Thursday, July 1, 2021

खलिस्तानचे खलत्व आणि खलांची खलबते वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? भारत आणि पाकिस्तानातील शीखबहुल भाग आणि अन्य काही प्रदेश यांचे मिळून शिखांचे खलिस्तान नावाचे शीख धर्मीयांचे स्वतंत्र राष्ट्र असावे, अशी काही शिखांची मागणी असून तिला पाकिस्तानच्या आयएसआय (इंटर स्टेट इंटेलिजन्स) या गुप्तहेर संघटनेची संस्थेची केवळ फूसच नाही तर साह्यही आहे. ती भारत, अफगाणिस्तान यासारख्या अनेक देशातही उत्पात घडविणे, तिथल्या बंडखोर गटांना सर्वप्रकारे मदत करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर कट रचणे आणि अमलात आणणे अशीच कामे करतांना आजवर प्रत्यक्षात आढळून आली आहे. खलिस्तानाबाबत सहानुभूती असणारे लोक मुख्यत: कॅनडा, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये तसेच इतर देशातही आढळून आले आहेत.. खलिस्तानची चळवळ केव्हा आणि कशी रुजली? ब्रिटिशांच्या ‘फोडा आणि झोडा’ या नीतीला अनुसरून पंजाबमध्येही हिंदू, मुस्लिम, शीख आणि बौद्ध यात त्यांनी दुहीची बीजे पेरली. परिणामत: 1930 मध्ये शिखांनी स्वतंत्र शीख राज्याची मागणी केली तर हे मुस्लिम राज्य असावे असा पवित्रा मुस्लिम लीगने घेतला. खलिस्तानची फुटिरतावादी चळवळ 1980 च्या सुमारास स्वतंत्र भारतात विशेष प्रमाणात दिसू लागली होती. त्यावेळी खलिस्तानमध्ये भारत आणि पाकिस्तानातील पंजाब हा भूभाग, याशिवाय चंदिगडसकट उत्तर आणि पश्चिम भारतातील काही भूभाग समाविष्ट असावा, अशी त्यांची भूमिका होती. या कल्पनेला पाकिस्तानचे त्यावेळचे पंतप्रधान झुलपिकार अली भुट्टो यांचा केवळ पाठिंबाच नव्हता तर त्यांनी तिला खतपाणीही घातले होते. म्हणूनच पाकिस्तानचा खलिस्तानला पाठिंबा आहे, असा सार्थ दावा खलिस्तान चळवळीचे संस्थापक सदस्य जगजितसिंग चौहान यांनी त्या काळात केला होता. पण पोलिसांची कठोर कारवाई, अंतर्गत कलह आणि मुख्यत: खुद्द शिखांचाच भ्रमनिरास यामुळे 1990 च्या सुमारास ही चळवळ भारतात जवळजवळ संपुष्टात आली. पाकिस्तान आणि खलिस्तान फाळणीच्या वेळी पाकिस्तानमध्ये 20 लक्ष शीख राहत होते तर आज मात्र केवळ 50 हजारच उरले आहेत. इतर एकतर मारले तरी गेले किंवा परागंदा होऊन भारतात किंवा इतरत्र स्थलांतरित तरी झाले असतील किंवा त्यांचे धर्मांतर तरी करण्यात आले असणार. असे असूनही आजचे खलिस्तानवादी आयएसआयशी जवळीक साधून भारतविरोधी कारवायात सहभागी होतात, याला काय म्हणावे? खरेतर त्यांचा संघर्ष पाकिस्तानशी असायला हवा होता. त्यांच्या खलिस्तानच्या स्वप्नात पाकिस्तानमध्ये गेलेला पंजाबच प्रमुखपणे असायला नको होता का? पण त्याचा सस्कर विसर खलिस्तान्यांना पडला आहे, याला काय म्हणावे? पण त्याचबरोबर भारतातील आणि बाहेरच्याही बहुसंख्य शिखांना हे मान्य नाही, हे एक सुचिन्हच म्हटले पाहिजे. भुट्टो आणि झिया-उल-हक यांची दिवास्वप्ने भारतावर सतत हल्ले करून त्याला रक्तबंबाळ करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न गेली अनेक वर्षे सुरू आहेत. 1971 पूर्वी पाकिस्तानमध्ये जनरल याह्याखान यांचे लष्करी शासनातले सहकारी या नात्याने झुलपिकारअली भुट्टो यांनी प्रथम पूर्वेकडील भारतीय सैन्याचा पराभव करायचा आणि भारताचा संपूर्ण पूर्वभाग व्यापून होताच त्याला पाकिस्तानच्या दुसऱ्या भागाशी जोडण्यासाठी एक रुंद रस्ता (कॅारिडॅार) उरलेल्या भारतातून कोरून काढण्याची योजना मांडली होती. तसेच काश्मीर मुक्त करायचे आणि शीखबहुल पंजाबाचे रुपांतर खलिस्तानमध्ये करायची योजना मांडली होती. पुढे जनरल झिया-उल हक यांनी मुस्लिम आणि शीख यातील परंपरागत वैरावर मैत्रीचा तोडगा काढायचा असे ठरविले. शिखांच्या श्रद्धास्थानांना पूर्वीची स्थिती प्राप्त करून द्यायची आणि श्रद्धाळूंना यात्रा करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे ठरविले. स्वप्न विरले कसे? इंग्लंड आणि अमेरिकेतून शीख श्रद्धाळूंनी या श्रद्धास्थानांना भेट देण्यास सुरवात केली. ही मंडळी खलिस्तानची मागणी करण्याचे बाबतीत आघाडीवर होती. त्यांच्या मुक्कामात पाकिस्तानातील शिखांसमोर खलिस्तानचा प्रचार केला जाऊ लागला. जनरल अब्दुल रहमान यांनी आयएसआय मध्ये एक स्वतंत्र कक्ष स्थापन केला. भारतातील शिखांच्या ‘स्वातंत्र्यलढ्याला’(?) साह्य करणे हा यामागचा मुख्य हेतू होता. अब्दुल रहमान प्रौढीने सांगत असत की, शिखांना पूर्ण प्रांत पेटवता आला आहे. कुणाला ठार करायचे, कुठे बॅाम्ब पेरायचे, कोणती कार्यालये उडवायची हे त्यांना चांगले कळले आहे. धगधगणारा अस्थिर पंजाब ही जणू पाकिस्तानी सैन्याची बिनखर्चाची डिव्हिजनच आहे, अशी दर्पोक्ती जनरल हमीद गुल यांची होती. खुद्द झिया-उल हक मात्र असे काहीही नाही, असे वरवर आणि वारंवर जगभर सांगायचे. भारताने पंजाब आणि पाकिस्तानच्या सीमा भरभक्कम कुंपण घालून बंद केल्यानंतरच भारतातील खलिस्तानी चळवळ हळूहळू विरली. अमेरिका जून 1984 मध्ये न्यूयॅार्क टाईम्समध्ये एक बातमी प्रकाशित झाली. अमेरिकेची गुप्तहेर संस्था सीआयए पंजाबमध्ये अशांतता निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे,अशा आशयाची ती बातमी होती. याच सुमारास भारतीय वृत्तपत्रात एक वृत्त प्रसिद्ध झाले होते, ते असे की, सीआयए जर्नेलसिंग भिंद्रावाले यांच्या अनुयायांना शस्त्रास्त्रांची मदत आणि साह्य पाकिस्तानकरवी करणार होती. अशीच माहिती रिसर्च ॲंड ॲनलिसिस विंगलाही (रॅा) मिळाली होती. 2006 मध्ये अमेरिकन न्यायालयाने खलिद आवान ह्या धर्माने मुस्लिम आणि कॅनडातील पाकिस्तान्याला दहशतवादी कारवायातील सहभागासाठी शिक्षा ठोठावली. 2008 मध्ये तर भारतीय गुप्तहेर खात्याला पक्की माहिती मिळाली होती की, आयएसआय शीख अतिरेक्यांना उठाव करण्यासाठी साह्य करते आहे. कॅनडा सुवर्ण मंदिरातील ॲापरेशन ब्ल्यू स्टार नंतर लगेच कॅनडामध्ये अतिरेकी शिखांनी कॅनडात उचल खाल्ली होती. कॅनडाच्या संसदेचे मवाळ सदस्य उज्जल दोसांग यांनी अतिरेक्यांविरुद्ध विचार व्यक्त करताच त्यांना धमक्या देण्यात आल्या. कॅनेडियन शीख असलेले तारासिंग हे इंडो - कॅनेडियन टाईम्सचे प्रकाशक होते. एकेकाळी ते खलिस्तानसमर्थक होते. पण त्यांनी एअर इंडियाची फेरी क्रमांक 182 च्या बाबतीतल्या घातपातावर कडक टीका केली होती. हा कट रचला जात असतांनाचा संवाद आपल्या कानावर पडला असून तशी साक्ष आपण देणार आहोत, असे त्यांनी जाहीर केले होते. तरसेम सिंग पुरेवाल ब्रिटनमधील पंजाबी साप्ताहिक देस परदेसचे संपादक होते. यांचीही हत्या करण्यात आली. शीख जहालवादाबाबतची त्यांची शोधपत्रकारिता या हत्येला कारणीभूत असल्याचे मानले गेले. वर्ल्ड सिख ॲार्गनायझेशन ॲाफ कॅनडाने (डब्ल्यूएसओ) शिखांच्या दहशतवादी कारवायांवर प्रकाश टाकणाऱ्या वृत्तसंस्थेवर मानहानी, खोटेपणा आणि बदनामीचा (डिफेमेशन, स्लॅंडर ॲंड लायबेल) आरोप ठेवत खटला भरला. पण 2015 मध्ये मात्र याबाबत पुढे काहीही न करण्याचा निर्णय घेतला. ही बाब पुरेशी बोलकी ठरली आहे. कॅनडामधील ज्यांनी ज्यांनी खलिस्तानविरोधी लिखाण केले त्या सर्वाना जिवे मारण्याच्या धमक्या अगोदरपासूनच मिळत आहेत. 2008 मध्ये डॅा मनमोहनसिंग यांनी शिख दहशतवादाबाबत चिंता व्यक्त केली होती. 2017 मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यावर ते खलिस्तानला सहानुभूती दाखवीत असल्याचा आरोप करीत त्यांची भेट घेण्यास नकार दिला होता. अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी, खलिस्तान हा मुद्दा न कॅनडात आहे न पंजाबात, असे ठणकावून सांगितले. तेव्हा जस्टिन ट्रूडो यांनी भूमिका जाहीर केली की, कॅनडा खलिस्तान चळवळीच्या पुनरुज्जीवनाला समर्थन देणार नाही. पण आज 2020 मध्ये किसान आंदोलनाच्या निमित्ताने कॅनडा, ॲास्ट्रेलियादी देशात उमटलेल्या प्रतिक्रिया याच जातकुळीच्या आहेत. ब्रिटन 2008 मध्ये फेब्रुवारी महिन्यात पंजाब पोलिस प्रमुखांनी आरोप केला होता की, अतिरेक्यांना ब्रिटनमधील शीखांकडून आर्थिक मदत मिळत असते. बबर खालसा आपल्या अनुयायांना पाकिस्तानमधील अल कायद्याच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी पाठवीत असते. या वृत्ताची पुष्टी बीबीसीने केलेली असल्यामुळे त्याचे महत्त्व वेगळे आहे. इंटरनॅशनल सिख यूथ फेडरेशन (आयएसवायएफ) या संघटनेचे सदस्य खून, बॅाम्बहल्ले, आणि अपहरण यासारख्या कृत्यात सहभागी असून हा राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका आहे. पण अमेरिकेत ही संघटना अतिरेकी मानली जात नाही. बब्बर खालसा, बब्बर खालसा इंटर नॅशनल, इंटरनॅशनल सिख यूथ फेडरेशन यांना कॅनडात दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारताबाहेरील शिखांचे काही गट आजही पैशाचे प्रलोभन दाखवून शिखांना खलिस्तानी गटात सामील करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. किसान आंदोलनाचे निमित्ताने ही बाब पुन्हा एकदा उघडकीस आली आहे, एवढेच!

No comments:

Post a Comment