My son (Ajit), and daughter-in-law (Neelam) suggested to me that I should have a blog of my own. Because of their kind suggestion, I have created this blog.
Friday, July 2, 2021
कानोसा, अमेरिकन-भारतीय मतदारांच्या मनाचा!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
अमेरिकेतील भारतीय, निरनिराळ्या राज्यात कसे विखुरलेले आहेत, राज्यागणिक त्यांची संख्या तसेच राज्यातील एकूण लोकसंख्येशी या संख्येचे टक्केवारीने प्रमाण किती आहे, याबाबत अगदी ढोबळमानाने विचारात घेतलेले हे आकडे निदान तुलनात्मक अभ्यासासाठी पुरेसे मानायला हरकत नसावी.
1) भारतीयांची 0.5 लक्ष किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या (लाखात) असलेली राज्ये आणि त्यांची राज्यातील एकूण संख्येशी असलेली टक्केवारी अशी आहे.
1) कॅलिफोर्निया - 5 लक्ष (1.4%); 2 न्यूयॅार्क - 3 लक्ष (1.6%); 3 न्यू जर्सी- 3 लक्ष (3.3%); 4 टेक्सास- 2.5 लक्ष(1 %); 5 इलिओनॅाईस- 2 लक्ष(1.5 %); 6 फ्लोरिडा - 1.3 लक्ष (0.7 %); 7 व्हर्जिनिया - 1 लक्ष (1.3 %); 8 पेन्सिलव्हॅनिया- 1 लक्ष (0.8 %); 9 जॅार्जिया -1 लक्ष (1%); 10 मेरी लॅंड- 0.8 लक्ष (1.4%); 11 मॅसॅच्युसेट्स- 0.8 लक्ष (1.2%); 12 मिशिगन - 0.8 लक्ष (0.8%); 13 ओहायहो - 0.6 लक्ष (0.6%); 14 वॅाशिंगटन - 0.6 लक्ष (0.9 %); 15 नॅार्थ कॅरोलना - 0.6 लक्ष (0.6 %); 16 कनेक्टिकट - 0.5 लक्ष (1.3%);
2) भारतीयांची लोकसंख्या 0.5 लक्षापेक्षाही कमी (हजारात) पण टक्केवारी मात्र 0.5 % पेक्षा जास्त असलेली राज्ये
अ) ॲरिझोना- 36,000 (0.6%); ब) मिनेसोटा 33,000 (0.5%); क) डेलावेअर- 11,000 (1.3%); ड) नॅार्थ हॅंपशायर- 8,000 (0.6%);इ) वॅाशिंगटन (डिस्ट्रिक्ट ॲाफ कोलंबिया) - 5,000 (0.9 %); फ) कॅनसस -14,000 (0.5%)
अमेरिकेत मतदान दिनांकाच्या अगोदरच 1 कोटीपेक्षाही जास्त मतदारांनी मतदान केले सुद्धा आहे. कोरोनावर मात करून स्वस्थ होताच डोनाल्ड ट्रंप यांनी महत्त्वाच्या राज्यांमध्ये प्रचाराची धमाल उडवून दिली आहे. अमेरिकेतील अमेरिकन - भारतीय मतदारांचा कल दिवसेदिवस ट्रंप यांच्या बाजूने वळत असून याचे श्रेय फार मोठ्या प्रमाणात मोदी आणि ट्रंप यांच्या मैत्रीला जाते, असे एका नुकत्याच पार पडलेल्या पाहणीत आढळून आले आहे. त्यातच मुस्लिमधार्जिण्या बायडेन यांचे पाकिस्तानबाबतच नव्हे तर चीनबाबतही धोरण काय असेल, याबाबत अनेक अमेरिकन-भारतीय मतदार साशंक आहेत. त्यांचा मुख्य प्रचारप्रमुख अमेरिकन-पाकिस्तानी आहे. अटीतटीच्या संभाव्य लढती असलेल्या राज्यांमधील हे मतदार रिपब्लिकन पक्षाकडे अधिकाधिक प्रमाणात वळू लागलेले दिसत आहेत, असे वृत्त बाहेर येत आहे. प्रचार करतांना डोनाल्ड ट्रंप मोदींबाबत व्यक्त होण्याची संधी सहसा सोडत नाहीत, तसेच ते मोदींना बरोबरीच्या नात्याने वागवतात, यामुळे डोनाल्ड ट्रंप अमेरिकन-भारतीय मतदारांमध्ये लोकप्रिय होत चालले आहेत. अमेरिकेत भारताला आणि भारतीय नेतृत्वाला एवढा भाव यापूर्वी क्वचितच दिला जात असे, याचीही या मतदारांनी नोंद घेतली आहे.
आफ्रिकन-अमेरिकन कमला हॅरिस
ट्रंप प्रशासनानेही भारतातील अंतर्गत प्रश्नांबाबत, कधीही भारताविरोधात भूमिका घेतलेली नाही. यात जसे काश्मीर आले, तसेच अरुणाचलही आले आहे. जागतिक व्यासपीठावर भारताचे स्थान कसे उंचावेल, व्यक्त होण्याची संधी भारताला कशी मिळेल यासाठी ट्रंप यांचा प्रयत्न असतो. याउलट डेमोक्रॅट पक्षाचे सर्व अध्यक्ष (यात खुद्द बायडेनही येतात, अपवाद- जॅान एफ केनेडी), सर्व दोष भारताच्याच माथी मारून उपदेशाचे डोज देत आले आहेत. उपाध्यक्षपदाच्या मुस्लिमधार्जिण्या असा आरोप असलेल्या सुविद्य उमेदवार व कायदेपंडित कमला हॅरिस, स्वत:ची ओळख आफ्रिकन - अमेरिकन अशी आजवर करून देत असत. आता मात्र त्यांना आपला भारतीय वारसा आठवतोय. बहुदा यामुळेच कमला हॅरिस यांची भारतीय-अमेरिकनांवर फारशी पकड असल्याचे दिसत नाही. आजवर तसा त्यांनी कधी प्रयत्नही केलेला नाही. उलट त्या सातत्याने आपल्या आफ्रिकन वारशावर भर देत भारत आणि भारतीयांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांबाबत विरोधी भूमिकाच घेत आल्या आहेत. याचे एक कारण असे असेल का, की अमेरिकेत आफ्रिकनांची संख्या 15 % च्या वर आहे तर अमेरिकेच्या कोणत्याही राज्यात एखादा अपवाद वगळता भारतीय 1.5 % टक्यापेक्षा जास्त नाहीत.
भारतीय-अमेरिकन नागरिकांचा कुणीना कुणी नातेवाईक भारतात असतोच/असणारच. अमेरिकेने भारताला सन्मानाने वागवावे, तसेच चीनच्या बाबतीत अमेरिकेने भारताला साथ द्यावी, अशी भारतीयांची अपेक्षा असते. ही साथ ट्रंप व रिपब्लिकन पक्षच देईल, असा त्यांचा विश्वास आहे. हा संदेश हे नातेवाईक आपल्या अमेरिकेतील बांधवांना नेमकेपणाने पोचवत असतात.
महत्त्वाची राज्ये व भारतीयांची संख्या
मिशिगन, पेन्सिलव्हॅनिया, जॅार्जिया, नॅार्थ कॅरोलिना, व्हर्जिनिया, टेक्सास या राज्यातून एकूण 538 इलेक्टर्सपैकी 118 इलेक्टर्स निवडले जातात. या राज्यात एकूण 5 लक्षाहून अधिक अमेरिकन - भारतीय मतदार आहेत. त्यामुळे 118 इलेक्टर्सच्या निवडीवर या मतदारांचा प्रभाव पडू शकेल, असे मानले/म्हटले जाते.
अमेरिकन लोकसंख्येचे वंशश: विभाजन असे आहे. गोरे 77.3 % आहेत. पण यापैकी 23.8 % गोरे डोनाल्ड ट्रंप यांचे विरोधक आहेत. यात प्रामुख्याने क्युबन, मेक्सिकन, दक्षिण किंवा मध्य अमेरिकन लोकांचा समावेश असतो. पण उरलेल्या 53.5 % गोऱ्यांपैकी बहुसंख्य अमेरिकन गोऱ्यांचा डोनाल्ड ट्रंप यांना फार मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. काळ्यांची टक्केवारी 16.9 % आहे. हे डोनाल्ड ट्रंप यांच्या विरोधातच मतदान करणार हे सांगायला नको. अमेरिकन - भारतीय टक्केवारी, पूर्ण देशाचा विचार करता, 1 % पेक्षाही कमी आहे. पण यातील बहुसंख्य भारतीय मतदार डोनाल्ड ट्रंप यांच्या धोरणांवर खूश असलेले आहेत. एच1बी व्हिसाबाबतचे ट्रंप प्रशासनाचे धोरण तिथे स्थायिक झालेल्या भारतीयांनाही आवडत नसले तरी या धोरणाचा अमेरिकेत नोकरीसाठी येऊ इच्छिणाऱ्यांना, ग्रीन कार्ड मिळवू इच्छिणाऱ्यांना जसा त्रास होतो, तसा तो अमेरिकेत स्थायिक होऊन नागरिकत्व आणि मताधिकार मिळालेल्या भारतीयांना होत नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे. एकेकाळी हे डेमोक्रॅट पक्षाला एक गठ्ठा मतदान करीत असत. पण मोदींचा भारतातील उदय, त्यांची धोरणे व अमेरिकेतील विद्यमान शासन आणि प्रशसनव्यवस्थेशी भारताचे असलेले सलोख्याचे संबंध, यामुळे भारतीय मतदार फार मोठ्या प्रमाणावर रिपब्लिकन पक्षाकडे वळले आहेत. यामुळे देशभरातल्या प्रत्येक राज्यात डोनाल्ड ट्रंप यांची मते (पॅापुलर व्होट्स) काहीना काही प्रमाणात वाढणार आहेत आणि तेवढ्यानेच डेमोक्रॅट पक्षाची मते कमी होणार आहेत.
‘हाऊडी मोदी’, हा ह्यूस्टन मधील कार्यक्रम आणि अहमदाबाद येथील ‘नमस्ते ट्रंप’ हा कार्यक्रम यांचा अमेरिकन - भारतीय जनमानसावर फार मोठा प्रभाव पडला आहे.
मोदींच्या दमदार व धाडसी पुढाकारांमुळे भारतात होत असलेल्या परिवर्तनाने अमेरिकन - भारतीय अतिशय प्रभावित झाले आहेत. काश्मीरला भारतापासून वेगळे ठेवणारे 370 कलम कधी दूर होऊ शकेल, ही आशा अमेरिकन-भारतीयांनी केव्हाच सोडून दिली होती. सिटिझनशिप (अमेंडमेंट) ॲक्टबद्दल तर त्यांच्या मनात विचारही येण्याची शक्यता नव्हती. पुढची चार वर्षे अमेरिकेत ट्रंप आणि भारतात मोदी ही जोडी दोन्ही देशांना प्रगतीच्या एका नवीन उंचीवर घेऊन जाईल, असा त्यांना विश्वास वाटतो आहे.
मतदारनोंदणी आणि मतदान या दोन्ही बाबतीत अमेरिकन-भारतीय मतदार जागरूक असल्याचे आढळून आले आहे. 2016 मध्ये त्यांची मतदान करण्याची टक्केवारी 62 % म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त होती. 2020 मध्ये ही टक्केवारी आणखी वाढते किंवा कसे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तशी ती वाढल्यास रिपब्लिकन पक्षाचे पारडे बऱ्यापैकी जड होईल, असे दिसते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment