Saturday, January 14, 2017

अशीही कथा एका अपहरणाची!
वसंत गणेश काणे
१९९८ सालची गोष्ट. फ्लोरिडामधील सुतिकागृहातून एका नवजात मुलीचे जन्मानंतर अवघ्या आठ तासानंतर अपहरण झाले होते. ही घटना एवढी धक्कादायक होती की, जॅक्सनव्हिले नावाच्या ‘त्या’ गावातून  जाणारे प्रत्येक वाहन थांबवून एकजात प्रत्येकाची तपासणी पोलिसांनी केली.
एका १६ वर्षाच्या मुलीने ( शानारा माॅब्लीने) कामिया माॅब्लेला जन्म दिला होता. जन्म होऊन फक्त आठच तास झाले होते. त्यामुळे फोटो काढलेला नव्हता. नाळेचे टोक गळाले नव्हते. बेंबी वर आलेली (अंबिलिकल काॅर्ड हार्निया ) होती. पार्श्व भागावर डाग( मंगोलियन स्पाॅट्स) होते. ते साधारणपणे सहा ते आठ आठवड्यांनी जातात. व्हिडिओवर अपहरण दिसत होते पण तो व्हिडिओ अहरणकर्तीची ओळख पटावी एवढा स्पष्ट दिसत नव्हता  शोध तरी घेणार कसा? कामियाचे छायाचित्र तरी कसे जारी करणार? शेवटी कलाकाराला सांगण्यात आले, ‘बाबारे,तूच आपल्या कल्पनेने नवजात अर्भकाचे चित्र काढ’. हे चित्र जॅक्सनव्हिले गावात ठिकठिकाणी लावण्यात आले. पुढेही दर वर्षी ते लावण्यात येत होते. माहिती देणाऱ्याला २ लक्ष ५० हजार डाॅलरचे बक्षीस जाहीर करण्यात आले? अडीच हजार लोकांनी सुगावा लागल्याचे पोलिसांना सांगितले. पण….पण ……
‘अमेरिकाज मोस्ट वाॅंटेड’, नावाचा प्रकटनाचा एक प्रकार असतो. त्यानुसारही तीनदा प्रसिद्धी देण्यात आली. परदेशातील शोधकर्ते सुद्धा मदतीला धावले. पण व्यर्थ!
१३ जानेवारी २०१७ ला १८ वर्षानंतर शोध मोहीम फलद्रुप झाली. कामियाचा पत्ता लागला, असे जॅक्सनव्हिलेचे शेरीफ माईक विल्यम्स पत्रकारांना सांगत होते.  डीएनए चाचणीनुसार निश्चित झाले की,१८ वर्षांची वाॅल्टर बोरो गावात ही मुलगी - कामिया माॅब्ली - रहात होती. ५१ वर्षाच्या अपहरणकर्त्या महिलेला - ग्लोरिया  विल्यम्सला अटक करण्यात आली आहे.
कामिया माॅब्लीची समजूत अशी होती की, ती आपल्या खऱ्या आईबापांसोबतच राहते आहे. हे सत्य पचवण्यासाठी तिला वेळ लागतो आहे. ही प्रक्रिया खूप वेळ खाणारी असणार, इतर कुणाला त्याची कल्पना करणेही कठीण आहे.
शानारा माॅब्ली आपल्या पहिल्यावहिल्या मुलीचा- कामिया माॅब्लीचा- प्रत्येक वाढदिवस न चुकता साजरा करीत आलेली आहे. ती आजवर प्रत्येक वाढदिवसाला केकचा एक छोटासा तुकडा ॲल्युमिनियम फाॅईलमध्ये गुंडाळून फ्रिझरमध्ये जपून ठेवीत असे. पण कामिया माॅब्लीला अशा कोणत्याही केकची चव आजवर घेता आलेली नाही. ही बातमी फ्लोरिडा टाईम्सने प्रथमत: १० जुलै २००८ ला तिच्या अपहरणाच्या दहाव्या वाढदिवसाला छापली होती. शनारा विचायची, ‘ कशी असेल हो माझी मुलगी? तिला काय आवडत असेल? तिचे केस लांबसडक असतील का? तिच्या भिवया माझ्या सारख्याच असतील का?
१६ वर्षाच्या शनारा माॅब्लीने आपल्या नवजात अर्भकाला  नर्स समजून एका कामवालीच्याच स्वाधीन केले होते. ती म्हणाली होती की, बेबीला ताप आलेला दिसतो आहे. तो मोजावा लागेल. वीस मिनिटात बेबीला घेऊन परत परत येते. ही तोतयी (अपहरणकर्ती ?) १४ तास त्याच हाॅस्पिटलमध्ये या मुलीचा शोध घेण्याच्या मिशाने प्रत्येकापाशी चौकशी करीत हिंडत होती. हाॅस्पिटलच्या नर्सेसने वाटले की ही बाई शनाराच्या नात्यातली किंवा ओळखीचीच कुणीतरी आहे. त्या दोघींना बोलतांना त्यांनी पाहिले होते.
नवजात बालिकेला तोतया नर्सने नेल्यानंतर काही मिनिटांनीच तिच्या आजीने काहीतरी काळेबेरे आहे, असा संशय येऊन पोलिसात वर्दी दिली होती. हाॅस्पिटलमधील येण्याजाण्याचे सर्व मार्ग तात्काळ बंद करण्यात आले. पेशंटच्या भेटीला आलेल्या प्रत्येकाला थोपवण्यात आले. बसेस, रेल्वेगाड्या एवढेच नव्हे तर विमानेही रोखून धरण्यात आली. कसून शोध घेण्यात आला, पण उपयोग झाला नाही. या वार्तेकडे फ्लोरिडा प्रांताचेच नव्हे, तर अख्ख्या अमेरिकेचे लक्ष वेधले गेले.
शोधपथकांनी  सुगावा लागलेल्या दूरदूर स्थानी जाऊन शोध मोहीम राबविली. संशयावरून १५ बालकांचे पायाचे ठसे व दोन बालकांचे डीएनए नमुने ताडून पाहिले. एकही नमुना जुळला नाही.
‘अमेरिकेत नॅशनल सेंटर फाॅर मिसिंग ॲंड एक्सप्लाॅयटेड चिल्ड्रेन’, या नावाची संस्था आहे. हे प्रकरण ज्या अधिकाऱ्याकडे सोपविले होते त्याने जाहीर केले की आम्ही शोधमोहीम थांबवणार नाही.
बालिकेच्या पालकांनी हास्पिटलला कोर्टात खेचले. दीड लक्ष डाॅलर नुकसानभरपाई व नवजात बालकांच्या सुरक्षेची व्यवस्था संपूर्ण फ्लोरिडा प्रांतात आणखी चोख व कडक करण्यात येईल, या आश्वासनानंतर केस मागे घेण्यात आली.
होताहोता २०१६ साल उजाडले.साऊथ करोलिना प्रांतातून खबर आली की, कामियाचीच जन्मतारीख सांगणारी एक मुलगी त्यांना आढळली आहे. पण तिचे नाव कामिया नाही, काही वेगळेच आहे. कागदपत्रेही बनावट आहेत, हे आणखी तपास केल्यानंतर लक्षात आले.
आपल्या संबंधात काहीतरी गडबड झालेली आहे, असा संशय कामियाला काही महिने अगोदर पासूनच येत होता.
नुकतेच तिला आपण कोण आहोत, ते कळले आणि आपण जिला आई  मानत होतो, तिच्यावर काय आरोप आहे, हेही तिला समजले.
पोलिसांनी गुप्तता राखण्यासाठी तिचे सध्याचे नाव उघड केलेले नाही. त्यांनी कामियाच्या खऱ्या आईबडलांची भेट घेऊन त्यांना सगळी वस्तुस्थिती सांगितली आहे.
 कामियाचा पिता क्रेग आयकेन आपल्या मुलीच्या जन्माचे वेळी तुरुंगात होता. त्याला १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला (शनारा माॅब्लीला) गरोदर ठेवल्याबद्दल आठ महिने कैदेची शिक्षा झाली होती. त्याचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त होते म्हणजे तो वयात आलेला किंवा प्रौढ होता. अमेरिकन कायद्यानुसार ज्याचे वय १८ पेक्षा जास्त तो प्रौढ व जो त्यापेक्षा लहान तो क्षमापित करण्यास पात्र मानला जातो. या कायद्यानुसार त्याला शिक्षा झाली व शनाराची गय करण्यात आली. १९९९ साली तुरुंगात असतांना तो म्हणाला होता, ‘ ती (त्याची मुलगी) कशी दिसत असेल हो?’.
आपल्या मुलीला मुकलेली शनारा मुले सांभाळून ( बेबी सिटिंग) करीत दिवस काढीत होती. शोधपथकाशी वेळोवेळी चर्चा करीत होती, संवाद साधत होती,  कधीतरी आपली कामिया आपल्याला भेटेल या आशेवर. तिची आशा फलद्रुप व्हायला जवळजवळ दोन दशकं लागली.
फेस टाईमवर पोलिसांनी कामियाची आपल्या खऱ्या आईवडलांशी व आजीशी गाठभेट घालून दिली. तिच्या खऱ्या आईवडलांचा आनंद गगनातही मावला नसणार!
कामियाची आजी (वडलांची आई) वेलमा आयकेन वय वर्ष ६६ म्हणाली, ‘  कामिया अगदी वडलांच्या वळणावर गेली आहे हो. कामिया, आमच्याशी नवख्यासारखी बोलली नाही. अनेक वर्षांपासूनचे तिचे व आमचे बोलणे चालणे आहे, असे वाटत होते. मी रोज देवाजवळ प्रार्थना करीत असे की, ‘देवा, नातीची भेट व्हायच्या आधी मला नेऊ नकोस रे बाबा’. ती कुठेतरी जवळच असणार पण आपण तिला भेटू शकत नाही, तिच्याशी दोन कौतुकाचे शब्द बोलू शकत नाही, या कल्पनेने आम्हाला सतत अस्वस्थ वाटायचे.
शेजाऱ्यांचे म्हणणे असे होते की, कामियाच्या खोट्या आईने- ग्लोरिया विल्यम्सने- तिचे लालनपालन, कोडकौतुक खऱ्या आईने करावे तसेच केले.  तिच्या हौशी पुरवल्या. आम्हाला कुणालाही ही पळवून आणलेली मुलगी आहे, असा किंचितसा संशयसुद्धा कधीही आला नाही. आमच्या लेखी ती स्वत: एक बुद्धिमान, कामसू, पापभीरू, सामाजिक कार्यात अहमहमिकेने सहभागी होणारी शेजारीण होती. तिला नावं ठेवायला जागाच नव्हती. पण ते काहीही असले तरीही तिने  एका मुलीला  पळवून आणले होते हे सत्य काही लपणार नाही.
जिला कामिया आपली आई समजत होती, त्या ग्लोरिया विल्यम्सवर अपहरणाचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी अटक केली आहे. त्या दोघी कोर्टात समोरासमोर येताच कामिया म्हणाली, मी तुझ्यासाठी देवाजवळ करुणा भाकते.  साऊथ कॅरोलिनामधील वालरबोरो येथील ज्या छोट्याशा पण टुमदार घरी इतकी वर्षे कामिया वाढली, खेळली, बागडली ते घर ‘त्या’ हाॅस्पिटलपासून केवळ २०० मैलावर आहे.
‘अमेरिकेतील नॅशनल सेंटर फाॅर मिसिंग ॲंड एक्सप्लाॅयटेड चिल्ड्रेन’ ने १९८३ पासून आजवर अपहरण झालेल्या तीनशे आठ मुलांचा शोध लावला आहे. अातापर्यंत १२ प्रकरणे ऐरणीवर होती. आता त्यांची संख्या ११ झाली आहे. त्यांच्याही आशा आता नव्याने पल्लवीत होत आहेत.
जेव्हा एखाद्या केसची फाईल आता बंद करायला हवी असे वाटू लागते, तेव्हा सुद्धा आम्ही नव्या माहितीच्या शोधात असतो. दर दिवशी तंत्रज्ञानाचे पाऊल पुढे पडत असते. एखादा धागा अवचित हाती लागतोच. कितीही वेळ लागो, शोध घ्यायचे थांबवायचे नाही, हे आमचे ब्रीदवाक्य आहे. पण तरीही हे सांगितलेच पाहिजे की, ‘असे’ प्रकरण आजवर आमच्या वाट्याला आले नव्हते, असे म्हणत पोलिसप्रमुख माईक विलियम्स यांनी पत्रपरिषद आवरती घेतली.



No comments:

Post a Comment