Saturday, January 7, 2017

गाथा ही आईनस्टीनच्या अर्धांगिनीची
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
जगविख्यात पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ अलबर्ट आईनस्टीनची प्रथम पत्नी मिलेव्हा हिचा जन्म आजच्या सर्बियामधील पण १८७५ सालच्या आॅस्ट्रिया - हंगेरीमधील तितेल गावी १९ डिसेंबर ला झाला. म्हणजे १९ डिसेंबर २०१६ ला तिचा १४१ वा वाढदिवस होता.  नोबेल पारितोषिक विजेता म्हणून तसेच जगातील विसाव्या शतकातला सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक म्हणूनही अलबर्ट आईनस्टीनचा जगभर गौरव केला जातो. पण त्यामानाने त्याच्या अर्धांगिनीचा मिलेव्हाचा उल्लेख क्वचितच होतो. वस्तुस्थिती ही आहे की, मिलेव्हाचे अलबर्ट आईनस्टीनच्या संशोधनात बरोबरीचे योगदान होते. ही बाब आता २०१६ साली जगासमोर येते आहे. पण तिच्या वाट्याला ही उपेक्षा का?
 बायकांना अक्कल नसते?-  ‘बायकांना अक्कल नसते’, या समजुतीच्या काळात जन्म झाला हाच कायतो पूर्वाश्रमीच्या मिलेव्हाचा मेरिकचा म्हणजेच उत्तराश्रमीच्या मिलेव्हा अलबर्टचा अपराध होता. झुरिच पाॅलिटेक्निक स्कूलमध्ये शिकत असतांना तिचा अलबर्ट आईन्स्टीनशी परिचय झाला, परिचयाचे रुपांतर प्रेमात व्हायला वेळ लागला नाही. परिणाम व्हायचा तोच झाला आणि मिलेव्हाच्या वाट्याला गरोदरपण आले. त्यामुळे त्यांनी तातडीने लग्न करून संसार थाटला. या काळात अलबर्ट आईन्स्टीन झुरिच पेटंट आॅफिसमध्ये कामाला होता. याच काळात अलबर्ट आईन्स्टीनचे पुढे जगविख्यात झालेले संशोधन आकाराला येत होते. या दाम्पत्याला याच काळात आणखी दोन अपत्ये झाली. पुढे १९१६ साली घटस्फोट घेऊन ही दोघे विभक्त झाली. १९२१ साली अलबर्ट आईनस्टीनला फोटो इलेक्ट्रिक इफेक्टविषयक संशोधनासाठी नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले.  नोबेल पारितोषिकाच्या निमित्ताने अलबर्ट आईन्स्टीनला मिळालेला पैसा मिलेव्हाकडे गेला. मिलेव्हाने अलबर्ट आईन्स्टीनने आईनस्टीनच्या प्रथम पत्नीने १९४८ साली जगाचा निरोप घेतला.
 या तशा साध्यासुध्या कहाणी मागची कहाणी मात्र अशी बाळबोध नाही. मग कशी आहे ती कहाणी?
मेधावी मिल्व्हा - सर्बियन वंशाच्या धनसंपन्न कुटुंबात मिलेव्हाचा जन्म झाला होता. एक अतिशय मेधावी विद्यार्थिनी असल्यामुळे फक्त मुलांसाठीच असलेल्या शाळेत - झुरिच पाॅलिटेक्नक स्कूलमध्ये-  तिला प्रवेश मिळू शकला. पुढे हीच ‘शाळा’ स्विस फेडरल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नाॅलाॅजी म्हणून नावारूपाला आलेली आहे. गणित आणि पदार्शविज्ञान यात तिची प्रगती उत्तम असे. अलबर्ट आईन्स्टीन बरोबर तिचे विशेष सख्य असण्याचे एक वेगळेही कारण होते ते असे की, हे दोघेही विज्ञानाच्या प्रेमात पडले होते. त्यामुळे तिच्या मित्रांमध्ये अलबर्ट आईन्स्टीनला विशेष स्थान होते.
विजोड जोडी? - या दरम्यानच्या काही काळात मिलेव्हा जर्मनीतही शिकायला गेली होती. पण या दोन प्रेमी जीवांमध्ये अंकुरलेले प्रेम पत्रव्यवहाराच्या माध्यमाने फुलतच राहिले. आपल्या लाडक्या डाॅलीला (मिलेव्हाला) अलबर्ट आईन्स्टीनने साद घातली आणि ती दोघे एकत्र आली. हे प्रेमसंबंध मिलेव्हाच्या आईवडलांना मंजूर होते पण अलबर्ट आईन्स्टीनचाया आईवडलांना हा संबंध मंजूर नव्हता. कारणेही तशी त्यावेळचे संदर्भ पाहता लहानसहान नव्हती. मिलेव्हाचे वयाने मोठे असणे, तिचा धर्म वेगळा असणे आणि दोन कुटुंबांचा सांस्कृतिक वारसाही वेगळा असणे हे मुद्दे तसे नजरेआड करण्यासारखे नव्हते.
विवाहापूर्वीचा अपत्यसंभव - प्रेम व अभ्यास यात सख्य नसते, असे म्हणतात. १९०० साली ही मेधावी मुलगी चक्क नापास झाली. अलबर्ट मात्र पुढेपुढे शिकतच राहिला. पास होण्याचा  मिलेव्हाचा दुसरा प्रयत्न सुद्धा फसला. ती पुन्हा नापास झाली. पण अाईन्स्टीनचे मूल मात्र तिच्या उदरात याच काळात वाढू लागल्याचे लक्षात आले. १९०२ मध्ये लग्नाआधीच आईवडलांकडे असतानाच मिलेव्हाच्या पोटी लिसेर्लचा जन्म झाला. या मुलीचे काय झाले ते नक्की सांगता येत नाही. तिला दत्तक देण्यात आले असे म्हणतात. तिला नंतर ‘स्कार्लेट फिव्हर’ हा रोग झाला होता, असेही म्हणतात.
गौरव तुझा पण पैसे माझे - १९०३ साली अलबर्ट व मिलेव्हाचा विवाह झाला. लगेचच त्यांच्या पोटी हंस जन्माला आला. अलबर्ट आईन्स्टीनच्या संशोधनात  मिलेव्हाचा हातभार किती होता, याबाबतची माहिती नुकतीच बाहेर आली आहे. त्यावरून या संशोधनात तिचा बरोबरीचा वाटा होता, हे जाणवते. त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध होत, तेव्हा ‘आमचे’ असा उल्लेख असे. ‘माझे’ असा उल्लेख अलबर्ट आईन्स्टीनने केलेला आढळत नाही. पण मग ती अनुत्तीर्ण का होत होती. त्याचे कारण ‘बायकांना अक्कल नसते’. या पुरुषप्रधान मनोवृत्तीत सापडते. याचा वारंवार अनुभव आल्यानंतर मिलेव्हानेच सुचविले की, ‘यापुढे तू माझ्या नावाचा उल्लेख न करता फक्त आपल्याच नावाचा उल्लेख करीत जा. पण यदाकदाचित या संशोधनाचे निमित्ताने नोबेल पारितोषिक मिळाले, तर गौरव तुझा पण त्या निमित्ताने मिळणारे पैसे मात्र माझे, बरं का!’ सापेक्षतावादासंबंधातले अलबर्ट आईन्स्टीनचे सुप्रसिद्ध समीकरण ई = एमसी २, हे याच काळात त्याला स्फुरले, असे म्हणतात.
तपासणे व दुरुस्त करणे - पीटर मायकलमोर हा अलबर्ट आईन्स्टीनचा एक चरित्र लेखक आहे. तो म्हणतो की,सापेक्षतावादावरचे आपले लिखाण पूर्ण केल्यानंतर अलबर्ट आईन्स्टीन सतत दोन आठवडे नुसता लोळत पडला होता. या काळात मिलेव्हानेच लिखाण वारंवार तपासून दुरुस्त केले व नंतरच ते पुढे पाठविले. आता दोघांनाही खूप शीण आला होता. ते विश्रांतीसाठी सर्बियाला गेले. तिथे दोघांच्या संयुक्त प्रयत्नांचे अनेक दाखले उपलब्ध आहेत.
संशोधन दोघांचे की एकट्याचे? - मिलेव्हा मेरिक आणि अलबर्ट आईनस्टीन ही दोघे खूप अगोदरपासून म्हणजे १९१४ पासून जोडीने ( कोलॅबोरेट) अभ्यास करीत हे दाखवणारे अनेक दस्तऐवज आज उपलब्ध झाले आहेत. ‘सापेक्ष गतीबाबतचा( रिलेटिव्ह मोशन) आमचा अभ्यास’ असा लिखाणाचा प्रारंभ असलेले लेखी उल्लेख डझनावारी आढळतात. या संयुक्त प्रयत्नांची आधाराशीला परस्पर प्रेम व आदरावर उभी होती. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट व सापेक्षतावादाच्या आगळ्यावेगळ्या अमरवेली फुलण्या बहरण्याचे श्रेय या परस्परसंबंधाला जाते.
वी आर वन एंटिटी - अलबर्ट आईनस्टीनची अलौकिक प्रतिभा सर्वप्रथम कुणाला जाणवली असेल तर ती मिलेव्हाला. तिच्याशिवाय आईनस्टीन यशस्वी होऊच शकला नसता. स्वत:च्या सर्व इच्छा, आशा आकांक्षा बाजूला सारून तिने अलबर्टला साथ दिली. त्याच्या यशात, भावभावनात एकतानतेने सहभागी झाली. त्यांचे संयुक्त लिखाण त्याच्या एकट्याच्याच नावाने प्रगट करण्याचे एकदा ठरल्यावर त्या दोघांच्या वेगवेगळ्या देहात जणू एकच मन वावरू लागले होते. (तिच्या जर्मन भाषेतील वाक्याचा इंग्रजी अनुवाद आहे,”वी आर वन एंटिटी”) अलबर्टच्या यशातच आपले सुख सामावलेले आहे, हे मानून/समजून/पटून ती वावरत होती. तिने असे का केले असावे? तशी तिची ओळख एकलकोंडी (रिझर्व्ह्ड) व स्वत:ची ओळख पुसून टाकणारी (सेल्फ-इफेस्ड) अशी आहे. पारितोषिक वा प्रसिद्धी यांच्या वाट्यालाही ती कधीच गेली नाही. तसेही जेव्हा जोडीने व संयुक्त प्रयत्न असतो, तेव्हा माझे कोणते व तुझे कोणते हे का कधी वेगळे करता येते?
कुणाच्या वाट्याला मोती तर कुणाच्या वाट्याला फक्त शिंपले- त्यांच्या संयुक्त अभ्यासाचा पहिला दाखला उपलब्ध आहे १९०८ सालचा. आईनस्टीनला प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या पहिल्यावहिल्या भाषणातील आठ पाने आहेत मिलेव्हाच्या अक्षरातली. तुझ्या नावाचा उल्लेख का नाही असे विचारल्यावर ती म्हणाली होती, ‘अलबर्ट आज जगविख्यात पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्या यशाचा मला आनंद आहे. मात्र यशामुळे त्याच्यातल्या मानवतेला झाकोळी येऊ नये एवढीच माझी इच्छा आहे…..’. पुढे तिने म्हटले आहे, ‘आता त्याच्यापाशी बायको सोबत घालवायला वेळच नसतो मुळी. म्हणतात ना, एकाच्या हातात येतात मोती, तर दुसऱ्याच्या वाट्याला येतात शिंपलीच तेवढी’
या दाम्पत्याचा दुसरा मुलगा जन्माला आला २८ जुलै १९१० रोजी. या काळातील अलबर्टने तिला पोस्टकार्डावर लिहिलेली प्रेमाने ओथंबिलेली प्रेमपत्रे उपलब्ध आहेत.
मिठाचा खडा - पण १९१२ साली अलबर्ड एल्सा लोवेंथल नावाच्या  दूरच्या बहिणीच्या प्रेमात पडला. हे प्रेमप्रकरण गुपित स्वरुपात परस्पर पत्रव्यवहारापुरते दोन वर्षे सुरू होते. ही पत्रेही उपलब्ध आहेत. या काळात अलबर्ट यशाच्या एकामागून एक पायऱ्या सर करत चढतच होता.१९१४ साली हे लफडे उघडकीला आले आणि मिलेव्हा मुलांना बरोबर घेऊन वेगळी झाली, तिने घटसफोटाला संमती दिली पण एक अट टाकली की, जर कधी अलबर्ट आईनस्टीनला नोबेल पारितोषिक मिळाले तर पारितोषिकावर त्याचा हक्क राहील पण त्यासोबत मिळणाऱ्या रकमेवर तिचा अधिकार असेल. तिचे नंतरचे आयुष्य हालअपेष्टेत व दारिद्यात  गेले. त्यातच मुलाला - एड्युअर्डला- स्किझोफ्रेनिया झाला. या निमित्ताचा व अन्य खर्च भागविण्यासाठी तिने शिकवण्या करून कसेबसे दिवस काढले. अलबर्ट आईनस्टीनकडून पोटगी पोटी रकम यायची. पण अपुरी व तीही अनियमितपणाने.
शब्द फिरवला - १९२५ साली अलबर्ट आईनस्टीनने मृत्युपत्रात लिहिले की नोबेल पारितोषिकाचे पैसे मुलाला मिळावेत. मग मात्र मिलेव्हा खवळून उठली. या पैशावर माझा हक्क आहे आणि संशोधनात माझाही वाटा आहे. तो सिद्ध करण्यासाठी माझ्याजवळचे पुरावे मी उघड करीन, अशी तिने धमकी दिली.  यावर अलबर्ट आईन्स्टाईनने तिला लिहिले की, तुझ्या धमकीचे मला हसू येते. कोण विश्वास ठेवील तुझ्यावर? तू गप्प राहण्यातच शहाणपणा आहे. आणि ….आणि मिलेव्हाने गप्प राहण्याचे ठरविले.
मैत्रिणीचा कैवार- पण तिची मैत्रीण मिलाना हिने १९२९ साली एका पत्रकाराला आवाहन केले की या बाबतीतले सत्य समोर यावे, यासाठी त्यांने मिलेव्हाची मुलाखत घ्यावी. मिलेव्हाची भूमिका याबाबत अशी होती की, असे वागणे तिच्या स्वभावात बसत नाही. पण तिने आपल्या मैत्रिणीला मिलानाला अडविले किंवा थोपवले नाही व तिची बाजूसही समोर आली.
संयुक्त संशोधनाचे साक्षीदार - मिलेव्हाचा भाऊ मिलोसने एके ठिकाणी लिहिले आहे की, मिलेव्हा व अलबर्ट राॅकेलच्या दिव्याच्या प्रकाशात रात्ररात्र जागत बसून विज्ञानातील समस्यांवर चर्चा करीत, हिशोब करीत, निष्कर्ष लिहून काढीत, ते वाचीत व त्यावर चर्चा करीत, त्यात सुधारणा करीत. अलबर्ट आईनस्टीनचा मुलगा - हंस अलबर्ट - याचेही मत असेच आहे. आपल्या आईवडलांना एकत्र बसून अभ्यास करताना पाहिल्याचे त्याला आठवते. ही सर्व हकीकत मिलेव्हाच्या १४१ व्या वाढदिवशी १९ डिसेंबर २०१६ ला जगजाहीर झाली

No comments:

Post a Comment