Saturday, January 7, 2017

लहानपण दे गा देवा - मी म्हशीची धार काढायला शिकतो.
वसंत गणेश काणे
लहानपणच्या आठवणी सलग स्वरुपात आठवत नाहीत. आज सकाळी सकाळी का कुणास ठावूक एकाएकी घरच्या गाईम्हशींची आठवण झाली. त्यावेळी आमच्या घरी दोन गाई व एक म्हैस होती.
म्हैस विकत घ्यायला मी वडलांसबत बाजारात गेलो होतो. तीन चार म्हशी आम्ही पाहिल्या. एक म्हैस मला आवडली(?) होती. पण वडलांचे मत काही वेगळेच होते. मी हट्ट करून पाहिला. पण वडील मला रागवले, ‘तुला यातलं काही कळतं का? यापुढे मी तुला बरोबर आणणारच नाही’, असं म्हणून त्यांनी मला गप्प केले.
म्हैस विकणारा म्हशीची किंमत १४० रु सांगत होता, ही १९४४च्या सुमारासची गोष्ट आहे. घासाघीस होऊन ११० रुपयाला ती म्हैस आम्ही घरी घेऊन आलो. ती अगोदरच व्यायलेली होती. त्यामुळे रेडकू (म्हशीचे पिल्लू) सोबत घेऊन आलो होतो. धार काढायला गुराखी होता. ती त्याला धार काढू देईना. प्रत्येक म्हशीच्या काही खोड्या (सवयी) असतात.
काहींचे मागचे पाय बांधून मगच त्यांची धार काढतात. म्हणून तिचे पाय बांधण्याचा प्रयत्न केला. पण ती पाय बांधू देईना. बहुदा ही सवय तिला नसावी. पण खटपट/झटापट करून तिचे पाय बांधले. तिला ते मुळीच आवडले नसावे. ती थयथय नाचू लागली. पायांनाकाच बसत होता. पायातून रक्त येऊ लागले.
काही म्हशींची धार काढतांना धार काढतांना शीळ ऐकायची सवय असते, असे कुणीसे म्हणाले. वसंता कुठे आहे?, वडलांनी चौकशी केली. मी हजर झालो. नेहमी शीळ घालीत उनाडक्या करीत असतोस. बघू बरं कशी शीळ घालतोस ते? मी शीळ घालू लागलो, पण म्हशीवर परिणाम होत नव्हता. जरा मोठ्यानं शीळ घाल की. नाहीतर एरवी आम्हाला ऐकून ऐकून बेजार व्हावे लागते. पण माझी शीळ काही म्हशीच्या पसंतीस उतरली नसावी. चल, हो बाजूला, वडील खेकसले. आपली शीळ म्हशीला सुद्धा आवडत नाही, हे कळून मी खट्टू झालो. त्यानंतर उभ्या आयुष्यात मी कुणालाही शीळ म्हणून घातल्याचे आठवत नाही.
काही म्हशींची धार काढतांना शेतकऱ्याची बायको समोर उभी राहते. धार काढणारा सगळी धार काढतो की नाही, हे पहायला ती उभी असते. या म्हशीला ही सवय तर नाही ना ? लगेच आई पदर खोचून म्हशीसमोर उभी राहिली. म्हैस खाली मान घालून घमेल्यातले वैरण खात होती. तिने मान वर करून पाहिले सुद्धा नाही. वैरणात पाणी घातलेले काहींना आवडत नाही, काहींना सरकीच हवी असते, ती सुद्धा अगोदर भिजत घातलेली. एक ना दोन. सगळे प्रयोग झाले म्हैस काही दूध काढू देईना. तिची कास भरलेली असायची. सड फुगून तट्ट झाले होते. शेवटी ती म्हैस आम्ही तीस रुपयांना विकून टाकली. ज्याने ती विकत घेतली होती, त्याच्याकडे ती व्यवस्थित धार काढू देत होती. पण तो मात्र आपण फसलो, तीस रुपये वाया गेले, म्हणून आमच्या समोर हळहळत असायचा.
तरी मी म्हटले होते की, ती दुसरी म्हैस विकत घ्या म्हणून? पण आमचं कोण ऐकतो? मागे वडील उभे होते, हे माहित नसल्याने मी बोलून गेलो. पुढचा प्रसंग ऐकण्यात वाचकांना रुचि नसावी, म्हणून सांगत नाही.
मग आमचे ठरले की, पहिल्या वितीचीच म्हैस विकत घ्यायची. म्हणजे तिला खोडी नसतील. आपण लावू त्या सवयी धार काढतांना तिला लागतील.
मला गाईची धार काढता येत असे. म्हशीची धार काढायची म्हणजे अंगठा आणि पहिल्या बोटात चांगलाच जोर असावा लागतो. धार काढणाऱ्यांच्या बोटांना सुद्धा घट्टे पडतात. गाईची धार काढतांना अंगठा मिटण्याची गरज नसते. मी म्हशीची धार काढू का, असे विचारताच, आरशात तोंड पहा एकदा? भावाबहिणींनी खिजवले. शेवटी मी धार काढणाऱ्याशीच गट्टी जमविली. पण त्याने स्वतंत्र भांडे आणायला सांगितले. ते कसे आणणार? माझे बिंग फुटले असते. शेवटी मी एक युक्ती केली. टिप्याला(आमच्या घरच्या कुत्र्याला) आम्ही एका भांड्यात दूध देत असू. ते भांडे मी घेऊन आलो. पण त्या दुधाचं करायचं काय? मग ते टिप्यालाच प्यायला घालू लागलो. तो शेपटी हलवीत ते दूध प्यायचा. पण एक दिवस आईने हे पाहिले. ती रागावली. एवढे दूध तू कुत्र्याला पाजतोस? काय म्हणू तुला? त्या धार काढणाऱ्याला बरेच झाले आहे. तो मुद्दामच दिवसेदिवस अधिकाधिक दूध काढायचे बाकी ठेवत असणार.  ते काही नाही. उद्या पासून घरातले चांगले भांडे घेत जा. किती दूध काढतोस ते मला दाखवीत जा. नंतर नंतर कंटाळा करशील. दूध पुरते काढले नाही तर दुसऱ्या दिवशी म्हैस तेवढे दूध कमी देते म्हणतात. आईने धार काढणाऱ्याचीही चांगलीच सटक काढली. पण एक मात्र झाले. मी म्हशीची धार काढायला शिकलो.

No comments:

Post a Comment