Friday, January 13, 2017

‘भारतरत्न महामोहोपाध्याय पांडुरंग वामन काणे स्मृती पुरस्काराचा मानकरी’ - अजित वसंत काणे
वसंत गणेश काणे,
   दिनांक ९/१० जानेवारी २०१६ ला कल्याण येथे काणे कुल संमेलनात अजित वसंत काणेच्या म्हणजे माझ्या मुलाच्या वतीने ‘भारतरत्न महामोहोपाध्याय पांडुरंग वामन काणे स्मृती पुरस्कार’ हा सन्मान मी स्वीकारला आहे. अकरा पेटंट्स व अन्य तीन मार्गस्थ पेटंट्स असा अजितच्या कार्यकर्तृत्त्वाचा आलेख आहे.  त्याचे कार्य पारितोषिक किंवा गौरवपात्र आहे किंवा कसे याबाबत त्याची किंवा आमची खात्री नव्हती. पण आयोजकांनीच शोध घेऊन व माहिती मिळवून सूचना केल्यामुळेच हा योग घडून येत आहे, याबद्दल आम्ही आनंद व आभार व्यक्त करतो. पाच हजार रुपये रोख, मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे हे पारितोषिक आपल्या पुत्राच्या वतीने स्वीकारतांना होणाऱ्या  आनंदाची कल्पना अशाच प्रकारचा अनुभव असलेल्या एखाद्या पित्यालाच पुरतेपणी येऊ शकेल. अमेरिकेत पेन्सिलव्हॅनिया प्रांतात याॅर्क या अमेरिकेच्या पहिल्या राजधानीच्या गावी कार्यरत असलेला तो आणि त्याचे कुटुंबीय कार्यबाहुल्य व व्यस्ततेमुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, म्हणून त्यांच्या वतीने ह्या सन्मानाचा मी विन्म्रतापूर्वक व साभार स्वीकार केला आहे.
    त्याचा पुत्र म्हणजेच माझा नातू ओम्कार याने हाताच्या बोटांच्या हालचालीनुसार नियंत्रित होऊ शकणाऱ्या मानवरहित यानाला, म्हणजेच ड्रोनला, ‘इंटेल इंटरनॅशनल सायन्स ॲंड इंजिनिअरिंग फेअर २०१५’ मधील सर्व सहभागी प्रकल्पात, चौथ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने ओम्कारने उपस्थितांपैकी एका शास्त्रज्ञाची, म्हणजेच २००८ मधील रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते मार्टेन शॅफी यांची भेट घेऊन त्यांच्याशी बातचीत केली. त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले की, स्पर्धेतील यशापयशाला पराभव समजून खचू नका. माझा स्वत:चा प्रकल्प चार वर्षे यशदायी होत नव्हता. मी अगदी खचून गेलो होतो. विषयच सोडून देण्याच्या विचारात होतो. पण माझ्या गाईडने मला प्रयत्न सोडू नकोस, असा धीर दिला. मी त्याप्रमाणे वागलो आणि मला २००८ चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. तोपर्यंत एकही धनवंत मला मदत करण्यास धजावत नव्हता. नंतर मात्र सहकार्यासाठी आतूर असलेल्यांची रीघच लागली.
   उद्योग आणि उत्पादन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘स्टार्ट अप आणि स्टॅंड अप’ या संकल्पना योजना स्वरूपात दिनांक १६ जानेवारी २०१६ या तारखेला आकार घेत आहेत, त्यामुळे उद्योग व उत्पादन क्षेत्रात कार्य करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी एक अमोल संधी उपलब्ध होत आहे. अशीच संधी संशोधन क्षेत्रातही अशाच स्वरूपात लवकरच उपलब्ध होईल, अशी आपण अपेक्षा बाळगू या.
   काणे कुल संमेलनाची कल्पना हा एक स्वागतार्ह उपक्रम आहे. अनेक वर्षांपूर्वी श्री. ज. जोशी यांची 'वृत्तांत' ही कादंबरी वाचली होती. जोशी कुलवृतांतासाठी माहिती मिळावी यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून जी माहिती उपलब्ध झाली त्यावरून असे लक्षात आले की, केवळ तीन पिढ्यात हे जोशी कुलोत्पन्न, जगातील सर्व खंडातील प्रत्येक देशात व जीवनातील प्रत्येक क्षेत्रात पसरले होते. ही या कादंबरीतील एक कल्पित कथा होती. पण आज कोणत्याही कुलाचे बाबतीत ही सत्यकथा असणार, यात शंका नाही. अर्थात काणे कुलही याला अपवाद असणार नाही. ही सगळी माहिती मिळवून संकलित करण्याचे व तिचा आढावा घेण्याचे कार्य अशा संमेलनातून घडून येत असते. त्यामुळे अशा उपक्रमांची महती सांगण्यास शब्द अपुरे पडतात.पुन्हा एकदा सर्वांचे आभार.

No comments:

Post a Comment