Saturday, January 7, 2017

जपानमधील राजंसन्यास
वसंत गणेश काणे

  जपानचे ८३ वर्ष वयाचे सम्राट अकिहिटो यांनी वृद्धापकाळामुळे व प्रकृतीमानही ठीक राहत नसल्यामुळे राज्यत्याग करण्याची इच्छा टिव्हीवर भाषण करून व्यक्त केल्याला बराच काळ उलटून गेला आहे, माझी प्रकृती दिवसेदिवस ढासळते आहे, असे ते म्हणाले. तसे पाहिले तर यात अस्वाभाविक किंवा ज्याला वृत्तमूल्य असावे, असे काहीही नसावे, असाच सर्वसाधारण समज असेल ? पण असे नाही. त्यांच्या भाषणानंतर जपानी विश्वामध्ये निरनिराळे तरंग उमटले आहेत. त्यांना बदललेल्या आंतरराष्ट्रीय घटनांची किनार आहे. या घटनांचा मागोवा जरा वेगळ्या पद्धतीने घेणे उपयोगाचे होईल, असे वाटते. त्यासाठी वर्तमानातून प्रारंभ करून भूतकाळात जावे, हे योग्य व विषय समजण्याचे दृष्टीने सोयीचे ठरेल, अशी अपेक्षा आहे.
अचानक व अनौपचारिक भेट -  जपानचे पंतप्रधान पेरू देशाच्या दौऱ्यावर असतांना ‘ब्रेक जर्नी’ करून न्यू याॅर्कला उतरतात आणि नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची अनौपचारिक भेट घेणारे जागतिक कीर्तीचे पहिले राजकारणी ठरतात, याला एक वेगळे महत्त्व आहे. डोनाल्ड ट्रंप हे राज्यशकट हाकण्यासाठी आपल्या चमूची जमवाजमव करीत असतांनाच ही भेट घडून आली आहे. त्यामुळे ही भेट तशी अनौपचारिकच असणार हे उघड आहे. जपानने स्वत: अण्वस्त्रासकट सर्वच बाबतीत शस्त्रसज्ज होऊन आपल्या सुरक्षेची तजवीज करावी, असे डोनाल्ड ट्रंप हे आपल्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान म्हणत होते. प्रचारादरम्यान केलेली विधाने फारशी गंभीरपणे घ्यायची नसतात, हे आता अमेरिकेतही गृहीतच धरले जाते. ही भेट अनौपचारिक असली तरी मैत्रीपूर्ण स्वरूापासह ती परस्पर विश्वास वाढवणारी ठरली, हे जपानच्या अध्यक्षांचे विधान खरेच मानावयाला हवे. जपानने शस्त्रे (अण्वस्त्रासकट) तयार करू नयेत व बाळगू नयेत, ही अट दुसरे महायुद्ध संपल्यानंतर जपानची शरणागती मान्य करतांना इंग्लंड अमेरिकादी देशांनी जपानवर लादली होती. या मोबदल्यात जपानच्या संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेने घेतली होती. या साठी जी शिबंदी अमेरिकेला पॅसिफिक महासागरात तैनात ठेवावी लागेल, तिच्या खर्चापोटी  जी रकम लागेल, तो खर्च जपानने सोसला पाहिजे, असे काहीसे या. कराराचे स्वरूप होते. सर्व अटींचे पालन करीत जपानने आपले लक्ष युद्धाच्या जखमा भरून काढण्यावर व अन्य प्रगतीपर बाबींवर केंद्रित करून प्रगतीचा उच्चांक गाठला आहे. आता डोनाल्ड ट्रंप यांना जपान व दक्षिण कोरिया यांनी संरक्षणविषयक सर्व जबाबदारी स्वत: शस्त्रसज्ज होऊन उचलावी किंवा त्यासाठी होणऱ्या खर्चाचा भार उचलावावा, असे म्हणण्याचे तसे पाहिले तर कारण नव्हते. खर्चापोटी होणारी रकम जपान व दक्षिण कोरिया सुरवातीपासूनच ठरल्याप्रमाणे अमेरिकेला देत आहेत. त्यात वाढ करून हवी असे म्हणणे वेगळे व यापुढे तुमचे तुम्ही पहा, असे म्हणून हात झटकणे वेगळे. जपानने आज अण्वस्त्रसज्ज व्हावे, असे ठरविले तरी त्यासाठी निदान एक दशक तरी लागेल. अमेरिकेवर संरक्षणासाठी फारकाळ अवलंबून राहता येणार नाही व तसे करणे योग्यही नाही, असा विचार सूप्तपणे जपानमध्ये बळावत चालला होताच, असे एक मत आहे. ते कितपत खरे किंवा खोटे आहे, याची शहानिशा करणे कठीण आहे. पण जपानचे विद्यमान पंतप्रधान शिंझो अबे हे जपानने शस्त्रसज्ज व्हावे, या मताचे आहेत, हे खरे आहे. ते नव्या पिढीचे प्रतिनिधित्त्व करीत आहेत. तरजपानचे सम्राट अकिहिटो हे जपानमधील भीष्मपितामह शोभावेत, असे आहेत. हिरोशीमा व नागासाकीतील मानव संहाराच्या स्मृती तर त्यांच्या मनात ताज्या अणारच. या हल्यातून जे कसेबसे वाचले त्यांना झालेल्या मरणप्राय यातनांचेही ते साक्षीदार असणार, हेही ओघानेच येते. त्यामुळे ते वयोनिवृत्ती घेण्याचा विचार करीत अाहेत असे वृत्त असले तरी जपानने शस्त्रसज्ज व्हावे, त्यातही अण्वस्त्रसज्ज व्हावे हे मत त्यांना मान्य नाही, असे म्हणतात. हे खोटे मानता येणार नाही. पण राजसिंहासनाचा त्याग करणे जपानमध्ये राजालाही सोपे नाही. हा वदतोव्याघात असला तरी ते एक सत्य आहे.
घटनेत पदत्यागाची तरतूद नाही -  पहिली बाब ही की जपानी राज्यघटनेनुसार सम्राटाने तहाहयात पदावर राहिलेच पाहिजे, असे आहे. त्यांना मध्येच पदत्याग करण्याची अनुमती जपानी राज्यघटना देत नाही. सनातनी लोकांना तर सम्राटांचा हा विचार मुळीच रुचणार नाही की मान्य होणार नाही. जपानचे पंतप्रधान शिंझो अबे तसे नव्या विचाराचे व पिढीचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी सम्राटांच्या वयोनिवृत्तीबाबत(?) काय करायचे यावर सरकार गांभीर्याने विचार करील व मार्ग काढील, असे म्हटले आहे.
  सम्राटपदी स्त्री असणार नाही - दुसरे असे की, घटना दुरुस्त करण्याच्या विचाराला प्रारंभ होताच एक मुद्दा नव्याने चर्चेला येणार आहे/नव्हे आला आहे. जपानमध्ये सम्राटपद वारसा हक्काने पुढील पिढीकडे जात असले तरी तो वारस पुरुषच असला पाहिजे, अशी तरतूद घटनेत आहे. सम्राट अकिहिटो यांचा मुलगा राजपुत्र नरुहिटो याला आयको नावाची मुलगी असल्यामुळे घटनेतील तरतुदीनुसार ती सम्राटपदी विराजमान होऊ शकणार नव्हती. आयकोचा जन्म झाल्यावर घटनेत बदल करून आयकोला - एका स्त्रीला - राजसिंहासनावर बसवण्याची तरतूद करण्याचा विचार पुढे आला होता. यासाठी २००५ मध्ये शासनाने तज्ञांची एक समिती नेमून तिला शिफारस करण्यास सांगितले. तिने अनुकूल मतही दिले. पण दरम्यानच्या काळात आयकोला भाऊ मिळाला म्हणजे हिसाहिटोचा - सम्राटाच्या नातवाचा - जन्म झाला. आणि घटना दुरुस्तीचा विचार मागे पडला तो पडलाच. पण आता सम्राटांनी पदत्याग करण्याचे ठरविलेच तर त्यासाठी अनुमती देणारी घटना दुरुस्ती एवीतेवी करावी लागणार आहेच. यावेळी ओघाओघाने सम्राटपदी स्त्री असावी की नसावी हा मुद्दाही चर्चेला येईल, यात शंका नाही.(आज हिसाहिटो हा नातू पुरुष वारस असल्यामुळे हा प्रश्न तातडीचा राहिलेला नाही हा भाग अलाहिदा)
 सम्राटांची राजकीय चाल आहे काय ? - तिसरे असे की, सम्राटाने राजकीय निर्णय घेण्यावर प्रतिबंध आहेत. हे बंधन आजवर सम्राटांकडून  कसोशीने पाळले गेले होते. पण जपानचे राजकारण आज एका वेगळ्याच वळणावर आले असतांना सम्राटांनी हा मनोदय व्यक्त केला आहे. दुसऱ्याच एका कारणास्तव जपानच्या राज्यघटनेत बदल करण्याचा विचार पंतप्रधान शिंझो अबे यांच्या मनात घोळतो आहे. ते कारण  असे की, ‘हिंसाचाराचा व युद्धाचा विरोध’ (पेसिफिझम) या दुसऱ्या महायुद्धानंतर स्वीकारलेल्या भूमिकेला सोडचिठ्टी देण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधान शिंझो अबे त्यांना वाटते आहे. त्या दृष्टीने घटनेत बदल करण्याचा त्यांचा विचार आहे. त्यांचा घटनेत बदल करण्याचा हा मूलगामी विचार आणि सम्राटांनी राजसंन्यास घेण्याची व्यक्त केलेली इच्छा यात काही परस्परसंबंध आहे का, याचा शोध राजकीय निरीक्षक घेत आहेत.
 न धरी शस्त्र करी मी - दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने जणू शस्त्रसंन्यासच घेतला होता. त्या मोबदल्यातच सम्राटपद कायम ठेवण्यास अमेरिका राजी झाली होती, तसेच तिने जपानच्या संरक्षणाची समूल्य हमीही घेतली आहे. या व्यवस्थेत बदल करण्याचा विचार हा साधासुधा विचार म्हणता यायचा नाही. सम्राटपद टिकवण्यासाठी दिलेले शस्त्रसंन्यासाचे अभिवचन १९४५ पासून आतापर्यंत जपानने प्रामाणिकपणे पाळले आहे. आता जपान नव्याने सैन्य उभारणार असेल व शस्त्रास्त्र निर्मितीला (अण्वस्त्रांसकट) प्रारंभ करणार असेल तर जागतिक सत्तासमतोलावर त्याचे फार मोठे परिणाम होतील. अमेरिका, चीन व रशिया या महाशक्तींची याबाबत  भूमिका काय असेल, या विचाराने राजकीय निरीक्षकांची मती गुंग झाली आहे. सम्राटांचा राजीनामा देण्याचा मनोदय ही पंतप्रधान शिंझो अबे यांच्या शस्त्रसज्ज व्हायच्या भूमिकेच्या विरोधातील राजकीय चाल की खऱ्याखुऱ्या आजारपणामुळे  ढासळलेल्या प्रकृतीमुळे उचलेले पाऊल हे लवकरच स्पष्ट होईल.
जपानच्या राजसिंहासनाचे वैशिष्ट्य- जपानच्या राजसिंहासनाला क्रायसॅनथेमम सिंहासन असे नाव आहे. राजप्रासादातील हे खास सिंहासन आहे. जपानचे सम्राट निरनिराळ्या वेळी निरनिराळी सिंहासने वापरतात. नॅशनल डाएट(जपानची संसद) ला उद्देशून भाषण करतांना सम्राट एका वेगळ्याच सिंहासनावर स्थानापन्न झालेले असतात. जपानचे हे राजसिंहासन खूपच जुन्याकाळपासून अस्तित्त्वात आहे. ख्रिस्तपूर्व ६६० ला निर्माण झालेल्या या ‘गादीवर’ सध्याचे सम्राट अकिहिटो हे १२५ वे सम्राट आहेत.
 १९२० साली हिरोहिटो हे राजपुत्र कार्यवाहक शासक (रिजंट) म्हणून काम पाहू लागले कारण खुद्द सम्राट योशिहिटो (तायशो हे मरणोत्तर नाव) यांचे प्रकृतीस्वास्थ्य इतके वाईट होते की, प्रत्यक्षात ते काहीही काम करू शकत नव्हते. जपानी सम्राटांची त्यांच्या हयातीतील नावे व मरणोत्तर नावे वेगवेगळी असतात. योशिहिटो यांच्या मृत्यूनंतर  १९२६ ते १९८९ पर्यंत हिरोहिटो हे सम्राट होते त्यांचे मरणोत्तर नाव शोवा असे आहे. १९८९ पासून सध्याचे सम्राट अकिहिटो असून त्यांचे मरणोत्तर नाव किंजो असेल. हे सिंहासन टिकावे व सम्राटपद कायम रहावे हे जपानच्या आस्थेचे व निष्ठेचे विषय आहेत. त्यासाठी जपानने शस्त्रसंन्यास पत्करला आज राजसंन्यासाच्या शक्यतेमुळे शतकानुशतके सुरू असलेली परंपरा काय नवीन रूप घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.



No comments:

Post a Comment