेस्ट हेंमिंगवेची मोहक पत्नी मार्था गेलहाॅर्न आणि लाईफ व टाईम या मासिकांचा प्रकाशकाशी विवाहबद्ध झालेली क्लेअर बूथ लूस यांची संभावना ती ‘त्या लाडावलेल्या खास बायका’ अशा सारख्या शब्दात करायची.
कष्टांची करामत - ती असं का बरं म्हणत असेल? तिला सतत असुरक्षित वाटायचं. ती अनेक वर्षे मुक्त पत्रकार (फ्री लान्सर) होती. पैसा बेताचाच मिळायचा. झगडत झगडतच ती पुढे आली. त्या काळात कष्टांना पारावार नव्हता. मग मात्र ती गार्डियन व नंतर डेली टेलिग्राफची स्टाफ मेंबर झाली. पण आता तिने पन्नाशी ओलांडली होती. एका संपादकाचे मत असे आहे/होते की, तिची सुरवाती सुरवातीची वार्तापत्रे हकीकतीसारखी( नॅरेटिव्ह) न वाटता सरकारी परिपत्रकासारखी(कम्युनिके) असायची. लिखाण सुधारण्यासाठी तिला खूप कष्ट घ्यावे लागले. या दृष्टीने विचार करता तिचे दुसरे पती ब्रिटिश पत्रकार जाॅफ्रे होर यांची तिला खूप मदत झाली. तिची वृ्ते ते ठीकठाक करीत.
गुणविशेष - जिज्ञासा, दम (स्टॅमिना), माहिती मिळविण्याची बहुमुखी व बहु आयामी सूत्रे ( सोर्सेस) यात तिचा कुणीही हात धरू शकत नसे. सेनापती असो वा राजनैतिक अधिकारी, मंत्री असो वा समाज धुरीण एवढेच नव्हेत तर सर्व प्रकारचे बंडखोर या सर्वांबरोबर तिचा वट सारख्याच सहजतेने चालत असे. त्यामुळे प्रकाशने, अर्थकारणाला वाहिलेली नियतकालिके, टाईम सारखी मासिके आणि दैनिके अशा सर्व प्रकारच्या वृत्तक्षेत्रात तिच्या वृत्तांचे स्वागत असे. तिच्या मित्रात आणि संपर्क सूत्रात कोण नव्हते? डोनाल्ड मॅक्लीन व फिल्बी सारखे बडे बडे फितुर गुप्तहेर तर होतेच पण रशियाला माहिती पुरवणाऱ्या गुप्तहेरांच्या संघटनांशीही ती नित्य संपर्कात असायची.
फिल्बी प्रकरण - फिल्बी प्रकरणी तिची भूमिका तर खाशी व वेगळीच आहे. फिल्बी हा मूळचा ब्रिटिश गुप्तहेर पण रशियाला फितुर झाला (डबल एजंट) होता. तो पत्रकाराचा बुरखा पांघरूनही वावरत असे. लेबॅनाॅनची राजधानी बैरूट येथे एका रात्रीच्या भोजनाला (डिनर) तिला व फिल्बीला आमंत्रण होते. पत्रकाराने हमखास हजर असावे, असा तो कार्यक्रम होता. भोजनाला फिल्बी आला नाही. क्लेअर हाॅलिंगवर्थच्या मनात त्याच्या देशनिष्ठेविषयी शंका होतीच, तिने बंदरावर बारीक तपास केला. त्या रात्रीच फिल्बीने युक्रेनमधील (त्यावेळी युक्रेन रशियाचा भाग होता) ओडेसासाठीच्या जहाजातून पलायन केले होते.
या वृत्ताला बित्तंबातमी (स्कूप) म्हणता येणार नव्हते. हा तर बाॅम्बच होता!ब्रिटिश सरकारने गार्डियन वृत्तपत्राला कोर्टातच खेचले असते. शीत युद्धाच्या काळात ही गौप्यस्फोटाऐवजी बदनामीकारक बातमीच मानली गेली असती. ही बातमी छापण्याची गार्डियनच्या संपादकाची हिंमत होत नव्हती. इकडे क्लेअरचा जीव खालीवर होत होता. दुसऱ्या कुणाला ही बातमी मिळाली तर ? पण क्लेअर चतुरही होती. एके दिवशी मुख्य संपादक रजेवर आहे हे पाहून तिने त्याच्या सहाय्यकाकरवी बातमी छापवून आणली आणि दिला बार उडवून! तीन महिने ब्रिटिश सरकार चिडीचूप होते. या काळात कुणाकुणाला सरकारी समन्स आल्याची स्वप्ने रात्री व दिवसाही पडत होती कुणास ठावूक? क्लेअर हाॅलिंगवर्थ तर संपल्यातच जमा झाली असती. पण तीन महिन्यानंतर ब्रिटिश सरकारने जाहीर केले की, ‘फिल्बी रशियाला फितुर (डिफेक्ट) झाला आहे’.आणि क्लेअर हाॅलिंगवर्थ बित्तंबातमी काढणाऱ्यांमधली महाराणी ठरली.
कारकिर्दीची साजेशी अखेर - १९७३ मध्ये क्लेअर हाॅलिंगवर्थची कारकीर्द संपली. शेवटची नेमणूक तिच्या कीर्तीला साजेशीच होती. टेलिग्राफ वर्तमानपत्राने तिची नेमणूक चीनमध्ये केली होती. माओची प्रकृती बिघडत चाललीच होती हे जगाला माहीत होते (की त्याने इहलोकीची यात्रा संपविली होती?). रशियाचा लोखंडी पडदा (आयर्न कर्टन) भेदणे एकवेळ सोपे होते पण चीनचा बांबू कर्टन ? तो अभेद्य मानला जायचा. चीनमध्ये सत्तासंघर्ष सुरू झाल्याचा संशय होता, वार्ता कानावर येत होत्या. अशा परिस्थितीत चीनमध्ये क्लेअर हाॅलिंगवर्थची नेमणूक नाही करायची तर कुणाची? ती चीनमध्ये डोळ्यात तेल घालून वावरत होती. शेवटी ९ सप्टेंबर १९७६ ला चीननेच जाहीर केले की, मध्यरात्रीनंतर दहा मिनिटांनी माओने जगाचा निरोप घेतला आहे.
‘आय जस्ट एंजाॅय इट’ - क्लेअर हाॅलिंगवर्थ आयुष्यभर मृत्यूच्या छायेखालीच वावरत होती. १९४६ साली जेरूसलेममधील किंग डेव्हिड हाॅटेल अतिरेक्यांनी उडवून लावले. जवळपास शंभर लोक मृत्युमुखी पडले. त्यावेळी काही फुटाच्या अंतरावरच क्लेअर हाॅलिंगवर्थचा निवास होता.
 ‘मी काही शूरवीर नाही बरं का?’, क्लेअर हाॅलिंगवर्थ म्हणत असे. संकट प्रसंगातील क्षण मला आवडतात. मी त्यांचा आस्वाद घेत असते ( आय जस्ट एंजाॅय इट). का ते विचारू नका. परमेश्वरानेच मला असे घडविले आहे.मला भीती वाटत नाही, घाबरायला होत नाही,  इतकंच.
‘भारतरत्न महामोहोपाध्याय पांडुरंग वामन काणे स्मृती पुरस्काराचा मानकरी’ - अजित वसंत काणे
वसंत गणेश काणे,
   दिनांक ९/१० जानेवारी २०१६ ला कल्याण येथे काणे कुल संमेलनात अजित वसंत काणेच्या म्हणजे माझ्या मुलाच्या वतीने ‘भारतरत्न महामोहोपाध्याय पांडुरंग वामन काणे स्मृती पुरस्कार’ हा सन्मान मी स्वीकारला आहे. अकरा पेटंट्स व अन्य तीन मार्गस्थ पेटंट्स असा अजितच्या कार्यकर्तृत्त्वाचा आलेख आहे.  त्याचे कार्य पारितोषिक किंवा गौरवपात्र आहे किंवा कसे याबाबत त्याची किंवा आमची खात्री नव्हती. पण आयोजकांनीच शोध घेऊन व माहिती मिळवून सूचना केल्यामुळेच हा योग घडून येत आहे, याबद्दल आम्ही आनंद व आभार व्यक्त करतो. पाच हजार रुपये रोख, मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे हे पारितोषिक आपल्या पुत्राच्या वतीने स्वीकारतांना होणाऱ्या  आनंदाची कल्पना अशाच प्रकारचा अनुभव असलेल्या एखाद्या पित्यालाच पुरतेपणी येऊ शकेल. अमेरिकेत पेन्सिलव्हॅनिया प्रांतात याॅर्क या अमेरिकेच्या पहिल्या राजधानीच्या गावी कार्यरत असलेला तो आणि त्याचे कुटुंबीय कार्यबाहुल्य व व्यस्ततेमुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, म्हणून त्यांच्या वतीने ह्या सन्मानाचा मी विन्म्रतापूर्वक व साभार स्वीकार केला आहे.
    त्याचा पुत्र म्हणजेच माझा नातू ओम्कार याने हाताच्या बोटांच्या हालचालीनुसार नियंत्रित होऊ शकणाऱ्या मानवरहित यानाला, म्हणजेच ड्रोनला, ‘इंटेल इंटरनॅशनल सायन्स ॲंड इंजिनिअरिंग फेअर २०१५’ मधील सर्व सहभागी प्रकल्पात, चौथ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने ओम्कारने उपस्थितांपैकी एका शास्त्रज्ञाची, म्हणजेच २००८ मधील रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते मार्टेन शॅफी यांची भेट घेऊन त्यांच्याशी बातचीत केली. त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले की, स्पर्धेतील यशापयशाला पराभव समजून खचू नका. माझा स्वत:चा प्रकल्प चार वर्षे यशदायी होत नव्हता. मी अगदी खचून गेलो होतो. विषयच सोडून देण्याच्या विचारात होतो. पण माझ्या गाईडने मला प्रयत्न सोडू नकोस, असा धीर दिला. मी त्याप्रमाणे वागलो आणि मला २००८ चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. तोपर्यंत एकही धनवंत मला मदत करण्यास धजावत नव्हता. नंतर मात्र सहकार्यासाठी आतूर असलेल्यांची रीघच लागली.
   उद्योग आणि उत्पादन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘स्टार्ट अप आणि स्टॅंड अप’ या संकल्पना योजना स्वरूपात दिनांक १६ जानेवारी २०१६ या तारखेला आकार घेत आहेत, त्यामुळे उद्योग व उत्पादन क्षेत्रात कार्य करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी एक अमोल संधी उपलब्ध होत आहे. अशीच संधी संशोधन क्षेत्रातही अशाच स्वरूपात लवकरच उपलब्ध होईल, अशी आपण अपेक्षा बाळगू या.
   काणे कुल संमेलनाची कल्पना हा एक स्वागतार्ह उपक्रम आहे. अनेक वर्षांपूर्वी श्री. ज. जोशी यांची 'वृत्तांत' ही कादंबरी वाचली होती. जोशी कुलवृतांतासाठी माहिती मिळावी यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून जी माहिती उपलब्ध झाली त्यावरून असे लक्षात आले की, केवळ तीन पिढ्यात हे जोशी कुलोत्पन्न, जगातील सर्व खंडातील प्रत्येक देशात व जीवनातील प्रत्येक क्षेत्रात पसरले होते. ही या कादंबरीतील एक कल्पित कथा होती. पण आज कोणत्याही कुलाचे बाबतीत ही सत्यकथा असणार, यात शंका नाही. अर्थात काणे कुलही याला अपवाद असणार नाही. ही सगळी माहिती मिळवून संकलित करण्याचे व तिचा आढावा घेण्याचे कार्य अशा संमेलनातून घडून येत असते. त्यामुळे अशा उपक्रमांची महती सांगण्यास शब्द अपुरे पडतात.पुन्हा एकदा सर्वांचे आभार.

Saturday, January 7, 2017

जपानमधील राजंसन्यास
वसंत गणेश काणे

  जपानचे ८३ वर्ष वयाचे सम्राट अकिहिटो यांनी वृद्धापकाळामुळे व प्रकृतीमानही ठीक राहत नसल्यामुळे राज्यत्याग करण्याची इच्छा टिव्हीवर भाषण करून व्यक्त केल्याला बराच काळ उलटून गेला आहे, माझी प्रकृती दिवसेदिवस ढासळते आहे, असे ते म्हणाले. तसे पाहिले तर यात अस्वाभाविक किंवा ज्याला वृत्तमूल्य असावे, असे काहीही नसावे, असाच सर्वसाधारण समज असेल ? पण असे नाही. त्यांच्या भाषणानंतर जपानी विश्वामध्ये निरनिराळे तरंग उमटले आहेत. त्यांना बदललेल्या आंतरराष्ट्रीय घटनांची किनार आहे. या घटनांचा मागोवा जरा वेगळ्या पद्धतीने घेणे उपयोगाचे होईल, असे वाटते. त्यासाठी वर्तमानातून प्रारंभ करून भूतकाळात जावे, हे योग्य व विषय समजण्याचे दृष्टीने सोयीचे ठरेल, अशी अपेक्षा आहे.
अचानक व अनौपचारिक भेट -  जपानचे पंतप्रधान पेरू देशाच्या दौऱ्यावर असतांना ‘ब्रेक जर्नी’ करून न्यू याॅर्कला उतरतात आणि नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची अनौपचारिक भेट घेणारे जागतिक कीर्तीचे पहिले राजकारणी ठरतात, याला एक वेगळे महत्त्व आहे. डोनाल्ड ट्रंप हे राज्यशकट हाकण्यासाठी आपल्या चमूची जमवाजमव करीत असतांनाच ही भेट घडून आली आहे. त्यामुळे ही भेट तशी अनौपचारिकच असणार हे उघड आहे. जपानने स्वत: अण्वस्त्रासकट सर्वच बाबतीत शस्त्रसज्ज होऊन आपल्या सुरक्षेची तजवीज करावी, असे डोनाल्ड ट्रंप हे आपल्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान म्हणत होते. प्रचारादरम्यान केलेली विधाने फारशी गंभीरपणे घ्यायची नसतात, हे आता अमेरिकेतही गृहीतच धरले जाते. ही भेट अनौपचारिक असली तरी मैत्रीपूर्ण स्वरूापासह ती परस्पर विश्वास वाढवणारी ठरली, हे जपानच्या अध्यक्षांचे विधान खरेच मानावयाला हवे. जपानने शस्त्रे (अण्वस्त्रासकट) तयार करू नयेत व बाळगू नयेत, ही अट दुसरे महायुद्ध संपल्यानंतर जपानची शरणागती मान्य करतांना इंग्लंड अमेरिकादी देशांनी जपानवर लादली होती. या मोबदल्यात जपानच्या संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेने घेतली होती. या साठी जी शिबंदी अमेरिकेला पॅसिफिक महासागरात तैनात ठेवावी लागेल, तिच्या खर्चापोटी  जी रकम लागेल, तो खर्च जपानने सोसला पाहिजे, असे काहीसे या. कराराचे स्वरूप होते. सर्व अटींचे पालन करीत जपानने आपले लक्ष युद्धाच्या जखमा भरून काढण्यावर व अन्य प्रगतीपर बाबींवर केंद्रित करून प्रगतीचा उच्चांक गाठला आहे. आता डोनाल्ड ट्रंप यांना जपान व दक्षिण कोरिया यांनी संरक्षणविषयक सर्व जबाबदारी स्वत: शस्त्रसज्ज होऊन उचलावी किंवा त्यासाठी होणऱ्या खर्चाचा भार उचलावावा, असे म्हणण्याचे तसे पाहिले तर कारण नव्हते. खर्चापोटी होणारी रकम जपान व दक्षिण कोरिया सुरवातीपासूनच ठरल्याप्रमाणे अमेरिकेला देत आहेत. त्यात वाढ करून हवी असे म्हणणे वेगळे व यापुढे तुमचे तुम्ही पहा, असे म्हणून हात झटकणे वेगळे. जपानने आज अण्वस्त्रसज्ज व्हावे, असे ठरविले तरी त्यासाठी निदान एक दशक तरी लागेल. अमेरिकेवर संरक्षणासाठी फारकाळ अवलंबून राहता येणार नाही व तसे करणे योग्यही नाही, असा विचार सूप्तपणे जपानमध्ये बळावत चालला होताच, असे एक मत आहे. ते कितपत खरे किंवा खोटे आहे, याची शहानिशा करणे कठीण आहे. पण जपानचे विद्यमान पंतप्रधान शिंझो अबे हे जपानने शस्त्रसज्ज व्हावे, या मताचे आहेत, हे खरे आहे. ते नव्या पिढीचे प्रतिनिधित्त्व करीत आहेत. तरजपानचे सम्राट अकिहिटो हे जपानमधील भीष्मपितामह शोभावेत, असे आहेत. हिरोशीमा व नागासाकीतील मानव संहाराच्या स्मृती तर त्यांच्या मनात ताज्या अणारच. या हल्यातून जे कसेबसे वाचले त्यांना झालेल्या मरणप्राय यातनांचेही ते साक्षीदार असणार, हेही ओघानेच येते. त्यामुळे ते वयोनिवृत्ती घेण्याचा विचार करीत अाहेत असे वृत्त असले तरी जपानने शस्त्रसज्ज व्हावे, त्यातही अण्वस्त्रसज्ज व्हावे हे मत त्यांना मान्य नाही, असे म्हणतात. हे खोटे मानता येणार नाही. पण राजसिंहासनाचा त्याग करणे जपानमध्ये राजालाही सोपे नाही. हा वदतोव्याघात असला तरी ते एक सत्य आहे.
घटनेत पदत्यागाची तरतूद नाही -  पहिली बाब ही की जपानी राज्यघटनेनुसार सम्राटाने तहाहयात पदावर राहिलेच पाहिजे, असे आहे. त्यांना मध्येच पदत्याग करण्याची अनुमती जपानी राज्यघटना देत नाही. सनातनी लोकांना तर सम्राटांचा हा विचार मुळीच रुचणार नाही की मान्य होणार नाही. जपानचे पंतप्रधान शिंझो अबे तसे नव्या विचाराचे व पिढीचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी सम्राटांच्या वयोनिवृत्तीबाबत(?) काय करायचे यावर सरकार गांभीर्याने विचार करील व मार्ग काढील, असे म्हटले आहे.
  सम्राटपदी स्त्री असणार नाही - दुसरे असे की, घटना दुरुस्त करण्याच्या विचाराला प्रारंभ होताच एक मुद्दा नव्याने चर्चेला येणार आहे/नव्हे आला आहे. जपानमध्ये सम्राटपद वारसा हक्काने पुढील पिढीकडे जात असले तरी तो वारस पुरुषच असला पाहिजे, अशी तरतूद घटनेत आहे. सम्राट अकिहिटो यांचा मुलगा राजपुत्र नरुहिटो याला आयको नावाची मुलगी असल्यामुळे घटनेतील तरतुदीनुसार ती सम्राटपदी विराजमान होऊ शकणार नव्हती. आयकोचा जन्म झाल्यावर घटनेत बदल करून आयकोला - एका स्त्रीला - राजसिंहासनावर बसवण्याची तरतूद करण्याचा विचार पुढे आला होता. यासाठी २००५ मध्ये शासनाने तज्ञांची एक समिती नेमून तिला शिफारस करण्यास सांगितले. तिने अनुकूल मतही दिले. पण दरम्यानच्या काळात आयकोला भाऊ मिळाला म्हणजे हिसाहिटोचा - सम्राटाच्या नातवाचा - जन्म झाला. आणि घटना दुरुस्तीचा विचार मागे पडला तो पडलाच. पण आता सम्राटांनी पदत्याग करण्याचे ठरविलेच तर त्यासाठी अनुमती देणारी घटना दुरुस्ती एवीतेवी करावी लागणार आहेच. यावेळी ओघाओघाने सम्राटपदी स्त्री असावी की नसावी हा मुद्दाही चर्चेला येईल, यात शंका नाही.(आज हिसाहिटो हा नातू पुरुष वारस असल्यामुळे हा प्रश्न तातडीचा राहिलेला नाही हा भाग अलाहिदा)
 सम्राटांची राजकीय चाल आहे काय ? - तिसरे असे की, सम्राटाने राजकीय निर्णय घेण्यावर प्रतिबंध आहेत. हे बंधन आजवर सम्राटांकडून  कसोशीने पाळले गेले होते. पण जपानचे राजकारण आज एका वेगळ्याच वळणावर आले असतांना सम्राटांनी हा मनोदय व्यक्त केला आहे. दुसऱ्याच एका कारणास्तव जपानच्या राज्यघटनेत बदल करण्याचा विचार पंतप्रधान शिंझो अबे यांच्या मनात घोळतो आहे. ते कारण  असे की, ‘हिंसाचाराचा व युद्धाचा विरोध’ (पेसिफिझम) या दुसऱ्या महायुद्धानंतर स्वीकारलेल्या भूमिकेला सोडचिठ्टी देण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधान शिंझो अबे त्यांना वाटते आहे. त्या दृष्टीने घटनेत बदल करण्याचा त्यांचा विचार आहे. त्यांचा घटनेत बदल करण्याचा हा मूलगामी विचार आणि सम्राटांनी राजसंन्यास घेण्याची व्यक्त केलेली इच्छा यात काही परस्परसंबंध आहे का, याचा शोध राजकीय निरीक्षक घेत आहेत.
 न धरी शस्त्र करी मी - दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने जणू शस्त्रसंन्यासच घेतला होता. त्या मोबदल्यातच सम्राटपद कायम ठेवण्यास अमेरिका राजी झाली होती, तसेच तिने जपानच्या संरक्षणाची समूल्य हमीही घेतली आहे. या व्यवस्थेत बदल करण्याचा विचार हा साधासुधा विचार म्हणता यायचा नाही. सम्राटपद टिकवण्यासाठी दिलेले शस्त्रसंन्यासाचे अभिवचन १९४५ पासून आतापर्यंत जपानने प्रामाणिकपणे पाळले आहे. आता जपान नव्याने सैन्य उभारणार असेल व शस्त्रास्त्र निर्मितीला (अण्वस्त्रांसकट) प्रारंभ करणार असेल तर जागतिक सत्तासमतोलावर त्याचे फार मोठे परिणाम होतील. अमेरिका, चीन व रशिया या महाशक्तींची याबाबत  भूमिका काय असेल, या विचाराने राजकीय निरीक्षकांची मती गुंग झाली आहे. सम्राटांचा राजीनामा देण्याचा मनोदय ही पंतप्रधान शिंझो अबे यांच्या शस्त्रसज्ज व्हायच्या भूमिकेच्या विरोधातील राजकीय चाल की खऱ्याखुऱ्या आजारपणामुळे  ढासळलेल्या प्रकृतीमुळे उचलेले पाऊल हे लवकरच स्पष्ट होईल.
जपानच्या राजसिंहासनाचे वैशिष्ट्य- जपानच्या राजसिंहासनाला क्रायसॅनथेमम सिंहासन असे नाव आहे. राजप्रासादातील हे खास सिंहासन आहे. जपानचे सम्राट निरनिराळ्या वेळी निरनिराळी सिंहासने वापरतात. नॅशनल डाएट(जपानची संसद) ला उद्देशून भाषण करतांना सम्राट एका वेगळ्याच सिंहासनावर स्थानापन्न झालेले असतात. जपानचे हे राजसिंहासन खूपच जुन्याकाळपासून अस्तित्त्वात आहे. ख्रिस्तपूर्व ६६० ला निर्माण झालेल्या या ‘गादीवर’ सध्याचे सम्राट अकिहिटो हे १२५ वे सम्राट आहेत.
 १९२० साली हिरोहिटो हे राजपुत्र कार्यवाहक शासक (रिजंट) म्हणून काम पाहू लागले कारण खुद्द सम्राट योशिहिटो (तायशो हे मरणोत्तर नाव) यांचे प्रकृतीस्वास्थ्य इतके वाईट होते की, प्रत्यक्षात ते काहीही काम करू शकत नव्हते. जपानी सम्राटांची त्यांच्या हयातीतील नावे व मरणोत्तर नावे वेगवेगळी असतात. योशिहिटो यांच्या मृत्यूनंतर  १९२६ ते १९८९ पर्यंत हिरोहिटो हे सम्राट होते त्यांचे मरणोत्तर नाव शोवा असे आहे. १९८९ पासून सध्याचे सम्राट अकिहिटो असून त्यांचे मरणोत्तर नाव किंजो असेल. हे सिंहासन टिकावे व सम्राटपद कायम रहावे हे जपानच्या आस्थेचे व निष्ठेचे विषय आहेत. त्यासाठी जपानने शस्त्रसंन्यास पत्करला आज राजसंन्यासाच्या शक्यतेमुळे शतकानुशतके सुरू असलेली परंपरा काय नवीन रूप घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.



आजच्या आश्रम शाळा
वसंत गणेश काणे
आदिवासी विभागाचे वार्षिक बजेट ५ हजार कोटी रुपयांचे अाहे/असते. यापैकी १२ शे कोटी रुपये आश्रमशाळांवर खर्च होत असतात. तरीही आदिवासींसाठीच्या शाळांची,त्यात मिळणाऱ्या शिक्षणाची व मधल्या वेळी मुलांना दिल्या जाणाऱ्या आहाराची स्थती अतिशय वाईट आहे. आदिवासींच्या विशेष गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करण्यात आले आहे. मंत्रालयात हजारावर कर्मचारी आहेत. शाळांमध्ये शिक्षक आहेत, शिक्षकेतर कर्मचारी आहेत. यावर होणारा खर्च सत्कारणी लागतांना दिसत नाही. त्यामुळे सर्वांना दु:ख होते आहे, तसेच संतापही येतो आहे. असे का व्हावे? पैसा सत्कारणी का लागत नाही?  आता मंत्रालय स्थापन होऊन तीन दशकापेक्षा जास्त काळ लोटला आहे, हे लक्षात घेतले म्हणजे किती पैसा वाया गेला व सगळा आदिवासी समाज होता तसाच मागास राहिलेला पाहून संवेदनशील मने अस्वस्थ झाल्यावाचून राहणार नाहीत.
एक कोटी आदिवासी - महाराष्ट्रातील जवळ जवळ निम्या जिल्ह्यांमध्ये आदिवासी मोठ्या प्रमाणात राहतात. सत्तर तालुके तर असे आहेत की त्यात फक्त आदिवासीच राहतात, असे म्हटले तर फारशी अतिशयोक्ती होणार नाही. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी म्हणजे १० कोटींपैकी  जवळजवळ एक कोटी लोक आदिवासी आहेत. आदिवासींचा विकास व्हावा म्हणून सुरवातीला आदिवासी विकास संचालनालय व हे पुरेसे न वाटल्यामुळेआदिवासी विकास आयुक्तालय व तेही कमी पडल्यामुळे स्वतंत्र आदिवासी विभाग स्थापन झाला. आज आयुक्तलये आहेत ती ठाणे,नाशिक, अमरावती व नागपूर येथे आहेत. शिक्षण, आर्थिक विकास, आरोग्य, पोषण व रोजगार यावर भर देण्याचा उद्देश साध्य व्हावा म्हणून ही व्यवस्था होती /आहे. ही सर्व व्यवस्था करूनही प्रगती होतांना दिसत नाही, हा चिंतेचा विषय झाला आहे.
आश्रमशाळा सुरू होऊन पन्नास वर्षे झाली - शिक्षणाचा विचार करायचा झाला तर यासाठी आश्रमशाळा सुरू करण्यात आल्याला आता अनेक वर्षे (नक्की सांगायचे तर पन्नास वर्षे) झाली आहेत.या आश्रमशाळा सरकारी व खाजगी अनुदानित अशा दोन्ही प्रकारच्या आहेत. पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण या शाळातून मिळते. या शाळांची संख्या १ हजारावर असून सरकारी व खाजगी अनुदानित शाळांची संख्या समसमान म्हणजे साडे पाचशे इतकी आहे. याशाळात ५ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बहुतेक शाळांना बऱ्यापैकी इमारती आहेत. पण अन्य सोयीसुविधा समाधानकारक नाहीत.
आदिवासींच्या आदिवासीपणाचे काय करायचे? - आदिवासींचे आदिवासीपण जपले जावे असा एक दृष्टीकोन आहे. पण आदिवासींना विशेषत: तरुणांना आपली जीवनशैली ही इतर नागरी जनांप्रमाणेच असावी/असली पाहिजे असे वाटत असते.आमचे आदिवासीपण जपून आम्हाला प्राणीसंग्रहातील प्राण्याप्रमाणे एक प्रेक्षणीय जीव म्हणून रहायचे नाही, अशी जर त्यांची भूमिका असेल तर त्यांच्यावर त्यांची मूळ आदिवासी जीवनशैली लादण्याचा अधिकार कुणालाही नाही.आपली जीवनशैली कशी व कोणती असावी, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे.
शासन आपली जबाबदारी पार पाडते आहे पण? - एकूण परिस्थिती पाहता आदिवासींच्या विकासाठी सरकार काहीच करीत नाही, असे म्हणता येणार नाही. लोकसंख्येच्या तुलनेत पुरेशी यंत्रणा आणि निधीही सरकारकडून दिला जातो आहे. मात्र, त्रुटी आहेत, त्या अंमलबजावणीच्या पातळीवर, असेच यावरून स्पष्ट होते. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणायचे की त्यांचे आदिवासीपण जपत त्यांचे जगणे सुकर करायचे हा तात्त्विक मुद्दाही येथे उपस्थित केला जातो. त्यांच्यासाठी अन्य योजना आखताना मुख्य भर शिक्षणावरही देण्यात आला.
  हे सर्व विस्ताराने विचारात घ्यायचे कारण असे आहे की, शासन आदिवासींच्या शिक्षणाबाबत बरेचसे जागरूक आहे, असे म्हणता येईल. अर्थात सुधारणेला वाव नक्कीच आहे. पण १२ शे कोटी ही काही अगदीच कमी रक्कम नाही. त्यामानाने होत असलेली प्रगती मात्र खूपच असमाधानकारक आहे, असे मोठ्या खेदाने म्हणावे लागते. तसेच यावरून आणखीही एक बाब अधोरेखित होते ती ही की, केवळ पैशाची तरतूद केला म्हणजे चांगले शिक्षण मिळेलच असे नाही. अंमलबजावणीही तेवढीच महत्त्वाची आहे. शिक्षणाचे घोडे इथेच पेड खाते आहे.
आदिवासींचे आदिवासीपण जपले जावे असा एक दृष्टीकोन आहे. पण आदिवासींना विशेषत: तरुणांना आपली जीवनशैली इतर नागरी जनांप्रमाणेच असावी/असली पाहिजे असे वाटत असते. आमचे आदिवासीपण जपून आम्हाला प्राणीसंग्रहातील प्राण्याप्रमाणे एक प्रेक्षणीय जीव म्हणून रहायचे नाही, अशी जर त्यांची भूमिका असेल तर त्यांच्यावर त्यांची मूळ आदिवासी जीवनशैली लादण्याचा अधिकार कुणालाही नाही.आपली जीवनशैली कशी व कोणती असावी, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे.
आदिवासी भागातील शिक्षणाचा स्तर उंच व्हावा, शिक्षणक्षेत्रात वेळोवेळी होणाऱ्या नवनवीन प्रयोग त्यांनाही कळावेत/समजावेत, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी, ही अपेक्षा आश्रमशाळांनीही पूर्ण करावी, अशी अपेक्षा चुकीची मानता येणार नाही. पण ही अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही. ही वाजवी अपेक्षा आहे. पण ती पूर्ण होतांना दिसत नाही. याउलट आर्थिक गैरव्यवहार करून पैसा मिळविण्याची आश्रमशाळा ही सुलभ व सोपी केंद्रे झाली आहे. केंद्रे झाली आहेत. या शाळात  विद्यार्थ्यांचा छळ होतो, मुलींवर अत्याचार व बलात्काराच्या वार्ता तर नित्यनियमाने कानावर पडत असतात. खाण्यापिण्याचे हाल, दूषित अन्न व पाणी, सत्वहीन भोजन यामुळे वसतीगृहातील मुले आजारी पडत आहेत. आदिवासी मुलांमधील मधील सारक्षरतेचे प्रमाण ५५ टक्याच्या मागेपुढे रेंगाळते आहे. मुलीमध्ये ते ४० टक्केच आहे. आधुनिक जीवनशैलीचा परिचय तर दूरच राहिला असून जंगलातले हालअपेष्टांचे, काबडकष्टाचे जीवन बरे होते, असे म्हणण्याची पाळी आली आहे. तरीही नाइलाजाने पालकांना आपल्या मुलामुलींना या शाळात पाठवावे लागते आहे.
केवळ इमारत बांधली तर तेवढ्यामुळेच चांगले शिक्षण मिळते असे नाही. काही शाळांच्या इमारतीही गुरांचे गोठे शोभाव्यात अशा आहेत, हा प्रश्न अलाहिदा. शिक्षण कसे दिले जाते, हे महत्त्वाचे आहे. ते आधुनिक व युगानुकूल असले पाहिजे. शिक्षणात रोज नवनवीन प्रयोग केले जात आहेत. यांची वार्ता सुद्धा आश्रमशाळात पोचत नसेल तर पुढे काही बोलायलाच नको. प्रत्येक शाळेत प्रयोगशशीलतेला वाव असला पाहिजे. त्यासाठी जशी शिक्षकात प्रयोगशीलता असली पाहिजे तसेच प्रयोगशीलतेला पूरक असे वातावरणही असले पाहिजे. खरेतर या शाळांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असतात. पण त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळत नसेल तर हा सर्व खर्च वाया जातो आहे, असेच म्हणावे लागेल. खर्चाची पुरेशी तजवीज करून शासनाने आपली जबाबदारी पार पाडली आहे. शिक्षकांनाही पूर्ण  वेतन वेळेवर मिळत नाही. अशी कुचकामाची यंत्रणा आमूलाग्र बदलावी लागेल. आज योजना कागदावरच पडून आहेत. त्यांची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी शासकीय आश्रम शाळांच्या व्यवस्थापनाने आळस व जडता झटकून टाकून उभे राहिले पाहिजे.खाजगी आश्रमशाळा तर भ्रष्टाचाराची कुरणेच झाली आहेत. अनुदान स्वरूपात येणारा सर्व पैसा गिळंकृत होत असतो. त्यमुळे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उपासमरीमुळे व कुपोषणामुळे शारीरिक  शोषण होते शिक्षण मिळत नसल्यामुळे बौद्धिक उपासमार होते व गैरप्रकारांमुळे व अनैतिक लैंगिक  व्यवहारांमुळे मानसिक खच्चीकरण होत असते. ही परिस्थिती बदलल्याशिवाय आदिवासी मुख्यप्रवाहात सामील तर होणार नाहीतच पण या क्षेत्रात नक्षलवादाची व अतिरेक्यांना जन्म देणारी विषवल्ली पल्लवीत होत राहील

गाथा ही आईनस्टीनच्या अर्धांगिनीची
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
जगविख्यात पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ अलबर्ट आईनस्टीनची प्रथम पत्नी मिलेव्हा हिचा जन्म आजच्या सर्बियामधील पण १८७५ सालच्या आॅस्ट्रिया - हंगेरीमधील तितेल गावी १९ डिसेंबर ला झाला. म्हणजे १९ डिसेंबर २०१६ ला तिचा १४१ वा वाढदिवस होता.  नोबेल पारितोषिक विजेता म्हणून तसेच जगातील विसाव्या शतकातला सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक म्हणूनही अलबर्ट आईनस्टीनचा जगभर गौरव केला जातो. पण त्यामानाने त्याच्या अर्धांगिनीचा मिलेव्हाचा उल्लेख क्वचितच होतो. वस्तुस्थिती ही आहे की, मिलेव्हाचे अलबर्ट आईनस्टीनच्या संशोधनात बरोबरीचे योगदान होते. ही बाब आता २०१६ साली जगासमोर येते आहे. पण तिच्या वाट्याला ही उपेक्षा का?
 बायकांना अक्कल नसते?-  ‘बायकांना अक्कल नसते’, या समजुतीच्या काळात जन्म झाला हाच कायतो पूर्वाश्रमीच्या मिलेव्हाचा मेरिकचा म्हणजेच उत्तराश्रमीच्या मिलेव्हा अलबर्टचा अपराध होता. झुरिच पाॅलिटेक्निक स्कूलमध्ये शिकत असतांना तिचा अलबर्ट आईन्स्टीनशी परिचय झाला, परिचयाचे रुपांतर प्रेमात व्हायला वेळ लागला नाही. परिणाम व्हायचा तोच झाला आणि मिलेव्हाच्या वाट्याला गरोदरपण आले. त्यामुळे त्यांनी तातडीने लग्न करून संसार थाटला. या काळात अलबर्ट आईन्स्टीन झुरिच पेटंट आॅफिसमध्ये कामाला होता. याच काळात अलबर्ट आईन्स्टीनचे पुढे जगविख्यात झालेले संशोधन आकाराला येत होते. या दाम्पत्याला याच काळात आणखी दोन अपत्ये झाली. पुढे १९१६ साली घटस्फोट घेऊन ही दोघे विभक्त झाली. १९२१ साली अलबर्ट आईनस्टीनला फोटो इलेक्ट्रिक इफेक्टविषयक संशोधनासाठी नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले.  नोबेल पारितोषिकाच्या निमित्ताने अलबर्ट आईन्स्टीनला मिळालेला पैसा मिलेव्हाकडे गेला. मिलेव्हाने अलबर्ट आईन्स्टीनने आईनस्टीनच्या प्रथम पत्नीने १९४८ साली जगाचा निरोप घेतला.
 या तशा साध्यासुध्या कहाणी मागची कहाणी मात्र अशी बाळबोध नाही. मग कशी आहे ती कहाणी?
मेधावी मिल्व्हा - सर्बियन वंशाच्या धनसंपन्न कुटुंबात मिलेव्हाचा जन्म झाला होता. एक अतिशय मेधावी विद्यार्थिनी असल्यामुळे फक्त मुलांसाठीच असलेल्या शाळेत - झुरिच पाॅलिटेक्नक स्कूलमध्ये-  तिला प्रवेश मिळू शकला. पुढे हीच ‘शाळा’ स्विस फेडरल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नाॅलाॅजी म्हणून नावारूपाला आलेली आहे. गणित आणि पदार्शविज्ञान यात तिची प्रगती उत्तम असे. अलबर्ट आईन्स्टीन बरोबर तिचे विशेष सख्य असण्याचे एक वेगळेही कारण होते ते असे की, हे दोघेही विज्ञानाच्या प्रेमात पडले होते. त्यामुळे तिच्या मित्रांमध्ये अलबर्ट आईन्स्टीनला विशेष स्थान होते.
विजोड जोडी? - या दरम्यानच्या काही काळात मिलेव्हा जर्मनीतही शिकायला गेली होती. पण या दोन प्रेमी जीवांमध्ये अंकुरलेले प्रेम पत्रव्यवहाराच्या माध्यमाने फुलतच राहिले. आपल्या लाडक्या डाॅलीला (मिलेव्हाला) अलबर्ट आईन्स्टीनने साद घातली आणि ती दोघे एकत्र आली. हे प्रेमसंबंध मिलेव्हाच्या आईवडलांना मंजूर होते पण अलबर्ट आईन्स्टीनचाया आईवडलांना हा संबंध मंजूर नव्हता. कारणेही तशी त्यावेळचे संदर्भ पाहता लहानसहान नव्हती. मिलेव्हाचे वयाने मोठे असणे, तिचा धर्म वेगळा असणे आणि दोन कुटुंबांचा सांस्कृतिक वारसाही वेगळा असणे हे मुद्दे तसे नजरेआड करण्यासारखे नव्हते.
विवाहापूर्वीचा अपत्यसंभव - प्रेम व अभ्यास यात सख्य नसते, असे म्हणतात. १९०० साली ही मेधावी मुलगी चक्क नापास झाली. अलबर्ट मात्र पुढेपुढे शिकतच राहिला. पास होण्याचा  मिलेव्हाचा दुसरा प्रयत्न सुद्धा फसला. ती पुन्हा नापास झाली. पण अाईन्स्टीनचे मूल मात्र तिच्या उदरात याच काळात वाढू लागल्याचे लक्षात आले. १९०२ मध्ये लग्नाआधीच आईवडलांकडे असतानाच मिलेव्हाच्या पोटी लिसेर्लचा जन्म झाला. या मुलीचे काय झाले ते नक्की सांगता येत नाही. तिला दत्तक देण्यात आले असे म्हणतात. तिला नंतर ‘स्कार्लेट फिव्हर’ हा रोग झाला होता, असेही म्हणतात.
गौरव तुझा पण पैसे माझे - १९०३ साली अलबर्ट व मिलेव्हाचा विवाह झाला. लगेचच त्यांच्या पोटी हंस जन्माला आला. अलबर्ट आईन्स्टीनच्या संशोधनात  मिलेव्हाचा हातभार किती होता, याबाबतची माहिती नुकतीच बाहेर आली आहे. त्यावरून या संशोधनात तिचा बरोबरीचा वाटा होता, हे जाणवते. त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध होत, तेव्हा ‘आमचे’ असा उल्लेख असे. ‘माझे’ असा उल्लेख अलबर्ट आईन्स्टीनने केलेला आढळत नाही. पण मग ती अनुत्तीर्ण का होत होती. त्याचे कारण ‘बायकांना अक्कल नसते’. या पुरुषप्रधान मनोवृत्तीत सापडते. याचा वारंवार अनुभव आल्यानंतर मिलेव्हानेच सुचविले की, ‘यापुढे तू माझ्या नावाचा उल्लेख न करता फक्त आपल्याच नावाचा उल्लेख करीत जा. पण यदाकदाचित या संशोधनाचे निमित्ताने नोबेल पारितोषिक मिळाले, तर गौरव तुझा पण त्या निमित्ताने मिळणारे पैसे मात्र माझे, बरं का!’ सापेक्षतावादासंबंधातले अलबर्ट आईन्स्टीनचे सुप्रसिद्ध समीकरण ई = एमसी २, हे याच काळात त्याला स्फुरले, असे म्हणतात.
तपासणे व दुरुस्त करणे - पीटर मायकलमोर हा अलबर्ट आईन्स्टीनचा एक चरित्र लेखक आहे. तो म्हणतो की,सापेक्षतावादावरचे आपले लिखाण पूर्ण केल्यानंतर अलबर्ट आईन्स्टीन सतत दोन आठवडे नुसता लोळत पडला होता. या काळात मिलेव्हानेच लिखाण वारंवार तपासून दुरुस्त केले व नंतरच ते पुढे पाठविले. आता दोघांनाही खूप शीण आला होता. ते विश्रांतीसाठी सर्बियाला गेले. तिथे दोघांच्या संयुक्त प्रयत्नांचे अनेक दाखले उपलब्ध आहेत.
संशोधन दोघांचे की एकट्याचे? - मिलेव्हा मेरिक आणि अलबर्ट आईनस्टीन ही दोघे खूप अगोदरपासून म्हणजे १९१४ पासून जोडीने ( कोलॅबोरेट) अभ्यास करीत हे दाखवणारे अनेक दस्तऐवज आज उपलब्ध झाले आहेत. ‘सापेक्ष गतीबाबतचा( रिलेटिव्ह मोशन) आमचा अभ्यास’ असा लिखाणाचा प्रारंभ असलेले लेखी उल्लेख डझनावारी आढळतात. या संयुक्त प्रयत्नांची आधाराशीला परस्पर प्रेम व आदरावर उभी होती. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट व सापेक्षतावादाच्या आगळ्यावेगळ्या अमरवेली फुलण्या बहरण्याचे श्रेय या परस्परसंबंधाला जाते.
वी आर वन एंटिटी - अलबर्ट आईनस्टीनची अलौकिक प्रतिभा सर्वप्रथम कुणाला जाणवली असेल तर ती मिलेव्हाला. तिच्याशिवाय आईनस्टीन यशस्वी होऊच शकला नसता. स्वत:च्या सर्व इच्छा, आशा आकांक्षा बाजूला सारून तिने अलबर्टला साथ दिली. त्याच्या यशात, भावभावनात एकतानतेने सहभागी झाली. त्यांचे संयुक्त लिखाण त्याच्या एकट्याच्याच नावाने प्रगट करण्याचे एकदा ठरल्यावर त्या दोघांच्या वेगवेगळ्या देहात जणू एकच मन वावरू लागले होते. (तिच्या जर्मन भाषेतील वाक्याचा इंग्रजी अनुवाद आहे,”वी आर वन एंटिटी”) अलबर्टच्या यशातच आपले सुख सामावलेले आहे, हे मानून/समजून/पटून ती वावरत होती. तिने असे का केले असावे? तशी तिची ओळख एकलकोंडी (रिझर्व्ह्ड) व स्वत:ची ओळख पुसून टाकणारी (सेल्फ-इफेस्ड) अशी आहे. पारितोषिक वा प्रसिद्धी यांच्या वाट्यालाही ती कधीच गेली नाही. तसेही जेव्हा जोडीने व संयुक्त प्रयत्न असतो, तेव्हा माझे कोणते व तुझे कोणते हे का कधी वेगळे करता येते?
कुणाच्या वाट्याला मोती तर कुणाच्या वाट्याला फक्त शिंपले- त्यांच्या संयुक्त अभ्यासाचा पहिला दाखला उपलब्ध आहे १९०८ सालचा. आईनस्टीनला प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या पहिल्यावहिल्या भाषणातील आठ पाने आहेत मिलेव्हाच्या अक्षरातली. तुझ्या नावाचा उल्लेख का नाही असे विचारल्यावर ती म्हणाली होती, ‘अलबर्ट आज जगविख्यात पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्या यशाचा मला आनंद आहे. मात्र यशामुळे त्याच्यातल्या मानवतेला झाकोळी येऊ नये एवढीच माझी इच्छा आहे…..’. पुढे तिने म्हटले आहे, ‘आता त्याच्यापाशी बायको सोबत घालवायला वेळच नसतो मुळी. म्हणतात ना, एकाच्या हातात येतात मोती, तर दुसऱ्याच्या वाट्याला येतात शिंपलीच तेवढी’
या दाम्पत्याचा दुसरा मुलगा जन्माला आला २८ जुलै १९१० रोजी. या काळातील अलबर्टने तिला पोस्टकार्डावर लिहिलेली प्रेमाने ओथंबिलेली प्रेमपत्रे उपलब्ध आहेत.
मिठाचा खडा - पण १९१२ साली अलबर्ड एल्सा लोवेंथल नावाच्या  दूरच्या बहिणीच्या प्रेमात पडला. हे प्रेमप्रकरण गुपित स्वरुपात परस्पर पत्रव्यवहारापुरते दोन वर्षे सुरू होते. ही पत्रेही उपलब्ध आहेत. या काळात अलबर्ट यशाच्या एकामागून एक पायऱ्या सर करत चढतच होता.१९१४ साली हे लफडे उघडकीला आले आणि मिलेव्हा मुलांना बरोबर घेऊन वेगळी झाली, तिने घटसफोटाला संमती दिली पण एक अट टाकली की, जर कधी अलबर्ट आईनस्टीनला नोबेल पारितोषिक मिळाले तर पारितोषिकावर त्याचा हक्क राहील पण त्यासोबत मिळणाऱ्या रकमेवर तिचा अधिकार असेल. तिचे नंतरचे आयुष्य हालअपेष्टेत व दारिद्यात  गेले. त्यातच मुलाला - एड्युअर्डला- स्किझोफ्रेनिया झाला. या निमित्ताचा व अन्य खर्च भागविण्यासाठी तिने शिकवण्या करून कसेबसे दिवस काढले. अलबर्ट आईनस्टीनकडून पोटगी पोटी रकम यायची. पण अपुरी व तीही अनियमितपणाने.
शब्द फिरवला - १९२५ साली अलबर्ट आईनस्टीनने मृत्युपत्रात लिहिले की नोबेल पारितोषिकाचे पैसे मुलाला मिळावेत. मग मात्र मिलेव्हा खवळून उठली. या पैशावर माझा हक्क आहे आणि संशोधनात माझाही वाटा आहे. तो सिद्ध करण्यासाठी माझ्याजवळचे पुरावे मी उघड करीन, अशी तिने धमकी दिली.  यावर अलबर्ट आईन्स्टाईनने तिला लिहिले की, तुझ्या धमकीचे मला हसू येते. कोण विश्वास ठेवील तुझ्यावर? तू गप्प राहण्यातच शहाणपणा आहे. आणि ….आणि मिलेव्हाने गप्प राहण्याचे ठरविले.
मैत्रिणीचा कैवार- पण तिची मैत्रीण मिलाना हिने १९२९ साली एका पत्रकाराला आवाहन केले की या बाबतीतले सत्य समोर यावे, यासाठी त्यांने मिलेव्हाची मुलाखत घ्यावी. मिलेव्हाची भूमिका याबाबत अशी होती की, असे वागणे तिच्या स्वभावात बसत नाही. पण तिने आपल्या मैत्रिणीला मिलानाला अडविले किंवा थोपवले नाही व तिची बाजूसही समोर आली.
संयुक्त संशोधनाचे साक्षीदार - मिलेव्हाचा भाऊ मिलोसने एके ठिकाणी लिहिले आहे की, मिलेव्हा व अलबर्ट राॅकेलच्या दिव्याच्या प्रकाशात रात्ररात्र जागत बसून विज्ञानातील समस्यांवर चर्चा करीत, हिशोब करीत, निष्कर्ष लिहून काढीत, ते वाचीत व त्यावर चर्चा करीत, त्यात सुधारणा करीत. अलबर्ट आईनस्टीनचा मुलगा - हंस अलबर्ट - याचेही मत असेच आहे. आपल्या आईवडलांना एकत्र बसून अभ्यास करताना पाहिल्याचे त्याला आठवते. ही सर्व हकीकत मिलेव्हाच्या १४१ व्या वाढदिवशी १९ डिसेंबर २०१६ ला जगजाहीर झाली
लहानपण दे गा देवा - मी म्हशीची धार काढायला शिकतो.
वसंत गणेश काणे
लहानपणच्या आठवणी सलग स्वरुपात आठवत नाहीत. आज सकाळी सकाळी का कुणास ठावूक एकाएकी घरच्या गाईम्हशींची आठवण झाली. त्यावेळी आमच्या घरी दोन गाई व एक म्हैस होती.
म्हैस विकत घ्यायला मी वडलांसबत बाजारात गेलो होतो. तीन चार म्हशी आम्ही पाहिल्या. एक म्हैस मला आवडली(?) होती. पण वडलांचे मत काही वेगळेच होते. मी हट्ट करून पाहिला. पण वडील मला रागवले, ‘तुला यातलं काही कळतं का? यापुढे मी तुला बरोबर आणणारच नाही’, असं म्हणून त्यांनी मला गप्प केले.
म्हैस विकणारा म्हशीची किंमत १४० रु सांगत होता, ही १९४४च्या सुमारासची गोष्ट आहे. घासाघीस होऊन ११० रुपयाला ती म्हैस आम्ही घरी घेऊन आलो. ती अगोदरच व्यायलेली होती. त्यामुळे रेडकू (म्हशीचे पिल्लू) सोबत घेऊन आलो होतो. धार काढायला गुराखी होता. ती त्याला धार काढू देईना. प्रत्येक म्हशीच्या काही खोड्या (सवयी) असतात.
काहींचे मागचे पाय बांधून मगच त्यांची धार काढतात. म्हणून तिचे पाय बांधण्याचा प्रयत्न केला. पण ती पाय बांधू देईना. बहुदा ही सवय तिला नसावी. पण खटपट/झटापट करून तिचे पाय बांधले. तिला ते मुळीच आवडले नसावे. ती थयथय नाचू लागली. पायांनाकाच बसत होता. पायातून रक्त येऊ लागले.
काही म्हशींची धार काढतांना धार काढतांना शीळ ऐकायची सवय असते, असे कुणीसे म्हणाले. वसंता कुठे आहे?, वडलांनी चौकशी केली. मी हजर झालो. नेहमी शीळ घालीत उनाडक्या करीत असतोस. बघू बरं कशी शीळ घालतोस ते? मी शीळ घालू लागलो, पण म्हशीवर परिणाम होत नव्हता. जरा मोठ्यानं शीळ घाल की. नाहीतर एरवी आम्हाला ऐकून ऐकून बेजार व्हावे लागते. पण माझी शीळ काही म्हशीच्या पसंतीस उतरली नसावी. चल, हो बाजूला, वडील खेकसले. आपली शीळ म्हशीला सुद्धा आवडत नाही, हे कळून मी खट्टू झालो. त्यानंतर उभ्या आयुष्यात मी कुणालाही शीळ म्हणून घातल्याचे आठवत नाही.
काही म्हशींची धार काढतांना शेतकऱ्याची बायको समोर उभी राहते. धार काढणारा सगळी धार काढतो की नाही, हे पहायला ती उभी असते. या म्हशीला ही सवय तर नाही ना ? लगेच आई पदर खोचून म्हशीसमोर उभी राहिली. म्हैस खाली मान घालून घमेल्यातले वैरण खात होती. तिने मान वर करून पाहिले सुद्धा नाही. वैरणात पाणी घातलेले काहींना आवडत नाही, काहींना सरकीच हवी असते, ती सुद्धा अगोदर भिजत घातलेली. एक ना दोन. सगळे प्रयोग झाले म्हैस काही दूध काढू देईना. तिची कास भरलेली असायची. सड फुगून तट्ट झाले होते. शेवटी ती म्हैस आम्ही तीस रुपयांना विकून टाकली. ज्याने ती विकत घेतली होती, त्याच्याकडे ती व्यवस्थित धार काढू देत होती. पण तो मात्र आपण फसलो, तीस रुपये वाया गेले, म्हणून आमच्या समोर हळहळत असायचा.
तरी मी म्हटले होते की, ती दुसरी म्हैस विकत घ्या म्हणून? पण आमचं कोण ऐकतो? मागे वडील उभे होते, हे माहित नसल्याने मी बोलून गेलो. पुढचा प्रसंग ऐकण्यात वाचकांना रुचि नसावी, म्हणून सांगत नाही.
मग आमचे ठरले की, पहिल्या वितीचीच म्हैस विकत घ्यायची. म्हणजे तिला खोडी नसतील. आपण लावू त्या सवयी धार काढतांना तिला लागतील.
मला गाईची धार काढता येत असे. म्हशीची धार काढायची म्हणजे अंगठा आणि पहिल्या बोटात चांगलाच जोर असावा लागतो. धार काढणाऱ्यांच्या बोटांना सुद्धा घट्टे पडतात. गाईची धार काढतांना अंगठा मिटण्याची गरज नसते. मी म्हशीची धार काढू का, असे विचारताच, आरशात तोंड पहा एकदा? भावाबहिणींनी खिजवले. शेवटी मी धार काढणाऱ्याशीच गट्टी जमविली. पण त्याने स्वतंत्र भांडे आणायला सांगितले. ते कसे आणणार? माझे बिंग फुटले असते. शेवटी मी एक युक्ती केली. टिप्याला(आमच्या घरच्या कुत्र्याला) आम्ही एका भांड्यात दूध देत असू. ते भांडे मी घेऊन आलो. पण त्या दुधाचं करायचं काय? मग ते टिप्यालाच प्यायला घालू लागलो. तो शेपटी हलवीत ते दूध प्यायचा. पण एक दिवस आईने हे पाहिले. ती रागावली. एवढे दूध तू कुत्र्याला पाजतोस? काय म्हणू तुला? त्या धार काढणाऱ्याला बरेच झाले आहे. तो मुद्दामच दिवसेदिवस अधिकाधिक दूध काढायचे बाकी ठेवत असणार.  ते काही नाही. उद्या पासून घरातले चांगले भांडे घेत जा. किती दूध काढतोस ते मला दाखवीत जा. नंतर नंतर कंटाळा करशील. दूध पुरते काढले नाही तर दुसऱ्या दिवशी म्हैस तेवढे दूध कमी देते म्हणतात. आईने धार काढणाऱ्याचीही चांगलीच सटक काढली. पण एक मात्र झाले. मी म्हशीची धार काढायला शिकलो.