Friday, January 13, 2017

‘स्पेलबाऊंड’
   वसंत गणेश काणे

आल्फ्रेड हिचकाॅक हा आम्हा काॅलेजकुमारांचा आवडता दिग्दर्शक होता. त्याचे गुप्तहेर कथेवर, रहस्यकथांवर आधारित चित्रपट आम्ही न चुकता पहात असू. असाच एक चित्रपट नुकताच पुन्हा पाहण्यात आला. त्याचे शीर्षक होते ‘स्पेलबाऊंड’. स्पेलबाऊंड म्हणजे मंत्रमुग्ध किंवा झपाटलेला. चित्रपटाच्या सुरवातीला एक सुभाषित येते. विल्यम शेक्यपिअरचे ते वचन आहे. ‘दी फाॅल्ट ...इज नाॅट इन अवर स्टार्स, बट इन अवरसेल्व्ह्ज’, म्हणजे दोष ग्रह ताऱ्यांचा नसतो, तर आपल्यातच असतो.
चित्रपटनिर्मितामागचा हेतू - चित्रपटाचा हेतू मानसिक विकृती दूर करण्यास उपयोगी असलेले मनोविश्लेषणाच महत्त्व उकलून दाखविण्याचा व तर्काधिष्टित महत्त्व पुनर्स्थापित करणे हा आहे, अशी करून हिचकाॅकने आपले वेगळेपण चित्रपटाच्या प्रारंभीच श्रोत्यांच्या मनावर बिबवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
चित्रपटातील काही भूमिका- काॅन्स्टन्स पिटर्सन (इनग्रिड बर्मन); डाॅ. मुर्चिसन (लिओ कॅराॅल); डाॅ ॲंथनी एडवर्ड/जाॅन ब्राऊन/जाॅन बॅलेनटाईन (ग्रेगरी पेक); डाॅ ब्रुलोव्ह ( मायकेल चेकाॅव्ह): डाॅ ब्रुलोव्ह (मायकेल चेकाॅव्ह).
चित्रपटाची कथावस्तू - चित्रपटाची कथावस्तू काहीशी अशी आहे. काॅन्स्टन्स  पिटर्सन या नावाच्या महिला मनोविश्लेषण तज्ञाची भूमिका विख्यात नटी इनग्रिड बर्मनने वठविली असून ती व्हरमाॅंट प्रांतातील ग्रीन मॅनाॅर्स येथील मनोविकृती रुग्णालयात (मेंटल हाॅस्पिटल) मध्ये नोकरी करीत असते. तिच्या (काॅन्स्टन्स पिटर्सन) पुरुष सहकाऱ्यांच्या हिशोबी ती एक अलिप्त (डिटॅच्ड) व भावनाशून्य (इमोशनलेस) व्यक्तीच कायती असते. हाॅस्पिटलच्या डायरेक्टरची - डाॅ. मुर्चिसनची - भूमिका लिओ कॅराॅलने साकारली असून  तो मानसिक थकव्यानंतर पुन्हा सेवेत रुजू झालेला असल्यामुळे त्याला सक्तीची सेवानिवृती घेण्यास सांगितलेले असते. त्याची जागा घेण्यासाठी डाॅ ॲंथनी एडवर्ड (नट -ग्रेगरी पेक)  हे नाव धारण करून आलेली व्यक्ती खूपच तरूण दिसत असते. त्यामुळे त्याच्या खरेपणाबद्दल सर्वांच्या मनात संशय निर्माण होतो.
  काॅन्स्टन्स पिटर्सनच्या (इनग्रिड बर्गन) हेही लक्षात येते की, डाॅ ॲंथनी एडवर्ड (ग्रेगरी पेक) म्हणून आलेल्या व्यक्तीच्या मनात पांढऱ्या पृष्ठभूमीवर काढलेल्या काळ्या समांतर रेषांबाबत एक अकारण भीती (फोबिया) दडलेली असते. एका शस्त्रक्रियेसाठी त्यालाही उपस्थित राहण्याचा प्रसंग येतो. त्यावेळचे ते शस्त्रक्रियेचे वातावरण न मानवून त्याला चक्कर येते. तो स्वत: डाॅक्टर असला तरी सर्जन नसतो. त्यामुळे असे घडते. त्यावेळी त्याच्या जवळील बाॅक्समध्ये एक डबी आढळते. तिच्यावर जे बी अशी अक्षरे असतात. या आद्याक्षरांच्या आधारे आपले नाव जाॅन ब्राॅन असल्याचे तो काॅन्स्टन्सला सांगतो. तसेच हा तोतया व खऱ्या ॲंथनी एडवर्ड यांच्या हस्ताक्षरातही फरक असतो, हेही तिच्या लक्षात येते. त्यामुळे हा खरा ॲंथनी एडवर्ड नाही, याबद्दल काॅन्स्टन्स पिटर्सनच्या मनात शंका उरत नाही. तोही तिला आपण तोतया असून आपणच खऱ्या ॲंथनी एडवर्डचा खून केला आहे, पण त्याचबरोबर आपल्याला स्वत:बाबत पराकोटीची विस्मृती झालेली असून आपण खरे कोण आहोत, आपले खरे नाव काय आहे, याबद्दल काहीच आठवत नाही, हेही स्पष्ट करतो. काॅन्स्टन्स पिटर्सनला मात्र वाटत असते की, त्याने खून केला नसून तो निर्दोष आहे. तो खोट्या अपराधी भावाचा बळी आहे. एके दिवशी हा तोतया ॲंथनी एडवर्ड तिच्या नावे एक पत्र लिहून पसार होतो. याच सुमारास उघड होते की, ॲंथनी एडवर्ड हे नाव धारण करून एक तोतया आला होता आणि खरा ॲंथनी एडवर्ड बेपत्ता असून त्याचा बहुदा खून झाला असावा.
डाॅ काॅन्स्टन्स पिटर्सन त्याचा शोध घेते आणि त्याच्यावर आपल्या मनोविश्लेषणविषयक ज्ञानाच्या आधारे प्रयोग करून त्याची विस्मृती दूर करण्याचा व सत्य शोधण्याचा प्रयत्न करते. तोतया आता स्वत:ला जाॅन ब्राॅन म्हणवू लागतो. पोलिस या दोघांच्या मागावर असतात. ती दोघे त्यांना चुकवून रेल्वेने राॅचेस्टर न्यू याॅर्क या रेल्वे स्टेशनवर येतात.अशी अनेक जोडपी स्टेशनवर आलेली असतात. बायको रेल्वेने जाणार असते व नवरा तिला निरोप द्यायला आलेला निरोपाचे निमित्ताने मिठ्या व चुंबनांची देवघेव होत असते. आपणही यापैकी एक असल्याचे तिथे पाळत ठेवन असलेल्या पोलिसांना भासवण्यासाठी ही दोघेही एकमेकांना चुंबनालिंगन देतात. पण चेकरला दोन तिकिटे दाखवून आगगाडीच्या डब्यात बसतात. निरोप द्यायला आलेला स्वत:ही पत्नीसोबत जातांना पाहून चेकर आश्चर्यचकीत होतो. नंतर ती दोघे डाॅ ब्रुलोव्हकडे आश्रय घेतात.  डाॅ ब्रुलोव्हची भूमिका मायकेल चेकाॅव्ह या नटाने वठवली आहे. डाॅ ब्रुलोव्हची डाॅ काॅन्स्टन्स पिटर्सन ही शिष्या असते. आपले लग्न झाले असून आपण दोघे हनिमून सफरीवर आहोत, असे ती आपल्या गुरूला सांगते. पण सत्य काय आहे, याचा त्याला अंदाज येतो. कारण ही दोघेही सोबत काहीही सामानसुमान न घेता आलेली असतात. डाॅ ब्रुलोव्ह त्यांना पाहुणचार घेण्यासाठी थांबवून घेतो.
आता ही गुरू शिष्येची जोडी जाॅन ब्राऊनच्या स्वप्नांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करते. या निमित्ताने बऱ्याच मनोविश्लेषणात्मक संकेतांचाही (सिंबाॅल्स) प्रेक्षकांना परिचय होतो. डोळे, पडदे, कात्र्या,पत्ते, कोरे पत्ते, बिनचेहऱ्याचा माणूस, माणूस उंच इमारतीवरून खाली कोसळणे, चिमणीमागे (गिरणीचा भोंगा) एका व्यक्तीने दडून बसणे, एका चाक खाली कोसळणे व अजस्त्र पंखाद्वारे पाठलाग होणे असे अनेक संकेत (सिंबाॅल्स) कथा लेखकाने व आल्फ्रेड हिचकाॅकने मोठ्या खुबीने वापरले आहेत. या स्वप्नांमधून असा अर्थबोध निघाला की, जॅान ब्राऊन आणि खरा ॲंथनी एडवर्ड बर्फावरून घसरण्याच्या सफरीवर (स्की ट्रिप) वर गॅब्रिएल दरीत गेले असावेत. (पांढऱ्या समांतर रेषा म्हणजेबर्फावर उमटणाऱ्या खाचा असाव्यात.) ॲंथनी एडवर्ड कोणत्या ना कोणत्या कारणामुळे या खेळात दगावला असावा. डाॅ काॅनस्टन्स पिटर्सन व जाॅन ब्राऊन त्याच गॅब्रिएल दरीत मुद्दाम स्किईंग (बर्फावरून घसरणे) साठी जातात व त्याच मार्गाने स्किईंग करतात. टेकडीच्या तळाकडे वेगाने घसरत येत असतांना ब्राऊनची स्मृती अचानक परत येते. त्याचवेळी त्याला एकदम एक उभा कडा समोर असल्याचे दिसते. याच कड्यावरून घसरून खाली पडून एडवर्ड मृत्युमुखी पडला होता, हेही त्याला आता  आठवते. यावेळी मात्र अटोकाट प्रयत्नाने ती दोघे पडतापडता सावरतात. त्याची लहानपणीच्या एका प्रसंगाची आठवणही याचवेळी जागी होते. खूप लहानपणीची गोष्ट होती. तो जिन्याच्या कठड्यावरून खाली वेगाने घसरत येत असतांना कठड्यावरच तळाशी बसलेल्या त्याच्या धाकट्या भावाला त्याचा इतका जबरदस्त धक्का लागतो की तो धाकटा भाऊ चेंडूसारखा उसळून टोकदार रेलिंगवर आदळतो. रेलिंगचे टोक अंगात घुसून धाकटा भाऊ तात्काळ गतप्राण होतो. या घटनेमुळे त्याच्या मनात एक अपराधीपणाचा भाव नेणिवेत घर करून बसला होता. त्याला असेही आठवले की, त्याचे खरे नाव जाॅन बॅलनटाईन असे होते. (अशा घटना जेव्हा प्रत्यक्षात घडतात, तेव्हा स्मृती व ओळख नाहीशी होते. व्यक्ती नवीन नावाने वावरू लागते. पण धारण केलेले नवीन नाव जुन्या नावाशी साम्य असलेले असते. जाॅन ब्राऊन व जाॅन बॅलनटाईन या दोन नावात लेखक व दिग्दर्शकाने साम्य ठेऊन प्रत्यक्षाची नाळ कायम राखलेली आढळते. आलेफ्रेड हिचकाॅकच्या इतर अनेक वैशिष्ट्यांसारखेच हे वैशिष्ट्य ठरावे.) आता सर्व काही सुरळीत होणार असे मानून प्रेक्षक निश्वास सोडतात न सोडतात की, लगेच दरीत कोसळलेलेल्या खऱ्या डाॅ ॲंथनी एडवर्डचे प्रेत सापडते पण त्याच्या पाठीत पिस्तुलातून डागलेली गोळी घुसलेली आढळते. जाॅन बॅलेनटाईनवर खुनाचा आळ येऊन आरोप ठेवला जातो व त्याची रवानगी तुरुंगात केली जाते. यावेळी न्यायालयीन दृश्ये न दाखवता काॅनस्टन्सच्या स्वगतातून(?) तिने त्याची बाजू कोर्टात मांडण्याचा प्रयत्न कसा केला ते आलफ्रेड हिचकाॅकने मोठ्या खुबीने दाखविले आहे.
जाॅन बॅलेनटाईनला शेवटी तुरुंगवास झालाच, या धक्याने खचलेली काॅन्स्टन्स पिटर्सन पुन्हा कामावर रुजू होते. पर्यायी व्यवस्था न होऊ शकल्यामुळे डाॅ मुर्चिसन पुन्हा एकदा पूर्वीच्या पदावर परत आलेला असतो. काॅन्स्टन्स पिटर्सनशी बोलता बोलता तो बोलून जातो की, त्याची व डाॅ ॲंथनी एडवर्डची तोंडओळख झाली होती पण त्याला डाॅ ॲंथनी एडवर्ड फारसा आवडला नव्हता. काॅन्स्टन्स पिटर्सन एकदम चमकते. पूर्वी त्याने सांगितले होते की, डाॅ ॲंथनी एडवर्डला तो मुळीच ओळखत नव्हता. काॅन्स्टन पिटर्सनच्या मनात एकदम संशय निर्माण होतो. ती मनातल्या मनात जाॅन ब्राऊनने त्याने पूर्वी सांगितलेल्या स्वप्नांची व त्यांच्या अर्थांची उजळणी करते. तिला जाणवते की स्वप्नात एक चाक दिसल्याचा उल्लेख जाॅन ब्राऊनने केला होता. या मुद्याकडे दुर्लक्ष झाले होते. ते चाक पिस्तुलाचे रूप घेऊन आले असावे व भोंग्यामागे जडलेला माणूस दुसरा तिसरा कुणी नसून तो खुद्द मुर्चिसनच असला पाहिजे. व त्यानेच पिस्तुलातून गोळी मारून ॲंथनी एडवर्डला दरीत टाकले असावे. ही घटना पडलेल्या चाकाचे रूप घेऊन स्वप्नात आली असली पाहिजे.
काॅन्स्टन्स पिटर्सन मुर्चिसन समोर आपला निष्कर्ष ठेवते. तो तिचा निष्कर्ष मान्य करतो आणि म्हणतो की, ते पिस्तूल अजूनही त्याच्याजवळ आहे. ते पिस्तूल तो तिच्यावर रोखतो. पण तिकडे दुर्लक्ष करीत काॅन्स्टन्स पिटर्सन बाहेर जायला निघते पण जाताजाता बजावते की त्याचा पहिला गुन्हा संशयास्पद परिस्थितीत झालेला मानला जाईलही कारण तेव्हा त्याच्यावर मानसिक थकव्याचा प्रभाव होता हे विचारात घेतले जाईल पण आता तिचा खून झाला तर मात्र ती घटना त्याला थेट इलेक्ट्रिक चेअरवरच नेऊन बसवील. मुर्चिसन तिला बाहेर जाऊ देतो व स्वत:वरच पिस्तूल चालवून आपलाच जीव घेतो.
शेवटी काॅनस्टन्स पिटर्सन व जाॅन बॅलेनटाईनचे गोडसे मीलन होते. ते हनिमूनवर जाण्यासाठी त्याच ग्रॅंड सेंट्रल स्टेशनवर आलेले दाखवले आहेत. त्याच चेकरशी त्यांची गाठभेठ होते. तो पुन्हा आश्चर्यचकीत झालेला दाखवला आहे. अगोदर इथूनच विकृत मनस्थितीतून निर्माण झालेल्या गुन्ह्याच्या शोध मोहिमेची सुरवात झालेली दाखविली आहे.

No comments:

Post a Comment