Friday, June 11, 2021

बेचिराख बैरूत वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? दिनांक 4 ॲागस्ट 2020 च्या संध्याकाळी लेबनाॅनची राजधानी व बंदरही असलेल्या बैरूत येथे एक जबरदस्त स्फोट (अणुबॅाम्ब सदृश) होऊन शंभरावर लोक मृत्युमुखी पडले आणि हजारो जखमी झाल्याचे वृत्त आहे. जप्त केलेल्या स्फोटक अमोनियम नायट्रेट नावाच्या पदार्थाचा प्रचंड मोठा साठा एका कोठारात अनेक दिवसांपासून जणू बेवारस पडून होता. हा पदार्थ खत म्हणून तसेच दारुगोळा तयार करण्यासाठीही वापरला जातो. अशी कोठारे लोकवस्तीपासून दूर असावीत, असा नियम असला तरी त्याचे पालन या भ्रष्टाचारग्रस्त देशात क्वचितच होत असते. आता या स्फोटाच्या कारणांची चौकशी सुरू झाली आहे. बचाव कार्य म्हणून जखमींवर उपचार, वाचलेल्यांचा शोध सुरू आहे लेबनॅानवर एकेकाळी फ्रान्सचा अंमल होता म्हणून फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॅान यांनी लेबनॅानला ताबडतोब भेट दली व बेचिराख झालेल्या भागाचा दौरा केला. त्यावेळी लोकांनी त्यांना घेरले आणि मदत सरकारमार्फत न देता प्रत्यक्ष आमच्या हातात पडेल असे पहा, असे म्हणत आर्जवे केली. लेबनॅानच्या जनतेला आपल्या सरकारच्या भ्रष्ट कारभाराबाबत किती खात्री आहे, हे यावरून स्पष्ट व्हावे. अध्यक्षांच्या निवासस्थानासकट बैरूतमधील सर्व महत्त्वाच्या वास्तू जमीनदोस्त झाल्या आहेत. रस्तावरची वाहने फुंक मारलेल्या कागदाच्या कपट्याप्रमाणे उडाली होती. काचेच्या तावदानांच्या चकनाचूर होऊन अनेक जायबंदी झाले, खरेखुरे बंगले पत्यांच्या बंगल्यांप्रमाणे कोसळले, स्फोटाच्या केंद्रापासून 10 किलोमीटर अंतरावरच्या घरांचीही मोडतोड झाली. मग केंद्रस्थानी काय झाले असेल याची कल्पनाच करावी, नव्हे कल्पनाही करू नये, हेच बरे. जीवित हानी जखमी झालेल्या 5 हजारांची संख्या वेगाने कमी होत असून मृत्यू पावणाऱ्यांची संख्या तेवढ्यानेच वेगाने वाढत आहे. बैरूट शहरातील निम्या लोकांची घरे आता राहण्यासारखी राहिलेली नाहीत. प्रलय, प्रलय म्हणतात, तो यापेक्षा वेगळा असेल का? स्फोटानंतर आता बैरूटमधील अनेक बड्या हस्ती हयात नाहीत. अग्निशामक दलाचे अनेक फायर फायटर्स एकतर स्वत:च बळी तरी गेले आहेत किंवा बेपत्ता तरी झाले आहेत. नक्की काय झाले? याबद्दलची मत्ते परस्परविरोधी आहेत. कोठाराजवळच कुणीतरी फटाके फोडल्याचे वृत्त समोर आले आहे. 2,750 मेट्रिक टन अमोनियम नायट्रेट गेली सहा वर्षे या कोठारात बेवारस व सुरक्षा व्यवस्थेशिवाय पडून होते, पण हा स्फोटक पदार्थ इथे आलाच कसा? तर त्याचे असे झाले की, 2013 मध्ये एक रशियन जहाज मोझॅंबिकला चालले होते. मध्येच जहाजावर बंड होऊन खलाशी जहाज सोडून गेले. कस्टम खात्याने जहाजावरचा अमोनियम नायट्रेटचा साठा उतरवून बंदराजवळच्या कोठारात ठेवला आणि जहाज जप्त केले. कोण वाचले, कोण गेले? वाचलेल्यांची शुश्रुषा करण्याऱ्या एका परिचारिकेने तीन छकुल्यांचे जीव वाचले आहेत. तर इतर अनेक आपल्या गायब झालेल्या सग्यासोयऱ्यांच्या शोधात भटकत आहेत. वित्त आणि जीवितहानीची नक्की माहिती आम्हाला नाही आणि नजीकच्या भविष्यकाळात ती आम्ही देऊही शकणार नाही, अशा आशयाचे निवेदन, हमद हसन या मंत्रिमहोदयांनी जाहीर केले आहे. लोकच शोधाशोध करीत एकमेकांना मदत करीत आहेत. दवाखान्यांसमोर जखमींच्या लांबच लांब रांगा दिसताहेत. स्फोट होताच लोक भयभीत होऊन सैरावैरा धावू लागले. रस्त्यांवर जखमींच्या रांगा, काचांचे टोकदार तुकडे, चेचल्या आणि चेपल्या गेलेली वाहने दिसत होती. आगी लागल्या ठिकाणापर्यंत अग्निशामक दलाची वाहने पोचू शकत नव्हती. त्यामुळे हेलिकॅाप्टरमधून पाण्याचे फवारे सोडण्यात येत होते. मूर्तिमंत विनाश वेगळा का असेल? आसमंतात लाल धुराचे साम्राज्य पसरले. तो धूर लांबलांब अंतरावरूनही दिसत होता. एक महिला आपल्या लहानग्याच्या शोधात वणवण भटकत होती. ज्यालात्याला विचारत होती, कुणी पाहिलंत का हो माझ्या लेकराला? खूपच गोंडस आहे हो माझं लेकरू! बचाव पथकानं अनेक लेकरांना वाचवलं होतं! पण त्यातलं हिचं गोंडस लेकरू कोणतं होतं ? किंवा त्यात ते होतं तरी का, हे ते सांगू शकत नव्हते. गतकाळात लेबॅनॅानमधून हद्दपार झालेल्यांचे प्रतिनिधित्व करणारा पुतळा मात्र तसाच ताठ उभा होत्या. त्याच्या आजूबाजूच्या इमारती मात्र जमीनदोस्त झाल्या होत्या. पण त्याच्या चेहऱ्यावर अंकित असलेले मूळ भाव आज वेगळेच दिसत होते का? बाजूलाच एक वयस्क महिला ढिगाऱ्यातून वाचलेले किडुकमिडुक एका बोचक्यात भरून पाठीवर घेऊन उभी होती. सॅटलाईटने एका छायाचित्रात बैरूट शहरात एक भलेमोठे विवर तयार झालेले दाखविले आहे. बैरूत शहर डिझॅस्टर सिटी बैरूत शहर डिझॅस्टर सिटी म्हणून घोषित करण्यात आले आहे. दाहेर नावाच्या विमान निर्मिती करणाऱ्या उद्योगसमूहाच्या प्रमुखाने या प्रश्नाचा पिच्छा पुरवण्याची घोषणा केली आहे. काय घडले, कसे घडले, जबाबदार कोण, हे तुम्ही शोधणार नसाल तर आम्ही शोधून काढू आणि त्यांना शिक्षा झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे त्यांनी घोषित केले आहे. अमोनियम नायट्रेटचा एवढा मोठा साठा नागरी वस्तीला लागून असलेल्या कोठारात वारंवार कळवूनही 2014 पासून पडून राहिलाच कसा ? वेगवेगळी मते आता तज्ञांची वेगवेगळी मते यायलाही सुरवात झाली आहे. स्फोट केवळ अमोनियम नायट्रेटमुळे झाला नसावा, असे त्यांना वाटते. काही अमेरिकन तज्ञ म्हणतात की, धुराच्या रंगावरून हे केवळ अमोनियम नायट्रेटमुळे घडले असेल, असे वाटत नाही. इतर संयुक्तेही सोबत असली पाहिजेत. धुराच्या लाल/ सोनेरी रंगावरून अशीही शंका येते आहे की, अमोनियम नायट्रेटसोबत काही लष्करी स्फोटकेही सोबत असावीत. डोनाल्ड ट्रंप यांनी तर एकदा नव्हे तर दोनदा घोषित केले आहे की, हा घातपाती हल्लाच आहे. पण अमेरिकेच्या संरक्षण खात्याला मात्र असे वाटत नाही, हे महत्त्वाचे आहे. बैरूत शहर आज रडते, ओरडते आहे. अनेकांना फेफऱ्याचा झटका आला आहे. काही नखशिखांत थरथरत आहेत, तर अनेक हवालदिल झाले आहेत. 2005 मध्ये कोठारच्या जवळपासच कार बॅाम्बचा वापर करून लेबनॅानचे तेव्हाचे अध्यक्ष रफिक हारीरी यांना उडविण्यात आले होते. त्या खटल्यातील 4 आरोपींच्या खटल्याचा निकाल 3 दिवसांवर आला असतांनाच हा स्फोट झाला आहे. याला योगायोग म्हणायचं की आणखी काही?

No comments:

Post a Comment