Thursday, July 1, 2021

पत्निपरायण फिलिप वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? इंग्लंडच्या राणीचे नवरेपद सांभाळणे ही खचितच साधीसुधी बाब नव्हती. प्रिन्स फिलिप हा तसा ड्यूक ॲाफ एडिंबरो! जन्म दिनांक 10 जून 1921 आणि मृत्यू दिनांक 9 एप्रिल 2021. म्हणजे शतक 2 महिन्यांनी हुकले. वयाच्या 99 व्या वर्षी कोरोना आणि हृदयविकार अशा दोन्ही आघाड्यांवर त्याचा मृत्यूशी संघर्ष सुरू होता. राणी एलिझाबेथ आणि फिलिप यांचे वैवाहिक जीवन मोजून 73 वर्षांचे होते. त्यापैकी 68 वर्षे एलिझाबेथ राणी पदावर होत्या. फिलिप हा राजपुत्र. याची बायको कोण? तर ब्रिटनची राणी! पण म्हणून हा राजा नाही, तर हा राणीचा नवरा!! भुरळ पाडणाऱा लढवैय्या! फिलिपचा जन्म ग्रीसमधला. हद्दपारीनंतर फिलिपचे कुटुंबीय फ्रान्समध्ये स्थायिक झाले. पण इंग्लिश, फ्रेंच आणि जर्मन भाषाच त्याला ग्रीकपेक्षा चांगल्या येत होत्या. तरूणवयात तो धार्मिक सुधारणाविषयक चळवळीत सामील झाला होता. 1939 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी तो नेव्हीत दाखल झाला. त्याचे व्यक्तिमत्व भुरळ पाडणारे होते. दुसऱ्या महायुद्धात मोजून 7 लढायात त्याने वाखाणण्यासारखा पराक्रम गाजवलेला होता. प्रेमी युगुल ब्रिटिश राजकन्या एलिझाबेथ द्वितीय हिच्याशी फिलिपची पत्रमैत्री झाली. पुढे मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. 20 नोव्हेंबर 1947 ला 26 वर्षांचे फिलिप यांना, एलिझाबेथ 21 वर्ष वयाची झाल्यानंतरच, तिच्याशी विवाह करण्याची संमती मिळाली. पण त्यांनी विवाहानंतर नौदलातील नोकरीचा राजीनामा मात्र 1952 साली म्हणजे एलिझाबेथ राणी झाल्यानंतरच दिला. कारण ब्रिटनमध्ये राणीच्या नवऱ्याने राणीच्याच आधिपत्याखालील नौदलात नोकरी करणे मान्य होण्यासारखे नव्हते. फिलिप यांनी राजेशाही आणि लोकशाही या दोन परस्परविरोधी बाबीत सुरेख समतोल साधला. राजीनाम्यानंतर ते सामाजिक, सांस्कृतिक आणि खेळ व क्रीडाविषयक कार्यक्रमातच उत्साहाने सहभागी होऊ लागले. अशा हजारो कार्यक्रमांची नोंद नोंदवीत त्यांनी 2017 साली सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली. एलिझाबेथकडे सम्राज्ञीपद कसे आले? एलिझाबेथ हिचे काका किंग एडवर्ड (आठवे) यांनी प्रेमासाठी राजघराण्याचा त्याग केल्यामुळे एलिझाबेथ यांच्या वडलांकडे म्हणजे सहाव्या जॅार्ज यांच्याकडे सम्राटपद गेले. त्यांना अकालीच म्हणजे 57 व्या वर्षीच मरण आले आणि एलिझाबेथ 1952 साली राणीपदी विराजमान झाल्या. फिलिप यांचे वेगळेपण आपल्या पत्नीच्या कर्तृत्वाला आणि कीर्तीला सतत उजाळा मिळत रहावा यासाठी स्वत:च्या कर्तृत्वाला तिलांजली देणारा हा राणीचा नवरा जगाच्या इतिहासात विरळाच म्हटला पाहिजे. प्रत्येक समारंभात राणीबरोबर उपस्थित तर रहायचे पण तिच्यापेक्षा दोन पावले सतत मागे राहतांना फिलिप यांची प्रसन्न मुद्रा कधीही कोमेजली नाही. क्वचित कुणी त्यांचा सत्कार करू लागला तर आपल्या पत्नीकडे हास्यमुद्रेने अंगुलीनिर्देश करण्यासही ते कधी चुकले नाहीत. आपली पत्नी एक सम्राज्ञी आहे आणि आपल्याला सतत तिच्या पाठीशी राहूनच तिची साथ करायची आहे, हे भान त्यांना सतत असे. यासाठी आवश्यक असे एक वेगळ्याच प्रकारचे व्यक्तिमत्त्व त्यांनी आपल्या अंगी बाणवले होते, मुळात स्वत:ही पराक्रमी आणि कर्तृत्वशाली असतांना सुद्धा! बहुदा या अलौकिकतेमुळेच जगाने त्यांच्या निधनाची विशेष नोंद घेतली असावी, हळहळ व्यक्त करीत श्रद्धांजली वाहिली असावी. एलिझाबेथ सम्राज्ञी झाल्या पण फिलिप सम्राट म्हणून गणले गेले नाहीत. ते होते राणीचे पती. त्यावेळचा ब्रिटिश समाज सनातनी, पितृसत्ताकवादी, पुरुषी अहंकाराने बरबटलेला होता. फिलिप मात्र याच्या विरुद्ध मनोभूमिकेचे होते. त्यांची गणना प्रगल्भ पुरोगामी व्यक्तींमध्ये होते. त्यांचे स्त्रीदाक्षिण्य, ‘आफ्टर यू मॅडम’ म्हणून महिलांना अगोदर वाट करून देण्यापुरते सीमित किंवा ढोंगी नव्हते. एलिझाबेथ यांनी 1952 साली राणीपदाचा मुकुट धारण केल्यानंतर फिलिप यांनी आपली सार्वजनिक जीवनातील भूमिका दुय्यम आहे याचा स्वत:ला कधीही विसर पडू दिला नाही. कर्तृत्वशाली पुरुषासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या, आपले स्वतंत्र अस्तित्व दांपत्यजीवनात पूर्णत: विलीन करणाऱ्या महिलांची अनेक उदाहरणे आढळतात. पण कर्तृत्वशाली पत्नीसाठी अशी भूमिका घेणारे किती पुरुष आढळतील? फिलिप हे असे पती होते. फिलिप आणि एलिझाबेथ यांना चार्ल्स ॲने, ॲंड्र्यू, आणि एडवर्ड अशी चार अपत्ये आहेत. 1950 मध्ये एलिझाबेथ यांची धाकटी बहीण मार्गारेट ही पीटर टाऊनशेंड नावाच्या एका घटस्फोटित वयस्कांच्या प्रेमात पडली. फिलिप यांचा या विवाहाला विरोध आहे, अशी हाकाटी माध्यमांनी त्यावेळी पिटली. पण मी प्रेमीजीवांच्या प्रेमात ढवळाढवळ करीत नसतो, असा स्पष्ट खुलासा त्यांनी केला. ‘खानदान की इज्जत’ या सारखे वृथा अभिनिवेश त्यांच्या गावीही नव्हते. फिलिप आणि भारत 1961, 1983 आणि 1997 अशी या शाही दांपत्याने भारताला तीनदा भेट दिलेली आहे. त्याअगोदर 1959 मध्ये पंतप्रधान पंडित नेहरूंनी, पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यासाठी निघालेल्या फिलिप यांचे, नवी दिल्ली विमानतळावर स्वागत केले होते. ब्रिटिश सत्तेने तुरुंगात टाकलेल्या नेत्यांनी झाले गेले विसरून जाऊन प्रत्येक वेळी त्यांचे यथोचित स्वागत केले आहे. 1961 सालच्या गणतंत्र दिवसानिमित्तच्या पथसंचलन कार्यक्रमाला हे दांपत्य प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित होते. 1961 सालचा फिलिप यांचा (तेव्हाचे) पुढे राष्ट्रपती झालेले राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या सोबतचा (मद्रास येथील) फोटो प्रसिद्ध झाला होता. त्यात एका उघड्या कारमध्ये हे दोघे मागच्या सीटवर बसलेले दाखविले होते. या भेटीत या दांपत्याने मुंबई, मद्रास (आजचे चेन्नाई), जयपूर, आग्रा आणि कोलकाता (त्यावेळचे कलकत्ता) या शहरांना भेटी दिल्या होत्या. जयपूरच्या महाराजांनी आयोजित केलेल्या वाघाच्या शिकारीच्या कार्यक्रमात त्यांनी वाघाची शिकार केली होती. या फोटोत स्वत: फिलिप, जयपूरचे महाराज आणि महाराणी आणि शिकार केलेला आठ फूट लांबीचा मृत वाघ दिसत होता. या शिकारीनंतर त्यांच्यावर जगभर टीकेची झोड उठली होती. याचवेळी त्यांनी एका मगरीची आणि एका मेंढीचीही शिकार केली होती. पण टीका झाली ती वाघाच्या शिकारीच्या संदर्भातच. विरोधाभासाचा मुद्दा असा की, याचवर्षी फिलिप वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंडाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. दुसरी शाही भेट होती 1983 सालची, इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळातली. यावेळी त्यांचा मुक्काम राष्ट्रपती भवनात होता. एकेकाळी ब्रिटिश व्हॅाईसरॅाय यांचे हे निवासस्थान असायचे. 1997 मध्येही फिलिप राणीसह भारतभेटीवर आले होते. यावेळी या दांपत्याने पंजाबातील अमृतसर येथील जलियनवालाबागला भेट दिली होती. यावेळी त्यांनी जनरल डायर यांनी 1919 साली नि:शस्त्र नागरिकांवर बेछुट गोळीबर करून मारलेल्यांच्या स्मृतिस्थळी पुष्पचक्र वाहिले होते. स्मृतिशीलेवरील मजकुरात अंकित होते की, ही भूमी 2000 नि:शस्त्र हिंदू, शीख आणि मुस्लिम हुतात्म्यांच्या रक्ताने संपृक्त झालेली आहे. यावर त्यांचा विश्वास बसेना! “यात काही जखमीही झाले असतीलच ना?, त्याचे काय?, हा प्रसंग मला आठवतो, तेव्हा मी जनरल डायरच्या मुलासोबत नौसेनेत नोकरी करीत होतो”, असे ते म्हणाले. त्यांच्या या उद्गारांवर तेव्हा सडकून टीकाही झाली होती. काहींच्या मते फिलिप यांच्या प्रमादांची यादीच प्रसिद्ध करण्याचे काम एका टोळक्याने हाती घेतले होते. ते काहीही असले तरी प्रमाद हा प्रमादच. इतिहास अशीच नोंद घेणार. त्यातच ब्रिटिश फॅारिन सेक्रेटरींनी काश्मीरबाबत नको ते भाष्य केले. तेव्हाचे पंतप्रधान इंदरकुमार गुजराल यांनी ‘थर्ड रेट पोलिटिकल पॅावर’ या शब्दात ब्रिटिश सत्तेची संभावना करून देत ब्रिटनला त्याच्या विद्यमान दयनीय स्थितीची जाणीव करून दिली होती. असो. वयाच्या 13 व्या वर्षीच एलिझाबेथ यांना फिलिप यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली होती आणि त्यावेळीच फिलिपच्या व्यक्तिमत्त्वाने त्या प्रभावित झाल्या होत्या. भरवशाचा साथीदार ही त्यांची पारख अचूक होती. त्यांनी फिलिपवर तेव्हापासून टाकलेला विश्वास कधीही अनाठायी ठरला नाही. फिलिप हे माझे शक्तिस्रोत आणि पूर्ण विश्वासाने विसंबून राहण्याचे सुखनिधान आहे, असे राणी एलिझाबेथ यांनी म्हणून ठेवले आहे, ते उगीचच नाही. गृहे तिष्ठति स: गृहस्थ: l गृहं नयति सा गृहिणी l मथितार्थ असा की, घरात राहतो तो गृहस्थ। घराचा प्रपंच चालवते ती गृहिणी!, हे वचन काहीशा वेगळ्या अर्थाने या प्रेमी दांपत्यालाही लागू पडते, असे म्हटले तर ते चुकेल का?

No comments:

Post a Comment