Friday, June 11, 2021

होय, तो वंशविच्छेदच होता. वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? होय, तो वंशविच्छेदच होता. अमेरिकेच्या या स्पष्ट मान्यतेमुळे आर्मेनियनांची चीड बरीचशी शमली असली तरी तुर्की मात्र पार भडकले आहेत. याला आर्मेनियनांच्या दृष्टीने आज प्रतिकात्मक महत्त्वच उरले आहे हे खरे आहे आणि तिकडे अमेरिकेचा नाटोमधला (नॅार्थ अटलांटिक ट्रिटी ॲार्गनायझेशन) एक महत्त्वाचा साथीदार तुर्कस्तान मात्र चांगलाच संतापला आहे. असे होणार याची कल्पना असूनही हा कबुलीजबाबवजा खुलासा केला आहे बलाढ्य अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी. बायडेन यांच्या या एका वाक्याला जगाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान मिळणार आहे. पहिल्या जागतिक महायुद्धातील ऐतिहासिक कत्तल पहिल्या जागतिक महायुद्धात, ॲाटोमन साम्राज्याचे पतन होत असतांना, ही ऐतिहासिक कत्तल घडली आहे. आजवर एकाही अमेरिकन अध्यक्षाने असे स्पष्ट कथन केलेले नाही. ते आजवर या प्रश्नी फक्त शब्दच्छलच करीत आले आहेत. सर्व आर्मेनियन जनतेने या वक्तव्याचे एकमुखाने स्वागत केले आहे. ही बाब मान्य व्हावी, ह्यासाठी आर्मेनियातील कार्यकर्ते एका शतकाहून अधिक काळ सातत्याने आग्रह करीत होते. पण तुर्कस्तानला नाराज करणे, अमेरिकेने आजवर टाळले होते. आता तुर्कस्तानमध्ये नुसता अंगार उफाळला आहे. तुर्कस्तानने साफ नाकारले आहे की, 1915 ते 1917 या काळात जे 15 लाख आर्मेनियन लोक मृत्युमुखी पडले त्याला वंशविच्छेद म्हणताच येणार नाही. पण आज प्रथमच अमेरिकेने अधिकृतरीत्या म्हटले आहे की, 106 वर्षांपूर्वी जे घडले त्याला वंशविच्छेदच म्हणायला हवे. अशाप्रकारे अमेरिकन जनता या वंशविच्छेदात बळी गेलेल्या सर्वांच्या हौतात्म्याचा सन्मान करते आहे. तारीखवार सांगायचे झाल्यास 24 एप्रिल 1915 या तारखेला 250 आर्मेनियन विद्वान आणि सामाजिक नेते यांना इस्तंबूल येथे अटक झाली होती आणि नंतर जे हत्याकांड सुरू झाले ते 15 लाखांची आहुती घेऊनच थांबले होते. तेव्हापासून आर्मेनियन वंशविच्छेद स्मृती दिन 24 एप्रिलला दरवर्षी पाळला जातो. गेल्यावर्षी म्हणजे 2020 मध्ये अध्यक्षपदाचे उमेदवार असतांना ॲाटोमन साम्राज्याच्या विनाशाच्या अखेरच्या वेदनांच्या आठवणींना बायडेन यांनी उजाळा दिला होता. निवडून आल्यानंतर आपण या हत्याकांडाला वंशविच्छेद म्हणून संबोधण्यास मान्यता देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले होते. ते त्यांनी आता पूर्ण केले आहे. तसे पाहता 2019 मध्येच अमेरिकन सिनेटने एकमताने या हत्याकांडाला वंशविच्छेद मानण्याबाबतचा बंधनकारक नसलेला ठराव (नॅानबाइंडिंग युनॅनिमस रेझोल्युशन) पारित केला होता. ॲाटोमन साम्राज्याच्या पतनानंतर लॅासेनच्या तहानुसार आजचे तुर्कस्तान या साम्राज्याच्या लघुरुपात 24 जुलै 1923 ला अस्तित्वात आले आहे. या ठरावाला आणि ज्यो बाायडेन यांच्या वचनपूर्तीच्या वक्तव्याला आज प्रतिकात्मक स्वरुपच असले तरी त्याचे महत्त्व कमी मानले जात नाही. इतिहासकाळात घडलेल्या चुका दुरुस्त करून मानवी हक्कांबाबतची प्रतिबद्धता व्यक्त करण्याचा हा एक प्रकार मानला जातो. हे करतांना आपला नाटोमधला महत्त्वाचा सहकारी नाराज होईल, याची जाणीव असूनही मानवी हक्कासाठीच्या प्रतिबद्धतेचा आपण पुन्हा एकदा स्वीकार करीत आहोत, हे अमेरिकेने जाहीर केले आहे. प्रत्येक कुटुंबातील निदान एकाची हत्या आर्मेनियातील येरेवनस्थित आर्मेनियन सेंटर फॅार अमेरिकन स्टडीजने बायडेन यांच्या वक्तव्याचे स्वागत केले आहे. त्यांच्या मते आजच्या आर्मेनियातील प्रत्येक कुटुंबातील निदान एका तरी पूर्वजाची या ऐतिहासिक कत्तलीत हत्या झालेली आहे. हे वक्तव्य प्रातिनिधिक स्वरुपाचे मानले तरीही या भीषण हत्याकांडाची तीव्रता जाणवल्यावाचून राहणार नाही. या मान्यतेला कायदेशीर मान्यता नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारची भरपाई मिळणार नाही, ही दुर्दैवाची बाब आहे, असे आर्मेनियन सेंटर फॅार अमेरिकन स्टडीजच्या संस्थापकांपैकी एक सुरेन सरग्यासियन यांनी म्हटले आहे. पण त्याच बरोबर आतातरी उरलेली इतर राष्ट्रेही अमेरिकेचे अनुसरण करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आजवर फ्रान्स, रशिया, कॅनडा आणि लेबॅनॅान यासह 30 देशांनी या हत्याकांडाला वंशविच्छेद म्हणून मान्यता दिलेली आहे. खुद्द तुर्कस्तानचे म्हणणे काय आहे ? तुर्कस्तानला हे मान्य आहे की, पहिल्या महायुद्धात ॲाटोमन सैनिकांबरोबर लढतांना अनेक आर्मेनियन मारले गेले हे सत्य आहे. त्यांच्या दु:खाच आम्हीही सहभागी आहोत. पण 15 लाख ही फुगवून सांगितलेली संख्या आहे. तसेच हा वंशविच्छेद नव्हता. कारण अशी काही पद्धतशीर आखणी झाल्याचे आणि ती तशीच पद्धतशीरपणे कृतीत आणल्याचे पुरावे सापडत नाहीत. वंशविच्छेदात या दोन बाबी अभिप्रेत असतात. असा कोणताही कट करून तो अमलात आणला गेलेला नाही. युद्धातील इतर मृत्यूंसारखेच हे मृत्यू आहेत. तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तैय्यिप एर्डोगन यांनी जाहीर केलेले वक्तव्य काहीसे अशा आशयाचे आहे. आजवर कोणत्याही अमेरिकन अध्यक्षाने एवढ्या स्पष्ट शब्दात आर्मेनियन वंशविच्छेदाचा उल्लेख केलेला नाही. रेनॅाल्ड रीगन यांनी आर्मेनिया, कंबोडिया आणि होलोकास्ट अशा तिन्हींचा एकत्र उल्लेख 1981 मध्ये केलेला आढळतो. यानंतर प्रत्येकाने हा विषय टाळलाच आहे. याचे कारण एकच होते. मध्यपूर्वेतील तुर्कस्तान हा अमेरिकेचा नाटोमधला महत्त्वाचा साथीदार होता. त्याला नाखूष करणे अमेरिकेला अडचणीचे ठरले असते. मग आत्ताच काय घडले किंवा बिघडले? एक असे की, तुर्कस्तानने रशियाकडून 440 क्रमांकाची शस्त्रप्रणाली विकत घेतली. दुसरे असे की सीरियाप्रश्नी तुर्कस्तानची भूमिका अमेरिकेला आताशा खूपच खुपणारी झाली आहे. थोडक्यात काय की, सत्याची बाजू घ्यायला सुद्धा असे काहीतरी घडावे लागते. एरवी अमेरिकेने हे सत्य झाकलेलेच ठेवले असते, असे म्हटले तर ते चुकेल का? निवडून आल्यानंतर तीन महिने उलटून गेल्यानंतरही बायडेन यांचे आणि एर्डोगन यांच्याशी बोलणे झाले नव्हते. याचा अर्थ असा होतो की, या दोन देशात आता पूर्वीसारखे घनिष्ट संबंध राहिलेले नाहीत. तीन महिन्यानंतर जे बोलणे झाले त्यातही औपचारिकताच जास्त होती. यात आर्मेनियाचा तर उल्लेखही नव्हता. उलट नाटो शिखर परिषदेच्यावेळी फावल्या वेळात परस्परांच्या हितसंबंधाबाबत आणखी चर्चा करू एवढेच कायते ठरले होते. आश्चर्य असे की, या करारावरची शाई वाळते न वाळते तोच म्हणजे दुसऱ्याच दिवशी बायडेन यांनी ‘आर्मेनियातील हत्या हा वंशविच्छेदच होता’, असे विधान केले आहे. यावर तुर्कस्तानच्या परराष्ट्रीय मंत्र्यांनी लगेचच बायडेन यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. ‘तोंडची वाफ दवडून इतिहास बदलत नसतो’, असे म्हणून त्यांनी बायडेन यांना फटकारून त्यांचे विधान साफ फेटाळले. पण तरीही तुर्की विचारवंतांनी मात्र तुर्की जनतेला एक चाकोरी पलीकडचा सल्ला दिला आहे. अमेरिकेवर टीका करू नका. असे केल्याने हुकुमशहा एड्रोगन याच्या हाती एक हत्यारच मिळेल. अशा वेळी हे हुकुमशहा आपल्या जनतेला भावनिक आवाहन करतात. हा हुकुमशहा परराष्ट्राच्या आपल्या देशावरच्या टीकेचे भांडवल करील. कोरोना आणि आर्थिक विपन्नतेवरून देशाचे लक्ष या प्रश्नावरच केंद्रित व्हावे असा प्रयत्न करील. बायडेन यांनी वेळ साधली बायडेन यांच्या विधानावर ॲड्रोजन आक्रमक भूमिका कदाचित स्वीकारतीलही. पण तिला चडफडण्यापेक्षा जास्त किंमत असणार नाही. कारण प्रत्याघातासाठी तुर्कस्तानपाशी अन्य पर्याय उरलेलेच नाहीत. कोरोना आणि आर्थिक दैन्यावस्थेने तुर्कस्तानचे कंबरडे पार मोडले आहे. तरीही तुर्कस्तानी जनतेला अमेरिकेच्या अध्यक्षाच्या वक्तव्यामुळे संताप येईल आणि त्याचे भावनिक उद्रेकही पहायला मिळतील, हे मात्र खरे आहे. 100 वर्षांपूर्वीचा विषय उकरून काढून एवढा रोष पत्करण्यास अमेरिका तयार का झाली आहे, ते पाहणेही उद्बोधक ठरणार आहे. आर्मेनिया हा कॅाकेशस पर्वताच्या रांगामधला युरोप आणि आशिया यांच्यामधला जेमतेम 30 लाख लोकसंख्या असलेला एक चिमुकला देश आहे. या देशातील संगीत आणि अभिनय क्षेत्रातील कलाकार जगप्रसिद्ध आहेत. त्यांनी लोकसंख्येतील उणीव अत्युच्च कलागुणांनी भरून काढली आहे. पण म्हणून का अमेरिकेचा हा कळवळा आहे? तर तसे नाही. अमेरिकेच्या कळवळ्यामागे सत्यनिष्ठेऐवजी दुसरेच एक व्यावहारिक कारण आहे. ते असे की कॅलिफोर्निया प्रांतात मूळच्या आर्मेनियन लोकांची संख्या बरीच जास्त आहे. त्यांना आपल्या पक्षाकडे वळविण्याची खटपट रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रॅट पक्ष दर निवडणुकीचे वेळी करीत असतात. यावेळी कमला हॅरिस आणि ज्यो बायडेन यांनी आर्मेनियन-अमेरिकन मते आपल्या पक्षाकडे वळवण्यासाठी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती बायडेन यांच्या वक्तव्यामुळे झाली आहे. अशाप्रकारे त्यांनी सत्यकथन साधले, मतेही मिळविली आणि चडफडण्याव्यतिरिक्त निदान सध्यातरी गलितगात्र तुर्कस्तान आणखी काहीही करू शकणार नाही, ही संधीही साधली. म्हणून तर भरतृहीने म्हणून ठेवले आहे, नृपनीती, अनेक रूपा!

No comments:

Post a Comment