Thursday, July 1, 2021

रात्रंदिन आम्हाला युद्धाचाच प्रसंग! वसंत गणेश काणे, बी एस्सी, एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? अमेरिकेने लसनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कच्यामालाच्या निर्यातीवर बंधन घातल्यामुळे जगभरातील भारतासह अनेक देशांचा लसनिर्मितीचा कार्यक्रम अडचणीत सापडला आहे. पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी या प्रश्नाला वाचा फोडली आणि यामुळे जगभर खळबळ माजली आहे. कच्यामालाची कमतरतेमुळे भारतातील लसनिर्मितीचे प्रयत्नांना मर्यादा पडतील, असे दिसते आहे. कच्चा माल भारताला तातडीने पुरवा असा अमेरिकेवर सर्व बाजूंनी दबाव वाढू लागला होता. अखेर अमेरिकेने अडमुठी भूमिका सोडून भारताची मागणी मान्य केली असून लवकरच लसी निर्मितीसाठी कच्चा मालाचा पुरवठा होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका, जर्मनी आणि अन्य देश औषधे ॲाक्सीजन, व्हेंटिलेटर आदी पुरवणार आहेत. लस म्हणजे काय? संसर्गजन्य रोगाचा प्रतिकार करण्याची शक्ती जे औषध मिळवून देते, त्याला व्हॅक्सीन किंवा लस असे नाव आहे. हा रोग निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवापासूनच तयार केलेला पदार्थ आहे. ज्या अतिसूक्ष्म जीवामुळे रोग निर्माण होतो, त्यासारखेच या लसीचे स्वरूप असते. बहुदा हा तोच अर्धामेला सूक्ष्मजीव तरी असतो किंवा त्याचे मृतशरीर तरी असते. कधीकधी तो जीव जे विष निर्माण करते ते असते. तर कधी त्याचे आवरण असते. आपल्या शरीरातील संरक्षक कोशांना या आवरणावरून त्या सूक्ष्मजीवाची ओळख पटते आणि ते त्याचा फडशा पाडतात. अमेरिका फर्स्ट पण अमेरिकेने तरी कच्यामालाच्या निर्यातीवर बंदी का घातली? लसींची मागणी सतत वाढती आहे. कंपन्यांना ती पूर्ण करायची झाल्यास त्यांना होणारा कच्यामालाचा पुरवठा खंडित होता कामा नये. ज्या गुणवत्तेचा कच्चामाल अमेरिकेत मिळतो आहे, तसा तो इतरत्र मिळत नाही. अमेरिकेला स्वत:च्या देशातील सर्व नागरिकांना लस द्यायची आहे. तसे करण्यासाठी उपलब्ध असलेला कच्चामाल त्यांना पुरेल एवढाच आहे. म्हणून त्यांनी कच्यामालाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. निर्यातबंदीसाठी अमेरिकेतील डिफेन्स प्रॅाडक्शन ॲक्टमधील तरतुदींचा आधार घेतला आहे. अमेरिकेतील फ्रायझरने लसनिर्मितीचे लक्ष्य अमेरिका आणि युरोपातील कच्च्यामालाच्या कमतरतेमुळे निम्म्याने कमी केले होते. कच्चा माल हा कच्चामाल आहे तरी काय? पहिला घटक आहे, ॲंटिव्हायरल एजंट. दुसरा घटक आहे, ॲंटिसेप्टिक लिक्विड्स. तिसरा घटक आहे स्टराईल (जंतुविरहित) वॅाटर. आणि चौथा घटक आहे, खुद्द कोविड-19 च्या डिएनएमधील काही घटक. या नावांवरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना खूपकाही कळेल, अशी शक्यता नाही. पण हे घटक असल्याशिवाय लस तयार करता येणार नाही, एवढे तर नक्की कळेल आणि यांची आपल्याला आयातच करावी लागे/लागते, हेही लक्षात येईल. युरोप आणि अमेरिका सोडल्यास सोडल्यास इतर ठिकाणी हा कच्चामाल उपलब्धच नाही का? तर आहे. पण शुद्धतेत तो कमी प्रतीचा आहे. या निमित्ताने आपल्याला आज ना उद्या या कच्यामालाच्या बाबतीतही स्वावलंबी व्हावे लागेल, हे जाणवल्याशिवाय राहणार नाही. नुसती लस तयार करणारी प्रयोगशाळा असून चालणार नाही. तर लस तयार करण्यासाठी लागणारे घटक तयार करणारे प्रकल्पही उभारावे लागतील. प्रत्येक बाबतीत आत्मनिर्भरता किती महत्त्वाची आहे आणि तिचा ध्यास आपण का घेतो आहोत, हे पटविण्यासाठीही हे उदाहरण दाखला म्हणून उपयोगाचे आहे. मग ते रुग्णक्षेत्र असो किंवा रणक्षेत्र! जोपर्यंत पुरवठा साखळी खंडित होत नाही किंवा एकदम फार मोठ्या प्रमाणात कच्चामाल लागत नाही, तोपर्यंत, ‘तुम्ही आम्हाला कच्चामाल पुरवा, आम्ही तुम्हाला पक्का माला तयार करून देतो’, हा व्यवहार सुरळीत सुरू असतो/सुरू राहू शकतो. पण आजची समस्या वेगळी कशी आहे, ते सांगायला नको. पण आज ना उद्या कोरोना आटोक्यात येईल. मग या प्रकल्पांचे काय करायचे? यासाठी ते बहूद्देशीयही असले पाहिजेत. म्हणजे रणगाड्यांची आवश्यकता पूर्ण झाल्यावर जसे ट्रॅक्टर तयार करता येतील, तशी सोय असली पाहिजे. साखर कारखान्यांनी साखरेसोबत इथेनॅाल, खत आणि ॲाक्सिजन तयार करण्याची क्षमता आणि व्यवस्था ठेवली पाहिजे. ज्या वस्तूची जशी आवश्यकता तसे उत्पादन कमीजास्त करीत राहिले पाहिजे. बायडेन यांनी आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या शंभर दिवसतच 30 कोटी जनतेला लस टोचायचा संकल्प सोडला आहे. त्यामुळे कच्चामाल त्यांचा त्यांनाच हवा आहे, अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे आपणही इतर देशांनी तयार केलेल्या लसींच्या खरेदीच्या विचारात आहोत. लसनिर्मितीची गती वाढावी यासाठी बायडेन यांनी जॅानसन ॲंड जॅानसन यांनाही तातडीने लसनिर्मिती करण्यास अनुमती दिली. फायझर आणि मॅाडेर्ना यांच्या सोबतीला आता ही नवीन कंपनीही आली आहे. पण लस तयार करण्याचे काम जून महिन्याचे अगोदर सुरू होणार नाही. त्यामुळे असे दिसते की, जोपर्यंत अमेरिकेची स्वत:ची लसी बाबतीतली गरज पूर्ण होत नाही, तोपर्यंत अमेरिका आणि युरोपकडून कच्चामाल आश्वासनानंतरही कसा मिळणार हा प्रश्न अनेकांना सतावतो आहे. पर्याय शोधणेही कठीणच आहे. कमी प्रतीचा माल मिळू शकेल पण तो वापरण्यात धोका आहे. लसनिर्मितीसाठी आवश्यक कच्चामाल १) अँटिव्हायरल एजंट्स - हे औषधी गुण असलेले पदार्थ असून त्यांचा उपयोग व्हायरसवर नियंत्रण मिळविण्यासाठी केला जातो. यांचे व्हायरसशी वितुष्ट असते. व्हायरसच्या जीवनचक्राच्या निरनिराळ्या अवस्थांवर त्यांचा परिणाम होतो. ते व्हायरसला नष्ट करू शकत नसले तरी त्याच्या जीवनचक्रातील निरनिराळ्या अवस्थांना आवर घालू शकतात. एकच औषध सर्व प्रकारच्या व्हायरसवर परिणाम करू शकत नसले तरी ते व्हायरसांच्या एका मोठ्या गटाचा विकास थोपवू शकते. अशी औषधे तयार करणारे प्रकल्प अमेरिका आणि युरोपात आहेत. २) ॲंटिसेप्टिक लिक्विड्स- हे पदार्थ त्वचेवरील बॅक्टेरियांना तसेच पाण्यातील बॅक्टेरियांना सुद्धा नष्ट करतात. आपल्या परिचयाचे डेटॅाल हे अशा प्रकारचे एक ॲंटिसेप्टिक आहे. ३) स्टराईल्ड वॅाटर म्हणजे जंतुविरहित पाणी हे सांगायला नको. ४) खुद्द कोविड-19 च्या डिएनएमधील काही घटक - व्हायरसच्या शरीरात दोन मूलभूत घटक असतात. एक न्युक्लिक ॲसिड. हे एकपेडी किंवा दोनपेडी असू शकते. एकपेडीला आरएनए म्हणतात. पीळ घातलेल्या शिडीसारखे दोन पेड असतील तर त्याला डिएनए असे नाव आहे. यावर प्रोटीनचे संरक्षक आवरण असते. त्याला कॅपसिड असे नाव आहे. आरएनए, डिएनए, कॅपसिड यासारखा कोणता घटक लस तयार करण्यासाठी निवडला जातो त्यावरून त्या लसीचे नाव आणि वेगळेपण ठरते. जगात ज्या लसी तयार झाल्या आहेत, त्या यासारखा कोणतातरी एक घटक निवडून तयार केल्या आहेत. लस टोचताच आपल्या शरीरात यांची प्रतिपिंडे (ॲंटी बॅाडीज) महिन्याभरात बऱ्याच प्रमाणात तयार होतात. अशाप्रकारे व्हायरसचा प्रतिकार करू शकतील अशा सैनिकांच्या किंवा कमांडोज तुकड्याच जणू तयार होतात. लस टोचलेली असेल तर व्हायरसचा संसर्ग होताच या कमांडोजना त्याची चटकन ओळख पटते आणि ते त्याच्यावर हल्ला करून त्याचा फडशा पाडतात. लस घेतल्यावरही कधीकधी व्हायरसचा संसर्ग झाला की आपण आजारी पडूही पण ॲाक्सीजन वा व्हेंटिलेटर लागण्याइतके प्रकरण गंभीर होणार नाही. आपण नेहमीप्रमाणे औषध घेऊन बरे होऊ. काहीतर आजारीही पडणार नाहीत. आपल्या नकळतच हे कमांडो/ॲंटी बॅाडीज/प्रतिपिंडे यांनी लढाई जिंकलेलीही असेल! आपल्या शरीरातील संरक्षणयंत्रणा अनेक रोगजंतूंचा समाचार रोजच घेत असते. युद्ध लढले आणि जिंकले जात असते. आपल्या मात्र हे गावीही नसते. आपण आजारी पडतो तेव्हा या संरक्षणयंत्रणेला साह्याची गरज पडते. अशावेळी औषधे घेऊन आणि पथ्य पाळून हे साह्य देता येते. रोगजंतू नवीन असेल तर त्यांच्याशी कसे लढावे याचे यांना प्रशिक्षण अगोदर मिळालेले नसल्यामुळे आजार बळावतो आणि आपल्याला दवाखान्यात दाखल व्हावे लागते. साथ असेल तर आपण लस तयार करतो आणि तिच्याशी लुटुपुटूची लढाई करून हे कमांडो शक्तिशाली जंतूंशी लढण्यास सज्ज होत असतात. म्हणून ही लसीकरणांची मोहीम! जीवशास्त्रीयदृष्ट्या सांगायचे झाले तर ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचाच प्रसंग’ हे मानवी जीवनातील एक वेगळेच वास्तव आहे. हे युद्ध लसीकरणाच्या मोहिमेत सुसूत्रता आणि सातत्य राखत पूर्णत्वाला नेण्याचे शिवधनुष्य आपल्याला पेलायचे आहे.

No comments:

Post a Comment