My son (Ajit), and daughter-in-law (Neelam) suggested to me that I should have a blog of my own. Because of their kind suggestion, I have created this blog.
Friday, July 2, 2021
अमेरिकन निवडणुकीत रशिया, चीन आणि इराणची ढवळाढवळ
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
रशिया, चीन आणि इराण हे तिन्ही देश अमेरिकेतील निवडणूक प्रक्रियेत ढवळाढवळ करण्यासाठी निकराचे प्रयत्न करणार, हे उघड गुपित आहे. या तिन्ही देशांना डोनाल्ड ट्रंप निवडून येऊ नयेत, असे वाटते. मतदारांवर प्रभाव पडेल असा प्रचार हे देश छुपेपणाने, तसेच उघडपणेही करताहेत/करतीलही. यावर उपाययोजना करणे सोपे नाही. गेल्या निवडणुकीत रशियाने लुडबुड व हस्तक्षेप करून हिलरी क्लिंटन यांच्या विरोधात व डोनाल्ड ट्रंप यांच्या बाजूने प्रचार केला होता, असे म्हणतात आणि मानतात सुद्धा! मुख्यत: अटीतटीच्या लढती असलेल्या देशपातळीवरच्या 10/12 राज्यांच्या निवडणुकींवर या देशांचे विशेष लक्ष असणार आहे. देशपातळीवरच्या निवडणुका तीन प्रकारच्या संस्थांच्या आहेत.
अ) हाऊस ॲाफ रिप्रेझेंटेटिव्ह (हाऊस)- हे सभागृह आपल्या लोकसभेसारखे पण फक्त दोनच वर्ष मुदतीचे सभागृह आहे. त्यामुळे आता 2020 नंतर 2022 मध्ये पुन्हा हाऊसच्या निवडणुका होतील. यांना मध्यावधी निवडणुका म्हणतात. कारण तोपर्यंत 2020 मध्ये निवडलेल्या अध्यक्षाची निम्मी कारकीर्द पार पडलेली असेल. या निमित्ताने अमेरिकेत अध्यक्षाच्या कारकीर्दीबाबत एकप्रकारची जनमत चाचणीच पार पाडली जाते, असे म्हटले जाते.
लोकसंख्येला आधार मानून 50 राज्यात एकूण 435 मतदारसंघ आहेत. त्यामुळे निवडलेला प्रतिनिधी (रिप्रेझेंटेटिव्ह) आपल्या मतदार संघाचेच प्रतिनिधित्व करीत असतो. कॅलिफोर्निया या सर्वात मोठ्या राज्यातून 53 प्रतिनिधी (रिप्रेझेंटेटिव्ह) हाऊसवर निवडले जातात. तर राज्य कितीही लहान असले तरी त्याला निदान एक तरी प्रतिनिधी मिळतोच/मिळणारच. अलास्का, डेलावेअर आदी राज्ये अशी आहेत. 2016 मध्ये रिपब्लिकन पक्षाचे 241 तर डेमोक्रॅट पक्षाचे 194 उमेदवार निवडून आले होते व हाऊसमध्ये रिपब्लिकन पक्षाला बहुमत मिळाले होते. 2018 च्या मध्यावधी निवडणुकीत मात्र रिपब्लिकन पक्षाचे तब्बल 42 जागांचे नुकसान होऊन प्रतिनिधींची संख्या 241 वरून 199 पर्यंत घसरली व त्यांचे हाऊसमधील बहुमत गेले तर याचवेळी डेमोक्रॅट पक्षाच्या प्रतिनिधींची संख्या 194 वरून 235 पर्यत वर गेली आणि त्या पक्षाचे हाऊसमध्ये बहुमत निर्माण झाले. एक अन्य उमेदवारही निवडून आला.
ब) सिनेट- सिनेटसाठी लोकसंख्या हा आधार नाही. तर राज्य हा आधार आहे. त्यामुळे सिनेटर संपूर्ण राज्याचे प्रतिनिधित्व करीत असतो. प्रत्येक राज्याला 2 सिनेटर असा सरळसोट नियम आहे. 1913 पर्यंत, म्हणजे 1788 मध्ये राज्यघटना (बिल ॲाफ राईट्स) पारित झाल्यानंतरची पहिली125 वर्षे, राज्याचे विधानसभागृहच सिनेटरची निवड करीत असे. पण यात भ्रष्टाचार होऊ लागला. म्हणून राज्यातील सिनेटर्सची निवड राज्यातील सर्व मतदार करतील, अशी घटनादुरुस्ती करण्यात आली. आणि सिनेटमध्ये राज्याचे खरेखुरे व प्रत्यक्ष प्रतिनिधित्व निर्माण झाले.
राज्य कितीही मोठे किंवा लहान असो. राज्यागणिक दोनच सिनेटर असणार. यामुळे बड्या राज्यांचा बडेजाव निर्माण होत नाही. जसे कॅलिफोर्निया या विशाल राज्याला जसे 2 सिनेटर, तसे छोट्याशा डेलावेअरलाही दोनच. तसेच यामुळे प्रत्येक राज्याचे मतमूल्य सिनेटमध्ये सारखेच असते. तसेच त्यामुळे सिनेटमध्ये, 50 राज्यांचे प्रत्येकी 2 याप्रमाणे 100 सिनेटर असतात. आपल्या राज्यसभेप्रमाणे, हे 6 सहा वर्ष मुदतीचे पण कायम सभागृह आहे. कारण दर दोन वर्षानंतर सहा वर्ष पूर्ण झालेले एकतृतियांश (दोनदा 33 व एकदा 34) सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी 33/33/34 सदस्य निवडून येतात. 2016 मध्ये 34 सदस्यांच्या निवडीनंतर सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे 52 तर डेमोक्रॅट पक्षाचे 46 व 2 अन्य असे बलाबल झाले. व हाऊसप्रमाणे सिनेटमध्येही रिपब्लिकन पक्षाचे बहुमत निर्माण झाले. 2018 मध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 52 ऐवजी 53 सिनेटर्स झाले. डेमोक्रॅट पक्षाचे सिनेटर्सही 1 ने वाढून 47 झाले. अशाप्रकारे सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत एकने वाढले. 2020 नंतर 2022 मध्ये 33 सिनेटर निवृत्त होतील आणि त्यांच्या जागी नवीन सिनेटर्स निवडून येतील.
क) इलेक्टोरल कॅालेज - अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या जोडगोळीची निवड करणे एवढेच या मतदारसंघाचे (कॅालेजचे) कार्य आहे. हे कार्य पार पडताच याची इतिकर्तव्यता पार पडून या अत्याल्पायू मतदारसंघाचे विसर्जन होते. ही अप्रत्यक्ष निवडणूक आहे. म्हणजे मतदार अध्यक्ष व उपाध्यक्षांना प्रत्यक्ष मतदान करीत नाहीत, तर ते अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्याचा अधिकार असलेल्या 538 इलेक्टर्सची निवड करतात. इलेक्टर्सची राज्यागणिक संख्या ही हाऊसमधील प्रतिनिधींची संख्या अधिक 2 (सिनेटर्सची संख्या) इतकी असते. या नियमाने कॅलिफोर्नियासारख्या मोठ्या राज्याला 53+2= 55 इलेक्टर्स निवडून द्यायचे असतात. तर अलास्का, डेलावेअर सारख्या लहान राज्यांना 1+2=3 इलेक्टर्स निवडून देता येतात. पण ही बेरीज हाऊसमधील प्रतिनिधींची संख्या 435 + सिनेटमधील सिनेटर्सची संख्या 100 = 535 इतकीच होते. मग उरलेल्या 3 चे काय?
अमेरिकेची राजधानी वॅाशिंगटन डी.सी. चा 50 राज्यांमध्ये समावेश नाही. हा भूभाग डिस्ट्रिक्ट ॲाफ कोलंबियाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा भूभाग मेरीलॅंड आणि व्हर्जिनिया या राज्यातून कोरून अलग केला आहे. कॅपिटल, व्हाईट हाऊस आणि सर्वोच्च न्यायालय याच भागात आहेत. एक विशेष बाब म्हणून याच्या वाट्याला 3 इलेक्टर्स आले आहेत. असा 535+3= 538 हा इलेक्टर्सचा हिशोब आहे.
इलेक्टर्स निवडायची पद्धतीही वेगळी आहे. तिला स्लेट पद्धती (पाटी पद्धती) असे म्हणतात. प्रत्येक राजकीय पक्ष आपल्याला अभिप्रेत असलेल्या इलेक्टर्सची यादी जणू एका पाटीवर लिहून ती जाहीर करतो. कॅलिफोर्नियासारख्या मोठ्या राज्यात प्रत्येक पक्षाच्या पाटीवर 55 नावे असतील. तर अलास्कासारख्या सर्वात लहान राज्याच्या पाटीवर फक्त 3 नावे असतील. मतदार उमेदवाराला नव्हे तर पक्षाला (पक्षाच्या पाटीला) मतदान करतात. अशाप्रकारे पाटीच (म्हणजे त्यावर नावे असलेले सर्व उमेदवार) निवडून येते किंवा पडते. या न्यायाने कॅलिफोर्नियात एकतर डेमोक्रॅट पक्षाचे 55 इलेक्टर्स निवडून येतील नाहीतर रिपब्लिकन पक्षाचेतरी 55 इलेक्टर्स निवडून येतील.
ड) पॅाप्युलर व्होट (जनमत) - राज्यातील सर्व मतदार आपल्या राज्यातील पाटीला मतदान करतात. 2016 मध्ये कॅलिफोर्नियात डेमोक्रॅट पक्षाला (पक्षाच्या पाटीला) 61 % मते मिळाली होती तर रिपब्लिकन पक्षाला (पक्षाच्या पाटीला) 33 % मते मिळाली होती. उरलेली 6 % मते इतर छोट्या पक्षांच्या पाट्यांमध्ये विभागली गेली होती. म्हणून कॅलिफोर्निया राज्यातून डेमोक्रॅट पक्षाच्या पाटीवरचे सर्व 55 उमेदवार इलेक्टर म्हणून निवडून आले. रिपब्लिकन पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. अनेकदा जिंकणाऱ्या आणि हरणाऱ्याच्या टक्केवारीत अत्यल्प फरक असतो. परकीय शक्ती अशा संभाव्य राज्यांची निवड प्रभाव टाकण्यासाठी करतात. रिपब्लिकन पक्षाने घरोघर जाऊन आपल्याला अनुकूल असलेल्या नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी करण्याची मोहीम युद्धस्तरावर हाती घेतली आहे. अमेरिकेत मतदानदिनीसुद्धा मतदारनोंदणी करून मतदान करता येते. कोरोनाच्या भीतीने डेमोक्रॅट कार्यकर्ते मात्र घरोघर जाण्याचे टाळत आहेत.
अशाप्रकारे संपूर्ण देशातून एकूण 538 इलेक्टर्स निवडून येतात. यात ज्या पक्षाचे किमान 270 इलेक्टर्स निवडून येतील त्या पक्षाची अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची जोडगोळी निवडून येईल, हे उघड आहे. 2016 मध्ये रिपब्लिकन पक्षाचे 306 इलेक्टर्स निवडून आले होते तर डेमोक्रॅट पक्षाचे 232 इलेक्टर्स निवडून आले होते. पण रिपब्लिकन पक्षाचे 2 आणि डेमोक्रॅट पक्षाचे 5 इलेक्टर्स फेथलेस (अविश्वसनीय/दलबदलू) निघाले. त्यांची राज्यनिहाय संख्या अशी होती. वॅाशिंगटन 4, टेक्सास 2, आणि हवाई 1. त्यांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांना मत दिले नाही. पण अशा इलेक्टर्सवर नियमानुसार कारवाई करता येत नाही.
म्हणून डोनाल्ड ट्रंप हे अध्यक्षपदी तर जोडीदार मायकेल पेन्स हे उपाध्यक्षपदी 306 नव्हे तर त्यातील दोन मते कमी होऊन 304 मते मिळवून विराजमान झाले. तर याच न्यायाने 232 नव्हे तर त्यातील पाच मते कमी होऊन 227 मते मिळवून अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन व उपाध्यक्षपदाचे उमेदवार टिम केन पराभूत झाले. बहुसंख्य राज्येही (30/21)रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने होती. मतांचा विचार केला तर मात्र हिलरी क्लिंटन यांना 6,58,53,514 (6 कोटी, 58 लक्ष, 53 हजार, 5 शे 14 म्हणजे 48.18 % पॅाप्युलर व्होट्स होती तर डोनाल्ड ट्रंप याना 6,29,84,828 (6 कोटी, 29 लक्ष, 84 हजार, 8 शे, 28) म्हणजे 46.09 % पॅाप्युलर व्होट्स होती. म्हणजे हिलरी क्लिंटन यांना डोनाल्ड ट्रंप यांचेपेक्षा 28 लक्ष, 68 हजार, 6 शे 86 मते जास्त होती. म्हणजे अमेरिकन जनमत हिलरी क्लिंटन यांच्या बाजूचे होते पण डोनाल्ड ट्रंप यांना 304 - 227 = 77 इलेक्टोरल व्होट्स जास्त होती. ज्याला इलेक्टोरल व्होट्स जास्त तो निवडून येईल, असा नियम असल्यामुळे डोनाल्ड ट्रंप यांना विजयी घोषित करण्यात आले. असे आजवर पाचवेळा झाले आहे. पण आपल्या माहितीत असे 2000 साली घडले आहे. गोर यांना 48.4% पॅाप्युलर व्होट्स होती तर बुश यांना 47.9 पॅाप्युलर व्होट्स होती. पण बुश यांना गोरपेक्षा इलेक्टोरल व्होट्स जास्त असल्यामुळे (271/266) ते निवडून आले होते
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment