Friday, June 11, 2021

ॲंजेला मर्केल यांची लोकविलक्षण कारकीर्द वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? ॲंजेला म्हणजे देवाची संदेशवाहक! या नावाचा उगम प्राचीन ग्रीक साहित्यात पहायला मिळतो. 17 जुलै 1954 ला जन्मलेली ॲंजेला डोरोथी मर्केल ही एक अत्यंत साधी राहणी आणि प्रगल्भ विचारसरणी असलेली जर्मन राजकारणी महिला आहे. ती युरोपीयन युनियनची अनभिषिक्त प्रमुख मानली जाते. तिचा जन्म पश्चिम जर्मनीतला तरी दोन जर्मनींच्या एकीकरणापूर्वी पूर्वजर्मनीत (कम्युनिस्ट) तिचा निवास होता. 1989 पर्यंत ती संशोधक वैज्ञानिक म्हणून काम करीत होती. जर्मन, रशियन आणि इंग्रजी या तीन भाषांवर तिचे प्रभुत्व आहे. दोन जर्मनींच्या एकीकरणानंतर ती राजकारणात आली. नंतर 6 वर्षांनीच म्हणजे 2005 पासून ती जर्मनीच्या चान्सेलरपदी विराजमान आहे. ख्रिश्चन डेमॅाक्रेटिक युनीयन हा तिचा राजकीय पक्ष आहे. ती जर्मनीची पहिली महिला चान्सेलर ठरली आहे. राजकीय विचारसरणी आणि स्वभाव वैशिष्ट्ये ॲंजेला मर्केल यांचा आंतरराष्ट्रीय सहकार्यावर भर असायचा या भूमिकेला अनुसरून त्या युरोपीयन युनीयन आणि नाटोच्या प्रखर समर्थक होत्या. जगातील राष्ट्रे आर्थिक संबंधातून एकमेकांशी जोडली जावेत, असे त्यांचे मत होते. न्युक्लिअर एनर्जी ऐवजी त्या रिन्युएबल एनर्जीच्या पुरस्कर्त्या होत्या. जर्मनीतील सक्तीची लष्करी सेवा त्यांनी रद्द केली. आरोग्यसेवेत अनेक सुधारणा घडवून आणल्या. सीरिया, अफगाणिस्तान आणि इराक मधून आलेलेल्या निर्वासितांबाबत त्यांचे धोरण सहानुभूतीपूर्ण आणि सकारात्मक होते. कोविड-19 बाबत मात्र त्यांचे धोरण धरसोडीचे राहिले असा त्यांच्यावर ठपका ठेवला जातो. तसेच त्यांचे अपारदर्शी व्यवहार आणि तंत्रज्ञाची दूरदृष्टी यामुळे सहकारी त्यांच्यावर काहीसे रुष्ट असायचे. या दोन बाबी नसत्या आणि भूमिका आणखी उदारमतवादी असती तर आजूबाजूच्या देशांवरही त्यांच्या भूमिकेचा प्रभाव कितीतरी मोठ्या प्रमाणात पडला असता, असे त्यांचे टीकाकार म्हणतात. युरोपीयन युनीयन, जी-7 आणि जी-20 या गटात त्यांचे दरारायुक्त ज्येष्ठत्व मान्यता पावलेले होते. मूळच्या कम्युनिस्टशासित पूर्व जर्मनीतून आलेल्या आणि चान्सेलरपदी पोचलेल्या त्या पहिल्या कार्यकर्त्या आहेत. अनेक राजकीय घडामोडींच्या त्या साक्षीदार आहेत. देशातले अरेराव विरोधक, डोनाल्ड ट्रंप यांच्यासारखे उद्धट जागतिक नेते, आघाडीतील नेत्यांचे डावपेच, पक्षामधले बेताल सहकारी या सर्वांना त्या पुरून उरल्या. कुठल्याही कठीण परिस्थितीत त्यांच्या मनाचा तोल कधीही ढळला नाही की आवाज चढला नाही. संवादात त्या समोरच्याशी अगदी शांत आवाजात बोलत असल्या तरी त्या आपल्याला जोखत आहेत, असे त्याला जाणवत असे. सहाय्यकांनी तयार करून दिलेल्या टिपणांवर त्यांचे स्वत:चे प्रभुत्व असायचे. माहिती मिळविण्याच्या बाबतीतली त्यांची उत्कंठा चातक पक्षाला लाजवील अशी होती. वादविवादात त्या कधी कुणाला हार गेल्या नाहीत. त्यांचा बराक ओबामाशी झालेल्या संवादाच्यावेळी एक सहाय्यक उपस्थित होता. आपण एखादा सेमीनार ऐकत आहोत, असे त्याला वाटले. त्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी त्यांना वचकून असत. कारण त्यांच्या खात्याविषयी यांनाच जास्त माहिती असायची. चांगले काम करणाऱ्या सहकाऱ्यांचे त्यांना कौतुक असे. ज्याचे श्रेय त्या त्याला ताबडतोब देत असत. चुकार सहकाऱ्यांना आपण केव्हा बाहेर फेकलो गेलो ते कळतच नसे. एखादा मुद्दा आपल्या सहकाऱ्यांच्यापचनी पडत नाही किंवा पटत नाही, असे त्यांच्या लक्षात येताच त्या चटकन दोन पावले मागे येत. गेल्या वर्षीच्या एका जनमत चाचणीनुसार त्या जगातील सर्वात विश्वसनीय नेत्या मानल्या गेल्या आहेत. फोर्ब्ज मासिकाने तर गेली सतत 10 वर्षे त्यांना जगातील सर्वात शक्तिशाली महिला म्हणून गणले होते. आपण पाचव्यांदा चान्सेलरपदी राहणार नाही, हे त्यांनी स्वत:हून जाहीर केले आहे. तेव्हापासून त्यांच्या गौरवार्थ जर्मनीत मजकुरांचे रकानेच्या रकाने लिहून येत आहेत. 26 सप्टेंबर 2021 ला जर्मनीत राष्ट्रीय निवडणुका होऊ घातल्या आहेत. जर्मन देशाने त्यांना निवृत्तीसमयी उचित असाच सन्मान करीत त्यांचा गौरव केला आहे. घराघरात बालकनीत उभे राहून जनतेने त्यांना टाळ्यांच्या गजरात 6 मिनिटांची मानवंदना दिली. जर्मनी आणि भारत मोदींच्या कार्यकाळात भारत आणि जर्मनी यांच्यात परस्पर सहकार्य आणि सहयोगाबाबत निरनिराळे करार करण्यात आले आहेत. मर्केल यांनी आपल्या मंत्रिमंडळातील अनेक सहकाऱी आणि उद्योजकांसह भारताला तीन दिवसांची भेट दिली होती. खाजगी क्षेत्रांना प्रोत्साहन देण्याच्या विचारांच्या या दोन देशात द्विपक्षीय व्यापार आणखी वाढविण्यावर चटकन एकमत झाले. शेतकी, सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात भारत आणि जर्मनी यात सहकार्य करण्याबाबत करार झाले आहेत. दहशतवाद आणि अतिरेकी कारवायांशी लढा देण्याबाबत या दोन्ही देशात करार झाले आहेत. आज 20,000 भारतीय विद्यार्थी जर्मनीत शिक्षण घेत असून जर्मनी आणखी भारतीयांचे स्वागत करण्यास उत्सुक आहे. . ॲंजेला मर्केल गेली 18 वर्षे 8 कोटी जर्मनांचे नेतृत्व करीत आहेत. सक्षम, कुशल, प्रामाणिक आणि समर्पण भावाने नेतृत्व कसे असते, याचा नमुनाच त्यांनी जगासमोर ठेवला आहे.वायफळ बडबड त्यांना माहीत नाही. आपली छबी सतत जनतेसमोर येत रहावी यासाठी लोकनेते ज्या विविध क्लृप्त्या लढवतात, त्या त्यांच्या गावीही नाहीत. त्यांचा लेडी ॲाफ दी वर्ल्ड म्हणून गौरव केला जातो.पण हे त्यांना आवडलेले नाही. 18 वर्षाच्या त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत मर्यादातिक्रमणाचे एकही उदाहरण शोधून सापडणार नाही. त्यांच्या नात्यातील एकही व्यक्ती सरकारदरबारी जागा अडवून बसलेली सापडणार नाही. आपण अमुक केलं, तमुक केलं असा टेंभा त्यांनी कधी मिरवला नाही. आपल्या कार्यकाळात त्यांनी वारेमाप कमाई केलेली आढळत नाही. त्यांच्या दरबारी कधीही खुशमस्कऱ्यांना थारा मिळत नसे. त्यांनी न कधी मानद पदव्या स्वीकारल्या, न कधी कुणाल्या उपाधी लावू दिल्या. त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना गारद करण्यासाठी कटकारस्थाने रचली नाहीत. शिक्षणाचा विचार करायचा झाला तर त्या त्या केमिकल फिजिसिस्ट होत्या. साधी राहणी त्यांना आवडायची, चमकधमक डामडौल यांचा त्यांना मोह नव्हता. त्यांनी माया जमविली नाही, जमीनजुमला तर सोडाच, साधी कार सुद्धा त्यांच्या नावे नाही, मग खाजगी बोटी, विमाने तर दूरच राहिली. आज जर्मनी शिखरस्थानी आहे, पण त्यांचे कपड्यांचे कपाट आजही 18 वर्षांपूर्वी जसे होते, तेच आणि तसेच आहे. जर्मन लोक आणि जर्मनी देश मात्र आज पूर्वी कधी नव्हता अशा सुस्थितीत आहे, हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे, कुशलतेचे फलित आहे. काही किस्से त्यांच्या सहाय्यकाला एकाने विचारले होते की, त्यांच्यासोबत काम करतानाचा तुमचा अनुभव काय आहे? यावर तो म्हणाला, ‘आपण एखाद्या अणुभट्टीपाशी उभे आहोत असे वाटत असते. ती कशी चालूच असते, चालूच असते, चालूच असते, कधी थांबतच नाही, तसे सोबतच्याला वाटत राहते’. ज्यो बायडेन यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष असतांना एकदा त्यांना भुरळ पाडून भुलवण्याचा प्रयत्न केला होता, असे म्हणतात. पण त्यांनी आपला मुद्दा न सोडता आपल्याला हवे ते त्यांच्याकडून वदवून घेतले आणि नंतरचे सत्र मात्र रद्दच केले. एकदा एका महिला पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला होता. तुम्ही नेहमी त्याचत्या पोशाखात दिसता. तुमच्या जवळ दुसरा सूट नाही की काय? यावर त्यांनी उत्तर दिले होते, ‘अहो, मी सरकारी नोकर आहे, मॅाडेल नाही’. दुसऱ्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल त्या म्हणाल्या होत्या, नाही, आमच्या घरी मोलकरणी नाहीत, स्वयंपाकीण नाही, नोकरचाकरही नाहीत. मी आणि माझे यजमान, आम्ही दोघंच घरची सर्व कामे करतो. असाच एक खवट प्रश्न. ‘तुमचे कपडे कोण धुतं? तुम्ही स्वत: की तुमचे यजमान?’, यावर त्या उत्तरल्या होत्या, ‘वॅाशिंग मशीनमध्ये कपडे मी लावते आणि पुढचं सर्व हे बघतात. पण माझी तुमच्याकडून वेगळ्या प्रश्नांची अपेक्षा होती. सरकार कसं चाललं आहे, कोणत्या योजना यशस्वी झाल्या, कोणत्या झाल्या नाहीत, याबाबत तुम्हाला जिज्ञासा असेल, असं मला वाटलं होतं’. ॲंजेला मर्केल जर्मनीच्या चान्सेलर झाल्यानंतरही एका साध्या अपार्टमेंटमध्ये एखाद्या सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे रहात आल्या आहेत. घरी ना नोकरचाकर न स्वीमिंग पूल! ना बागबगीचा! सगळंच कसं अविश्वसनीय! लोकविलक्षण!! नाही?

No comments:

Post a Comment