Monday, July 12, 2021

रशियाही विस्तारवादीच. वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? एकेकाळी युक्रेन रशियन साम्राज्याचा एक भाग होता. गोर्बाचेव्ह यांच्या काकीर्दीत रशियन साम्राज्य विघटन पावले आणि युक्रेनसह अनेक स्वतंत्र राष्ट्रे जन्माला आली. यापैकी युक्रेन हा भूभाग रशियाला पुन्हा आपल्याकडे घ्यायचा आहे. यामागचे प्रमुख कारण असे आहे की, युक्रेन युरेनियम आणि इतर खनीजांनी संपन्न असून अतिशय सुपीकही आहे. युक्रेनचाच भाग असलेला लहानसा क्रिमीया रशियाने अगोदरच गिळंकृत केला आहे. भौगोलिक दृष्ट्या क्रिमीया युक्रेनपेक्षा रशियाच्याच अधिक जवळ होता, तसेच दुसरे असे की, क्रिमीयाची जनताही रशियात सामील होण्यास अनुकूल होती. त्यामुळे क्रिमियाचे सामिलीकरण सहज शक्य झाले. युक्रेन - एक स्वतंत्र राष्ट्र पण युक्रेनचे तसे नाही. तो क्रिमीयाच्या तुलनेत बराच मोठा आहे. आणि युक्रेनमधील जनताही रशियात सामील व्हायला तयार नाही. स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करणाऱ्या अनेक ऐतिहासिक खुणा या देशात ठिकठिकणी आढळतात. निपर नदीच्या काठी तीर्थस्थळे, जुनी थडगी आणि त्यात इजिप्तसाख्या ममीही आढळून येतात. युक्रेनची भाषा आणि तिची अधिकृत लीपीही वेगळी आहे. यासारखे तपशील यासाठी महत्त्वाचे ठरतात की, एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून युक्रेनची प्राचीनकाळापासूनची ओळख आहे. भलेही हे रशियाला मान्य नसले तरी. रशियासाठी युक्रेनचे असलेले महत्त्व विघटनापूर्वीच्या रशियन साम्राज्यातही युक्रेनची जनता मनाने वेगळीच नांदत होती. विघटनानंतर तर युक्रेनच्या जनतेला रशियात सामील होण्याची मुळीच इच्छा नाही. पण पुतिन यांना काहीही झाले तरी हा भूभाग आपल्या ताब्यात हवाच आहे. कारण असे झाले तर रशियाच्या सामर्थ्यात फार मोठी भर पडणार आहे आणि अख्या युरोपला आपल्या धाकात ठेवण्याइतके सामर्थ्य रशियाला प्राप्त होईल. एवढेच नव्हे तर रशिया पाश्चात्य राष्ट्रांच्याही डोळ्याला डोळा भिडवून पाहू शकण्याइतका शक्तिशाली होईल. म्हणून काहीही करून युक्रेन खालसा करून आपल्या नियंत्रणात आणण्यासाठी रशियाचे अध्यक्ष पुतिन उतावीळ झाले आहेत आणि यासाठी ते कोणतीही किंमत मोजायलाही तयार आहेत, असे म्हणतात. अगदी तिसरे महायुद्ध उद्भवले तरी सुद्धा! पण गेली अनेक वर्षे, रशियाने या दृष्टीने प्रत्यक्षात मात्र फारशी हालचाल केली नव्हती. सध्याची जागतिक राजकीय स्थिती अशी आहे की, गुरगुरणे, फारच झाले तर बोचकारणे, याच्यापुढे जाऊन राष्ट्रे एकमेकांना डिवचण्याचे टाळतांनाच दिसतात. पण आता मात्र रशियाच्या मनात वेगळेच काहीतरी घाटते आहे, असे वाटावे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. रशियाच्या मनाचा कानोसा आल्यामुळे उत्तरादाखल नाटोनेही आपली सशस्त्र दले युक्रेनच्या सीमेजवळ हलवली आहेत. तसेच लढाऊ जहाजेही नेम धरून उभी ठेवली आहेत. त्यांनी युक्रेनच्या भूभागाची ड्रोनद्वारे हवाई पहाणी तर केव्हाच करून ठेवली आहे. पण पाश्चात्य राष्ट्रेही या पलीकडे फारशी पुढे सरकलेली नाहीत. तर एवढेच करून ती थबकली आहेत. ब्रिटनची युद्धनौका जवळ येताना दिसताच रशियाने तिच्यासमोर समुद्रातच क्षेपणास्त्र डागले, त्याला थोपवले आणि पुढचा हल्ला नौकेवरच होईल, अशी तंबी दिली. पण नौकेवर हल्ला मात्र केला नाही. रशियाच्या मनात काय चालले आहे? एका अंदाजानुसार दीड लक्ष रशियन सैनिक युक्रेनच्या सीमेवर येऊन थडकले आहेत. आता ठिणगी पडायचाच कायतो अवकाश आहे, असे म्हटले जाते आहे. पण दुसरे मत मात्र वेगळे आहे. अलेक्सी नवाल्नी या नावाच्या पुतिन यांच्या कडव्या टीकाकाराच्या समर्थकांचे आंदोलन रशियात बळकट होत चालले आहे. नवाल्नी सध्या अटकेत असून त्याची प्रकृती फारच बिघडली असल्याच्या वार्ता बाहेर आल्या आहेत. युरोपातील 27 राष्ट्रांच्या गटाने नवाल्लीच्या प्रकृतीविषयक वार्तांची गंभीर दखल घेतली असून त्याची सुरक्षा आणि प्रकृती याबाबत काही वेडेवाकडे घडले तर त्याची संपूर्ण जबाबदारी रशियावर असेल, असा सज्जड दम त्यांनी रशियाला दिला आहे. त्यामुळे या परिस्थितीत लक्ष इतरत्र वळवण्यासाठी रशिया गुरगुरण्यापेक्षा फारसे काही करील, असे यांना वाटत नाही. पण काहींचे मत वेगळे आहे. त्यांचा प्रश्न असा आहे की, एवढी मोठी सैन्यशक्ती केवळ डावपेच म्हणून का कुणी सरहद्दीवर नेऊन ठेवील? शिवाय असे की, अशा परिस्थितीत अपघाताने घडणारी लहानशी घटनाही युद्ध पेटण्यास पुरेशी ठरू शकेल, याची जाणीव रशियाला नसेल का? क्रिमीया ताब्यात घेतल्यानंतर तेव्हाच युक्रेनमधील रशियनसमर्थक फुटीरतावाद्यांनी पूर्व युक्रेनचा काही भाग ताब्यात घेतला होता. खरे तर त्याचवेळी युक्रेनचे निदान विभाजन तरी करावे असा रशियाचा डाव होता. पण तो फसला. यानंतर लगेचच युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी युक्रेनमधील रशियासमर्थक तीन वाहिन्यांवर तातडीने बंदी घातली आणि पुतिन यांच्या अन्य समर्थकांवरही कडक निर्बंध लादून त्यांना जेरेबंद केले. त्यामुळे युक्रेच्या पूर्व भागाचे विलिनीकरण झाले नाही हे खरे असले तरी युक्रेनमध्ये अंतर्गत संघर्षांने मात्र पुन्हा डोके वर काढले आहे. सात वर्षांचा संघर्ष पूर्व युक्रेनमधील रशियासमर्थक आणि युक्रेनचे लष्कर यांच्यातील संघर्षांत १३ हजारावर लोकांचा बळी गेल्या सात वर्षात गेला आहे. त्यामुळे चिडून रशियाने युक्रेन सीमेवर सैन्यबळ वाढवले आणि युद्धाचे ढग जमू लागल्याचे वृत्त जगभर पसरले. पण रशियाला एवढेच तर करायचे नसेल ना? अनेक युद्धतज्ञांनी असे मत व्यक्त केले आहे. युक्रेनचे अमेरिका आणि युरोपशी चांगले संबंध आहेत. ही बाब रशियाला साफ अमान्य आहे. त्यातून युक्रेनने नाटोत सामील होण्याचा मनोदय व्यक्त केल्यावर तर रशियाच्या तळपायाची आग मस्तकात पोचली. भरीसभर ही की, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी गेल्या काही महिन्यांत पाश्चात्त्य देशांना अनुकूल धोरणात्मक निर्णय घेण्याचा सपाटाच लावला आहे. यामुळे तर आगीत तेल ओतल्यासारखेच झाले आहे. या भूमिकेपासून युक्रेनला परावृत करण्याचा किंवा करण्यापुरताच तर रशियाचा हेतू सीमित नाहीना? ही अनिश्चितता अमेरिका आणि युरोप यांना सतावते आहे, हे पाहिले म्हणजे रशियाचा हेतू काय असावा हे काहीसे स्पष्ट होते, असेही निरीक्षकांचे मत आहे. अमेरिकेची रशियाला धमकी एप्रिलच्या सुरुवातीला युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आणि अमेरिकी अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यात चर्चा झाली होती. त्याचवेळी अविभक्त युक्रेनच्या सार्वभौमत्वाला आपला पाठिंबा आहे, असे अमेरिकेने जाहीर केले आहे. यासाठी वेळ पडल्यास अमेरिका रक्षणासाठीही पुढे सरसावेल, असे सूचित करण्यासही बायडेन चुकले नाहीत. रशियाने क्रिमीया खालसा केल्यापासून अमेरिकेने युक्रेनला भरपूर आर्थिक मदत केली असून ती तशीच चालू आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वेळी रशियाने डोनाल्ड ट्रंप यांना मदत होईल अशाप्रकारे हस्तक्षेप केला तसेच अमेरिकेवर सायबर हल्लाही केला असा आरोप करून बायडेन प्रशासनाने दहा रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांवर कारवाई केली. मात्र, याचा रशियावर काही परिणाम झालेला निदान दिसत तरी नाही. जरब बसावी या हेतूने केलेल्या अशा प्रकारच्या कारवाईला आपण भीक घालीत नाही, असे तर रशियाला दाखवावयाचे नाहीना, असे मत काही निरीक्षकांनी नोंदविले आहे. त्यातून रशिया आणि चीन यांनी आपापसातले मतभेद, मोठा कोण, तू का मी, हा मुद्दा बाजूला ठेवून एक मजबूत आघाडी उभी करण्याचे ठरविलेले दिसते आहे. म्हणून तर ही दमदाटी, बेदरकार भाषा नाहीना? पुतिन जसा एकेकाळचा पहेलवान गडी आहे, तसाच तो चतुर गुप्हेरही होता आणि आता तर राजकारणीही आहे. राजकारण्यांची बदलती भाषा रशियाबाबत कठोर भूमिका स्वीकारू असे डेमोक्रॅट पक्षाने अमेरिकेत निवडणूक प्रचार सुरू असतांनाच जाहीर केले होते. पण तेव्हाचा तो कडकपणा आता दिसत नाही, असे मत आता खुद्द अमेरिकेतच व्यक्त होतांना दिसते आहे. याउलट युरोप संबंधात तेव्हा व्यक्त केलेली सहकार्याची आणि सहयोगाची भूमिका आणि सध्याचे अमेरिकेचे युरोपबाबतचे धोरण यात मात्र पुरेशी सुसंगती दिसते आहे, असे निरीक्षण अमेरिकन माध्यमांनी नोंदविले आहे. पण रशियाबाबत मात्र बायडेन पावले जपून टाकतांना का दिसतात, असा प्रश्न अमेरिकेत विचारला जातो आहे. अर्थात सकारात्मक भूमिका घोषित केल्याप्रमाणे चालू ठेवणे, अमलात आणणे जेवढे सोपे व सहज असते, तसे ते विरोधी भूमिकेबाबत असत नाही/असणार नाही, हेही लक्षात घ्यावयास हवे आहे. इकडे खुद्द युक्रेनने संरक्षणावरचा खर्च वाढविला आहे. पण खर्चात कितीही वाढ केली तरी क्षेत्रफळाने 28 पटीपेक्षा जास्त, लोकसंख्येने तिपटीहूनही मोठ्या आणि शस्त्रसज्जतेतही वरचढ असलेल्या रशियासमोर युक्रेनचा निभाव लागणे कठीणच आहे. सीमेवर दीड लक्ष सुसज्ज सैन्य उभे करून रशिया युक्रेनला आपला संरक्षणावरचा खर्च वाढविण्यास भाग पाडीत तर नसेल ना? यामुळे इतर रचनात्मक बाबींवरचा खर्च कमी होऊन त्या देशात असंतोष निर्माण होईल आणि दीर्घ काळपर्यंत संघर्षाचा पवित्रा कायम ठेवणे युक्रेनला अशक्य होईल, हा तर रशियाचा डाव नसेल ना? आज मात्र रशियात युक्रेनप्रश्नी युद्धज्वर निर्माण झालेला दिसतो आहे. अलेक्सी नवाल्नी याच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनावरचा हा उतारा नाहीना? त्याची प्रकृती ढासळते आहे. खुद्द पुतिन यांनाही कंपवात (पार्किनसन्स डिसइज) ग्रासतो आहे, अशा अफवा आहेत. तिकडून जनतेचे लक्ष युक्रेनकडे वळविण्याचा तर हा डाव नाहीना? का सगळ्यांचे एकमेकांना नुसते जोखणेच सुरू आहे? राजकारण्यांचा मनाचा थांगपत्ता लागत नाही हेच खरे.

No comments:

Post a Comment