My son (Ajit), and daughter-in-law (Neelam) suggested to me that I should have a blog of my own. Because of their kind suggestion, I have created this blog.
Friday, July 2, 2021
तबलिगी जमात - काय, कोठे, कशासाठी प्रसिद्ध?
वसंत गणेश काणे, बी. एस्सी, एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी 7, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
मुस्लीम समाजात एकी आहे, अशी सर्वमान्य समजूत आहे. ती काही अंशी बरोबरही आहे. पण त्यांच्यात आपापसात कशा फळ्या व चिरफळ्या आहेत, हेही अधूनमधून जाणवत असते. दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातीच्या ‘अभ्यासवर्गाच्या’ निमित्ताने या जमातीच्या अनुयायांच्या ज्या ’लीला’ सध्या गाजताहेत, त्यामुळे ही जमात विशेष चर्चेत आली आहे आणि म्हणूनच या जमातीचे वेगळेपण हा एक अभ्यासाचा विषय झाला आहे.
कोण आहे ही तबलिगी जमात?
तबलिगी जमात या शब्दाचा शब्दश: अर्थ, ‘समावेशी जमात’ असा होईल. शब्दांचे अर्थ अनेकदा संदर्भानुसार व कालानुसार बदलतात हे ज्यांना मान्य असेल त्यांनी या शब्दाला चिकटलेले काहीसे नवीन अर्थ मान्य व्हायला हरकत नसावी. तबलिगी जमात ही सुन्नींची एक इस्लामिक चळवळ आहे. सर्व सुन्नींना एकत्र आणून प्रेषिताच्या काळात ज्याप्रकारे धर्माचरण होत असे, त्यानुसार सर्व सुन्नींचे आचरण असले पाहिजे, असे आग्रहाने प्रतिपादन करणारी ही मंडळी आहेत. जमातीची ही भूमिका खुद्द सुन्नींना मात्र मान्य नाही. याचे एक कारण असे असावे की, या निमित्ताने सुन्नींमध्ये एक नेतृत्व नव्याने उभे होऊ पाहते आहे, हे प्रस्थापित नेतृत्वाला मान्य नसावे. सर्वसाधारण समजूत आहे त्याप्रमाणे मुस्लिम समाज एकसंध नाही. सुन्नी, शिया, बोहरा, वहाबी, अहमदिया ह्या पंथांची नावे आपल्यापैकी अनेकांना निदान ऐकून माहीत असतील. पण सुन्नी हा मुस्लिमांमधला फार मोठा गटसुद्धा (80 % एवढा मोठा) एकसंध नाही. या सगळ्या सुन्नींना एका सूत्रात बांधण्याची ही चळवळ आहे. सर्व सुन्नींमध्ये कर्मकांडे (रायच्युअल्स), पोषाख आणि वैयक्तिक वर्तन याबाबत प्रेषिताच्या काळात जे संकेत पाळले जायचे ते अगदी जसेच्यातसे पाळण्यावर यांचा भर आहे. कर्मकांड म्हणजे काय? तर धार्मिक विधीतील रूढ संस्कार/प्रथा. या चळवळीचे 25 कोटी अनुयायी आहेत, असे मानतात. ते मुख्यत: दक्षिण आशियात म्हणजे श्रीलंका, भारत, बांग्लादेश, भूतान, नेपाळ, पाकिस्तान, आणि मालदीव या देशात आहेत. तसे पाहिले तर जवळजवळ 200 देशात यांचे अनुयायी आहेत. 20 व्या शतकातील ही मुस्लिमांची एक महत्त्वाची धार्मिक चळवळ मानली जाते.
‘मुस्लिमांनो खरे मुस्लिम व्हा’, जमातचे बोधवाक्य!
तबलिगी जमातीची स्थापना 1927 साली भारतात महम्मद इलियास यांनी दिल्लीजवळच्या मेवात येथे केली. सुरवातीला देवबंद चळवळीची शाखा म्हणून ही चळवळ सुरू झाली होती. देवबंद चळवळ 1866 मध्ये ब्रिटिशांकडून सत्ता हस्तगत करण्याच्या उद्देशाने सुरू झाली होती, असे अनेक मानतात. प्रेषितापासून रूढ झालेल्या परंपरेनुसार लोकांना जिहादसाठी तयार करणे हा तबलिगी जमातीचा प्रयत्न आहे. यांच्याही जगात एकूण 11 प्रकारच्या शाखा असून त्यातील दोन शाखा भारतात आहेत. दारूल उलूम देवबंद आणि नझहीरूल उलूम या त्या दोन शाखा असून दोन्ही उत्तरप्रदेशात आहेत. इस्लामी नैतिक मूल्यांचा होत असलेला ऱ्हास थांवबणे हा प्रमुख हेतू समोर ठेवून देवबंद काम करीत असते. तर तबलिगी जमातीसमोर अ) विश्वास ब) प्रार्थना क) ज्ञान ड) मुस्लिमांबाबत आदर इ) धर्मविस्तार ही सहा प्रमुख उद्दिष्टे आहेत. कुराण आणि हद्दित यावर यांचा भर असणार आहे. ‘मुस्लिमांनो, खरे मुस्लिम व्हा’, हे त्यांचे घोषवाक्य आहे. धर्मप्रसारासाठी हिंसाचार त्यांना नामंजूर आहे, असे हे तोंडाने म्हणत असले तरी प्रत्यक्षात मात्र यांची भूमिका पाकिस्तान व मलेशियातही अत्यंत आक्रमक राहिलेली आहे. प्रसार माध्यमांना त्यांनी दिलेल्या धमक्या तर ताज्याच आहेत. तरीही सध्या आपल्या देशात जेजे घडते आहे, ते या भूमिकेची चुणूकच आहे असे म्हटले पाहिजे. अगोदर मराठा साम्राज्याखाली आणि नंतर ब्रिटिश सत्तेच्या प्रभावामुळे मुस्लिमांची आक्रमकता काहीशी क्षीण झाली होती. पुढे विसाव्या शतकात हिंदूंचे ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मात धर्मांतर करण्याचे प्रमाण अतिशय वाढल्यामुळे हिंदूंमध्ये धर्मांतरितांचे शुद्धिकरण व संघटनेच्या आधारे हिंदूंचे दृढिकरण सुरू झाले. जोडीला मुस्लिम आक्रमकता तबलिगी जमातीच्या रूपाने पुनरुज्जीवित झाली. स्वामी श्रद्धानंदांचा हत्यारा तबलिगी जमातीचा होता, असे मानले जाते.
भारतातील तबलिगी जमात
आजचा विचार करायचा झाला तर जिथेजिथे हा पंथ कार्यरत आहे, त्या प्रत्येक देशात त्याने उपद्रवाशिवाय फारसे काही केलेले नाही. कट्टरता आणि धर्मांतर यामुळे बहुतेक देशांनी या तबलिगी जमातीवर निरनिराळे प्रतिबंधच घातले आहेत. काही लोकप्रतिनिधींनी आणि अन्यकाही यांनी वर्णन केल्याप्रमाणे हे लोक सभ्य, शांत, सज्जन, धार्मिक आणि सोवळे तर नक्कीच नाहीत. तरीही गेली 10/15 वर्षे भारतात या मंडळींना मिळतात तशा सोयीसवलती जगात कुठेही मिळत नाहीत.
पण भारतात यांच्यात दोन तट पडले आहेत. यांच्यातून विस्तव जात नाही. पहिला आणि मुख्य गट आज गाजतो आहे. त्याचे कार्यालय/केंद्र (मरकज/मरकत?) दिल्लीतील निजामुद्दीन येथे आहे. आणि दुसऱ्याचे बस्तान भोपाळला आहे. भोपाळी गट तुलनेने लहान आहे, एवढेच. (अप)कीर्तीत कोण डावा आणि कोण उजवा हे ठरविता येणार नाही. मध्यंतरी बांग्लादेशात ढाका या राजधानीच्या शहरात या दोन गटात अशीकाही धुमश्चक्री उडाली होती की बोलायची सोय नाही. धर्मपालनात कोण सच्चा आणि कोण पाखंडी याबाबतचा वादाचा मुद्दा निकाली काढण्याच्या निमित्ताने झालेला हा संघर्ष होता. खरेतर दोघेही एकाच माळेच मणी आहेत, हे सूज्ञास सांगणे नलगे. पाकिस्तानात सुद्धा लाहोर गट आणि रावळपिंडी गट असे तबलिगी जमातीत पाठभेद आहेत. त्यांचीही आपसात सुदोपसुंदी सुरू असते.
देवबंद आणि बरेलीवाले हे दोन्ही सुन्नी गट तर यांना खरे इस्लामी मानायलाच तयार नसतात, त्यांना ते निम्नस्तरीय (गयेगुजरे) मानतात. भारतात 75 % आणि पाकिस्तानमध्ये 60 टक्के बरेली आहेत. आज संपूर्ण भारतात तबलिगी जमात गाजते आहे पण भारतातील सर्वसाधारण मुस्लिम समाज तुलनेने बराचसा शांत होता, याचे हे एक कारण असू शकेल.
सर्वसाधारण मुस्लिम समाज जमातीविरोधात का आहे?
निजामुद्दीन येथील तबलिगी जमातीचा म्होरक्या मौलाना साद हा आहे. त्याचाच शोध घेत आज दिल्ली पोलीस सगळीकडे फिरत आहेत. आपण स्वत:च 14 दिवसांचे अलगीकरण (क्वारंटाईन) स्वीकारले आहे, असे त्याने जाहीर करून समोर येण्याचे टाळले आहे. त्याने नुकतेच इस्लामवर भाष्य (तकरीर) केले आहे. यात त्याने इस्लामचे मुख्य संकेत पार धुडकावून लावले आहेत. त्याने मक्का, मदीना यांच्यानंतर निजामुद्दीन येथील तबलिगी जमातीच्या मरकजला इस्लामचे मोठे तीर्थक्षेत्र म्हणून संबोधले होते. कोणत्याही सच्च्या इस्लामीला हे तिसरे तीर्थक्षेत्र मान्य असण्याची / होण्याची सुतराम शक्यता नाही. त्याच्या या वक्तव्याने अवघे इस्लाम जगत केवळ हादरलेच नाही तर संतापले सुद्धा आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले तर त्याला सुरक्षाच लाभण्याची शक्यता आहे. याचा एक अर्थ असाही आहे की, मौलाना साद अज्ञातवासात गेला आहे तो कोणाच्या भीतीने? पोलिसांच्या की संतप्त स्वकीयांच्या?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment