Friday, July 2, 2021

दहशतवाद्यांविरुद्धच्या आरपारच्या लढाईला प्रारंभ? वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? फ्रान्समधल्या एका शाळेत सॅम्युअल पाटी नावाच्या शिक्षकाने प्रेषितांबद्दलची व्यंगचित्रे वर्गातील मुलांना दाखविल्यामुळे चिडून 18 वर्षाच्या एका मुस्लिम तरुणाने त्या शिक्षकाचे शिर धारदार चाकू वापरून धडावेगळे केले. नंतर पोलिसांच्या गोळीबारात हा तरुण मारला गेला. फ्रान्समध्ये आजवर असे अनेक अतिरेकी हल्ले झाले आहेत. गोळीबार करण्यावर तसेच शस्त्राने भोसकण्यावर अतिरेक्यांचा विशेष भर दिसतो. कारण कमीतकमी मानवी शक्ती वापरून जास्तीत जास्त दहशत पसरवण्यात हे मार्ग विशेष उपयोगी पडत असतात. ॲास्ट्रियातील व्हिएन्नामध्ये मुंबईप्रमाणे बेधुंद गोळीबार झाला आहे. ज्यू धर्मियांची पूजा/प्रार्थना स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती. सुरक्षेची जबाबदारी लश्कराला सोपविण्यात आली आहे. धर्मनिरपेक्ष फ्रान्स फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राॅन यांनी इस्लामी फुटिरतावाद्यांना आवर घालण्याचा आणि धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांना जपण्याचा निर्धार नुकताच व्यक्त केला आहे. फ्रान्सची लोकसंख्या 7 कोटी असून (जर्मनी 8 कोटी तर इटाली 6 कोटी) त्यात 60 लाख मुस्लिम आहेत. आज त्यांच्यामुळे देशात एक पर्यायी संस्कृती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. धर्मश: विचार केल्यास फ्रान्समध्ये ख्रिश्चनांचे सर्व पंथ मिळून 47 % , धर्मच मानत नसलेले 40 %, इस्लामला मानणारे 9%, बौद्ध 1 %, ज्यू1 %, अन्य 5 %, धर्म न सांगणारे 1 % अशी ठोकळमानाने विभागणी आहे. म्हणजे फ्रान्समधला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा धर्म इस्लाम असून, बहुतेक इस्लामधर्मीय सुन्नी आहेत. तसेच यातील बहुतेक स्थलांतरित आहेत. मूळचेच कट्टर असलेले हे सर्व फ्रान्समध्ये आल्यानंतर अपेक्षेप्रमाणे सौम्य न होता अधीकच कट्टर होत गेले असून आज ते धर्मकांडाचे कट्टरतेने पालन करीत आहेत. परिणामकारक उपाययोजना या पार्श्वभूमीवर मॅक्रॅान यांचे इस्लामबाबतचे वक्तव्य विचार करण्यास प्रवृत्त करणारे आहे. त्यांनी दहशतवादींना आश्रय देणाऱ्या मशिदी तर बंद केल्याच, तसेच त्यांना परदेशातून मिळणारा पैसा आणि संदेश यावरही विशेष लक्ष देण्याचे ठरविले आहे. कारण इस्लामी कट्टरवाद्यांमुळे सुरक्षाविषयक समस्या निर्माण होत आहेत, त्याबाबत काहीतरी कृतिपर पावले उचलली पाहिजेत, असा आग्रह त्यांना पूर्वीपासूनच सतत केला जात होता, म्हणून त्यांनी शेवटी काहीसे निरुपायाने हे कठोर पाऊल उचलायचे ठरविले आहे. परिणामत: मुस्लिमजगतात याबाबत तीव्र प्रक्रिया उमटल्या असून फ्रान्समधील मुस्लिमांना दडपण्याचा हा प्रयत्न आहे, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. हे आमचे एकट्याचे दुखणे नाही पश्चिम युरोपात फ्रान्समध्ये मुस्लिमांची संख्या सर्वात जास्त आहे. हिजाब बंदीचे निमित्त करून मुस्लिमांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप मुस्लिमांनी केला आहे. कपडेपरिधान करण्यायाबाबत मुस्लिम महिलांमधील वस्त्रांचे अनेक प्रकार असे आहेत. संपूर्ण देह झाकतो तो बुरखा, फक्त डोळे उघडे ठेवणारा तो नकाब, मान आणि खांदे झाकणारा तो खिमार आणि डोक्यावरचे केस आणि मान झाकणारा तो हिजाब, असे वस्त्रप्रावरणाचे प्रकार मुस्लिमांमध्ये आहेत. कट्टरवादी मुस्लिमांपासून फ्रान्सला धोका आहे, असे मॅक्राॅन मानतात. कारण त्यांचे जे नीतिनियम आहेत, त्यापेक्षा इतर काहीही त्यांना मान्य नाही. याचा परिणाम असा होतो आहे की, एक देशविरोधी समाज फ्रान्समध्ये निर्माण होत चालला आहे. या संप्रदायविशेषतेचा परिणाम मुले शाळेत न येण्यावर होतो आहे. खेळ, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि अन्य सामाजिक कार्यक्रम या पासूनही ही मुले दूर राहतात. त्यांच्या मनावर अशी तत्त्वे बिंबविली जातात की जी प्रजासत्ताकाच्या कायद्यांच्या विरोधात असतात. इस्लाम हा धर्म असा आहे की, त्याच्यामुळे जगभर सर्वत्र आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, हे एकट्या फ्रान्सचे दुखणे नाही, हेही मॅक्रॅान यांनी स्पष्ट केले आहे. क्रीडा व अन्य संघटनांचे रुपांतर इस्लामचे शिक्षण देणाऱ्या संघटनात होऊ नये, मशिदींसाठी बाहेर देशातून इमाम आणण्यास बंदी असावी, मशिदींना मिळणाऱ्या पैशावर देखरेख ठेवावी, होमस्कूलिंगवर (घरच्याघरी शिक्षण) बंधने घालावीत, या सारख्या बाबींची तरतूद असलेला कायदा आता येऊ घातला आहे. आर्थिक चणचण असलेल्या स्थलांतरितांना भरीव आर्थिक मदत, द्यायला सरकार तयार आहे पण ही मदत कट्टरवादीच गिळंकृत करतांना आढळतात. हे सर्व थांबलेच पाहिजे, यावर मॅक्रॅान यांचा भर आहे. मॅक्रॅान यांची ही भूमिका संपूर्ण जगासाठीही पथदर्शक सिद्ध होईल, अशी चिन्हे आहेत. पण यामुळेच मुस्लिमजगतात असंतोष भडकला आहे. बेतालपणे बोलणाऱ्यातले इमॅन्युएल मॅक्रॅान नाहीत. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, या वाक्प्रचारानुसार काहीही बेतालपणे बोलणाऱ्यांपैकी इमॅन्युएल मॅक्रॅान नाहीत. या प्रश्नाबाबत त्यांनी अनेक महिने विचारविनीमय केलेला आहे. यात जसे धार्मिक मुखंड होते, तसेच आधुनिकतेचा पुरस्कार करणारे विचारवंतही होते. यामुळे या विषयावर जगभरच उघडपणे व मनमोकळेपणाने चर्चा सुरू झाली असून कट्टर व सनातनी मुस्लिमांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांवर लक्ष केंद्रित होण्यास मदत होत आहे. अर्थात नेहमीप्रमाणे काहींना यात राजकारण दिसते आहे. पण त्याला उपाय नाही. प्रत्येक देशाची काही गाभा मूल्ये ( कोअर व्हॅल्यूज) असतात. त्यामुळेच तो देश इतरांच्या तुलनेत वेगळा उठून दिसत असतो. दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे होणारी वित्त आणि जीवित हानी हा चिंतेचा विषय आहे, हे जसे खरे आहे, तसेच हे हल्ले प्रशासनाच्या ऐहिकतेवर, धर्मधारणेच्या स्वातंत्र्यावर तसेच व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावरही आघात करतात, हेही तेवढेच किंवा त्याहूनही महत्त्वाचे आणि खरे आहे. काही वर्षांपूर्वी एका हल्लेखोराने धारदार सुऱ्याने दोघांना जायबंदी केले होते. स्थान होते, चार्ली हेब्दो ह्या विडंबनाला वाहिलेल्या मासिकाच्या कार्यालयासमोरचे. इस्लामी दहशतवादी हल्ला म्हणून सर्व क्षेत्रातून निषेधाची आणि निर्भर्त्सनेची वक्तव्ये धडाडली. पुढे याच मासिकाच्या कार्यालयात घुसून 2015 साली जिहाद्यांनी 12 निरपराध्यांची हत्या केली होती. काय गुन्हा होता या मासिकाचा? तर त्यांनी प्रेषित महंमदांचे व्यंगचित्र फक्त उधृत केले होते. दोन प्रकाच्या प्रतिक्रिया मुस्लिम जगातातून शिक्षकाच्या हत्येबाबत दोन प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. जनतेत इस्लामी कट्टरतेविरुद्ध निदर्शनादी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर भर देण्यासाठी विवादित व्यंगचित्र देशभर जागोजागी लावण्यात आले आहे. भारतासकट अनेक देशांनी हिंसाचाराचा आणि मॅक्रॅान यांच्यावरील वैयक्तिक टीकेचा निषेध केला आहे पण मुंबई, भोपाळ, अलिगड, लुधियाना आदी शहरात प्रखर विरोधी मोर्चे, निदर्शने आयोजित होत आहेत. तुर्कस्थान, पाकिस्तान, इराण इत्यादी काही देशांनी संतापून अध्यक्ष मॅक्रॅान यांच्यावरच ठपका ठेवून त्यांनी मांडलेल्या प्रस्तावांमुळेच हे घडले, असे म्हटले आहे. फ्रान्समध्ये मुस्लिमांचे दमन होणार अशी भीती आम्हाला वाटत होतीच, आतातर खात्रीच पटली आहे, असे वक्तव्य मानवी हक्क संरक्षण चळवळीतील एक मुस्लिम कार्यकर्ते यासर लाऊटी यांनी प्रसारित केले आहे. मॅक्रॅान यांच्या भूमिकेमुळे कडव्या उजव्यांना बळ मिळाले, डाव्या मुस्लिमांच्या जिवाला धोका निर्माण झाला, जागतिक महामारीत घरच्याघरी शिक्षण घेऊन प्रगती करू इच्छिणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला खीळ बसली, असाही कांगावा यासर लाऊटी यांनी केला आहे. अनेक इस्लामिक देशांनी फ्रेंच उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. नॅाट्रे डॅम चर्चजवळील तीन व्यक्तींना ठार करून सुरू झालेला हिंसाचार सहजासहजी थांबेल अशी चिन्हे नाहीत. मुस्लिमजगतातील हा वणवा कुठवर पोचणार, ते कळत नाही. पण मॅक्राॅन आपल्या भूमिकेपासून तसूभरही ढळलेले दिसत नाहीत. कुणीतरी केव्हातरी रोखठोक भूमिका घेणारच होते, नव्हे त्यांना ती घ्यावीच लागणार होती. काळाच्या उदरात कायकाय साठवून ठेवले आहे, ते जसजसे बाहेर येईल तेव्हाच कळेल.

No comments:

Post a Comment