Friday, June 11, 2021

अमेरिकेतील ध्रुवीकरणाचे प्रयोग वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? अमेरिकेत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या जोडीला (टिकेट) मतदान करावे लागते. एका पक्षाचा अध्यक्षीय उमेदवार व दुसऱ्या पक्षाचा उपाध्यक्षीय उमेदवार अशी निवड करता येत नाही. 2020 मध्ये रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे व उपाध्यक्षपदाचे उमेदवार, 2016 साली होते तेच, म्हणजे डोनाल्ड ट्रंप (वय वर्ष 74) आणि माईक पेन्स (वय वर्ष 61) हेच राहतील. डेमोक्रॅट पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून वयस्क जोसेफ बायडेन (वय वर्ष 78) हे निश्चित असून, बराक ओबामा आणि हिलरी क्लिंटन यांच्या सल्यानुसार तरूण, तडफदार, प्रचार आणि निधिसंकलननिपुण कमलादेवी हॅरिस (वय वर्ष 55) या नुकत्याच उपाध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून निश्चित झाल्या आहेत. निवडून आल्यास त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष असतील. तसेच 2024 मध्ये अध्यक्षपदाच्याही उमेदवार असू शकतील. परस्परपूरकतेचे फंडे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांपैकी एक उत्तरेकडचा असेल तर दुसरा दक्षिणेकडचा, एक पुरूष तर दुसरा महिला उमेदवार, एक श्वेतवर्णी तर दुसरा अश्वेतवर्णी असावा, यासारखे व्यावहारिक फंडे अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या गळी उतरवण्यात पक्षश्रेष्ठी बहुदा यशस्वी होतात व उपाध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित केला जातो. पण याबाबत डेमोक्रॅट पक्षाचे मात्र आत्ताआत्तापर्यंत ठरत नव्हते. अर्थातच ध्रुवीकरणाचा एका पक्षाचा प्रयोग फळतो, त्याचवेळी दुसऱ्याचा फसलेला असतो. परस्परपूरकतेसाठी डेमोक्रॅट पक्षाने आजवर निवडलेले उमेदवार 2008 व 2012 मध्ये इलिनॅाईसचे गोरेतर व मिश्रवर्णी सिनेटर बराक हुसेन ओबामा (वय वर्ष 47) हे डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार होते. ओबामा हे डेमोक्रॅट पक्षातील राजकारणी आणि व्यवसायाने अटर्नी म्हणून ओळखले जात. 2008 साली अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आलेले ते पहिले आफ्रिकन-अमेरिकन आहेत. तसेच त्यांचे दोनदा निवडून येणे, ही घटना केवळ अमेरिकेच्या इतिहासातीलच नव्हे तर जगाच्या इतिहासातीलही महत्त्वाची घटना ठरली आहे/ठरते आहे. त्यांचा जन्म दूरच्या पॅसिफिक महासागरातील हवाई बेटामधील मधील होनोलुलु इथला होता. म्हणजे जन्माने ते उत्तर अमेरिकेतील सलग असलेल्या 48 राज्यापैकी एकाही राज्यातले नव्हते. त्यांची अमेरिकन ख्रिश्चन आई तशी मूळची युरोपातली होती. वडील अमेरिकन आफ्रिकन होते. 2008 व 2012 मधील डेमोक्रॅट पक्षाचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार, डेलावेअरचे सिनेटर, ज्यो बायडेन यांचाही पिंड राजकारण्याचाच आहे. 2016 मध्ये डेमोक्रॅट पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी, न्यूयॅार्कच्या सिनेटर, हिलरी क्लिंटन (वय वर्ष 69 ) या होत्या. कुशल राजकारणी, परराष्ट्र नीती निपुणता, लेखिका, कायदेतज्ञ, प्रभावी वक्तृत्व हे त्यांचे गुणविशेष होते. त्यांना डोनाल्ड ट्रंपपेक्षा पॅाप्युलर व्होट (जनमत) जास्त मिळून सुद्धा, इलेक्टोरल व्होट्स कमी पडल्यामुळे (50 पैकी फक्त 20 राज्येच अनुकूल) त्या पराभूत झाल्या. 2016 मध्ये डेमोक्रॅट पक्षाचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार, व्हर्जिनियाचे सिनेटर, टिम केन (वय वर्ष 58) हे अर्थतज्ञ व संशोधक म्हणून काम कार्यरत होते. अमेरिकेतही कमळ फुलणार का? दोनदा उपाध्यक्ष असलेले, जोसेफ बायडेन आता 2020 मध्ये डेमोक्रॅट पक्षातर्फे अध्यक्षपदाची निवडणूक लढवीत आहेत. सुसान राईस (कधीही निवडणूक न लढवणाऱ्या पण बायडेन यांच्या जुन्या व विश्वसनीय कृष्णवर्णी सहकारी), ॲमी क्लोबुचर, कमला (पूर्ण नाव कमलादेवी!) हॅरिस, डावीकडे कल असलेल्या इलिझाबेथ वॅारेन, टॅमी डकवर्थ, कॅदरीन मॅस्टो, स्टॅन्सी अब्राम (कृष्णवर्णी) यापैकी एकीचेही नाव घेण्यास ज्यो बायडेन तयार नव्हते. कारण असे की, कुणाही एकीची निवड केल्यास जशी मिळणाऱ्यांच्या मतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता होती, तसेच तिच्या निवडीमुळे काही मते गळण्याची भीतीही होती. ही बेरीज वजाबाकी लक्षात घेऊन त्यांना उपाध्यक्षपदाचा उमेदवार ठरवावा लागणार होता. ही अवघड शृंगापत्ती (डायलेमा) कमलादेवी हॅरिस यांची, एका गौरेतर मिश्रवर्णी, तरूण, तडफदार महिलेची उपाध्यक्षपदाची उमेदवार म्हणून निवड करून डेमोक्रॅट पक्षाने एकदाची संपविली आहे. कॅलिफोर्नियातील सिनेटर, कायदेपंडित कमलादेवी हॅरिस या राजकारणपटूही आहेत. त्यांच्या मातोश्री, कर्करोगतज्ञ, चेनैच्या श्यामला गोपालन या भारतीय तर वडील डोनाल्ड हॅरिस हे आफ्रिकन (जमैकन) आहेत. डगलस एमहॅाफ हे ज्यू बिजवर (घटस्फोटित) त्यांचे पती आहेत. भारदस्त भाषाप्रयोग करणारे, व्यवसायाने वकील, खिलाडू वृत्तीचे गोल्फ खेळाडू, समता आणि न्यायोचित व्यवहाराचे खंदे पुरस्कर्ते, अशी त्यांची ख्याती आहे. कमलादेवींचेही आपल्यापेक्षा फक्त सातच दिवसांनी मोठ्या असलेल्या पतीवर निरतिशय प्रेम आहे. माझा जोडीदार विनोदी, कनवाळू, शांत स्वभावाचा, प्रेमळ, माझ्या स्वयंपाकावरही बेहद्द खूष असलेला एक खराखुरा महापुरुष आहे, या शब्दात कमलादेवींनी आपल्या श्वेतवर्णी पतिराजांची महती वर्णिली आहे. कमलादेवींना कोल आणि इला अशी दोन सावत्र मुलेच असून ती आपल्या आईला, मॅामला म्हणून (मॅाम आणि कमला यांचा जोडशब्द) संबोधतात. अशाप्रकारे भारतीय आई, आफ्रिकन पिता आणि श्वेतवर्णी ज्यू पती अशा त्रिवेणी संगमात कमलादेवींचा सुघटित चौकोनी संसार न्हाहून निघाला असल्यामुळे, अमेरिकन जनमानसात (विशेषत: सर्व अल्संख्यांकात) त्यांची प्रतिमा आणि प्रतिष्ठा बरीच उजवी आहे. गोऱ्या, काळ्या आणि भारतीय (आशियायी) या तिन्ही समुदायांची मते बहुगुणी कमलादेवी हॅरिस खेचू शकतात, असा विचार करीत ज्यो बायडेन यांनी त्यांची निवड करून, एका उत्तम व निरोगी निवडणूक नीतीचे उदाहरणच घालून दिले आहे. पण भारत-अमेरिका संबंधात या दोघांचेही फारसे योगदान दिसत नाही. त्या चीनचा विस्तारवाद व दहशतवाद विरोधी असल्या तरी काश्मीरबाबतची त्यांची मते भारतविरोधी आहेत. त्या स्वत:चा उल्लेख आफ्रिकन-अमेरिकन असाच आणि एवढाच करतात. तसेच, तिन्ही घरचा पाहुणा अनेकदा उपाशीही राहतो, हेही विसरता यायचे नाही. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार 2008 साली, ॲरिझोनाचे सिनेटर, व्हिएटनाम युद्धातील एक युद्धबंदी, मूळचे सैनिकी कुटुंबातले जॅान मॅकेन (वय वर्ष 72 ) हे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार होते. पण तुलनेने तरूण असलेल्या बराक ओबामा यांनी त्यांचा 2008 च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव केला होता. 2008 मधील उपाध्यक्षपदाच्या उमेदवार अलास्काच्या गव्हर्नर सारा पॅलिन (वय वर्ष 44) या टेलिव्हिजनवरील एक विलोभनीय सादरकर्त्या, एक अभ्यासू राजकारणी आणि लोकप्रिय लेखिका होत्या. पण त्यांचाही पराभव झाला होता. तर 2012 मध्ये मॅसॅच्युसेट्सचे गव्हर्नर राहिलेले मीट रॅामनी (वय वर्ष 65 ) यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून अध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती. हे राजकारणी तसेच व्यापारीही होते. 2012 मध्ये रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार, व्हिसकॅानसिनचे पॅाल रायन (वय वर्ष 42) हे राजकारणी होते. त्यांचाही मीट रॅामनीसोबत पराभव झाला होता. 2016 मध्ये वयस्क डोनाल्ड ट्रंप यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून अध्यक्षपदाची निवडणूक लढविली व त्यांनी मात्र हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला. अर्थशास्त्राची पदवी संपादन केलेल्या, दोनदा घटस्फोट घेणाऱ्या, प्रत्येकवेळी पहिलीपेक्षा तरूण युवतीशी विवाह करणाऱ्या, तीन मुले व दोन मुलींचे पिता असलेल्या डोनाल्ड ट्रंप यांना 2016 पूर्वी राजकारणाचा मुळीच अनुभव नव्हता. पक्के ‘व्यवहारी’ म्हणून ओळख असलेले, केवळ विवेकशून्य व भडकावू भाषणामुळेच उदंड लोकप्रियता संपादन करणारे, अतिशय मर्यादित राजकीय समज व ज्ञान असलेले, डोनाल्ड ट्रंप आज अमेरिकेचे दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्यासाठी सरसावले आहेत. त्यांचा विजय निश्चित मानला जात असतांनाच कोरोनाची साथ आवरण्यात आलेले अपयश आणि परिणामत: देशाची झालेली आर्थिक घसरगुंडी, बेकारी आणि गोऱ्या श्वेतवर्णी पोलिसाने केलेली अश्वेतवर्णी कथित गुन्हेगार व्यक्तीची अमानुष हत्या, यामुळे अख्खी अमेरिका ढवळून निघाली आहे. त्यांच्या सोबत असलेले रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार आणि विद्यमान उपाध्यक्ष, मायकेल पेन्स हे गोऱ्या व सनातनी मतदारांवर प्रभाव असलेले आहेत. काही अभ्यासकांचे मत असे आहे की, याहीवेळी रिपब्लिकन पक्षच बाजी मारील. कारण वंश, वर्ण आणि धर्म या आधारावर होत असलेले वर्गीकरण व ध्रुवीकरण रिपब्लिकन पक्षाच्या पथ्यावर पडणारे आहे. अमेरिकेत सनातनी मतदारांची एक मोठी मतपेढी असून तिला डेमोक्रॅट पक्षाचे पुरोगामित्व साफ नापसंत असते. अशा मतपेढ्या सहजासहजी डळमळत किंवा डगमगत नसतात. राजकीय पंडितांची भाकिते चुकतात, ती यांच्यामुळेच!

No comments:

Post a Comment