My son (Ajit), and daughter-in-law (Neelam) suggested to me that I should have a blog of my own. Because of their kind suggestion, I have created this blog.
Friday, July 2, 2021
जम्मू आणि काश्मीरमधील निवडणुका
एक वस्तुनिष्ठ विश्लेषण
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
5 ॲागस्ट 2019 ला कलम 370 आणि 35 ए रद्द झाले. त्याचवेळी लडाख वगळून जम्मू आणि काश्मीरचा एक स्वतंत्र विभाग झाल्यावर तिथल्या जिल्हा विकास मंडळांच्या / डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काऊन्सिलच्या (डीडीसी) निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या सर्व निवडणुका एकहीगंभीर स्वरुपाचा अपप्रकार न होता शांततेत सुव्यवस्थित रीतीने पार पडल्या, हा लोकशाहीचा आणि निवडणूक प्रक्रियेचा फार मोठा विजयच मानला पाहिजे. दुसरे असे की, पीपल्स अलायन्स फॅार गुपकार डिक्लरेशन (पीएजीडी किंवा गुपकार) या नावाने सात पक्षांनी आघाडी स्थापन करून निवडणुका एकत्र येऊन उत्तम सहकार्य साधत लढवल्या आणि चांगले यशही संपादन केले, त्यामुळे निवडणुका योग्य वातावरणात पार पडल्या आहेत, हे सिद्ध करण्याची वेगळी गरज पडलेली नाही. या निवडणुकीची सांख्यिकीय माहिती आता निवडणूक यंत्रणेकडून आणि अन्य प्रकारेही उपलब्ध झाली आहे. जम्मू भागात 70 टक्यापेक्षा जास्त तर काश्मीर खोऱ्यात 30 टक्यापेक्षा जास्त मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संवेदनशील आणि जिज्ञासू मनाशी हे आकडे बोलत असतात. अशा अभ्यासूंसाठी ही माहिती बरीच उपयोगी पडू शकेल असे वाटते. तसेच त्यामुळे निवडणुकी पलीकडचा निकाल कळायलाही मदत होऊ शकेल, असे वाटते.
जिल्हा विकास मंडळ - रचना आणि स्वरूप
विकास हाच प्रमुख हेतू समोर ठेवूनच जिल्हा विकास मंडळांची स्थापना झाली असणार, हे सांगायला नको. पण राज्यातील राजकारणाची भावी काळातली दिशा काय असेल, याचा अंदाज या निवडणुकींच्या निकालाने स्पष्ट होणार आहे, हेही नक्की आहे. सुरवातीला जिल्हा विकास मंडळ ही रचना काय आहे, ते समजून घेणे उपयोगाचे ठरेल. या नवीन केंद्रशासित प्रदेशाचे जम्मू (लोकसंख्या सुमारे 1 कोटी 50 लक्ष) आणि काश्मीर खोरे (लोकसंख्या सुमारे 1 कोटी 36 लक्ष) असे दोन भाग करून प्रत्येकात दहादहा जिल्हे निर्माण केले असून प्रत्येकासाठी 14 असे समसमान प्रतिनिधींचे एक जिल्हा विकास मंडळ तयार केले आहे. या 14 प्रतिनिधींची निवड करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात 14 मतदारसंघ तयार केले आहेत. जम्मू व काश्मीरचे प्रत्येकी दहा या प्रमाणे एकूण वीस जिल्हे तयार झाले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात ज्या पक्षाचे किमान 8 (आठ ) प्रतिनिधी निवडून येतील, त्या पक्षाची सत्ता त्या जिल्ह्यात प्रस्थापित होईल. सर्व म्हणजे 20 जिल्ह्यांचे प्रत्येकी 14 याप्रमाणे एकूण 280 प्रतिनिधी होतात. यापैकी 2 मतदारसंघात मतदान होऊनही निवडणुका स्थगित करण्यात आल्या कारण यातील प्रत्येकी एका उमेदवाराच्या राष्ट्रीयतेबद्दलच प्रश्न निर्माण झाला आहे. हे उमेदवार पाकव्याप्त काश्मीरमधील आहेत, काश्मीरचे रहिवासी नाहीत, असा संशय आहे. अशाप्रकारे 278 जागांचेच निकाल सध्या जाहीर झाले आहेत. जम्मू आणि काश्मीर खोरे यातील प्रतिनिधींची संख्या सारखीच म्हणजे प्रत्येकी 140 असणे, ही बाब भविष्यात महत्त्वाची सिद्ध होईल. विधान सभेच्या निवडणुकीचे वेळी मतदारसंघांची संख्या ठरवितांना ही बाब विचारात घ्यावी लागेल. सध्या जम्मूत लोकसंख्या जास्त असूनही काश्मीर खोऱ्याला विधानसभागृहात जास्त प्रतिनिधित्व आहे.
प्रतिसादाचे स्वरूप
जम्मू आणि काश्मीरमध्ये 11 जिल्हे मुस्लिमबहुल आहेत. यापैका 10 जिल्हे काश्मीर खोऱ्यात असून पूंच हा मुस्लिमबहुल जिल्हा जम्मूत आहे. संमिश्र संख्या असलेले 5 जिल्हे जम्मू विभागात आहेत. पूर्णपणे हिंदुबहुल 4 जिल्हे जम्मू विभागात आहेत.
मुस्लिमबहुल जिल्ह्यात गुपका आघाडीला भरपूर मते मिळाली. अन्य उमेदवारांना त्या खालोखाल मते मिळाली. त्या खालोखाल मते कॅांग्रेसला मिळाली. सर्वात कमी मते भाजपला मिळाली.
संमिश्र लोकवस्ती असलेल्या जिल्ह्यात गुपकार आणि भाजपला बऱ्यापैकी मते मिळाली. कॅांग्रेस आणि अन्य उमेदवारांना कमी मते मिळाली.
हिंदूबहुल जिल्ह्यात सर्वात जास्त मते भाजपला मिळाली. अन्य उमेदवारांना कमी मते मिळाली. सर्वात कमी मते गुपकारला मिळाली तर कॅांग्रेसला नगण्य मते मिळाली. कॅांग्रेसचे गुपकारबरोबर जाणे मतदारांना आवडलेले दिसत नाही.
पक्ष आणि उमेदवारांची बजबजपुरी
निवडणुकीत एकूण 2,178 उमेदवार उभे होते. भाजपने 235, नॅशनल कॅानफरन्सने 169, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) 68, जम्मू ॲंड काश्मीर अपनी पार्टीने (जेकेएपी)166, कॅांग्रेसने 157, जम्मू ॲंड काश्मीर पीपल्स कॅानफरन्स (जेकेपीसी) 11 जम्मू ॲंड काश्मीर पीपल्स मूव्हमेंटनेसुद्धा (जेकेपीएम) 11, कम्युनिस्ट पार्टी ॲाफ इंडिया -एम (सीपीआय-एम) ने 8, लोक जनशक्ती पार्टीने (एलजेपी) 6, जम्मू ॲंड काश्मीर नॅशनल पॅंथर्स पार्टीने 54, अन्य काही लहान पक्ष आणि अपक्ष यांनी एकूण 1238 असे सर्व मिळून एकूण 2,178 उमेदवार रिंगणात होते.
विजयी उमेदवारांची संख्या आणि त्यांना मिळालेली मते
पक्षांनी उभ्या केलेल्या उमेदवारांची संख्या, निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या आणि त्यांना मिळालेली मते अशी आहेत. (टीप -भाजप, अपक्ष यांच्या जागांच्या संख्येत एकाचा आणि जेकेएएनसीच्या संख्येत 2 चा फरक पडू शकतो)
भाजप, उभे केले 235 / विजयी 75 / मते 4,87,364
नॅशनल कॅानफरन्स, उभे केले 169/ विजयी 67/ मते 2,82,514
अपक्ष, उभे केले 1238 / विजयी 50/ मते 1,71,420
पीडीपी, उभे केले 68 / विजयी 27/ मते 55,789
कॅांग्रेस, उभे केले 157/ विजयी 26 / मते 1,39,382
जेके अपनी पार्टी, उभे केले 166 / विजयी 12 / मते 38,147
जेकेपीसी, उभे केले 11/ विजयी 8 / मते 43,274
सीपीआय(एम), उभे केले 8/ विजयी 5 / मते 6,407
जेकेपीएम, उभे केले 11/ विजयी 3 / मते 6,754
पीडीएफ, उभे केले ()/ विजयी 2 / मते 7,273
जेकेएनपीपी, उभे केले () / विजयी 2 /मते 12,137
जेके नॅशनल पॅंथर्स पार्टी, उभे केले() / विजयी 2 / मते 12,137
बीएसपी, उभे केले ()/ विजयी 1/ मते 7,397
कुणाचा स्ट्राईक रेट किती?
स्ट्राईक रेटचा (किती जागा लढवल्या आणि किती जिंकल्या) विचार करतांना सध्या दोन जागा वगळूनच विचार करावा लागेल. त्यामुळे सर्व म्हणजे 280 जागांचा निकाल लागेल. तसेच सर्व तपशीलही यायचे आहेत. तेव्हा जो फरक पडेल तो लक्षात घ्या लागणार आहे पण तरीही तुलनात्मक स्थितीत फारसा फरक पडेल, असे वाटत नाही. जेकेपीसी, कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), नॅशनल कॅानफरन्स, पीडीपी, भाजप, जेकेपीएम, कॅांग्रेस, जेकेएपी असा क्रम सध्या लागतो. कमी जागा लढवून त्यातल्या जास्त जिंकणाऱ्याचा स्ट्राईक रेट जास्त तर असे नसणाऱ्यांचा कमी अशी स्थिती असते.
प्रमुख पक्षांना मिळालेली मतांची टक्केवारी.
भाजपला जम्मूत 37. 3 %,खोऱ्यात 4.2 % तर एकूण 28 % मते मिळाली आहेत.
नॅशनल कॅानफरन्सला ला जम्मूत 23 %,खोऱ्यात 35.6 % तर एकूण 26.3 % मते मिळाली आहेत.
पीडीपीला जम्मूत12. 6%,खोऱ्यात 27.7 % तर एकूण 20.6 % मते मिळाली आहेत.
कॅांग्रेसला जम्मूत 21. 2 %, खोऱ्यात17.9 % तर एकूण 20.6 % मते मिळाली आहेत.
भाजपला संपूर्ण प्रदेशाचा विचार केला तर सर्वात जास्त मते 28% मिळाली आहेत. जम्मू भागाचाच विचार केला सर्वात जास्त मते (37. 3%) मिळाली आहेत तर काश्मीर खोऱ्यात सर्वात कमी (4.2 %) मिळाली आहेत.
अटीतटीच्या 19 लढती
19 मतदारसंघात निवडणूक चुरशीची होऊन जागा 100 पेक्षा कमी मतांच्या फरकाने जिंकल्या गेल्या आहेत. अपक्ष 8, भाजप 3, नॅशनल कॅानफरन्स आणि कॅांग्रेस प्रत्येकी 2 आणि जम्मू काश्मीर अपनी पार्टी, पीडीएफ, जम्मू ॲंड काश्मीर, पीपल्स कॅानफरन्स प्रत्येकी एक(1) त्या 19 जागा आहेत.
पक्षनिहाय स्थिती
अ) भारतीय जनता पक्षाने उभ्या केलेल्या 235 उमेदवारांपैकी 75(7) उमेदवार निवडून आले आहेत. त्यातले फक्त 3 (तीन) काश्मीर खोऱ्यातील असले तरी हे तिघेही प्रागतिक विचाराचे सुशिक्षित तरूण उमेदवार आहेत. बहुतेक सर्व विरोधक एकत्र आल्यानंतरही काश्मीर खोऱ्यात भाजपने हा विजय मिळविला आहे. या प्रवेशाने भाजपची काश्मीर खोऱ्यातील अस्पृश्यता संपली असून भविष्यकाळातील मोठ्या विजयाचा हा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकेल. उरलेले 72 उमेदवारही जम्मू विभागातून विरोधकांच्या एकत्रित आघाडीला मात देऊनच निवडून आले आहेत.
पीपल्स अलायन्स फॅार गुपकार डिक्लरेशन (पीएजीडी/गुपकार)
ब) कलम 370 आणि 35ए च्या पुनर्स्थापनेचा प्रमुख उद्देश समोर ठेवून फारुक अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या पीपल्स अलायन्स फॅार गुपकार डिक्लरेशन (पीएजीडी/गुपकार) च्या आघाडीचे अन्य पदाधिकारी असे आहेत. यात प्रवक्ते म्हणून साजीद गनी लोन, उपाध्यक्षा या नात्याने मेहबुबा मुफ्ती, निमंत्रक म्हणून मोहम्मद युसूफ तारीगामी आणि समन्वयकाची जबाबदारी पेलणारे हस्नयन मसूद हे ज्येष्ठ आणि प्रभावी नेते आहेत. या आघाडीत एकूण 7 (सात) घटकपक्ष आहेत. ते असे.
1) नॅशनल कॅान्फरन्स 2) पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) 3) कम्युनिस्ट पार्टी ॲाफ इंडिया -एम (सीपीएम) 4) जम्मू ॲंड काश्मीर पीपल्स कॅानफरन्स (जेकेपीसी) 5) जम्मू ॲंड काश्मीर आवामी नॅशनल कॅानफरन्स (जेकेएएनसी) 6) इंडियन नॅशनल कॅांग्रेस (ऐनवेळी सामील झाली) 7) जम्मू ॲंड काश्मीर पीपल्स मूव्हमेंट पार्टी (जेकेपीएम).
पीपल्स अलायन्स फॅार गुपकार डिक्लरेशन (पीएजीडी) ही आघाडी एकदिलाने लढली. खरेतर तिने 112 जागा जिंकल्या आहेत. ऐनवेळी सामील झालेल्या कॅांग्रेसची 26 मते विचारात घेतली तर ही बेरीज 138 होते. काश्मीर खोऱ्यात तर तिचा वरचष्मा राहिलाच पण जम्मूतील पीर पांचाल आणि चिनाब खोऱ्यामधील मुस्लिमबहुल भागात म्हणजे रामबन, किश्तवार आणि राजोरी या जिल्ह्यात तिला बहुमत मिळाले नसले तरी भरपूर जागा मिळाल्या आहेत. ही आघाडी नसती तर काश्मीर खोऱ्यात भाजपला अजून निदान 4 जागा मिळू शकल्या असत्या. तसेच जम्मू भागातही तिने भाजपच्या विजयी घोडदौडीला आवर घातल्याचे जे चित्र सध्या समोर येते आहे, तसे ते आले नसते. या आघाडीतील एकूण 7 (सात) घटकपक्षांची निवडणुकीतील कामगिरी ही अशी आहे.
1) नॅशनल कॅान्फरन्सने 169 जागा लढविल्या असून एकूण 67 जागा जिंकल्या आहेत. पैगंबरवासी शेख अब्दुल्ला हे आजोबा, फारुक अब्दुला हे वडील आणि ओमर अब्दुल्ला हे नातू यांचा हा पक्ष आहे. या 67 जागांपैकी 42 जागा काश्मीर खोऱ्यातील असून, 25 जागा जम्मू भागातून मिळाल्या आहेत, हे विशेष. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत असले तरी हा जम्मू भागातील मुस्लिमबहुल प्रदेश आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. असे असले तरीहीजम्मू व काश्मीरमध्ये नॅशनल कॅानफरन्सचा दबदबा अजून कायम असल्याचे हा निकाल दाखवतो.
2) पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) हा माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींचा पक्ष असून याने 68 जागा लढविल्या होत्या. त्यापैकी 27 उमेदवार निवडून आले आहेत. या पक्षाला जम्मूतील नौशेरा मधील 1 च जागा मिळाली आहे. या पक्षातील एक गट फुटून बाहेर पडला असल्यामुळे हा पक्ष तसा अडचणीतच होता/आहे. या निवडणुकीत सर्वात जास्त नुकसान या पक्षाचे झाले आहे, असे दिसते.
3) कम्युनिस्ट पार्टी ॲाफ इंडिया -एम (सीपीएम) या पक्षाने 8 जागा लढविल्या आणि 5 जागा जिंकल्या आहेत. यांच्या आठ उमेदवारांपैकी जम्मूतील दोन्ही उमेदवार पडले पण दक्षिण काश्मीरमधील कुलगावमधून 6 पैकी 5 उमेदवार निवडून आले. याच विभागात पूर्वी शेख अब्दुल्लांनी कामगार चळवळ उभारून काश्मीरच्या राजाविरुद्ध आंदोलन उभे केले होते. तेव्हापासून याभागात डाव्यांचा प्रभाव आहे. मोहम्मद युसुफ तारिंगामी या 71 वर्षाच्या नेत्याच्या प्रभावामुळे 1996 पासूनच हा भाग अशांत क्षेत्र म्हणून दुर्लौकिक प्राप्त करता झाला आहे. मोजक्याच जागा लढवून व त्यापैकी जास्तीतजास्त जागा जिंकल्यामुळे या पक्षाचा स्ट्राईक रेट जास्त राहिलेला आहे.
4) जम्मू ॲंड काश्मीर पीपल्स कॅानफरन्स/पार्टी (जेकेपीसी) हा अब्दुल घनी लोन व मौलवी इफ्तिकार हुसेन अन्सारी यांनी 1978 मध्ये स्थापन केलेला पक्ष असून याने 11 जागा लढविल्या होत्या त्यापैकी 8 उमेदवार निवडून आले आहेत. ही कामगिरी अपेक्षितच होती.
5) जम्मू ॲंड काश्मीर आवामी नॅशनल कॅानफरन्स (जेकेएएनसी) या पक्षानेही 11 जागा लढविल्या होत्या. पण या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. या पक्षाची स्धापना माजी मुख्यमंत्री गुलाम मोहम्मद शहा यांनी नॅशनल कॅानफरन्समधून फुटून निघून केली होती. सध्या त्यांच्या पत्नी खालिदा बेगम या पक्षाचे नेतृत्व करीत आहेत. विसर्जित असेम्ब्लीमध्येही या पक्षाचा प्रतिनिधी नव्हता.
6) इंडियन नॅशनल कॅांग्रेसने 157 जागा लढविल्या त्यापैकी 26 उमेदवार निवडून आले आहेत. यापैकी 17 जागा जम्मू भागातील आहेत आणि फक्त 9 जागा काश्मीर खोऱ्यातील आहेत, ही बाबही बोलकीच म्हटली पाहिजे.
7) जम्मू ॲंड काश्मीर पीपल्स मूव्हमेंट पार्टी (जेकेपीएम) शहा फैजल हे माजी राजकारणी आणि भारतीय सेवेत सनदी नोकर होते. 2009 मध्ये इंडियव सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. 2019 मध्ये काश्मीरमध्ये होत असलेल्या हिंसाचाराचा निषेध करीत त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. 10 वर्षांची माझी केंद्र शासनाची नोकरी म्हणजे नुसता तुरुंगवास होता, असे राजीनामा दिल्यावर ते म्हणाले होते. त्यांना फुटिरतावादी चळवळीला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपावरून व 370 कलमाच्या पुनर्स्थापनेच्या चळवळीमुळे घरातच बंदिस्त ठेवण्यात आले होते. त्यांनी जम्मू काश्मीर पीपल्स मूव्हमेंट नावाचा पक्ष स्थापन केला. 21 मार्च 2019 ते 9 ॲागस्ट 2020 पर्यंतच पदावर राहून त्यांनी राजीनामा दिला. नंतर जावेद मुस्तफा मीर यांनी त्यांची जागा घेतली. या पक्षाने 11 जागा लढविल्या आणि 3 जागा जिंकल्या.
अपक्ष आणि अन्य पक्षांचे महत्त्व
अपक्ष म्हणून 50 उमेदवार निवडून आले आहेत. यातील कोण कुणाकडे झुकतो हे लवकरच कळेल. रामबन आणि किश्तवार जिल्यात तर हे अपक्ष किंगमेकरच ठरणार आहेत. श्रीनगर आणि पूंच जिल्ह्यातही यांनी 14 पैकी प्रत्येकी 7 म्हणजे निम्या जागा जिंकल्या आहेत, हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. जम्मू काश्मीरमध्ये पक्षांतरविरोधी कायदा नाही. कायदा असतांना सुद्धा जाणारे आणि बोलावणारे कोणकोणत्या हिकमती आणि क्लृप्त्या लढवतात, हे आपल्या परिचयाचे आहेच. पठिंब्याची किंमत वसूल करणारेही काही कमी नाहीत. जम्मू-काश्मीरमध्ये हा खेळ कसा रंगतो आणि एकमेकांवर कसे आरोप आणि प्रत्यारोप केले जातात, हे पाहणे मतदारांना आवडणारे नसले तरी त्यातील नाट्य आस्वाद्य नाही, असे म्हणता येईल का?
अन्य पक्ष
गुपकारमध्ये सामील न होता काही पक्षांनी निवडणूक लढविली आहे.
जम्मू ॲंड काश्मीर अपनी पार्टी (जेकेएपी) या नावाचा पक्ष पीडीपी शासनातील मधील एक मंत्री श्री. अल्ताफ बुखारी यांच्या नेतृत्वाखाली नव्याने 2020 मध्ये स्थापन झाला असून पीडीपी, नॅशनल कॅानफरन्स, कॅांग्रेस आणि शहा फैजल यांच्या जम्मू काश्मीर पीपल्स मूव्हमेंट (जेकेपीएम) मधील मिळून एकूण 50 प्रभावी व जनाधार असलेले मोठमोठे कार्यकर्ते या पक्षात सामील झाले आहेत. सामान्यांचा, सामान्यांद्वारे आणि सामान्यांसाठी हा पक्ष स्थापन झाला असल्याचा या पक्षाचा दावा आहे. 370 कलमाबाबतचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे, असे म्हणून त्याबाबत बोलण्यास या पक्षाच्या प्रवक्त्याने नकार दिला आहे, ही बाब बोलकी आहे. भाजपने या पक्षाचे स्वागत केले आहे तर बाधित पक्षांनी यावर कडक टीका केली आहे. या पक्षाने 12जागा तर जिंकल्याच आणि 38, 000 मतेही घेतली. या पक्षाची केंद्र शासनाशी जवळीक आहे असे मानले जाते व म्हणून या पक्षाला अन्य पक्ष ( विशेषत:गुपकारचे घटक पक्ष) किंग्ज पार्टी म्हणून हिणवीत होते.
या निवडणुकीत गुपकार आघाडीला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. पक्ष म्हणून विचार केला तर भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून दुसऱ्या क्रमांकावर नॅशनल कॅान्फरन्स हा पक्ष आला आहे.
महत्त्व आहे जिल्हा निहाय निकालांचे
पण ही माहिती जिल्हानिहाय निकाल कसे लागले त्यावर प्रकाश टाकीत नाही. जम्मू भागातील 10 पैकी 6 जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आली कारण यापैकी 5 जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे निदान आठ तरी उमेदवार निवडून आलेच आहेत. उरलेल्या रईसी जिल्ह्यात 7 उमेदवार निवडून आले आहेत आणि एका अपक्षाचा पाठिंबा नक्की मिळणार आहे. जम्मूमध्ये उरलेल्या 4 जिल्ह्यात बहुमत मिळू नये, ही बाब आश्चर्याची आणि त्या पक्षासाठी धक्कादायक आहे. नॅशनल कॅानफरन्सने जम्मू भागात 25 जागा जिंकून भाजपसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. या पक्षाने किश्तवार आणि रामबन जिल्ह्यात प्रत्येकी 6 जागा तर राजोरी जिल्ह्यात 5 जागा जिंकल्या आहेत.
370 कलम रद्द झाल्यानंतरची ही पहिली निवडणूक होती. 2015 मध्ये पीडीपीशी युती करून भारतीय जनता पक्ष सत्तेत सहभागी होता पण स्वबळावर भाजप यावेळी फक्त जम्मू भागातच 10 पैकी 6 जिल्ह्यात (दोडा, उधमपूर, कथुआ, जम्मू, रईसी आणि सांबा) पूर्ण बहुमत मिळवून सत्तेवर येतो आहे. तसेच या निवडणुकीत तो 75 जागा मिळवून पहिल्या क्रमांकावर आला आहे. (केंद्राचा पाठिंबा आहे असा आरोप असलेल्या असलेल्या जम्मू-काश्मीर अपनी पार्टीला ( किंग्ज पार्टीला) 12 जागा मिळाल्या आहेत. ही बाबही नोंद घेण्यासारखीच आहे.)
या 75 पैकी 72 जागा जम्मू विभागातून असून फक्त तीन जागा काश्मीरमधील आहेत. श्रीनगर जिल्ह्यामधील खोनमोह 2 मतदारसंघातून ऐझाज हुसेन, बांदीपुरा जिल्यामधील तलाईल मतदारसंघातून ऐझाज अहमद आणि पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा2 मतदारसंघातून श्रीमती मिन्हा लतीफ अशा त्या जागा आहेत. पण हा चंचूप्रवेशही भाजपला महत्त्वाचा वाटतो कारण या निमित्ताने भाजपला काश्मीर खोऱ्यात प्रथमच प्रवेश मिळतो आहे. तसेच विरोधात नॅशनल कॅान्फरन्स यासारखे तगडे स्पर्धक असतांना हा विजय मिळाला आहे. आम्हाला काश्मीर खोऱ्यात फारशी आशा नव्हतीच पण सर्व विरोधी पक्षांची एकजूट असूनही आम्हाला तीन जागा मिळतात. याचा अर्थ असा की खोऱ्यातही आम्ही दखल घ्यावी, असा पक्ष आहोत, असा या पक्षाचे एक प्रमुख नेते सय्यद शहानुवाज हुसेन यांचा दावा आहे. पण एक वस्तुस्थिती नाकारता येत नाही की हिंदूबहुल मतदारसंघ नसेल तर भाजपला विजय मिळणे अतिशय कठीण जाते. ही निवडणूक भाजपसाठी चाचपणीवजाच होती. भाजपला 4.8 लक्ष मते म्हणजे 38 % मते मिळाली आहेत. इतर कोणत्याही पक्षापेक्षा ही जास्त आहेत.
गुपकारची कामगिरी
पीएजीडी/गुपकार या सात पक्षांच्या आघाडीला 3 लक्ष 90 हजार मते मिळाली आहेत कॅांग्रेसला (पक्ष या नात्याने) 1लक्ष 30 हजार तर अपक्षांना 1लक्ष 71 हजार मते मिळाली आहेत. निवडणुकीत आणि निवडणुकीसाठी पीपल्स अलायन्स फॅार गुपकार डिक्लरेशन (पीएजीडी) या नावाची 7 पक्षांची आघाडी स्थापन झाली होती. यातील घटक पक्षातील विळ्या भोपळ्याइतके सख्य पाहता, अशी आघाडी निर्माण होईल असे भाजपसकट कुणालाही शक्य वाटत नव्हते. पण वेगवेगळे लढलो तर आपली वाताहत नक्कीचहोईल, हे समजुतदारपणे मान्य करून या पक्षांनी, विशेषत: फारुक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि महबुबा मुफ्ती यांनी, शहाणपणा दाखवून आघाडी केली आणि परिपक्वता आणि शहाणपणा दाखवला आणि चांगले यश मिळवले, हे उठून दिसते आहे. 370 व 35 ए हे कलम पुन्हा प्रस्थापित करावे, असा या आघाडीचा प्रयत्न असणार आहे.
नॅशनल कॅान्फरन्सचे उठून दिसणारे यश
पक्षनिहाय विचार करता नॅशनल कॅानफरन्सला घवघवीत यश मिळाले आहे. याचे कारण असे आहे की, अजूनही काश्मीर खोऱ्यात शेख अब्दुला यांच्या (आणि आता फारुक अब्दुल्ला व ओमर अब्दुल्ला यांच्या) नॅशनल कॅानफरन्सची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. तसेच महबुबा मुफ्तींच्या पीडीपीपेक्षा काश्मीर खोऱ्यात नॅशनल कॅानफरन्सचे पारडे चांगलेच जड आहे.
पीडीपीची दयनीय स्थिती
पीडीपी मात्र बरीच मागे पडली. याचे एक कारण असेही आहे की, भाजपला बरोबर घेऊन सत्तास्थापनापूर्वी, पीडीपी ला जमाते इस्लामीच्या कार्यकर्त्यांचे पाठबळ होते. पण पीडीपीने सत्तेसाठी भाजपसोबत युती केल्यामुळे हे कार्यकर्ते पीडीपीपासून दूर गेले आहेत. त्यातच विद्यमान सरकारने (भाजपने?) जमाते इस्लामी विरुद्ध केलेली कडक करावाईही ते विसरले नसणार, हे उघड आहे. पीडीपीची स्थिती मोठी विचित्र झाली आहे. केंद्राबाबत कडक भूमिका घ्यावी तर (त्यांच्या मते) केंद्र नाराज होणार, कडक भूमिका न घ्यावी तर जमाते इस्लामीचे उरलेसुरले कार्यकर्ते दूर जाणार! नॅशनल कॅानफरन्सपेक्षा पीडीपीने कमी जागा लढवल्या आणि म्हणून कमी जिंकल्या हे जरी खरे असले तरी दोन्ही पक्षांचा स्ट्राईक रेट जवळजवळ सारखाच (67/168 आणि 27/68 ) आहे. ही त्यातल्यात्यात समाधानाची बाब पीडीपीसाठी आहे. गुपकार आघाडीला काश्मीरमधील निदान आजतरी 9 जिल्ह्यात (कुपवाडा, बारामुल्ला, बडगाव, पुलवामा, अनंतनाग, बांदीपोरा, गंडरबाल, शोपियन, आणि कुलगाव) सत्ता मिळाली आहे. आजतरी असे म्हणण्याचे कारण असे की, पक्षांतराचा मार्ग नाराज मंडळी केव्हा चोखाळतील, हे कोण आणि कसे सांगणार? जम्मू भागातही गुपकारला आणि कॅांग्रेसला मिळून भरपूर मते व जागा (35) मिळाल्या आहेत. पण भाजपसाठी एक समाधानाची बाब आहे ती ही की खोऱ्यात भाजपने नव्या दमाचे खेळाडू उभे उभे केले आहेत त्यांनी यावेळी यावेळी मिळवलेली मते आज जरी शेकड्यात असली तरी ते उद्याचे पक्षाचे पक्षाचे आधारस्तंभ ठरणार आहेत.
श्रीनगरची वेगळी स्थिती
खुद्द श्रीनगर जिल्ह्यातील कथा काहीशी वेगळीच आहे. सर्वात कमी मतदान श्रीनगर जिल्ह्यात झाले आहे. त्यामुळे अनेक विजयी उमेदवारांना 500 पेक्षा कमी मते मिळाली आहेत. नॅशनल कॅानफरन्स आणि पीडीपीचे बरेच मतदार मतदानाला आले नाहीत. (कदाचित त्यांचा मतदानावर अघोषित बहिष्कार असेल. त्यामुळे तब्बल 7 जागी म्हणजे निम्या जागी अपक्ष निवडून आले आहेत. पीडीपीमधून बाहेर पडलेले एक नेते आणि भूतपूर्व आमदार अमीरा कादाल अलताफ बुखारी यांनी काढलेल्या अपनी पार्टीने 3 जागा जिंकल्या आहेत. यांच्याशी आणि अपक्षांशी युती करून भाजप श्रीनगर जिल्हा मंडळावर नियंत्रण मिळवील, अशी शक्यता आणि तशा आशयाचा आरोप पीएजीडीने केला आहे.
जम्मूमध्ये 70 % टक्के मतदान झाले तर खोऱ्यात मात्र 35 % मतदान झाले.
जम्मू विभाग जिल्हानिहाय निकाल
एकूण 140 पैकी भाजपने 72 तर इतरांनी 68 जागा मिळवल्या आहेत.
1 डोडा भाजप 8 अन्य 6 एकूण 14
2 किस्तवार भाजप 3 अन्य 11एकूण 14
3 रामवन भाजप 3 अन्य 11 एकूण 14
4 रईसी भाजप 7 अन्य 7 एकूण 14
5 उधमपूर भाजप 12 अन्य 3 एकूण 14
6 कथुआ भाजप 13 अन्य 1 एकूण 14
7 जम्मू भाजप 11 अन्य 3 एकूण 14
8 सांबा भाजप 13 अन्य 1 एकूण 14
9 राजोरी भाजप 3 अन्य 11 एकूण 14
10 पूंच भाजप 0 अन्य 14 एकूण 14
जम्मू विभागात 6 जिल्ह्यात भाजपची सत्ता असेल.म्हणजे भाजपचा अध्यक्ष असेल. उरलेल्या 4 जिल्ह्यात अपक्ष आणि लहान पक्ष यांच्या हातातील सत्तेच्या चाव्या किती परिणाम करतील, ते लवकरच स्पष्ट होईल. अन्यथा नॅशनल कॅान्फरन्स आणि कॅांग्रेस मिळून सत्ता स्थापन करतील आणि गुपकार आघाडीचे एकसंध स्वरुप खिळखिळे होईल. मुळात ही जोडी किती टिकेल, हाही प्रश्नच आहे.
काश्मीर खोऱ्यात श्रीनगर वगळता अन्य 9 जिल्ह्यात गुपकार आघाडी निवडणुकीनंतरही एकसंध राहिली आणि अपक्ष व छोटे पक्ष आणि अपनी पार्टी यांनी वेगळी भूमिका घेतली नाही, किंवा त्यांना तशी ती घेताआली नाही तर गुपकार आघाडीची सत्ता राहील, असे दिसते. अशी शक्यता वर्तवण्याचे कारण असे की, निवडणकीचे निमित्ताने आघाडी निर्माण होण्या अगोदर या घटक पक्षांपैकी कुणीही दुसऱ्याचे तोंड पाहण्यासही तयार नव्हता. श्रीनगर जिल्ह्यामध्ये सत्तेच्या चाव्या तर अपक्षांच्या हाती आहेत. त्यांना आपल्याकडे वळविण्यात कोण किती यशस्वी होतो, ते लवकरच कळेल.
यात नॅशनल कॅान्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ॲाफ इंडिया (एम), जम्मू ॲंड काश्मीर पीपल्स कॅानफरन्स, जेके आवामी नॅशनल कॅान्फरन्स, इंडियन नॅशनल कॅांग्रेस आणि जम्मू ॲंड काश्मीर पीपल्स मूव्हमेंट (जेकेपीएम) हे ते सात पक्ष, वेगळे लढलो तर भाजपुढे आपला टिकाव लागणार नाही म्हणून एकत्र आले आहेत. कॅांग्रेस पक्ष तर अगदी ऐनवेळी आघाडीत सामील झाला आहे. गुपकार आघाडीला 112 जागा मिळाल्या आहेत. घटक पक्षनिहाय विचार केला तर नॅशनल कॅान्फरन्स 67, पीडीपी 27, जेकेपीसी 8, सीपीआय(एम) 5 व अन्य 3 अशी 110 ची फोड आहे. उरलेल्या दोघांबाबत लवकरच स्पष्टता होईल. यात कॅांग्रेसचे 26 मिळवल्यास बेरीज 138 होईल. एरवी एकमेकांचे तोंडही न पाहणाऱ्यांची ही कागदावरची बेरीज प्रत्यक्षात येईल तेव्हा खरे. विशेषत: अपक्ष गुपकार विरोधात निवडून आले आहेत, ते तिकडे जातील ?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment