Friday, January 13, 2017

१०५ वर्षांची महिला युद्ध वार्ताहर- क्लेअर हाॅलिंगवर्थ
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
तब्बल १०५ वर्षे जगून तिने १० जानेवारी २०१७ ला जगाचा निरोप घेतला आहे. मुळात १०५ वर्षांचं आयुष्य वाट्याला येणं ही सामान्य बाब नव्हे. पण ज्या व्यक्तीच्या वाट्याला हे दीर्घ आयुष्य आलं ती व्यक्ती एक महिला पत्रकार होती, हे विशेषच म्हटले पाहिजे. याशिवाय आणखी वेगळी बाब आहे ती अशी की, तिच्या खाती विसाव्या शतकातील जागतिक महत्त्वाची बातमी प्रथम देण्याचा विक्रम नोंदवलेला आहे. कोणती होती ही खास बातमी? ‘दुसऱ्या महायुद्धाला प्रारंभ झाला आहे’, हे तिने जगाला प्रथम सांगितले. त्या वार्ताहर महिलेचे नाव आहे, क्लेअर हाॅलिंगवर्थ.
बड्या राष्ट्रांनी झेकोस्लोव्हाकियाचा बळी दिला - १९३९ सालची गोष्ट आहे. युद्धखोर हिटलरचे तुष्टीकरणाच्या (अपीझमेंट) नीतीचा अवलंब करून समाधान करावे व युद्ध टाळता आले तर पहावे, या हेतूने युरोपातील बडी राष्ट्रे तडजोडीसाठी अटोकाट प्रयत्न करीत होती. म्युनिचमध्ये जर्मनी, इटाली, ब्रिटन आणि फ्रान्स यांनी करार करून झेकोस्लोव्हाक गणराज्याला सुडेटेनलॅंड व संरक्षणाचे दृष्टीने इतर काही महत्त्वाची ठाणी जर्मनीला बहाल करून शांतता राखण्यास मदत करण्यासाठी एवढासा(?) त्याग करण्यास एकप्रकारे बाध्य केले. हे म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवण्यासारखेच झाले होते. परिणामी शांतता तर दूरच राहिली, काही काळानंतर जर्मन फौजांनी अख्खा झेकोस्लोव्हाकियाच गिळंकृत केला.
म्युनिचची अशीही प्रसिद्धी - जर्मनीतील बॅव्हारिया नावाचा प्रांत आहे. म्युनिच हे या प्रांताच्या राजधानीचे शहर. इतिहासकालीन इमारती आणि इतिहासाच्या व कलाकुसरींच्या खुणा जपणारी वस्तु संग्रहालये (म्युझियम्) हे या शहराचे वैशिष्ट्य आहे. जगाच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या घटनाही याच शहरात घडल्या, हे या शहराचे आणखी एक वैशिष्टय! या म्युनिच शहरात १९३८ साली जर्मनीचा फॅसिस्ट हुकुमशहा ॲडाॅल्फ हिटलर हा वखवखलेल्या भूमिकेत एका परिषदेत सहभागी झाला होता. वर्षापूर्वीच त्याने आॅस्ट्रिया गिळंकृत केला होता. पण त्याची भूक शमली नव्हती. आता त्याची बुभुक्षित नजर झेकोस्लोव्हॅकियातील सुडेटेंलॅंड या प्रदेशाकडे वळली होती. हा भूभाग त्याला जर्मनीत सामील करून हवा होता. कारणही तसेच महत्त्वाचे(?) होते. झेक सरकार म्हणे तिथल्या जर्मन भाषिकांवर अन्याय करीत होते. या प्रश्नाचा विचार करण्यासाठी २९ सप्टेंबर १९३८ ला म्युनिचला परिषद बोलावण्यात आली.
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र - जर्मनी, इटाली, ब्रिटन आणि फ्रान्स यांनी ठराव केला तो असा. जर्मनीने इतर कुठे आक्रमण न करण्याचे वचन दिल्यास सुडेटेंलॅंड हा झेकोस्लोव्हॅकियातील भूभाग खालसा करण्यास हरकत नसावी. वा रे करार! भूभाग झेकोस्लोव्हॅकियाचा! खालसा करण्याची (अनेक्स) अनुमती देणारे इटाली, ब्रिटन आणि फ्रान्स हे होतात कोण? पण शांततेसाठी झेकोस्लोव्हॅकियाने हा ‘त्याग’ करणे कसे आवश्यक आहे, हे त्याला पटवून देण्यात आले. करारावर जर्मनीच्या वतीने ॲडाॅल्फ हिटलर, ब्रिटनच्या वतीने नेव्हिल चेंबरलेन, फ्रान्सच्या वतीने एडाॅर्ड डालाडीर व इटालीच्या वतीने बेनीटो मुसोलिनी यांनी सह्या केल्या. बिचाऱ्या झेकोस्लोव्हॅकियाला त्याग केल्याचे नोंदवण्याचाही अधिकार नव्हता. पण बड्या राष्ट्रांनी हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवूनही दुष्टात्मा शांत झाला नाही, तो नाहीच. कदाचित इतिहासपुरुष कंठरवाने सांगतही असेल की, बाबांनो, तुष्टीकरणाची नीती शांततेची ग्वाही देत नाही.
चेंबरलिन व आपल्यातले विलक्षण साम्य - चेंबरलिन हातात कागदाचा तुकडा हलवीत जगाला आश्वस्त करीत होते, ‘ही पहा, आम्ही हस्तगत केलेली आमच्या काळातली शांतता’. अख्खे ब्रिटन सुखावले. त्यांच्या पंतप्रधानाने जगाला युद्धापासून वाचवले होते. जगात हे असे नित्य चालूच असते. बरोबर उण्यापुऱ्या १७ वर्षांनी आपण नाही का असाच पंचशील करार चीन बरोबर २९ एप्रिल १९५४ रोजी पेकिंग येथे करून अत्यानंदाने नाचलो होतो. दोन उदाहरणात तपशीलात एक दोन ‘लहानसे फरक’ आहेत. झेकोस्लोव्हॅकियात मरणापूर्वीची भयाण शांतता होती. आपल्याला तेही कळत नव्हते. आम्ही जल्लोश करीत होतो. दुसरा ‘लहानसा’ फरक हा होता की, झेकोस्लोव्हॅकियाने स्वत: स्वाक्षरी न केल्यामुळे तसा तो पापाचा धनी होत नव्हता. आपण आपण जाणूनबुजून, अक्कलहुशारीने, नशापाणी न करता, सवखुशीने एकामागून एक असा पाच शिळांचा आघात स्वत:वर ओढवून घेतला. सीमाप्रश्न, अझरला दहशतवादी ठरवण्याचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रात कायम सदस्यत्व देण्याचा प्रश्न, काश्मीरप्रकरणी पाठिंबा देण्याचा प्रश्न, एनएसजीत प्रवेशाचा प्रश्न या सारख्या प्रकरणी पाचपेक्षा जास्त शीळा चीनने आपल्या मस्तकावर हाणल्या आहेत. असो हे काहीसे विषयंतर झाले.
नमनालाच घडाभर तेल का? - १ आॅक्टोबर सुडेटेंलॅंड व पुढे मार्च १९३९ रोजी अख्खा झेकोस्लोव्हॅकियाच जर्मनीने गिळंकृत केला. नवीन पिढीला हा इतिहास माहीत नाही. जुन्या पिढीतलेही हा इतिहास जगलेले  ज्येष्ठतर नागरिकही आजमितीला फारसे शिल्लक नसणार. म्हणूनच नमनालाच घडाभर तेल लागते आहे.
झेकोस्लोव्हाकिया जगाच्या नकाशावरून पुसला गेल्यानंतरही चेंबरलीन यांची  युद्धाविणा शांती जिंकल्याची नशा काही उतरली नाही. नंतर पोलंडचा बळी गेला. मग मात्र चेंबरलिन यांना जाणवले की, हिटलरच्या शब्दांवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही आणि दुसऱ्या महायुद्धाला प्रारंभ झाला. ज्यांचा या युद्धाशी प्रत्यक्ष असा कोणताही संबंध नव्हता अशा पाच कोटी नागरिकांची आहुती पडल्यानंतरच हे युद्ध थांबले पण तेही शीत युद्धाला जन्म देण्यासाठी.
अजि म्या युद्ध पाहिले - आपल्या कथानायिकेची -  क्लेअर हाॅलिंगवर्थची - विशेषता ही की, तिने आपल्या स्वत:च्या डोळ्याने या युद्धाचा प्रारंभ पाहिला आहे. आधुनिक काळातली ‘संजयच’ म्हणाना. पत्रकार म्हणून जगाला या प्रारंभाचे वार्तांकन करणारी ती पहिली वार्ताहर आहे. १९३९ च्या शेवटी शांतता पथकाच्या सोबतीने ती जर्मनी व पोलंडच्या सीमेबर ती अगोदरच येऊन पोचली होती. ‘युद्धस्य कथा रम्या’ असे एक वचन आहे. तिलाही युद्धाच्या वार्ता प्रिय असत. नव्हे युद्धभूमीवर आपण जातीने असावे, असे तिला वाटायचे. (एंजाॅय बिईंग इन वाॅर). पोलंडमधील कटोव्हाईस या गावी ती लंडनच्या डेली टेलिग्राफची वार्ताहर म्हणून काम करीत होती. आॅगस्टमध्ये काम स्वीकारल्या नंतर केवळ तीन दिवसातच विसाव्या शतकातल्या (कदाचित  मागच्यापुढच्या सर्वच शतकातल्या) सर्वात मोठ्या स्कूपची (बितंबातमीची) ती एकमेव धनी ठरली. बातमी होती, ‘हिटलरने पोलंडवर आक्रमण केले आहे. दुसरे महायुद्ध सुरू झाले आहे’.
 दुसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभाचा आखो देखा हाल- संकटाची चाहूल लवकर लागावी म्हणून क्लेअर हाॅलिंगवर्थ खुद्द जर्मनीतच गेली. आपल्या माजी प्रियकराच्या वशिल्याने तिने एक राजकीय वाहन हस्तगत केले. त्यांवर ‘युनीयन जॅक’ हा ब्रिटिश राष्ट्रध्वज लावला. आता ती पोलंड व जर्मनीच्या सीमारेषेवर बिनधास्त फिरू शकत होती. कारण तोपर्यंत ब्रिटन व जर्मनीचे मित्रत्त्वाचे संबंध होते. ‘मला धडाडत चाललेल्या मोटरसायकलवरून जाणारे निरोपे ठिकठिकाणी दिसले. माझ्या एका बाजूला एक खोल दरी दिसत होती. आत डोकावता येत नव्हते. एक भलामोठा पडदा आतले सर्वकाही झाकत होता’, क्लेअर आपल्या सहकाऱ्यांना सांगत होती. सत्तर वर्षांपूर्वी अनुभवलेला प्रसंग तिच्या दृष्टीसमोर पुन्हा एकदा तसाच ताजातवाना उभा राहिला होता. टेलिग्राफ मधील कर्मचारी कान देऊन ऐकत होते. तेही तोच थरार अनुभवत होते.
‘कुठूनसा वाऱ्याचा प्रचंड झोत आला. लहानमोठ्या वस्तू जागा सोडून उडाल्या.छोटी झुडपे तर मुळापासून उखडली गेली. आता दरीतले दृश्यही दिसू लागले. कारण दृश्य झाकणारा पडदा पार उडून गेला होता. खोल दरीत शेकडो रणगाडे आग ओकीत निघाले होते. मी वेगाने परत फिरले.
‘बये, तू कुठे गेली होतीय?’, माझा माजी प्रियकर चिंताग्रस्त होऊन मला विचारत होता. मी वाहन परत केले व उत्तरले,’जर्मनीत’.
‘वेड लागलय का तुला? तिकडे कशाला मरायला का गेली होतीस?’, त्याच्या स्वरातील राग व चिंता दोन्ही जाणवत होती.
‘स्कूप (बितंमबातमी)’, अरे मला स्कूप मिळाला आहे’, क्लेअर सांगत होती. हो,  ती सांगत होती आणि अख्ख्या जगाला प्रथमच कळत होते की, ’पोलंडमध्ये जर्मन रणगाडे घुसले आहेत’.
तत्क्षणी ती सर्व धावत ब्रिटिश कार्यालयात घुसली. क्लेअरने टाईप करायला सुरवात केली.
‘टाॅप सीक्रेट!’
जर्मनीने पोलंडवर रणगाडे घुसवून हल्ला केला आहे!
दुसरा मेसेज पाठवला वाॅर्साला. तिथल्या टेलिग्राफच्या वार्ताहराला तिने सर्व हकीकत सांगितली. २९ आॅगस्टला पोलंडच्या वृत्तपत्रात युद्धाची आठ काॅलमी बातमी होती, ‘ जर्मनीचे १००० रणगाडे सीमेवर तैनात असून शेकडो रणगाडे पोलंडमध्ये घुसले आहेत’.
क्लेअर हाॅलिंगवर्थची पाच दशकांची युद्ध कारकीर्द - यानंतर सुरू झाला तिचा (क्लेअर हाॅलिंगवर्थचा) पाच दशकांचा युद्ध वार्ताहर म्हणून प्रवास!अल्जेरिया ते व्हिएटनाम, ग्रीस ते येमेन कुठेही युद्धभूमी आहे आणि  क्लेअर हाॅलिंगवर्थ मात्र नाही, असे झाले नाही. ब्रिटिश गुप्तहेर किम फिल्बी  रशियाला फितूर झाला होता. त्याला बेनकाब करण्याचे काम क्लेअर हाॅलिंगवर्थ हिने पार पाडले. १९८० पासून तिचा मुक्काम हाॅंगकाॅंगमध्ये होता. तिथेच १० जानेवारी २०१७ ला तिने अखेरचा श्वास घेतला.
बेदरकार क्लेअर - सफारी घालून, मोतीजडित पिस्तुल बाळगत क्लेअर हाॅलिंगवर्थ सैन्यासोबत त्यांच्याप्रमाणेच पावले टाकीत चालतांना पाहणारे अनेक आहेत. बंडखोरांच्या छुप्या छावण्यांना भेट देण्याचा बेदरकारपणा तिच्यात होता. बंदुकींच्या परस्परफैरी सुरू असतांना ती शांतचित्ताने ते ‘फायरवर्क’ पाहत असायची. बाॅम्बफेकी विमानांच्या सोबत तीही दुसऱ्या विमानाने जायची. काश्मीरमध्ये मोटारीत बसून ती एक पूल ओलांडत असतांनाची गोष्ट. पुलावर पाकिस्थान्यांनी गोळे डागण्यास सुरवात करताच ती शेजाऱ्याकडे वळून म्हणाली, ‘असं काही झालंनं की जीवनात जगण्यासारखं बरचं काही आहे, असं वाटायला लागतं’. युद्ध वार्ताहरक्षेत्र हे पुरुषांचं क्षेत्र मानलं जातं. पण या कुणाच्याही तुलनेत ती कमी पडली नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळची गोष्ट सांगतात. उत्तर आफ्रिकेत वाळवंटातली लढाई सुरू होती. ब्रिटिश सेनापती बर्नार्ड माॅंटगोमेरी ने क्लेअर हाॅलिंगवर्थला पत्रकारांच्या ताफ्यातून हाकूनच लावले. तसाही तो स्त्रीद्वेष्टाच होता म्हणा. सैन्याच्या आघाडीवरील तुकडीसोबत महिला नको. ही महिलांची जागा नाही. पिछाडीला सुरक्षित जागी रहा आणि कर वार्तांकन. क्लेअर हाॅलिंगवर्थ तिथून जी निघाली ती अल्जिरियामध्ये जनरल आयसेनहाॅवरच्या सैन्याच्या तुकडीतील एक सहकारी सैनिकच होऊन बसली.
वाळवंटी राहू - वाळवंटातील लढाईत सैन्याची खरी कसोटी लागते. दिवसेदिवस शरीराला पाण्याचा स्पर्श होत नाही, रात्री आकाश पांघरून झोपायचं, मास आणि बिस्किटांवर दिवस काढायचे. हे सहन न होऊन अनेक पुरुष वार्ताहर परत फिरत, कैरोला मुक्काम ठोकीत व तिथूनच वार्तांकन करीत. पण क्लेअरला हे पटणं शक्यच नव्हतं. जमिनीवर झोपायची सवय व्हावी म्हणून घरीसुद्धा ती जमिनीवरच झोपायची. तशी ती पाच फुटाची बुटरीच होती पण विमान चालवायची. पॅराशूट घेऊन बेधडक उडी मारायची. येतोय तो गोळा तोफेचा की ती बंदुकीतून डागलेली गोळी आहे, हे आवाजावरून ओळखायची.
हाताशी विजेरी व पिस्तुल - पोलंड अत्यल्प वेळात काबीज करा, अशा हिटलरच्या आज्ञा होत्या. त्यामुळे सैन्याच्या हालचाली विद्युतवेगी असत. पण या काळात तिची कार त्यांच्याही पुढे असायची. गडद अंधार असेल तरच थांबायचं, गाडी रस्त्याच्या कडेला घ्यायची, तोंडात बिस्किटांचा तोबरा भरायचा, तो घशाखाली उतरावा व्हिस्कीचा घोट घ्यायचा, हाताशी विजेरी आणि पिस्तुल ठेवायचं, शरीराचं मुटकुळं करायचं आणि ताणून द्यायची गाडीतच.
सर्वसंचारी क्लेअर - १९६० साली अल्जिरियात फ्रेंचांविरुद्ध गनिमी युद्ध सुरू झाले होते. त्यावेळी क्लेअर हाॅलिंगवर्थ ब्रिटनमधील गार्डियन या वृत्तपत्राची वार्ताहर होती. या वृत्तपत्राने आपला स्वत:चा इतिहास लिहिला आहे. त्यात क्लेअर हाॅलिंगवर्थ बाबत गौरवपूर्ण उल्लेख करतांना लेखक म्हणतो, अहो, बंदुकांचे आवाज येऊ लागले की, ही सुद्धा त्या दिशेने चालू लागायची. कुठल्याही कसब्यात/डेऱ्यात तिचा बेधडक संचार असे.
प्रतिहल्ला करण्याची हिंमत - अल्जेरियात एका हाॅटेलवर उजव्या गटाच्या अर्धसैनिक गटाने हल्ला चढवून एका ब्रिटिश पत्रकाराचे अपहरण केले. ही घटना आहे १९६२ सालची. क्लेअर हाॅलिंगवर्थची बहाद्दुरी अशी की, तिने सर्व परदेशी वार्ताहरांना संघटित केले व प्रतिहल्लाच केला म्हणाना. पण कसा?
पोकाॅक नावाच्या ग्रंथकाराने  ‘इस्ट ॲंड वेस्ट आॅफ सुवेझ’ या नावाच्या ग्रंथात या लढ्याची साद्यंत हकीकत दिली आहे. क्लेअर हाॅलिंगवर्थने जणू जोन आॅफ आर्क चे रूप धारण केले होते. आपले दोन्ही बाहू उंचावून ती म्हणाली, ‘त्यांना म्हणावं, आमच्यातल्या एकालाच काय पकडता? आम्ही सगळेच येतो ना? मला खात्री आहे, जगातल्या सर्व पत्रकारांना मारण्याची हिमत त्यांच्यात नाही. आम्हा सगळ्यांनाच सरसावलेले पाहताच त्यांनी आमच्यातल्या ‘त्या’ एकाची मुक्तता केली.
लाडावलेल्या पत्रकार - पत्रकारांचेही प्रकार असतात. त्यात महिला पत्रकारही आल्याच की. अर्नेस्ट हेंमिंगवेची मोहक पत्नी मार्था गेलहाॅर्न आणि लाईफ व टाईम या मासिकांचा प्रकाशकाशी विवाहबद्ध झालेली क्लेअर बूथ लूस यांची संभावना ती ‘त्या लाडावलेल्या खास बायका’ अशा सारख्या शब्दात करायची.
कष्टांची करामत - ती असं का बरं म्हणत असेल? तिला सतत असुरक्षित वाटायचं. ती अनेक वर्षे मुक्त पत्रकार (फ्री लान्सर) होती. पैसा बेताचाच मिळायचा. झगडत झगडतच ती पुढे आली. त्या काळात कष्टांना पारावार नव्हता. मग मात्र ती गार्डियन व नंतर डेली टेलिग्राफची स्टाफ मेंबर झाली. पण आता तिने पन्नाशी ओलांडली होती. एका संपादकाचे मत असे आहे/होते की, तिची सुरवाती सुरवातीची वार्तापत्रे हकीकतीसारखी( नॅरेटिव्ह) न वाटता सरकारी परिपत्रकासारखी(कम्युनिके) असायची. लिखाण सुधारण्यासाठी तिला खूप कष्ट घ्यावे लागले. या दृष्टीने विचार करता तिचे दुसरे पती ब्रिटिश पत्रकार जाॅफ्रे होर यांची तिला खूप मदत झाली. तिची वृ्ते ते ठीकठाक करीत.
गुणविशेष - जिज्ञासा, दम (स्टॅमिना), माहिती मिळविण्याची बहुमुखी व बहु आयामी सूत्रे ( सोर्सेस) यात तिचा कुणीही हात धरू शकत नसे. सेनापती असो वा राजनैतिक अधिकारी, मंत्री असो वा समाज धुरीण एवढेच नव्हेत तर सर्व प्रकारचे बंडखोर या सर्वांबरोबर तिचा वट सारख्याच सहजतेने चालत असे. त्यामुळे प्रकाशने, अर्थकारणाला वाहिलेली नियतकालिके, टाईम सारखी मासिके आणि दैनिके अशा सर्व प्रकारच्या वृत्तक्षेत्रात तिच्या वृत्तांचे स्वागत असे. तिच्या मित्रात आणि संपर्क सूत्रात कोण नव्हते? डोनाल्ड मॅक्लीन व फिल्बी सारखे बडे बडे फितुर गुप्तहेर तर होतेच पण रशियाला माहिती पुरवणाऱ्या गुप्तहेरांच्या संघटनांशीही ती नित्य संपर्कात असायची.
फिल्बी प्रकरण - फिल्बी प्रकरणी तिची भूमिका तर खाशी व वेगळीच आहे. फिल्बी हा मूळचा ब्रिटिश गुप्तहेर पण रशियाला फितुर झाला (डबल एजंट) होता. तो पत्रकाराचा बुरखा पांघरूनही वावरत असे. लेबॅनाॅनची राजधानी बैरूट येथे एका रात्रीच्या भोजनाला (डिनर) तिला व फिल्बीला आमंत्रण होते. पत्रकाराने हमखास हजर असावे, असा तो कार्यक्रम होता. भोजनाला फिल्बी आला नाही. क्लेअर हाॅलिंगवर्थच्या मनात त्याच्या देशनिष्ठेविषयी शंका होतीच, तिने बंदरावर बारीक तपास केला. त्या रात्रीच फिल्बीने युक्रेनमधील (त्यावेळी युक्रेन रशियाचा भाग होता) ओडेसासाठीच्या जहाजातून पलायन केले होते.
या वृत्ताला बित्तंबातमी (स्कूप) म्हणता येणार नव्हते. हा तर बाॅम्बच होता!ब्रिटिश सरकारने गार्डियन वृत्तपत्राला कोर्टातच खेचले असते. शीत युद्धाच्या काळात ही गौप्यस्फोटाऐवजी बदनामीकारक बातमीच मानली गेली असती. ही बातमी छापण्याची गार्डियनच्या संपादकाची हिंमत होत नव्हती. इकडे क्लेअरचा जीव खालीवर होत होता. दुसऱ्या कुणाला ही बातमी मिळाली तर ? पण क्लेअर चतुरही होती. एके दिवशी मुख्य संपादक रजेवर आहे हे पाहून तिने त्याच्या सहाय्यकाकरवी बातमी छापवून आणली आणि दिला बार उडवून! तीन महिने ब्रिटिश सरकार चिडीचूप होते. या काळात कुणाकुणाला सरकारी समन्स आल्याची स्वप्ने रात्री व दिवसाही पडत होती कुणास ठावूक? क्लेअर हाॅलिंगवर्थ तर संपल्यातच जमा झाली असती. पण तीन महिन्यानंतर ब्रिटिश सरकारने जाहीर केले की, ‘फिल्बी रशियाला फितुर (डिफेक्ट) झाला आहे’.आणि क्लेअर हाॅलिंगवर्थ बित्तंबातमी काढणाऱ्यांमधली महाराणी ठरली.
कारकिर्दीची साजेशी अखेर - १९७३ मध्ये क्लेअर हाॅलिंगवर्थची कारकीर्द संपली. शेवटची नेमणूक तिच्या कीर्तीला साजेशीच होती. टेलिग्राफ वर्तमानपत्राने तिची नेमणूक चीनमध्ये केली होती. माओची प्रकृती बिघडत चाललीच होती हे जगाला माहीत होते (की त्याने इहलोकीची यात्रा संपविली होती?). रशियाचा लोखंडी पडदा (आयर्न कर्टन) भेदणे एकवेळ सोपे होते पण चीनचा बांबू कर्टन ? तो अभेद्य मानला जायचा. चीनमध्ये सत्तासंघर्ष सुरू झाल्याचा संशय होता, वार्ता कानावर येत होत्या. अशा परिस्थितीत चीनमध्ये क्लेअर हाॅलिंगवर्थची नेमणूक नाही करायची तर कुणाची? ती चीनमध्ये डोळ्यात तेल घालून वावरत होती. शेवटी ९ सप्टेंबर १९७६ ला चीननेच जाहीर केले की, मध्यरात्रीनंतर दहा मिनिटांनी माओने जगाचा निरोप घेतला आहे.
‘आय जस्ट एंजाॅय इट’ - क्लेअर हाॅलिंगवर्थ आयुष्यभर मृत्यूच्या छायेखालीच वावरत होती. १९४६ साली जेरूसलेममधील किंग डेव्हिड हाॅटेल अतिरेक्यांनी उडवून लावले. जवळपास शंभर लोक मृत्युमुखी पडले. त्यावेळी काही फुटाच्या अंतरावरच क्लेअर हाॅलिंगवर्थचा निवास होता.
 ‘मी काही शूरवीर नाही बरं का?’, क्लेअर हाॅलिंगवर्थ म्हणत असे. संकट प्रसंगातील क्षण मला आवडतात. मी त्यांचा आस्वाद घेत असते ( आय जस्ट एंजाॅय इट). का ते विचारू नका. परमेश्वरानेच मला असे घडविले आहे.मला भीती वाटत नाही, घाबरायला होत नाही,  इतकंच.

No comments:

Post a Comment