Friday, June 11, 2021

धुमसत्या गाझा पट्टीत वरवरची शांतता? वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? मुळात पॅलेस्टाईन या नावाने ज्या भूभागाचा बोध होत असे तो प्रदेश पश्चिम आशियात असून तो लेबॅनॅान, सीरिया, ट्रान्स जॅार्डन, आणि इजिप्त या देशांनी वेढलेला आहे आणि उरलेला भाग भूमध्य समुद्राला लागून आहे. 1947 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या योजनेनुसार या भूभागाचे मुलखावेगळी फाळणी करून दोन देशात विभाजन करण्यात आले. विखुरलेल्या अरबबहुल भागांना पॅलेस्टाईन आणि तशाच ज्यूबहुल भूभागांना इस्रायल हे नाव दिले गेले. तसेच जेरुसलेम या शहरावर मात्र आंतरराष्ट्रीय नियंत्रण असावे, असे ठरले. कारण एकतर ज्यू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या तिन्ही धर्मांची पवित्र स्थळे जेरुसलेममध्ये आहेत म्हणून आणि दुसरे म्हणजे, जेरुसलेममध्ये ज्यू आणि अरब यांची संख्या समसमान असल्यामुळेही जेरुसलेमबाबत असा वेगळा निर्णय केला गेला. सोबतच्या 1947 च्या युनोने प्रसिद्ध केलेल्या नकाशात ज्यूबहुल खंडित इस्रायल धूसर रंगात, तसाच अरबबहुल पॅलेस्टाईन धवल प्रकारे आणि आंतरराष्ट्रीय नियंत्रित जेरुसलेम चौकटीला लागून दाखवले आहेत. अरबबहुल पॅलेस्टाईनमधील वेस्ट बॅंक (पश्चिम किनारा) आणि गाझा पट्टी हे दोन विलग प्रदेश धवल रंगात दिसत आहेत. जन्म होत नाही तोच युद्ध ही व्यवस्था ज्यूंनी स्वीकारली पण अरब राष्ट्रांनी ती फेटाळली. संयुक्त राष्ट्रांनी ही घोषणा करताच इजिप्त, सीरिया, इराक, ट्रान्स जॉर्डन या देशांनी इस्रायलवर हल्ला केला. नुकत्याच जन्मलेल्या इस्रायलने बहाद्दुरी दाखवीत या सर्व देशांना हकलून तर लावलंच शिवाय त्यांच्याकडील जमीनही हिसकावून घेतली. ही जिंकलेली जमीन त्यांच्या वाट्याला आलेल्या मूळ भूभागापेक्षाही जास्त होती. या युद्धानंतर इस्रायलचे क्षेत्रफळ दुप्पट आणि आकार पुष्कळसा सलग झाला. या युद्धाच्या काळात लाखो अरब लोकांनी पलायन केलं आणि आजूबाजूच्या अरब देशांमध्ये आश्रय घेतला. याचवेळी गाझावर इजिप्तने ताबा मिळवला तर वेस्ट बँकवर जॉर्डनने कब्जा केला, पॅलेस्टाईनचा उरलेला जवळजवळ सर्व भाग इस्रायलच्या ताब्यात आला. 1967 चा भीम पराक्रम सीरिया, जॅार्डन आणि इजिप्त यांनी 1967 मध्ये पुन्हा एकदा इस्रायलवर हल्ला केला. या 6 दिवसांच्या युद्धातही इस्रायलने ब्रिटन आणि फ्रान्स या मित्रांच्या साह्याने या तिन्ही देशांना धोबीपछाड दिली. इजिप्तकडून गाझापट्टी आणि सिनाई वाळवंट जिंकून घेतले. सीरियातील गोलन हाईट्स या सामरिक दृष्ट्या महत्त्वाच्या उंच टेकड्या ताब्यात घेतल्या. शिवाय जॅार्डनला वेस्ट बॅंकमधून हकलून लावले. पुढे मात्र फक्त सिनाई वाळवंट इस्रायलने इजिप्तला परत केले. 1978 चा कॅंप डेव्हिड करार या नंतरही इस्रायलवरचे शेजारच्या देशांकडून होणारे हल्ले काही थांबत नव्हते. 1973 मध्येही इजिप्त आणि सीरियाने इस्रायलवर हल्ला केला. पण व्यर्थ! . मात्र या निमित्ताने एक चांगली गोष्ट घडून आली ती अशी की, इजिप्त आणि इस्रायल यांच्यात युद्धानंतर संवाद घडून आला आणि इजिप्तने म्हणजे पहिल्या अरब देशाने इस्रायलला एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली, तर इस्रायलनेही इजिप्तचा हिसकावून घेतलेला भाग परत केला. 1978 च्या कॅम्प डेव्हिड करारानुसार हे घडून आलं. पण खुद्द इजिप्तनमध्ये इस्रायलला मान्यता दिल्यामुळे संतापाची लाट उसळली आणि पुढे तर इजिप्तच्या राष्ट्रपतींची हत्याही करण्यात आली. इस्रायल कुणालाही हार जात नाही याची तीन ते चारदा खात्री पटल्यामुळे इराण, तुर्कस्तान आणि आता लेबॅनॅान वगळता अन्य अरब देशांनी शांततेचा मार्गच निवडला. अंतर्गत संघर्षाला प्रारंभ आणि ओस्लो करार अरब देशांकडून होणारे बाहेरचे हल्ले थांबले, हे इस्रायलचे मोठेच यश होते. पण आता अंतर्गत संघर्षाला प्रारंभ झाला. पॅलेस्टाईनचे जे जे भाग इस्रायलने जिंकून घेतले होते, त्या भागातील अरबांनी उठाव केला. त्यांनी पॅलेस्टाईन लिबरेशन ॲार्गनायझेशनची (पीएलओ) स्थापना केली. सशस्त्र संघर्ष करून पॅलेस्टाईनमधील त्यांच्यामते मूळनिवासी असलेल्या अरबांच्या हक्कांचे रक्षण करायचे एवढेच त्यांचे उद्दिष्ट होते. इथे एक मुद्दा लक्षात ठेवायला हवा आहे, तो हा की, पॅलेस्टाईन लिबरेशन ॲार्गनायझेशन (पीएलओ) इस्रायलमध्ये राहणाऱ्या अरबांच्या हक्कांसाठी भांडत होती. ते हक्क अरबांना मिळत असतील तर तिचा इस्रायलला फारसा विरोध नव्हता. 1993 साली अमेरिकेने इस्रायल आणि पीएलओ यात ओस्लो शांतता करार घडवून आणला. या करारानुसार इस्रायल आणि पीएलओ यांनी एकमेकांच्या काही मागण्या मान्य केल्या आणि वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. हमासचा उदय आणि संघर्षाचे बदललेले स्वरुप पण याच सुमाराला हमासचा उदय झाला. अनेक देशांनी दहशतवादी ठरविलेल्या हमासची विचारधारा पीएलओपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. तिला इस्रायलचे अस्तित्वच मान्य नाही. हे लोक सुन्नी असून धर्मग्रंथांना शब्दश: मानणारे कडक सनातनी आहेत. स्थानिक निवडणुकीत उतरून पूर्ण गाझापट्टीवर आणि इस्रायलच्या ताब्यातील वेस्ट बॅंकमधील अनेक ठिकाणी हमासने स्थानिक स्वराज्य संस्थांवर ताबा मिळवला आहे. यांना ओस्लो करार अमान्य असून त्यांनी इस्रायलला नष्ट करण्याचा विडाच उचलला आहे. सहाजीकच तसाच निश्चय इस्रायलनेही हमासबाबत केला आहे. वेस्ट बॅंकची आजची स्थिती सध्या वेस्ट बॅंकवर जरी इस्रायलचा ताबा असला, तरी फक्त 42 टक्के भागावरच इस्रायलला मान्य असलेल्या पॅलेस्टेनियन ॲथॅारिटीचा अंमल चालतो. पण उरलेल्या 58 टक्के भागात इस्रायलचे अस्तित्वच मान्य नसलेल्या हमासचाच वरचष्मा आहे आणि 40x10 चौरस किमी क्षेत्रफळाची गाझा पट्टी तर पूर्णपणे हमासच्याच ताब्यात आहे. या गाझा पट्टीतच सध्याचा टोकाचा संघर्ष सुरू होता. इराणच्या न्युक्लिअर प्रकल्पांवर इस्रायलने नुकत्याच केलेल्या हल्यांमुळे इराण खूपच भडकला आहे. जेरुसलेममधील आताच्या धार्मिक संघर्षाचे निमित्त मिळताच इराणच्या चिथावणीला बळी पडून हमासने इस्रायलवर अचानक रॅाकेट हल्ला सुरू केला. हमासला याची पुरेपूर किंमत चुकवावी लागेल, असा सज्जड दम इस्रायलने दिला आहे. इस्रायलने हा प्रश्न कायमचा निकालात काढण्याचा हेतू समोर ठेवून कृती केलेली दिसते आहे. इस्रायलच्या आयर्न डोम शील्डने हमासची मनुष्यवस्तीवर पडू शकणारी बहुतेक रॅाकेट्स हवेतच निष्प्रभ केली आहेत. गाझा पट्टीतील महत्त्वाची सैनिकी केंद्रे इस्रायलने मनुष्यहानी टाळण्यासाठी पूर्वसूचना देऊन मगच नष्ट केली आहेत. याला अपवाद आहे तो नागरी वस्त्यांची ढाल करून रॅाकेट डागणाऱ्या हमासच्या सशस्त्र केंद्रांचा! जेरुसलेमचा तिढा जेरुसलेम शहरात ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मीयांची समसमान संख्या आणि महत्त्वाची धार्मिकस्थळे आहेत. इस्रायलने हे संपूर्ण शहर नियंत्रणाखाली घेतल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर वाद आणि स्थानिकस्तरावर गृहयुद्ध, सुरू झाले आहे. संयुक्त राष्ट्राच्या 1947 च्या करारानुसार, जेरुसलेम हे शहर इस्रायलला देण्यात आले नव्हते. आतातर इस्रायलने राजधानीही तिथेच नेली आहे. पण अमेरिका वगळता इतर सर्व देशांच्या वकिलाती मात्र अजूनही तेल अविव मध्येच आहेत. विस्थापितांना परत घेण्यास नकार का म्हणून? देश सोडून गेलेल्या लाखो मुस्लिमांना इस्रायलमध्ये परत घेतलं जावं अशी मागणी आज ना उद्या पुढे येईलच. इस्रायलची आजची लोकसंख्याच मुळी 90 लाख आहे, त्यात या मुस्लिमांना प्रवेश दिला तर ज्यू आणि मुस्लिम यातील संख्येच्या प्रमाणात होणारा बदल ज्यूंसाठी खूपच त्रासदायक ठरेल. आजच इस्रायलमध्ये 21 टक्के मुस्लिम आहेत. त्यात ही भर, म्हणजे विचारायलाच नको. त्यामुळे या प्रश्नी तडजोडीची शक्यता मुळीच दिसत नाही. इस्रायलचा ताबा असलेल्या वेस्ट बॅंकमध्ये अनेक छोटी स्थाने अशी आहेत की, तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हमासचे प्रतिनिधी निवडून आले आहेत. नकाशात ही स्थाने ठिपक्यात दाखविली आहेत. तिथेही कटकटी, भांडणे आणि चकमकींच्या स्वरुपात गृहयुद्ध सुरू आहे. अरबांनी काढलेल्या कुरापतीमुळे गाझामध्ये तर सध्याचा भडका उडाला होता. तेल उत्पादनक्षेत्राजवळील हा संघर्ष पुन्हा तेल भाववाढीचे संकट निर्माण करू शकेल. म्हणून विचारसरणी जपणारे या नात्याने हमासला किंवा इस्रायला पाठिंबा देणारे असोत वा हितसंबंधांवर नजर ठेवून हमासची किंवा इस्रायलची पाठराखण करणारे असोत, या सर्वांनाच हा संघर्ष लवकर संपायला हवा होता. पण आता संघर्ष शमला असला तरी जेरुसलेम, वेस्ट बॅंक आणि गाझा पट्टी हे समिश्र लोकसंख्या असलेले भाग धुमसतच राहणार आहेत. पुढेमागे संघर्षविराम करावाच लागला तर त्यापूर्वीच प्रतिपक्षाचे जास्तीतजास्त नुकसान करण्याचा दोन्ही पक्षांचा विचारही स्पष्ट दिसत होता. त्यामुळे आता संघर्ष थांबला, निदान विस्तृत युद्धात परिवर्तित झाला नाही आणि जागतिकस्तरावर झालेले तडजोडीचे प्रयत्न यशस्वी झाले, ही समाधानचीच बाब म्हटली पाहिजे.

No comments:

Post a Comment