Monday, July 26, 2021

विळ्या भोपळ्यांची झाली मैत्रिस्तव भेट ! मंगळवार, दिनांक २७/0७/२०२१ वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची संभावना एक हत्यारा आणि विधिनिषेध नसलेला नेता या शब्दात नुकतीच केली होती. बहुदा हे लक्षात ठेवूनच बायडेन हा वयोवृद्ध नेता मागे एकदा जसा विमानातून उतरतांना पाय घसरून पडतापडता वाचला होता, तसे यावेळी झाले नाही, असे म्हणत रशियाने त्यांच्यावर स्तुतीसुमने वाहिली. रशिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध सध्या किती स्नेहाचे (?) झाले आहेत, याची साक्ष पटविण्यासाठी हे उदाहरण पुरेसे ठरावे. असे अतिशय तणावग्रस्त संबंध असतांना अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची ही बहुप्रतिक्षित भेट एकदाची पार पडली. या अगोदर, कुठे भेटायचे, काय आणि कायकाय बोलायचे यावरच उभय बाजूंच्या प्रतिनिधीत कितीतरी दिवस काथ्याकूट सुरू होता. या भेटीत, शस्त्रकपात आणि रशियाचे अमेरिकेवरील कथित सायबर हल्ले, हे चर्चेचे दोन मुख्य विषय होते. अशा भेटीत प्रश्नांची एकदम सोडवणूक होईल, अशी कोणाचीच अपेक्षा नसते. पण भेटीनंतर तणावाची तीव्रता थोडीशी का होईना, पण कमी होत असते, हे खरे आहे, नाही म्हटले तरी, काही लहानसहान मुद्दे निकालीही निघू शकतात, हेही अगदीच खोटे नाही. ही चर्चा चालणार होती 5 तासभर! पण आटोपली 65 मिनिटानंतरच. पहिल्या सत्रानंतर चहा किंवा पेयपान आणि नंतर दुसरे सत्र, असे ठरले होते. पण दुसरे सत्र झालेच नाही. ही घटना चर्चेच्या यशस्वितेवर (?) प्रकाश टाकणारी आहे, असे निरीक्षकांना वाटते आहे. पण उभयपक्षी संबंध सुधारण्याचीच इच्छा असल्याचे लक्षात आल्यानंतर, चर्चेतच उगीच वेळ कशाला घालवायचा असे स्वत: खुद्द बायडेनच म्हणाले आहेत. ही वस्तुस्थिती समजायची की सारवासावर? या विषयावर अभ्यासकात अनेक दिवस चर्चा होत राहील. बायडेन यांनी पुतिन यांना भेट म्हणून एक उंची गॅागल आणि उधळलेल्या सांडाचे एक रेखीव शिल्प आणले होते. हे शिल्प आणि भेटणारी व्यक्ती यात साम्य शोधण्याचा विचार काही खवचट डोक्यात येईलही, पण त्यात काही अर्थ नाही. पुतिन यांनी अशी काही भेट दिल्याचे वृत्त निदान समोरतरी आलेले नाही. पण मागे डोनाल्ड ट्रंप यांना मात्र पुतिन यांनी एक चमचमणारा सॅासर बॅाल भेट म्हणून दिला होता. यजमान देश स्विट्झर्लंडने आगतस्वागत करीत भेटीसाठी योग्य वातावरण राहील, याची पुरेपूर काळजी घेतली होती. दक्षिण टोकाला असलेल्या जिनेव्हा येथील तलावाच्या नयनरम्य आणि प्रसन्न वातावरणात, एका टुमदार घरात ही कोरडी चर्चा घडून आली. बायडेन यांनी पदग्रहण केल्यानंतरच्या पहिल्याच परदेश दौऱ्यात जी-7 च्या शिखर परिषदेत आणि आणि नाटोच्या नेतेगणांसोबतही, यशस्वी वाटाघाटी केल्या होत्या. या दुहेरी यशाचे पाठबळ घेऊन, एखाद्या विजयी वीराचा आत्मविश्वास गाठीशी बांधून, बायडेन पुतिन यांच्यासमोर चर्चेसाठी उभे ठाकले होते. हा त्यांच्या दौऱ्यातला अंतिम थांबा होता. रशिया आणि अमेरिकेचे संबंध सध्या कधी नव्हे इतके बिघडलेले आहेत. रशियाच्या वैऱ्यांच्या यादीत तर आज अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. भेटीच्या वेळची ही उत्साहवर्धक (?) पृष्ठभूमी लक्षात ठेवूनच या भेटीचे मूल्यमापन केले पाहिजे. राष्ट्राराष्ट्रातील संबंध सुधारायचे असतील तर संवाद ही महत्त्वाची पायरी आहे. तिला वगळून स्थायी स्वरुपाचे संबंध निर्माण होणार नाहीत किंवा भविष्यात संबंध कसे असतील याविषयी अंदाजही बांधता येणार नाहीत, अशा आशयाची प्रतिक्रिया बायडेन यांनी भेटीनंतर दिली तर पुतिन म्हणाले की, सहकार्य करू शकू, असे काही विषय या भेटीत आम्हाला गवसले आहेत. पण क्रेमलिन आणि व्हाईट हाऊस यांच्या जाहीर व अधिकृत प्रतिक्रियेत मात्र फारसे आशादायक चित्र रंगलेले दिसले नाही. भेटीपूर्वी चर्चेला सुरवात करण्यापूर्वी दोन्ही नेते माध्यमांच्या प्रतिनिधींना सामोरे गेले. जागातील दोन महसत्तांचे नेते एकमेकांशी चर्चा करीत आहेत, असे बायडेन म्हणाले. एकमेकांशी समोरासमोर भेटून सोक्षमोक्ष लावलेला बरा, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. पण या संपूर्ण काळात आणि आणि कॅमेरांचा क्लिकक्लिकाट होत असतांना या दोघांनी एकमेकांकडे पाहिले सुद्धा नाही. नंतर ते चर्चा करण्यासाठी बंद खोलीत गेले. खोलीच्या भिंतींना लागून पुस्तकांची कपाटेच तेवढी होती. खोलीबाहेरचा परिसर जेवढा निसर्गरम्य आणि लोभस होता तेवढाच खोलीत कोरडेपणा होता. हे छायाचित्रकारांच्या आणि वार्ताहरांच्या नजरेतून न सुटलेले तपशील बोलकेच म्हटले पाहिजेत. भेटीनंतर एका खवचट पत्रकाराने बायडेन यांना प्रश्न विचारला की, पुतिन यांच्या शब्दावर तुमचा विश्वास आहे का? यावर बायडेन यांनी संमतीदर्शक मान डोलावली. पण नंतर काही तासांनीच व्हाईटहाऊसने खुलासा केला की, बायडेन यांचा हा अभिप्राय सर्वसाधारण स्वरुपाचाच होता. त्याला कोणत्याही एका प्रश्नाशी जोडून पाहिले जाऊ नये. व्हाईट हाऊसच्या या खुलाशावर टिप्पणी करण्याची आवश्यकता आहे का? दुसऱ्या एका वार्ताहराने पुतिन यांना ओरडतच विचारले की, तुम्हाला नवाल्नीची भीती वाटते का? यावर पुतिन यांनी ऐकले नाहीसे दाखवणेच पसंत केले. अशा या जुगलबंदींची दखल वृत्तसृष्टीने घेतली नसती, तरच नवल होते. जे नेते एकमेकांच्या देशात जाऊन एकमेकांची भेट घेऊ शकत नाहीत/इच्छित नसतात, ते परस्परांना स्वित्झर्लंड या तटस्थ राष्ट्रात भेटत असतात, असे म्हणतात. संयुक्त राष्ट्र संघटनेचे आणि रेडक्रॅासचे कार्यालय असलेले जिनेव्हा सरोवराकाठचे जिनोव्हा शहर बैठकीसाठी निवडले होते. बर्फाच्छादित पर्वतशिखरे, तुडुंब भरलेले तलाव, बॅंकिंग, स्किईंग, घड्याळे आणि चॉकोलेट आदींसाठी प्रसिद्ध असलेल्या स्विट्झर्लंडचे अध्यक्ष गाय पर्मेलीन यांचेकडे यजमानपद होते. त्यांनी दोन्ही पाहुण्यांचे हस्तांदोलन करीत प्रसन्न मुद्रेने स्वागत केले. त्यावेळचा आणखी एक प्रसंग! स्वागतानंतर बायडेन आणि पुतिन यांनीही परस्परांशी हस्तांदोलन केले. यावेळी अनुभवी आणि वयोज्येष्ठ राजकारणी बायडेन यांनी पुढाकार घेत हात अगोदर पुढे केला आणि स्मितहास्यही केले. पण काही क्षण थांबून, मगच हस्तांदोलनासाठी आपला हात पुढे करतांना कृतिवीर पुतिन यांचा चेहरा मात्र निर्विकार होता. राजकारणात येण्यापूर्वी पुतिन केजीबी या रशियन हेरखात्यातील माजी लेफ्टनंट कर्नल आणि एक कुस्तीगीरही होते, याचा तर हा परिणाम नव्हता ना? आज मात्र या बलाढ्य नेत्याला कंपवात (पार्किनसन्स डिसईज) झाल्याचा संशय आहे. पत्रकार भोचक असतात, असे म्हणतात. हे कितपत खरे आहे, ते सांगता यायचे नाही. पण त्यांची दृष्टी तीक्ष्ण आणि नेमके ते अचूक टिपणारी / हेरणारी तर बुद्धी, रहस्यभेद करणारी असते, हे मात्र या नोंदींवरून स्पष्ट होते. पण असा मिरचीमसाला हवाच! कोरडी वर्णने आस्वाद्य तर सोडाच पण वाचनीय तरी ठरतील का? प्रश्न, सुटलेले आणि लटकलेले एकमेकांच्या देशात राजदूत पुन्हा नव्याने नेमले नसते तर ते उभयपक्षीच नव्हे तर जगाच्या दृष्टीनेही हानीकारक ठरले असते. पण असे न होता राजदूत नेमण्याबाबत सहमती झाली, ही मोठीच उपलब्धी म्हणायची. अण्वस्त्र नियंत्रण - याबाबत पूर्वीपासूनचीच सहमती असलेल्या न्युक्लिअर आर्म्स ट्रिटीची मुदत संपते आहे ती यापुढेही वाढविण्यात यावी, अशी भूमिका रशियाने मांडली. याबाबतही उभयपक्षी सहमती झाली. सायबर हल्ले - अमेरिकेवर होत असलेल्या सायबर हल्यासाठी अमेरिकेने रशियाला जबाबदार मानले तर रशियाने हा आरोप साफ नाकारला. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचे वेळी रशियाची नसती ढवळढवळ सुरू होती, हा आरोप ऐकताच, कानावर हात ठेवीत, भलतेच काय बोलता, असे पुतिन यांनी म्हटल्याचे वृत्त आहे. अमेरिकेचे दोन खलाशी रशियाच्या ताब्यात आहेत तर रशियाचे अमेरिकेत बंदिस्त असलेले अधिकारीही सुटकेची वाट पाहत आहेत. याबाबत अदलाबदलीच्या आधारावर हा प्रश्न सुटू शकेल, अशी भूमिका पुतिन यांनी घेतल्याचे समजते आहे. अलेक्सी नवाल्नी - विरोध पक्ष नेते नवाल्नी यांचा तुरुंगवास आणि त्यांच्यावर विषप्रयोग केल्याचा आरोप, हे रशियाचे अंतर्गत प्रश्न आहेत. म्हणून ते चर्चेच्या परिघाबाहेरचे राजकीय विषय आहेत, अशी रशियाची भूमिका होती. तर यावर चर्चाही करायची नाही, हे अमेरिकेला मुळीच मान्य नव्हते. नवाल्नी यांचे काही बरेवाईट झाल्यास त्याचे भयंकर परिणाम होतील, असे बायडेन यांनी पुतिन यांना बजावल्याचे वृत्त आहे. युक्रेन - युक्रेनचा भाग असलेल्या क्रिमिया द्विपकल्पाला रशियाने जोडून घेतल्यानंतर आता युक्रेनच्या सीमेलगत रशियन फौजा तैनात आहेत. युक्रेनची नाटोत सामील होण्याची भूमिका कळताच रशिया खवळून उठला आहे. काहीही करून पुतिन यांना युक्रेन हवाच आहे. ही बाब त्यांनी बायडेनपासून लपवून ठेवली नाही. सीरिया - सीरियाच्या अध्यक्षांविरुद्ध असलेल्या बंडखोरांना अमेरिका मदत करते आहे तर अध्यक्षांना रशिया मदत करतो आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने या बंडखोरांना मदत करण्यासाठी तुर्कस्तानातून एक बोळ (कोरिडॅार) तयार केली आहे. ही बोळ रशियाने बंद करू नये, असे अमेरिकेने रशियाला बजावले आहे. उभयतांच्या तात्त्विक भूमिका उभयपक्षी होणाऱ्या अशा चर्चांमधूनच परराष्ट्र नीती आकाराला येत असते. या चर्चा एखादी गुप्तलीपी उलगडण्यासारख्या असतात. तेच कौशल्य चर्चा करतांनाही असावे लागते. शेवटी परराष्ट्र नीती अशा चर्चांमधून निर्माण होणाऱ्या वैयक्तिक संबंधातूनच विस्तार पावत असते, कारण मानवी मनाचे कार्य असेच चालत असते’, अशा आशयाचे उद्गार बायडेन यांनी पत्रकार परिषदेचा समारोप करतांना काढले. काही मूलभूत नियमांचे आपण सर्वांनी पालन केलेच पाहिजे. हे बायडेन यांनी पुतिन यांना स्पष्ट शब्दात जाणवून दिले. तर बायडेन यांच्याबद्दल बोलतांना पुतिन मोजकेच शब्द वापरीत म्हणाले की, बायडेन हे एक समतोल वृत्ती असणारे गृहस्थ आहेत. त्यामुळे आमचे विचार पुष्कळसे सारखे आणि जुळणारेच आहेत, हे माझ्या लक्षात आले आहे. जागतिक राजकारणात असच बोलायचं असतं. तरीही अण्वस्त्रधारी देशांचे प्रमुख असलेल्या या दोन नेत्यांनी समोरासमोर बसून, एकमेकांच्या डोळ्याला डोळा भिडवून, बातचीत केली ही एक उपलब्धीच आहे, यावर मात्र निरीक्षकांचे एकमत आहे.

No comments:

Post a Comment