Friday, July 2, 2021

न्यायाधीशाची नेमणूक - अमेरिकन स्टाईल! वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश क्लेरेन्स थॅामस यांनी ॲमी बॅरेट यांना, घटनेनुसार घ्यायची शपथ, सोमवार दिनांक 26 ॲाक्टोबर 2020 रोजी देवविली. अडथळे, विरोध, निदर्शने, अडचणी यावर मात करीत आणि शिवाय प्रदीर्घ मुलाखतीचे दिव्य हा सर्वात महत्त्वाचा टप्पा त्यांनी ओलांडल्यानंतर, नियुक्ती दिनांकानंतर 30 दिवसात, निवडणूक दिनांकाच्या एक आठवडा अगोदर आणि सिनेटने मान्यता दिल्यानंतर तासाभरातच, शपथविधी पार पडून रिपब्लिकन पक्षाचं घोडं एकदाचं गंगेत न्हालं. ॲमी कॅान्ली बॅरेट यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाच्या तहाहयात नियुक्तीला अमेरिकन सिनेटने 51 विरुद्ध 48 अशा निसटत्या मताधिक्याने का होईना पण मान्यता दिली होती. विशिष्ट अनुभव असलेल्या न्यायाधीश, वकील, किंवा प्रतिष्ठित कायदेपंडितांमधून, अध्यक्षांनी निवड केलेल्या व्यक्तीची सिनेटने विस्तृत मुलाखत (यावेळी तर सतत चार दिवस चाललेली) घ्यायची असते. यानंतर या निवडीवर बहुमताने निर्णय घ्यायचा असतो. अशाप्रकारे निवड झाल्यानंतर, मृत्यू झाल्यास, राजीनामा दिल्यास, निवृत्ती घेतल्यास, किंवा महाभियोगानंतर अपात्र ठरविले गेल्यासच त्या न्यायाधीशांची कारकीर्द संपते, एरवी नाही. व्यक्तीच्या अधिकाराचे रक्षण, धार्मिक स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, माध्यमांचे स्वातंत्र्य, संघटन स्वातंत्र्य, शस्त्र बाळगण्याचे स्वातंत्र्य, ज्युरीद्वारे खटला चालविला जाण्याचा अधिकार, निजतेचा (प्रायव्हसी) अधिकार, गुलामगिरीपासूनचे स्वातंत्र्य, नागरिकतेचा अधिकार, मतदानाचा अधिकार, हे आणि असे विषय हाताळण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची आहे. सर्वोच्च न्यायालय हे अमेरिकेतील सर्वात श्रेष्ठ न्यायासन आहे. डेमोक्रॅट पक्षाचा विरोध आणि बॅरेट यांची भूमिका विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ॲमी कॅानली बॅरेट यांची निवड केल्यानंतर डेमोक्रॅट पक्षाने आक्षेप घेऊन ही निवड निवडणुकीनंतर अध्यक्षपदी निवडून येणाऱ्या व्यक्तीनेच करावी असा आग्रह धरला होता. तो डोनाल्ड ट्रंप यांनी अर्थातच फेटाळून लावला. त्यानंतर त्यांची नियुक्ती कायम करण्यासाठी प्रथम 22 सदस्यांच्या (12 रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधी तर 10 डेमोक्रॅट पक्षाचे प्रतिनिधी) सिनेटसमितीसमोर बॅरेट यांची मुलाखत सुरू झाली आणि समिताच्या शिफारसीला पूर्ण सिनेटची 51 विरुद्ध 48 मान्यताही मिळाली. ह्या बाबींना प्रसारमाध्यमात महत्त्वाचे स्थान मिळणे ओघानेच सुरू झाले होते. ॲफोर्डेबल केअर ॲक्ट, कोरोनाची साथ, समलिंगींचे प्रश्न या प्रश्नांबाबत अमेरिकन जनमत राजकीय पक्षांप्रमाणेच दुभंगलेले असून बॅरेट यांची मते रिपब्लिकन पक्षाच्या मतांशी मिळतीजुळती आहेत. सनातनी अमेरिकन जनमतही रिपब्लिकन पक्षाच्या भूमिकेला अनुकूलच आहे. न्यायालयात उजवीकडे झुकलेल्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा डोनाल्ड ट्रंप यांचा हा प्रयत्न आहे, अशी गरामागरम चर्चाही सुरू झाली होती. एक मात्र खरे की, या नियुक्तीच्या निमित्ताने दोन्ही पक्षांच्या परस्परविरोधी भूमिका अनायासेच प्रचारात आल्या आहेत. सिनेटमधील डेमोक्रॅट पक्षाचे नेतृत्व उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस करीत होत्या. मुलाखतीदरम्यान बॅरेट यांनी डेमोक्रॅट पक्षाची त्यांच्याबद्दलची टिप्पणी शांतपणे ऐकून घेतली होती. नंतर उत्तरादाखल त्या एवढेच म्हणाल्या होत्या की, ॲफोर्डेबल केअर ॲक्ट, कोरोनाची साथ, वांशिक कटुता आणि समलिंगींचे विवाहादी प्रश्न, याबाबतचे आपले सर्व मुद्दे महत्त्वाचे आहेत, असे मीही मानते. पण एका फेडरल जजला असलेल्या मर्यादित अधिकारांचा विचार करता, मी याबाबत वेगळे काही करू शकले नसते. धोरणांबाबतचे वाद सोडविण्याची जबाबदारी राजकीय पक्षांची आहे. याबाबत जनतेने न्यायाधीशांकडून अपेक्षा ठेवू नयेत तसेच न्यायाधीशांनी त्यांचे मूल्य ठरविण्याच्या भानगडीतही पडू नये. असे उत्तर देत त्यांनी या प्रश्नांना बगल तर दिलीच, पण याचवेळी आपल्या सनातनी पाठिराख्यांना द्यायचा तो संदेश देऊन त्या नामानिराळ्याही राहिल्या आहेत. ‘माझ्या समजुतीप्रमाणे सर्व अमेरिकनांना स्वतंत्र वृत्तीचा न्यायाधीश हवा आहे. घटना आणि कायदे जसे लिहिले आहेत, त्याप्रमाणे त्यांचा अर्थ उलगडून सांगणे हे आणि एवढेच त्याचे काम आहे. ही भूमिका पार पाडून मी देशाची सेवा करू शकेन असा मला विश्वास आहे’, असे म्हणून त्यांनी आपले उत्तर आटोपते घेतले होते. मुलाखत आणि निवडणूक प्रचार सतत चार दिवस सिनेटसमोर सुरू असलेल्या मुलाखतीला तशीच प्रसिद्धी मिळत होती आणि रिपब्लिकन पक्षाचा प्रचारही ओघानेच होत होता. सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असल्यामुळे, अध्यक्षांनी केलेल्या बॅनेट यांच्या निवडीला मान्यता मिळेल यात शंका नव्हतीच. या नियुक्तीनंतर एकूण 9 न्यायाधीशांमध्ये 6 उजव्या विचारसरणीचे तर 3 डाव्या विचारसरणीचे न्यायाधीश असतील, असे मानले जाते. या वर्षीची अमेरिकन अध्यक्षाची निवडणूक अटीतटीची आणि वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. असे झाल्यास हा गुंता बहुदा सर्वोच्च न्यायालयालाच सोडवावा लागेल. रिपब्लिकन पक्ष या नेमणुकीबाबत आग्रही का होता आणि डेमोक्रॅट पक्ष निवडणुकीनंतरच न्यायाधीशाची नेमणूक करण्यावर का भर देतो होता, हे आता लक्षात येते. निवडणुकीनंतर, कुणी सांगावे, सिनेटमध्ये डेमोक्रॅट पक्षाचे बहुमत निर्माण होईलही, असे डेमोक्रॅट पक्षाला वाटत असावे, नव्हे वाटत असेलच. म्हणूनच तर डेमोक्रॅट पक्ष एकीकडे अगदी टोकाची भूमिका घेत निवडीला विरोध करीत होता. पण प्रत्यक्षात मात्र, 2 लाख नागरिकांचा बळी घेणाऱ्या कोरोनाकडे आणि जगणे कठीण करणाऱ्या आर्थिक मंदीकडे पार दुर्लक्ष करीत रिपब्लिकन पक्ष ही नेमणूक करीत आहे, असा त्यांचा आरोप होता. सिनेट आणि डोनाल्ड ट्रंप यांना न्यायालयाचा तोल उजवीकडे आणि रिपब्लिकन पक्षाकडे वळवायचा आहे तसेच पुराणमतवाद्यांची न्यायव्यवस्थेतील तटबंदी निदान काही दशकांसाठी नक्की करायची आहे, असा डेमोक्रॅट पक्षाचा आरोप होता, तर या नेमणुकीत घटनाबाह्य असे काहीही नसून, माजी उदारमतवादी न्यायाधीश रुथ बदर गिन्सबर्ग यांच्या ॲमी बॅरेट या योग्य वारसदार ठरतील, असा रिपब्लिकनांचा दावा आहे. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयातील एक तहाहयात नियुक्ती झालेल्या जस्टिस, रुथ बदर गिन्सबर्ग. 27 वर्षांच्या सेवेनंतर वयाच्या 87 व्या वर्षी 29 सप्टेंबर 2020 ला निधन पावल्या. या एका थोर महिला न्यायाधीश व्यक्तीची जागा त्याच गुणवत्तेच्या दुसऱ्या तशाच महिला न्यायाधीश व्यक्तीने भरून निघत आहे, असाही रिपब्लिकन पक्षाचा दावा आहे. महिलांचे निषेध मोर्चे उघड आणि आभासी पद्धतीनेही निषेधाचे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. बड्या धेंडांच्या संबंधातले होते, म्हणून बलात्कार करणाऱ्यांच्या बाजूने ॲमी बेरट यांनी निकाल दिला, अशा आशयाची एका पीडितेची टीकाही सध्या विशेष प्रसिद्धी पावत होती. पण रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असलेल्या सिनेटच्या न्यायिक समितीने टीका, विरोध आणि बहिष्कार यांच्याकडे साफ दुर्लक्ष करीत आपला अहवाल संपूर्ण सिनेटकडे मान्यतेसाठी पाठविला. नवीन अध्यक्षाची निवड तोंडाशी आली असतांना यापूर्वी अशी नेमणूक यापूर्वी कधीही झाली नव्हती, हे खरे असले तरी यात बेकायदेशीर असे काहीही नाही, तसेच असा प्रसंगही एवढ्यात उद्भवला नव्हता, हेही खरे आहे. बॅरेट या कॅथोलिकपंथीय ख्रिश्चन असून त्या आदर्श पुराणमतवादी आणि धार्मिक महिला आहेत, हे सांगण्यासही रिपब्लिकन पक्ष चुकला नाही. सिनेटमध्ये नेमणुकीच्या विरोधात नेटाने लढत देत असलेल्या आणि उपाध्यक्षपदाच्या उमेदवारही असलेल्या कमला हॅरिस यांनी मतदानात मात्र भाग घेतला नाही. राजकीय चातुर्य म्हणतात, ते हेच तर नसेल ना? कारण एवीतेवी नियुक्ती होणारच असेल तर विरोधी मत देऊन सनासनी अमेरिकन मतदारांचा रोष आणखी कशाला ओढवून घ्या? हा आपला फक्त अंदाज! दुसऱ्याच्या मनातलं कुणाला कधी कळलय का?

No comments:

Post a Comment