Friday, June 11, 2021

कमला हॅरिस - व्यक्ती आणि व्यक्तिमत्त्व वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? भारतीय वंशाच्या कॅन्सरतज्ञ श्यामला गोपालन यांचे जमैकन पती डोनाल्ड हॅरिस अर्थशास्त्राचे भूतपूर्व प्राध्यापक असून आज 81 वर्षांचे आहेत. सिनेटर आणि उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमलादेवी तसेच कायदेपंडित आणि राजकीय विश्लेषक मायालक्ष्मी या हॅरिस दाम्पत्याच्या कन्या होत. दाक्षिणात्य शास्त्रीय संगीतनिपुण श्यामला, वयाच्या 19 व्या वर्षी, 1958 साली, न्युट्रिशन आणि एंडोक्रायनॅालॅाजी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी तशा योगायोगानेच अमेरिकेत आल्या होत्या. 1964 मध्ये याच विषयात त्यांनी पीएचडीची पदवी संपादन केली. नागरीहक्क चळवळीच्या निमित्ताने डोनाल्ड आणि श्यामला यांचा परिचय, पुढे प्रेमात आणि नंतर 1964 मध्ये विवाहात परिवर्तित झाला. पुढे मात्र त्यांच्या कुटुंबाला मतभेदाचे ग्रहण लागले आणि मुली लहान असतांनाच श्यामला 1971 मध्ये घटस्फोट घेऊन वेगळ्या झाल्या. यावेळी मुलींचा ताबा कुणाकडे असावा आणि कौटुंबिक ग्रंथालयातील कोणतं पुस्तक कुणाला मिळावं, या दोन प्रमुख मुद्यांमुळे या दोघात निर्माण झालेली कटुता पुढेही कायम राहिली. 11 फेब्रुवारी 2009 ला श्यामलांचे निधन झाले. डोनाल्ड हॅरिस यांचे आज आपल्या मुलींशी नावापुरतेच संबंध आहेत. डगलस एमहॅाफ हे श्वेतवर्णी ज्यू कमलांचे पती आहेत. कायदेपंडित, समता आणि न्यायोचित व्यवहाराचे खंदे पुरस्कर्ते, अशी त्यांची ख्याती आहे. कमलादेवींना कोल आणि इला अशी दोन सावत्र मुलेच असून ती आपल्या आईला, मॅामला म्हणून (मॅाम आणि कमला यांचा जोडशब्द) संबोधतात. कमला हॅरिस - डेमोक्रॅट उमेदवार डेमोक्रॅट पक्षाच्या नुकत्याच पार पडलेल्या आभासी (व्हर्च्युअल) अधिवेशनात कमलादेवी आपल्या बहुगुणी आईबद्दल भरभरून बोलल्या. आईने अंगी बिंबवलेल्या उच्च मूल्यांमुळेच आम्ही दोघी मुली आजवरची प्रगती करू शकलो आहोत. आमच्यातील स्वाभीमान, खमकेपणा, भारतीय वारशाचा अभिमान ह्या वैशिष्ट्यांचे श्रेय आईने केलेल्या संस्कारांना आहे. घर आणि नोकरी सांभाळत आईने आम्हा दोघींना वाढविले आहे. आपण ज्या कुटुंबात जन्मतो आणि ज्या कुटुंबात विवाह करून प्रवेश करतो, त्यांना आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान असले पाहिजे, असे संस्कार आईने आम्हा मुलींवर घडविले आहेत. अशा आशयाचे उल्लेख कमलादेवींच्या भाषणात होते. आशय आणि अभिव्यक्तीचा उत्कृष्ट नमुना असलेले हे भाषण, स्वराभिनय, स्पष्ट शब्दोच्चार आणि कुणालाही सहज कळेल व समजेल अशा सरलतेने युक्त असून सध्या व्हॅाट्सॲपवर जगभर प्रसृत होत आहे. प्रेरक, आत्मविश्वासाने ओतप्रोत आणि आश्वासकतेचा नमुना असलेले हे भाषण श्रोत्यांना खिळवून ठेवणारे आहे. परंपरेतून स्वत:ला मोकळे केले अमेरिकेत महिला उमेदवार सामान्यत: लाल, पांढरी किंवा निळी वस्त्रे परिधान करूनच प्रचार करतात. पण कमलादेवी हॅरिस यांनी ही प्रथा आणि परंपरा मोडीत काढली आणि बर्गंडी रंगाचा वेश परिधान करून आणि मोत्यांचा अद्ययावत व ठसठशीत नेकलेस ठळकपणे दिसेल असा घालून, उमेदवारी स्वीकारीबाबतचे आपले पहिले भाषण केले. निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी कमला हॅरिस यांची उपाध्यक्षपदाची उमेदवारी आणि त्यानिमित्त केलेले भाषण ही एक ऐतिहासिक घटना ठरणार आहे. या निमित्ताने अमेरिकन राजनीती कूस बदलते आहे. भाषणात त्यांनी आपण स्थलांतरिताची संतती असल्याचेही सांगितले, आपला कृष्णवर्णीय वारसा बेधडकपणे कथन केला आणि भाषणाच्या शेवटी, मोठमोठ्या कृष्णवर्णी, मिश्रवर्णी आणि श्वेतवर्णी कार्यकर्त्यांनी आपल्या अंत:करणात प्रज्वलित केलेली समतेची ज्योत आपण कशी अधिकाधिक तेजाने तेवत ठेवली आहे, याचा अभिमानपूर्वक उल्लेख केला. त्यांचा बर्गंडी रंगाचा डबल ब्रेस्टेड ब्लेझर आणि ट्राउझर आणि मोत्यांचा नेकलेस हे सर्व एक आणखीही एक वेगळीच कहाणी सांगत होते. तसा त्यांचा पोषाख अशा प्रसंगांचे वेळी घालायच्या परंपरागत पोषाखापेक्षा रंग सोडला तर वेगळा नव्हता. पॅंटसूट आणि नेकलेस घालूनच महिला उमेदवार उमेदवारी मिळाल्यानंतर व्यासपीठावर येत असत. पण मग वेगळे काय होते? वेगळा होता तो फक्त रंग! बर्गंडी रंग!! राजकीयक्षेत्रातील क्रियाशील महिलांनी पांढरे कपडे वापरणे हेच अमेरिकेत रूढ झालेले आहे. यामागे एक विशेष हेतू असल्याचे सांगतात. स्त्रीस्वातंत्र्यासाठी झटलेल्या स्त्रीया पांढऱ्या पोषाखात मोर्चे काढून मतदानाचा हक्क मिळावा म्हणून आंदोलन करीत. 2016 साली पक्षाने देऊ केलेली अध्यक्षपदासाठीची उमेदवारी स्वीकारतांनाचे भाषण देतांना हिलरी क्लिंटन यांनीही पांढराच पॅंटसूट परिधान केला होता. पूर्वसुरींशी आपली असलेली प्रतिबद्धता व्यक्त करण्याचा त्यांचा तो एक मार्ग असे. पण कमला हॅरिस यांनी असे केले नाही. त्यांनी बर्गंडी रंग निवडून स्वत:ला या परंपरेपासून वेगळे केले आहे. कमला हॅरिस यांनी आपल्या प्रभावी भाषणात या स्त्रीयांना आदरांजली वाहिली. अनेक कृष्णवर्णी स्त्रीयांचा या चळवळीत कसा क्रियाशील सहभाग असे, ते त्यांनी आवर्जून सांगितले. मताधिकार मिळून इतकी वर्षे झाली असूनसुद्धा अजूनही आम्हा सर्ववर्णीय स्त्रीयांना हक्कांसाठी कसा लढा द्यावा लागतो आहे, असे सांगत त्यांनी मेरी चर्च टेरेल, मेरी मॅक्लिओड बेथून, फॅनी लो हॅमर, आणि डायने नॅश आदींचा गौरवपूर्ण उल्लेख केला. समता, स्वातंत्र्य, न्याय, लोकशाही आणि समान संधी आजही अनेक महिला समता, स्वातंत्र्य आणि न्याय यांच्या अपेक्षेतच आहेत. लोकशाही व समान संधी यांच्या अपेक्षेत तर आपण सर्वच आहोत. सर्व मानव समान आहेत, हा संस्कार अजून रुजायचाच आहे. कोरोना पेक्षाही भयंकर असलेल्या वांशिक भेदरूपी व्हायरसवरची लस कधी तयार होणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अल्फा कप्पा अल्फा कमला हॅरिस यांच्या गळ्यातल्या शुभ्र मोत्यांच्या भारी नेकलेसला एक वेगळाच आणि खास अर्थही आहे. या निमित्ताने त्यांना अल्फा कप्पा अल्फा (एकेए) या संघटनेशी असलेली आपली प्रतिबद्धता व्यक्त करायची होती. अमेरिकेत मोत्यांच्या दागिन्यांची विशेष महति आहे. हिरेजडित दागदागिने घालणे श्रीमंतीचे प्रदर्शन मानले जाते. उंची पण चारचौघीत घालून वावरायचा दागिना म्हणजे शुभ्र मोत्यांचा नेकलेस! या निमित्ताने प्रतिबद्धता व्यक्त करता येते, हौसही साधली जाते आणि शिवाय यात श्रीमंती तोराही नाही. विद्यापीठातील 20 महिलांच्या ज्या गटाने या संघटनेची, अल्फा कप्पा अल्फाची (एकेए) स्थापना केली, त्यांना ट्वेंटी पर्ल्स म्हणून संबोधले जाते. या घटनेच्या स्मरणार्थ आणि त्यांच्याविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठी या मंडळाच्या महिला मोजून 20 मोत्यांची माळ घालतात. उपाध्यक्षपदाच्या उमेदवारीचा स्वीकार करतांना आपण कोण आणि कशासाठी आहोत, हे जगजाहीर करण्यासाठी कमला हॅरिस यांच्या गळ्यात हा वीस शुभ्र मोत्यांचा नेकलेस होता. हिरव्याकंच व चमकदार पानालाही शुभ्र व अस्सल मोत्याच्या बरोबरीचे स्थान अल्फा कप्पा अल्फा संघटनेत आहे. हिरवाकंच रंग सळसळत्या तारुण्याचे तर शुभ्र मोती शुद्धता व हुशारीचे प्रतीक मानले जाते, आत्ताआत्तापर्यंत प्राण्यांना मात्र स्थान नव्हते. पण आता उंच उडी मारून उद्दिष्ट गाठण्याच्या क्षमतेचे प्रतीक म्हणून ही मंडळी ताडकन उडी मारणारी बेडकेही आस्थेने बाळगू लागली आहेत. ‘स्की - वी’ 20 पैकी 16 मोती संस्थापकांच्या सन्मानासाठी तर उरलेले 4 मोती, विद्यमान विद्वान सदस्यांचे प्रतिनिधित्व करणारे असतात. अल्फा कप्पा अल्फा संघटनेचे उद्दिष्ट श्रेष्ठ दर्जाची विद्वत्ता व नीतिमत्ता, एकता, मैत्री व भगिनीभाव यांची निर्मिती व्हावी, हे आहे. याशिवाय युवतींसमोरच्या समस्यांचे निराकरण व्हावे, त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळावी, यासाठीही ही संघटना प्रयत्न करते. एकमेकींचे स्वागत करतांना आपण जसे ‘नमस्ते’ म्हणतो तसे या सदस्या ‘स्की - वी’, असे म्हणून एकमेकींबद्दल स्नेह व आदर व्यक्त करतात. ‘सुसंस्कृतपणा आणि गुणवत्ता’, हे या संस्थेचे बोधवाक्य आहे. एक प्राचीन ग्रीक अक्षर हे या संस्थेचे बोधचिन्ह आहे. ही प्रतीके, ही चिन्हे व या प्रथा यांना प्राचीन ग्रीक संस्कृतीत आधार सापडतो, असे अनेक मानतात. या संघटनेची सदस्या चारचौघीत उठून दिसणारी, सभागृहात ताठ मानेने प्रवेश करणारी. एकतर दरारायुक्त नजर असलेली किंवा चेहऱ्यावर समाधानाचे भाव असलेली तरी असते. तिची चालही राजेशाहीच असणार. या सर्वातून तिची पुरुषांबरोबरची बरोबरी आणि तदनुषंगिक वैशिष्टे उठून दिसतात/ दिसली पाहिजेत. कमला हॅरिस भाषण करण्यासाठी आपल्या स्थानावरून उठून व्यासपीठावर येताना पाहतांना या सर्व बाबी प्रेक्षकांच्या नजरेतून सुटल्या नसणार. अमेरिकन राजकीय क्षितिजावर निर्णायक स्त्रीशक्तीचा उदय होत असल्याची खात्री पटविणारे कमला हॅरिस यांचे भाषण, जनतेच्या स्मरणात कायमचे घर करून बसले असणार, यात तिळमात्र शंका नाही!

No comments:

Post a Comment