Monday, July 19, 2021

कॅनडातील मूळ निवासींचा सांस्कृतिक वंशविच्छेद वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? सध्या कॅनडामध्ये असंतोषाचा आगडोंब उसळला असून त्याबाबतची वृत्ते अमेरिकेतील न्यूयॅार्क टाईम्स सारख्या आणि कॅनडातील ग्लोब ॲंड मेल, टोरोंटो स्टार यासारख्या प्रमुख वृत्तपत्रात रकाने भरभरून झळकत आहेत. इंडिजिनस पीपल उतर अमेरिका खंडातील मूळ निवासींचा आणि त्यांच्या वंशजांचा उल्लेख ‘इंडिजिनस पीपल’ या शब्दात करतात. आज उत्तर अमेरिका खंडाचा जो भूभाग कॅनडा म्हणून ओळखला जातो तिथल्या मूळच्या निवासींना बाजूला सारून/ढकलून कॅनडा नावाची ही मुख्यत: ब्रिटिश आणि फ्रेंचांची वसाहत अस्तित्वात आली आहे. कॅनडाची आजची राज्यघटना तिथल्या मूळ निवासींच्या 3 गटांना मान्यता देते. पहिला गट इंडियन्स म्हणून ओळखला जातो. या गटाचा उल्लेख आज ‘फर्स्ट नेशन्स’ या शब्दात केला जातो. दुसरा गट आहे इन्यूट, तर तिसरा आहे ‘मेटिस’. अशा निवासी शाळा 10 लाख फर्स्ट नेशन्सचे 634 समुदाय कॅनडात ठिकठिकाणी विखुरलेले आहेत. यांच्या मुलांना पोलिसांच्या मदतीने त्यांच्या आईवडलांपासून जबरदस्तीने वेगळे करून रोमन कॅथोलिक चर्च संचालित निवासी शाळात ‘घालण्यात’ येत असे. अगतिक पालक हा सर्व प्रकार उघड्या डोळ्याने मुकाट्याने पाहत आणि सहन करीत असत. या मुलांना आपापल्या कुटुंबांपासून तोडून, त्यांचे सांस्कृतिक बंध कापण्यात येत असत. जसे प्रथेप्रमाणे मुलींनी वेणी घालू नये, म्हणून त्यांचे केस कापून टाकले जात. त्यांना गोऱ्या कॅनेडियन समाजात एकरूप करून घेण्यासाठी अनेक ख्रिश्चन संस्कार गेली 120 वर्षे सुरू आहेत/होते. शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या मुलांनी आपली मूळ ओळख विसरून जावी आणि ख्रिश्चन समाजाशी एकरूप व्हावीत, हा यामागचा हेतू असे. एकच जीन पूल या सर्व मूळ निवासींच्या प्राचीन अवशेषाात आढळलेला डिएनए एकाच गटातून (जीन पूल) मधून आलेला आहे. नवीन अभ्यासानुसार याची मुळे आशियात सापडतात. ज्या मुलाच्या अस्थींमध्ये हा डिएनए प्रथम आढळला ते मूल 12 ते 18 महिन्यांचे आणि 12 हजार 600 वर्षांपूवीचे होते. अमेरिकेच्या ज्या भूभागत हे अवशेष सापडले त्या भागाला आज मॅांटाना राज्य असे नाव आहे. हे राज्य कॅनडाच्या अवशेषबहुल सॅस्कातचेवन राज्याला तसे लागूनच आहे. मॅांटॅना हे राज्य आज अमेरिकेच्या 50 राज्यांपैकी एक राज्य आहे. म्हणजे आशियातून हे स्थलांतर 12 हजार वर्षांपूर्वी झालेले आहे, असे मानायचे काय? याचा अर्थ असा होतो की, या मूळ निवासींची वसती कॅनडापुरती मर्यादित नव्हती/नाही, तर ती अमेरिकेतही निदान आजच्या मॅांटेना राज्यात तरी पसरलेली होती. तिथेही मूळ ओळख पुसण्याचे हे सर्व प्रकार होत असत, असे मानणे क्रमप्राप्त आहे. पण अमेरिकन शासनाने हा प्रकार अजूनतरी अधिकृत रीत्या मान्य केलेला नाही. नामविरहित कबरी कॅनडामध्ये जबरदस्ती करून निवासी शाळेत टाकलेल्या या मुलांच्या 750 कबरी सॅस्कातचेवन प्रांतातील एका निवासी शाळेच्या आवारात (हो आवारतच) नुकत्याच आढळून आल्या आहेत. अशाच 225 मुलांचे अवशेष कॅनडामधीलच ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील एका निवासी शाळेच्या परिसरातच आढळले आहेत. गेल्याच महिन्यात बालकल्याण अधिकाऱ्यांनी भूगर्भातील वस्तूंचा वेध घेणाऱ्या रडारच्या (ग्राऊंड पेनिट्रेटिंग रडार) साह्याने ह्या नामखुणाविरहित अनामिक कबरी शोधून काढल्या. पण मुळात या कबरींवरच्या नामफलक असलेल्या शीळा आज ना उद्या सापडतीलच, अशी फर्स्ट नेशन्सची अपेक्षा आहे. यातील अवशेष मानवी आणि लहान मुलांचे आहेत. पण या मुलांचीही ओळख काय, ती कशी आणि कशाने मेली हे बहुदा कधीच कळणार नाही. हे गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य मानून त्याची चौकशी करण्यात यावी अशी फर्स्ट नेशन्सची मागणी आहे. चर्चने मात्र हा प्रकार साफ नाकारला आहे. पण या प्रकाराबद्दल कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी, आपल्याला फार मोठा धक्का बसल्याचे म्हटले आहे. कॅनडामध्ये शासकीय अनुदानावर चालणाऱ्या अशा 130 निवासी शाळा आहेत. या शाळांवर नियंत्रण मात्र धार्मिक पदाधिकाऱ्यांचे असते. म्हणजे जवळजवळ दोन शतके हा प्रकार शासकीय छत्राखाली सुरू होता, असे मानणे भाग आहे.. मृत्यू कशामुळे? या निवासी शाळांमध्ये शिक्षण घेणारी 6000 मुले आजवर मृत्युमुखी पडली आहेत, असे एक मत आहे. अतिशय ओंगळवाण्या निवासव्यवस्थेमुळे आणि कुपोषणामुळे आजारी पडून यातील अनेक मुलांचा बळी गेला आहे. या शाळांच्या इमारती निकृष्ट प्रतीचे बांधकाम असलेल्या होत्या. कॅनडातील कडाक्याच्या थंडीत इमारती उबदार ठेवाव्या लागतात. अशी कोणतीही व्यवस्था या निवासी शाळात दिसत नाही. ऊब यावी म्हणून लाकडे पेटविली तर अनेकदा आगी लागत. यात बरीच मुले होरपळून मरत तर काही ही संधी साधून पळूनही जात. पण बाहेरच्या कडाक्याच्या थंडीत ती गारठून मरून जात. कारण त्यांची घरे शेकडो मैल दूर असत. याशिवाय अस्वच्छ स्वच्छतागृहांमुळेही मुलांना अनेक आजार होत. इतर अनेकांना शारीरिक छळ आणि लैंगिक गैरव्यवहार यांनाही सामोरे जावे लागे. अशा अनैसर्गिक कृत्यांमुळे मुले मरून तरी जात नाहीतर आत्महत्येचा पर्याय तरी निवडीत असत. या शाळांमध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त मुले कोंबली जात, कर्मचारी वर्ग अपुरा असे आणि शाळांची आर्थिक स्थिती हालाखीची असे. पण मूळ निवासींच्या मते मृतांचा आकडा केवळ 6000 नाही तर 10,000 ते 50,000 इतका असला पाहिजे. शिकवायला म्हणून ज्यांना जबरदस्तीने उचलून नेले, ती मुले अनेकदा कधी परत आलीच नाहीत, अशा आशयाच्या कथा मूळ निवासींच्या कुटुंबात पिढ्यान पिढ्या सांगितल्या जात असत. त्या भाकडकथा नव्हत्या, हे आता स्पष्ट झाले आहे. जी मुले परतत ती पार बदलून गेलेली असत. मृत्यूनंतरचीही भावनाशून्यता निवासी शाळेतील मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ते पालकांना कळविणे आणि त्याचे पार्थिव घरी पाठविणे, ही एक सर्वमान्य प्रथा आहे. पण या दुर्दैवी मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या नशिबी हेही नव्हते. पहिल्या महायुद्धानंतर पसरलेल्या क्षय आणि आजच्या कोरोनासारख्या स्पॅनिश फ्ल्यूच्या साथीने निवासी शाळांमध्ये अक्षरशहा थैमान घातले होते. वेगळी सांस्कृतिक ओळख पुसण्याचा प्रयत्न 1863 ते 1998 या काळात 1 लक्ष 50 हजार मूळ निवासींची मुले घरातून ओरबाडून या शाळात टाकण्या आली. मुलांवर आपली भाषा बोलण्यास बंदी असे, त्यांच्या सांस्कृतिक प्रथेनुसार त्यांना व्यवहार करता येत नसत, त्यांची सांस्कृतिक ओळख पुसून टाकण्याचा हा प्रकार (कल्चर इरेझर) होता, अनेकांशी गैरव्यवहार होत होता, त्यांना हीन/कमी प्रतीचे म्हणून वागवण्यात आले. फ्लोरेन्स स्पॅरव्हिअर नावाच्या एका माजी विद्यार्थिनीने या विषयाला एका पत्रपरिषदेत तपशीलवार वाचा फोडली आहे. ते आम्हाला मानव समजालाच तयार नव्हते, असे मत तिने नोंदविले आहे. घरी न परतलेल्या विद्यार्थ्यांचे काय झाले, याची चौकशी करण्यासाठी सुरवातीला 2008 साली आणि नंतर 2015 साली नेमलेल्या नॅशनल ट्रुथ ॲंड रिकनसिलिएशन कमीशनने 1883 ते 1996 या काळात घडत असलेला हा प्रकार सांस्कृतिक वंशविच्छेद या सदरात मोडतो, असे नमूद केले आहे. या अहवालाची दखल घेत कॅनेडियन शासनाने दिलगिरी व्यक्त करीत क्षमायाचनाही केली. पण ज्या रोमन कॅथोलिक चर्चच्या नियंत्रणात अशा 70 % निवासी शाळा होत्या, त्यांनी आजतागायत माफी मागितलेली नाही. फर्स्ट नेशन्सचा भावनिक उद्रेक ब्रिटिश कोलंबिया, सॅस्कातचेवान, मॅनिटोबा आणि टोकाच्या न्यू ब्रुन्सविक प्रांतातील अनेक शहरांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त करीत 1 जुलैचा कॅनडादिनाचा कार्यक्रम रद्द केला होता. निदर्शकांनी मॅनिटोबा राज्यातील राणी व्हिक्टोरिया आणि विद्यमान राणी एलिझाबेथ यांच्या पुतळ्यांना, रक्तलांछनाचे प्रतीक म्हणून, लाल रंग फासला, सागरी संशोधक आणि ब्रिटिश प्रवासी कॅप्टन कुकचा पुतळा तर उखडून समुद्रात फेकून दिला, या उद्रेकात कॅनडाचे पहिले पंतप्रधान जॅान मॅक्डोनल्ड यांच्या देशभरातील पुतळ्यांचाही समावेश आहे, हे सांगितल्यानंतर फर्स्ट नेशन्सच्या क्षोभावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खुद्द पोप यांनी स्वत: कॅनडात येऊन क्षमायाचना केली पाहिजे, असे म्हटले आहे. पण पोप यांनी झाल्याप्रकाराबद्दल अगोदरच दु:ख व्यक्त केले असले आणि मूळ निवासींचे अधिकार आणि त्यांची संस्कृती यांच्या बाबतीत आदराची भावना असली पाहिजे, असेही म्हटले असले, तरी क्षामायाचना मात्र केलेली नाही. सलोख्यासाठीचे प्रयत्न सफल होतील? या प्रकाराची जबाबदारी एक राष्ट्र म्हणून आम्ही स्वीकारतो आहोत, असे स्वत: कॅथोलिक असल्याच्या पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी मान्य केले आहे. पण त्यांनी पुतळे फोडण्याच्या/त्यांना विद्रुप करण्याच्या कृत्याचा निषेध केला आहे. आजची चर्चेस लोकहिताची, समाजसेवेची, माानवसेवेची भूमिका स्वीकारून कार्य करीत असतांना त्यांना आगी लावणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न त्यांनी केला आहे. यामुळे फर्स्ट नेशन्स आणि अन्य घटकांमध्ये सलोखा, मनोमीलन घडवून आणण्याच्या प्रयत्नांना खीळ बसते आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. गतकाळात घडलेली प्रकरणे आज उकरून काढण्यात काय अर्थ आहे, असे मानणारा एक मोठा वर्ग कॅनडात आहे. पण झालेल्या चुका मान्य करणे, त्याबाबत दिलगिरी व्यक्त करणे, ही वर्तमानकाळात न्यायोचित भूमिका स्वीकारण्या अगोदरची पायरी आहे, हे नाकारता येईल का, असा प्रतिप्रश्न विचारणारा दुसरा वर्गही तेवढाच मोठा आहे. हे काहीही असले तरी कॅनडातील फर्स्ट नेशन्सच्या मनातील ही धगधगती आग शांत होण्यास मॅकेन्झी, युकॅान, सेंट लॅारेन्स, कोलंबिया आणि सॅस्कातचेवान या कॅनडाच्या 5 प्रमुख नद्यांमधून बरेच पाणी वाहून जावे लागणार आहे, हे मात्र सत्य आहे. टीप: आकृती वेगळ्या ईमेलने पाठवीत आहे.

No comments:

Post a Comment