Friday, January 13, 2017

अमेरिकेची बदलती राजनीती
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
अमेरिकेत पुराणमतवादी व सनातनी वृत्तीचे लोक बरेच आहेत. त्यामुळे साम्यवादाविरुद्धची आघाडी अमेरिकेत आपोआपच उभी राहत असे. रिपब्लिकन पक्षही परंपरेने याच वृत्तीचा असल्यामुळे लोकसंख्येतील एक मोठा गट या पक्षाकडे विनासायास वळत असे. गेली अनेक दशके हा अमेरिकन राजकारणाचा विशेष राहिला आहे. रिपब्लिकन पक्षाचा ग्रॅंड ओल्ड पार्टी अशा शब्दप्रयोगाने गौरवपूर्वक उल्लेख केला जातो. एकेकाळी अब्राहम लिंकन सारख्या प्रागतिक विचाराच्या महापुरुष या पक्षाचे नेतृत्त्व केले होते, हे ऐकून विश्वास बसणार नाही. पण त्यानंतर या पक्षाची उदारमतवादी भूमिका हळूहळू बदलत गेली. पण आता मात्र ती पार बदलली आहे.
बदलती अमेरिका - असा बदल झाला नसता तर, स्वराष्ट्र सुरक्षेबाबतीतले अतिरेकी अत्याग्रही, मुक्त बाजारपेठेचे खंदे पुरस्कर्ते, परंपरागत रूढीरीतीचे पाईक या जीओपी (ग्रॅंड ओल्ड पार्टी) भोवती गोळा होतेना. रशियन साम्राज्यवादाला जगभर ठिकठिकाणी पायबंद घालण्याचा विडाच जणू  या पक्षाने उचलला होता. ही सर्व मंडळी निरीश्वरवादी बोल्शेव्हिक क्रांतीचे लोण जगभर पोचविणासाठी सर्व सूक्तासूक्त मार्गांचा अवलंब करण्याचा खटाटोप थोपविण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत असत.
आजचा रशिया कसा? - आजचा रशिया मार्क्सिस्ट- लेनिनिस्ट शिकवणीचा (डाॅक्ट्रीनचा) पूर्वीसारखा कडवा पुरस्कर्ता राहिलेला नाही, हे जरी आजचे वास्तव असले तरी अमेरिकेच्या दृष्टीने तसेच तिची मित्रराष्ट्रे व उदारमतवादी भूमिकेचे पुरस्कर्ते यांच्या दृष्टीनेही रशियारूपी संकट पुरते निवारले गेलेले नाही, हेही नजरेआड करून चालणार नाही. रशियाने क्रीमियाला कसे गिळंकृत केले, युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर जगाने केलेल्या निर्भर्त्सनेला कशी केराची टोपली दा.खविली, विरोधाला थोडीही भीक घातली नाही, हा इतिहासही नजरेआड करता येण्यासारखा नाही. सीरियामध्ये इसीसला पायबंद घालण्याचे निमित्ताने रशियाने हस्तक्षेप करतांना केलेली बेफाम बाॅम्बफेक, त्यात गतप्राण झालेल्या निर्दोष, जखमी व लढ्यात प्रत्यक्ष सहभाग नसलेल्या नागरिक व असहाय्य बायामुलांची आक्रंदने यामुळे रशिया किंचितही विचलित झाला नाही, हे सर्व पाहिले की, रशियाचा मूळ स्वभाव निदान पुरतेपणी तरी अजूनही गेलेला नाही, असेच जग म्हणेल व म्हणते आहे. या नरसंहारात बळी गेलेल्या सगळ्यांचा एकच गुन्हा होता, तो हा की त्यातले बहुसंख्य लोक सुन्नी हा इस्लामी पंथ मानणारे होते व इसीस ही सुद्धा सुन्नीपंथीयांचा अंमल जगभर कायम करण्यास निघालेल्या अतिरेकी सुन्नींची संघटना आहे. इसीसचे बहुतेक सर्व समर्थक कडवे सुन्नी असले तरी सर्व सुन्नी इसीसचे समर्थक नाहीत, हे रशियाला दिसत नसेल का? सीरियाच्या  बशीर अल् असाद याला जेवढे सुन्नी मरतील तेवढे हवेच आहेत, कारण यामुळे शिया व सुन्नी यातील सीरियामधील संख्यात्मक समतोल शियांच्या बाजूने झुकेल. पण म्हणून रशियाची अशी मदत असादला जरी पटत असली तरी सुसंस्कृत जगताला पटणारी नाही. पण असा विधिनिषेध जणू रशियाच्या ‘डीएनए’तच नाही. इसीस बद्दल तर बोलायलाच नको. त्यांना युरोप पेटलेलाच हवा आहे. मग त्यात त्यांचीच आहुती पडत असली तरीही.
डोनाल्ड ट्रंप यांचे वेगळेपण - रिपब्लिकन पक्षाने -अब्राहम लिंकनच्या ग्रॅंड ओल्ड पार्टीने-या वेळी दिलेला अध्यक्षपदासाठीचा उमेदवार डोनाल्ड ट्रंप हा रशियाधार्जिणा निघावा, हे नजीकच्या भूतकाळात कधीही घडले नव्हते, नव्हे अमेरिकेतील कोणत्याच पक्षाने अशी निवड केली नव्हती. १९४८ साली प्रोग्रेसिव्ह पार्टीने हेन्री वालास यांची अध्यक्षपदासाठीचा उमेदवार म्हणून निवड केली होती, हाच कायतो अपवाद आढळतो. पण हा अमेरिकेतला त्या काळचा तसा लहान पण ज्याचे बहुसंख्य सदस्य साम्यवादी होते, असा पक्ष होता. गेल्यावर्षी निवडणूक प्रचार मोहिमेत डोनाल्ड ट्रंप  रशियन यांनी सतत रशियाचे अध्यक्ष व एकेकाळचे केजी बी या रशियन गुप्तहेर संघटनेचे एक प्रमुख अधिकारी व्हाल्दिमीर पुतिन यांची स्तुती केली, रशियाभोवती कडे करण्याच्या हेतूने अमेरिकेच्या प्रयत्नातून उभारलेल्या नाटोवर (नाॅर्थ अटलांटिक ट्रिटी आॅर्गनायझेशन) टीका केली आणि आपली प्रतिस्पर्धी उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या ईमेल्स ‘हॅक’ करण्यास (भेदण्यास) क्रेमलीनला (रशियाला) प्रोत्साहित केले, असा त्यांच्यावर आरोप व म्हणून आक्षेप आहे, ही वस्तुस्थिती कुणीही ( हो, कुणीही) नाकारत नाही. एवढेच नाही तर रशियाने क्रीमियाचा टवका तोडून घशात घातल्या नंतर त्या युक्रेनचा भाग असलेल्या भागाला खालसा (अनेक्स) करण्याच्या कृतीला क्षमापित (कंडोन) करून मान्यता द्यावी असा प्रस्ताव मांडला! क्रीमिया हे दीपकल्प (पेनिनसुला- म्हणजे तीन बाजूला समुद्र व एका बाजूला जमीन असलेला भारतासारखा देश/प्रदेश ) आहे. युनोने रशियाच्या या कृतीला जबरदस्तीने घेतलेला तात्पुरता ताबा (आॅक्युपेशन) असे संबोधले आहे. रशियाने या कशालाच भीक घातलेली नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच अशी घटना घडली आहे. हिला मान्यता देणे म्हणजे अमेरिकेने उत्तर कोरिया व क्युबा यांच्या पंक्तीला जाऊन बसण्यासारखे आहे. निवडून आल्यानंतर ईमेल्स बाबतचा आक्षेप डोनाल्ड ट्रंप यांनी फेटाळून लावला असून अमेरिकन गुप्तहेर संघटनेने प्रगट केलेली ही माहिती म्हणजे प्रतिपक्षीयांचे राजकीय षडयंत्र( विच-हंट) आहे, असे म्हणून या प्रचाराची संभावना केली आहे.
रिपब्लिकन नेत्यांच्या विचारात बदल -  पण एक वास्तव स्पष्ट दिसते आहे. डोनाल्ड ट्रंप यांच्या विजयानंतर अनेक रिपब्लिकन नेते त्यांच्यासारखाच विचार व्यक्त करीत आहेत. या ग्रॅंड ओल्ड पार्टीच्या रशियाकडे पाहण्याच्या दृष्टिकोणात बदल होतो आहे. नव्याने झालेल्या माहिती संकलनाच्या एका अहवालानुसार निदान चाळीस टक्के रिपब्लिकन नेते असा म्हणजे ट्रंप सारखा विचार करू लागले आहेत. असे असले तरी पूर्ण देशाचा विचार करता सत्तर टक्के अमेरिकनांना रशियाने अमेरिकन निवडणुकीत केलेल्या दखलअंदाजीची (इंटरफिअरन्स) चौकशी करावी असे वाटते तर रिपब्लिकन पक्षापुरता विचार करतो म्हटले तर असा विचार करणारे जेमतेम पन्नास टक्के किंवा थोडेसेच जास्त सदस्य या विचाराचे आहेत. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत हिलरी क्लिंन याना मत देणाऱ्या बहुसंख्य मतदारांना मात्र (८० टक्के) वाटते की, रशियाने अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेत ईमेल्स भेदण्याच्या (हॅक) निमित्ताने जी ढवळाढवळ केली त्याबद्द्ल रशियाला जाब विचारून धारेवर धरलेच पाहिजे. पण ट्रंप यांना मत देणाऱ्या जेमतेम वीस टक्के लोकांनाच असे वाटते. आपल्यासारख्या त्रयस्थांनी या अमेरिकच्या चारभिंतीतील या मतमतांतराचा गंभीरपणे विचार का करायचा?
निक्सन यांच्या काळातील अमेरिका - आपण अमेरिकेच्या बदलत्या विचाराची दखल घ्यायची ती अशासाठी की, जागतिक राजकीय सारीपटावरील अमेरिकेची भूमिका कूस बदलत असल्याची ही चिन्हे आहेत. या बदलांचा आपल्याशीही सबंध पोचतो. एकेकाळी याच अमेरिकेच्या आणि याच रिपब्लिकन पक्षाच्या त्यावेळच्या अध्यक्षाने म्हणजे रिचर्ड निक्सनने रशियाला चाप लावण्यासाठी आपला चाणक्य हेन्री किसिंजर याच्या सल्यानुसार चीनशी जवळीक करायला सुरवात केली होती असे म्हणतात. आज पारडे फिरले आहे. आता चीन डोईजड झाला आहे. म्हणून तर ट्रंप रशियाशी दोस्ती करण्याच्या प्रयत्नात नाही ना? पण यावेळी हेन्री किसिंजर सारखा कुणी चाणक्य सल्ला द्यायला दिसत नाही. मग ट्रंपमध्ये निक्सन व हेन्री किसिंजर हा अमेरिकन चाणक्य हे दोन्ही एकवटले आहेत, असे मानायचे का? हे राजकीय निरीक्षकांचे भाकित मानायचे, की त्यांनी तोडलेले अकलेचे तारे समजायचे? अर्थात याचा निर्णय काळच करील.  पण मग निक्सनना ज्याप्रमाणे डेमोक्रॅट पक्षाच्या वाॅटरगेट नावाच्या कार्यालयातील बोलणी कळावीत म्हणून मायक्रोफोन बसवण्याच्या उपद्व्यापासाठी बदनाम होऊन पायउतार व्हावे लागले होते, हा इतिहास काय सांगतो? ट्रंप यांची पावले निक्सन यांच्या पाऊलखुणांच्या दिशेने तर जात नाहीत ना? भावी काळात त्यांनाही निक्सन यांच्याप्रमाणे पायउतार व्हावे लागणार नाही ना? अनेक लोक या प्रश्नांना डेमोक्रॅट पक्षाने उडवलेल्या वावड्या म्हणत आहेत. त्यांना निवडणुकीत झालेला आपला पराभव पचवता येत नाही, असे म्हणत आहेत. हे तर आपल्या काॅंग्रेस पक्षासारखे झाले आहे की काय? काही लोक ट्रंपना बदलावे असा सल्ला रिपब्लिकन पक्षाला देत आहेत. हे ऐकून तर आपल्या ममतांचीच आठवण व्हावी, अशी स्थिती आहे. पण असे काहीही होणार नाही. अमेरिकन राजकारणात होऊ घातलेल्या आमूलाग्र बदलांची ही चाहूल आहे, असे मानणाराही एक वर्ग आहे. आपण काय बोध घ्यायचा?  जागतिक राजकारणात कुणी कुणाचा स्थायी मित्र किंवा शत्रू नसतो. स्थायी असतात ते ज्याचे त्याचे हितसंबंध. त्यासाठी कुणीही कोणत्याही टोकाला जाईल. जेम्स किर्चिक नावाचे एक राजकीय भविष्यवेते व विचारवंत आहेत. त्यांच्या आगामी ग्रंथाचे शीर्षक आहे, ‘युरोपचा अंत : हुकुमशहा, भडकावू भाषण करणारे व अंधकार युग यांचा उदय’. ही भविष्यवाणी युरोपपुरतीच मानायची की?��विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन आसेंजयाने स्पष्ट केले आहे की, त्यांना रशियाकडून हिलरी क्लिंटन यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान कोणतीही माहिती पुरविण्यात आली नव्हती. अमेरिकेतील रशियाला अनुकूल असलेल्या रिपब्लिकनांच्या एका गटाला वाटते की, रशियाला बदनाम करण्याची कोणतीही संधी डेमोक्रॅट लोकांना हवी असते व पुरेशी असते. तर दुसऱ्या गटाची भूमिका अशी आहे की, अधूनमधून रशिया विरुद्ध काही ना काही किंवा काहीही मिळाले तरी डेमोक्रॅट लोकांना हवेच असते. कारण हे लोक रशियाला मुस्लिम अतिरक्यांना छुपेपणाने साथ देणारे राष्ट्र अशी रशियाची प्रतिमा रंगवायची असते.
एक ठळक उदाहरण द्यायचे झाले तर ते हाऊस आॅफ रिप्रेसेंटेटिव्हच्या रिपब्लिकन अध्यक्षाचेच देता येईल. न्यूट गिनग्रिच नावाचे हे महाशय हाऊसचे अध्यक्ष असतानाची गोष्ट आहे. नाटोचा विस्तार करावा व त्यात लहानमोठ्या सर्वच पूर्वयुरोपियन देशांनाही प्रवेश द्यावा असा मुद्दा समोर आला तेव्हा डोनाल्ड ट्रंप यांनी भूमिका घेतली की, या देशांनी त्यांच्या संरक्षणापोटी अमेरिकेला  पैसे दिले पाहिजेत.(दे मस्ट पे अस). एखाद्या महानगराच्या उपनगराएवढाही ज्यांचा जीव नाही अशा देशाच्या संरक्षणाचे निमित्ताने अणुयुद्धाचा धोका अमेरिकेने का पत्करावा? न्यूट गिनग्रिच यांनी डोनाल्ड ट्रंप यांची री ओली. रशियाला अर्थातच आनंदाच्या उकळ्या फुटल्या, कारण व्हाल्दिमीर पुतिनला विघटन पावलेल्या सोव्हिएट साम्राज्यात काही कामाचे व उपयोगी देश पुन्हा सोव्हिएट ( प्रांत म्हणून) कोणत्याही पद्धतीने का होईना पण परत रशियात आणायचे आहेतच. इतिहासाकडून माणूस काहीही शिकत नाही, हेच खरे. दुसऱ्या महायुद्धाचा प्रसंग का ओढवला?
म्युनिचमध्ये जर्मनी, इटाली, ब्रिटन आणि फ्रान्स यांनी करार करून झेकोस्लोव्हाक गणराज्याला सुडेटेनलॅंड व संरक्षणाचे दृष्टीने महत्त्वाची ठाणी जर्मनीला बहाल करून शांतता राखण्यास मदत करण्यासाठी  एवढासा(?) त्याग करण्यास एकप्रकारे बाध्य केले. हे म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवण्यासारखेच झाले. शांततातर दूरच राहिली, जर्मन फौजांनी अख्खा झेकोस्लोव्हाकच गिळंकृत केला. रशिया व ट्रंप यांच्या जवळिकीचा हा कदाचित प्रारंभ बिंदू असावा. एखाद्या लहानशा भूभागासाठी किंवा लहानशा राष्ट्राच्या अस्तित्त्वासाठी अणुयुद्धाची जोखीम उचलावी का आणि तही फुकटाफाकटी? विचारशील व संवेदनशील अंत:करणालाच हा मुद्दा अंतर्मुख करू शकेल? दलाई लामांना आश्रय देऊन आपण चीनशी वैर ओढवून घेतले ते योग्य होते का? आपल्याकडेही हा प्रश्न विचारणारे लोक नाहीत का? मग ती तर बोलूनचालून इहवादी अमेरिका आहे. असो.
विकिलीक्सच्या ज्युलियन असांजला पकडून आणा व फसावर लटकवा, असे म्हणणारे डोनाल्ड ट्रंप आज त्याची स्तुती करीत आहेत. का? कारण असे की, ईमेल्सची बितंमबातमी आपल्याया रशियाकडून पुरवण्यात आली नव्हती, असे ज्युलियन असांजने जाहीर केले आहे. त्यामुळे त्याने केलेले गुन्हे (ते गुन्हे खरेच त्याने केले होते किंवा कसे हा प्रश्न अलाहिदाच आहे बरं का) माफ होतात का?  विधिवत व्यवहाराच्या पुरस्कर्त्यांच्या तोंडी हे शब्द शोभतात का? हीच मंडळी एकेकाळी ज्युलियन असांजने अमेरिकेशी युद्ध पुकारले आहे आणि त्यासाठी त्याला मृत्युदंडच द्यायला हवा असे म्हणत होती. म्हणून तो जीव मुठीत धरून वाट मिळेल तसा पळत सुटला आहे/होता.अमेरिकेसारखे बलाढ्य राष्ट्र एखाद्या व्यक्तीच्या/संस्थेच्या/संघटनेच्या जिवावर उठते, तेव्हा त्यावर काही भाष्य करण्याची आवश्यकता आहे का?
आज अमेरिका व रशिया यातील वैर काही काळापुरते का होईना व एकाच प्रश्नापुरते का होईना पण मिटते आहे, याला वाईट म्हणायचे कारण नाही. कोणता आहे हा अलौकिक प्रश्न? तो प्रश्न आहे, इस्लामी दशशतवाद! उद्या हा प्रश्न मिटला असे क्षणभर गृहीत धरून चालू. पण पुन्हा येरे माझ्या मागल्या का? पण डोनाल्ड ट्रंप यांना किंवा अमेरिकेलाच दोष देण्यात काय अर्थ आहे? इतिहासाच्या पानोपानी अशी अनेक उदाहरणे सापडतील. का यालाच इतिहास म्हणायचे.
या प्रश्नाला आणखीही एक आयाम आहे. डोनाल्ड ट्रंप दिनांक २० जानवारीला पदभार ग्रहण करणार आहेत. त्यानंतर ते कोणती भूमिका स्वीकारतात हे पहावे लागेल. मी काय (किंवा काय काय) करतो ते पहाच जरा, असे केवळ रशियाबद्दलच नव्हे तर इतर प्रश्नांबाबतही डोनाल्ड ट्रंप म्हणाले आहेत, असे म्हणतात. शहाण्याने त्या दिवसाची वाट पहावी, हेच बरे होणार नाही का?

No comments:

Post a Comment