Friday, February 5, 2016


       पहिलीत प्रवेश केव्हा,कसा आणि का ?   
  मुलाला पहिल्या वर्गात केव्हा प्रवेश द्यावा या बाबत २००९ च्या शिक्षण हक्क कायद्यात तरतूद आहे. प्रवेशासाठीचे वय सहा वर्षे इतके असावे, अशी ही तरतूद आहे. आज पहिल्या वर्गात प्रवेशासाठीचे वय पाच वर्षे इतके असावे, अशी तरतूद आहे. त्यामुळे २०१४-२०१५ या वर्षात पाच वर्ष वयाची मुले पहिलीत शिकत आहेत.२०१५-२०१६ मध्ये ही मुले सहा वर्षांची होऊन दुसरीत जातील, हे ओघानेच आले. तसेच पहिलीत जर आजपर्यंत प्रवेशाचे वय पाच वर्षे इतके होते तर आज (२०१४- २०१५) सिनीअर केजी मध्ये आलेली मुले चार वर्ष वयाची असणार हे उघड आहे. तसेच ज्युनिअर केजी मध्ये आज ( २०१४-२०१५) आलेली मुले तीन वर्ष वयाची असणार हे उघड आहे. 
                           संक्रमणावस्थेतील प्रश्न आणि अडचणी
       सध्या संक्रमणावस्था चालू आहे. जी मुले २०१५-२०१६ मध्ये पहिलीत प्रवेशासाठी येतील त्यांचे वय पाच वर्षे असेल. त्यांना शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार प्रवेश देतां येणार नाही. त्यांना हे वर्षभर सिनीअर केजीच्या वर्गातच बसवावे लागेल. तसेच जी मुले २०१५-२०१६ मध्ये सिनीअर केजीत प्रवेश घेतील त्यांचे वय चार वर्षे असेल. त्यांचेबाबतीतही अशीच अडचण पुढील वर्षी येणार आहे. 
     यांवर उपाय कोणता? ज्युनियर केजीत प्रवेशाचे वय आज तीन वर्षाचे आहे ते बदलून २०१५ पासून चार वर्षाचे करावे. म्हणजे २०१६ मध्ये ही मुले पाच वर्षांची होऊन सिनीयर केजी मध्ये आणि २०१७ मध्ये सहा वर्षांची होऊन पहिलीत जातील.
      यावर एकमत असे असू शकेल की, केजीमध्ये शिकणारी मुले संख्येने खूप कमी असतील. त्यांचा विचार कशाला करायचा? पण ही भूमिका योग्य नाही. दुसरे असे की, काही प्राथमिक शाळांना केजीचे वर्ग जोडलेलेही असतील. अशा शाळांमध्ये २०१५ मध्ये पहिलीचे वर्ग ओस पडतील कारण त्या शाळेत पहिलीत प्रवेश घेऊ इच्छिणारी सर्व/निदान बहुसंख्य मुले सहापेक्षा कमी वयाची असतील. त्यांना या नवीन नियमामुळे पहिलीत प्रवेश देतां येणार नाही. २०१६ पासून हे कमी विद्यार्थी संख्या असलेले वर्ग क्रमाक्रमाने दहावीपर्यंत जातील.
                               वय आणि वर्ग यांचे परस्परावलंबित्त्व
       प्ले ग्रुप, नर्सरी, केजी या पातळीवरच्या शिक्षणाचे नियमन करणारा कायदाच आपल्या देशात नाही.  वय आणि शाळा प्रवेश यांत निकटची संबंध आहे. नर्सरी किंवा बालवाडीत प्रवेशाचे वय तीन वर्षे इतके असावे. केजी १ चार वर्षे आणि केजी २ पाच वर्षे असे असावे. ही वये निश्चित करण्यापूर्वी या प्रश्नावर जगभर अभ्यास आणि प्रयोग झाले आहेत. मूल शाळेत प्रवेश करते म्हणजे घराच्या चार भिंती ओलांडून घरापासून काही अंतरावर असलेल्या इमारतीमधील एका खोलीत जाऊन बसते, हा अतिशय मर्यादित आणि वरवरचा भाग झाला. याचा खरा अर्थ असा आहे की ते आता समाजाचा एक अविभाज्य हिस्सा बनणार असते. समाजात मिसळण्यासाठी त्याची दोन प्रकारची तयारी होणे गरजेचे आहे. एका प्रकारची तयारी म्हणजे शारीरिक तयारी. आपल्या शी, शू, तहान, भूक विषयक व्यवहार, गरजा आणि आवश्यकता सांगण्याची क्षमता मुलात आलेली असली पाहिजे. दुसर्या प्रकारची तयारी म्हणजे मानसिक तयारी. ही जास्त महत्त्वाची आहे. घरात मूल सुरक्षित असते. घरातील सगळी माणसे त्याची मर्जी राखण्यासाठी, संभाळण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी तत्पर असतात. कुटुंब सोडवून ते फारसे दूर गेलेले नसते. तिथेही आपल्या मर्जीप्रमाणेच इतरांनी विशेषत: दुसर्या मुलांनी वागले/वावरले पाहिजे, असा त्याचा हट्ट असतो. आता मात्र शाळारूपी समाजात ही मनमानी चालणार नसते.त्यामुळे काही मुलात असुरक्षिततेची भावना निर्माण होते तर काही दांडगेपणाने आपलाच हेका चालवण्याचा प्रयत्न करतात. समाजात सगळ्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी प्रत्येकाने आपल्या स्वातंत्र्याला मुरड घातली पाहिजे हे समजायला आणि उमजायला पुरेसा वेळ देण्याची आवश्यकता असते. या दृष्टीने विचार करता शाळा हे समाजाचे लघुरूप आहे, हे लक्षात येते. या जीवनात जो रुळतो, तो जीवनात यशस्वी होण्यासाठीची पहिली अट पूर्ण करतो, शाळा प्रवेशासाठीचे वय एक वर्ष कमी काय किंवा जास्त काय असा विचार किती वरवरचा आहे यासाठी आणखीही उदाहरणे देता येतील.
                                   अभ्यासक्रमही तेवढाच महत्त्वाचा 
           वयाचा मुद्दा जसा महत्त्वाचा आहे तसाच अभ्यासक्रमाचा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे. प्रत्येक वयात मुलाचीही क्षमता काय आणि कशी असते,हे पाहून अभ्यासक्रम ठरतो. प्रयेक वयात मुलाच्या वेगवेगळ्या क्षमता विकास पावत असतात. या विकसाला पोषक आणि पूरक कार्यक्रम दिले पाहिजेत. म्हणूनच मूल रांगायला लागले की त्याच्या समोर आपण त्याचे आवडते खेळणे ठेवतो. उत्तेजनाचा हा आदर्श प्रकार पुढे मात्र पालक आणि अनेकदा शिक्षकही विसरतात. 
            लहानपणी ( पाच वर्ष पर्यंत मुलांच्या हाताच्या बोटांचे स्नायू पुरेसे विकसित झालेलेच नसतात. या वयात मुलाखत लेखनक्षमता आली पाहिजे असा पालकांचा आग्रह आणि प्रयत्न असतो. योग्य पद्धतीने पेन/पेन्सील धरणे त्याला शक्य होत नाही. या वयात चित्रे रंगवणे, मातकाम करणे, क्रेयाॅन पेन्सिली वापरणे असा पर्याय असला पाहिजे.रांगोळीही उत्तम.
             मुलांना मूर्त कल्पना लवकर समजतात. चिंचोके / खडे वापरून अंकज्ञान , बेरीज, वजाबाकी शिकवा. वाचनक्षमता लवकर येते. म्हणून वाटायला अगोदर शिकवा. लेखन हे कौशल्याचे काम आहे. कौशल्य साध्य करायला वेळ लागतो.अशी अभ्यासक्रमाची आखणी असते/असायला पाहिजे. त्याचसोबत परिसराचाही अभ्यासही आवश्यक आहे.त्याच्यासारखा उत्तम शिक्षक नाही.
      थोडक्यात काय की, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, वैचारिक,भावनिक आदी क्षमता, वृत्ती, प्रवृत्ती यांचा म्हणजेच सर्वांगीण विकासाचा पाया या वयात घातला जात असतो. या मुशीच्या कोंदणात व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व फुलणार /बहरणार असते. यादृष्टीने आपण पुरेसे गंभीर केव्हा होणार?

No comments:

Post a Comment