Friday, June 11, 2021

ब्रिटिश साम्राज्याच्या लयानंतर ब्रिटनचेही तुकडे?

युनायटेड किंगडम (युके) / ब्रिटन आकृती प्रत्यक्षाशी तंतोतंत जुळेलच असे नाही युनायटेड किंगडम = {एकमेकांना लागून असलेले इंग्लंड (राजधानी - लंडन) + स्कॅाटलंड (राजधानी- एडिंबरो) + वेल्स (राजधानी- कार्डिफ) आणि भौगोलिक दृष्ट्या वेगळे असलेले तरी युनायटेड किंगडमचा हिस्सा असलेले, नॅार्दर्न आयर्लंड (राजधानी- बेलफास्ट)} वसंत काणे साम्राज्यविलयानंतर आता खुद्द ब्रिटनचेही तुकडे? वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? ग्रेट ब्रिटन/ ब्रिटन आणि इंग्लंड ही नावे आपण नेहमी ऐकतो. युनायटेड किंगडम (युके) हे नावही आपल्या ऐकण्यात आले असेल. या अनेक नावांमुळे अनेकांच्या मनात गोंधळही उडत असेल. म्हणून या नावांमुळे ज्या भूभागांचा बोध होतो, तो सुरवातीलाच स्पष्ट करून घेणे खूप उपयोगाचे ठरणार आहे. युनायटेड किंगडम (युके) / ब्रिटन ची व्याप्ती सर्वात जास्त असून, या राष्ट्रात ग्रेट ब्रिटन आणि नॅार्थ आयर्लंड यांचा समावेश होतो तर ग्रेट ब्रिटनमध्ये इंग्लंड, वेल्स, स्कॅाटलंड हे प्रदेश समाविष्ट आहेत. थोडक्यात असे की, युनायटेड किंगडम (युके) / ब्रिटनमध्ये, इंग्लंड (राजधानी लंडन), वेल्स (राजधानी कार्डिफ), स्कॅाटलंड (राजधानी एडिंबरो), आणि नॅार्थ आयर्लंड (राजधानी बेलफास्ट) यांचा समावेश होतो, हे स्पष्ट होईल. नॅार्दर्न आयर्लंड: भौगोलिक सलगता आयर्लंडशी पण घटक मात्र युनायटेड किंगडमचे आयर्लंडची स्थिती काहीशी वेगळी आहे. व्यावहारिक भाषेत बोलायचे तर हे दोन आयर्लंड हा एक सलग भूभाग आहे. एक आहे, प्रजासत्ताक आयर्लंड. तर दुसरा आहे नॅार्दर्न आयर्लंड. प्रजासत्ताक आयर्लंड हा नावाप्रमाणे हा बेटासारखा स्वतंत्र देश आहे. हा देश युरोपियन युनीयनमध्ये सामील असून तिथेच राहण्याच्या बाबतीत ठाम आहे. आयर्लंडशी भौगोलिक सलगता असूनही नॉर्दर्न आयर्लंड हा भाग मात्र ग्रेट ब्रिटनचा हिस्सा आहे. या भागातील लोकांची जवळीक सहाजीकच प्रजासत्ताक आयर्लंडमधील लोकांशी आहे. त्यात सामील होण्याचीही त्यांची इच्छा आहे. त्यासाठी अनेक वर्षे हिंसक आंदोलने झाली होती. शेवटी 1998 साली एक करार झाला. तो करार गुडफ्रायडे करार या नावे ओळखला जातो. त्यानुसार प्रजासत्ताक आयर्लंडला व नॅार्दर्न आयर्लंड यातील सीमा सदैव अनिर्बंध असतील, येण्याजाण्यासाठी पासपोर्ट लागणार नाही, असे ठरले आहे. शक्तिशाली युनायटेड किंगडमची निर्मिती अशाप्रकारे युनायटेड किंगडम (युके)/ब्रिटन या राष्ट्राभोवती अटलांटिक महासागर, पूर्वेला नॅार्थ सी, दक्षिणेला इंग्लिश चॅनेल, आणि वायव्येला सेल्टिक सी आहे. इतिहास काळात इंग्लंड आणि स्कॉटलंडमध्ये असंख्य युद्धे झाली आहेत. पुढे मात्र इंग्लंड आणि स्कॅाटलंडच्या संसद सभागृहांनी पारित केलेल्या ठरावांना अनुसरून या दोघांचा समावेश असलेले ग्रेट ब्रिटनचे राज्य 1 मे 1707 ला अस्तित्वात आले. पुढे 1801 मध्ये वेल्स युनायटेड किंगडमचा हिस्सा बनले. 1920/1921 मध्ये युनायटेड किंगडम ॲाफ ब्रिटन आणि आयर्लंड यांनी संयुक्तरीत्या ठरविले की आयर्लंडचे नॅार्थ आयर्लंड आणि साऊथ आयर्लंड असे दोन स्वायत्त भाग करून मग ते दोन्ही युनायटेड किंगडममध्ये विलीन करायचे. नॅार्थ आयर्लंड ठरल्याप्रमाणे विलीन झाले पण साऊथ आयर्लंड मात्र एक स्वायत्त प्रजासत्ताक झाले. नॅार्थ आयर्लंडमधील अनेक भूभाग नंतर फुटून साऊथ आयर्लंडमध्ये गेले आहेत. अशी आहे युनायटेड किंगडमची जन्मकथा! युनाटेड किंगडममध्ये एकच केंद्रीभूत सांसदीय लोकशाही आहे. घटनामान्य राजेशाहीही आहे. 1952 पासून एलिझाबेथ (दुसऱ्या) या राणीपदी आहेत. लंडन हे राजधानीचे शहर तर हे जागतिक महत्त्वाचे शहर असून एक जागतिक आर्थिक केंद्रही आहे. फक्त संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारच तेवढे केंद्रीभूत सत्तेकडे म्हणजे युनायटेड किंगडमकडे आहेत. एकेकाळी जगाच्या एकचतुर्थांश भूभागावर ब्रिटनची/युनायटेड किंगडमची सत्ता होती. या ठिकाणी आजही भाषा, संस्कृती, कायदेक्षेत्र आणि राजकीय व्यवस्थापन यांच्यावर ब्रिटनचा प्रभाव दिसून येतो. ब्रिटन म्हणजे जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था, उच्च विकासांक असलेले राष्ट्र, औद्योगिकरणातील एक महत्त्वाचा अग्रणी देश, 19 आणि 20 विसावे शतक गाजवणारी शक्तिशाली महासत्ता, आर्थिक, सांस्कृतिक, सैनिकी, वैज्ञानिक, तांत्रिक आणि राजकीय क्षेत्रांवर छाप पाडणारी महासत्ता. एक अणुसत्ता. शस्त्रास्त्रांवर खर्च करणारी सहाव्या क्रमांकाची ही सत्ता सुरक्षा समितीची स्थापनेपासूनची कायम सदस्य सुद्धा आहे. कॅामनवेल्थ, जी 7, जी 20, नाटो, डब्ल्यूटीओ, इंटरपोल अशा आंतरराष्ट्रीय संघटनांची सदस्यता ब्रिटनला बहाल असून ही बाब त्याच्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाची परिचायक आहे. अर्थात एकेकाळी जगाच्या एकचतुर्थांश भूभागावर ज्या ब्रिटनचे साम्राज्य होते, ज्या ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नसे, असे म्हटले जायचे, त्या युनायटेड किंगडमची ती रया आता राहिलेली नाही, ही वस्तुस्थितीही बरेच काही सांगून जाते आहे. अस्वस्थ युनायटेड किंगडम युनायटेड किंगडमच्या 7 कोटी लोकसंख्येपैकी एकट्या इंग्लंडचीच लोकसंख्या 84 % म्हणजे 5.9 कोटी आहे. स्कॉटलंडची 8 % म्हणजे 60 लाख , वेल्सची 4.7 % म्हणजे 35 लाख तर उत्तर आयर्लंडची 3 % म्हणजे 21 लाख असा उरलेल्यांच्या लोकसंख्येचा ठोकळमानाने हिशोब आहे. सहाजीकच युनायटेड किंगडमच्या राजकारणावर इंग्लंडचा विशेष प्रभाव असतो. यामुळे अन्य तिघांना आपली गळचेपी होते आहे, आपल्याला पुरेसा वाव किंवा महत्त्व मिळत नाही, असे वाटत असे ते सहाजीकच म्हटले पाहिजे. हा वैचारिक अंत:प्रवाह अधूमधून डोके वर काढत आला आहे. युनायटेड किंगडममध्ये सर्वत्र धर्म, भाषा आणि संस्कृती यात साम्य आहे. एकराष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होण्यास, टिकण्यास आणि वृद्धिंगत होण्यासाठी हे तीन घटक महत्त्वाचे मानले गेले आहेत. पण एवढेच पुरेसे नसते, हे आता लक्षात येत चालले आहे. नाहीतर 1934 मध्ये स्कॉटिश नॅशनल पार्टी हा फुटिरतावादी पक्ष जन्माला आलाच नसता. मात्र सुरुवातीला वेगळे होण्याची नव्हे तर स्कॉटलंडला आहेत त्यापेक्षा जास्त अधिकार मिळावेत, अशी मागणी होती. पुढे स्कॉटलंडची समजूत काढण्यासाठी, वेगळी संसद देण्याचा निर्णय 1999 मध्ये साली घेण्यात आला. 1999 च्या संसदेच्या पहिल्या निवडणुकांत स्कॉटिश नॅशनल पार्टीला एकूण 129 जागांपैकी 35 जागा पण 28.7 टक्के मते तर मजूर पक्षाला 59 जागा आणि 38.8 टक्के मतं तर मिळाली. हुजूर पक्षाला 18 जागा तर 15.6 % मते मिळाली. लिबरल डेमोक्रॅट पक्षाला 17 जागा तर 14.2 % मते मिळाली. 2014 सालच्या जनमत चाचणीत 85 % मतदान झाले, यावेळी स्कॅाटलंडच्या 55 % नागरिकांनी ब्रिटनमध्येच राहण्याच्या बाजूने मत दिले होते. 2016 साली मात्र स्कॉटिश नॅशनल पार्टीला एकदम 64 जागा आणि 46.5 टक्के मते, मजूर पक्षाला 24 जागा आणि 22.6 टक्के मते आणि हुजूर पक्षाला 31 जागा आणि 22 टक्के मतं मिळाली. स्कॉटिश नॅशनल पार्टीला मिळालेल्या 64 म्हणजे जवळजवळ निम्या जागा आणि मिळालेली मते 46.5 टक्के मते युनायटेड किंगडमच्या पुरस्कर्त्यांची झोप उडविणारी ठरली. 2021 साली तर स्कॉटिश नॅशनल पार्टीला 64 जागा आणि 47.7 टक्के मते मिळून 2016 च्या तुलनेत जागा जरी तेवढ्याच तरी मते मात्र 1.2 टक्के जास्त मिळाली आहेत, मजूर पक्षाला 22 जागा आणि 21.6 टक्के मते मिळाली म्हणजे 2016 च्या तुलनेत 1 टक्के कमी मते मिळाली आहेत आणि हुजूर पक्षाला 31 जागा आणि 21.9 टक्के मते मिळून 2016 च्या तुलनेत 0.1 टक्के कमी मते मिळाली आहेत. लिबरल डेमोक्रॅट पक्षाला 4 जागा आणि 6.9 टक्के मते, ग्रीन पार्टीला 8 जागा व 1.3 टक्के मते मिळाली आहेत. स्कॉटिश नॅशनल पार्टीने आपल्या 64 जागा कायम राखल्या आहेत. जवळजवळ निम्या जागा आणि मिळालेली मते 47.7 टक्के मते युनायटेड किंगडमच्या पुरस्कर्त्यांची चिंता वाढविणारी ठरली आहेत. मजूर पक्ष, हुजूर पक्ष आणि लिबरल डेमोक्रॅट या तीन पक्षांचा स्वतंत्र स्कॅाटलंडला विरोध आहे. तर आठ सदस्य असलेल्या ग्रीन पार्टीचा स्कॉटलंडच्या स्वातंत्र्याला पाठिंबा आहे. त्यामुळे स्कॅाटलंडच्या संसदेत स्वतंत्र स्कॅाटलंडचा किंवा सार्वमताचा निर्णय घ्या, असा कोणताही ठराव पारित होऊ शकतो, अशी स्थिती आहे. विद्यमान विचारमंथन युनायटेड किंगडमने युरोपीयन युनीयन मधून बाहेर पडू नये, अशी स्कॅाटलंडची भूमिका होती. तरीही ब्रेक्झिट घडले. स्कॉटलंडचा निःशस्त्रीकरणाला पाठिंबा आहे, तर युनायटेड किंगडम अण्वस्त्रधारी राहू इच्छिते. स्कॉटलंडमधील तेल आणि नैसर्गिक वायूच्या भल्यामोठ्या साठ्यांवर स्कॅाटलंडचेच नियंत्रण असावे, अशी स्कॅाटलंडची भूमिका आहे. स्कॅाटलंड आर्थिक दृष्ट्या कमकुवत असेल, सुरक्षा परिषदेत स्कॅाटलंडला स्थान नसेल, त्यापेक्षा एकत्र राहूया, मोठेपणाने वावरू या, असे आवाहन करीत, अन्य पक्षांनी स्कॅाटलंडला भावनिक सादही घातली आहे. पण ब्रिटनमध्ये व्हिप आणि पक्षांतरबंदी कायदा नसल्यामुळे सदस्य त्यांच्या विवेकबुद्धीनुसार मतदान करतात. म्हणूनच स्कॉटिश स्वातंत्र्याचा ठराव स्कॅाटलंडच्या संसदेत संमत होईलच, अशी हमी जशी देता येणार नाही. त्याचप्रमाणे सार्वमत घेतले तर जनतेचा कौल स्वतंत्र स्कॉटलंडच्या बाजूनेच येईल, असे तरी कशाच्या आधारे म्हणणार?

No comments:

Post a Comment